'घरोघरी मातीच्या चुली'.. जुनी झाली म्हण.
घरोघरी गॅसच्या शेगड्या. घरोघरी मायक्रोवेव्ह प्रचलित म्हण!
आमचेही घर अपवाद नाही. मायक्रोवेव्हचे आगमन झाले, तेव्हाचा अनुभव.
मला वाटले, वीस सेकंदात चहा गरम कसा होणार?
मी दोन मिनिटे ठेवला. गेला की भसाभसा उतू!
मुलगा म्हणाला "अग आई! हा मायक्रोवेव्ह आहे. शिकून घे. मी करतो स्वच्छ! ती डिस्क जड असते. हो बाजूला!"
मग त्याने गॅसवर चहा करून दिला. पण चहाची मजाच गेली त्या वेळी. पण काय करणार?
शिकले पाहिजे!
विचार करता करता माझे मन भूतकाळात गेले.
त्या काळी त्या मातीच्या चुली, लाकडे पेटवणे, धूर फुंकणे, रोज पहाटे चुली सारवणे. मग स्वयंपाक सुरू करायच्या आधी त्यांना हळदकुंकू वाहून नमस्कार!
गंमतीने चुलींना 'चुलतसासूबाई' म्हणत असत.
तर त्या धुराने बऱ्याच बायकांना डोळ्याच्या पापण्यांना खुपऱ्या होत असत.
त्या मुख्य चुलीला जोडून पोकळी करून आणखी वैलाची चूल करीत. म्हणजे ह्या चुलीतला जाळ त्या पोकळीतून जाऊन त्यावर डाळ वगैरे शिजत असे.
इंधन-धन बचत.
लाकडे पेटवायला गोवऱ्या पेटवायच्या, त्यावर छोट्या ढलप्या. मग त्या पेटल्या की मोठी लाकडे. विस्तव जास्त झाला तर अर्धवट जळलेली लाकडे बाहेर काढून त्यावर मंद आचेवर भाजी ठेवणे.
खूप खटाटोप असायचा. एवढे करूनही महिला वर्ग घरातील 'तिकडच्या स्वाऱ्या' जेवल्याखेरीज कधीही जेवत नसत.
मग हळूहळू कोळशाच्या चुली बालटीतल्या शेगड्या लोखंडी शेगड्या आल्या.
लाकडी कोळसे, बदामी कोळसे आणि दगडी कोळसे.
मग पितळी तीन पायांचे स्टोव्ह आले. त्यांचे साथीदार काकडा, बर्नर्स, पिना, वायसर, पंपाचे, झाकणाचे आणि इंधन रॉकेल म्हणजे केरोसीन म्हणजे हिंदीत मिट्टी का तेल!
स्टोव्ह दुरुस्ती दुकाने जोरात चालत असत. राॅकेल टंचाईमुळे स्टोव्ह बेताने वापरावा लागे.
मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, राजस्थान, पंजाब इकडे मात्र दगडी कोळसाच!
प्रचंड धूर ओकणारा!
आमच्या वडिलांची बदली कोटा जंक्शन (राजस्थान) इथे झाली. रेल्वे स्टेशनला समांतर असणाऱ्या रेल्वे कॉलनीत छान घर मिळाले. मागे-पुढे अंगण!
मुंबईकडे जाणारा ट्रॅक, एक सायडिंग ट्रॅक, मग प्लॅटफॉर्म, मग डाउन लाइन प्लॅटफॉर्म.
तर इंजिनात पाणी भरण्यासाठी उंच भलामोठा नळ. इंजीन बरोबर त्याच्या खाली पाण्याची टाकी येईल असे उभे करायचे ड्रायव्हर. मी कोळशाच्या वाफेच्या इंजिनाबद्दल सांगते आहे, लक्षात आलेच असेल तुमच्या!
तसेच इंजिनात वापरलेल्या दगडी कोळशाला खाली रिकामे करायला दोन रुळांच्या मध्ये पक्का हौद असायचा. जळलेले कोळसे त्यात पडायचे.
गाडी रवाना झाली की ड्युटी संपवलेला फायरमन ते कोळसे बाहेर टाकायचा. त्या कोळशात अजूनही खूप ऊर्जा असायची. पण ती इंजिनासाठी पुरेशी नसायची. रेल्वे कॉलनीतील सगळे जण ते कोळसे घरी आणायचे. धुऊन त्याची राख निघून जायची, वाळवायचे की स्वैपाकाला इंधन तयार!
नाहीतरी ते कोळसे फुकटच जाणार, ते आम्ही वापरत असू. तेवढीच पैशाची बचत!
ज्यांना शक्य असे, ते इंजिनातून सोडले जाणारे गरम पाणीसुद्धा बालट्या बादल्या वाहून आणत.
तर असे हे इंधन-धन!
पण,
फाळणी झाली. खूप निर्वासित आले कोट्यात.
त्यांनी ह्या कोळशावर ताबा मिळवला आणि चक्क विकायला सुरुवात केली.
साहजिकच सर्वांनी त्यांना हटकले. भांडणे झाली. तेव्हा त्यांचे उत्तर!!
"हमारा घरबार, वतन छोडना पडा!
हमारी ऑंखो के सामने हमारी मॉं-बहने, घरवाली उनकी इज्जत लूट गयी!
बुढे़ बच्चे मर गये! मुर्दे छोडकर आये!
जीते जागते हमारे मुर्दे बन गये!
यहाॅं क्या है हमारा?
लेकिन जीना तो है!"
काय बोलणार?
तेव्हा सारे काही कळत नव्हते. पण आमच्या वडिलांचे काही सहकारी सर्व कहाण्या सांगत. वाचनातून वास्तव समजले. तर असे हे इंधन-धन!
तर हळूहळू बदल होऊन गॅस आला. पण त्यासाठी रेशन कार्ड. एकच सिलेंडर. तो संपल्यानंतरच दुसरा नोंदवायचा. मग दोन सिलेंडर्स मिळू लागले. आणि आता बऱ्याच ठिकाणी पाइप गॅसही आला आहे. ओव्हन, मायक्रोवेव्ह, हॉट प्लेट, इलेक्ट्रिक कुकर, सोलर कुकर!
धूर नाही, स्टोव्हची घरघर नाही, पोल्युशन नाही.
इंधनाचा आणखी एक सोर्स म्हणजे रेल्वे रुळांना जोडणारे लाकडी स्लीपर्स.
आता ओतीव लोखंडाचे किंवा सिमेंट-काँक्रीटचे असतात. पण तेव्हा साल, ओक, टिंबर. ते गाड्यांच्या धावण्याने कमकुवत झाले की बदलून तिथेच फेकून देत. रेल्वे कर्मचारी घरी घेऊन येत. त्यात खूप ऊर्जा असायची. तुमच्या अंगात शक्ती असेल तर तुम्ही फोडा, नाहीतर चार पैसे देऊन फोडून घ्या. तरीही इंधनाचे खूप पैसे वाचायचे.
आमच्याकडे बंब होता. नाहीतर चुलाणे पेटवून त्यावर घरोघरी पाणी तापायचे अंघोळीसाठी. तिकडे थंडी खूप. ते कडकडीत तापलेले पाणी छान वाटायचे. एक स्लीपर चार महिने तरी पुरायचा.
अगदी साठच्या दशकात आम्ही बोरिवली (मुंबई) इथे आलो. तरी स्लीपर्स मिळत होते. आमच्या बागेला स्लीपर्स उभे उभे लावून कंपाउंड केले होते. मनात येते की रेल्वे हे स्लीपर्स विकून स्वतःसाठी पैसे कमावू शकली असती. पण अक्षरश: हे इंधन-धन फेकून दिले जायचे. काही काही लोकांनी तीन तीन स्लीपर्स जोडून बाकडी बनवली होती.
असो.
आमचे काका महू (म.प्र.) इथे रेल्वेत कंट्रोलर या पदावर!
मोठ्ठा बंगला, नोकर. कुठेही फिरतीवर जाताना 'सलून' मिळत असे. छोटी बोगी, त्यात सर्व सोई. दिमतीला चपरासी.
बंगल्याच्या मागच्या बाजूला रेल्वे इंजीन यार्ड होते. तेथे इंजीन पहाटे आले की, ड्रायव्हर किंवा फायरमन दार वाजवून इंजिनातील गरम गरम पाणी हवे तर घ्या सांगायचे. दिवाळीच्या सुट्टीत आम्ही महूला जात असू. काका-काकू, दोन चुलतभाऊ आणि आम्ही तीन - काका-काकू, मुले-बाळे मिळून वीसेक जण!
काकाकाकूंना खूप अगत्य होते.
सकाळी सगळ्या आया आम्हा मुलांच्या हातात कपड्यांची बंडले देऊन तयार ठेवत. तीन बाथरूम होत्या. नोकर आणि दोघे मोठे भराभरा बालट्या-बालट्या पाणी आणत. अगदी कडकडीत इंजिनातून सोडलेल्या नळातून. बादली ठेवली की भरली इतका मोठा.
भराभर 'अभ्यंगस्नान' पार पडे एवढ्या सगळ्यांचे. पण कोणालाही कधी 'रॅश' आली नाही, स्कीन प्रॉब्लेम झाला नाही.
पाण्याला थोडा कोळशाचा धुरकट वास यायचा, पण काहीही वाटायचे नाही. आमचे पाणी घेऊन झाले की रेल्वे क्वार्टर्समधील इतरही लोक पाणी घेऊन जायचे. कामवाली बाई कपडे भिजवायला गरम पाणी आणायची.
आता बघा!
एरवी फुकट गेले असते पाणी. आणि सगळ्यांचाच इंधन खर्च वाचायचा. महूला हवा दिवाळीत छान असायची, त्यामुळे ते गरम गरम पाणी मस्त मजा वाटायची!
आता घरोघरी गीझर आहेत, शॉवर्स आहेत. हळूहळू बंब इतिहास जमा होत आहेतच.
पण ह्या 'इंधन-धन' आठवणी जाग्या आहेत.
अनुराधा काळे
प्रतिक्रिया
5 Nov 2022 - 6:27 pm | पॉल पॉट
खुप मस्त लेख. आवडला. रेल्वेबद्दलच्या ह्या गोष्टी नाहीत नव्हत्या.
आणखी लेख लिहा. खुप छान लिहीतात तुम्ही.
7 Nov 2022 - 12:04 pm | श्वेता व्यास
छान लेख, इंधन धनाचा रेखाटलेला प्रवास आवडला. गावी आजीकडे माझ्या लहानपणी चूलच होती त्यामुळे हा प्रवास पाहिला आहे.
7 Nov 2022 - 8:25 pm | स्मिताके
रंजक माहिती.
इंधन धन बचत हा विचार खूप मोलाचा, आणि सहजसाध्य. दुर्दैवाने आज आपण सर्व हे विसरत चाललो आहोत.
7 Nov 2022 - 9:04 pm | मुक्त विहारि
मला चुलीवरचा स्वैपाक जास्त आवडतो.
7 Nov 2022 - 9:18 pm | सरिता बांदेकर
छान लिहीलंय.
मिरजेत गाडी स्टेशनला लागली की लोक बालद्या घेऊन उभे राहिलेले बघितले होते.
ते तसे का उभे रहायचे ते तुमच्यामुळे कळलं.
13 Nov 2022 - 12:20 pm | नगरी
अप्रतिम,ओघवती भाषा! लेखाचे शीर्षक वाचून थोडा गैरसमज झाला, मला वाटले कार्बन फूट प्रिंट, जीवाश्म इंधन विरुद्ध नवीन उपाय या विषयी असेल.पण एकंदर जुन्या आठवणी ताज्या झाल्या,मस्त
13 Nov 2022 - 8:42 pm | सुखी
नवीनच माहिती कळाली... छान कल्पना अन् इंधनाचा अपव्यय टाळण्यासाठी धडपड खूपच छान
14 Nov 2022 - 11:57 am | विवेकपटाईत
लेख आवडला. पूर्वी 1980 च्या आधी जुन्या दिल्लीत राहत होतो. तिथे ही मिठाई पुला जवळ सर्व इंजिन कोळसा रिकामा करायचे. काही तामिळ बाया हा कोळसा वेचायची कामे करायची. तो कोळसा त्या बाया रविवारी मिठाई पुलावर लागणार्या बाजारात विकायची. हिवाळ्यात आम्ही ही तो स्वस्त कोळसा विकत घेत असू.
14 Nov 2022 - 8:41 pm | टर्मीनेटर
सुंदर स्मरणरंजन! बऱ्याच रोचक गोष्टी समजल्या 👍
माझे वडील रेल्वेमध्ये नोकरीला (आता निवृत्त), त्यांचं 'स्टोअर्स' डिपार्टमेंट. मी साधारण दहावीत असेपर्यंत त्यांना फिरतीची ड्युटी होती. महिन्यातले जवळपास पंधरा दिवस ते टुर वर असायचे. आताही तिच पद्धत आहे कि नाही हे माहित नाही पण तेव्हा देशभरातल्या सर्व रेल्वे स्टेशन्सना दैनंदिन वापरासाठी लागणाऱ्या रंगीत/पांढरे वेगवेगळ्या आकाराचे कागद,पेन्स, खडू, कार्बन पेपर्स, शाई आणि अशा अनेक प्रकारचे स्टेशनरी साहित्य, रेल्वे स्टेशनच्या साफ-सफाई साठी लागणारे फिनाईल, लिक्विड सोप, ब्लिचींग पावडर, नॅपथेलीन बॉल्स (डांबराच्या गोळ्या), डिओडोरंट्स, डस्टर्स, झाडू, खराटे अशा प्रकारच्या कित्येक प्रकारच्या वस्तू तसेच लाईनमन्स/सिग्नलमन्स साठीचे रेनकोट्स, गमबूट्स, सेफ्टी शूज बरोबर दोरखंड, सुतळी, काही प्रकारचे हार्डवेअर सामान, ह्या आणि अशा असंख्य वस्तूंनी भरलेल्या 'सप्लाय स्पेशल' मालगाडीला असा 'सलून' जोडलेला असायचा.
सलुन मध्ये बाबांच्या दिमतीला एक चपरासी आणि जेवण बनवण्यासाठी एक आचारी असे. दोन-तीन वेळा अशा 'सलुन' मधुन त्यांच्याबरोबर थोड्याफार अंतराचा प्रवास केल्याच्या आठवणी हा लेख वाचताना ताज्या झाल्या.
ह्या छान लेखासाठी धन्यवाद आणि पुढिल लेखनास शुभेच्छा!
15 Nov 2022 - 10:28 am | कर्नलतपस्वी
अनुराधाजी आपला इंधन प्रवास वाचताना डोळ्यासमोर आयुष्यपट झरझर येवून गेला.
चुल ते मायक्रोवेव्ह, बंब ते गिझर सर्व काही अनुभवले.
लहानपणी लाकडाच्या वखारीत बंबंबफोड, ढलप्या, चुलवणाची लाकडे,अंतिमयात्रेसाठी लागणारे ओंडके असे लाकडाचे वेगवेगळे प्रकार मिळायचे.
महू,Military Headquarters of War(MHOW) मोठे लष्कर ठाणे. छोटेसेच टुमदार गाव. स्मोकींग चे नाईट गाउन,सलवार सुट,मुलींचे फ्राॅक सुदंर मीळायचे. Wood carving,Paintings या सारख्या ड्राॅईग रूम मधे सजावटीच्या वस्तू आणी मिलीटरीचे युनिफार्म ह्या सारखी खरेदी सेनेचे प्रशिक्षणार्थी हमखास करत.