दिवाळी अंक २०२२ - लग्गी

विनिता००२'s picture
विनिता००२ in दिवाळी अंक
5 Nov 2022 - 2:32 pm

शेतातून येणार्‍या शंकर्‍याला पाहून दामू थांबला. पण शंकर्‍याचे लक्ष नव्हते. तो तसाच पुढे गेला. दामूला आश्चर्य वाटले.

"अय शंकर्‍याऽ" त्याने आवाज दिला. भानावर आल्याप्रमाणे शंकर्‍या थांबला.
"काय रं...आँ...काय झालाय?" दामूने त्याच्या चेहर्‍याकडे बारकाईने पाहत विचारले.
"काय न्हाय!" शंकर्‍या रडक्या आवाजात उत्तरला आणि परत आपल्या वाटेने चालू लागला. दामूला काहीच कळले नाही.
शंकर्‍या त्याचा खास दोस्त! पण आजकाल तो काहीतरी काळजीत दिसत होता. दामू रस्त्यातच विचार करत उभा होता,
तेवढ्यात गावाकडून मळ्याकडे जाणारा हिरोजी तिथे आला. विचारात उभ्या असलेल्या दामूला त्याने हलवले.
"काय रं...कामून असा हुबाय?"
"ह्यो शंकर्‍या रं....लक्षान काय बरं दिसेना ह्याचं! आवाज देतोय तर तसाच फुडं निगून गेला."
"व्हय रं..म्या बी बगालोय, भिरमाट्यल्यागतं करतय ते आताशा!"
शंकर, दामाजी आणि हिरोजी शाळासोबती! नेहमी एकमेकांसोबत राहणारे, गप्पागोष्टींत, विनोदात रमणारे! प्रत्येकाची थोडीफार जमीन होती. खाऊन पिऊन सुखी होते. मध्यंतरी शंकरची म्हातारी आजारी होती, मग बायको आजारी झाली. दवाखान्याला पैसा लागला. हिरोजी व दामाजीने जमेल तेवढी मदत केली. दोघी नीट झाल्या. काही दिवस बरे गेले, पण नंतर शंकर्‍या एकटा एकटा राहू लागला. दामाजी व हिरोजी आपापल्या व्यापात होते. त्यांच्या हे लवकर लक्षात आले नाही. आणि आता शंकर्‍याची ही हालत होती.
"ह्याला काय झालंया, शोधाया हवं लेका!" दामू हिरोजीला म्हणाला.
****
दुसर्‍याच दिवशी दोघांनी सकाळी सकाळी शेताकडं जाणार्‍या शंकर्‍याला गाठले. दोघेही खनपटीला बसले, तेव्हा कुठं
शंकर्‍या बोलता झाला.
"आय आजारली तवा पैका व्हता माझ्याकडं! पर लगी लक्षी बी आजारी झाली. तुमी दोगांनी लई आधार दिला. पर तेवडा पुरा
नव्हता. पैक्यांची काहीच जुळनी व्हईना, मग जरा ईच्चार करून धनाजी सावकाराकडं गेलो. जमीन घहान ठिवून पैका दिला
त्यानं! गेले सालभर पैका फेडतोया, पर तो समदा त्यानं याजापायी वळता करून घेतला. मुद्दल तसंच हाय म्हणतोया. माजी
जिमीन हडपाया बसलाया त्यो सोद्या!" शंकर्‍या डोळ्यांतून वाहणारे पाणी पुसत म्हणाला.
"पर तू समदा पैका फेडलास नव्हं?" हिरोजीने विचारले.
"व्हय रं..ह्यो बग, समदा हिसाब कागदावर लिवलाय ना!" त्याने तारीखवार लिहिलेला कागद ह्या दोघांपुढे ठेवला. दोघांनी
सगळा हिशोब तपासला. शंकर म्हणत होता ते खरे होते. कर्ज जवळजवळ फिटल्यातच जमा होते. पण धनाजी सावकाराला कोण समजावणार? शंकरला धीर देऊन त्यांनी शेतावर रवाना केले.
दामू व हिराने बरेच डोके लावले, पर शंकर्‍याची जमीन सोडवण्याचा काय बी मार्ग दिसंना. सावकार तर शंकर्‍याच्या मागंच
लागलेला.
"दामू, काय सुचना गड्या, काय करावं गा! शंकर्‍या जीव दील, ज़मीन गेली तर!"
"व्हय रं, म्या बी तोच ईच्चार करायलोय." दामू डोके खाजवत म्हणाला. अचानक त्याने चुटकी वाजवली.
"येक आयडीया हाय बग!"
"काय रं?" दामू हिरोजीच्या कानाला लागला. हिरोजीचा चेहरा उजळला.
"बेस हाय रं! असंच करूयात." सगळे ठरवून दोघे पांगले.
****
दोन दिवसांनी अमावस्या होती. रात्र गेली अन सावकाराच्या घरावर दरोडा पडल्याची बातमी गावभर पसरली. जो तो उठून सावकाराच्या वाड्याकडे जाऊ लागला. दामू अन हिरोजीसुद्धा घटनास्थळी पोहोचले. पोलीस पाटील वाड्यात फिरून काय गेले, काय राहिले नोंद घेत होता. सावकाराने शहरातल्या पोलीस चौकीत तक्रार नोंदवली. शहरातून आलेली जीप सायरन वाजवत गावात शिरली. गावातली पोरे 'हेऽऽ' करत जीपमागे पळू लागली. कर्रर्र ब्रेक लावत जीप सावकाराच्या घरापुढे थांबली आणि कडक इस्त्रीच्या युनिफॉर्ममधला, चकचकीत बुट घातलेला पी.एस.आय. सानप खाली उतरला. उतरल्यावर त्याने आजूबाजूला नजर फिरवून गावाचा अदमास घेतला आणि कर्र कर्र बूट वाजवत तो वाड्यात शिरला.
डोक्याला हात लावून बसलेला सावकार त्याला पाहून तटकन जागंचा हलला आणि पीएसआयपुढे त्याने गहिवर घातला. 
"कोन्या भाड्यानं वाडा लुटला बगा ओ सायेबऽऽऽ माजं होतं-नवतं ते समद उचलून नेलं ओ सायेबऽऽऽ..." त्याने आणखी लांबण लावली असती, पण पीएसआय वैतागला आणि जोरात ओरडला.
"चूपऽ एकदम चूपऽ" तसा सावकार एकदम गप्प झाला. 
"शिंदेऽ काय काय गेलंय?" त्याने पोलीस पाटलाला हाकारले. पोलीस पाटील शिंदे लगबगीने पुढे आले. दोघे हळू आवाजात काही वेळ बोलत राहिले. तिजोरी साफ झाली होती. चोर सराईतपणे आत शिरला होता, इतर कशालाही धक्का न लावता तिजोरीच्या खोलीत शिरला, चाव्या तिथल्या गादीखालीच होत्या. काही वेळात तो बाहेरही पडला असेल.
"फिंगर प्रिंटस घ्यायला येतील इतक्यात. सावकार, तुमचा कोणावर संशय?" त्याने सावकाराला विचारले, तसा सावकार परत गळा काढणार होता, पण पीएसआय सानपची तीक्ष्ण नजर पाहून नीट बोलला.
"संशय कोनावर घेनार सायेब... मी सावकार. गरज पडंल तवा लोक जवळ करत्यात अन गरज सरली की मला श्या घालत्यात."
"बरं...पण इतक्यात कोनाशी काय भांडण वगैरे!"
"भांडान नाय पर.. हा… शंकर जगनाड्याशी बोलचाली झाली व्हती बगा!"
"कशावरून?"
"हेच आपलं पैशांवरून.... रीन घेतलया अन फेडाया जमंना. मग जमीन माझ्या नावावर करून दे म्हटलं. तर उसळला."
"बरं, ह्या जगनाड्याचं काही जुनं पोलीस रेकॉर्ड आहे का?"
"ओ सायेब, सादा सरळ मानूस हाय त्यो! त्यो असलं काय बी करनार न्हाय." पवाराची सखू म्हातारी ठसक्यात बोलली.
"गप गं म्हातारे!" सावकार तावातावाने तिच्याकडे जाऊ लागला, तसे सानपने त्याला अडवले.
"मी करतोय ना चौकशी. तुम्ही शांत राहा." हात चोळत सावकार गप्प उभा राहिला.
"अजून काही?" सानपने गावकर्‍यांवर नजर फिरवत विचारले.
"अजून्..हां त्यो दाम्या हाय ना, त्यो रातभर दिमडी बडवत व्हता." सावकार आठवत उत्तरला.
"रातभर?...मग दरोडा पडला तेव्हा तुमी जागंच असाल म्हनायचं!" सानपने नजर रोखत विचारले, तसा तो गडबडला.
"रातभर म्हंजी डोळा लागीपर्यंत तरी ऐकाया येत व्हतं जी!"
"बरं, पाटील, तुम्ही चौकशी करा. परवा ह्या शंकर आनी दामूला पन बोलवा चावडीवर."
"जी सायेब!" पो.पा. शिंदेनी होकार भरला. 
***
तिथले पंचनाम्याचे काम आवरून पो.पा. शिंदे उशिराच घरी आले.
"मामा, किती उशीर? मी जेवायला वाट पाहत होते ना!" त्याची लाडकी भाची दृष्टी लटक्या रागाने म्हणाली. बारावीची
परीक्षा देऊन ती उन्हाळ्याच्या सुट्टीसाठी गावाला आली होती.
"अगं पोरी, म्या हाय पोलीस पाटील. गावात दरोडा पडलाया. समदं निस्तरल्याबिगार कसं येता येनार?"
"दरोडा? सिनेमात पडतो तसा...?" दृष्टीने आश्चर्याने विचारले.
"हं.. म्हणं शिनेमात पडत्यो तसा! बघिटलं का ओ?" मामाने मामीला संभाषणात ओढले.
"येक काम करा धनी, ह्या पुरीला बी न्ह्या तुमच्या संगट तपासाला!" मामीने मामाचा पापड मोडला.
"हं..तर...लई श्यानीयेस! संगट न्या म्हणं. चेष्टा हाय व्हय, माजी नोकरी हाय ती!"
"आवं, आपली पोर हुशार हाय, तुमास्नी तरास नाय देणार, तर मदतच होईल तिची."
"होय मामा...मी पण येते ना तुज्यासोबत!" पो.पा. शिंदेंनी जरा विचार केला.
"बरं, चल तू बी. सकाळच्या पारी येरवाळीच आवर. उद्या लई काम हाये. पांडुरंगा इठ्ठला!" मामा आत निघून गेले.  
दृष्टी विचार करत होती. अशी कामे तिला आवडायची. रात्री बसून तिने दरोड्याची फाइल पूर्ण वाचली.
***
सकाळी शिंदे मामा बाहेर पडले, ते सरळ शंकरच्या घरी आले.
"रामराम पाटीलऽ" शंकर आवरून बाहेरच पडत होता.
"शंकर, बाहेर निघालास का?" शिंदे मामांनी विचारले.
"व्हय जी. पोटापाण्याची सोय बघाया नव्हं का?"
"व्हय, पर पोटापाण्याची सोय अशी दुसर्‍याची घरं लुटून कवापासून कराया लागलास?"
"देवा पांडुरंगाऽ" शंकरने फडाफडा तोंडात मारून घेतले. "काय बोलता पाटील? म्या माळकरी मानूस हाय. असलं वंगाळ काम माज्या हातनं होनार नाय!"
"ते कळलचं रं! बरं काल रातच्याला कुटं हुतास?"
"म्या? घरातच हुतो."
"कोनी साक्षीदार?"
"पाटील, कामून चेष्टा कराया लागलाया गरिबाची! घरातली समदी साक्षीदार हायेत. इचारा हवं तर!" शंकर्‍याच्या डोळ्यांत
पाणी तरळले. पाटलांनाही वाईट वाटले, पण ते त्यांचे कामच होते. 'आलिया भोगासी..' म्हणून ते शंकरच्या घरात शिरले.
त्याच्या आईने बसायला वाकळ टाकली. बुट्टीतल्या ओल्या शेंगा दृष्टीला दिल्या.
"खा पोरी, आपल्याच रानातल्या हायती. पाटील, इच्चारा काय इच्चारायचं ते!" म्हणून म्हातारी पाटलांसमोर ऐसपैस बसली.
पाटलांनी तपासाशी संबंधित बरेच प्रश्न विचारले. शंकर घरीच होता हे सिद्ध होत होते. पाटलांनी आपली चौकशी आवरती घेतली. ते निघणार, तेवढ्यात पवारांची सखू म्हातारी घरात आली.
"पाटील, तुमी हितं?"
"व्हय मावशी, दरोड्याची चौकशी सुरू हाय नव्हं!"
"आरं त्यो सावकार हायच बारा बोड्याचा! बरं झालं, चांगला दनका बसला त्याला. पर त्याच्यापायी तुमी अश्राप, गरीब लोकास्नी कामून त्रास द्याया लागलाया?" म्हातारीचा राग पाटलांना समजत होता.
"सखू मावशी, माजी ड्यूटी हाय ही पोलीस पाटील म्हणून! अन त्यो दोषी नसला तर ते सिद्ध हुईलच. शंकर, उद्या सकाळी चावडीवर ये. शेरातले पोलीस इनीस्पेक्टर यायचं हाय. तुला ईचारतील, तवा नीट उत्तर दे."
"येतो जी. कर न्हाय त्याला डर कशापायी?" शंकर म्हणाला.
*** 
शंकरच्या घरून ते निघाले. दृष्टी विचारातच होती..
"मामा, मला नाही वाटतं, हे शंकर दोषी आहेत असं!"
"पोरी, ते मला बी म्हाईतीये. पर ते पुराव्यानं शाबीत करावं लागतं. 'हा सूर्य अन हा जयद्रथ' हे दावावं लागतं."   
आता त्यांचा मोर्चा दामूच्या घराकडे वळला. दामू दारात बसून झांजाचे दोर नीट करत होता.
"काय करतोस दामाजी?" शिंदेमामांनी अंगणात पाय टाकत विचारले.
"राम राम पाटील, ह्ये झांजांची दोरी सरळी करत बसलोय जी." उठून त्याने अंगणातली बाज नीट टाकली, आतून एक वाकळ आणून त्यावर अंथरली. मग तो पाण्याचा तांब्या व ताटलीत हुरडा घेऊन आला.
"ही कोन म्हणायची?" त्याने दृष्टीकडे पाहत विचारले.
"ही माझी भाची, दृष्टी."
"नमस्कार!" दृष्टीने हात जोडून नमस्कार केला, तसा तो जरा बावचळला. त्यानेही नमस्कारासाठी हात जोडल्यासारखे
केले. पो.पा. शिंदे बाजेवर बसले, तसा तो घराच्या पायरीवर टेकला.
"दामू, गावात दरोडा पडलेला तुला माहीतच हाय."
"व्हय जी. हे काम ज्यानं पन केलं, बरं केलं." दामू मान झटकत उत्तरला.
"दामूऽ सरळ उत्तरं दे. काल रात्री तू कुठे होतास?"
"घरातच."
"काल तू दिमडी वाजवत होतास?"
"आता दिमडी वाजवनं काय गुना झाला का?"
"पर रातभर?"
"न्हाय जी, रातभर वाजवत बसाया इकती लाडकी न्हाय माजी दिमडी! रातचं जेवान झाल्यावर सराव मनून घटकाभर वाजवत बसलो."
"मग तुला बाहेर काही आवाज ऐकू आला का?"
"न्हाय बा! एक कुत्रंबी भुकलं न्हाय अन काय न्हाय. पर म्या मनतो, पाटील, आसं कोन दरवडेखोर असतील वो, अजाबात
पत्त्या न लागता तिजोरी साफ केली?" दामाजीच्या डोळ्यात अपार कुतूहल होते.
"कळंल, तेबी कळंल लवकरच! तू उद्या सकाळच्याला चावडीवर ये. शेरातून सायेब यायचेत तपासाला!"
"व्हय जी, येतो."
त्याला सुचना देऊन शिंदेमामा उठले. दृष्टी गप्पच होती. दामूच्या उत्तरात शंका घेण्यासारखं काहीच नव्हते, पण तिला ते खटकत होते.
"मामा, तू आता कुठं जाणारेस?" तिने विचारले.
"आता चावडीवर जायचं, ह्या सर्वांची नोंद ठिवाया हवी. तू घरला जातीस का?"
"हो. मी जाते आता, मला कंटाळा आला."
"बरं, जा मग! ह्यो समूरचा रस्ता सरळ घराकडंच जातो. जा, मामी वाट पाहत आसंल."
शिंदेमामा चावडीकडे वळले, तशी दृष्टी दुसर्‍या रस्त्याला लागली. तिला काहीतरी शोधायचे होते.
शिंदेमामा घरी आले, त्याच्या काही वेळ आधीच ती घरी आली.
****
दुसर्‍या दिवशी पीएसआय सानप आला, ते सरळ चावडीत शिरला. रायटर बाजूला पॅड सरसावून सज्ज होता.
गावातल्या लोकांच्या जबान्या घ्यायला सुरुवात झाली. शंकर, दामू व हिरोजीसुद्धा हजर होते. गावातले लोक उघड बोलत नसले, तरी गरिबाला नाडणार्‍या सावकाराला ही चांगली शिक्षा मिळाली, असाच प्रत्येकाचा विचार होता. सानपला ते जाणवत होते. सावकाराने संशयित म्हणून ज्याचे नाव घेतले, त्या शंकरचीसुद्धा चौकशी झाली. त्याच्या उत्तराची सत्यता तपासली गेली. तो घरातच होता हे पुराव्यानिशी सिद्ध झाले. चावडीच्या जरा बाजूला असलेल्या एका घराच्या सज्जातून दृष्टी हे सर्व पाहत होती.
दामूची चौकशी सुरु झाली.
"हं, तर दामाजी नाव ना तुमचं?"
"व्हय जी."
"त्या रात्री तुम्ही दिमडी वाजवत बसलेले म्हने. का बुवा, रातभर दिमडी बडवायची गरज काय पडली?"
"बेस इचारलंत सायेब, त्याचं काय हायं, ह्यो हिरोजी, म्हंजी माजा मैतर! त्यो, मी आमी झांजपतकात होतो. लग्नसराईत, जत्रंत
खेळाच्या सुपार्‍या येतात. जरा दोन-चार पैकं सुटतात. तर झालं काय, हिरोजीचा जो दिमडीवाला व्हता, त्यो गेला मिल्ट्रीत! आता इकता चांगला मोका आला, सरकारी नोकरी लागली, तर त्याला कामुन अडवायचं! पर मग आमच्या झांजपतकाला दिमडीवाला गावंना. मग आमीच युगत काडली. त्या दिमडीवाल्यानं मला दिमडी शिकवली अन त्यो गेला. आता म्या पडलो अडानी मानूस! मला सरावाबिगर कसं जमनार जी. मग म्या काय करतो, येळ गावला का सराव करत बसतो. व्हय, नायतर माजा गुरू रागवंल ना! मनून म्या रातच्याला सराव करत बसलो आसंन जी! बाकी मला काय ठावं नाय." दामू उत्तर देऊन सानपच्या तोंडाकडे पाहत उभा राहिला. सानपाला काय बोलावे तेच कळेना.
"बरं, जा बाबा जा, कर सराव!" सानपाने तिथला तांब्या उचलून घटाघटा पाणी प्यायले.
सगळ्यांच्या जबान्या घेतल्या, पण काहीच हाती लागले नाही. हे काम सावकाराच्या घरातल्याच कोणाचे तरी असावे, असा सानपला दाट संशय होता. खुद्द सावकारही ह्यात सामील असू शकणार होता. अशी काहीच गदारोळ न होता चोरी होऊच कशी शकते! सानपने शहराची वाट धरली. सावकाराने कपाळ बडवून घेतले. आता जागोजागी लपवून ठेवलेला पैसा बाहेर काढावा लागणार होता. तिजोरीतले चोराने हात न लावलेले दागिने परत तिजोरीत ठेवावे लागणार होते. सगळ्यांची गहाणपत्रे तेवढी गेली होती. त्याची आत्तापर्यंत राख होऊन वार्‍यावर उडूनहि गेली असेल.. स्वत:ला समजावून सावकार कामाला लागला. 
"मामी, घरात बसून कंटाळा आलाय. मी जरा गावात एक चक्कर मारून येते." शिंदेमामा बाहेर गेले होते. मोका साधून दृष्टी बाहेर पडली.
वाटेत सखूआजी भेटली, हळूहळू शेताकडे निघाली होती.
"काय आजी, कशा आहात?" दृष्टीने चौकशी केली.
"म्या बरी हाय, तू? पोलीस पाटलाची पाव्हणी नव्हं का?"
"होय. त्यांची भाची मी!"
"व्हय व्हय शंकराच्या घरात पायलंया तुला. कुणीकडं चाललीस?"
"काही नाही असंच फिरायला. पण गावात फिरायची पण भीती वाटतेय. कालच दरोडा पडलाय ना गावात?" सखू म्हातारी
गालात हसली.
"व्हय, व्हय, दरवडा पडलाया!"
"तुम्हाला नाही भीती वाटत? तुम्ही एकट्याच निघालात शेताकडे?"
"अगं पोरी, चोराच्या घरात चोरी झाली तर त्यात आनंदच हाय नव्हं? मला बापडीला त्यो चोर काय करणार!"
"पण कोणी केली असेल ही चोरी? ते पण कोणाला पत्ता न लागता?"
"तुला एक सांगू का? आमच्या गांवात झांजपतक हाय. लयी बाजिंदी हायेत वाजीवनारी. काय एक एक खेळ करत्यात. कुनाच्यातरी अडोसरीला लपवलेला नारळ अलगद शोधून काडत्यात. दिमडीच्या लग्गीनं त्याला रस्ता दावला जातो." दृष्टी चाट पडली. सखू म्हातारीचा निरोप घेऊन ती पुढे सरकली.
तिचे नशीब जोरावर होते, शेताच्या वाटेवरच तिला दामाजी भेटला.
"काय म्हणताय पावनीबाय! गमतया नव्हं गावात?"
"हो, छान आहे."
"नाय, आमचं हाय खेडगाव, शेरावानी मनोरंजन नाय हितं."
"नाही कसं.. दिमडी आहे ना." दामूने एकदम तिच्याकडे पाहिले. तिचे डोळे चमकत होते.
"काय पन.. दिमडी काय मनोरंजन करनार!"
"दामूकाका, ते तुम्हाला चांगलंच माहीत आहे. सावकाराचं घर तुमच्या घरापासून बरंच लांब आहे ना? मग त्याला दिमडीचा आवाज कसा ऐकायला गेला? तो पण मध्यरात्री? लग्गी वाजवत होते ना तुम्ही. फार सुरात असते ती. मध्येच हळू होते, मध्येच कडाडते."
"तुला कसं माहिती?" दामू ह्या बोटभर पोरीकडे अचंब्याने बघत होता. जे गावात कोणालाच कळले नव्हते, ते हिला कसे
कळले?
"खरे तर ही केस एकदम सरळ आहे. रात्री तुम्ही घरात वाजवत होतात, मग सावकाराच्या घराच्या गल्लीत गेलात. कारण जो कोणी सावकाराच्या घरात शिरणार होता, त्याला दिमडीचा संकेत नीट ऐकायला जायला हवा होता. दिमडीच्या लग्गीची माहिती असलेला, तिच्या तालावर एखादी गोष्ट शोधू शकतो. कुठे वळायचे, कुठे वर चढायचे, कुठे एखादी चीजवस्तू लपवली आहे, त्यातून तसा संकेत देता येतो. तुम्ही कोणाला हे संकेत दिलेत? शंकरकाका तर नक्कीच नाही. मग कोण? हिरोजी? तुम्ही तिघे जिवलग मित्र ना! हं, बरोबर ना?" दृष्टीने रोखून पाहत विचारले.
"इकतं समद ठावं हाय, मग पोलिसांना का नायी सांगितलं?" त्याने नाराजीने विचारले.
"सावकाराला अद्दल घडायलाच हवी होती ना! सगळ्या गावाची नाराजी होती त्याच्यावर. आणि मामाने मला सांगितले की फक्त गहाणपत्रेच गेली होती, बाकी चीजवस्तूंना हात लावला नव्हता."
"व्हय. सावकारानं लई तरास दिलाता. शंकर्‍याची जमीन बळकवाया निगाला व्हता. जमीन आमची आय हाय, अशी बरी जाऊ दिऊ? आन ती पन त्याचा हिसाब बराबर असताना? म्या अन हिरोजीन शंकर्‍याची जमीन वाचवायची ठरीवलं. काय करावं कळंना. लांड्यालबाड्या करून मुद्दल तसंच ठिवनार्‍या सावकाराला अजूक पैका तरी का द्यायचा? लग्गी मला जमाया लागली व्हती. हिरोजीनं अजूक जरा शिकवली अन बेत ठरला. दिमडीचा सराव म्या करायचोच, त्यामुळं त्यात कोनाला काय येगळं वाटलं नाय. समदी कागदं आनून जाळली अन राख शेतात पसरुन दिली." दामू बोलता बोलता थांबला. 
"तुमचे मित्रप्रेम फार आवडले मला! ही केस सुटली असली, तरी ती पोलीस फाइलमध्ये 'पेंडिंग' असलेलीच बरी! येते मी." दृष्टी समाधानाने घराकडे वळली. 

प्रतिक्रिया

कर्नलतपस्वी's picture

6 Nov 2022 - 5:18 pm | कर्नलतपस्वी

ल ई ब्येस,
कथा वाचायला सुरवात केल्यापासून शंकर पाटलांची आठवण आली.

मस्तच भट्टी जमलीये आणखी लिहा.

सरिता बांदेकर's picture

6 Nov 2022 - 8:43 pm | सरिता बांदेकर

छान आहे कथा

सरिता बांदेकर's picture

6 Nov 2022 - 8:43 pm | सरिता बांदेकर

छान आहे कथा

छान कथा, वेगळाच शेवट.कर्नल तपस्वींनि म्हंटल्याप्रमाणे शाळेत मराठी क्रमिक पुस्तकात शंकर पाटीलांच्या कथेप्रमाणे लिहिलेली. आणि शेवटी थोडा धक्कादायी चांगला शेवट.

छान कथा, वेगळाच शेवट.कर्नल तपस्वींनि म्हंटल्याप्रमाणे शाळेत मराठी क्रमिक पुस्तकात शंकर पाटीलांच्या कथेप्रमाणे लिहिलेली. आणि शेवटी थोडा धक्कादायी चांगला शेवट.

विनिता००२'s picture

7 Nov 2022 - 2:56 pm | विनिता००२

खूप खुप धन्यवाद मंडळी :)

मला पण शंकर पाटलांचे साहित्य खूप आवडते. सार्थक झाले __/\__

स्मिताके's picture

7 Nov 2022 - 7:13 pm | स्मिताके

मस्त रंगली कथा. आवडली.

मुक्त विहारि's picture

7 Nov 2022 - 10:59 pm | मुक्त विहारि

आवडली

विनिता००२'s picture

8 Nov 2022 - 9:39 pm | विनिता००२

धन्यवाद वाचक मंडळी __/\__

सुक्या's picture

9 Nov 2022 - 5:37 am | सुक्या

मस्त कथा आहे.

श्वेता२४'s picture

9 Nov 2022 - 1:52 pm | श्वेता२४

सर्व प्रसंग डोळ्यासमोर उभे राहिले.

पॉइंट ब्लँक's picture

10 Nov 2022 - 1:04 pm | पॉइंट ब्लँक

वाचताना मजा आली खूप

सौंदाळा's picture

11 Nov 2022 - 12:23 pm | सौंदाळा

भारी आहे कथा.

विनिता००२'s picture

11 Nov 2022 - 2:55 pm | विनिता००२

__/\__ धन्यवाद :)

दिमडी, लग्गी म्हंजी काय ते अज्याबात माहिती नाय...
पण कथा एकदम झकास वाटली बघा... 👍

श्वेता व्यास's picture

16 Nov 2022 - 3:20 pm | श्वेता व्यास

+१

सुखी's picture

12 Nov 2022 - 5:35 pm | सुखी

कथा आवडली

श्वेता व्यास's picture

16 Nov 2022 - 3:22 pm | श्वेता व्यास

लग्गी म्हणजे काय माहिती नाही.
दिमडीवर वाजणारा ठराविक ठेका असावा असा कथेवरून अंदाज येतोय.
चांगला शेवट असलेली कथा आवडली.

विनिता००२'s picture

21 Nov 2022 - 11:36 pm | विनिता००२

हे बघा ही आहे दिमडी आणि काही यूट्यूब लिंक देतेय. लग्गी नाही पण दिमडी कशी वाजते ते कळेल..

Dimdi Solo