बदामी २: बदामी किल्ला, मंडप, धान्यकोठारे आणि शिवालये

प्रचेतस's picture
प्रचेतस in भटकंती
23 Dec 2022 - 8:34 pm

बदामी १: चालुक्यांचा संक्षिप्त इतिहास आणि बदामी लेणी

खरं तर बदामी किल्ला, अगस्ती तलाव, त्याच्या काठावरील मंदिरं ही तिसर्‍या दिवशीची सफर. बदामीस पोहोचल्यावर पहिल्या दिवशी बदामी लेणी पाहून दुसरे दिवशी ऐहोळे आणि पट्टदकलची मंदिरे पाहून तिसरा दिवस थोडा आरामाचा जावा म्हणून त्या दिवशी फक्त बदामी किल्ला आणि त्याच्या आसपासचा परीसर आणि महाकूट मंदिर संकुल बघायचे ठेवले होते, मात्र ह्याच दिवशी हे सर्व बघूनही सिडलाफडी अनपेक्षितरित्या झाल्याने एक दमदार वाटचाल झाली होती. भौगोलिक सलगतेमुळे शिवाय इतरांनाही बदामी झटपट करता यावे म्हणून तिसर्‍या दिवशीच्या ह्या सफरीविषयी आधीच लिहितो आहे, याच्या पुढील लेखात सिडला फडी बघून आपण ऐहोळेतील मंदिरे बघायला जाऊ.

बदामी किल्ला

खरं तर बदामी किल्ला दोन वेगवेगळ्या पहाडांवर असल्याने त्याचे तसे दोन भाग पडतात, बदामी लेण्यांच्या वर असलेल्या किल्ल्यावर जाण्याचा मार्ग पुरातत्त्व खात्याने बंद केला आहे मात्र त्याच्या समोरील असलेल्या किल्ल्यावर मात्र सहजी जाता येते आणि बदामीच्या सफरीस आलेल्या प्रत्येकानेच ह्या किल्ल्याची अद्भूतरम्य सफर अवश्य करावी. होतं काय बरेचसे लोक सकाळी बदामी लेणी करुन दुपारी ऐहोळे पट्ट्दकल करुन रात्री मुक्कामी हंपीस जातात त्यामुळे बदामीतील ही ठिकाणे बघण्याची राहून जातात. असा घाईगडबडीचा दौरा त्या ठिकाणांनाही पूर्ण न्याय देत नाही तेव्हा बदामीस यायचे नियोजन करताना आपल्या हाती किमान अडीच दिवस असतील असे पाहूनच यावे. बदामी लेणी पाहणारे शंभरातील नव्व्याण्णव पर्यटक बदामीच्या किल्ल्याला भेटच देत नाहीत त्यामुळे समोरच गर्दीने ओसंडून वाहणार्‍या बदामी लेणीपेक्षा इथे निरव शांतता प्रकर्षाने जाणवते.

तर बदामी किल्ल्यावर जाणे तसे अत्यंत सोपे आहे. बदामीच्या मुख्य बाजारातून अगस्ती तलावाकडे जाणारे सर्वच रस्ते इथे येऊन मिळतात मात्र इथे स्वतःची गाडी घेऊन जाऊ नये. कारण येथील अरुंद आणि दाटीवाटीच्या रस्त्यावर गाडी नेणे अत्यंत कठीण. जे पर्यटक बदामीस सार्वजनिक वाहनांनी आले आहेत त्यांनी चालत किंवा रिक्षाने बदामी किल्ल्याच्या पायथ्याशी येणे श्रेयस्कर. जे लोक खाजगी वाहनांनी आलेले आहेत त्यांनी वाहन हॉटेलवरच ठेवून रिक्षाने यावे किंवा बदामी लेण्यांच्या पार्किंगला स्वतःचे वाहन लावून किल्ल्याच्या पायथ्याशी चालत सात ते आठ मिनिटात पोहोचता येते. आम्ही हाच मार्ग निवडला. अर्थात इकडे चालत यायचे म्हणजे नाक दाबूनच यावे लागते. बाजूची वस्ती बकाल आहे, सांडपाणी, डुकरे, दुर्गंधी यांच्याशी सामना करतच येथवर पोहोचावे लागते. बदामी किल्ल्यावर जाण्यासाठी लेण्यांच्या पार्किंगमधून येण्यास दोन मार्ग आहेत. एक म्हणजे येल्लम्मा मंदिरावरुन अगस्तीतलावाच्या पायर्‍यांवरुन चालत जाऊन येथे पोहोचता येते, हा सर्वात जवळचा मार्ग, मात्र काही काही ठिकाणी ह्या पायर्‍या ओलांडणे थोडे जिकिरीचे आहे. तर दुसरा मार्ग यल्लम्मा देवळाच्या इथे असलेल्या वस्तीतून चालत जाऊन येथे पोहोचता येते. वाटेत ठिकठिकाणी वस्तीतील अरुंद वळणांवर 'बदामी संग्रहालय' असे फलक आहेत.

खालील छायाचित्रात दोन्ही मार्ग दिसतील. उजवीकडचा मार्ग तलावातील पायर्‍यांचा आहे तर मशिदीच्या बाजूस डावीकडील मार्ग हा वस्तीतून जाणारा आहे.

a

अगदी पाच सात मिनिटातच आपण वस्तीतून बाहेर येतो आणि एका प्रवेशद्वारातून आत जाताच बदामी किल्ल्याच्या शांत, सुंदर वातावरणात प्रवेश करतो. किल्ल्याच्या प्रवेशद्वाराचा मार्ग जरी लहान दिसत असला तरी येथून कारसारखी वाहने सहज प्रवेश करु शकतात मात्र कारने येथवर येणेच जिकिरीचे असल्याने ते टाळावेच.

प्रवेशद्वार

a

येथून पुढे आल्यावर दिसते ती बदामी पुरातत्त्व खात्याच्या संग्रहालयाची इमारत, त्याबद्द्ल आपण पुढे वाचूच. सकाळची वेळ असल्याने आम्ही आधी बदामी किल्ला पाहून मगच वस्तुसंग्रहालय पाहायचे ठरवले. बदामी किल्ल्यावर जाण्यास प्रवेश फी नाही.

बदामी पुराणवस्तु संग्रहालय

a

ह्याच्याच डाव्या बाजूस आहे ते किल्ल्यावर जाणारे पहिले प्रवेशद्वार. दोन भव्य प्रस्तरखंडांच्या बेचक्यात हे प्रवेशद्वार आहे.

a

मंडप

ह्या प्रवेशद्वारातून आत जाताच आपला इथल्या अद्भूत जगात प्रवेश होऊन आपण त्यात जणू हरवूनच जातो. चालुक्यांचा राजा पुलकेशी(पहिला) याने इसवी ५४३ मध्ये हा बळकट किल्ला बांधला. ह्याची तटबंदी पार अगस्ती तलावाला भिडली आहे. पर पहिल्या प्रवेशद्वारातून पुढे जाताच प्रचंड मोठ्या प्रस्तरखंडांमधून एक प्रशस्त रस्ता पुढे जाताना दिसतो. हाच ह्या किल्ल्याचा राजमार्ग मात्र येथे डावीकडे एक लहानशी वाट एका बेचक्यात जाताना दिसते ही वाट न चुकवण्याजोगीच. ह्या वाटेतच लपला आहे किल्ल्याच्या टेहळणी मंडपाकडे जाण्याचा मार्ग. एकमेकांना अगदी चिकटलेल्या दोन प्रचंड खडकांच्या बेचक्यातून जेमतेम एक माणूस घसटत घसटतच कसाबसा जाऊ शकेल इतकीच अरुंद असणारी पायर्‍यांची वाट आपल्याला किल्ल्याच्या टेहळणी मंडपाकडे घेऊन जाते.

किल्ल्याच्या टेहळणी मंडपाकडे जाणारी वाट

a

a

त्या वाटेवरुन वर आल्यावर एकदम प्रशस्त असे दोन टेहळणी मंडप दृष्टीस पडतात. येथून बदामीच्या कड्याचे, बदामी गावाचे, वरचे आणि खालच्या दोन्ही शिवालयांचे सुंदर दर्शन होते.

बेचक्यातून वर आल्यावर दिसणारे टेहळणी मंडप, उजवीकडे खालच्या बाजूस किल्ल्यावर जाणारा राजमार्ग

a

अगदी समोरच दिसणारे खालचे शिवालय

a

कड्याच्या वर असणारे वरचे शिवालय

a

हे सगळे निवांत पाहून बेचक्यातून खाली येऊन परत राजमार्गाला लागलो. अतिशय भव्य कड्यांच्यामधून जाणारी वाट काही पायर्‍या चढून डावीकडे वळते. लाल, गुलाबी, काळ्या, करड्या, निळसर इत्यादी रंगांच्या विविध छटा सकाळच्या कोवळ्या उन्हात निसर्गाचे अनोखे विभ्रम दाखवत असतात.

a

a

डावीकडे वळताच कड्याच्या दोन भागांमध्ये खुबीने बनवलेले एक अत्यंत देखणे प्रवेशद्वार नजरेस पडते. प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूंस देखणे द्वारपाल कोरलेले आहेत.

प्रवेशद्वार

a

द्वारातून पुढे येताच दोन रस्ते फुटलेले दिसतात. डावीकडचा रस्ता खालच्या शिवालयाकडे जातो तर उजवीकडील रस्ता किल्ल्याच्या वरील भागात असलेल्या शिवालयाकडे जातो. दोन्ही रस्त्यांच्या मध्यभागी एका भग्न इमारतीचे अवशेष आहेत. हे बहुधा दारुकोठार किंवा शस्त्रागार असावे.

तिठा

a

खालचे शिवालय

इथून आम्ही खालच्या शिवालयाकडे गेलो. द्राविड शैलीत बांधलेल्या ह्या शिवालयाचा काल इसवी सनाच्या सहाव्या शतकातला आहे. एक छोटा प्रवेशमंडप, सभामंडप आणि प्रदक्षिणापथासह असलेले गर्भगृह अशी याची रचना, मात्र कालौघात इतर भाग पडून गेल्यामुळे आज फक्त गर्भगृह त्याच्या शिखरासहच शिल्लक राहिलेले दिसते. गर्भगृहाच्या द्वारशाखेवर नक्षीकाम असून द्वारपाल आहेत. या मंदिराचे काही काम किंवा जीर्णोद्धार विजयनगरच्या राजवटीत देखील झाले आहे.

खालचे शिवालय

a

येथून समोरील पहाडात असलेल्या बदामी लेण्यांचे, बदामी गावाचे आणि अगस्ती तलावाचे मनोरम दर्शन घडते.

a

शिवालय बघून पुन्हा मागे आलो आणि पुढील किल्ला बघण्यास निघालो. थोडे पुढे जाताच एक वाट किंचित खालती उतरुन ध्वजस्तंभाच्या बुरुजाकडे जाताना दिसते.

a

बुरुजाच्या अलीकडे जमिनीतच अंतर्गत खोदलेली एक कोठी नजरेस पडते. हे बहुधा शस्त्रागार, दारुकोठार किंवा खजिन्याची खोली असावी.

a

ध्वजस्तंभाचा बुरुज

a

बुरुजावर असलेल्या जंघ्यांमधून बदामीचा परिसर आणि खालच्या बाजूस असणार्‍या मलिगेट्टी शिवालयाचे अप्रतिम दर्शन घडते. ह्या शिवालयास जाण्याचा मार्ग गावातून असून वेळेअभावी इकडे जाता आले नाही. द्राविड शैलीत असणारे हे आणि एका विशाल प्रस्तरावर उभारलेले हे चालुक्यकालीन शिवालय अत्यंत देखणे आहे.

मलिगेट्टी शिवालय

a

आलो तसाच परत मागे येऊन किल्ल्याच्या वरच्या भागाला लागलो. थोडे पुढे जाताच वाट उजवीकडे वळून खडकातच असलेल्या अजून एका प्रवेशद्वारापाशी येते.

a

धान्यकोठारे

प्रवेशद्वारातून आत आल्यावर या अरुंद वाटेने वर येताच आपण पोहोचतो ते इथल्या धान्यकोठारांपाशी. वाटेत खडकातच गणपती, नंदी आदी मूर्ती कोरलेल्या दृष्टीस पडतात.

a

धान्यकोठारे

a

इथली धान्यकोठारे एकदम वेगळ्या शैलीची. निमुळत्या घुमटाकार आकारात खालच्या बाजूस मोठ्या प्रस्तरखंड लावून आणि वरच्या भागात लहानलहान प्रस्तरखंड खुबीने बसवून ही निर्माण केलेली आहेत. आत जाण्यास लहानसे खिडकीवजा प्रवेशद्वार असून आतून ती पोकळ आहेत.

a

वरच्या भागात जाण्यासाठी प्रस्तरांच्याच खुंट्या केलेल्या आहेत. येथे बाजूलाच काही भग्न इमारतींचे अवशेष देखील आहेत.

a

वरचे शिवालय

धान्यकोठारे पाहून वर जाताच आपला किल्ल्याच्या माथ्यावर प्रवेश होतो व वरच्या शिवालयाचे दर्शन घडते. वाटेत एक भग्न इमारत असून आतमध्ये एक बांधून काढलेली एक खोल चौकोनी विहिर आहे. विहिरीवर एक छत देखील आहे.

भग्न इमारत आणि त्यापुढे शिखर दृश्यमान असणारे वरचे शिवालय.

a

येथून पुढे जातात पूर्णरुपात सामोरे येते ते शिवालय.

अगदीच कड्याच्या टोकावर असलेल्या पूर्णपणे द्राविड शैलीत असणार्‍या ह्या शिवालयाच्या सभामंडपाचा एका बाजूचा भाग आज अस्तित्वात आहे. मंडपातून गर्भगृहाचा प्रदक्षिणापथ आहे. प्रदक्षिणापथात उजेड येण्यासाठी चक्राकार नक्षी असणार्‍या सुरेख खिडक्या आहेत.

शिवालय

a

शिवालयाच्या सभामंडपावर हत्ती, सिंह आदींच्या प्रतिकृती असून पट्टीकांवर यक्षमूर्ती तसेच कृष्णाच्या जीवनातले काही प्रसंग कोरलेले आहे. एकूणातच वैष्णव मूर्तींचे येथे प्राबल्य असल्याने हे शिवालय मूळचे विष्णू मंदिर होते की काय अशी शंका घेण्यास येथे पूर्ण वाव आहे. सभामंडपालाही प्रदक्षिणापथ आहे. असे दुहेरी प्रदक्षिणापथ असणे ही चालुक्यकालीन शैलीची विशेषता.

सभामंडपातील मूर्ती

a

शिवालयाचे समोरून दर्शन

a

वरुन दिसणारे खालचे शिवालय

a

मंदिराच्या बाह्य भागावर कोरलेला विदारण नृसिंह

a

गर्भगृहाच्या प्रदक्षिणापथात असणार्‍या चक्राकार देखण्या खिडक्या

a

a

हे शिवालय बघून परत निघालो, येथून आलो तसेच परत येऊन खाली भूतनाथ मंदिराकडे जाता येते किंवा थोडे पुढे जाऊन गुहेत असणार्‍या अंजनेय गुडीच्या मार्गाने खाली उतरून पलिकडच्या बाजूने वळसा मारून कप्पे आरभट्ट शिलालेखाच्या बाजूने खाली उतरुन भूतनाथ मंदिराकडे जाता येते. मात्र तो मार्ग इतका आकर्षक नाही त्यामुळे आम्ही ह्याच मार्गाने खाली उतरलो.

a

उतरताना पुन्हा पुन्हा अजस्त्र प्रस्तरखंडांचे दर्शन होतच होते.

a

पुराणवस्तु संग्रहालय

झपाझप उतरुन खालती संग्रहालयापाशी आलो. माणशी तिकीट पाच रूपये आहे. फोटो काढण्यास मात्र मनाई आहे. संग्रहालयात फारसे कुणी जात नाहीत मात्र हे न चुकवण्याजोगे आहे. आतमध्ये कृष्णलीला असणारी तोरणे, एका मंदिराचे दोन्ही बाजूस मूर्तीकाम असलेले एक अजस्त्र तोरण असून कित्येक चालुक्यकालीन भग्न मूर्तींचे अवशेष आहेत. मात्र येथील आवर्जून पाहण्यासारखे म्हणजे एक प्रचंड लज्जागौरी. मस्तकाच्या जागी कमल असलेली एक कुठेही भग्न न झालेली ही लज्जागौरी पाहणे म्हणजे एक अर्वणनीय अनुभव. अशीच एक लज्जागौरी महाकूट मंदिराच्या आवारात देखील आहे मात्र ती अर्धी भग्न झालेली आहे त्याबद्द्ल पुढच्या भागात येईलच. संग्रहालयाच्या आवारात देखील कित्येक मूर्ती ठेवलेल्या आहेत.

संग्रहालयची इमारत आणि किल्ल्याचे टेहळणी मंडप

a

खरे तर ह्याच भागात मल्लिकार्जुन, भूतनाथ मंदिरे आणि विष्णू गुडी बद्द्ल लिहायचे होते पण विस्तारभयास्तव त्याबद्द्ल पुढील भागात लिहिन.

क्रमशः

प्रतिक्रिया

कर्नलतपस्वी's picture

23 Dec 2022 - 10:01 pm | कर्नलतपस्वी

सुदंर वर्णन आणी मस्त फोटो. येथील पर्वतराजी व सह्याद्रीत मुलभूत फरक दिसतो. इतक्या कालावधीत या दगडांवर पाउस,उन,वारा याचा काहीच विपरीत परीणाम दिसून येत नाही.

प्रचेतस's picture

26 Dec 2022 - 7:15 am | प्रचेतस

इतक्या कालावधीत या दगडांवर पाउस,उन,वारा याचा काहीच विपरीत परीणाम दिसून येत नाही.
उलट इकडचा वालुकाश्म ठिसूळ, त्यामुळे खडकांचे विदारण पटकन होते, पण ठिसूळ असल्याने कोरायला सोपा, सह्याद्रीचा काळा बसाल्ट अत्यंत कठीण. पण खूप टिकणारा.
बदामीला ठिसूळ खडकामुळे वातावरणाचे थोडे विपरीत परिणाम दिसून येतात पण शिल्पकारांनी ऊन वारा पाऊस येऊ नये म्हणून खुबीने मूर्तिकाम केले आहे.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

24 Dec 2022 - 10:21 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

लाल रंगाने माखलेले ते सर्व दगड-प्रस्तरखंड त्यातली ती द्रवीडी शैलीची मंदिरं. कोठारे, या कोठाराच्या आकारावरुन आमच्याकडे गावात पूर्वी शेतात खळ्यावर गोव-या पावसळ्यात भिजू नये म्हणून अशी कोठा-याच्या आकार शैलीची 'कनगी' करायचे, त्याची आठवण झाली.डिक्टो अशीच असायची. बाकी. शिवालय आवडलं. दुरुन शिवलिंग दिसावे तसेच दिसतेय. विदारण नृसिंह शिल्पही आवडलं. ध्वजस्तंभाचा बुरुज तो प्रसिद्ध नाट्यगृहासारखा वाटला. किल्ल्याच्या टेहळणी मंडपाकडे जाणारी वाट सर्वच नंबर एक हाही भाग मंदिर चित्रे आणि माहिती देणारा आहे, पुढील भागाच्या प्रतिक्षेत. लिहिते राहा.

-दिलीप बिरुटे

तिथून जातांना आनंद होतो. लाल दगडाची जात वेगळी आहे. कोकणात,मंगळुरात आहेत पण ते चिरे आहेत. लगेच भेगाळतात पावसात. कोठारे मात्र काळ्या दगडात आहेत.

Bhakti's picture

24 Dec 2022 - 11:10 am | Bhakti

सुंदर भटकंती!
शिवालय, शिल्पे ,तिठा(पहिल्यांदा शब्द वाचला), धान्य कोठारे, किल्ला सुंदर.

लेखाच्या उत्कृष्टतेबद्दल वेगळे सांगणे नलगे.

हे एक वेगळंच अद्भुत विश्व आहे.

ती धान्याची कोठारे बघून विस्मय वाटला. एकावर एक दगड, अगदी वेगवेगळ्या आकाराचे (मराठीत शेप आणि साइज या दोन्हींना आकार हाच शब्द आहे का?), रचून कोंकणात गडगे बनवलेले पाहिलेत. त्यावरून चढून उडी मारताना क्वचित आख्खा गडगा खाली आणला आहे. पण ते झालं विषयांतर

तर असा वर घुमटाकार आकार होत गेलेली बंदिस्त रचना केवळ दगड रचत रचत कशी केली असेल असा अचंबा वाटतो.

आणखी एक. आधुनिक इमारती, घरे आणि त्यांच्या स्कायलाईन यांचं स्वतःचं एक सौंदर्य असतं. पण इथे त्या पुरातन शिवालयाच्या पार्श्वभूमीवर आधुनिक घरे eyesore वाटत आहेत.

हजारो वर्षे जुना हा ठेवा. त्यावेळी या रस्त्यांवर, किल्ल्यावर दैनंदिन आयुष्य कसे असेल, लोक काय संवाद करत असतील, असे उगीच मनात येत राहते.

अशीच भटकंती चालू ठेव आणि आम्हाला बसल्या जागी वृत्तांतरुपी झलक मिळत राहू दे.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

24 Dec 2022 - 12:09 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

आम्हाला बसल्या जागी वृत्तांतरुपी झलक मिळत राहू दे.

सहमत आहेच. बाय द वे, 'वृत्तांतरुपी' तल्या 'रुपी' शब्दाचा नेमका काय अर्थ असावा. हल्ली फार वाचनात येतो अशा प्रकारचा शब्द . जसे की, 'प्रेमरुपी' 'आशिर्वादरुपी' हा 'रुपी' फार गळेपडू प्रकार वाटतो मला.

-दिलीप बिरुटे

सर टोबी's picture

24 Dec 2022 - 12:56 pm | सर टोबी

बर्याच वेळेला विनाकारण विशेषण वापरले जाते. असे करतांना नेहमी वाचनात येणारी वाक्य अथवा शब्दप्रयोग वापरले जातात. आताशा जे वृत्तपत्रिय लिखाण प्रमाण म्हणून वापरावे त्याचाच दर्जा भयंकर खालावला आहे.

कशा सारखं असणं अथवा वाटणं या अर्थाने रूपी हा शब्द वापरला पाहिजे. सहलीचा आभास वाटणारी झलक म्हणायचं असेल तर सहलरूपी झलक हे चालू शकेल.

राजेंद्र मेहेंदळे's picture

16 Mar 2023 - 3:20 pm | राजेंद्र मेहेंदळे

रुपी ऐवजी मात्रे हा शब्द कसा वाटतो? दर्शनमात्रे/वाचनमात्रे तसे वृत्तांतमात्रे?

गवि's picture

24 Dec 2022 - 3:45 pm | गवि

अहो प्राडॉ सर,

वृत्तांतरुपी झलक म्हणजे शब्दरुपी तिळगूळ वगैरे.
प्रत्यक्ष ठिकाणास धावती पण थोडक्यात (झलक) भेट असे नसून अप्रत्यक्ष अनुभूति, पण ती व्हिडिओ, vlog, ऑडियो व्हिज्युअल माध्यम असे नसून लेखी वृत्तान्त या विशिष्ट रुपात.

बाकी, किती अवांतर कराल? आपल्यासारखे ज्येष्ठ सदस्य असे करताना बघून एक मिपाकर म्हणून इ इ.

गोरगावलेकर's picture

24 Dec 2022 - 12:23 pm | गोरगावलेकर

सुंदर फोटो आणि सोबत तपशीलवार वर्णन यामुळे लेख जबरदस्त झालाय.
बदामीस यायचे नियोजन करताना आपल्या हाती किमान अडीच दिवस असतील असे पाहूनच यावे
येथील सहल आखतांना माझ्यासाठी हे खूपच महत्वाचे.

सौंदाळा's picture

24 Dec 2022 - 11:19 pm | सौंदाळा

थोडा उशिरा आला पण मस्तच भाग.
उंच, अवाढव्य पाषाण बघून वेगळाच अद्भूतरम्य, गूढ माहौल वाटला.
रच्याकने बदामी नाव हे बदामी रंगाच्या खडकांमुळे पडले आहे का?
उपप्रश्न: प्राचीन काळी ढोबळमानाने उत्तर भारत हा प्रामुख्याने शैव आणि दक्षिण भारत वैष्णव असे होते का?
ऐहोळे आणि पट्टकलचा भाग आता पट्टकन टाका.

प्रचेतस's picture

26 Dec 2022 - 7:12 am | प्रचेतस

रच्याकने बदामी नाव हे बदामी रंगाच्या खडकांमुळे पडले आहे का?
हो, इकडे लाल गुलाबी, बदामी रंगाच्या वालुकाश्माचे प्रमाण खूप जास्त आहे. त्यामुळे बदामी हे नाव, मात्र मूळचे नाव वातापि.

प्राचीन काळी ढोबळमानाने उत्तर भारत हा प्रामुख्याने शैव आणि दक्षिण भारत वैष्णव असे होते का?
नाही, दोन्हीकडे शैव वैष्णव दोन्ही पंथ कमीजास्त प्रमाणात सारखेच पसरलेले होते. वैष्णव चालुक्य आणि विजयनगरच्या राजांनी शैव मंदिरेही मोठ्या प्रमाणावर उभारलेली आढळून येतात.पट्टदकल आणि ऐहोळेची बहुतांशी मंदिरे ही शैवच आहेत.

ऐहोळे आणि पट्टकलचा भाग आता पट्टकन टाका.
बदामीचे अजून एखाद दोन भाग झाल्यावर ऐहोळे सुरू करेन त्यानंतर पट्टदकल.

हणमंतअण्णा शंकराप्पा रावळगुंडवाडीकर's picture

9 Jan 2023 - 6:57 pm | हणमंतअण्णा शंकर...

वातापि हे नावही वार्‍यामुळे पडले असावे असा माझा कयास आहे. इथे सगळी कडे लालसर-गुलाबी माती आढळते आणि वार्‍याने वालुकाश्माची सतत झीज होऊन असे स्ट्र्क्चर्स आणि माती तयार झालेली असावी. एकंदरीत वार्‍याचा खूप मोठा रोल आहे.

बदामी मलाही प्रचंड आवडते. बदामीच्या किल्ल्याच्या बाजूने महाकूट मंदीरांच्या दिशेला एक पायी वाट गेलेली आहे. माझ्या आयुष्यातला सर्वात सुंदर असा ट्रेक. शून्य गर्दी, अ‍ॅरिझोना वाटावे असा परीसर, मऊ गुलाबी सुंदर माती, मुक्तपणे चरणारे घोडे, निरभ्र आकाश, पाऊसकाळ सरल्यानंतरची प्रसन्नता, किंचित पिवळेपणाची चाहूल लागलेले घमघमणारे गवत..जणू जीएंच्या एखाद्या दीर्घरूपककथेमध्ये आपण आहोत, एक यात्रिक आहोत. फरक इतकाच की ही कथा खूप आशावादी आहे. त्या विलक्षण सौंदर्याने भरून आलेले मन, महाकूट मंदिरांचा गूढरम्य परिसर, जणू तोही जीएकथेतला एक मठच. अगदी ते प्रवेशद्वारावर कोरलेले द्वारपाल सापळे.. असा प्रचंड सुंदर अनुभव!

बदामीला गेल्यावर मला भारतीयत्वातली उत्पत्ती स्थिती लयाची सूत्रे प्रत्यक्ष जगल्याचा अनुभव येतो. शब्दातीत!

वाकाटकांना सादर नमन!

वातापि हे नावही वार्‍यामुळे पडले असावे असा माझा कयास आहे.

वातापि नाव अगस्त्याने केलेल्या वातापि राक्षसाच्या वधाप्रीत्यर्थ पडले. तो वध येते केला अशी समजूत. अर्थात वातापि हे एकप्रकारे अपान वायूचे रूपक आहे.

बदामीच्या किल्ल्याच्या बाजूने महाकूट मंदीरांच्या दिशेला एक पायी वाट गेलेली आहे

अतिशय सुरेख परिसर आहे तो. महाकूट मंदिर अत्यंत रमणीय जागा आहे. मात्र हल्ली जवळपास सर्वच जण गाडीवाटेने येत असल्याने प्रवेशद्वारावरील ते भैरव कुणाच्या नजरेस पडत नाहीत. अगदी तिकडे आवर्जून गेल्याशिवाय तिथे ते आहेत हेच कुणाला माहित नाहीये. आम्ही मात्र ते पाहिले. त्याविषयी लिहिणार आहेच.

वाकाटकांना सादर नमन!

ते वाकाटक नव्हे तर चालुक्य.

चित्रगुप्त's picture

25 Dec 2022 - 2:57 pm | चित्रगुप्त

वल्लीपंत, तुमचे लेख म्हणजे मेजवानीच असते. काय ते डोंगूर काय ते फोटो वगैरे. अशा लेखांना एकदोन ओळींचा प्रतिसाद देण्याची पण लाज वाटते, आणि एकेक फोटो निवांत बघून त्यावर काही लिहू-विचारू, आणि विस्तृत प्रतिसाद देऊ असे दर वेळी ठरवूनही ते राहूनच जाते. पण आता तुमचे सगळे लेख एकेक करून वाचायचे आणि प्रतिसादायचे ठरवले आहे.

श्वेता२४'s picture

29 Dec 2022 - 11:21 am | श्वेता२४

भविष्यात ही सहल नियोजित आहे. त्यामुळे तुम्ही दिलेला हा सर्व तपशील माझ्यासाठी अत्यंत उपयोगी आहे. तुमचे वर्णनही अतीशय मुद्देसूद असते. पुढील भागांच्या प्रतिक्षेत आहे.

टर्मीनेटर's picture

9 Jan 2023 - 1:49 am | टर्मीनेटर

डावीकडे वळताच कड्याच्या दोन भागांमध्ये खुबीने बनवलेले एक अत्यंत देखणे प्रवेशद्वार नजरेस पडते. प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूंस देखणे द्वारपाल कोरलेले आहेत.

काय कोरिवकाम आहे राव, एक नंबर 👍
पुढिल भागाच्या प्रतिक्षेत.

अनिंद्य's picture

9 Jan 2023 - 11:22 am | अनिंद्य

खूप छान.
पु भा प्र

सुंदर फोटो आणि विस्मयकारक माहिती.
... मस्त लेख.. नेहमीप्रमाणेच :)

राजेंद्र मेहेंदळे's picture

16 Mar 2023 - 3:24 pm | राजेंद्र मेहेंदळे

आता एक एक करुन वाचतोय आणि रवंथ करतोय. अर्थात वर म्हटल्याप्रमाणे अशा अभ्यसपूर्ण लेखाला एकोळी प्रतिसाद देणे म्हणजे गुन्हाच आहे, पण प्रतिसाद न देणे त्याहुन मोठा गुन्हा आहे. बाकी व्यासंगाला नमस्कार आहेच _/\_ हंपी/बदामी ट्रिप करताना ही माहिती फार उपयोगी पडेल मला.