रातराणीची जादू

Primary tabs

मालविका's picture
मालविका in जनातलं, मनातलं
16 Nov 2022 - 4:05 pm

रातराणीची जादू
जवळपास २ वर्षापूर्वी रातराणीची रोप लावली होती. जगतायत की मरतायत अशी करत करत जगली बा एकदाची. या पावसाळ्यात तर अगदी एकास एक करीत फोफावली मस्त. वाढ तर चांगली झाली पण फुलं काही लागेनात. पाणीही नियमित चालू होत. सगळी रोपं बांधावर लावल्याने कुंपण अगदी सुशोभित झालं आहे आता.
थंडी पडायला सुरवात झालेय. ४ दिवसापूर्वी रात्री श्रीनिवासशी गप्पा मारत झोपाळ्यावर बसलेली असताना गार वाऱ्याची झुळूक आली. अंगावर शहारा आला. आधीच थंडी, त्यात मी झोके घेत बसलेले आणि वर वारा आला. पण याच झुळुकिबरोबर एक मंद सुगंध आला. आम्ही दोघांनी एकमेकांकडे बघितलं आणि दोघांच्याही चेहऱ्यावर एकच भाव, " रातराणी खुलली". पण ते तेवढ्यापुरते. परत वास नाही आला. सकाळी उठून बघितलं तर कुठे जराश्या कळ्या आलेल्या.त्या कळ्या बघून खूप छान वाटलं. निदान हळू हळू का होईना रातराणी फुलायला तर लागली याचच सुख वाटल.
काल मात्र सकाळी पाणी घालताना झाडाला कळ्यांचे घोस च्या घोस दिसले लागलेले. इतके की झाडांच्या छोट्या छोट्या फांद्या त्या कळ्यांच्या भाराने वाकलेल्या. तेव्हापासून रात्रीची उत्सुकता होती. अगदी लहान मुलासारखे कधी एकदा रात्र होतेय नी कधी एकदा रातराणी फुलते अस झाल होत. रात्री नेहमीप्रमाणे गप्पा मारत बसलो होतो आणि आज अगदी भरभरून वास आला. सगळ्या आसमंतात रातराणीचा वास अगदी भरून होता. कितीतरी वेळा शांत तरीही मोठे श्वास घेवून सगळा वास उरात साठवत होतो. तरीही प्रत्येक श्वासात आणखी आणखी वास येतच होता. निसर्गाची किमया खरंच किती अनोखी आहे. किती दिवस वाट बघितली या क्षणाची. आणि आता तो क्षण कसा मनापासून जगत होते मी.
कालची रात्र अगदीच अनोखी होती. न विसरता येणारी. कितीतरी वेळ त्या मंद सुगंधात मी झोके घेत होते. त्याआधी जाऊन फुललेल्या रातराणीचे भरपूर फोटो काढले. प्रत्येक फांदीला एवढी फुलं होती की नक्की कुणाचा फोटो काढू हे कळत नव्हतं. आम्ही पावसाळा नसेल तर गच्चीवर झोपतो. काल झोपताना रातराणीचा मंद सुगंध आजूबाजूला दरवळत होता. आज आमचं अख्ख घर आणि आजूबाजूचा परिसर या नैसर्गिक वासाने भरून गेला होता. रातराणी पूर्ण बहरात आलेली. हा असा सुगंध कुपीत बंद करणं अशक्य. तसच तो रोजच मिळाला तर त्याच मूल्य देखील कमी. असा अवचित मिळालेला आनंद आणि त्याच्या आठवणी या अनमोल असतात. आनंद शोधला तर खूप साध्या गोष्टीत पण सापडतो. तसच काल या माझ्या झाडाने मला काय दिलं हे शब्दात सांगण कठीण आहे. तो अनुभव घेऊनच बघावं. रातराणी वेड्यासारखी फुलायला लागली आहे. तिच्या सुगंधाचा अनुभव घ्यायला नक्की या.
- धनश्रीनिवास

https://youtube.com/watch?v=zyfnf5WAFck&feature=share

मुक्तकअनुभव