माझिया मनाला ( कथा )

चष्मेबद्दूर's picture
चष्मेबद्दूर in जनातलं, मनातलं
18 Oct 2022 - 9:39 pm

अगदी टिपिकल पुरुषांसारखे त्याचा गाड्यांमध्ये इंट्रेस्ट असणं फारच स्वाभाविक होतं. रस्त्यांवरून झोकात जाणाऱ्या गाड्यांच्या अप्रतिम रंगांकडे मी कौतुकाने बघत असायची, तेंव्हा त्याला त्यांच्या इंजिनांची हॉर्स पॉवर, ती गाडी अमुक इतक्या सेकंदात अमुक इतका वेग कसं घेते वगैरे गोष्टी किरकोळीत माहिती असायच्या. या गाडीची प्रॉडक्शन लाइन/ प्लांट कुठल्या राज्यातल्या एक गावात आहे आणि तिथली फॅक्टरी कशी मस्त आहे, आणि त्या कंपनीच्या शेअर्सच्या किमतीत कशी उगाचच नाही वाढ झालेली ----- ही अशी सगळी माहिती मला सांगताना, एखाद्या लहान मुलाला त्याच्या आवडीचे खेळणे अचानक मिळाल्यावर जे काही होईल, असा भाव त्याच्या चेहेऱ्यावर असायचा.
आशा या टिपिकल नवऱ्याशी माझा प्रेम विवाह झाला, तेंव्हा अनेकांनी मला आडून बोलून दाखवलं, की एक छोटं प्रॉडक्शन यूनिट यशस्वीपणे चालवणाऱ्या खमक्या बाईच्या मनात प्रेमाची हळुवार भावनासुद्धा असेल असं वाटत नाही.. असो. तर नवलाईची वर्षे बघता बघता सरली आणि चार चौघांच्या सांसारला लागते तशी, पण थोडी उशीरानेच नव्या जीवाची चाहूल लागली. मग मात्र मी हादरून गेले. लहानपणी माझ्या मानलेल्या आत्या_काकवांनी सहन केलेली गर्भारपणं, त्यांच्या सासवा_आयांनी त्यांची केलेली बाळंतपण आणि नंतर त्या मुलांना वाढवताना या सगळ्या आयांनी केलेले त्याग वगैरेंची आठवण होऊन माझ्या पोटात गोळाच आला. म्हणजे मलादेखील हे त्यागाचे, जगरणाचे आणि सुरळीत/ अवघड बाळंतपणाचे किस्से सांगत कौटुंबिक मैफिलीत माझी जागा पक्की करायला लागणार, या जाणि‍वेने हताश व्हायला झालं.--- छे, छे.. हे असं काही घडू द्यायचं नाही, असं मनाशी बोलत मी माझ्या नवऱ्याला म्हणलं, “ आपण या मुलाला जन्म देऊया नको..”
नवरा नुकताच घरी आलेला. रस्त्यावरच्या वाहनांच्या जीवघेण्या गर्दीतून दीड तास प्रवास करून थकून गेला होतं बिचारा ! ‘ हे काय आता काढलंय हिनी नवीनच? ‘ असं काहीसं त्याच्या चेहेऱ्यावर उमटत असतानाच मी घाईघाईन पुढे होऊन त्याच्या हातातले मोजे घेऊन वळले आणि माझ्या पाठीला त्याचा आवाज ऐकू आला. “ गेले पाच वर्ष वाट बघत होतो न आपण यासाठी? इतका हाता तोंडाशी आलेला घास नाकारायला झालं तरी काय तुला अचानक?”___ “ मला नाई बी झेपणार हे सगळं. हे नऊ महीने आणि त्यानंतरच सगळं आयुष्य त्याच्या भोवती काढायच. त्याच्या वेळा पाळताना मला माझं काम सुचेल का? हा एवढा पसारा मांडून ठेवलाय फॅक्टरीचा.. नाही म्हणलं तरी दहा बायकांना स्वतःचे चार पैसे दरमहा नियमित कमवायला माझी मदत होतेय. मूल झाल्यावर नाही जमलं हे करायला तर इतक्या वर्षांमध्ये एवढं खपून तयार केलेलं हे जग असंच सोडून देताना बघण मला नाहीच जमणार. आणि त्याचा राग त्या मुलावर निघण्याची शक्यताच जास्त..”
माझ्या डोळ्यातल्या गंगा_जमुना पुसत त्यानी मला मिठीत घेतलं. “ हम्म ..”त्याच्या मिठीत मी सुस्कारा सोडला.__ “ बरं, तू म्हणतेस तर नको जायला पुढं...” माझा चेहेरा ओंजळीत घेत तो म्हणाला. पण हे म्हणताना त्याच्या डोळ्यात दुःखाची एक लकेर स्पष्ट चमकून गेली. त्यानी त्याचं दुःख न लपवता माझ्यापर्यंत पोचवाव आणि त्यावरचा उपाय मी निर्दयपणे नाकारावा.. ? पण केवळ माझ्या अत्यंत प्रिय व्यक्तीला हव आहे म्हणून आणि ती केवळ माझ्याकडूनच हव आहे म्हणून मी माझ्या शरीरात बदल करून घेऊ? आणि पर्यायाने माझ्या आयुष्यात आणि मी बघितलेल्या स्वप्नात?_ समजा हे घडू दिलं आणि नाही माझ्या मनात त्या पोराबद्दल ममत्व निर्माण झालं तर? आणि हे घडण्याची बऱ्याच अंशी शक्यता होती. मला माझे अब्बु आणि नवऱ्याशिवाय कोणीच प्रेम दिलं नाही आणि त्यादोघांशिवाय कोणावर मी इतकं प्रेम केलं नाही. या दोघांबद्दल पहिल्यापासूनच जितकं उत्स्फूर्त आणि आतूंन वाटत गेलं, तसं माझ्या पोटातल्या त्या ठिपक्याबद्दल मुळातूनच वाटत नाहीये. झाले की आता तिनेक आठवडे !
हे सगळं माझ्या चेहेऱ्यावर नक्की उमटले असणार कारण तो समजूतदारपणे हसून मला म्हणाला, “ चल, चहा घेणार का मस्तपैकी? मग ठरवूया काय आणि कसं ते..” चहा पिताना मला म्हणाला, “ राधे, किती मनाला लावून घेतेस प्रत्येक गोष्ट ! तुझ्या प्रेमात पडलो ते काय तुझी कर्तबगारी बघून नाही, ती तर सगळ्या जगाला दिसतच होती तुला मिळणाऱ्या कौतुकातून, बक्षीसातून. मला आपला आवडला तुझा रोखठोकपणा आणि एवढं यश मिळवूनसुद्धा जमिनीवर राहण्याचा तुझा स्वभाव. आता इतक्या वर्षांनी काय सांगतो आहेस असं म्हणू नकोस. तुझ्यासारखीच एक छोटी राधा असेल आपल्या आयुष्यात तर काय बहार येईल असं मनात आलं. तिच्या बहाण्याने मी तुझेच लाड पुरवणार होतो.”__ “ पण मला जर त्या मुलाबद्दल काहीच भावना नसेल तर? उगाच ओढूनताणून जबाबदारी घ्यायची आणि नाही झेपलं तर? ते काय झाड आहे का, नुसतं पाणी दिलं तरी पुरतं? कशीही वाढली तरी छानच दिसायला?” माझ्या मनातला खरेपणा पाहून त्यानी माघार घेतली आणि म्हणाला, “ ठिके. मी तुझ्या प्रेमात पडलो आहे. तुला नको असेल असं माझ्याकडून काही होणार नाही.” मग मात्र माझं मलाच कळेना की याच ऐकू की माझ्या मनाचं ?उद्याच्या उद्या अब्बुकडे जायलाच हवं. काहीतरी मार्ग दिसेल !
अब्बु म्हणजे अब्बू_आजोब. ते माझे रक्ताचे आजोबा नव्हेत. ओळखीच्यान्बरोबर अनाथ आश्रमात गेलेल्या अब्बुना मी दिसले. माझ्या बोळक्या तोंडातल्या अंगठ्यासकट मी त्यांच्याकडे पाहून हसले तेंव्हाच ते विरघळले. त्यांच्या कोरड्या आयुष्यात माझ्यामुळे थोडासा ओलावा निर्माण होईल अशी आशा त्यांना वाटली असणार. त्यांच्या भिरभिरणाऱ्या जगाला कुठेतरी बांधून घ्यावस वाटलं. त्या आश्रमातच त्यांनी ठरवलं की, ही माझी नात, मी हीच सगळं करीन. अब्बूनासुद्धा स्वतःचे सख्खे असे कुणीच नव्हते. सगळीच नाती मानलेली. पण त्यामुळे माझ्या पोरकेपणाची भावना त्यांना नेमकी ठाऊक ! लहानपणी शाळेत वाढदिवस साजरा करताना सगळे ज्या “ बिच्चारी गं $$$” या नजरेने माझ्याकडे बघायचे आणि मी ते घरी येऊन सांगायचे, तेंव्हा ते मला घट्ट पोटाशी धरायचे. म्हणायचे, “हे बघ राधूल्या, तुला मी आणि मला तू, हे शेवटपर्यंत लक्षात ठेव. बाकी जग गेलं $$$$ खड्ड्यात ..” असं म्हणून मग आम्ही दोघं मोठयानी हसायचो. नंतर जशी मी मोठ्या वर्गात गेले, तशी मला त्या नजरांची सवय झाली आणि एकीकडे मला बरं देखिल वाटायला लागलं. अशासाठी, की या माझ्या मित्र_मैत्रिणींना छोट्या छोट्या किरकोळ गोष्टीतसुद्धा आई_बाबा, ताई_दादा, आत्या_काका यांच्या घ्याव्या लागणाऱ्या परवानग्या आणि त्यासाठी करावी लागणारी खोटं बोलण्याची कसरत मला बापजन्मी नसती जमली !
दुसऱ्या दिवशी त्यांच्या दाराची घंटी वाजवताना माझ्या मनात अभूतपूर्व कल्लोळ होता.__ “ बरं का राधाक्का,” आजकाल मला ते याच नावानी हाक मारायचे_ “तू ज्या गोकुळात मला मिळलीस न, तिथे सगळे असेच होते..” __ “असेच म्हणजे?”_ “असे म्हणजे किंचितसे व्यंग असलेले. गर्भारपणात मूल पाडायच म्हणून आईने काहीबाही खाल्लेलं, ते त्या बिचाऱ्या जीवांनी पचवून त्याच्या खुणा या जगात आणलेल्या. कोणाची नजर अधू तर कोणाचा पाय. तू मात्र धाकड कशी काय याचं मला नेहमी आश्चर्य वाटायचं.”__ “अब्बू $$$ तुमची राधा इतकी निष्काळजी आणि बेजबाबदार आहे असं वाटलं तरी कसं तुम्हाला? एव्हढी खात्री नाहीये..?” माझ्या मनातलं दुखः आणि राग माझ्या स्वरात पुरेपूर उतरला होता. पटकन पुढे होत ते म्हणाले, “ नाही ग राधे नाही. मी म्हणतोय की, ज्याअर्थी तुझ्या मनात द्वंद्व सुरू झालं, त्याअर्थी तुला काहीतरी जाणवलं असणार न? किंवा ‘जाणवलं’ नसणार ! ते काय आहे याचा शोध घेतलास का?” ते मला किती ओळखून आहेत या जाणि‍वेनी मी खजील झाले आणि पाणी पिण्याच्या बहाण्याने स्वैपाकघराकडे वळले. तिथल्या खुर्चीत बसत ते मला म्हणाले, “ मग काय करतेस आता? समरला सांगितलं असशीलच. काय म्हणाला तो?” __ “तुम्हाला विचारायला सांगितलंन् त्यानं. अब्बू, खरंच जर मला या पोराबद्दल काहीच माया नाही वाटली आणि त्याचं सगळं करता करता रागच यायला लागला तर मग माझ्या आणि त्याच्या लहानपणामध्ये काय फरक? मला तर तुम्ही मिळालात, याला कोण ? माझ्या रागाला घाबरून त्याचं बालपण संपेल. समर असा किती पुरणारे त्याला? आमच्या दोघात त्याचीपण कुतरओढ ! मान्य आहे की या सगळ्या जर_तरच्या गोष्टी आहेत. पण तुम्हाला माहीत आहे न मला मुलांची किती नावड आहे ते? मग?”--- अब्बू खुर्चीवरून उठून हळूहळू चालत येत होते माझ्याकडे. त्यांच्या मनातली घालमेल, माझ्याबद्दल वाटणारी काळजी आणि आत्तापर्यंत खाल्लेल्या खस्ता त्यांच्या चालण्यातून दिसत होत्या. मी पुढे होऊन त्यांचा हात धरला. माझ्या घशात दुखायला लागलं. “अब्बू, मी तुम्हाला दहा वर्षांनी म्हातार केलं न हो?” माझं हे वाक्य ऐकून पटकन मिठीत घेतलं त्यांनी. एकीकडे माझे डोळे गळत होते आणि दुसरीकडे माझ्या पाठीवरून फिरणारा त्यांचा आश्वासक हात मला दिलासा देत होता.
Disclaimer:
काही वर्षांपूर्वी गौरी देशपांडे नामक एका अचाट लेखिकेची मला ओळख झाली. झपाटल्यासारख तिचं लिखाण वाचत गेले, तिच्या पुस्तकांची पारायण केली. त्याचा परिपाक म्हणून हा एक प्रयत्न केला तिच्यासारख लिहायचा. जे जमलं आहे ते तिचं आहे, जे नाही ते माझं !

साहित्यिकविरंगुळा