हरंगुळचं "हरहुन्नरी" शिक्षणकेंद्र

मार्गी's picture
मार्गी in जनातलं, मनातलं
24 Dec 2022 - 7:47 pm

✪ हरंगुळच्या शिस्तबद्ध व अष्टावधानी जनकल्याण निवासी विद्यालयाला भेट
✪ विद्यार्थ्यांसाठी आकाश दर्शन व फन लर्न सत्र घेण्याचा अनुभव
✪ सत्रांमधला मुलांचा सहभाग आणि ऊर्जा!
✪ पहाटे चंद्र बघण्याचा मुलांचा अनुभव आणि त्यांना तो दाखवण्याचा माझा अनुभव!
✪ शिक्षकांचं काम किती कठीण असतं ह्याची झलक
✪ दिवसातून अडीच तास मैदानावर खेळणारे विद्यार्थी- दुर्मिळ दृश्य!
✪ सेरेब्रल पाल्सी व इतर बौद्धिक व शारीरिक दिव्यांगांसाठीच्या संवेदना प्रकल्पाला भेट

सर्वांना नमस्कार. लातूरजवळच्या हरंगुळ इथे असलेल्या जनकल्याण निवासी विद्यालयामध्ये तीन दिवस राहण्याचा योग नुकताच आला. आदरणीय प्रकाशजी लातुरे व श्री. रवींद्र पूर्णपात्रे ह्यांनी विद्यालयाच्या मुलांसाठी आकाश दर्शनाचे कार्यक्रम घेण्यासाठी बोलावलं होतं. तीन दिवस शाळेतच राहिलो आणि ही शाळा अनुभवली. विद्यार्थ्यांसोबत थोडा संवाद करता आला. त्याबरोबर जनकल्याण समितीचाच अन्य प्रकल्प म्हणजे संवेदना केंद्रालाही भेट देता आली. ह्या वास्तव्यातले अनुभव लेखाद्वारे आपल्यासोबत शेअर करत आहे.

हरंगुळच्या दोन्ही संस्थांबद्दल आधी ऐकलेलं होतं, पण भेट राहिली होती. आकाश दर्शनाच्या निमित्ताने हा योग आला. लातूरपासून ८ किलोमीटर अंतरावर ही शाळा आहे. परिसर अतिशय मोठा आहे. गेटवर माझ्या प्रवेशाची नोंद केली गेली व त्याबरोबर मला नेण्यासाठी आलेल्या दुचाकीचं किलोमीटर रीडिंगही घेतलं गेलं. संस्था किती बारकाईने काम करते, ह्याची पहिली चुणूक मिळाली! पोहचलो तेव्हा दुपारचा एक वाजतोय. गेटमधून आत गेल्यावर आधी शाळेचा परिसर लागतो- इथे शाळेची इमारत व कार्यालय आहे. थोडं पुढे गेल्यावर सभागृह, मैदान, इतर वस्तीगृह असा परिसर आहे. ३० सप्टेंबर १९९३ च्या किल्लारीच्या प्रलयंकारी भूकंपानंतर पुनर्वसनाचा भाग म्हणून ही शाळा लातूरला सुरू झाली होती. कालांतराने इथे तिची इमारत उभी राहिली. हा परिसर आकाराने शैक्षणिक वसाहतीसारखा वाटतोय. इथे पाचवी ते दहावी शाळा चालते. त्यामध्ये साडेपाचशेपेक्षा जास्त विद्यार्थी- विद्यार्थिनी शिकतात. संस्थेचे अनेक अधिकारी व कर्मचारी, मुला- मुलींच्या वस्तीगृहाचे अधीक्षक व इतर जण इथे राहतात. शिवाय नर्सिंग शिकणा-या २० मुली राहतात. केवळ खोल्या- इमारती- सभागृह- वस्तीगृहच नाही, तर इथलं ग्राउंडही लगेच नजरेत भरतंय.

पोहचल्यानंतर संस्थेतल्या मंडळींनी आपुलकीने स्वागत केलं. अनेक जणांसोबत अप्रत्यक्ष ओळख होती. प्रत्यक्ष भेटून आनंद झाला. श्री. दत्ताभाऊ माने, श्री. सुरवसे सर, श्री. बालाजी माने सर, श्री. अशोक मुळे, श्री. भस्मे आदिंच्या भेटी झाल्या. नंतर मला बोलवणारे श्री. रवींद्र पूर्णपात्रे सर आणि माझे जुने व ज्येष्ठ मित्र प्रकाशजी लातुरेही भेटले. आणि शाळेमध्येच थांबत असल्यामुळे मुलंही सारखे आजूबाजूला दिसत आहेत. शाळेतल्या कामामध्येही मुलांचा सहभाग दिसतोय. काही मुलं श्रमदान करताना दिसत आहेत, काही भोजन व्यवस्थेमध्ये मदत करताना दिसत आहेत. श्री. पूर्णपात्रे सरांशी बोलून आकाश दर्शनासाठी कोणत्या वर्गातले मुलं घ्यायचे व कसं सत्र घ्यायचं हे ठरवलं.

परभणीमधले आकाश दर्शनाचे सत्र ढगांमुळे रद्द करावे लागले होते. त्यामुळे एक नजर ढगांकडे आहे. इथे इतक्या मुलांना आकाश दर्शनाचा आनंद घेता येणार आहे, तेव्हा निसर्गाने थोडी साथ द्यावी असं वाटतंय. संध्याकाळी सत्र घेण्याच्या थोडा वेळ आधी आकाश एकदाचं स्वच्छ झालं आणि दहावीच्या एका तुकडीला आकाश दाखवता आलं. पण अर्ध सत्र होतं न होतं तो लगेचच ढग आले. आकाशातल्या गमतींची माहिती दिल्यावर गुरू, शनी, मंगळ ग्रह दाखवून होतात तोपर्यंत पूर्ण आकाश ढगांनी व्यापलं. ह्याची कल्पना असल्यामुळे पर्याय म्हणून माझ्या फन लर्न सत्राची तयारी केलेली आहेच. दहावीच्या दुस-या तुकडीसाठी फन- लर्न हे सत्र घेतलं. त्यातही मुलांनी एकदम उत्साहाने सहभाग घेतला- गोष्टी सांगितली, गमती सांगितल्या. छोट्या गटांमध्ये मिळून पत्त्यांचा बंगला बनवण्याच्या कृतीचा आनंद घेतला. एका गटाचा जेव्हा पत्त्यांचा तिसरा मजला उभा राहिला, तेव्हा त्यांना झालेला आनंद बघण्यासारखा होता!

दुस-या दिवशी आकाश स्वच्छ असेल असं अनुमान असल्यामुळे पहाटे ५.१५ ते ६.१५ असं तासभर मुला- मुलींना चंद्र दर्शनासाठी सांगितलं. इथे मुलं पहाटे ४ ला उठतात. त्यांचा दिनक्रम अगदी ठरलेला असतो. आणि ठरल्यानुसार पहाटे मुलं तयार होते. आकाशानेही साथ दिली, अष्टमीचा चंद्र बरोबर डोक्यावर दिसतोय. पहाटेच्या वेळी ग्राउंडवर एकामागोमाग एक तुकड्या असं करत २५० मुलांनी टेलिस्कोपमधून चंद्र बघितला! त्याशिवाय उपस्थित शिक्षक, इतर कर्मचारी, संस्थेचे इतर सदस्य ह्यांनीही चंद्र बघितला. नंतर दुपारच्या सत्रात दहावी व नववीच्या मुला- मुलींना टेलिस्कोपमधून सूर्यावरचे डागही दाखवता आले. फिल्टर लावल्यामुळे सूर्य संत्र्यासारखा दिसला!

दुस-या रात्री आकाश स्वच्छ असल्यामुळे सलग तीन गटांना आकाश दाखवता आलं. गुरू- शनी- मंगळ हे ग्रह, कृत्तिका तारकागुच्छ व आकाशातले ठळक तारे दाखवता आले. त्याशिवाय आकाशातल्या गमती सांगता आल्या. मोठे गट असल्यामुळे व्यक्तिगत संवाद नाही करता आला, पण गटासोबत चर्चा करता आली. परिचयात अनेक जण म्हणायचे की, आकाशातलं काहीच बघितलं नाहीय आजवर. तेव्हा मग त्यांना आठवण करून द्यायचो की, एक ग्रह तरी तुम्ही नक्कीच बघितलाय! एका ता-याचा प्रकाश तरी तुम्ही बघितलाय. आपण जो कृत्तिका तारकागुच्छ बघितला, तो ४०० प्रकाश वर्ष अंतरावरचा आहे असं सांगून थोडी चर्चा करता आली. कृत्तिकाजवळ पोर्णिमा असताना कार्तिक व श्रवणजवळ पोर्णिमा असताना श्रावण महिना असं सांगता आलं. चार इंचांचा दुर्बिणीतला आरसा कसा प्रकाश गोळा करतो, एकाग्रतेमुळे किती फरक पडतो, ह्याबद्दल सांगता आलं. पुढेही सलग दोन दिवस आकाशाने उत्तम साथ दिली. रात्रीचे तीन सेशन्स घेता आले. आणि पहाटेही आकाश मोकळं असल्यामुळे चंद्रही सगळ्याच विद्यार्थ्यांना दाखवता आला. शाळेतील सगळ्या विद्यार्थ्यांनी चंद्र बघितला. मुलींच्या सातवी ते दहावी वर्गांचं व मुलांच्या आठवी ते दहावी वर्गांचं आकाश दर्शनही झालं. ह्यामध्ये सर्व मुलं, शिक्षक, वस्तीगृहावरचे सर- मॅडम आणि संस्थेचे इतर सदस्य ह्या सर्वांनी खूप मदत केली. तिस-या दिवशी चंद्र दर्शनाऐवजी संस्थेतले शिक्षक- इतर कर्मचारी व सदस्य ह्यांच्यासाठी छोटेखानी ध्यान सत्र घेतलं. सूचनांनुसार इन्स्ट्रुमेंटल संगीताच्या सोबतीने स्वत:ला रिलॅक्स करत जाणं आणि स्वत:ला नुसतं बघत जाणं, असं त्याचं स्वरूप होतं.

सलग तीन तास ४०- ४० जणांच्या गटाला आकाश दाखवताना मात्र शिक्षकाचं काम किती कठीण आहे, ह्याची एक चुणूक बघायला मिळाली. मुलांना शांत ठेवणं, त्याच त्या सूचना सतत न राग न येऊ देता सांगणं किती कठीण आहे, हेही‌ कळालं. मुलांचे असे सलग तीन सत्र घेणं हे त्यामुळे ध्यानाच्या कसोटीसारखंही वाटलं. माझ्या स्वत:साठी हा वेगळाच अनुभव आहे.

हे सगळे सत्र घेताना आणि शाळेतल्या शिक्षक, अधिकारी व अधीक्षक आदि मंडळींना भेटताना शाळेचं काम कसं चालतं हे हळु हळु कळतंय. अनेक गोष्टी इथे इतर शाळांपेक्षा वेगळ्या वाटल्या. इथले सगळे मुलं किमान अडीच तास रोज मैदानात खेळतात. हे आज दुर्मिळ दृश्यच आहे! शाळा मुलांसाठी इतरही अनेक उपक्रम करते. मुलांची सहल नियमित जाते. पण ती सहल नसून *मातृभूमी दर्शन* उपक्रम असतो. दर वर्षी नववीचे मुलं २६ जानेवारीला रायगडावर दोन दिवसांसाठी जातात. गणेशोत्सव, शारदोत्सव अशा उपक्रमांमध्ये मुलांचा सहभाग असतो. सगळे मुलं- मुली ही ग्रामीण भागातली व लातूरच्या आसपासच्या जिल्ह्यांमधली आहेत. त्यामुळे शेतीशी संबंधित उपक्रमांमध्येही ते सहभाग घेतात. त्याबरोबर अनेक क्रीडा व इतर स्पर्धांमध्येही विद्यार्थ्यांचा सहभाग असतो. माझ्यासमोरच एक अख्खी बस भरून विद्यार्थी स्पर्धेला जाताना बघितले! स्पर्धेला जाण्याचा त्यांचा उत्साह आणि त्यांना शुभेच्छा देताना इतर मुलांना वाटणारं कौतुक हेही बघण्यासारखं दृश्य होतं. बुद्धीबळ, समूह कब्बडी, व्हॉलीबॉल, धावणे अशा अनेक खेळांमध्ये व स्पर्धांमध्ये मुलं भाग घेतात. अनेक जण विभागीय स्तरावरही खेळलेले आहेत. धावण्याच्या बाबतीत तर मी सकाळी मैदानात बघितलंसुद्धा आहे. मीसुद्धा रनर असल्यामुळे मला बघितल्यावरच जाणवलं की, छोटी मुलंही खूप मस्त वेगाने पळत आहेत. अगदी ४ मिनिट/ किलोमीटर इतक्या जबरदस्त वेगाने. त्यांना अजून थोडं प्रशिक्षण, मार्गदर्शन व साधन- सामुग्री मिळाली तर ते आणखी पुढे जाऊ शकतात. सकाळच्या वेळी क्रीडा शिक्षक मुलांचं चांगलं वॉर्म- अप- स्ट्रेचिंग करतानाही दिसले होते. गंमत म्हणजे मुलांना दुर्बिणीतून दिसणा-या चंद्रावरही वॉर्म अप करणारे दोन माणसं दिसली होती! :) इतका खेळ त्यांच्या मनावर खोलवर रुजलेला आहे!

तीन दिवस ही शाळा अशी अनुभवता आली. अनेक विद्यार्थ्यांसोबत थोडा थोडा संवाद करता आला. शाळेमध्ये मला खटकण्यासारखी एकच गोष्ट वाटली आणि ती म्हणजे मुलींची कमी असलेली संख्या. साडेपाचशे एकूण विद्यार्थ्यांमध्ये मुली जेमतेम शंभरहून अधिक आहेत असं कळालं. आणि त्याचं कारणही वेगळ्या वस्तीगृहाची व्यवस्था करण्यातल्या अडचणी, असं सांगितलं गेलं. असो. तीन दिवस राहिल्यामुळे बाजूलाच असलेल्या संवेदना प्रकल्पालाही भेट देता आली.

सेरेब्रल पाल्सी व इतर बौद्धिक व शारीरिक दिव्यांगांसाठीचा संवेदना प्रकल्प

हा प्रकल्प, इथले कार्यकर्ते व इथली टीम अतिशय खडतर वाटेचे पथिक आहेत. सेरेब्रल पाल्सी व इतर बौद्धिक दृष्ट्या दिव्यांग असलेले मुलं- प्रौढ व त्याबरोबर इतर २१ प्रकारचे दिव्यांग ह्यांच्यासाठी हे केंद्र काम करतं. इथल्या टीमचं नेतृत्व श्री. सुरेशजी पाटील करतात. विविध प्रकारच्या दिव्यांगांसाठी इथे असलेल्या सोयी सुविधाही केंद्रात फिरून बघता आल्या. अगदी पाय-यांबरोबर रेलिंगचा आधार असलेलं रँप इथे आहे. आतमधल्या खोल्यांमध्ये जाण्याच्या वाटेवरही रेलिंग आहे. अंध व्यक्तींनाही खोली कळावी म्हणून फरशीवर वेगळ्या खुणा केलेल्या आहेत. स्पीच थेरपी, म्युझिक थेरपी अशा विविध थेरपी- उपचारांसाठी इथे साधनं आहेत आणि व्यवस्था केलेली आहे. दिव्यांगांना वेगवेगळ्या गोष्टी शिकता याव्यात म्हणून त्यांच्या खोल्यांमध्ये मोठे आरसेही बसवलेले आहेत. आरशामध्ये बघूनही त्यांना लक्षात राहायला मदत होते. आरसा केवळ लांबची गोष्ट किंवा आकाशच दाखवत नाही, तर "स्वत:लाही" बघण्यासाठी मदत करतो! असो. लातूरवरून वेगवेगळे थेरपिस्ट व तज्ज्ञ इथे येऊन बौद्धिकदृष्ट्या दिव्यांग असलेल्या मुलांना व प्रौढांना शिकवतात आणि सक्षम करण्याच्या दिशेने पुढे नेतात. जनकल्याण निवासी विद्यालयाचा माजी विद्यार्थी असलेल्या अजिंक्य बाहुबली भस्मेने सगळी माहिती देत फिरून हे केंद्र दाखवलं. दिव्यांगांसाठीच्या छोट्या गरजांबद्दल असलेली इतकी सखोल सहानुभूती व "संवेदना बघून छान वाटलं.

संवेदना केंद्र अनेक प्रकारांनी काम करतं. इथे सेरेब्रल पाल्सी व इतर बौद्धिक दिव्यांग मुलं व प्रौढांसाठी निवासी शाळा चालते. तसंच इथे ते काही दिवस राहू शकतात (त्यांच्या पालकांना प्रवासाला जायचं असेल तेव्हा). त्याबरोबर इथे जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र व दिव्यांग व्यवसाय प्रशिक्षण केंद्र आहे. त्याबरोबर २१ प्रकारच्या दिव्यांगांना सेवा व सुविधा पुरवणारं नोडल केंद्र म्हणूनही हे केंद्र काम करतं. इथे सेलेब्रल पाल्सी असलेले व इतर बौद्धिक दिव्यांग राहात नाहीत. पण ह्याच प्रकल्पाचा भाग म्हणून किल्लारीजवळ नदी हात्तरगा येथे जनकल्याण दिव्यांग पुनर्वसन केंद्र सुरू केलेलं आहे. तिथे १८ वर्षांच्या पुढचे दिव्यांग राहतात. समाजाच्या मदतीने हा प्रकल्प कार्यरत आहे. काही काही दिव्यांग व्यक्तींना सतत व्यावसायिक देखभालकर्त्याची गरज असते. काहींना थेरपी व साधनांची गरज असते. अनेकदा दिव्यांगांच्या पालकांना मदतीची गरज असते. इथे दिव्यांगांच्या पालकांच्याही कार्यशाळा होतात, शिबिर होतात. सरकारी सुविधा मिळण्यासाठी त्यांना मदत केली जाते. लवकर निदान होऊन थेरपी/ उपचार सुरू व्हावेत म्हणून दिव्यांगांबद्दल सर्वेक्षण केलं जातं व जागरूकता अभियानही राबवले जातात. हे काम बघताना जमेल त्या प्रकारे त्यात सहभाग घेण्याची इच्छा झाली. आपणही ह्या उपक्रमांमध्ये शक्य असेल त्यानुसार सहभाग घेऊ शकता. लातूरपासून जवळ असलेलं हे केंद्र आणि निवासी विद्यालयही बघू शकता. अधिक माहितीसाठी व सहभाग घेण्यासाठी- जनकल्याण निवासी विद्यालय, हरंगुळ, लातूर संपर्क क्र. 07722024005, 07722024008. संवेदना प्रकल्प संपर्क क्र. 09422072517, 09021917568.

हा लेख पूर्ण वाचल्याबद्दल मन:पूर्वक धन्यवाद.

- निरंजन वेलणकर 09422108376

समाजशिक्षणलेखअनुभव

प्रतिक्रिया

रीडर's picture

26 Dec 2022 - 4:30 pm | रीडर

उत्तम उपक्रम

खूप छान उपक्रम! शाळेचा आणी विद्यार्थ्यांचा ऊत्साही सहभाग पण फार छान!

मार्गी's picture

28 Dec 2022 - 2:33 pm | मार्गी

वाचनाबद्दल व प्रतिक्रियांबद्दल सर्वांना धन्यवाद! इतकंच म्हणेन की, दोन्ही संस्था छान काम करतात. आणि संवेदना केंद्राच्या संदर्भात ह्या विषयातल्या समस्या खूप मोठ्या आहेत आणि अशा विशेष मुलांना व प्रौढांना समाजाने अजून जास्त मदत केली पाहिजे. आणि त्यासाठी तेवढी जागरूकता होण्याचीही गरज आहे. धन्यवाद.