तिरुपती - एक पर्यटन.

कंजूस's picture
कंजूस in काथ्याकूट
18 Oct 2022 - 6:45 pm
गाभा: 

तिरुपती - एक पर्यटन

आमची बरीच भटकंती सुरू असते त्यावरून नेहमी विचारणा होते की तिरुपतीला गेलात का? मग ठरवून टाकलं की करोना संपला की तिरुपती बघू. धार्मिक ठिकाणं म्हटली की गणपतीनंतरचा पितृपंधरवडा चांगला काळ असतो कारण गर्दी नसते. पण बालाजी वेंकटेशाच्या दर्शनासाठी जाणारच नाही तर या वेळी ठरवलं की नवरात्रात जाऊ. आणखी पुढे नेलं तर दिवाळी. मग नोव्हेंबर - डिसेंबरमध्ये दुसरा पावसाळा इकडे सुरू होतो. शिवाय एकच एक ठिकाण ठरवून तीन चार दिवसांचे पर्यटन करणे धोक्याचे असते. याबरोबर तमिळनाडूतील कांचिपूरम, महाबलीपुरम ही जोडलं. कुठे काही संप, बंद,पाऊस झाला तर इतर ठिकाणे हात देतील. तमिळनाडूतला पावसाळा तर ओक्टोबर - नोव्हेंबर - डिसेंबरमध्ये. मग नवरात्रात जाण्याचं नक्की केलं आणि तिरुपतीची माहिती काढायला सुरुवात केली.

काही लोक दरवर्षी तिरुपतीला जाणारे आहेत पण आम्ही प्रथमच जात आहे म्हणजे अगदी नवखे.पूर्वीच्या आंध्रप्रदेशात अगदी दक्षिणेकडे तिरुपती आहे. नंतर आंध्रप्रदेशचे दोन भाग झाल्यावरही आंध्रातच राहिले. जुनी राजधानी हैदराबाद ही नवीन तेलंगण राज्यात गेली. हा आइटीक्षेत्राचा विशेष भाग मिळाला तरी तिरुपतीसारखे श्रीमंती धार्मिक ठिकाण गेल्याने तेलंगणास दु:खच झाले. ते आता दुसरे एक धार्मिक ठिकाण बांधून भाविक खेचणार आहे. मोठा निधी दिला आहे.

तिरुमला/तिरुमलै (तिरु =श्री ,मलै=पर्वत) हे स्थान कसे निर्माण झाले याविषयी पुराणांमध्ये अनेक आख्यायिका आहेत.
कथा पहिली
विष्णूचा तिसरा अवतार म्हणजे वराह अवतार. एकदा प्रलय होऊन पृथ्वी बुडाली तेव्हा विश्वाचा तारणहार विष्णू याने श्वेत वराहाच्या रूपाने येऊन पृथ्वीस सागरातून वर आणले आणि या पर्वतावर विश्रांती घेतली. त्यामुळे या स्थानास श्री वराह स्वामी क्षेत्र म्हणू लागले. किंवा आदि वराह क्षेत्र.

कथा दुसरी
वैकुंठाला सुखी स्थानाचा कंटाळा येऊन विष्णूने नारदमुनीस विचारले की दुसरी कोणतीतरी जागा सुचवा. तेव्हा नारदमुनीने शेषाचलम ही जागा सुचवली. शेषाचे सात फणे म्हणजे इथली सात शिखरे होत. तिरुमलैला शेषाचलमही म्हणतात.

कथा तिसरी
एकदा ऋषिमुनींनी एक मोठा यज्ञ करायचे ठरवले पण यज्ञ देवता कोण असावी यावर त्यांचे एक मत होईना. मग भृगू ऋषी म्हणाले की मी घेऊन येतो एका देवाला. प्रथम ब्रह्माकडे गेले तर त्यांच्या तीनही तोंडांनी लक्षही दिले नाही. मग भृगू गेले कैलासावर महादेवाला बोलवायला. पण महादेव पार्वतीशी बोलण्यातुन गुंग होते. मग पोहोचले वैकुंठाला. महाविष्णू लक्ष्मीची बोलण्यात मग्न. भृगूला आला राग. त्याने विष्णूच्या छाताडावर मारली लाथ. विष्णू जागे होऊन पाहतात तर समोर संतापलेले भृगू. विष्णूने भृगूची करुणा भाकली, पाय धरले आणि आपल्या पायाला लागले तर नाही ना विचारले. भृगुला आली विष्णूची दया आणि क्षमा केली. पण लक्ष्मीची आश्रय स्थान असलेल्या जागीच लाथ बसूनही विष्णूने काहीच केले नाही म्हणून लक्ष्मी वैकुंठ सोडून करवीर क्षेत्री म्हणजे कोल्हापुरात येऊन राहिली. ( रेल्वेने यांची नोंद घेऊन कोल्हापूर ते तिरुपती अशी हरिप्रिया एक्स्प्रेस सुरू केली आहे.) तिकडे वैकुंठाला विष्णूला कंटाळा आला आणि तो नारदाच्या सुचवणीनूसार शेषाचलम पर्वतावर येऊन एका मुंग्यांच्या वारुळात 'श्रीनिवास' रूपात राहिला. म्हणून हे तिरुमलै श्रीनिवासम क्षेत्र. पुढे लक्ष्मिला आपल्या पतिदेवाची काळजी लागून एका गायीला तिथे घेऊन फिरू लागली. त्या वारुळापाशी येऊन ती पान्हा सोडत असे. ही गाय तिथल्या एका राजाला देऊन लक्ष्मी कोल्हापुरात परतली तरी गाय आपले काम करतच राहिली. राजाच्या गुराख्याने ही गोष्ट राजाच्या कानावर घातली तेव्हा राजाने गायीला काठीने मारले. श्रीनिवास तिथून बाहेर आले आणि गायीच्या अंगावरचे काठीच्या माराचे वळ त्यांच्या देहावर पाहून राजा वरमला आणि क्षमा मागू लागला. मग विष्णूने त्यास सांगितले की ठीक आहे तुझ्या वंशाच्या एका राजास मुलगी होईल तेव्हा तिच्याशी लग्न करेन. तर तो राजा आकाश राजा आणि त्याची मुलगी पद्मावती. आणखी एका आश्वासनाने कृष्णाचा प्रतिपाळ करणाऱ्या यशोदेला विष्णूने वचन दिलेले की मी तुला पुढे एकदा दिव्य दर्शन देईन. त्याप्रमाणे यशोदा ही सांप्रत काळी वकुळादेवी म्हणून अवतरली. ती या 'श्रीनिवासाचे' स्थळ घेऊन आकाश राजाकडे पद्मावतीसाठी मागणी घालायला गेली. आणि श्रीनिवासाचे पद्मावतीशी लग्न झाले. (या पद्मावतीचे देऊळ तिरुपती गावापासून पाच किमी.वर कांचिपुरम रस्त्यावर आहे. )

एकूण तिरुमला/तिरुपती माहात्म्य पुराणांत आहे. आताच्या श्रीनिवास/ वेंकटेशा यापेक्षा वराह अवताराचे स्थान म्हणून आद्य आहे.

फोटो १
वराह स्वामी पुष्करणी, तिरुमलै

पुराणांत विविध पवित्र क्षेत्र आणि स्थानांचा उल्लेख असला तरी देऊळ ही कल्पना बहुधा थोडी उशिरा आली असावी.

तिरुमला आणि तिरुपती येथील देवळे
ऐतिहासिक आढावा.

पाचव्या शतकात पल्लव राजांनी ही देवळे बांधली. नंतर चोल राजांनी त्यात भर घातली. सोळाव्या शतकात विजयनगरच्या राजांनी त्यास गढी बांधून ,उंच गोपूरे बांधून भव्य दिव्य केलं.

अकराव्या शतकानंतर हिंदु राजांच्या राजवटी संपून मुसलमान,मोगल,ब्रिटीश राजवटी आल्या. देवळांची तोडफोड इकडे झाली नाही. ब्रिटिशांनी धार्मिक कार्यक्रमांतून बाजूला झाल्यावर या देवळांची व्यवस्था हाथीरामजी मठास सोपवण्यात आली. ती १८४३ ते १९३३ नव्वद वर्षे पाहात होते. नंतर देवस्थान कमिटी निर्माण केली गेली. १९८७ मध्ये सर्व कारभार आंध्र प्रदेश सरकारकडे गेला. त्यांनी मंडळावर कमीतकमी तीन आइएएस अधिकारी नेमले. ते धार्मिक सुसुत्रता,स्वच्छता, पर्यटन,सुरक्षा पाहतात. ( ते तिथे गेल्यावर लगेचच जाणवते.)

कुठे राहावे

याविषयी यूट्यूबवर खूप विडिओ आहेत. ते पाहून एक लक्षात आले की इतर शहरांत जशी हॉटेल्स आणि रेस्टारो आहेत तशी इथेही भरपूर आहेत पण देवस्थान कमिटीच्या निवासाची व्यवस्था पाहून ठरवून टाकले की एक दिवस तरी ( एकच दिवस खोली मिळते) या खोलीत राहून अनुभव घ्यायचाच. तो घेण्याचा योग आला आणि तिथली स्वच्छता आणि अगत्य पाहून तिथेच देव भेटला.

देवस्थानच्या रुमस बुकिंग विषयी.
आणि दर्शन पास.
देवस्थानच्या वेबसाइटवरून ( https://tirupatibalaji.ap.gov.in/ )ऑनलाईन रूम्स बुकिंग करता येते पण ते लवकर भरते. या रूमस 'श्रीनिवासम कॉम्प्लेक्स' ( बस स्टेशनजवळ,समोर) या इमारतीत असतात. आगावू बुकिंग न मिळाल्यास तिरुपती स्टेशनजवळच्या 'विष्णू निवासम' मध्ये करंट/ऑफलाईन बुकिंग होते. यासाठी राहणाऱ्या सर्वांना तिथे हजर राहून आधार कार्डस द्यावी लागतात. रूमचे भाडे रोखीने घेत नाहीत. कार्ड पेमेंटच करावे लागते. ( साधी नॉन एसी रु३४०,एसी ५००,डिलक्स ८००.)फक्त २४ तासांसाठी रूम मिळते. गर्दी नसल्यास दुसरे दिवशी आणखी २४तास इक्स्टेन्शन मिळू शकते. पण अगोदरच दोन दिवसांचे बुकिंग मिळत नाही. नियम बदलतात. खासगी हॉटेल्स तीन बेडचे १३०० रु घेतात,एसी रु दोन ते अडीच हजार १८टक्के टॅक्ससह. एकदम दोन तीन दिवसांसाठी रुम घेता येते हा फायदा. तिरुपतीमधल्या हॉटेलवर सर्व लगेच ठेवून फक्त एक लहान बॅग घेऊन तिरुमला'ला जाऊन येणे सोयीचे पडते.

दर्शनाचे तीन प्रकार आहेत.
१)दिव्य दर्शन - हे अलिपिरी फुटपाथ उर्फ सोपान वरून ३५०० पायऱ्या चढून तिरुमला'ला येतात त्यांना थेट दर्शन मिळण्याची सोय आहे. एक लाडू प्रसाद फुकट मिळतो.
२)सर्व दर्शन - फ्री. पण कितीही वेळ लागू शकतो.
३) स्पेशल दर्शन तिकिट - हे रुपये तिनशे भरून ऑनलाईन बुकिंग https://tirupatibalaji.ap.gov.in/ या साइटवर होते. थोडे लवकर दर्शन होते. बुकिंग पुढच्या महिन्याचे अगोदरच्या महिन्याच्या पंधरा तारखेस उघडते. पण ते अर्ध्या तासात संपते.
या सर्व दर्शनाचे मिळून साधारणपणे वीस तासांत ऐंशी हजार लोकांना दर्शन मिळते.

कसे जावे
इथून बेंगळुरू केंपेगौडा विमानतळ २४० किमी.
चैन्नई विमानतळ १३० किमी आहे. सोयीचा.
रस्त्याने - सर्व मुख्य शहरांना जोडले आहे. रेल्वेचे तिरुपती स्टेशन गावातच आहे. रेनिगुंटा हे स्टेशन मुंबई -चेन्नई या मेन लाईनवर दहा किमी दूर आहे. तिरुपती -रेनिगुंटा -श्री कालाहस्ती या मार्गे खासगी आणि राज्यपरिवहनाच्या बसेस दर दहा मिनिटाला असतात. थेट टॅक्सीही आहेतच.

फोटो २
तिरुपती रेल्वे स्टेशन परिसर

याविषयीचे यूट्यूबवरचे विडिओ पाहून तिरुपतीमधून तिरुमाला पर्वतावर कसे जाता येते याची पूर्ण माहिती मिळाली. अल्लीपिरी सोपान मार्गे पायी चढून जाणाऱ्यांना विशेष महत्त्व दिले आहे. माझा तसेच करण्याचा विचार होता पण मी एकटा नव्हतो म्हणून बेत रद्द केला. तसा तिरुमला फार उंचावर नाही. ८२०मिटरस आहे, म्हणजे माथेरानपेक्षा शंभर मिटरस जास्ती. मध्यंतरी करोना काळात वरती गर्दी होऊ नये म्हणून एक नियम करण्यात आला होता. तुमच्याकडे दर्शन पास/तिकिट असल्याशिवाय बसने/वाहनाने वर जाऊ देत नव्हते. आता तो नियम काढला आहे. वर जाताना वाटेत लगेजची तपासणी केली जाते. पाण्याच्या वन-टाईम-यूस प्लास्टिक बॉटल्स नेता येत नाहीत. सध्या करोना मास्क बंधन काढले आहे.

खादाडी
संपूर्ण तिरुपती परिसर शाकाहारी आहे. इडली,वडे,डोसे आणि फक्त भात, सांबार, रसम,भाजी असलेली थाळी मिळते. एका ठिकाणी आंध्रच्या चटण्या, गुंगरा का खट्टा आचार आणि तेल मिळाले. इकडे सर्व पदार्थ केळीच्या पानावरच वाढले जातात. मेनू पाहून परोठा,नान, पंजाबी जेवण, महाराष्ट्रीय पिठलं भाकरी मिळण्याची रेस्टारोंही आहेत. आवडता चहा चांगल्या दुधाचा कुठेही/रेस्टारोंतही पंधरा रुपये फुल कप. मजा.

प्रसाद
फोटो ३
श्री वेंकटेशा बालाजी मंदिर बाहेरून

फोटो ४
श्री बालाजीचा रथ

हे महत्त्वाचे. आम्ही काहीही खटपट करून दर्शन करायचेच असे ठरवून गेलो नव्हतो. दहा मिनिटांत कुठे आत जाऊन येता येत असेल तिथे पर्यटन म्हणूनच जाणार होतो. नवरात्रानिमित्त ब्रह्मोत्सव सुरू होता. रात्री नऊला रांगेत राहिलेले भाविक सकाळी दहाला दहा सेकंदांचे दर्शन घेऊन बाहेर येत होते. देवाच्या दर्शनापेक्षा प्रसादाचे महत्त्व अधिक असते. ते मात्र मागच्या दाराने साध्य केले. चार लाडू मिळवले ( विकत घेतले.) नेहमिचेच बुंदीचे लाडू आहेत. आदि वराह स्वामी मंदिर आणि स्वामी पुष्करणी येथे गर्दी नव्हती ते पाहिले. इतके बारा तास रांगेत घालवलेले भाविक अन्नप्रसादमकडे जात होते. खूप गर्दी.

फोटो ५
तिरुमलै पर्वत, तिरुपती शहरातून

फोटो ६
तिरुमलै प्रवेश करताना एक कारंजा

चार तासांत तिरुमला आटपून खाली रूमवर विष्णू निवासमला आलो. तिथेही अन्नप्रसादमची सेवा आहे. दहीभात देतात हवा तेवढा. गर्दी नाहीच.( तिरुमलाच्या अन्नप्रसादम सेवेत संपूर्ण जेवण थाळी मिळते.)

इतर देवळे
तिरुपती रेल्वे स्टेशनला लागूनच श्री गोविंदराव स्वामी मंदिर आणि जत्रा बाजार आहे. ते शांतपणे पाहू शकतो. देऊळ हजार वर्षे जुने आहे, मोठे उंच (४०मिटरस)गोपूर आहे. तिरुमला पर्वतावर बघण्याची ठिकाणे आणि खाली तिरुपती मधील देवळे यांच्या देवस्थानच्या तसेच खासगी टुअरस आहेत. त्यांचे यूट्युबवरचे विडिओ पाहून आणि हाताशी असलेला वेळ याप्रमाणे अधिक पर्यटन शक्य आहे. वरच्या एका टुअरमध्ये मलबारी शेकरु पाहायला मिळते. वन्य प्राण्यांना खायला घालू नका अशा सूचना असतानाही त्या शेकरुंना भाविक लोक खायला देतानाचा विडिओ होता.तो आता Traveling Tadka channel ने काढून टाकला आहे.

फोटो ७
गोविंदराव स्वामी मंदिर, तिरुपती.

तिरुपती मध्येच तिरुमला वरून खाली येताना वाटेवरच पर्वताच्या पायथ्याशी (रेल्वे स्टेशनपासून तीन किमी) कपिलतीर्थ/कपिलेश्वराचे रम्य देऊळ आहे. छानसा धबधबा आणि पुष्करिणी आहे. ही फारच सुंदर जागा आहे. ही चुकवू नये.
फोटो ८
कपिलतीर्थ

पद्मावती मंदिरास गेलो नाही.
दुसऱ्या दिवशी तिरुपती पासून तीस किमी अंतरावर चे श्रीकालाहस्ती हे देऊळ पाहिले. इथे राहुकेतू दोष निवारण पूजा होतात त्यामुळे भाविकांची सतत येजा असते.
फोटो ९
श्री कालाहस्ती प्रवेश

विशेष - इथल्या ओटो रिक्षांना भाडेमिटर नाहीत. साठ रु/ किमी या भावानेच प्रवास करावा लागतो. बाकी धार्मिक ठिकाणी खर्च व्हायचाच. .

फोटो १०
पुष्करणी, तिरुपती. मागे रोषणाई केलेलं विष्णू निवासम.

पाऊस कुठे आला नाही आणि पर्यटन छान झाले.
(२,३,४,ऑक्टोबर २०२२.नवरात्र काळातले पर्यटन.)
___________________________

(भटकंती सदरात लेखनाचा आराखडा येत नसल्याने या चर्चा/काथ्याकूट सदरात लिहीत आहे.)

प्रतिक्रिया

तिरुपती काय किंवा अष्टविनायक काय हे करताना एक प्रश्न मनात येतो की इतके सव्य अपसव्य करून तिथे दर्शनासाठी जायचे तर घरी दर्शन केले तर ते पुण्य वेगळे असते का?
एखादी ट्रीप म्हणून गेलो तर वेगळी गोष्ट आहे.

असो : तिरुपती डोंगराखाली पद्मावतीचे मंदीर आहे. तेथे बालजीचे आणि पद्मावतीचे लग्न लागते. हा सोहळा रोज होतो.
या मागची कथा आहे की विष्णू ने राम अवतारात पद्मावतीला वचन दिले होते. ते वचन पूर्ण करण्यासाठी विष्णू ने बालाजी हा अवतार घेतला

चौकस२१२'s picture

19 Oct 2022 - 5:32 am | चौकस२१२

" भाऊगर्दी " या प्रशांवर स्थापत्य शास्त्रातून काय उपाय काढता येईल याचा विचार बरेच दिवस मनात घोळत आहे

यापुढे सर्व अशी प्रसिद्ध ठिकाणे ) विशेष करून प्रार्थना स्थळे ) वर्तुळाकार बनवावीत आणि त्यास चार दिशातून किंवा ६ किंवा ८ असे प्रवेश पथ असावेत .. त्यातील गर्दीचे डायनामिक ( मराठी? ) संतुलिकारन करावे .. असा फतवा मी काढीत आहे ... त्यानुसार आपापल्या दाहरमत हा बदल करावा लागेल,
१) जसे ३ मुखी सिंह आहे तसे हिंदू , ख्रिस्तीमी बुद्ध देवास अनेख मुखी वहार लागेल ,, शिक्षणा ४ किंवा आठ गेणथ त्या त्या कोनातून ठेवावे लागतील
( हे ८ प्रवेश पथ हे फक्त एका पातळीवर नसावेत तर बहू पातळीवर असावेत ..

सिद्धिविनायकचे झकपक ३ मजली देऊळ झाले, गणपती पुळेंचे काँक्रीट जीर्णोद्धार झाला ठेवाच आपण ठरवले गर्दी बाजारी देवळात जाणे बंद
जायचेच तर फक्त स्थापत्य बघायला जायचे .. बाकी देव व तिथून कधीच पळून गेलेला असणार ! आणि हो सर्वधर्म समभव म्हणून खुलासा हा कि हे काही फक्त हिंदू देवलनबद्दल नाही म्हणत ...
असो लेखकाचा अपमान करणायचा कोणताही हेतू नाही हे नमूद करून वरील प्रतिसाद लिहिला आहे

डोंगर म्हटला की मला सुरसुरी येते. जायचं. शिवाय धार्मिक म्हणजे चोवीस तास वाहन,प्रवास,हॉटेल याची सोय असते.

पण ती नाही.
--------
तिरुमलै पर्वत आणि परिसर पाहण्याची जेवढी उत्सुकता होती तेवढी बालाजी दर्शनाची नव्हती.
घाटात दोन्ही बाजूंनी जी झाडे आहेत ती बरीच परदेशी वाणाची आहेत. आतल्या भागात भारतीय वनातली आहेत. झाडी मात्र दाट आहे.

अनिंद्य's picture

18 Oct 2022 - 7:59 pm | अनिंद्य

छान झाला प्रवास.

अनेक वर्षांत जाणे झाले नाही तिरुपतीला. आता गेलो की त्यांचे किचन बघायचे आहे.

कंजूस's picture

18 Oct 2022 - 8:11 pm | कंजूस

मला वाटते कर्नाटकातील धर्मस्थळा ( श्री मंजुनाथा) यांचे पाहावे. डिस्कवरी चानेलवर सतत दाखवत असतात. किंवा पुरीच्या जगन्नाथाचे/भूबनेसरच्या वासुदेव मंदिराचे/लिंगराज मंदिराचे पाहावे.

माहिती व वर्णन, फोटो उत्तम आहेत.
अलिकडे कुठल्याही प्रसिद्ध मंदिरात दर्शनासाठी जायचे म्हणजे अंगावर काटा येतो.
काय ती गर्दी , काय त्या रांगा, हाल हाल नुसते.
बालाजी ला इथूनच नमस्कार!

मुक्त विहारि's picture

18 Oct 2022 - 9:23 pm | मुक्त विहारि

सहमत आहे ....

धर्मराजमुटके's picture

18 Oct 2022 - 8:26 pm | धर्मराजमुटके

छान लेखन !
अवांतर : महाप्रसाद मधे कांदा लसूण वर्ज्य असतो का तिथे ? बहुतांश वैष्णव मंदिरांमधे वर्ज्य असतो म्हणून विचारले.
तिथली प्रजा उत्तर भारतीयांची भाषा बोलते काय ?

म्हणजे किती गर्दी असेल याची कल्पना करा. तिकडे गेलो नाही. पण तो अन्नप्रसादम घेण्याची इच्छा होती. बाहेर हॉटेलात जेवण थाळी मिळते तेच असावे हे विडिओ पाहून वाटतंय. बाकी सांबारात कांदा असतोच तो असणारच.

भाषा कोणती? तिथले लोक तेलुगूच बोलतात. पण आपल्याला विचारतात तेलुगू?/तमिळ?/इंदी?/इंग्लिश?
भाविकांच्या गटात पंधरा टक्के महाराष्ट्रातून,पंधरा हिंदी भाषिक,तीस तेलुगू,तीस तमिळ वाटले. मराठी लोक नांदेड,लातूर भागातले शेतकरी अधिक. पंधरा -वीस तीस लोकांचे गट आणि एक म्होरक्या. हॉटेल रूम घेत नाहीत, विष्णू निवासाच्या दोन मजल्यांवर फरशीवरच राहतात. ऐसपैस जागा, थंड पाणी, स्वच्छता गृहे आहेत सोयी. मोठा गट असल्याने लगेजची चिंता नसते, लॉकरस घेत नाहीत. इथेही अन्नप्रसादम ( म्हणजे फुकट अन्न) देतात. फक्त दहीभात असतो, कितीही मिळतो. चांगला असतो.

महाप्रसाद कांदा लसूण नसलेला म्हणजे पुरी - भूबनेसरचा (भूवनेश्वरचा). उत्तम आहार असतो.

श्रीराम बिडीकर's picture

20 Oct 2022 - 10:14 am | श्रीराम बिडीकर

होय , तिथल्या महप्रसदात कन्दा लसुण हा वर्ज्य असतो आनि तिथल्या व्यापा-याना तोदकी मोडकी हिन्दी येते

श्रीराम बिडीकर's picture

20 Oct 2022 - 10:14 am | श्रीराम बिडीकर

होय , तिथल्या महप्रसदात कन्दा लसुण हा वर्ज्य असतो आनि तिथल्या व्यापा-याना तोडकी मोडकी हिन्दी येते

श्रीराम बिडीकर's picture

20 Oct 2022 - 10:19 am | श्रीराम बिडीकर

महाप्रसाद मधे कांदा लसूण वर्ज्य असतो का तिथे ? -------> होय वर्ज्य असतो कांदा आणि लसुण पण..
तिथली प्रजा उत्तर भारतीयांची भाषा बोलते काय ? -------> तोडकी मोडकी हिन्दी येते तिथल्या लोकाना

महाप्रसादम्= लाडू
वरच्या मंदिराशेजारी अन्नप्रसाद उपलब्ध असतो. सकाळी उपमा. दुपारी आणि रात्री सांबार भात आणि दोन तीन चटण्या. अर्थात, तो प्रसाद असतो.
असाच अन्नप्रसाद खाली पद्मावती मंदिरात उपलब्ध असतो.

वरच्या बसस्टँड पासून ते मंदिराजवळील उपाहार गृहे आणि दुकाने येथील लोक मराठी आणि हिंदी बोलतात. तिथे पोचल्यावर लगेच कानावर 'बोला भाऊ, गरम जेवण तयार आहे. मराठी, पंजाबी, साऊथ सगळं मिळेल.' अशी वाक्ये कानावर पडल्यावर आश्चर्याचा धक्काच बसला होता. दुकानदार स्थानिकच, पण ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी उत्तम मराठी बोलतात.

मुक्त विहारि's picture

18 Oct 2022 - 9:22 pm | मुक्त विहारि

फार लहानपणी गेलो होतो

आता परत जाणार नाही

देव तिन्ही त्रिकाळ आणि सर्वव्यापी असतो, ह्यावरच विश्र्वास बसला आहे...

नचिकेत जवखेडकर's picture

19 Oct 2022 - 6:53 am | नचिकेत जवखेडकर

छानच आहे प्रवासवर्णन! ७वीत असताना तिरुपतीला गेलो होतो त्या आठवणी जाग्या झाल्या. मी तिकडे आजारी पडल्यामुळे मंडपात जाऊन दर्शन घेता नाही आले. एक मात्र आठवतं की, रेणीगुंटाहून जाताना त्या बसवाल्यानी जी काय सुसाट मारली होती बस घाटातून तेव्हा असं वाटलं की हा नक्की पाडणार बस दरीत.

तशी बालाजीची मंदिरं बऱ्याच ठिकाणी असतील भारतात पण मी चेन्नईला असताना टी नगर मधल्या एका बालाजीच्या मंदिरात बऱ्याचदा जायचो शनिवारी सकाळी. काहीही गर्दी नाही आणि छान दर्शन व्हायचं. तसंच प्रसाद म्हणून जो बूंदीचा लाडू मिळायचा तो केवळ अप्रतिम. केतकावळ्याच्या मंदिरात पण मिळतो. तेही मंदिर छान आहे.

श्वेता व्यास's picture

19 Oct 2022 - 12:12 pm | श्वेता व्यास

छान फोटो आहेत. तिरुपतीला अजून जाणे झाले नाही आणि गर्दीची वर्णने ऐकून जाणे होईल असे वाटतही नाही.

Bhakti's picture

19 Oct 2022 - 6:18 pm | Bhakti

छान माहिती लिहीली.
इतिहास, पौराणिक, भौगोलिक इत्यंभूत
भाऊ नुकताच जाऊन आला त्यामुळे प्रसादाच्या लाडुची चव अजून जिभेवर रेंगाळत आहे :)
मी कालेजला असताना गेले होते,नुसती धमाल!!बालाजीचे दर्शन खरोखर अजूनही आठवते!एक दिव्य अनुभव _/\_
बालाजीचे लग्न आमच्या शहरात पण झाले होते.तिरुपतीहून‌ मूर्ती आणतात, गावोगावी असे सोहळे रोज घडवतात,तोही पाहिला आहे.

कपिलमुनी's picture

19 Oct 2022 - 6:36 pm | कपिलमुनी

बालाजीच्या गर्दीचा बाऊ करण्यात अर्थ नाही..
प्रत्येक ठिकाणी वेटींग साठी रूम्स असतात, तिथे बाथरूम , खाण्याची , मुलांना दूध वगैरे सोय असते . अशा हॉल मधून थांबत थांबत पुढे जायचे असते . शेवटी अर्धा तास उभे राहावे लागते.
काही हॉल मध्ये स्क्रीन असते .. तिथे पौराणिक चित्रपट असतात..

लहान मुले, वृद्ध असतील तर डायरेक्ट दर्शन मिळते .

आपल्या पुराणात जसे नाममहात्म्य तसेच स्थानमहात्म्य आहे.
त्यामुळे मी घरीच बरा, तिथे जाऊन काय वेगळे वगैरे पब्लिक असता त्यांना फाट्यावर मारून एकदा दर्शन घेण्यासाठी नक्की जावे

Bhakti's picture

19 Oct 2022 - 6:41 pm | Bhakti

+१ अगदी बरोबर!
बालाजीप्रमाणे आणखिन‌ दर्शनासाठी सोयीयुक्त देवस्थान कोणते?

तो लेख आताच दिला आहे.

आणखिन‌ दर्शनासाठी सोयीयुक्त देवस्थाने . . .

कर्नाटक किनारा. निसर्गाने भरभरून दिलंय. वाहने, राहाणे,खाणे,नदी,समुद्र, पर्वत , धार्मिक ठिकाणं,स्वच्छता,निवांतपणा सर्वच आहे.
दोन चानेल्स - (English subtitles सह)
Steps together
Not in office

कंजूस's picture

19 Oct 2022 - 7:24 pm | कंजूस

एक पत्रकार म्हणून जाऊन आलो. अगोदरच्या पंधरवड्यात/पितृपंधरवड्यात तासाभरात दर्शन मिळत होते असे कळले.

प्रचेतस's picture

19 Oct 2022 - 8:06 pm | प्रचेतस

फोटो आणि वर्णन खूपच भारी. तुमचे पर्यटन केवळ धार्मिक न राहता काय पाहावे, काय बघावे, काय खावे, कसे जावे, कसे यावे अशा विविध अंगांनी माहिती पुरवलेली असते ते विशेष आवडते.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

21 Oct 2022 - 8:12 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

ऑफलाईन वाचन होतो म्हणजे लॉगीन न करता. सुरुवातीपासुनच तुम्ही कथा सांगून मजा आणली. सर्व छायाचित्रे मस्तच. बालाजी आता येईल तेव्हा येईल असे वाटले. नवख्या माणसाला मार्गदर्शक ठरावा असा लेख. लिहिते राहा कंजुस काका. लेखन आवडले.

-दिलीप बिरुटे

बोलघेवडा's picture

22 Oct 2022 - 8:07 am | बोलघेवडा

हवा सर्व ठिकाणी आहे, पण तयार मध्ये हवा भरण्यासाठी पंप लागतोच. वाऱ्याची झुळूक अनुभवण्यासाठी पंखा किंवा खिडकीसमोर बसणे गरजेचे आहे. घरी टीव्ही वर बघितलेला चित्रपट आणि थिएटरमध्ये 3D गॉगल्स लावून बघितलेला चित्रपट याय अनुभवाचे अंतर असते. त्याप्रमाणे देव सर्वत्र आहेच पण त्याची अनुभूती येण्यासाठी देवळात जाणे गरजेचे आहे. तिथल्या काही क्षण तरी मॅन भक्तिमय होऊन जाते.
तिरुपती येथील व्यवस्था अतिशय उत्तम दर्जाची आहे. गर्दी असली तरी धक्का बुक्की नाही. कुठंही काही ही वाहू देत नाहीत त्यामुळे फुल, हळद कुंकू यांच निर्माल्य आढळत नाही. अनवाणी चालताना कचरा सोडा एखादा खडा सुद्धा टोचत नाही. गोविंदा च्या गजरात तुम्ही मंदिरात प्रवेश करता आणि श्री बालाजी चे ते रूप समोर येते तो अनुभव अविस्मरणीय आहे. तेव्हा कोणताही किल्मिष मनात ना ठेवता मंदिरात जाऊन दर्शन घेणे ही विनंती

कंजूस's picture

22 Oct 2022 - 12:51 pm | कंजूस

नेहमी जाणाऱ्यांना गर्दी केव्हा असते/नसते त्याची माहिती असते. ब्रह्मोत्सव असल्याने गर्दी फार होती. तासभर लागत असता तर आता गेलो असतो आणि आतली व्यवस्था पाहून आलो असतो. बघू पुढे कधीतरी.
पंढरपुरात दोनदा गेलो. पहिल्या खेपेला मुखदर्शनाच्या रांगेतून पाहिले. दुसऱ्या खेपेला ज्येष्ठ कृष्ण द्वादशीस गेलो. दहा मिनिटांत गाभाऱ्यात पोहोचलो. ती पायाखालची वीट पाहायला मिळाली आणि लगेच पोलीसांनी "मामा पुढे सरका" सांगितले. गुराखी लोक कापडी टोपी घालतात ती डोक्यावर आहे पण ती पाहता येत नाही. मुकुट घालून ठेवतात त्यावर.

चौथा कोनाडा's picture

22 Oct 2022 - 1:01 pm | चौथा कोनाडा

खुप मस्त धागा .... तिरूपति हा असा विषय असतो की कुणीही जाउन आलातर त्याच्या अनुभवाविषयी ऐकायला उत्सुकता वाटतेच !

dpasasasfm007

खुप अनुभव अन पर्यटनाच्या दृष्टीने उपयोगी माहिती !
तिरूपतिच्या आख्यायिका रोचक आहेत, पुन्हा वाचताना मजा आली !

माझं बालपण धार्मिक गर्दीच्या ठिकाणी गेल्यामुळे तिरुपति विषयी फार अप्रुप नव्हते .... आणि तिथली प्रचंड गर्दी, दर्शनाला रांगा, केस कापण्याचे प्रकार ऐकुन तर तिथं जायचं नाहीच असं ठरवलं होतं पण अचानक ३-४ वर्षांंपुर्वी नातलगाबरोबर जाण्याचा योग आला, दिवाळी संपता संपता गेलो. भक्तनिवास फुल्ल असल्यामुळे हॉटेल बुक करावे लागले. दर्शन पास ऑनलाईन काढून ठेवले होते ... त्यामुळे रांगेत फार वेळ थांबावे लागले नाही ... तिथला घाट बेहद्द आवडला .. . स्वच्छता, नीटनेटकेपणा, मार्गदर्शक पाट्या, शिस्त आणि व्यवस्थापन यामुळे खुप इम्प्रेस झालो .. प्रत्यक्ष तिरुपति दर्शनाला फार काही वाटले नाही (आपण म्हंजे कोरडा पाषाण ... धन्य धन्य होण्यातलं सुख आपल्याला कसं कळणार ? ) भोजनगृहात फार वेळ न लागता भोजन झाले, उत्तम होते त्यामुळे आवडले. केस अर्पण करायचा भाग (केस कापायचा) आवर्जून बघुन आलो, जेवढं वाटलं होतं तेव्हढं अस्वच्छपणा नव्ह्ता,

इतर ठिकाणे पदमावती मंदिर, गोविंदराव स्वामी मंदिर आवडले. कपील तीर्थ खुपच आवडले. इथे पुन्हा यावेसे वाटले. सेव्हन हिल्स (रॉक गार्डन) देखणे आहे ते ही आवडले, पुन्हा संधी मिळाली तर हा डोंगर रांग परिसर यायला पुन्हा यायचे ठरवले. तिरुपति झू पार्क अर्थात प्राणि संग्रहालय हे ही पाहिले... सुंदर आहे, पाहण्यासारखे ... रमत गमत पाहिले तर ५-६ तास आरामात निघुन जातील !! आम्ही रमत गमतच पाहिले !

आणि कालीहस्ती मंदिर तर आयसिंग ऑन दि केक होतं ..., सुंदर आहे, मंदिर स्थापत्य अ ति शय आकर्षक आहे !
एकंदरीत तिरूपति फुल्ल आठवड्याचे झकास पर्यटन आहे.

धन्यू कंजूस जी !

श्वेता२४'s picture

25 Oct 2022 - 12:20 pm | श्वेता२४

१७-१८ वर्षांपूर्वी तिरुपतीला जाणे झाले होते. बहिणीचा एक मारवाडी मित्र दरवर्षी जायचा त्याच्यासोबत गेलो होतो. त्यानेच सर्व आयोजन केले होते. आमचा जवळपास १०-१२ जणांचा ग्रुप होता. मारवाडी धर्मशाळेत राहिलो होतो. बाकी काही आठवत नाही. पण रात्री दर्शनासाठी गोविंदा गोविंदा असे म्हणत एका दालनातून दुसर्या दालनात पळत जायला भारी मजा आली होती. सर्व भक्तीमय वातावरण होते. बालाजीचे दर्शन थोडक्या सेकंदासाठी झाले पण तो क्षण आजही आठवतो. एक जाणवते लहानपणी कोणत्याही मंदीरात दर्शन सुलभ होते. शांतपणे दर्शन घेता यायचे. नुकतेच तुळजापूर,गाणगापूर व अक्कलकोटला जाऊन आले. प्रचंड बदल जाणवला. सर्वत्रच खूप गर्दी असते . निवांत दर्शन होतच नाही. गडबड गोंधळ धक्काबुक्की होते व मग दर्शनाचा मूड जातो. पण तिरुपतीला प्रचंड गर्दी त्यावेळीही होती. तराही असे काही जाणवले नाही. असो. गर्दीतही भक्तांना चांगले दर्शन घडावे यासाठी मंदीरप्रशासनाने काही प्रयत्न केले पाहिजेत हे नक्की.

श्वेता२४'s picture

25 Oct 2022 - 12:20 pm | श्वेता२४

१७-१८ वर्षांपूर्वी तिरुपतीला जाणे झाले होते. बहिणीचा एक मारवाडी मित्र दरवर्षी जायचा त्याच्यासोबत गेलो होतो. त्यानेच सर्व आयोजन केले होते. आमचा जवळपास १०-१२ जणांचा ग्रुप होता. मारवाडी धर्मशाळेत राहिलो होतो. बाकी काही आठवत नाही. पण रात्री दर्शनासाठी गोविंदा गोविंदा असे म्हणत एका दालनातून दुसर्या दालनात पळत जायला भारी मजा आली होती. सर्व भक्तीमय वातावरण होते. बालाजीचे दर्शन थोडक्या सेकंदासाठी झाले पण तो क्षण आजही आठवतो. एक जाणवते लहानपणी कोणत्याही मंदीरात दर्शन सुलभ होते. शांतपणे दर्शन घेता यायचे. नुकतेच तुळजापूर,गाणगापूर व अक्कलकोटला जाऊन आले. प्रचंड बदल जाणवला. सर्वत्रच खूप गर्दी असते . निवांत दर्शन होतच नाही. गडबड गोंधळ धक्काबुक्की होते व मग दर्शनाचा मूड जातो. पण तिरुपतीला प्रचंड गर्दी त्यावेळीही होती. तराही असे काही जाणवले नाही. असो. गर्दीतही भक्तांना चांगले दर्शन घडावे यासाठी मंदीरप्रशासनाने काही प्रयत्न केले पाहिजेत हे नक्की.

गोरगावलेकर's picture

25 Oct 2022 - 3:26 pm | गोरगावलेकर

आख्यायिका, दर्शनाचे प्रकार, कसे जावे वगैरे सविस्तर माहिती. आणि जोडीला सुंदर फोटो