संस्कार

Primary tabs

ज्ञाना's picture
ज्ञाना in जनातलं, मनातलं
23 Dec 2022 - 1:06 am

संस्कार म्हणजे काय? मूल संस्कारी आहे म्हणजे मोठ्यांचा आदर करणे, त्यांच्या वेळोवेळी पाया पडणे, चांगला अभ्यास व देवधर्म या सवयी तिला किंवा त्याला आहेत असं म्हणायचे. हल्लीच्या काळात हे निकष थोडे वेगळे आणी कालानुसार आधुनिक असतील पण गर्भितार्थ तोच. एखाद्या व्यसनाधीन वा गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तीवर वाईट संस्कार झाले आहेत असं मानलं जातं.

खरं तर संस्कार हे दुसरे तिसरं काही नसून लहानपणी तुमच्या मन:पटलावर कोरल्या गेलेल्या आठवणी असतात. वय वर्ष शून्य ते आठ या कालात मनावर कोरल्या गेलेल्या आठवणी या इतक्या कायमस्वरूपी असतात की उरलेलं सगळं आयुष्य या आठवणी, अनुभवांमधून स्वत:बद्दलची जी प्रतिमा घडते (व्यक्तिमत्व) त्या दृष्टीकोनातून ती व्यक्ती जगते.

आईच्या पोटात असतांना सातव्या महिन्यातच बाळाची श्रवणेंद्रीये विकसीत व्हायला सुरूवात होते. अभिमन्यू आईच्या गर्भात असतांना चक्रव्यूहाचा भेद करायला शिकला हि केवळ महाभारतातली कथाच नाही, होणारे पालक गर्भावस्थेत असलेल्याआपल्या अपत्याबरोबर आजसुध्दा संवाद साधू शकतात. या साठी तंत्र विकसीत केलं गेलय आणी मनाला थक्क करणारे प्रयोगांचे दाखलेही उपलब्ध आहेत.

मुल जन्माला आल्यावर सर्वात पहिला संस्कार होतो तो म्हणजे मुलगा आहे का मुलगी याचा. त्यानंतर नामकरण केलं जातं. स्वत:च नाव मग ज्या कुटूंबात जन्म झाला त्या कुटूंबाच नाव (आडनाव) दिलं जातं. हळूहळू इतर विशेषणं त्या व्यक्तिमत्वाला जोडली जातात ती म्हणजे घरातील ईतरांशी जे नातं आहे त्या नात्यांची नावं, कुठल्या समाजात कुठल्या जातीत आणी पोटजातीत जन्म झाला ह्याची ओळख दिली जाते त्यांची भाषा, खाणेपीणे, पेहेराव, सणवार साजरे करण्याच्या पध्दती असे अनेक विविध ओळखींचे थर लागुन व्यक्तिमत्व घडतं. हे इथेच थांबतं असं नाही थोड्याफार प्रमाणात उर्वरीत आयुष्यात चालूच राहातं पण मी कोण आहे ह्याची स्वत:बद्दलची प्रतीमा (core identity) वय वर्षे आठ पर्यंत घडते.

हिंदू धर्मात काही जातींमधे उपनयन संस्कार केला जातो (काही इतर धर्मांमधे सुध्दा वेगळ्या नावांनी केला जातो). वयाच्या आठव्या वर्षी हा विधी करतात. याचं मुख्य कारण म्हणजे या वयात मनुष्यामधे अहंकार निर्माण होतो. हा अहंकार म्हणजे फक्त मिजास नव्हे तर मी शरीर आहे हि वेगळी नविन ओळख निर्माण होते (अहं आकार). हि नवी ओळख दृढ होऊ नये म्हणून वेळीच बटुला कानात अहं ब्रम्हास्मी हा ऊपदेश दिला जातो ज्याचा अर्थ तुझं खरं स्वरूप शरीराच्या आकारा पुरते मर्यादीत नाही तर निराकार अनादि अनंत ब्रम्हचैतन्य आहे. हि धारणा ठेवुन बटु जेंव्हा पुढे वाटचाल करतो तेंव्हा योग सहज साध्य होण्याची प्रबळ शक्यता निर्माण होते. मी म्हणजे फक्त हे शरीर नाही तर सर्वव्याप्त ब्रम्हस्वरूप आहे आणी माझं शरीर हे मला जगात जे साध्य करायचंय त्यासाठी मिळालेलं उपकरण आहे या भावनेने जगण्याची सुरूवात होते. बटुची आई या संस्कारात त्याला आपल्या हाताने घास भरवते आणी आईने भरवलेला हा शेवटचा घास असं शीकवलं जातं, हेतू हा की तू आता स्वत:ची कामं करायला सक्षम आहेस यापुढे यांत आईची मदत हेणार नाही हे त्या बालमनावर बिंबवणे. बरं थोडासुध्दा अहंकार राहिल्यास ब्रम्हज्ञान प्राप्त होण्याची शक्यता नाही म्हणून ‘मी माझं कमावून खातो’ हि भावना मनात येण्याआधीच उदरनिर्वाहासाठी बटुला भीक्षा मागण्याची दिक्षा दिली जायची. भीक्षा म्हणजे भीक नव्हे. क्रिया एकच जरी असली तरी ज्या हेतूने ती केली जाते त्यामध्ये जमीन आणी आकाशातील अंतरा इतका फरक आहे.

एकोणीसाव्या शतकाच्या ऊत्तरार्धातील कलकत्ता शहरातली ही गोष्ट. शहरातील काही प्रतिष्ठीत घरांतल्या महिला एका कार्यक्रमानिमीत्त एकत्र जमल्या होत्या. महिलांच्या गप्पा चालू होत्या आणी मुलं आजुबाजुला खेळत होती. नुकत्याच आईकडे धावत आलेल्या एका लहानग्याला एका महिलेने सहजच विचारलं की बाळ तु मोठा झाल्यावर कोण होणार? मग काय विचारतां? सगळ्या चिल्ल्यापिल्ल्यांची एक एक करून मी कोण होणार ते सांगायला सुरूवात झाली. कुणाला महाराजा व्हायचं होतं तर कुणाला गव्हर्नर, कलेक्टर, डाक्टर आणी काय काय. छोट्या नरेंद्रला मात्र कलकत्त्याच्या रस्त्यांवरून धावणाऱ्या घोडागाड्यांचं प्रचंड आकर्षण होतं आणी त्याहूनही जास्त चक चक आवाज करत चाबूक मारणाऱ्या घोडागाडी चालकाचं. त्याची पाळी आली तेंव्हा त्यानं निरागसपणानं मला घोडागाडीवाला व्हायचय असं सांगीतलं. असं म्हंटल्यावर जमलेल्या आयांनी आणी पाठोपाठ त्यांच्या मुलांनी नरेंद्रची खील्ली उडवली. बिच्चारा नरेंद्र अगदी रडवेला झाला. घरी आल्यावर हिरमुसलेल्या नरेंद्रने आईला विचारलं मी घोडागाडीवाला व्हायचं म्हंटलं तर का सगळे मला हसले? नरेंद्रच्या आईने त्याला ऊचलुन कडेवर घेतलं आणी दिवाणखान्यात भींतीवर लावलेल्या एका चित्रापाशी घेऊन गेली. चित्राकडे बोट दाखवून ती नरेंद्रला म्हणाली तुला घोडागाडीवाला व्हायचंय ना? मग तू ह्यांच्यासारखा घोडागाडीवाला हो. महाभारतातला कुरूक्षेत्रातला युध्दाचा देखावा होता तो आणी ज्यांच्याकडे बोट दाखवत होती ते होते अर्जुनाच्या रथाचे सारथ्य करणारे भगवान श्रीकृष्ण. मोठा झाल्यावर सगळं जग नरेंद्रला स्वामी विवेकानंद म्हणून ओळखायला लागलं होतं. जिजाऊंनीसुध्दा बाल शिवाजींच्या डोळ्यांसमोर असंच स्वराज्याचं स्वप्न रंगवलं होतं आणी म्हणूनच कोवळ्या वयात मावळ्या साथीदारांसह तोरणा जींकायच्या आधी शंकराच्या पिंडीवर करंगळी कापून त्यांनी शपथ घेतली.

हे सांगायच तात्पर्य एवढंच की या महापुरूषांच्या मातांनी कोवळ्या वयातच त्यांच्यावर हे संस्कार केले होते. पालकांनी आपल्या वागण्या बोलण्यावरून व राहाणीमानामधून पाल्यावर कुठले संस्कार होत आहेत याबद्दल सजग राहाण्याची गरज आहे. फक्त पालकांनी आणी कुटूंबीयानीच नाही तर समाजातील सगळ्यांनी. After all “it takes a village to raise a child”.

प्रेरणा स्त्रोतः सिध्द समाधि योग चे जनक पुजनीय गुरूजी ऋषी प्रभाकर यांच्या Infant Siddha या कार्यक्रमातून.

समाजविचार

प्रतिक्रिया

राघव's picture

23 Dec 2022 - 2:51 am | राघव

विचार आवडले! "सिद्ध समाधी योग"ची शिबिरं अजूनही असतात काय? असल्यास त्याची काही माहिती मिळू शकेल?
माझ्या आई-बाबांनी खूप वर्षांपूर्वी अशा एका शिबिरात भाग घेतला होता आणि त्याची ते अजूनही आठवण काढतात. त्यामुळे कुतुहल आहे खरं तर! :-)

धन्यवाद राघव! शिबीरांबद्दल अधिक माहीतीसाठी

ज्ञाना's picture

23 Dec 2022 - 11:04 am | ज्ञाना

www.ssy.org
अधिक महितिसाठि टिचकि मारा

सस्नेह's picture

23 Dec 2022 - 9:49 am | सस्नेह

संस्कारांचे महत्त्व अलिकडे लुप्त होत चालले आहे. खरं तर संस्कार मनाची वीण घट्ट नि मजबूत होण्यास कारणीभूत ठरतात.

श्वेता२४'s picture

23 Dec 2022 - 10:56 am | श्वेता२४

पालकांनी आपल्या वागण्या बोलण्यावरून व राहाणीमानामधून पाल्यावर कुठले संस्कार होत आहेत याबद्दल सजग राहाण्याची गरज आहे. फक्त पालकांनी आणी कुटूंबीयानीच नाही तर समाजातील सगळ्यांनी. १०० टक्के सहमत

मध्यंतरी हा रील पाहिला होता,संस्कार..खरंय संस्कारांमुळे खुप काही सहन करावं लागतं ‌...पण जास्त सहन करू नये हाही संस्कार असावा.
https://www.instagram.com/reel/ClBJyQNu2id/?igshid=YmMyMTA2M2Y=

ज्ञाना's picture

24 Dec 2022 - 1:14 am | ज्ञाना

रील गंमतशीर, विनोदी आहे :). जर विनोदाचा भाग बाजुला ठेवला तर असं दिसतय की रीलमधल्या ह्या बाईंना वाटतंय की संस्कार म्हणजे फक्त सुविचारच. त्यांनी पालकांना खून मारामाऱ्या करताना पाहीलं असतं तर असं म्हणाल्या नसत्या.