आईस्क्रीम!
लेखनविषय (Tags)
लेखनप्रकार (Writing Type)
उण्यापुऱ्या ६०-७०-८० वर्षांचं आयुष्य आपलं. त्यातही जवळजवळ १/३ झोपेतच जाते. बाकी तर हिशोब सोडूनच द्या. जेव्हा पहिल्यांदा समज येते बहुतेकजण शाळेतच असतात. काही लोक कदाचित कॉलेज मध्ये वा पन्नाशीतही असू शकतात तो भाग निराळा !
त्या वयात मौज मजा म्हणजे काय हो मित्रांसोबत मनसोक्त खेळायला मिळणे, हातगाडीवर मिळणारे आइस्क्रीम खाणे, कधी मिळालेच तर रेस्टॉरंट मध्ये वडिलांसोबत जाऊन मसाला डोसा खाणे बस ! पण नाही एवढ्या साध्या गोष्टीचे पण काही परिणाम असू शकतात नाही का? दहावी / बोर्ड वगैरे राक्षस पण असतातच मानगुटीवर बसलेले. एकदा दहावी होऊ दे रे मग काय कॉलेज मध्ये कर जेवढी मौजमजा करायची ते. असं बहुतेक लोकांनी १००% ऐकलेल आहेच. असो कसबस १० वी होतं पार. कॉलेज मध्ये पोचल्यावर पहिले १-२ महिने तर गांगरलेलेच असतात. नक्की काय चालू आहे ते समजण्यातच १-२ महिने निघून जातात. तोपर्यंत कुठल्यातरी परीक्षेची चाहूल लागते आणि मौजमजा बाजूला ठेऊन अभ्यास करावा लागतो. कुणाला नुसती चाहूल लागली तरी पुरेसं असतं तर कुणाला १-२ गुणपत्रिका पालकांपर्यंत पोचल्यावर जाग येते. परत चालू होतो १२ वी, प्रवेशपरीक्षाची तयारी वगैरे. "हे बघ ! तुला चांगल्या कॉलेजमध्ये मेडिकल इंजिनियरिंग ला प्रवेश हवा असेल ना तर आत्ताच मेहनत घे. एकदा प्रवेश मिळाला की मग निवांत आहे सगळ" पालकांकडून मिळणारं गाजर अस अपग्रेड झालेलं असतं. पोहोचतो मग आपण पण इंजिनीयरिंग मध्ये. कदाचित पहिल्यांदाच पालकांपासून दूर, गावापासून दूर. इथे एका वेगळ्याच दुनियेशी ओळख होते. जेव्हा पाहिजे तेव्हा कॅन्टीन मध्ये बसता येते. दारू/सिगारेट शी निदान तोंडओळख तरी होते. एक दोन KT लागल्या की नोट्स वगैरे कुठून मिळतील वगैरे पण कळून जाते. आता पालकांच्या दबावापेक्षा YD वगैरे झालो तर हे स्वातंत्र्य मिळणार नाही ही जाणीव होते आणि रात्रीचा दिवस करून /रट्टा मारून / पास व्हावंच लागते. या सगळ्यात पदवीचे ३-४ वर्ष कसे उडून जातात ते अजिबातच कळत नाही. पुन्हा गाजर अपग्रेड: एकदा स्वतः च्या पायावर उभा रहा मग कुणीच काही म्हणणार नाही. कदाचित आपल्याला ही घरून पैसे घेण्याची लाज वाटणे चालू झालेलं असतं. मित्रांना चांगल्या ठिकाणी जॉब लागल्यावर त्यांचा तोंडून सतत त्याच्याच गोष्टी चालू झालेल्या असतात. आपलंही इंटरव्ह्यू देणं चालूच असतं म्हणा! २-३ कदाचित २०-३० ही ठिकाणी इंटरव्ह्यू दिल्यावर एका ठिकाणी होतं कसतरी. पगार थोडा कमी असला तरी अनुभव चांगला मिळणार असतो म्हणून आपणही थोडी माघार घेऊन करतो जॉईन. आणि मग आपण प्रवेश करतो एका कधीही न तोडता येणाऱ्या चक्रव्युव्हात! २-५ वर्षे जातात हातात १-२ स्विच होतात, बऱ्यापैकी पैसा येतो हातात. जास्त मेहनत केली तरच इथे टिकून राहता येते हे कळून जाते आणि तरच पैसे मिळतात हे पण कळते. या सगळ्यांमध्ये मौज मजा कुठेतरी राहूनच जाते. लहानपणी जो मसाला डोसा खाऊन स्वर्ग मिळाल्याची भावना येत होती तसाच मसाला डोसा नाईलाजाने रोज नाश्त्याला खावा लागतो.
दरम्यान कुणीतरी आवडलेलं असतं नाहीतर पालक काहीतरी हालचाल करीतच असतात. हो नाही करता करता एक नवीन व्यक्ती येते आपल्या आयुष्यात. थोडं प्रेम थोडं भांडण आणि ४-५ वर्ष जातात. एखादं नवीन आयुष्य पण होतं चालू आणि मग आपण पण दाखवतो जुनं गाजर नवीन वेष्टनात !
असेच दिवस जातात आणि कधीतरी लक्षात येतं... अरे! त्या गाडीवरच्या आइस्क्रीम पासून खूप दूर आलोय की.....!
प्रतिक्रिया
सर्वच लेखन आवडले. वरकरणी "आहे
चक्रव्युह
अरे ही तर खरा स्वतःसाठीच
छान !
खरं आहे... जीवनाचा असा
भावना छान व्यक्त केल्या आहेत ....
छान लिहिलंय.
छान लेख