हिमाचल प्रदेश :कांगडा व चंबा परिसर :भाग ३: कांगडा किल्ला व लोअर धर्मशाळा

गोरगावलेकर's picture
गोरगावलेकर in भटकंती
15 Dec 2022 - 2:14 pm

मागील भाग येथे वाचा

आज सहलीचा दुसरा दिवस. पहाटे लवकरच जागआली. बाल्कनीतून पर्वतरांगांचे विलोभनीय दृश्य दिसत होते. इमारतीच्या गच्चीतून अजून सुंदर नजारा दिसणार होता म्हणून वर आलो. आमच्या आधीच उठलेले काही जण दूरवर सूर्योदय पॉइंटला पोहचले होते. सूर्य पाठीमागच्या डोंगरातून वर येत होता त्याची किरणे समोरच्या शिखरांवर पडून उजळायला सुरुवात झाली होती.

आज चहाही गच्चीतच मागवला

काही दिवसात हेच पर्वत व परिसर बर्फाच्या चादरीत लपेटला जाईल. आता पर्वतशिखरे हिमाच्छादित व्हायला सुरुवात झाली आहे.
दोन दिवसांपूर्वीचा फोटो (सौजन्य:ड्रॅगन रिसॉर्ट, नड्डी)

आजच्या भटकंतीसाठी निघायचे होते. सगळ्यांना पटापट आवरून नाश्त्यासाठी जमायला सांगितले.आजचे मुख्य आकर्षण कांगडा किल्ला पाहून दुपारनंतर लोअर धर्मशाळेतील प्रेक्षणीय स्थळे असा कार्क्रम ठरला होता.साडेनऊला बाहेर पडलो. मक्लाईडगंजपासून कांगडा किल्ला साधारण २८ किमी. सव्वा तासात किल्ल्याला पोहचलो. गाडी थेट किल्ल्यापर्यंत जाते.
प्रत्येकी रु.२५/- भरून आवारात प्रवेश केला

भारतीय पुरातत्व विभागाच्या एका पाटीवरून घेतलेली काही माहिती
या भागात सापडलेल्या अश्मयुगीन हत्यारांवरून कांगडा व आसपासचे क्षेत्र इ.स.पूर्व ५०००० ते २०००० प्राचीन असावे असे सिद्ध होते ज्या काळात मानव शिकार-संग्राहक प्रकारात मोडत असे. त्यानंतर रोर नामक भागातून इ.स.पूर्व २०००० ते १०००० या काळातिल काही नवपाषाण हत्यारे मिळाली ज्यावेळी मानव कृषी जीवनाकडे प्रगत झाला होता. याच भागात इ.स.पूर्व १२०० वर्षांपूर्वी सापडलेला लोखंडी वस्तरा लोहयुगाची साक्ष देतो. पठ्यार व खनियारा येथून इ.स. पूर्व दुसऱ्या व पहिल्या शतकातील सापडलेल्या तीन शिलालेखांतून या भागाचे त्या काळातील अस्तित्व लक्षात येते. येथे सापडलेल्या ताम्र. रजत नाण्यांवरून वेळोवेळच्या कांग्रा राजांची व दिल्लीच्या मुस्लिम राज्यकर्त्यांची साक्ष मिळते. प्राचीन त्रिगर्त राज्य (आजचे कांगडा) म्हणजे सतलज, रावी आणि व्यास नद्यांच्या मधील पहाडी भूभाग तसेच जालंधरचा मैदानी भूभागापर्यंत पसरलेले होते. असे मानतात की यामधील नगरकोट (कांगडा) अतिशय महत्वपूर्ण भाग होता व याची स्थापना महाभारत युद्धसमाप्तीनंतर राजा सुशर्मा चंद्र याने लगेचच केली होती.कोट कांग्रा किंवा नगरकोट याबद्दलचा पहिला उल्लेख सन १००९ मध्ये महम्मद गझनीने केलेल्या आक्रमणाचा मिळतो. त्याने आपला राज्यपाल येथे नियुक्त केला होता ज्याला दिल्लीच्या तोमर शासकांनी नंतर लावले व किल्ल्याचा ताबा जातोच राजघराण्याकडे दिला. इ.स. १३३७ मध्ये मोहम्मद तुघलकने किल्ल्याचा ताबा मिळवला व त्यानंतर सन १३५१ मध्ये त्याचा वारस फिरुझशाह तुघलक याचा अधिकार या किल्ल्यावर आला. सन १६२१ मध्ये जहांगीरने १५ महिन्यांच्या घेराबंदीनंतर किल्ला जिकून घेतला व सैफ अली खानला राज्यपाल म्हणून नियुक्त केले. सैफ अली खानच्या मृत्यूनंतर मुघल क्षीण पडले व सॅन १७८६ मध्ये शक्तिशाली राजा संसारचंद्र द्वितीय याने किल्ल्याचा ताबा मिळवला. राजा संसारचंद् याला याला आपले शेजारील राज्यकर्ते, अमरसिंग थापा यांच्या नेतृत्वाखालील नेपाळी गुरखा व शेवटी महाराजा रणजितसिंग या शीख नेतृत्वाशी सामना करावा लागला. अखेर सन १८०९ मध्ये त्याला समर्पण करावे लागले व किल्ला शिखांच्या ताब्यात गेला. त्यानंतर इतर राज्यांबरोबर हाही किल्ला सन १८४६ मध्ये ब्रिटिशांच्या ताब्यात गेला.

बाणगंगा आणि मांझी (पाताळगंगा) या दोन नद्यांच्या मध्ये असलेल्या एका उंच- अरुंद लांबट डोंगरपट्टीवर हा प्राचीन किल्ला आहे. भारतातील बहुधा सर्वात जुना किल्ला. किल्ल्याच्या तटबंदीचा घेर जवळपास चार किमी. आहे. किल्ल्याने पन्नासच्या वर आक्रमणे झेलली. अनेक जय-पराजय पहिले. अनेक राज्यकर्त्यांनी त्यांच्या काळात बांधलेली वास्तुशिल्पे, मंदिरे पहिली. १९०५ च्या विनाशकारी भूकंपात किल्ल्यास अतोनात नुकसान झाले. भारतीय पुरातत्व खात्याने संवर्धन केल्याने आजही हा किल्ला दिमाखात उभा आहे.

किल्ल्यावर पोहचण्यासाठी आपल्याला अनेक दरवाजे पार करावे लागतात.
प्रथम दरवाजा आहे “रणजित सिंग द्वार”. हा दरवाजा पंजाबचे महाराजा रणजितसिंग यांनी बांधला. दरवाजा भव्य व कमानदार आहे.

या दरवाजातून आत आल्यावर थोडी मोकळी जागा आहे व त्या पलीकडे अजून एक कमान असलेला दरवाजा आहे. याला अहिनी दरवाजा म्हणतात. मध्ये थोडी मोकळी जागा आहे तेथे बसून किल्ल्याविषयी थोडी माहिती घेतली.
किल्ल्यासाठी आपण तिकीट काढतो तेथेच बाजूला ऑडिओ गाईडची सुविधा मिळते (खाजगी).आपल्याला हेडफोन व सोबत माहिती भरलेले उपकरण मिळते. सोबत ठिकाणांचे अनुक्रम क्रमांक दिलेला किल्ल्याचा नकाशाही दिला जातो. नकाशा व उपकरण कसे वापरायचे त्याची माहिती देतात. एकच उपकरण घेऊन एकाने माहिती ऐकायची व त्याने ती इतरांना द्यायची असे चालले असते. पण सर्वांची चालण्याची गती सारखी असणार नव्हती. म्हणून आम्ही तीन उपकरणे घेतली म्हणजे कोणी मागे पुढे झाले तरी अडचण येणार नव्हती. (दर २००/-प्रत्येकी होता पण आम्ही तीन घेतल्याने एकूण ४५०/- देण्याचे ठरले)

अहिनी दरवाजा

याच्या पलीकडे प्रशस्तअंगण असून पुढे तिसऱ्या दरवाजाकडे जाणाऱ्या दगडी पायऱ्या आहेत, बाजूला भिंत असून प्रत्येक मजल्यावर चौकोनी खिडक्या आहेत (जंग्या?). या खडक्या प्रत्येक पायरीच्या बाजूला एक याप्रमाणे दिसतात.

बाजूच्या भिंतीत दरवाजाच्या डाव्या बाजूस गणेश तर उजव्या बाजूस देवी दुर्गेची सुंदर प्रतिमा आहे. मध्यभागी एक हरीण व गळ्यात उडतारुमाल (ध्वज? काय असावे?) दिसतो.येथे आणखीही काही प्रतिमा आहेत जसे गणेश व हनुमान इ.

चवथा दरवाजा आहे "अमिरी दरवाजा" अमीरी दरवाजापासून पायऱ्या लागतात
येथे वळण घेऊन रस्ता पाचव्या क्रमांकाच्या दरवाजाकडे जातो.

पाचवा दरवाजा म्हणजे तीन वेगवेगळ्या उंचीच्या कमानी असलेली संरचना आहे. हा दरवाजा “जहांगीरी दरवाजा” म्हणून ओळखला जातो. कांगडा विजयाच्या स्मरणार्थ स्वतः जहांगीर या मुघल सम्राटाने या दरवाजाचे निर्माण केले होते. जहांगीर दरवाजा पार केला की किल्ल्यापर्यंत पोहचायचा आपला एक टप्पा पार होतो.

येथून दिसणारे दृश्य

यापुढे उंच दगडी तटबंदी असलेल्या एका चिंचोळ्या वाटेने आपल्याला पुढे जावे लागते. हा म्हणजे अंधेरी दरवाजा. अंधाऱ्या मार्गामुळे कदाचित याला अंधेरी नाव असावे.

येथे पुढील दरवाजाकडे जाणाऱ्या पायऱ्यांवर वर बसून थोडी विश्रांती घेतली.

पुढील द्वार म्हणजे म्हणजे किल्ल्याच्या रहिवासी संकुलाकडे घेऊन जाणारा दरवाजा. हा दरवाजा 'दर्शनी दरवाजा' म्हणून ओळखला जातो. दरवाज्याच्या एका बाजूस गंगा तर दुसऱ्या बाजूस यमुनेची प्रतिमा आहे. गंगा तिचे वाहन मगर तर यमुना तिचे वाहन कासवासहित दिसते.

दर्शनी दरवाजातून आत जाताच प्रशस्त अंगण लागते. सुरवातीलाच भव्य प्राचीन पिंपळवृक्ष आहे.

याच्या बाजूला दर्शनी दरवाजाच्या उजव्या बाजूने अंगणाकडे तोंडकरून काही खोल्या आहेत ज्या बहुदा येथील संकुलात असलेल्या पुजारी लोकांचे वास्तव्य असावे. बहुतेक खोल्यांचे छत, दरवाजे खिडक्या नाहीत. बहुतेक भूकंपात खूप पडझड झाली असावी. पडझड झालेल्या इमारतींचे अवशेष येथे नजरेस पडतात.

अंगणाच्या पलीकडे राजवाड्याच्या पडक्या वास्तूकडे जाण्यासाठी असलेल्या पायऱ्यांमुळे डावा व उजवा असे दोन भाग पडतात.

उजव्या बाजूस लक्ष्मी नारायण मंदिर होते आता त्याचा फक्त चौथरा, बांधकामातील काही अवशेष व पाठीमागील भिंतच शिल्लक आहे.

आतल्या बाजूने सामान्य वाटणाऱ्या या लक्ष्मी नारायण मंदिराच्या बाह्य भिंतीवर मात्र अत्यन्त सुंदर कोरीव काम आहे. ही भिंत उभारण्यास दहा वर्षे लागली असे कळते.

जवळून दिसणारी भिंत

डाव्या बाजूस अंबिका मातेचे मंदिर आहे. मंदिराच्याच मागे जैन मंदिरही आहे.

गणपती जैन तीर्थंकर. शिव-पार्वती, विष्णू, ब्रह्मा यांच्या लहान प्रतिमा तसेच हनुमान, नरसिंह इ. प्रतिमाही आहेत

अंबा माता मंदिर परिसर

पायऱ्या चढून गेल्यावर महाल दरवाजा लागतो.

महाल आता अवशेष रूपातच दिसतो.येथे पाण्याचे टाके, भूमिगत खोल्या नजरेस पडतात. येथून पुढे दगडी बांधकामा ऐवजी वीट बांधकाम दिसायला सुरुवात होते.

पाठीमागे पाहिल्यास सुरुवातीचा प्राचीन भव्य वटवृक्ष दिसतो

पुढे किल्याचा शेवटचा भाग म्हणजे एक प्रशस्त बहुभुज बुरुज आहे. येथून आसपासच्या भागावर नजर ठेवण्यात येत असावी. येथून निसर्गाचा अप्रतिम नजारा दिसतो.

किल्ला पाहून झाला. झरझर उतरायला सुरुवात केली. किल्याच्या प्रवेश द्वाराजवळच भारतीय पुरातत्व सर्वेक्षण खात्याने उभारलेले छोटेसे संग्रहालय आहे ते पहिले.

संग्रहालयात फोटो घेऊ देत नाहीत पण बाहेर खूप स्तंभ, भग्न मूर्ती व इतर अवशेष आहेत त्यांचे फोटो घेता आले.

महिषासुरमर्दिनी, घटपल्लव स्तंभ अवशेष, स्तंभ अवशेष, गंगा (१३-१४ व्या शतकातील), यक्ष

देवी, भारवाहक, उडते यक्ष

थोडी चालण्याची तयारी असेल तर धर्मशाळा सहलीत कांगडा किल्ला हे पाहायलाच हवे असे एक ठिकाण आहे.

बाहेर पडलो. लिंबू सरबत, मोमोज,चहा असे ज्याला हवे ते घेतले व गाडीत बसलो. सकाळी पोटभर नाश्ता होत असल्याने दुपारी जेवणाची जरूर भासत नव्हती. जरूर पडल्यास फळे, घरून आणलेला खाऊ गाडीत बसूनच खाल्ला जात होता. त्यामळे वाचलेला वेळ एखाद दुसरे जास्तीचे पर्यटन स्थळ बघण्यास उपयोगात येत होता. यानंतर सहलीच्या राहिलेल्या सर्व दिवसातही हाच क्रम सुरु राहिला.
(खाऊ: खाऱ्या पाण्यात उकळून वाळवलेल्या भुईमुगाच्या शेंगा, भिजत घालून नंतर, उकळून-वाळवून-वाळूत भाजून (फोडून) तयार केलेले गहू, डिंकाचे लाडू, चिवडा इ. कितीही दिवस टिकेल असा भरपूर खाऊ सोबत होता)
दुपारचा एक वाजला होता. धर्मशाळेकडे परत निघालो. पुढचे ठिकाण होते हिमाचल प्रदेशच्या युद्ध वीरांच्या स्मरणार्थ उभारलेले स्मारक. पाऊण तासात येथे पोहचलो.
प्रवेश फी रु.२०/- प्रत्येकी भरून उद्यानात प्रवेश केला.

पाईन वृक्षांच्या झाडीत उंच-सखल जमिनीवर हे सुंदर उद्यान आहे. वेळोवेळी झालेल्या युद्धात वीरमरण आलेल्या योध्यांची नावे येथे काळ्या दगडात उंच लाद्यांवर कोरलेली आहेत. उद्यानातील पायवाटांवरून फेरफटका मारायला छान वाटते.

उद्यानाच्या बाहेर रणगाडा, तोफ, ठेवलेली आहे तसेच पाकिस्तानचा जप्त केलेला एक रणगाडाही आहे. या ठिकाणास भेट देण्यासाठी अर्धा-पाऊण तास पुष्कळ आहे.

येथून पुढचे ठिकाण हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशन स्टेडियम असणार होते. अंतर फक्त अडीच किमी. पुढच्या पाचच मिनिटात येथे पोहचलो.
प्रवेश फी व भेटीची वेळ


२३००० आसन क्षमता असलेले हे स्टेडियम हिमाचल प्रदेश क्रिकेटच्या रणजी मॅचेस तसेच काही आंतर राज्य क्रिकेट खेळांसाठी वापरले जाते. किंग्स इलेव्हन पंजाबचे होम ग्राउंड म्हणून काही IPL च्या मॅचेसही येथे खेळल्या गेल्या आहेत. तसेच काही एकदिवसीय आणि टेस्ट मॅचेस खेळल्या गेल्या आहेत.
स्टेडियमची इमारत

स्टेडियमचे मैदान देखभाल दुरुस्तीच्या कामास्तव खोदलेले आहे हे कळल्याने मूळ स्टेडियम कसे दिसते त्याचा अंदाज यावा म्हणून स्टेडियमच्या बॅनरचा फोटो काढून घेतला.

स्टेडियम मध्ये प्रवेश केल्यावर दिसणारे दृश्य. मागे धौलाधर (धवलधार) पर्वत रांग.

मैदानात देखभाल, दुरुस्तीचे काम सुरु होते. खोदकाम केलेले मैदान.

खेळ सुरु नसतांनाही खेळाची मजा अनुभवणारे आमच्या ग्रुपचे प्रेक्षक

अर्धा तास थांबून बाहेर आलो. बाहेर खाद्य पदार्थांचे काही स्टॉल आहेत. चहापाणी झाले. अर्ध्या तासात पुढच्या ठिकाणाला पोहचलो. हे एक धार्मिक स्थळ आहे.
कुनाल पथरी किंवा कपालेश्वर माता मंदिर.
51 शक्तीपीठांपैकी हे एक ठिकाण म्हणजे 'कुणाल पत्थरी मंदिर'. असे मानतात की सतीच्या शरीराचा कपाळाचा भाग या ठिकाणी पडल्याने याला कपालेश्वरी माता मंदिर असेही म्हणतात.(खरं तर कपाळ म्हणजे कवटीचा वरचा गोलाकार भाग इथे अपेक्षित आहे) हा भाग उलट ठेवल्यावर परातीसारखा भासतो. स्थानिक कांगडी भाषेत पीठ मळण्याची लाकडी परात असते तिला कुनाल असे म्हणतात. मंदिरात मातेच्या मूर्तीवर अशा आकाराची दगडी कुणाल असल्याने मंदिर कुनाल पत्थरी मंदिर म्हणून ओळखले जाते. असे म्हणतात की कुनाल मधील पाणी कधीच आटत नाही. भक्तांना हेच पाणी तीर्थ म्हणून दिल्या जाते जे अतिशय गुणकारी आहेअसे सांगितल्या जाते.
मंदिराचा परिसर अतिशय रम्य असून आजूबाजूला चहाचे मळेही आहेत.१५-२० मिनिट येथे थांबून परत निघालो.

वाटेत चहाचे मळे आहेत तेथे थोडावेळ रेंगाळलो. महिला पर्यटकांनी मळ्यात भरपूर फोटो काढले.

संध्याकाळचे पाच वाजले होते. अजून एखादे ठिकाण बघायचा विचार होता पण आमच्या चालकाची आता जास्त कुठे थांबायची इच्छा दिसत नव्हती कारण आज दसरा हा सणाचा दिवस होता आणि चालक स्थानिक म्हणजे धर्मशाळेचाच असल्याने त्याला लवकरात लवकर घरी पोहचण्याची ओढ असावी. आम्हीही आवरते घेतले. सहाच्या आत हॉटेलला परत आलो. उद्या सकाळी लवकर यायच्या बोलीवर गाडी चालकाला सुटी दिली .
रिसॉर्टला पोहचल्यावर कालच्या प्रमाणेच आजही शेकोटीभवती गप्पागोष्टी रंगल्या. केक कापून मोठ्या बहिणीचा वाढदिवसही साजरा केला गेला.

उद्या हॉटेल सोडायचे असल्याने रात्रीच सर्व आवराआवर करून झोपी गेलो.

क्रमश:

प्रतिक्रिया

सुरेख लेखन आणि तपशीलवार वर्णन.
कांगडा किल्ला अतिशय सुंदर दिसतोय. अतिशय निसर्गरम्य स्थळ असून प्राचीन अवशेषांनी खच्चून भरलेले दिसतेय. ,धर्मशाळा क्रिकेट मैदान, युद्धस्मारक आणि कपालेश्वरी मंदिर देखील छान. रंगसंगती एकदम नजरेत भरणारी.

कर्नलतपस्वी's picture

15 Dec 2022 - 3:16 pm | कर्नलतपस्वी

तुमची भटकंती म्हणजे आमची ऑन लाईन शाळा. भरपूर माहीती व आमची सुद्धा व्हर्च्युअल भटकंती होते.

राजेंद्र मेहेंदळे's picture

15 Dec 2022 - 7:32 pm | राजेंद्र मेहेंदळे

भरपुर फोटो टाकल्यामुळे हा भाग वाचायला जास्त मजा आली. आता चौथा भाग कधी?
रच्याकने- शेवटच्या भागात कुठे कुठे राहिलात, खाल्ले प्यायले त्या हॉटेलची नावे देता येतील का? म्हणजे पुढे कधीतरी प्लॅन करता येईल.

श्वेता२४'s picture

15 Dec 2022 - 7:56 pm | श्वेता२४

स्वतःच तिथे पाहत आहोत असा भास व्हावा इतके छान वर्णन केले आहेत .फोटोही खूपच सुंदर आले आहेत. स्थलादर्शनाच्या वेळा आणि तिकीट याचे तपशील दिले, त्यामुळे आगामी नियोजनात याचा उपयोग होईल.

गोरगावलेकर's picture

15 Dec 2022 - 11:18 pm | गोरगावलेकर

@प्रचेतस:अतिशय निसर्गरम्य स्थळ असून प्राचीन अवशेषांनी खच्चून भरलेले दिसतेय.
होय. सुंदरच आहे हा भाग. मंदिरे बघताना खरंच आपली आठवण झाली होती. शिल्प पाहतांना त्यातील बारकावे समजून घेता आले असते तर सहलीची मजा आणखी वाढली असती.

@कर्नलतपस्वी: अहो शाळा कसली! मिपावरच वाचन करत करत लिहिण्याचे थोडे धाडस आले इतकेच.

@ राजेंद्र मेहेंदळे:आपण आज सर्व भाग वाचलेत. आनंद झाला. चौथा भाग कदाचित पुढच्या आठवड्यात. हॉटेलची नावे देत आहेच. फक्त दर देणार नाही. सीझनचे दर, ग्रुपचे दर वेगवेगळे असू शकतात. आजकाल नेटवर किंवा एका कॉलवर माहिती मिळू शकेल.

@श्वेता२४: प्रतिसादाबद्दल धन्यवाद! आगामी नियोजनात जरूर पडल्यास व्यनीद्वारे माहिती देईनच.

कंजूस's picture

16 Dec 2022 - 8:29 am | कंजूस

किल्ला आणि मूर्ती आवडल्या.
रम्य स्थळ.

गोरगावलेकर's picture

16 Dec 2022 - 10:59 am | गोरगावलेकर

लेखात काही टंकलेखन चुका आहेत ज्या मला लेख भटकंती विभागात हलविल्याशिवाय दुरुस्त करता येणार नाहीत.

जसे-
त्याने आपला राज्यपाल येथे नियुक्त केला होता ज्याला दिल्लीच्या तोमर शासकांनी नंतर लावले व किल्ल्याचा ताबा जातोच राजघराण्याकडे दिला.

त्याने आपला राज्यपाल येथे नियुक्त केला होता ज्याला दिल्लीच्या तोमर शासकांनी नंतर हाकलून लावले व किल्ल्याचा ताबा कटोच राजघराण्याकडे दिला.

सुंदर!फोटो पाहून, वर्णन वाचून तृप्त वाटलं!

श्वेता२४'s picture

16 Dec 2022 - 2:11 pm | श्वेता२४

मला ही सूचना कंजूस काकांनी केली होती त्यामुळे मी लेख तिथेच प्रकाशित करते. कारण तेथे संपादनाची सोय आहे.

गोरगावलेकर's picture

16 Dec 2022 - 3:02 pm | गोरगावलेकर

हो. मलाही कंकाका यांनी तसे सुचवले होते त्याबद्दल त्यांचे निश्चितच आभार. पण नंतर मला संपादक मंडळाकडून सांगण्यात आले की तुम्ही लेख देत रहा. आम्ही वेळ मिळेल तसा तो योग्य विभागात हलवू. हे लोकही त्यांचे स्वत:चे काम सांभाळून मिपासाठी त्यांचा अमूल्य वेळ देतात. वाट बघू.

अनिंद्य's picture

20 Dec 2022 - 11:24 am | अनिंद्य

सुंदर भटकंती.

हा सुंदर प्रदेश कधी बघायला मिळतो याची वाट पाहतो आहे !

लेख आणि फोटोज सुं द र... कांगडा किल्ला तुफान आवडला 👍
मागच्या भागावर प्रतिसाद देताना Enhancement नं करता फोटो देण्याच्या केलेल्या विनंतीचा तुम्ही मान ठेवलात त्यासाठी तुमचे अतीव आभार! मेकअपची गरज माणसांना, निसर्गाला नाही 😀

असो, बऱ्याच वर्षांपूर्वी केलेल्या नैनिताल, धरमशाला आणि डलहौसी ट्रीपच्या काही आठवणी ह्या मालिकेच्या निमित्ताने ताज्या होत आहेत!
मॅक्लिओडगंज अजून बघितले नाहीये, मुंबई ते कैरो प्रवासात भेटलेल्या आणि चांगला मित्र झालेल्या लुधियाणाच्या अरूण कुमारच्या बायकोचे माहेर मॅक्लिओडगंज आहे आणि त्याने लुधियाणा - ज्वालाजी - मॅक्लिओडगंज - लुधियाणा अशा एका निवांत कौटुंबिक सहलीचे आयोजन करण्याची तयारी दाखवुन त्यासाठी वारंवार आग्रहाचे निमंत्रण देऊनही गेल्या चार वर्षांत तेथे जाण्याचा योग काही अजून आला नाहीये.

पुढील भागाच्या प्रतिक्षेत आहे!

कर्नलतपस्वी's picture

24 Dec 2022 - 3:04 pm | कर्नलतपस्वी

@कर्नलतपस्वी: अहो शाळा कसली! मिपावरच वाचन करत करत लिहिण्याचे थोडे धाडस आले इतकेच.

भटकंती वाचणे म्हणजे ऑन लाईन शाळेतला सामान्य विज्ञानाचा(इतीहास, भुगोल) तासच म्हणावा लागेल.

गोरगावलेकर's picture

30 Dec 2022 - 1:51 pm | गोरगावलेकर

@अनिंद्य:आपल्याला हा प्रदेश पाहण्याची संधी लवकरच मिळो ही सदिच्छा.

@टर्मीनेटर: मेकअपची गरज माणसांना, निसर्गाला नाही
हे आवडले
आपल्या मित्रपरिवातील लोक खुद्द मॅक्लिओडगंजचे रहिवासी असल्याने त्यांच्या माहितीचा ही ठिकाणे पाहतांना आपल्याला निश्चितच फायदा होईल. आपल्यालाही या प्रदेशातील भटकंतीसाठी शुभेच्छा.

@कर्नलतपस्वी:बरोबर बोललात.

कवट्या महांकाळ's picture

26 May 2023 - 2:02 pm | कवट्या महांकाळ

गोरगावलेकर जी, तुमच्या या माहितीचा खूपच उपयोग झाला.अतिशय धन्यवाद!!आत्ताच आम्ही अमृतसर,धर्मशाळा आणि डलहौसी अशी ट्रिप करून आलो. यात २ गोष्टी ऍड करायच्या म्हणजे
१)दलाई लमा मंदिर mcloadgunj -जिथे दलाई लमा यांचे वास्तव्य असते ते ठिकाण हि बघण्यासारखे आहे.जर का त्यांच्या रुटीन मध्ये असेल तर तुम्ही त्यांना बघू शकता किंवा प्रार्थनेत/शिबिरात सहभागी होऊ शकता अर्थात रजिस्टर करून
२) स्टेट वॉर मेमोरियल ला लागूनच स्टेट वॉर musium आहे.अजिबात चुकवू नये असे ठिकाण.त्या ठिकाणी महाभारत कालखंडापासून सुरु करून पहिले,दुसरे महायुद्ध ,त्यात भारतीय सैनिकांचा ब्रिटिशांनी केलेला वापर इथपासून सुरु केलेला प्रवास १९४७,१९६५,१९७१,शांतीसेना करत करत २०२3 पर्यंत येऊन पोचतो.डिस्प्ले आणि हेडफोन्स द्वारा दिलेली अतिशय उत्तम माहिती हे याचे वैशिष्ठ्य आहे.आम्ही २ तास पहिले तरी संपूर्ण पाहून आणि ऐकून झाले नाही.लहान मुलांसाठी सैन्य,सैनिंक आणि इतिहास समजण्यासाठी त्यंत उत्तम ठिकाण.

गोरगावलेकर's picture

26 May 2023 - 3:52 pm | गोरगावलेकर

नवीन माहितीबद्दल धन्यवाद. प्रत्येक ठिकाण वेगवेगळ्या ऋतूत अनुभवण्याची मजाही काही औरच त्यामुळे आपलेही अनुभव येऊ द्या.