आईस्क्रीम!

उगा काहितरीच's picture
उगा काहितरीच in जनातलं, मनातलं
7 Sep 2022 - 9:45 am

उण्यापुऱ्या ६०-७०-८० वर्षांचं आयुष्य आपलं. त्यातही जवळजवळ १/३ झोपेतच जाते. बाकी तर हिशोब सोडूनच द्या. जेव्हा पहिल्यांदा समज येते बहुतेकजण शाळेतच असतात. काही लोक कदाचित कॉलेज मध्ये वा पन्नाशीतही असू शकतात तो भाग निराळा !
त्या वयात मौज मजा म्हणजे काय हो मित्रांसोबत मनसोक्त खेळायला मिळणे, हातगाडीवर मिळणारे आइस्क्रीम खाणे, कधी मिळालेच तर रेस्टॉरंट मध्ये वडिलांसोबत जाऊन मसाला डोसा खाणे बस ! पण नाही एवढ्या साध्या गोष्टीचे पण काही परिणाम असू शकतात नाही का? दहावी / बोर्ड वगैरे राक्षस पण असतातच मानगुटीवर बसलेले. एकदा दहावी होऊ दे रे मग काय कॉलेज मध्ये कर जेवढी मौजमजा करायची ते. असं बहुतेक लोकांनी १००% ऐकलेल आहेच. असो कसबस १० वी होतं पार. कॉलेज मध्ये पोचल्यावर पहिले १-२ महिने तर गांगरलेलेच असतात. नक्की काय चालू आहे ते समजण्यातच १-२ महिने निघून जातात. तोपर्यंत कुठल्यातरी परीक्षेची चाहूल लागते आणि मौजमजा बाजूला ठेऊन अभ्यास करावा लागतो. कुणाला नुसती चाहूल लागली तरी पुरेसं असतं तर कुणाला १-२ गुणपत्रिका पालकांपर्यंत पोचल्यावर जाग येते. परत चालू होतो १२ वी, प्रवेशपरीक्षाची तयारी वगैरे. "हे बघ ! तुला चांगल्या कॉलेजमध्ये मेडिकल इंजिनियरिंग ला प्रवेश हवा असेल ना तर आत्ताच मेहनत घे. एकदा प्रवेश मिळाला की मग निवांत आहे सगळ" पालकांकडून मिळणारं गाजर अस अपग्रेड झालेलं असतं. पोहोचतो मग आपण पण इंजिनीयरिंग मध्ये. कदाचित पहिल्यांदाच पालकांपासून दूर, गावापासून दूर. इथे एका वेगळ्याच दुनियेशी ओळख होते. जेव्हा पाहिजे तेव्हा कॅन्टीन मध्ये बसता येते. दारू/सिगारेट शी निदान तोंडओळख तरी होते. एक दोन KT लागल्या की नोट्स वगैरे कुठून मिळतील वगैरे पण कळून जाते. आता पालकांच्या दबावापेक्षा YD वगैरे झालो तर हे स्वातंत्र्य मिळणार नाही ही जाणीव होते आणि रात्रीचा दिवस करून /रट्टा मारून / पास व्हावंच लागते. या सगळ्यात पदवीचे ३-४ वर्ष कसे उडून जातात ते अजिबातच कळत नाही. पुन्हा गाजर अपग्रेड: एकदा स्वतः च्या पायावर उभा रहा मग कुणीच काही म्हणणार नाही. कदाचित आपल्याला ही घरून पैसे घेण्याची लाज वाटणे चालू झालेलं असतं. मित्रांना चांगल्या ठिकाणी जॉब लागल्यावर त्यांचा तोंडून सतत त्याच्याच गोष्टी चालू झालेल्या असतात. आपलंही इंटरव्ह्यू देणं चालूच असतं म्हणा! २-३ कदाचित २०-३० ही ठिकाणी इंटरव्ह्यू दिल्यावर एका ठिकाणी होतं कसतरी. पगार थोडा कमी असला तरी अनुभव चांगला मिळणार असतो म्हणून आपणही थोडी माघार घेऊन करतो जॉईन. आणि मग आपण प्रवेश करतो एका कधीही न तोडता येणाऱ्या चक्रव्युव्हात! २-५ वर्षे जातात हातात १-२ स्विच होतात, बऱ्यापैकी पैसा येतो हातात. जास्त मेहनत केली तरच इथे टिकून राहता येते हे कळून जाते आणि तरच पैसे मिळतात हे पण कळते. या सगळ्यांमध्ये मौज मजा कुठेतरी राहूनच जाते. लहानपणी जो मसाला डोसा खाऊन स्वर्ग मिळाल्याची भावना येत होती तसाच मसाला डोसा नाईलाजाने रोज नाश्त्याला खावा लागतो.
दरम्यान कुणीतरी आवडलेलं असतं नाहीतर पालक काहीतरी हालचाल करीतच असतात. हो नाही करता करता एक नवीन व्यक्ती येते आपल्या आयुष्यात. थोडं प्रेम थोडं भांडण आणि ४-५ वर्ष जातात. एखादं नवीन आयुष्य पण होतं चालू आणि मग आपण पण दाखवतो जुनं गाजर नवीन वेष्टनात !
असेच दिवस जातात आणि कधीतरी लक्षात येतं... अरे! त्या गाडीवरच्या आइस्क्रीम पासून खूप दूर आलोय की.....!

मुक्तकविरंगुळा

प्रतिक्रिया

शेखरमोघे's picture

8 Sep 2022 - 12:01 am | शेखरमोघे

सर्वच लेखन आवडले. वरकरणी "आहे, चाललय, आयुष्य जाते आहे पुढे पुढे" अशा अगदी चाकोरीतल्या लिखाणाची punch line ("गाडीवरच्या आइस्क्रीम पासून खूप दूर आलोय की") जबरदस्त!

कर्नलतपस्वी's picture

8 Sep 2022 - 6:31 am | कर्नलतपस्वी

अरे! त्या गाडीवरच्या आइस्क्रीम पासून खूप दूर आलोय की.....!
खरेतर लहान आसतो तेव्हा आईबापाची जबाबदारी असते मुल आपल्या पायावर उभे राहील. पुढे स्वतःवर स्वतःची व इतरांची जबाबदारी. मग आईबाप या जगातून प्रयाण करतात,मुलं आपल्या पायावर उभी असतात. एवढच काय बायकोला सुद्धा आपली गरज नसते.

एवढ सगळं पार केल्यावर सेवा निवृत्ती येते. आपली कुणाला जरूर नाही असे दिसुन येते आणी तिथून पुढे खरी मजा चालू होते. स्वतःच आयुष्य सुरू होते. याचवेळेस मनुष्य विचार करतो आता काय जगून उपयोग.

अरे ही तर खरा स्वतःसाठीच जगायची वेळ परमेश्वराने माणसाला दिली आहे.

विचार करा.

अरे ही तर खरा स्वतःसाठीच जगायची वेळ परमेश्वराने माणसाला दिली आहे.>>>+१११

कुमार१'s picture

8 Sep 2022 - 11:14 am | कुमार१

मग आपण पण दाखवतो जुनं गाजर नवीन वेष्टनात !

>>> +११

चौथा कोनाडा's picture

8 Sep 2022 - 11:25 am | चौथा कोनाडा

खरं आहे... जीवनाचा असा धाकधुकीचा प्रवास सुरूच राहतो... लहानसहान सुखांपासून पासून वंचित होत जातो...

जसे जसे त्यापासून दूर जायला लागतो तास तशी त्यातली त्यावेळी चाखलेली गोडी अस्वस्थ लागते, उगाच काहीतरी म्हणून आपण दुर्लक्ष करू शकत नाही... कारण त्यातच खरं सुख आहे

मुक्त विहारि's picture

8 Sep 2022 - 9:12 pm | मुक्त विहारि

एक साधं वाक्य आहे.

वर्तमान काळांत जगा.

सस्नेह's picture

13 Sep 2022 - 9:44 pm | सस्नेह

आवडलं :)
स्नेहा

सौन्दर्य's picture

13 Sep 2022 - 10:59 pm | सौन्दर्य

छान लेख, अगदी समर्पक.

'लहानपण देगा देवा' हे हवेसे वाटते कारण त्या वयात फक्त अभ्यास, थोडीफार शिस्त एव्हढीच अपेक्षा असते आपल्या आईवडिलांना. दोन वेळेच्या जेवणाची (बहुतेककरून) आपल्यावर जबाबदारी पडलेली नसते. त्यामुळे ते जेवण आणून द्यायला आपल्या आई-वडिलांना कराव्या लागणाऱ्या कसरतीची आपल्याला कल्पना नसते. पण जसजसे मोठे होत जातो जबाबदाऱ्या, अपेक्षा वाढत जातात व त्या पूर्ण करण्यासाठी सतत झटावे लागते. मग त्या झटापटीत अनेक साध्या साध्या गोष्टी निसटून जातात किंवा मिळाल्या तरी त्यात पूर्वीसारखा आनंद लाभत नाही. थोडक्यात जबाबदाऱ्या व आनंद ह्यांचे आपल्या जीवनातले प्रमाण व्यस्त झाले असते ते जाणीवपूर्वक समं करावे लागते तरच आनंद लाभतो.