तारा रुपानं काय लई देकनी न्हवती, हुती आपली चार जणींवाणी. नाक-तोंड जाग्यावर हुतं म्हनायचं. अंगापिंडानं बाकी निबार. साळंतल्या तिच्या गडणींपरीस टीचभर उंच दिसणार. मराठी आटवीत असताना तिला पदुर आला, तवा तिचा आज्जा रामजी तिच्या बाला काय म्हनला की "पुरगी मोटी दिसाय लागली की गा. आता बास जहाली साळा. आता हिला ठिवायची न्हाई." तवा तारीचा बा - बापू म्हनला की "धाव्वी हू दे की रं नाना. पोरीचं डोकं चांगलं हाय म्हनत्यात. शाणी हाय म्हनत हुता मास्तर. चार बुकं शिकली आस्ती मंजे.." तवा बापूची आई शीताबाई खवळून म्हनली की "बुकं शिकून काय तुजी पुरगी बालिष्टर हुनार हाय व्हय? शेतकर्याच्या, कुनब्याच्या पुरी, सौंसार कराय आला म्हंजी झालं. लई दिस घरात ठिवुने तेनास्नी. उद्या तिच्या मापाचा पोरगा मिळंना झाला तर मग? हिच्या शिणीची मी हुतो तवा माझ्या अंगावर पीत हुतास तू."
आसं आई, बा दोगंबी धडामकरून भिताड पडल्यावानी आंगावर आल्यावर बापूला काय बोलावं कळंना. व्हय न्हवं, व्हय न्हवं, करू या बगुया, करू या बगुया करत धा-पंदरा दीस गेलं आन एकादिशी म्हातारी तोंडात आन घेनार न्हाई म्हनून बसली. "आसं का गं आई? आई, आसं का?" करून बापू एगदा सोडून धादा इचारला, तर शीताबाईचं काय एक न्हाई का दोन न्हाई. काय झालं आन कसं झालं म्हनून बापू आईकडं गेला, तवा म्हातारी दिसाउजेडी डोसक्यावरनं वाकाळ घ्यून भिताडाकडं तोंड करून झोपून टाकली. बापूला आता काय करावं आन कुनासंगट बोलावं कळंना. त्यो असा ध्येयविधेय झाल्याला बगून त्याची बायको त्याला परड्यात हाटकली आन पाताळ आवाजात म्हनली, "आवं, तारीची हाळद घट झाल्याबिगार त्वांडात पानी न्हाईत घ्यायच्या आत्ती. काल हावसाबाईला सांगत हुत्या. तुमी कितीबी मिंत्या करा, न्हाईच आयकायच्या त्या. तुमानी ठावं न्हाई का आता, लई हायती बगा."
"आता बगतो, आज जाऊन पावण्याला गाट पडतो" आसं बापूनं धाधा येळा सांगितल्यावर शीताबाई उटली आन लेकाकडं न बगता कांबरूनाच्या घडया कराय लागली. तवा बापूला बगलंला घ्यून रामजी म्हनला, "बापू, ह्ये काई खरं न्हवं गड्या. कशाला वांदं करत बसायचं? आन आज बगाय लागलो म्हंजे काय उद्याला हुनार हाय व्हय लगीन? वर्स सा म्हयने जायाचेच की गा. गाटी बांदून ठिवल्याल्या आसत्यात लेकरा वरनं. पर आता लगीन हूस्तवर म्हातारी सुकानं भाकरी खाऊ देनार न्हाई. कवा झालं तरी लगीन करायचं हायेच. मग बगायला तरी लागू या की." ह्यावर जरा इचार करून बापू म्हनला, "तसंच केल्यालं बरं. ते आणि निर्मळ."
मग या पावन्याला सांग, तिकडची बातमी आली की तिकडं जा, आणि कुणीकडची म्हायती काड आसं करत करत चार-सा म्हैने गेले आन शेवटाला बुबनाळच्या महादेव उळागड्ड्याच्या पोराबरोबर तारीचं लगीन ठरलं. पोरगा सुबास कारखान्यावर हुता. आट आकणी घर हुतं. दोन भावात सा एकर बागायत हुती. दोन म्हसरं हुती. थोरला भाऊ यष्टीत हुता. त्याला दोन लेकरं हुती. धाकटी भन आलासला दिल्याली हुती. पावणं लांबच्या वळकीतलं हुतं. सासरा माळकरी हुता. माणसं चांगली हुती. तेंची पसंती, हेंची पसंती, देणं-घेणं, मानपान एका बैठकीतच जमलं. कोण काय आकडून धरला न्हाई. "पोरीच्या अंगावर काय तुमच्या मनाला यील ते घाला" आसं पोरीचा सासरा म्हनला आन बापूला आपल्या उरावरचा धोंडा उतरल्यागत झालं. पंडिताला बोलवून लगीचचाच म्होतूर धरला. "तुमची शे दोनशे, आमची शे दोनशे काय हुतील ती मानसं जेवायला घालून लगीन करून द्यूया" असं रामजी आपनहून म्हनला. तारीनं नशीब काडलं.
लगीन झालं आन रामजी आणि शीताबाईला आता मराय मोकळं झाल्यावाणी झालं. तारी पोरगी गुनाची हुती. कामाला हुशार हुती. जडगी न्हवती. आईचं वळण चांगलं हुतं. कदी आवाज चडवून बोलत न्हवती. थोरल्या जावेच्या हाताखाली तिनं सासरची शिस्त लावून घेतली. सासर्याला थंडीच्या पारी सकाळी तोंड धुवायला ऊन पानी मिळायला लागलं. सासूला एकादशीला मऊसूत शाबू खिचडी आनि साईचं धई मिळायला लागलं. दोगं भाऊ सांच्याला जेवाय बसल्यावर तव्यावरच्या भाकरी, तिखट कोरड्यास आनि आंब्याचं लालभडक लोणचं खाऊन ढेकर द्यायला लागले. घरातल्या पोरांना नव्या काकीनं जीव लावला. धाकली तर काकीनं जेवायला घातल्याशिवाय जेवंना झाली. "काय गं बया नव्या काकीचा तेगार, आमी नऊ म्हैने पोटात बाळिगलो ते कुटं गेलं म्हनायचं?" तारीची थोरली जाऊ मायेनं म्हणायला लागली. बापय मानसांची आन सासूचं जेवान झाल्यावर जावा जावा हात वाळोस्तोर बोलत जेवाय लागल्या. उनात खड वाळवलेल्या मऊ वाकळावर म्हातारी मानसं दिस उगवस्तोर निजाय लागली. उळागड्ड्याच्या घरात आबादीआबाद झाली.
वरीस उलटून गेलं तसं सुबासला - तारीच्या नवर्याला - त्याचे दोस्त इचारायला लागले. "लाडू दिलास लेका, आता पेडं कवा देनार" म्हून. तेंच्यातला कोनतर शाना म्हनायला की "जरा दम खावा की लेको आन पेडं काय का बर्फी काय, व्हय की न्हाई? पहिली बेटी धनाची पेटी लगानो." तारीची सासू आपल्या थोरल्या सुनंला इचाराय लागली की "काय गं, तुझ्या जावंचा काय बेत?" पंचमीला तारी म्हायेरला आली, तवा शीताबाईनं तिला पोटाशी धरलं आन कवळ्यातून सोडताना तिच्या पोटावरनं हात फिरवला. हाताला तिचं सप्पय पोट लागल्यावर म्हनली, "काय जुळणी न्हाई व्हय गं?" तारीची आई आपल्या लेकीशी बोलताना म्हनली की "काय गं तारा, नवीन लोंचं घातल्यालं हाये. द्यू का तुला आनकी? आंबट खावं वाटतंय काय तुला? काय नवंजुनं? न्हवं, सकाळी कुनीतरी वकल्यावाणी आवाज आला, म्हून इचारतो."
वरीस झालं, दोन वर्स झाली आन आता तीन वर्सं व्हायला आली, तवा जरा कायतर कराय पायजे आसं लोकान्ला वाटाय लागलं. शीताबाई किती नवस बोलून बसली हुती हे तिच्या तरी ध्यानात हुतं की न्हाई कुनाला दक्कल. बापू जावयाच्या थोरल्या भावाला म्हनला की "सांगा तुमच्या भावाला आन तारीला कोंच्यातरी चांगल्या डागदरला दाखवायला. अवो, आता काय काय आवशधं आन काय काय. आमच्या टायमाला न्हवतं काय आसलं. ह्यो द्येव, ती द्येवी ह्येच हुतं वो. आता बगा जरा. बुवांच्या मांडीवर थोरलं नातवंड हाये हो, पर आमची पन हाउस हाये ना. आमची आई तर तेवड्यासाटीच जित्ती हाये म्हना ना."
मोठया दवाखान्यात तारी आन सुबास दाखवायला गेले, तवा त्यांच्या आया देव पान्यात घालून बसल्या. माळकरी बुवा तेनास्नी म्हनला, "आपुन कुणाचं काय वाकडं केल्येलं न्हाई, देव आपलं भलंच करनार हो. लेकीची कूस उजवू दे रं राया. सुबासला एक पोर होऊ दे रं बाप्पा. विठ्ठल विठ्ठल जय हारी, विठ्ठल विठ्ठल जय हारी.."
काय इसेस न्हाई, जरा दम खायाला होवा. पोरं ह्येच सांगत आली आनि थोरांच्या जिवाला थंडोसा वाटला. अवो, देवाजीच्या मनात पायजे . लग्न हून बारा बारा वर्सानं पोरं हुत्यात. कुन्या देवाचं कायतरी र्हायलेलं हाये का बगा. डोंगराला कवा गेलाता? ताईबाईला अमुशेला नारळ फोडलावता न्हवं?
म्होरच्या अमुशेला सांच्याला सुबासनं नारळ फोडला, तशी तारी घुमायला लागली. तिची वेणी सुटून इस्कटून गेली. कपाळावरचं कुक्कू फरकाटल्यावानी झालं. तिच्या डोळ्यातनं घळाघळा पानी यायला लागलं. हूं हूं हूं हूं म्हनत तिनं काटवटकन्या घातल्यावानी फेर धरला. त्याल न घातलेल्या झोपाळ्यावानी तिचं दात कार्र कार्र वाजत हुतं. तिच्या जावेला, सासूला काय करावं कळंना. आदीच दांडगी असल्याली तारी चार जणांना आवरंना. कुनी तिला जाग्यावं धरून ठेवायला बगत हुतं, कुनी तिच्या डोक्यावं पानी वतलं. दमगीर हून तारी जिमिनीवर पडली आनी भुई बडवत हुमसून हुमसून रडायला लागली.
जंगमाचा पोरगा देवरुशी हुता. तालुकाभर त्याचं नाव हुतं. सुबासचा त्यो दोस्त हुता. आशानआसं झाल्यालं हाये आसं कळल्यावर त्यो आपल्या मनानंच सुबासच्या घराकडं आला. कुटं गेलाता वयनी, माळावर लिंबाची दोन आवळी जावळी झाडं हायती तिकडं सांच्याला गेलावता काय, देवळाकडं यकट्याच गेलावता काय, हिरवी साडी नेसलावता काय. एक ना दोन इचारलं . तारीला काय धड आटवत न्हवतं.हिकडं तिकडं करून जंगमाच्या पोरानं एक काळा दोरा मंतरून दिला. काय वाट्टल ते झालं तरी ह्यो दोरा हातातनं निगता कामाने आसं बजावून सांगितलं. काळी कापडं घालायची न्हाईत, काळं काही खायाचं न्हाई, दिस बुडायच्या आत घरात याचं आशा धा गोष्टी सांगितल्या. पांडरा मंगळार धरायचा. फकस्त पांडर्या वस्तू खायाच्या. दूद, धई, ताक, फोडणी नं घातल्याला शाबू. उपास सांच्याला सोडायचा न्हाई, बुदवारी सकाळी गुळाचा खडा खाऊन सोडायचा. रोजची देवपूजा चुकवायची न्हाई.
“भाईरचं काय हाय काय रं?” तारीच्या सासूनं जंगमाच्या पोराला घराच्या भाईर न्यून ईचारलं.
“तसं काय वाटंना काकी. कुटं गेल्याबी न्हाईत वयनी. घरातलंच कायतर चुकल्यालं हाये यल्लम्माला काय बोल्लावता काय?”
“काय न्हाई रं बाळा. देवीला बोल्ल्यालं इसरीन काय मी?”
“तसं न्हवं, लगीन झाल्यावर वट्टी भरायला खणनारोळ घ्यून जोडीनं लावून दिलावता न्हवं?”
तारीच्या सासू सासर्यानं एकमेकाकडं बगीतलं. सासूनं पदराचा बोळा तोंडाव घ्येतला.
“आगागा.. कसं इसरलं रं?”
जंगमाच्या पोरानं हात फिरवून हाताचं पंजं आभाळाकडं केलं. “इतकी थोरली मानसं तुमी तात्या. नवी सून घरात आणलायसा आन तिला देवीच्या पायावर घालाल का न्हाई? देवीची वट्टी इसारला? देवीचा कोप हाये काकी.”
“आता रं?”
“आता काय, देवीच्या मनात हाये ते हुनार. हू ने ती गोष्ट आपल्या हातानं झाल्याली हाये. आता काय भोग असंल त्यो भोगून सारायला लागनार.”
“आरं लगा पन हेच्यावर कायतरी तोडगा आसलंच की. तू येवडा मोटा देवरुशी.”
“देवरुशी हाय तात्या मी. देवीचा भगत हाये. देव न्हाई. देवीसमोर माजी काय टाप? त्यातनं यल्लम्मा म्हंजे एक नंबर कडक देवस्थान. त्यातनं बगतो. जनवाडला आमचं गुरु हायेत. जाऊन तेनला इचारतो. काय उपाय हाय का बगू. तुमी तेवडं मी सांगितल्यालं सगळं पाळा, कशात खाडा होता कामाने. वयनींच्या संगट कायम कुनीतरी पायजे. एकटं कुटं जाऊ द्यू नका. सांबाळा काकी, न्हाईतर काट्याचा नायटा व्हील.”
जंगमाचा पोरगा असं बजावून गेला आणि सगळ्या उळागडड्याच्या घरानं तारीला लोन्याचा गोळा सांबाळावा तसं सांबाळायला सुर्वात केली. पुडची अमुशा आली तशी सगळ्या घराची झोप उडाल्यावानी झाली. सुबासनं तारीच्या आई-बापाला बोलवून घेतलावता. नारळ तर फोडायलाच पायजे हुता. तारीच्या हुजरी नारळ फोडायला नको म्हनून सुबास तिला पल्याडच्या खोलीत घ्यून गेला. हिकडं बुवांनी नारळ फोडल्याचा काडकन आवाज आला आन शेजारच्या खोलीतनं तारी गुरासारकी वरडली. हातातलं भक्कल तसंच हातात घ्यून बुवा पल्याडच्या खोलीत पळालं. तारीनं जिमिनीवर घालून घेतलं हुतं आणि ती घुमत हुती.
“आई कोपल्याली हाये तात्या, “ जंगमाचा पोरगा म्हनला. “आपली चुकी हाये, आपल्याला शिक्षा होनार. तुमच्या घराला गिराण लागलेलं हाये. वयनींच्या जिवाला धोका हाये. सुबासला धोका हाये.”
सुबासची आई, वैनी, तारीची आई, शिताबाई सगळ्या रडायला लागल्या. तारी सुंब बडवल्यागत जिमिनीकडं बगत बसालीवती. “रडू नकासा काकी. देवाघरची कुराड हाये. कुणाच्या गळ्यावर पडंल कसं कळनार?”
“आरं लेका, तू घरचा मानूस.” बुवा म्हनालं. “जसा आमचा सुबास, तसा तू. तू आता ह्यातनं वाट दावाय पायजेस.”
“मी सांगिटल्यालं आयकाल? जमल?”
“आरं, पोरीच्या जिवाचा प्रश्न हाये. “ बुवा म्हनालं. “पोरांपेकशा काय जास्ती हाय व्हय?” बापूच्या आन तारीच्या आईच्या डोळ्याला पानी आलं. एवडी माया लावली पुरगीनं, सासरच्या लोकानला. गुनाची लेक. तिच्या नशीबाला काय ह्यो भोग म्हनायचा? माफी कर, आई. चुकी पोटात घ्ये आई, आई!
“सगळ्यानला यल्लमाला जायाला लागनार. अगदी बारक्या पोरांसकट सगळी. देवीला हिरवी साडी, चोळी, बांगड्या. सुबास आन वयनी हेनी लिंब नेसून वेशीपास्नं देवळापत्तुर दंडवत घालत जायचं. घरात कुना एका बाई मानसानं पांडरा मंगळार धरायचा. कडंपत्तुर करायचा. सोडायचा न्हाई.”
“ह्ये करू. सगळं करू.”
“मी धरतो बाबा मंगळार. पोरीच्या जिवाला तरास नगो.” तारीची सासू म्हनली .
“आनि सगळ्यात म्हत्वाचं म्हंजे बारा वर्सं शेज तोडायची. सुबास, वयनी, बारा वर्सं..”
“आनि रं?”
“विलाज न्हाई, तात्या विलाज न्हाई. देवीची विच्चा. आपला काय जोर्या चालनार न्हाई. बारा वर्सांचा जोगवा हाये म्हना. आपली चुकी, लेकरांना भोगाय लागनार. ह्यो न्यावच हाये. ह्ये करायलाच लागनार. बारा वर्सांचा वसा हाये. एका शेजंवर दोगं येता कामाने.”
आतल्या खोलीत बायकांच्या रडन्याचा कालवा झाला. तारी तशीच जिमिनीकडं बगत बसालीवती.
“सुबास?”
“माजी काय तक्रार न्हाई तात्या. ताराच्या जिवापेक्षा काय मोटं न्हाई. कवा जायाचं बाबा देवीला?”
‘उद्या.”
यल्लम्माला जायाचं म्हंजे लोकांची तोंडं फुलून येत असनार. द्येवी, आई आपली! ती गाट पडनार. नवी कापडं घालून, भेंड बत्तासं, चिरमुरं, नारोळ, पेडं तेन घ्यून लोक हौसंनं यल्लमाला जात हुती. महादेव उळागड्ड्याच्या घरातल्या लोकांच्या तोंडावर काय रया न्हवती. बारकी पोरं तेवडी जत्रंला आल्यावानी खुषीत हुती. बाकी सगळी जबरीनं आनल्यावानी आलीती. जंगमाच्या पोरानं पूजा बांदली. देवीला साडी, चोळी, बांगड्या व्हायल्या. लिंब नेसून सुबास आनि तारा दंडवत घालत देवीच्या देवळापत्तुर गेलं. नारोळ फोडायला सुबास म्होरं झाला. तारीला एका बाजूनं तिच्या आईनं आन दुसर्या बाजूनं तिच्या सासूनं घट धरलं व्हतं. तारीला कसली सुद्धच न्हवती. वाटंवरचं काटं, खडं लागून तिच्या हातापायावर खरचटल्यालं हुतं. रगात येत हुतं. सोन्यासारखी पोरगी, तिच्या आईच्या मनाला आलं, सासरच्या चुकीनं मातेरं झालं तिचं. काय करणार! भोग हाये म्हनायचा आपला. जंगमाचा पोरगा म्हनत हुता तसं, भोगून सारला पायजे ! आई..
काडकन नारोळ फुटला आन तारी एकदम दचाकली. यल्लामाच्या मूर्तीकडं बगून तिनं हात जोडलं. तिच्या डोळ्याला पानी आलंवतं, पर ती सुद्धीवर हुती. जंगमाच्या पोरानं तिचा मळवट भरला.
“श्राप सुटला काकी. पोरं वाचली आपली. दंडवत घाला समद्यांनी” त्यो मोट्या आवाजात म्हनला .
द्येवीला जाऊन म्हयना हून गेलावता. अमुशा आली आन गेली. बुवाच्या घरात नारोळ फुटला खरं तारीच्या काय आंगात आलं न्हाई. काकीनं पांडरं मंगळार धरलंवतं. पोरं मरतामरता वाचली. आपली चुकी ! तिच्या आणि बुवाच्या मनाला गोष्ट लागून र्हायली व्हती. सुबास मळ्यात झोपायला जात हुता. तारी सासूसंगं माजघरात झोपत हुती. झाली गोष्ट गावातल्यांच्या कानावर गेली हुतीच. दुसरा कोन असता तर लोकांनी बोलून बोलून त्याच्या आंगावर भसकं पाडलं असतं. पर बुवा आन काकी सज्जन मानसं. शेवटी मानूस हाय, चुकी व्हायाचीच. आई-बापांच्या चुकीची शिक्षा पोरानला भोगायला लागत्या, ह्यो न्यावच हाये. सुबास वाचला, तारी वाचली ह्येच मोटं म्हनायचं. जंगमाच्या पोरानं वाचिवलं. पुन्य बांदून घेतला त्यो.
ऐतवार हुता. ऊसाची भरणी हुती. सकाळी न्ह्यारी करून सुबास मळ्याकडं गेलावता. मला यायला सांज हुणार, सगळी भरणी आटपूनंच मी येनार, दुपारी भाकरी कुणाकंडं तरी लावून दे म्हनून त्यो तारीला सांगून गेलावता. बारा वाजलं तरी वाटेकर्याची पोरगी भाकरी घिऊन जायला आली न्हाई तसा ताराचा जीव खालवर व्हायला लागला. “मी भाकरी घिऊन जाऊ काय गं?” तिची सासू इचारली. “तुमी कुटं जाता आता उनाचं?” तारी म्हनली . “मी जातो आन द्यून येतो”
“तू जातीस व्हय? बरं जा. पर येकटी नको जाऊ. पोरीला संगट घ्यून जा. ए पोरी, काकीसंगट मळ्याकडं जाऊन काकाला भाकरी द्यून ये बाळा.” म्हातारी म्हनली .
“आं.. आमी न्हाई जा.” तिची नात म्हनली .
“आगं, जा की दोडा. जा तुला बाजारदिशी पाच रुपये देतो म्हनं गोडी श्येव खायाला, जा.”
“नगो मला. मला कट्टाळा आलाय.” पुरगी म्हनली .
“आसू द्या वं. आब्यास करून कटाळली आसंल पुरगी.” तारी म्हनली. “मी जाऊन येतो लगीच. त्येला किती येळ लागतोय?”
“बरं, मग जास्टेळ तटू नकोस तितं. मी जेवायला थांबतो काय.” म्हातारी म्हनली .
“व्हय, व्हय. मी आलोच घटकाभरात. आल्यावर जिवूया “ भाकरी घ्यून तारी निगाली.
निम्म्या ऊसाची भरणी झालीवती. गडी माणसं सुट्टी करून जेवायलीवती. सुबास पाटाच्या पान्यात हातपाय धुवालता. लई ऊन तावालतं.तारी घामाघूम हून खोपीत आली. फडक्यात बांदलेली भाकरी तिनं खोपीतल्या कट्ट्यावर ठिवली. फडक्यात एकाला दोन माणसं आसली तर कमी पडायला नको म्हून बांदलेल्या चार भाकरी हुत्या, तोंडल्याचं कोरड्यास हुतं, जरमनच्या डब्यात तिकाट आमटी हुती. शिल्वरच्या डब्यात धईभात हुता. खर्डा हुता. भाजल्यालं दोन पापड हुतं. शेंगदाणं हुतं. ताक हुतं.
तारानं कळशीतल्या पान्यानं खोपीभाईर तोंड धुतलं. आत यून ती दाराम्होरं वार्याला बसली तेवड्यात सुबास आलाच.
“तू आलीस व्हय भाकरी घ्यून?”
“व्हय. उशीर झाला ती पुरगी काय आली न्हाई, मग आत्तीला म्हनलो की भुका लागल्या आसतील तुमाला, मीच द्यून येतो भाकरी.”
“बरं केलीस. बस आता तूबी खा जरा ह्यातलंच.” सुबास म्हनला .
“नगो. आत्ती थांबल्यात माज्यासाटी. तुमीच जेवा. सकाळी लवकर आलायसा. वाडून देतो मी.” तारी म्हनाली.
बंडी काडून उगड्या अंगानंच सुबास जेवायला बसला. खोपीत वरच्या अंगानं ठेवल्यालं लख्ख घासल्यालं ताट तारीनं खाली काडलं आन त्यात चारी जिन्नस वाडले.
“किती जेवन आनल्यास तारा. मी काय भूत हाय का काय?” भाकरीचा घास घ्येत सुबास म्हनला .
“आसू दे, जेवा. सांज हुनार तुमाला यायला. उद्यापासनं परत डूटी हाये. आजबी विसावा न्हाई तुमाला. जेवा. सगळं संपवा माज्या नदरंसमोर.” सुबाससमोर बसत तारा म्हनाली. “आवं, काय झालं? कोरड्यास तिकाट झालंया काय? नवं तिकाट हाये वो. जास्त पडलं वाटतं माज्या हातानं..”
“तिकाट जास्त न्हाई तारा. पर आता ह्यो बोजा मला सोसंना गं” पालथ्या हातानं डोळं पुसत सुबास म्हनला.
“हां.. आसं न्हाई करायचं. आजाबात न्हाई. बोजा दोगांनी मिळून उचिललेला हाये. त्यो न्ह्यायचा आता कडंपत्तूर. आता डोळ्यातनं पानी काडायचं न्हाई.”
“आगं पर तारा…”
“काई बोलू नगा म्हंतो न्हवं का मी? तुमी, मी आनि भावजींनी यवजल्यासारखं झालं की न्हाई सगळं? आता काळजावर धोंडा ठिवायचा.”
“तारा, ह्ये काय करून बसलीस तू? दवाखान्यात तपासायला गेलो आन त्यो मोटा डाक्टर म्हनला की दोष तुज्यात न्हाई, माज्यात हाये. मीच बाप हुनार न्हाई कवा. मीच मर्द न्हाई... मीच ..”
“गप बसा म्हनतो न्हवं का मी. माजी आन हाये तुमाला. अगदी गप बसा. अवो, तुमी आनि मी काय येगळं हाये का? सांगा बरं मला. त्यो डाक्टर म्हनला त्ये गावभर झालं असतं तर काय झालं आसतं सांगा मला. माज्यात दोष हाये म्हनून सांगूया आसं मी म्हनत हुतो तर तुमी म्हनला की आई तुला घराभाईऱ काडंल आन माजं दुसरं लग्न लावंल. तवा भावजी म्हनालं की ह्ये आसं करूया म्हनून.”
“आगं पर तारा..”
“कायी न्हाई. झालं ह्ये बेस झालं. आबरू वाचली. तुमचीबी आन माजीबी. माजा बा म्हनतो, आबरू हाय तर मानूस हाय. आबरुच गेली तर निस्ता मानूस जगून काय उपेग?”
“पर ह्ये असं लांब लांब कसं जगायचं गं?”
“जगायचं तसंच. भावजी म्हनले न्हाईत का, भोग हाये. भोगून सारला पायजे . त्येच खरं हाये. तुमी माज्या शेजेत नसला म्हनून काय झालं? माज्या नदरंसमोर तर हाय न्हवं? मी हाय घट्ट. बारा वर्सं जायाला काय येळ लागतुया व्हय? आन बारा वर्सं गेली की कुनाला पंचाईत आसनार?”
“तुजं वाटोळं झालं बग माज्यामुळं”
“आसला शबुद आजिबात काडायचा न्हाई. कायी वाटोळं न्हाई झालं माजं. दवाखान्यात तुमी म्हनला , घरात मी सांगतो खरं काय त्ये. तुला काडीमोड देतो, तू दुसरं लगीन कर, तुला पोरंबाळं हूंदेत, कुटंबी र्हा, पर सुकानं र्हा, तवा मला वाटलं मी माजं फिटलं. मला तरी आनि सुक काय मिळनार. काय एक पोर हुनार न्हाई पोटाला. न्हाई तर न्हाई. कितीतरी लोकास्नी हुत न्हाईत पोरं. म्हून काय दाल्ला बायको येगळं हुत्यात व्हय? अवो, ह्या गाटी वर बांदल्याल्या आसत्यात. त्यो बांदनारा. त्योच सोडवनारा. तुमी कोन आनि आमी कोन?”
“तारा..”
“आता ऱ्हाऊ द्या बाकीचं. जेवा भराभरा. तुमची भरणी हुयाची हाये. मलाबी घराकडं जायाला पायजे. आत्ती वाट बगत असत्याल. ताक न्हाई घ्येतला? चांगलं गोड हाये. घ्या की.”
सुबासनं ताकाचा तांब्या उचलला. तारा त्याच्या म्होरं बसून त्याच्या उगड्या अंगाकडं बगत हुती. एक शिनिमा बगावा तशी डोळं न झाकता त्याच्या उगड्या अंगाकडं बगत हुती.
प्रतिक्रिया
5 Nov 2022 - 8:00 pm | कर्नलतपस्वी
भाषा,मांडणी आणी कलाटणी अप्रतिम.
वाटले होते तारी शेतात गेल्यावर दोघांचा तोल सुटेल. अंधश्रद्धेवर मात होईल पण तुम्ही एक वेगळेच वळण दिले. ग्रामीण भागातील असल्याने कथा जास्त भावली.
खुप छान, आवडली कथा.
5 Nov 2022 - 8:48 pm | Bhakti
छान ग्रामीण भाषेतील कथा आवडली.
तारीच्या अंगात अचानक आल्यावर थोडं कृत्रिम वाटलं पण कथा ओघवत शेवट भावला!गावाकडली येडी माया !
5 Nov 2022 - 10:42 pm | सौंदाळा
अप्रतिम रावसाहेब.
कथाबीजाचा सुंदर वृक्ष कसा करायचा हे तुमच्या कथा वाचूनच समजते.
अप्रतिम शब्दसंपत्ती, वातावरण निर्मिती आणि अर्थातच कथेला शेवटी दिलेली कलाटणी.
(तुलना करायला आवडत नाही पण राहवले नाही म्हणून सांगतो, तुमच्या कथा वाचताना जि. ए. ची आठवण होते)
6 Nov 2022 - 8:17 am | गवि
वाह उस्ताद.. !!
6 Nov 2022 - 10:38 am | अनिंद्य
छान लेखन, भाषेचा बाज विशेष आवडला, ओढून ताणून ग्राम्य केलेले एकही वाक्य नाही.
लोक काय म्हणतील यापायी दोन तरण्या जीवांसाठी शेजबंदीचा बोजा क्रूर वाटला.
6 Nov 2022 - 2:04 pm | यश राज
कथा आवडली. शेवटाला छान कलाटणी दिलीत.
6 Nov 2022 - 2:11 pm | प्रदीप
पण शेवट थोडा हुकलेला वाटला.
6 Nov 2022 - 5:22 pm | चष्मेबद्दूर
पहिलीच कथा वाचायला घेतली आणि शेवटपर्यंत खिळवून ठेवलं तिनं. मस्त !!
6 Nov 2022 - 8:38 pm | प्राची अश्विनी
आवडली गोष्ट.
6 Nov 2022 - 8:48 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
वाह मजा आली. ग्रामीण कथेचा बाज उच्च. एकदा कथावाचायला सुरुवात झाली की माणूस आनंद टोकाच्या पायरीवरच येऊन थांबतो. एकापेक्षा एका सरश शब्दांनी कथा उत्तम फुलली आहे. कथेत रंगलो, रमलो तोच 'ध्येयविधेय' शब्दाने गतिरोधकावर गाडी अचानक आदळली. पण, आता एवढं तेवढं चालायचंच. कथेचं एकेक पान उलटून कथा वाचत पुढे जातांना जंगमाबरोबर 'तारीचं' जुगाड जमतंय, जमावं असं एकदा वाटलं. पण तसं झालं असतं तर, मागे एक आपली एक कथा होती त्या वळणावर ही कथा गेली असती, असे वाटले. पण आता, एवढं तेवढं चालायचंच. तर, कथेच्या शेवटी कथा काही तरी वेगळे वळण, काही अनपेक्षित धक्का देईल असे वाटले. पण, शेवट तर इतका अध्यात्मिक वळणावर गेला की गुत्त्यावर चाललेला माणूस थेट ऋषि वगैरे, साधु-सन्याशीच होऊन परत यावा इतका तो अध्यात्मिक उंचीवर गेला. हं आता एवढं तेवढं चालायचंच. पण, दिवाळी अंकातल्या तुमच्या या ग्रामीण कथेने एक वाचक म्हणून मोठा आनंद दिला. हं आता....
-दिलीप बिरुटे
6 Nov 2022 - 10:03 pm | आग्या१९९०
छान कथा. खूप वर्षांनी ' गोडी श्येव ' वाचनात आला. कोकणात खाजा म्हणतात.
7 Nov 2022 - 5:19 pm | पाषाणभेद
वेगळ्याच वळणाची कथा, बिचारी तारा.
7 Nov 2022 - 7:10 pm | स्मिताके
छान कथा. ग्रामीण भाषेचा बाज खूप आवडला. कथा मस्त उत्कंठावर्धक वेगात पुढे गेली. पण तोडगा फार कडक.. काहीतरी साधी, मजेशीर हिकमत निघावी असं वाटत होतं.
7 Nov 2022 - 8:00 pm | सन्जोप राव
प्रतिसादाबद्दल सर्वांचे आभार.
7 Nov 2022 - 9:34 pm | मुक्त विहारि
शेवट आवडला
7 Nov 2022 - 10:20 pm | सुक्या
सुंदर !!!
8 Nov 2022 - 12:35 pm | अरुण मनोहर
उत्तम भाषा आणि वातावरण निर्मिती
8 Nov 2022 - 2:58 pm | स्वधर्म
रावसाहेब, अप्रतिम कथा! कितीतरी दिवसांनी कसदार वाचल्याचा अनुभव आला. आणि आमच्या सांगली, इच्चकरंजी (इचलकरंजी नव्हे) कोलापूरकडची (कोल्हापूर नव्हे) भाषा म्हणजे दुधात साखरच किवो!!
शेवट आवडला. जुन्या काळात ‘लोक काय म्हणतील’ यापाय़ी अशा किती माऊल्या उभा जन्म वनवास भोगून गेल्या असतील याची ददात नाही. डोळे पाणावले.
8 Nov 2022 - 4:34 pm | सौ मृदुला धनंजय...
सुंदर कथा . ग्रामीण भाषा वाचायला खूपच मजा आली.
8 Nov 2022 - 6:32 pm | सोत्रि
सन्जोप राव, बस्स नाम ही काफी है!
झकास जमलीय कथा.
- (सन्जोप रावांचा पंखा) सोकाजी
9 Nov 2022 - 10:43 am | सस्नेह
अस्सल ग्रामीण बाजाची सकस कथा !
अलिकडे मिपावर दुर्मिळ झालेल्या दर्जेदार, सशक्त लेखनाच्या पार्श्वभूमीवर हा लेख अगदी भावला.
जुने मिपाकर लिहिते झाले हे पाहून आनंद झाला.
9 Nov 2022 - 11:12 am | श्वेता२४
गावाकडं असंच होतं. नवरा बायकोचे एकमेकांवरचे जिवापाड प्रेम रंगवले आहे तो शेवट खूप भावला.
9 Nov 2022 - 8:18 pm | टर्मीनेटर
सुरेख कथा...नेहमीप्रमाणेच 👍
9 Nov 2022 - 10:55 pm | पॉइंट ब्लँक
खरतर सकाळीच कथा वाचली होती.
ग्रामीण भागातील जीवनाचे बारकावे, तिथल्या परंपरा, वाट्याला आलेले सुखदूखाचे क्षण, गावाकडच्या भाषेत प्रभावीपणे मांडण्याची लेखकाची ताकद शब्दगानिक जाणवत होती. जीवाला चटका देण्याची ताकद, कारुण्याचा परिणामकारक वापर आणि शेवटी दिलेले मस्त वळण ह्या सगळयाच कौतुक वाटून ही मनाला समाधान वाटलं नाही. कथा नीट समजलीच नाही असं सारखं वाटत राहिलं. दिवसभर डोकेफोड केल्यावर , थोडफार समजलं असा वाटतंय. ते बहुदा अस असावं -
सर्व पात्रांच्या आयुष्यात होणाऱ्या घटना कुठल्याच पात्रांच्या हातात नाही , मग ती तारी असो, तिचा बाप असो किंवा तिचा नवरा सुबास. जणू एक वेगळी शक्तीच सगळा खेळ मांडून बसली आहे आधीपासून. डोंगरा एवढं मोठे दुःख आयुष्यात त्याच शक्तीने आणून ठेवलं. पण अब्रू वाचवायाला पुन्हा त्याच शक्तीच्या नावाचा घ्यावा लागलेला आधार !!!
इतकी मस्त खोली आहे ह्या कथेमध्ये. आणि अंध्याऱ्या किर्र रात्री मध्ये सुद्धा कमावणारे काजवे समाधानाचे छोटे क्षण घेवून येतात. ते वेचता आले की घोर संकटात ही तग धरून राहता येते हे तत्वज्ञान छान मांडले आहे. बहुदा समजून घेण्यासाठी अजून बरच काही असेल कथेत , कधी तेवढी अक्कल येईल माहिती नाही.
10 Nov 2022 - 7:26 am | तिमा
रावांची कथा उत्तम असणारच, म्हणून वाचायला घेतली. पण सदोष फाँटमुळे सगळीकडे र हा ट सारखा दिसत असल्याने वाचताना त्रास झाला. यांत रावांची काहीच चूक नाही. संपादकांनी अजूनही लक्ष घालावे.
10 Nov 2022 - 12:46 pm | गोरगावलेकर
आवडली कथा
11 Nov 2022 - 10:21 am | तुषार काळभोर
अशी एक अस्सल मातीतली देशी कथा असल्याशिवाय दिवाळी अंक वाचल्याचा फील येत नाही!
12 Nov 2022 - 6:09 am | सुखी
संजोपराव, इथे लिहिते झाल्याबद्दल खूप आभार...
एकदम जोरकात लिवलाय, दंडवत घ्या __/\__
12 Nov 2022 - 12:45 pm | आलो आलो
छान रंगवली आहे कथा सशक्त ग्राम्य लेखन नेहमीच मन प्रफुल्लित करते .
14 Nov 2022 - 5:59 am | सौन्दर्य
कथा एकदम सुंदर. र हे अक्षर ट सारखे दिसत असल्यामुळे सुरवातीला थोडा त्रास झाला पण नंतर त्याची सवय झाली. काही शब्द अजिबातच कळले नाहीत, ध्येयविधेय, आलास, आकणी वगैरे. तरी देखील वाक्याच्या संदर्भाने अर्थ लावले.
आता थोडा टेक्निकल प्रश्न. सुभाष नामर्द होता म्हणजे त्याचा स्पर्म काउंट कमी होता का मिलनाची क्रिया करायला तो असमर्थ होता ? जर मिलनाची क्रिया करायला तो असमर्थ होता तर ते त्याला आधीच कळायला पाहिजे होते त्यामुळं त्याने लग्न करणे चुकीचे होते. जर त्याचा स्पर्म काउंट कमी होता असे धरले तरी तो तारीबरोबर गुपचूप शरीर संबंध ठेवूच शकला असता. त्याने जरी त्यांना मुले झाली नसती तरी दोघांची शारीरिक भूक भागली असती. तारीला भर तारुण्यात असा वनवास भोगायला लागला नसता.
कथा एकदम हृदयस्पर्शी आणि नेहेमीपेक्षा एका वेगळ्याच वाटेने घेऊन जाणारी.
14 Nov 2022 - 6:27 am | फारएन्ड
जबरदस्त कथा आहे. कथा आणि शैली दोन्ही छान.
14 Nov 2022 - 11:42 am | विवेकपटाईत
मस्त आवडली
15 Nov 2022 - 2:17 pm | श्वेता व्यास
अस्सल ग्रामीण बाजातली कथा आवडली.
15 Nov 2022 - 6:50 pm | विनिता००२
भाषेचा बाज फार आवडला. एकदम मामाच्या गावाला गेल्यासारखे वाटले. सांगलीला!
पात्रे छान उभी केलीत.सौंदर्य म्हणतात तेच म्हणते..दोघांना सुखाचा संसार नक्कीच करता आला असता...
16 Nov 2022 - 9:47 am | सन्जोप राव
कथा लिहीत असताना एका वळणावर आली की मग पुढे काय व्हावे हे लेखकाच्या हातात असत नाही. खानोलकरांच्या एका पात्राला पांगळा का केलं असं त्यांना पुलंनी विचारलं होतं तेंव्हा खानोलकर म्हणाले होते की मी केलं नाही, तो पांगळा झाला.
स्टिंडबर्ग म्हणतो तसं, Shallow people demand variety – but I have been writing the same story throughout my life, every time trying to cut nearer the aching nerve.
तारी आनि सुबास यांच्या मीलनाची सुखांतिका झाली असती तर ही दुखरी नस लांबच राहिली असती.
असो.
26 Nov 2022 - 10:05 pm | विनिता००२
हे खरंय....कथा कशी पुढे जाईल ते आपल्या हातांत नसते....
3 Dec 2022 - 10:50 am | ज्ञानोबाचे पैजार
आवडली गोष्ट आणि शेवट विषेश आवडला
पैजारबुवा,