शरत्काल

Primary tabs

नूतन's picture
नूतन in जनातलं, मनातलं
17 Nov 2022 - 7:27 pm

शरदाचे चांदणे, मधुवनी फुलला निशिगंध
नाचतो गोपी जनवृंद, वाजवी पावा गोविंद

माणिक वर्माच्या गोड आवाजात हे गाणं ऐकताना
मन हरवून गेलं पण पुन्हा पुन्हा शरदाचं चांदणं शब्दाशी घुटमळत राहिलं.

'शरदाचं चांदणं' हा वाक्प्रचार आपण सहसा विशेष गोष्टींसाठीच वापरतो. त्याच्या उच्चारानेदेखील मन आनंदात न्हाऊन निघतं. अशा या शरद ऋतू विषयी मला उत्सुकता वाटली आणि त्या अनुषंगाने काही काही वाचत
गेले. 'आंधळे आणि हत्ती' या कथेत प्रत्येकाला तो हत्ती वेगवेगळा वाटतो तसंच काहीसं हे वाचन करताना जाणवत होतं.

यामध्ये कालिदासाचं ऋतुसंहार आणि तुलसीदासांचं रामचरितमानस या दोन्हीत शरद ऋतूकडे बघण्याची दृष्टी किती वेगळी आहे हे जाणवत राहिलं. मला जे काही उमजलं ते तुमच्यापर्यंत पोचवण्याचा हा प्रयत्न.

कालिदास

'ॠतुसंहार ' हे कालिदासाचं प्रथम काव्य. 'ऋतुसंहार ' म्हणजे ऋतुंचा समूह अथवा ऋतूंची मालिका. या काव्यात कालिदासाने विविध ऋतूंमध्ये निसर्गात होणारे बदल आणि निसर्गाबरोबरच प्रणयी जीवांमध्ये होणारे
भावबदल यांचं वर्णन केलेलं आहे. साहजिकच शरद ऋतूचं वर्णन करताना कालिदासाची दृष्टी सौंदर्यामुखी आहे. शरदातील निसर्ग वर्णन करताना कालिदास म्हणतो--

काशांशुका विकचपद्ममनोज्ञवक्त्रा

सोन्मादहंसरवतनूपुरनादरम्या।

आपक्वशालिरुचिरानतगात्रयष्टिः

प्राप्ता शरन्नववधूरिव रम्यरूपा ॥ १॥

शरद ऋतु मध्ये कासफूल / काशफुलाला बहर येतो. शेवरीच्या कापसासारख्या मुलायमआणि शुभ्र पांढऱ्या रंगाच्या पिसांचा फुलोरा घेऊन डोलणारी ही पाती जिचे रेशमी वसन आहे,या ॠतूत फुलणारी कमळं म्हणजे जिचं सुंदर मुखकमल आहे,आनंदाने विहरणाऱ्या हंसांचा
कलरव म्हणजे जणू जिच्या पायातील नुपुरांची रुणझुण आहे , तयार झालेल्या भाताच्या लोंब्याप्रमाणे लवलवती अशी जिची देहयष्टी आहे, अशा नववधूच्या रूपात शरदाचे आगमन होते. (ऋतू इथे स्त्रीलिंगी मानला आहे)

काशैर्मही शिशिरदीधितिना रजन्यो

हंसैर्जलानि सरितां कुमुदैः सरांसि ।

सप्तच्छदैः कुसुमभारनतैर्वनान्ताः

शुक्लीकृतान्युपवनानि च मालतीभिः ॥ २॥

काशफुलांमुळे धरती, चंद्रामुळे रात्र, शुभ्र हंसांमुळे आणि कमळांमुळे तलावातील जळ, सप्तपर्णीच्या बहराने वनप्रांत तर चमेलीच्या फुलांनी उपवन, उद्यानांवर सर्वत्र शुभ्रतेची पखरण केली आहे

व्योम क्वचिद्रजतशङ्खमृणालगौरै
स्त्यक्ताम्बुभिर्लघुतया शतशः प्रयातैः ।
संलक्ष्यते पवनवेगचलैः पयोदै
राजेव चामरवरैरुपवीज्यमानः ॥ ४॥

वर्षात्ऋतुने नुकताच आपला पाय काढता घेतलाआहे. त्यामुळे पावसाचा वर्षाव करून मेघ रिते झाले आहेत. काही रूपेरी ,काही शुभ्रधवल शंख शिंपल्याप्रमाणे दिसणारे हे शत-शत मेघ वाऱ्याबरोबर वहात आहेत. जणू एखाया राजावर कुणी चवऱ्या ढाळाव्या असंच ते दृष्य आहे.

मन्दानिलाकुलितचारुतराग्रशाखः

पुष्पोद्गमप्रचयकोमलपल्लवाग्रः ।

मत्तद्विरेफपरिपीतमधुप्रसे

कश्चित्तं विदारयति कस्य न कोविदारः ॥ ६॥

मंद मंद हवेच्या झुळकींनी ज्याचे शेंडे डुलत आहेत. फुलांना बहर आल्यामुळे नाजुक पालवीही त्यांना शोभवत आहे. गुंजारव करत भुंगे त्या फुलातील मधुपान करीत आहेत असा हा 'कोविदार पुष्प' अर्थात 'कचनार' पुष्पवृक्ष कोणाचं चित्त आकर्षून घेणार नाही ?

निरभ्र आकाशातील नक्षत्रदर्शनाचा हाच तर काळ!
कालिदास म्हणतो -

तारागणप्रचुरभूषणमुद्वहन्ती

मेघोपरोधपरिमुक्तशशाङ्कवक्त्रा

ज्योत्स्नादुकूलममलं रजनी दधाना

वृद्धिं प्रयात्यनुदिनं प्रमदेव बाला ॥ ७॥

शरदातील रात्र कशी आहे? तर तिने तारक-समूहांची आभूषणं धारण केली आहेत. मेघांच्या आडून चंद्रमुख डोकावते आहे. धवल चांदण्यांचे विमल (सुंदर) वस्त्र धारण केलं आहे. एखाद्या अल्लड युवतीसारखी अशी ही शरदाची रात्र आहे.

कारण्डवाननविघट्टितवीचिमालाः

कादम्बसारसचयाकुलतीरदेशाः ।

कुर्वन्ति हंसविरुतैः परितो जनस्य

प्रीतिं सरोरुहरजोरुणितास्तटिन्यः ॥ ८॥

नद्यांविषयी कालिदास म्हणतो - तिच्या पाण्यावरील तरंगांवर 'कारंडव' पक्षी चोची मारत आहेत, कादंब आणि सारस पक्ष्यांचे थवे किना-यावर फिरत आहेत. ( कारंडव, कादंब, सारस - हे पाणपक्षी आहेत) पद्मपरांगानी ते पाणी लालसर दिसत आहे आणि विहरणाऱ्या हंसांच्या कलरवाने भरलेल्या या नदया सर्वानाच आनंदीत करत आहेत.

अशा प्रकारेच कालिदासाने शरद ऋतुतील पवन, उपवनं, भाताची शेतं, पहाटेचं दव इत्यादिचं वर्णन केलं आहे. अशा या शरद ॠतुत प्रणयी जीवांचं भावविश्व कसंआहे ? तर शीतल चांदणं पसरवणारा हा चंद्र, पतिविरहिणीला मात्र विखारी बाणांनी घायाळ करीत आहे. उल्हसित करणारा मंद पवन युवकांचं चित्त चंचल करीत आहे.युवती आपल्या काळ्याभोर आणि पुढून किंचित कुरळ्या असणाऱ्या आपल्या केसात मालतीपुष्पांच्या माळा गुंफत आहेत. सुवर्ण कुंडलांनी सज्जित असे कान
नीलकमलांनी अधिक सुशोभित करत आहेत.

'तुलसीदास'

संत तुलसीदास हे 'रामचरितमानस' या काव्य ग्रंथाचे रचयिते आहेत. या ग्रंथात , रामायणाच्या 'किष्किंधा काण्ड' भागात शरद ऋतु विषयक रचना सापडतात. निसर्गवर्णनाबरोबर जीवनविषयक भाष्य करताना प्रभु रामचंद्र लक्ष्मणाला सांगताना म्हणतात -

बरषा बिगत सरद रितु आई।
लछमन देखहु परम सुहाई॥
फूलें कास सकल महि छाई।
जनु बरषाँ कृत प्रगट बुढ़ाई॥1

हे लक्ष्मणा, आता पावसाळा सरत आला आहे आणि प्रसन्न असा शरद ॠतू आला आहे. पांढ-याशुभ्र कास फुलांनी पृथ्वी सजली आहे. वर्षा ऋतूने आपलं वार्धक्यच जणू त्यातून सूचित केलं आहे.

उदित अगस्ति पंथ जल सोषा।
जिमि लोभहिं सोषइ संतोषा॥
सरिता सर निर्मल जल सोहा।
संत हृदय जस गत मद मोहा॥2॥

लोभ जसं मनाचं समाधान शोषून घेतो तद्वत,अगस्ति ताऱ्याच्या उदयाने मार्गावरील पाणी शोषलं जाऊन तो कोरडा झाला आहे. संतांच्या मदमोहविरहीत निर्मल मनाप्रमाणे नदी-तलावांचं जल निर्मल झालं आहे.

रस रस सूख सरित सर पानी।
ममता त्याग करहिं जिमि ग्यानी॥
जानि सरद रितु खंजन आए।
पाइ समय जिमि सुकृत सुहाए॥3॥

विवेकी पुरुष ज्याप्रमाणे मोहमायेपासून हळूहळू दूर होतो त्याप्रमाणेच नदी- तलाव थेंबाथेंबानी सुकायला सुरवात झाली आहे. ज्याप्रमाणे आपल्या कर्माचे फळ योग्य वेळ येताच प्राप्त होते त्याप्रमाणे शरद ऋतू येताच
खंजन पक्षी प्रगट होतात.

पंक न रेनु सोह असि धरनी।
नीति निपुन नृप कै जसि करनी॥
जल संकोच बिकल भइँ मीना।
अबुध कुटुंबी जिमि धनहीना॥4॥

नीतिनिपुण राजाचे व्यवहार जसे स्वच्छ ,पारदर्शक असतात त्याप्रमाणे ही धरती धूळ माती चिखल जाऊन स्वच्छ झाली आहे. विवेकशून्य गृहस्थ ज्याप्रमाणे धनाच्या लोभाने अस्वस्थ होतो त्याप्रमाणे पाण्याची विपुलता कमी होऊ लागल्याने मासे व्याकुळ होऊ लागतात.

बिनु घन निर्मल सोह अकासा।
हरिजन इव परिहरि सब आसा॥
कहुँ कहुँ बृष्टि सारदी थोरी।
कोउ एक भाव भगति जिमि मोरी॥5॥

भगवद्भक्त जसा आशाविरहीत होतो तसं हे आकाश निरभ्र, शोभायमान झाले आहे.जसे काही विरळा भक्त मला प्राप्त करतात तशी एखादी विरळा सर अजूनही या शरद ऋतूत येत आहे.

सुखी मीन जे नीर अगाधा।
जिमि हरि सरन न एकऊ बाधा॥
फूलें कमल सोह सर कैसा।
निर्गुन ब्रह्म सगुन भएँ जैसा॥6॥

श्रीहरीच्या चरणांशी खोल अंतःकरणापासून लीन झालेल्याला जशी कोणतीही चिंता, भिती उरत नाही त्याप्रमाणेच खोल पाण्यातल्या माशांनाही कसलीही फिकीर वाटत नाही. निर्गुणब्रम्ह, सगुण रुपात जसं शोभून दिसतं त्याप्रमाणेच फुललेल्या कमळांनी सरोवरं शोभिवंत झाली आहेत.

गुंजत मधुकर मुखर अनूपा।
सुंदर खग रव नाना रूपा॥
चक्रबाक मन दुख निसि पेखी।
जिमि दुर्जन पर संपति देखी॥7॥

फुलातला मध प्राशन करीत भुंगे गुंजारव करत आहेत. पक्षी विविध आणि मधूर स्वरात कूजन करत आहेत. पण चक्रवाक पक्षी मात्र रात्र होताच वियोगाच्या कल्पनेने दुःखी होत आहे जसा एखादा मत्सरी माणूस दुसऱ्याची संपत्ती पाहून दु:खी होतो.

भूमि जीव संकुल रहे
गए सरद रितु पाइ।
सदगुर मिलें जाहिं जिमि
संसय भ्रम समुदाइ॥8॥

सद्गुरू भेटल्यावर जसे सारे भ्रम, शंकांचं निरसन होतं त्याप्रमाणेच शरदाचं आगमन होताच,पावसामुळे आलेले कृमी कीटक नाहीसे होऊन वाटेवरचं भयही नाहीसे झालं आहे

कोणत्याही दृष्टीने पाहिलं तरी सुख,आनंद देणाऱ्या
अशा या शरद ऋतूचं आपण सर्वजण सहर्ष स्वागत करुया !

(ऋतुसंहारमधील संस्कृत श्लोक समजून घेण्यासाठी याच नावाच्या मूलचंद्र पाठक रचित काव्याची मदत घेतली आहे)

वाङ्मयआस्वाद

प्रतिक्रिया

प्रचेतस's picture

18 Nov 2022 - 5:27 pm | प्रचेतस

काय सुरेख लिहिलंय.
वाल्मिकी रामायणातही शरद ऋतूचे सुरेख वर्णन आले आहे.

जलं प्रसन्नं कुमुदं प्रभासं
क्रौञ्चस्वनः शालिवनं विपक्वम् ।
मदुश्च वायुर्विमलश्च चंद्रः
शंसंति वर्षव्यपनीतकालम् ॥

सगळीकडे जलाने प्रसन्न झाले आहे, कमळे फुलली आहेत, क्रौंच पक्षी बोलू लागतात , फळे, फुले पक्व झाली आहेत, वायु मंदगतीने वाहू लागला असून चंद्र अत्यंत स्वच्छ दिसत आहे. वर्षाकाल समाप्त झाला असून शरत्कालाचे आगमन होत आहे.

बालेंद्रगोपांतरचित्रितेन
विभाति भूमिर्नवशाद्वलेन ।
गात्रानुपृक्तेन शुकप्रभेण
नारीव लाक्षोक्षितकंबलेन ॥

लहान लहान इंद्रगोपांनी चित्रित झालेल्या आणि गवतरुपी हिरवी चादर पांघरलेली ही भूमी मध्ये मध्ये लाखेच्या रंगाने रंगवलेल्या स्त्रीप्रमाणे शोभा प्राप्त करत आहे.

तर ऋतुसंहारात कालिदास म्हणतो,

प्रभिन्नवैदूर्यनिमंस्तृणाङत्कुरः समाचिता प्रोत्थितकन्दलीदलैः ।
विभाति शुक्लेतररत्नभूषिता वराङ्गनेव क्षितिरिन्द्रगोपकः ||

वैदूर्यासारख्या तृणाना फुटलेल्या अंकुरांनी ही भूमी भरून गेली आहे, कर्दळीला पाने फुटू लागली आहेत, इंद्रागोपांनी भरलेली ही भूमी जणू रत्नांनी विभूषित झालेल्या सुंदरीसारखी शोभून दिसत आहे.

पहा तरी किती समानता आहे ह्या दोन्ही श्लोकांत, साहजिकच कालिदासावर वाल्मिकी रामायणाचा प्रभाव होता हे उघड दिसते. अर्थात कालिदासाच्या काव्यात उपमांचा पुरेपुर वापर आढळतो तर वाल्मीकीरामायणातील वर्णन अधिक प्रासादिक आणि सुमधूर भासते.

माझ्या अभ्यासाप्रमाणे या श्लोकाचा अर्थ असा आहे....
हिरव्यागार, ताज्या (नवीन) गवत कुरणावरती, लालबुंद अशा इंद्रगोप अर्थात कुंकवाच्या किड्यांनी सुंदर नक्षी काढली आहे. गात्रा म्हणजे पृथ्वीचे हे रूप जणू पोपटांच्या हिरव्या-लाल रंगसंगतीशी साधर्म्य असणारी,लाखेसारख्या लाल ठिपक्यांनी भूषित अशी हिरवीगार साडी परिधान केलेली कुणी ललनाच!

बालेन्द्रगोपांतरचित्रितेन म्हणजे इंद्रगोप किड्यांनी काढलेली नक्षी असा न घेता लाल इंद्रगोप किडे हेच हिरव्या तृणांवर नक्षीसारखे दिसत आहेत असा अर्थ घेता येतो असे वाटते. अर्थात अर्थ भिन्न असू शकतो.

नूतन's picture

18 Nov 2022 - 6:06 pm | नूतन

प्रतिसादाबद्दल धन्यवाद.
अशा प्रतिसादाबद्दल विशेष धन्यवाद. खूप सुंदर वाटलं वाचताना.

Bhakti's picture

18 Nov 2022 - 6:10 pm | Bhakti

सुंदर वर्णन!
यानिमित्ताने हा लेख आठवला.त्यातही संदर्भासाठी वापरलेला लेख सुंदर आहे.

कर्नलतपस्वी's picture

19 Nov 2022 - 8:20 pm | कर्नलतपस्वी

भक्ती आपले ऋतु वरील सर्व लेख वाचले आहेत. छान लिहीलेत.

श्वेता व्यास's picture

18 Nov 2022 - 6:31 pm | श्वेता व्यास

खूप सुरेख!

महाभारत हा महाग्रंथ ऋतूंच्या वर्णनासाठी विख्यात नाही मात्र हरिवंशात शरद ऋतूचे अतिशय रसाळ वर्णन आले आहे.

तं शरत्‍कुसुमापीडा: परिवार्य प्रदक्षिणम्।
गावो गिरिवरं सर्वास्‍ततो यान्‍तु पुनर्व्रजम्।।

प्राप्‍ता किलेयं हि गवां स्‍वादुतोयतृणा गुणै:।
शरत् प्रमुदिता रम्‍या गतमेघजलाशया:।।

प्रियकै: पुष्पितैर्गौरं श्‍यामं बाणासनै: क्‍वचित्।
कठोरतृणमाभाति निर्मयूररुतं वनम्।।

विजला विमला व्‍योम्नि विबलाका विविद्युत:।
विवर्धन्‍ते जलधरा विदन्‍ता इव कुंजरा:।।

पटुना मेघवातेन नवतोयानुकर्षिणा।
पर्णोत्‍करघना: सर्वे प्रसादं यान्ति पादपा:।।

सितवर्णाम्‍बुदोष्‍णीषं हंसचामर‍वीजितम्।
पूर्णचन्‍द्रामलच्‍छत्रं साभिषेकमिवाम्‍बरम्।।

हंसै: प्रहसितानीव समुत्‍कृष्‍टानि सारसै:।
सर्वाणि तनुतां यान्ति जलानि जलदक्षये।।

चक्रवाकस्‍तनतटा: पुलिनश्रोणिमण्‍डला:।
हंसलक्षण‍हासिन्‍य: पतिं यान्ति समुद्रगा:।।

शरद ऋतूंत फुलणाऱ्या पुष्पांच्या माला घालून, सर्व गाईकडून या पर्वतश्रेष्ठाभोवती प्रदक्षिणा करवून पुनः त्यांस व्रजामध्यें परत आणा. गाईंना मधुर तृण व जल देणारा रमणीय व प्रमुदित शरत्काल सांप्रत प्राप्त झाला आहे. हा ऋतु लागला म्हणजे मेघ कमी होत जाऊन जलाशयांतील पाणी आटू लागते. सध्या हे अरण्य प्रियक वृक्षांच्या पुष्पांनी गौरवर्ण दिसत आहे. परंतु त्यांत कोठें कोठें बाणासनाच्या पुष्पांमुळे कृष्ण वर्णाची छटा दिसत आहे. आता या वनांतील गवत जून झाले असून, मोरांचा शब्द देखील कोठें ऐकू येत नाहीं. तरी याची शोभा कांहीं विशेषच दिसत आहे. भग्नदंत कुंजरांप्रमाणे आकाशांतील मेघ विद्युतरहित व जलशून्य झाल्याने स्वच्छ दिसत आहेत व नवीन उदक आकर्षण करून घेणारे मेघ गडगडत आहेत. सर्व वृक्षांना नवी व घनदाट पालवी आलेली असल्यामुळे ते प्रसन्न दिसत आहेत. शुभ्रवर्ण मेघरूपी उष्णीष, हंसरूपी चामरें व पूर्णचंद्ररूपी निर्मळ छत्र, यांनीं हें अंबर सुशोभित झालेले असल्याकारणाने, ते नूतन अभिषिक्त राजाप्रमाणें शोभत आहे. पाऊसकाळ संपत आला असल्यामुळे, त्याबरोबर तळीं वगैरे जलाशय देखील रोडावत चालले आहेत असें वाटते. हे कृश होत चाललेले जलाशय पाहून हंस व सारस हे देखील नाके मुरडीत आहेत. चक्रवाकरूपी स्तन, पुलिनरूपी श्रोणिमंडल व हंसरूपी हास्य यांनी युक्त असलेल्या नद्या आपल्या समुद्ररूपी पतीच्या भेटीस चालल्या आहेत असा भास होत आहे.

चौथा कोनाडा's picture

19 Nov 2022 - 1:40 pm | चौथा कोनाडा

व्वा, खुप सुंदर! मजा आली.

ऋतूंचे वर्णन वाचताना हरकायला झाले.
किती समृद्ध आहेत आपली प्राचीन महाकाव्ये आणि साहित्य !

कर्नलतपस्वी's picture

19 Nov 2022 - 8:26 pm | कर्नलतपस्वी

संस्कृती आणी माझा छत्तीस चा आकडा असल्याने काही गोष्टी वाचायच्या आहेत पण हिम्मत होत नाही.

असे अनुवाद वाचले म्हणजे कळते की शाळेत असताना आभ्यास केला असता तर आपल्यालाही या सर्वांचा अस्वाद घेता आला असता.

प्रचेतस यांचे प्रतिसाद व स्पष्टीकरण म्हणजे
"सोने पे सुहागा ".

लिहीत रहा नक्कीच वाचू.

नूतन's picture

19 Nov 2022 - 10:23 pm | नूतन

प्रतिसादाबद्दल मनापासून धन्यवाद

मुक्त विहारि's picture

27 Nov 2022 - 4:50 pm | मुक्त विहारि

लेख आवडला