दिवाळी अंक २०२२ - अनुत्तरित

Primary tabs

उमेश तुपे's picture
उमेश तुपे in दिवाळी अंक
5 Nov 2022 - 10:31 pm

कमेकांशी स्पर्धा करत आकाशाला स्पर्श करू पाहणाऱ्या उंचच उंच झाडांवर त्याची नजर गेली आणि एका विलक्षण समाधानाने त्याने पश्चिमेस पसरलेल्या मावळतीच्या लालसर रंगाकडे वळून पाहिलं. गेल्या कित्येक दिवसांच्या प्रवासात आज पहिल्यांदाच सपाट मैदानापेक्षा काहीतरी वेगळं त्याच्या नजरेस पडलं होतं. या सुखद धक्क्याने त्याची आशा पल्लवित झाली. गडद काळोखाचा विळखा पडण्यापूर्वी कालीच्या मंदिरात पोहोचावं, या विचाराने त्याने चालण्यास सुरुवात केली. पण विरलेल्या वस्त्राप्रमाणं झालेल्या त्याच्या शरीरातून एक कळ सापाप्रमाणे सळसळली आणि त्याचं शरीर वेदनेनं थरथरलं. आपला प्रवास आता इथेच संपणार असं त्याला क्षणभर वाटलं. त्याचे डोळे मिटले गेले. एक अनामिक भीती त्याच्या अंगात संचारली. पांढऱ्या चोचीचं अन बसक्या मानेचं तेच गिधाड आपल्या मानगुटीवर बसलंय, असं त्याला क्षणभर वाटलं आणि तो जिवाच्या आकांताने असाहाय्यपणे ओरडू लागला. त्याचा आवाज बराच काळ त्या निर्जन अशा घनदाट अरण्यात घुमत राहिला.

काळोखाने जिभल्या चाटून त्या लालसर प्रकाशाला आता गिळंकृत करत आणलं होतं. सावल्या अंधारात गडप झाल्या होत्या. काहीही करून आज कालीच्या मंदिरात पोहोचायचंच, या निर्धाराने तो एकेक पाऊल उचलू लागला. त्याच्या पावलांची गती आता अधिकच वाढली होती. दोन-तीन मैलांच्या प्रवासानंतर गर्द हिरव्या दाट झाडीने वेढलेल्या उंच टेकडीवर पेटलेल्या मशालींच्या प्रकाशात उजाळून निघालेलं जीर्ण मंदिर त्याच्या नजरेस पडलं. त्यासरशी एका विजयी मुद्रेने त्याचा चेहरा उजाळून निघाला. कित्येक वर्षांपासून बाळगलेली मनीषा आता पूर्ण होणार या विचाराने तो सुखावला. इथे तरी आपल्या प्रश्नांची उत्तरं मिळतील या आशेने तो मंदिराच्या दिशेनं निघाला.. पण समोरचा रस्ता हळूहळू चिंचोळा होत गेला आणि एका खोल दरीत जाऊन नाहीसा झाला. या अनपेक्षित घटनेने तो अत्यंत अस्वस्थ झाला. दरीच्या पलीकडे मशालींच्या ज्वालांनी धगधगत असलेलं मंदिर त्याला खुणावत होतम. मंदिराकडे जाण्याचा मार्ग मात्र त्याला काही केल्या मिळत नव्हता. एक-दोन मैलाच्या निरर्थक प्रवासानंतर आपलं थकलेलं शरीर आहे त्याच ठिकाणी टाकून द्यावं, असं त्याला तीव्रतेने वाटलं. त्याच क्षणी दूरवर त्याला एक मिणमिणत असलेला दिवा दिसला. कालीच्या मंदिरात जाण्याचा मार्ग कदाचित तिकडून मिळेल, या आशेने तो तिथपर्यंत पोहोचला. झोपडीत दिवा एकटाच जळत होता. आसपास कोणी आहे का याचा त्याने कानोसा घेतला. तो झोपडीत पाऊल टाकणार, तोच त्याला जराशा अंतरावर कसल्याशा आवाजाची चाहूल लागली. गर्द हिरव्या बांबूच्या झाडीतून जरा पुढे आल्यावर समोरचं दृश्य पाहून तो स्तिमित झाला. एक व्यक्ती सरोवराच्या काठावर बसली होती. तिच्या आवतीभोवती असलेल्या रंगवेरंगी खड्यांवर शीतल चांदणं पसरलं होतं. त्या चांदण्यात तो माणूस अतिशय तेजस्वी दिसत होता. त्याच्या उघड्या पाठीवर पसरलेले त्याचे केस हवेच्या मंद झुळकेने हेलकावत होते. अशा निर्जन ठिकाणी इतकं सुंदर सरोवर आणि असा कोणी असामान्य माणूस भेटेल याची त्याने कधीही कल्पना केली नव्हती. इतक्यात सरोवरातून पाण्याच्या लाटेबरोबर एक मासा काठावर येऊन तडफडू लागला. तो माणूस गडबडीने उठला. त्याने धावत जाऊन त्याला उचलत त्याकडे निरखून पाहिलं आणि एक स्मितहास्य करत पुन्हा त्याला खोलवर पाण्यात नेऊन सोडलं. आपल्या खिशातील एक रंगीत खडा त्याने त्याभोवती पसरलेल्या असंख्य रंगीबेरंगी खड्यांमध्ये फेकला. जरा वेळाने पुन्हा एका मोठ्या माशाला त्याने असंच खोल पाण्यात नेऊन सोडलं. जणू तो कित्येक दशकांपासून या सरोवराच्या काठी बसून हेच कार्य करतोय.. आणि त्याभोवती पसरलेले रंगबेरंगी खडे जणू त्याची साक्ष देत आहेत. त्याच्या या कृतीने तो प्रभावित झाला. या सत्पुरुषापुढे आपण अतिशुद्र आहोत असं त्याला वाटलं. त्याने अत्यंत नम्रपणे त्याला आवाज दिला.. "मित्रा, मी तुझ्या महान कार्यात व्यत्यय आणतोय त्याबद्दल मला क्षमा कर. पण या वेळी तरी मला तुझ्या मदतीची नितांत गरज आहे." अचानक झालेल्या आवाजाने त्याने काहीसं गोंधळून मागे पाहिलं आणि तो त्याकडे चालत येत म्हणाला,
"कोण आहेस तू मला माहित नाही, पण तु नक्कीच एक धाडसी प्रवासी आहेस. कारण आजतागायत इथे येण्याचं धाडस दाखवणारे अगदी मोजकेच. आणि तू ज्याला महान कार्य म्हणतोस, हे करणारा मी काही एकटाच नाही. पूर्वजांपासून चालत आलेलं हे अत्यंत साधं काम आहे."

"मित्रा, तु या कार्याला साधं समजतोस हा तुझ्या मनाचा मोठेपणा आहे. "

"तू काय बोलतोस हे मला समजत नाही, पण मला तु मित्रा म्हणालास.. आज कितीतरी दिवसांनी मी हा शब्द ऐकलाय, सांग मी तुला काय मदत करू शकतो?"

"मी इथल्या कालीच्या मंदिराविषयी खूप काही ऐकलं आहे. म्हणे इथे मानवाच्या साऱ्या प्रश्नांची उत्तरं मिळतात, म्हणून मी हजारो मैलांचा प्रवास करून दक्षिणेतून आलो आहे." काली हा शब्द ऐकताच थंडगार वातावरणातदेखील त्याच्या अंगाला घाम फुटला. त्याचा चेहरा खर्रकन उतरला. त्याच्या जुन्या आठवणी उफाळून आल्या आणि तो अत्यंत त्रासिक चेहऱ्याने उद्गरला,
"मला वाटलं तू जीवनाचा आनंद लुटणारा एक निर्भीड प्रवासी आहेस. पण माझा अंदाज चुकीचा ठरला. तू तर निरुत्तरित प्रश्नांच्या भोवऱ्यात गटांगळ्या खाणारा आणि त्यातच आपलं अस्तित्व शोधणारा एक अतिसाधारण मनुष्य आहेस. परंतु तरीही तू मला मित्रा म्हणालास, म्हणून तुला अत्यंत प्रामाणिकपणे सांगतो. तू आताच्या आता इथून निघून जा, तुला तुझ्या कोणत्याही प्रश्नाची उत्तरं इथे मिळणार नाहीत. खरं तर हे असं तुला सांगून मी माझ्याशीच प्रतारणा करतोय. पण का? कुणास ठाऊक हे मला माहीत नाही. कितीतरी दिवसांनी माझ्याकडून एक सत्कार्य घडत आहे. अनेक प्रश्न अनुत्तरित असतात, त्यांची उत्तरं न शोधणं कधीही चांगलंच."

त्यावर प्रवासी जरा हसला आणि म्हणाला, "मित्रा, माझ्या वाट्याला आलेली दु:खं जर तू अनुभवली असतीस, तर असं बोलण्याचं साहस तू कधीच केलं नसतं. असं काही बोलण्यापूर्वी तू माझं थोडं ऐकून घे. मित्रा, मी व्यवसायाने एक छायाचित्रकार होतो. एके दिवशी भटकंती करत करत मी पश्चिमेकडील अतिशय दुर्गम भागात पोहोचलो. तिथली लोकवस्ती अतिशय विरळ होती. घरं उतरत्या छपराची आणि गवताने शेकारलेली होती. तिथली माणसं अत्यंत कुपोषित होती. त्या दिवशी माझ्या मनासारखं एकही दृश्य मला कॅमेऱ्यात कैद करता आलं नव्हतं. सूर्य हळूहळू मावळतीकडे झुकत चालला होता. त्यामुळे मी तेथील एका दूरच्या वस्तीत शिरलो. तिथे एक लहान मूल दोन गुडघ्यांवर बसून जमिनीवर डोकं ठेवून झोपलं होतं. त्याच्या अंगावरलं कातडं ताणून शिवल्यासारखं वाटतं होतं. कितीतरी दिवसांपासून त्याने अन्नाचा कणही खाल्लेला नसेल, हे त्याच्याकडे पाहून लक्षात येत होतं. इतक्यात तिथे एक पांढऱ्या चोचीचं अन बसक्या मानेचं पांढरं गिधाड उतरलं. ते त्या मुलाच्या मृत्यूची वाट पाहत बसलं होतं. जरा वेळाने ते हळूहळू त्या मुलापाशी येऊन थांबलं. मी क्षणाचाही विलंब न करता ते दृश्य माझ्या कॅमेऱ्यामध्ये कैद केलं. मी दुर्मीळ असं दृश्य टिपण्यात यशस्वी झालो होतो. त्या आनंदातच मी घाईघाईने माघारी फिरलो. दुसऱ्या दिवशी तो फोटो सगळया वर्तमानपत्रांत आला. माझं खूप कौतुक झालं. इतकंच नाही, तर त्या फोटोला त्या वर्षीचा सर्वोत्कृष्ट छायाचित्राचा पुरस्कार मिळाला. खरं तर त्या दिवशी मी खूप आनंदात होतो. घरी आल्यानंतर माझ्या लहान मुलीने माझ्या हातातलं ते छायाचित्र घेतलं. बराच वेळ तिने त्याकडे पाहिलं आणि अनपेक्षितपणे मला विचारलं, "बाबा, त्या मुलाचं पुढे काय झालं? तिथे किती गिधाडं होती?" त्या प्रश्नाने मी पुरता गोंधळून गेलो. मीच मला विचारलं, खरंच तिथे किती गिधाडं होती? मित्रा, त्या वेळी माझ्या अस्वस्थ मनातून आवाज आला.. दोन. ते दुसरं गिधाड म्हणजे मी स्वत: होतो. या कल्पनेने माझं आयुष्य बदलून टाकलं.

त्या दिवसापासून आजपर्यंत मी शांतपणे झोपू शकलो नाही. कित्येक वर्षांपासून मी हे वेदनेचं ओझं सोबत घेऊन हिंडतोय. मित्रा, मला मृत्यू आला तरी चालेल. पण क्षणोक्षणी मृत्यू देणाऱ्या या वेदनेपासून माझी मुक्तता कर. मला जीवनाच्या अंतिम सत्यापर्यंत पोहोचायंचंय, म्हणून कृपा करुन मला मंदिराचा रस्ता दाखव. मी तुझे उपकार कधी विसरणार नाही."

"तुला वेदनेतून मुक्त करणारा मी कोण? मी एक अत्यंत साधा मनुष्य आहे. माझ्या अनुभवाने तुला एक सांगतो - या जगात शाश्वत असं काहीच नसतं आणि जीवनाचं अंतिम असं सत्य नसतं. त्यामुळे मी हात जोडून तुला प्रार्थना करतो. माझ्यावर कृपा कर आणि तत्काळ येथून चालता हो. यातच तुझं हित आहे. तुला समजवण्यासाठी आता माझ्याकडे जास्त वेळ नाही."

"मी हजारो मैलांचा प्रवास करून आलो ते येथून रिकाम्या हाताने परतण्यासाठी का? मी माझे परतीचे दोर कधीच कापले आहेत, ते आता शक्य नाही. मला मदत करण्याची तुझी कणभरदेखील इच्छा दिसत नाही. मी तुला खूप संवेदनशील समजत होतो, पण तो माझा भ्रम होता आणि माझ्या हिताचं म्हणशील तर ते मला न कळण्याइतपत मी मूर्ख नाही." असं म्हणत प्रवासी रागाने मागे वळला आणि चालत चालत बांबूच्या गर्द हिरव्या झाडीत दिसेनासा झाला. प्रवाशाला थांबवण्याचा प्रयत्न निष्फळ ठरल्याने तो हताश झाला.

सरोवराकाठी भेटलेल्या मनुष्याच्या अशा अनपेक्षित आणि विचित्र वर्तनाने प्रवासी एकदम गोंधळून गेला होता. त्याला आता फक्त उंच टेकडीवरील मंदिराभोवती धगधगणाऱ्या मशालींच्या ज्वाला दिसत होत्या. आता आपण जाऊ तोच आपला रस्ता, अशा निर्धाराने तो समोरील घनदाट जंगलात सरळच उतरला. उंचच उंच वाढलेले वृक्ष आणि त्याखालच्या दाट गवतातून झाडांना विळखा घालणाऱ्या वेलींमुळे वाट काढणं अवघड झालं होतं. पायाने होणाऱ्या आवाजाने फांद्यांवरील पक्षी मध्येच फडफड करत होते. काहीतरी सरपटत गेल्याचा आवाज होत होता. पण आता त्याला कसलीही भीती नव्हती. तो निर्धाराने एक एक पाऊल खाली टाकत होता. बऱ्याच वेळानंतर एका खोल कड्यापाशी येऊन तो जरा वेळ थांबला. आता मशालींचा उजेड दिसत नव्हता. क्षणभर आता पुढे कोठे जावं, त्याला समजेना. पाठीमागे वरती वळून पाहिल्यावर आपण बरचंसं अंतर खाली उतरुन आलोत, असं त्याच्या लक्षात आलं. आता समोरील मोठा कडा चढून आपण पलीकडे गेलो, तर कालीच्या मंदिरात कदाचित पोहोचू असं त्याला वाटलं. तो पुढची वाट शोधत कपारीकपारीने हळूहळू उतरू लागला. इतक्यात त्याला कसल्याशा मानवी आवाजाची चाहूल लागली. तो थबकला. सावधपणे त्याने कानोसा घेतला. पण आवाज आता थांबला होता. आपल्याला भास झाला असावा असं समजून तो पुन्हा चालू लागला. त्या शांततेत त्याच्या पावलांचा आवाज झाला. झाडांची पानं सळसळली आणि समोरील कड्याच्या पायथ्याकडून सपसप करत दोन-चार बाण विद्युतगतीने त्याच्याकडे आले. त्यापैकी एका बाणाने त्याच्या उजव्या मांडीचा छेद घेतला. त्यातून रक्ताची उष्ण धार वाहू लागली. त्याच वेळी दोन तरुण व्याध तीरकमठा घेऊन दूरवरून येत असल्याचं त्याला दिसलं. अचानक झालेल्या या हल्ल्याने तो गोंधळून गेला. एका झाडाचा आसरा घेत तो त्या ठिकाणी निपचित पडून राहिला. समोरील काळ्याकुट्ट कड्याच्या पायथ्याला विखुरलेल्या दगडातून लाल मुंग्यांच्या रांगेप्रमाणे आता माणसं बाहेर पडू लागली होती. काहींच्या हाती मशाली, तर काहींच्या हातात कसलंसं तंतुवाद्य होतं. त्या तंतुवाद्याच्या आवाजाने रात्रीच्या शांततेला तडे गेले. काही जण प्राण्यांची रूपं धारण करून चित्रविचित्र आवाज करत नृत्य करत होते. जसा आवाज वाढत गेला, तसा तो एका तंद्रीत गेला. शेवटी अंगातून बरचसा रक्तप्रवाह झाल्याने तो मूर्छित पडला.

त्याचे डोळे उघडले, तेव्हा तो समोरील दृश्य पाहून अचंबित झाला. एका भल्यामोठ्या उंच शिळेवर कोरीवकाम केलेल्या दगडी आसनावर एक हडकुळा मनुष्य सिंहाचा मुखवटा घालून बसला होता. त्याच्या दोन्ही बाजूंनी वरती जाण्या-येण्यास दगडी पायऱ्या कोरलेल्या होत्या. त्या प्रत्येक पायरीवर हिंस्र प्राण्यांचे मुखवटे धारण केलेली माणसं हातात दगडी हत्यारं घेऊन बसली होती. आपण आता जिवंत नसून एका दुसऱ्याच जगात आलो आहोत असं त्याला वाटलं. तोच त्याच्या उजव्या पायाच्या मांडीतून एक प्रचंड कळ निघाली, त्यासरशी त्याने खाली पाहिलं. मधोमध असलेल्या एका दगडी स्तभांला आपल्याला बांधून ठेवल्याचं त्याच्या लक्षात आलं. पण अशातही आपण जिवंत आहोत याचं त्याला समाधान वाटलं. इतक्यात एक जटाधारी मनुष्य तिथे आला. त्याने त्या दगडी सिंहासनावर बसलेल्या प्रमुखाला दोन्ही हात हलवत वाकून नमस्कार केला. त्यासरशी शांत असलेल्या वातावरणात एकाकी उत्साह संचारला. कसलीशी वाद्यं जोरजोरात वाजू लागली. दगडी पायऱ्यांवर बसलेली माणसं तातडीने उभी राहिली. आपल्या हातातील दगडी हत्यारं उंचावत ती जयघोष करु लागली. इतक्यात सिंहासनाच्या बाजूला असलेला दगडाचा एक भाग बाजूला सरकला आणि त्यातून एक बोगदा प्रकाशित झाला. काळ्या दगडांना चाटणाऱ्या अग्नीच्या ज्वाला हळूहळू मोठ्या झाल्या आणि त्यातून दोन मनुष्य पायऱ्या उतरून खाली आले. पहिल्याच्या हातात एक पेटलेली मशाल होती, तर दुसरा त्यापाठीमागून चालत येत होता. पाठीमागून येणाऱ्या व्यक्तीला पाहताच प्रवाशाचे डोळे विस्फारले. क्षणभर त्याचा आपल्या स्वत:च्या डोळ्यांवर विश्वास बसेना. तो पुन्हा पुन्हा त्या मशालीच्या उजेडात त्याला पाहण्याचा प्रयत्न करत होता. त्या दोघांनी प्रमुखाला वाकून नमस्कार केला. त्याने प्रमुखाला कसलीशी विनंती केली. त्यानंतर प्रमुखाने दगडी स्तभांकडे बोट दाखवत त्याला काहीतरी आदेश दिला. त्यासरशी तो स्तंभाकडे येत प्रवाशाला म्हणाला,

"हो, तु मला बरोबर ओळखलंस. मीच तो, ज्याला तु सरोवराच्या काठी भेटला होतास. तू खूप नशीबवान होतास, म्हणून आपली भेट झाली. पण शेवटी तुझ्या दुर्देवाने तुला इथे आणलंच. प्रमुखाच्या उपकाराने थोडा वेळ तरी मला तुझ्याशी बोलता येतंय .पण माझ्या वाट्याला तर तेही भाग्य आलं नव्हतं. त्यामुळे तू थोडा वेळ माझं ऐकून घे.,"

प्रवाशाला त्याच्या ढोंगीपणाचा आता भयंकर राग आला. त्याच्या डोळ्यात रक्त उतरलं. हातांच्या मुठी आवळल्या गेल्या. आपण फसलो गेलो आहोत हे आता प्रवाशाच्या लक्षात आलं होतं. तो अत्यंत त्वेषाने म्हणाला, "तू अत्यंत नीच आणि पापी मनुष्य आहेस. मृत्यूसुद्धा तुला आपलंसं करणार नाही." त्यावर तो शांतपणे म्हणाला, "तू आता मला काहीही बोललास, तरी त्याचा काही एक उपयोग नाही. कारण तुझी भाषा समजू शकणारा मी येथे एकमेव असा आहे. आणि हेही तुझं भाग्यच आहे. मी तुला माघारी परतण्यासाठी खूप विनवणी केली होती, पण तू अत्यंत उद्धटपणाने ती धुडकावून लावलीस, हे मात्र तू विसरू नकोस. त्यामूळे आता तुझ्याकडे दुसरा पर्याय नाही."

त्यावर प्रवासी म्हणाला, "मी तुला एक सत्पुरुष समजत होतो. या तेजस्वी चेहऱ्यामागचा तुझा राक्षसी चेहरा मला दिसला नव्हता. मी तुला मित्रा म्हणालो, माझं मन तुझ्यापुढे मोकळं केलं ते केवळ तुझे वर्तन पाहून. कारण तू सरोवराकाठी बसून पाण्यातून बाहेर आलेल्या माशांना पुन्हा पाण्यात सोडून त्यांना जीवनदान देण्याचं पवित्र कार्य करत होतास. आणि त्याचबरोबर एक रंगीत खडा त्या खड्यांच्या ढिगाऱ्यात टाकत होतास. त्या रंगीबेरंगी खड्यांचा ढीग पाहून मला तू हे कार्य कित्येक दशकांपासून करत आहेस असं वाटलं आणि दुसरीकडे मी एका मुलाचेसुद्धा प्राण वाचवू शकलो नाही, याचं शल्य माझ्या मनात कित्येक दिवसांपासून सलत होतं. या भावनेने मी अत्यंत व्यथित झालेलो होतो. तेव्हा मला माहित नव्हतं की, तू केवळ मला फसवण्यासाठी हे सारं करत आहेस."

आता मात्र त्याचा संयम सुटला. तो प्रवाशाला म्हणाला, "मूर्ख माणसा, तू मला काय समजावं हा तुझा प्रश्न होता. तू मला काय समजलास हाही तुझाच दोष होता. खरं तर तु आजपर्यंत केवळ तुझ्याच धुंदीत जगत आलास. मी केवळ तुला दाखवण्यासाठी किंवा फसवण्यासाठी यातलं काहीच असं केलेलं नाही. मी नेहमीप्रमाणे आजही तेथे मासेमारी करण्यासाठीच गेलो होतो. जे काम मी वर्षानुवर्षं इथल्या लोकांसाठी मच्छीमार म्हणून करत आलोय. तू त्या झोपडीत जरा लक्षपूर्वक पाहिलं असतं, तर तुला कदाचित ते कळलं असतं. तु ज्या वेळी तेथे आलास, त्या वेळी माझं काम होत आलं होतं. मला केवळ एका छोट्या माशाची आवश्यकता होती. मी तो पहिला छोटा मासा जेव्हा पाण्यात सोडला, त्या वेळेस तु कदाचित पाहिलं नसेल.. मी त्याला हातदेखील लावला नव्हता. मी त्याला एका पानाच्या साहाय्याने पकडून अलगद पाण्यात सोडला होता. कारण तो अत्यंत विषारी जातीचा मासा होता. त्याच्या केवळ स्पर्शानेदेखील माणसाचा मृत्यू होतो आणि ज्या वेळी माझ्या गळाला लागलेला तो मोठा मासा मी पाण्यात सोडला, त्या वेळी मला इतक्या मोठ्या माशाची आवश्यकता नव्हती. गरजेपेक्षा जास्त माशांची शिकार करणं इथल्या धर्माच्या विरुद्ध आहे हे कदाचित तुला माहीत नसेल. आणि त्या खड्याचं म्हणशील, तर त्या खड्यांच्या साहाय्याने मी माझी वेळ मोजत होतो. कारण आज इथल्या देवतेची जत्रा असल्याने मला वेळेत पोहोचण्याचा प्रमुखाचा आदेश होता. जोपर्यंत मी आणलेल्या माशांचा नैवद्य इथल्या देवतेला दाखवला जात नाही, तोपर्यंत जत्रेला सुरुवात होत नाही. आता तुच सांग, या सगळ्यामध्ये मी तुला कसं फसवलं?"

त्याच्या सडेतोड उत्तराने प्रवासी भांबावून गेला. जरा वेळ काय बोलावं हे त्याला समजेनासं झालं. आपण इतक्या सहज निष्कर्ष काढला, याचा त्याला पश्चात्ताप झाला. शेवटी अंगातील सारी शक्ती एकवटून अत्यंत गहिवरलेल्या स्वरात तो म्हणाला, "जर असंच होतं, तर तू मला कालीच्या मंदिरात जाण्याचा रस्ता का दाखवला नाहीस? तू जर मला तो दाखवला असता, तर मी या मार्गाने कधीच आलो नसतो. मृत्यूची म्हणशील तर मला अजिबात भीती नाही. पण वाईट एवढंच वाटतं की, मी माझं आयुष्य ज्यासाठी खर्च केलं, किमान त्या प्रश्नांची उत्तरं मला मिळाली असती, तर मी समाधानाने या जगाचा निरोप घेतला असता.

यावर एक दीर्घ सुस्कारा टाकत मच्छीमार म्हणाला, "तू जर माझा सल्ला ऐकला असतास, तर तुझ्यावर ही वेळ आली नसती. मी पहिल्या भेटीतदेखील बोललो होतो. आपल्या प्रत्येक प्रश्नाची उत्तरं मिळतीलच असं नाही. आणि ती मिळालीच पाहिजे असा माणसाने कधी अट्टाहासदेखील करु नये. मीही तुझ्यासारखाच कालीच्या मंदिराचा शोध घेत वीस वर्षांपूर्वी इथे आलो होतो. आणि माझ्या दुर्देवाने इथे अडकलो. मी आलो, त्या दिवशीही इथल्या देवतेची जत्रा होती. त्या दिवशी माझ्यासमोर इथल्या देवतेला एक नरबळी अर्पण केला गेला आणि एका जिवाची अनंत यातनेतून सुटका झाली. आज त्याचीच पुनरावृत्ती होत आहे. मला कालीच्या मंदिराचा आजपर्यंत शोध लागला नाही आणि माझ्या प्रश्नांची उत्तरंही मिळाली नाहीत. माझं सोड, पण किमान तुझी माझ्याशी भेट झाली होती. तू मला मित्र म्हणालास, म्हणून मी जे भोगलं ते किमान तुझ्या वाट्याला तरी नको म्हणून मी तुला परत जाण्यासाठी हात जोडून विनवणी करत होतो. माझ्यासोबत हा मशाल घेऊन असलेला एक पहारेकरी सदैव असतो. पण नेमकं तू आलास, त्याच वेळी तो एका झाडाखाली आराम करत असताना झोपी गेला होता. त्यामूळे तू ठरवलं असतंस, तर तू सुखरुप परत माघारी जाऊ शकला असतास."

आता त्या दगडी स्तंभाभोवती सर्व स्त्री-पुरुष जमा झाले होते. देवतेच्या पुजेची सर्व तयारी झाली होती. सर्वांनी आपापल्या शिकारीचा नैवद्य तिथे आणला. मच्छीमारानेही आपला पहिला मानाचा नैवद्य तिथे पाठवला होता. कित्येक वर्षांनंतर देवतेला आज नरबळी मिळणार होता. त्यामूळे सर्वांमध्ये एक वेगळाच उत्साह संचारला होता. त्या दगडी सिंहासनाच्या पायऱ्यांवरील वेगवेगळ्या हिंस्र प्राण्यांची मुखवटे घातलेली माणसं आता उतरून देवतेसमोरील चबुतऱ्यापाशी येउन थांबली. आता सर्व जण प्रमुखाच्या आदेशाची वाट पाहत उभे होते. प्रमुखाचे डोळे आकाशातील चंद्रावर लागले होते.

प्रवासी मात्र हे सारं विमनस्कपणे पाहत होता. अशा पद्धतीने तर शत्रूलाही मृत्यू येऊ नये, पण आज अशी वेळ प्रत्यक्ष आपल्यावरच का यावी.. तेही आपल्या कोणत्याच प्रश्नाची उत्तरं न मिळता, या विचाराने तो अत्यंत अस्वस्थ झाला. इतक्यात तेच पांढऱ्या चोचीचं आणि बसक्या मानेचं गिधाड त्या दगडी स्तभांच्या बरोबर समोर असलेल्या एका उंच झाडावर उतरलं. त्याला पाहून आज त्याच्या चेहऱ्यावर भीतीची किंवा दु:खाची किंचितही छटा उमटली नाही. अत्यंत निर्विकारपणे त्या गिधाडाकडे पाहत तो मच्छीमारास म्हणाला, "मित्रा, मला आता कसलंही दुख: नाही. आज एक वर्तुळ पूर्ण झालं. त्या समोरील झाडाच्या शेंड्याकडे पाहा माझं कर्म माझ्याकडे परत चालून आलं आहे. ते गिधाड आज माझ्या मरणाची वाट पाहत आहे. किमान मरताना तरी मी आता समाधानाने मरेन. आपलं पाप येथेच फेडून जाण्यासारखा दुसरा आनंद नाही."

त्यावर मच्छीमार म्हणाला, "मित्रा, या क्षणी तरी मी तुला खोटं सांगणार नाही. कदाचित सत्य ऐकून तुझा जीवनावरचा विश्वास उडेल. पण तुला सत्य सांगणं मला आवश्यक वाटतं. कारण नंतर मी तुला ते कधीच सांगू शकणार नाही. तू ज्याला तुझं कर्म म्हणतोस, तू ज्यासाठी तुझा संसार सोडलास, ते पातक तुझ्या हातून घडलंच नाही. मित्रा, खरं तर तु अजूनही तुझ्या त्या प्रश्नांतून बाहेर आलेला नाहीस. तू मला सरोवराकाठी जे सांगितलंस, त्यात किंचीतही तथ्य नाही. मुळात तू ते छायाचित्र टिपण्यापूर्वीच त्या मुलाचा मृत्यू झालेला होता आणि हे निर्विवाद सत्य आहे. त्यामुळे तू त्या मूलाला वाचवण्याचा प्रश्नच उद्भवत नाही."

"शेकडो बाणांनी माझ्या शरीराला छेदलं असतं, तरी मित्रा, मला इतक्या असाहाय्य वेदना झाल्या नसत्या. मात्र तू एका वाक्याने त्याच्या कितीतरी पट वेदना मला माझ्या जीवनाच्या अंतसमयी दिल्या आहेत. असं बाष्कळ काहीतरी बडबडण्यापूर्वी तू थोडासा तरी विचार करायला हवा होतास."

"मित्रा, मला क्षमा कर, पण सत्य हेच आहे. मी ज्या भागातून आलोय, तो भाग निसर्गाने अतिशय समृद्ध असा होता. त्यामूळे सगळ्या पक्ष्यांचे अत्यंत छोटे छोटे बारकावे मला माहित आहेत. खरं तर मी तुला हे सारं तेव्हांच सांगण्याचा प्रयत्न करत होतो. पण तू काहीही ऐकण्याच्या मन:स्थितीत नव्हता. मित्रा, गिधाडांमध्ये इजिप्शियन नावाची एक जात आहे. या जातीचे डोळे अतिशय तीक्ष्ण असतात. अनेक किलोमीटर अंतरावरील शिकार किंवा खाद्य हे सहज हेरू शकतात. बहुतेक गिधडांची याच गिधाडावर नजर असते. जेव्हा हे गिधाड खाद्य हेरतं, तेव्हा साहजिकच ते तिथे उतरतं. त्याला उतरलेलं पाहून इतर गिधाडंही उतरू लागतात व सगळ्या गिधाडांना खबर मिळते की खाद्य मिळालं आहे. खाद्याजवळ पोहोचल्यावर गिधाडं बराच वेळ वाट पाहत असतात. ही सर्व गिधाडं राजगिधाड येण्याची वाट बघत असतात. मृतदेहाची कातडी अत्यंत जाड झालेली असते, ती भेदणं आवाक्याबाहेर असतं. राजगिधाडाने येऊन पहिलं काम फत्ते केल्यावर मग बाकी गिधाडांचं काम सुरु होतं. त्यामुळे तू मला जे वर्णन करुन सांगितलंस, ते इजिप्शियन नावाच्या गिधाडाचं होतं. त्यामुळे त्या बालकांचा मृत्यू तू ते छायाचित्र टिपण्यापूर्वीच झालेला होता, हे निश्चित आहे. आणि तूला यावरही विश्वास वाटत नसेल तर जरा वळून पलीकडे बघ. देवतेच्या नैवद्याकरिता व्याधाने केलेली ती मृगया तुला दिसतच असेल. त्याचकरिता ते इजिप्शियन गिधाड इथे उतरलं आहे. तुझ्यासाठी नाही."

इतक्यात दगडी स्तंभाच्या अगदी समोर असलेल्या एका गोलाकार खळग्यात साचलेल्या पाण्यात चंद्राचं प्रतिबिंब पडलं. त्याच वेळी प्रमुखाने एक हात उंचावून सेवकांना आदेश दिला. तंतुवाद्याचा तालबद्ध आवाज परिसरात घुमू लागला. देवतेचा जयजयकार सुरू झाला. कसलासा काळसर रंग आकाशात उधळला गेला. मच्छीमाराने अत्यंत शांतपणे प्रवाशाला अलिंगन दिलं आणि म्हणाला, "मित्रा, मला क्षमा कर. आता मला जावं लागेल. तुझ्या प्रश्नाची उत्तरं देण्याचा मी पुरेपूर प्रयत्न केला, पण वेळ अपुरा पडला. आता आणखी एक प्रवासी येईपर्यंत तुलाच माझं काम करावं लागेल. मित्रा.. एक गोष्ट मात्र यापुढे कायम लक्षात असू दे - 'मिळवलेली उत्तरं ही प्रश्नांपेक्षा अधिक त्रासदायक असतात."

दोन सेवक मच्छीमाराला पकडून चबुतऱ्याच्या दिशेने घेऊन जाऊ लागले. एकामागे एक मिळालेल्या अनपेक्षित धक्क्यांनी प्रवाशाची विचार करण्याची क्षमता खंडित झाली. काय बोलावं हेच त्याला जरा वेळ सुचलं नाही, तोच त्याला मच्छीमाराचे पाठीमागील हात साखळदंडाने बांधलेले दिसले. आता मात्र त्याला मच्छीमाराला काहीतरी ओरडून ओरडून विचारायचं होतं, पण त्याच्या कंठातून आवाज फुटला नाही. तो अत्यंत हताशपणे मच्छिमाराकडे पाहू लागला. मच्छीमाराभोवती तोपर्यंत चित्र-विचित्र आवाज करणाऱ्या माणसांचं एक वर्तुळ तयार झालेलं होतं. त्याला चबुतऱ्यावर ढकलंलं गेलं, तोच प्रवाशाने आपले डोळे बंद केले. कसल्याशा आवाजानंतर एक आर्त किंकाळी त्या रात्रीच्या काळोखाला फाडत भोवतालच्या काळ्याकुट्ट पाषाणांवर आदळली आणि प्रवाशाच्या समोरील गोलाकार खळग्यातील चंद्राचं प्रतिबिंब नाहीसं होऊन त्या जागी प्रवाशासाठी उरले ते केवळ मृत्युदायक वेदना देणारे अगणित अनुत्तरित प्रश्न...

प्रतिक्रिया

ॲबसेंट माइंडेड प्रोफेसर's picture

7 Nov 2022 - 11:17 am | ॲबसेंट माइंडेड ...

कथा चांगली फुलवली आहे. छायाचित्राचा प्रसंग आधि कुठेतरी वाचल्यासारखे वाटते आहे.

आग्या१९९०'s picture

7 Nov 2022 - 12:16 pm | आग्या१९९०

कथेला छान कलाटणी दिली. केविन कार्टरला वेळीच असे समुपदेशन मिळायला हवे होते की

Bhakti's picture

7 Nov 2022 - 12:58 pm | Bhakti

जबरदस्त!
त्या फोटो मागणी कथा आणि फोटोग्राफरची व्यथा कमाल कलात्मक पद्धतीने लिहिले आहे.

Bhakti's picture

7 Nov 2022 - 12:58 pm | Bhakti

जबरदस्त!
त्या फोटो मागणी कथा आणि फोटोग्राफरची व्यथा कमाल कलात्मक पद्धतीने लिहिले आहे.

नगरी's picture

10 Nov 2022 - 12:58 pm | नगरी

ही कथाच असावी,कोणाच्याही नशिबी असे येऊ नये

श्वेता२४'s picture

10 Nov 2022 - 1:33 pm | श्वेता२४

आवडली कथआ.

सौंदाळा's picture

10 Nov 2022 - 5:41 pm | सौंदाळा

आशयगर्भ पण छान कथा

कर्नलतपस्वी's picture

10 Nov 2022 - 6:33 pm | कर्नलतपस्वी

अशीच एक कथा वाचली होती लहानपणी.

तुम्ही कथा खुप सुंदर खुलवलीत. धक्कातंत्र जबरदस्त आहे.
लिहीत रहा वाचत राहू.

टर्मीनेटर's picture

11 Nov 2022 - 4:06 pm | टर्मीनेटर

कथा आवडली! शेवट मस्तच 👍

श्वेता व्यास's picture

15 Nov 2022 - 5:29 pm | श्वेता व्यास

मस्त कथा.
मिळवलेली उत्तरं ही प्रश्नांपेक्षा अधिक त्रासदायक असतात. हे खूप छान
नंतर छायाचित्रकार मित्राच्या जागी असणार असं सारखं वाटत होतं, ज्या पद्धतीने मित्र त्याला जाण्याची विनंती करत होता त्यावरून.

छान कथा... शेवटचा ट्विस्ट पण अनपेक्षित

स्मिताके's picture

15 Nov 2022 - 9:57 pm | स्मिताके

गहन विषय आहे पण कथेने शेवटपर्यंत खिळवून ठेवले.