जंगली जयगड ट्रेक २२.०५.२०२२

Primary tabs

Vivek Phatak's picture
Vivek Phatak in भटकंती
9 Aug 2022 - 7:09 pm

जंगली जयगड ट्रेक २२.०५.२०२२

जंगली जयगड हा किल्ला अतिशय घनदाट वनश्रीने नटलेल्या Koyna Wild Life Sanctuary (Koyna WLS) मधे वसलेला आहे. सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील नवजा हे किल्याचे पायथ्याचे गाव. १०-१५ घरांचे अतिशय सुंदर टुमदार गाव. प्रत्येक घरापुढे अंगण, अंगणात फणस, आंबे, पेरू आणि भरपूर फुलझाडे. नवजा हे तेच गाव जिथे गेल्या पावसाळ्यात एका दिवसात देशातील सर्वाधिक पाऊस पडला होता आणि अनेक ठिकाणी दरडी कोसळल्या होत्या. अजूनही गावातील लोक ह्या पावसाळ्यात काय होईल ह्या भीतीच्या छायेत आहेत.

.

.

.

गावातून किल्यावर जाण्यासाठी आधी दोन किलोमीटर पर्यंत डांबरी रस्त्याने जावे लागते. त्यानंतर किल्ल्याकडे जाणारी घनदाट जंगलातील पायवाट सुरू होते. नुकताच मान्सून पूर्व पाऊस होऊन गेला होता. आताही माथ्यावर ढग होते, जंगलात सर्वत्र दाट धुकं दाटले होते. वातावरण धुंद होते. आम्ही मे महिन्यात मान्सून ट्रेकचा अनुभव घेत होतो. पावसामुळे पायवाटेवरील पालापाचोळा ओलसर झाला होता त्यामुळे जळवांचा सुळसुळाट होता. इथल्या जळवा आकाराने, मागच्या कोळेश्वर ट्रेक (वाई तालुका) मधे अनुभवलेल्या जळवांपेक्षा मोठ्या होत्या. माझ्यासकट आमच्या ग्रुप मधल्या बऱ्याच जणांना त्यांचा प्रसाद मिळाला. माझ्या हातावर जळू कशी काय चढली कळलंच नाही. काही वेळाने माझ्या arm sleeves कडे माझे लक्ष गेलं तेव्हा ते रक्ताने माखले दिसले. ते काढून फेकुनच द्यावे लागले. मला ह्या गोष्टीचे अजिबात sensation झाले नाही. असो.

.

.

.

.

ह्या जंगलात बिबटे आणि अस्वलं मोठ्या प्रमाणात आढळतात. बऱ्याच वेळेस बिबटे गावात येतात, पण त्यांच्याकडून गावकऱ्यांना काहीही त्रास झाला नसल्याचे आमचा गाईड रणजित सांगत होता. किल्यावर जाण्यासाठी वनखात्याची पूर्व परवानगी घ्यावी लागते. गावातून किल्यावर जाण्यासाठी १.३०/२ तास लागतात. गडाला तटबंदी किंवा मुख्य द्वार वगेरे असे काही नाही. वर एक ठाणाई देवीचे पडझड झालेले मंदिर आहे. जंगलातून वर आल्यावर डोंगर धारेवरून वाटचाल करत आपल्याला गडमाथ्यावर जावे लागते. काही ठिकाणी पायवाट अगदीच निमुळती आणि घसरडी आहे त्यामुळे थोडी काळजी घ्यावी लागते.

.

.

.

.

.

गडमाथा अगदीच लहानसा आहे. धुके असल्यामुळे माथ्यावरून काहीच दिसत नव्हते. पण थोड्याच वेळात उन पडले आणि निसर्गाने आपला खजिना आमच्या समोर रिता केला. आमचे अहो भाग्य की आम्हाला इंद्रवज्राचे दर्शन झाले. माथ्यावरून कोळकेवाडी जलाशय, वाशिष्ठी नदी, कुंभार्ली घाट, कोंकणकडा, लांबवर दिसणारे चिपळूण आणि सह्याद्रीची उत्तुंग डोंगररांग ह्याचे मनोहारी दर्शन होते. आम्ही माथ्यावर जातानाच एक फुरसे बाजूच्या गवतात अदृश्य झाले. त्यामुळे अर्ध लक्ष खाली पायाच्या आजू बाजूलाच ठेवावे लागत होते. मनसोक्त फोटोग्राफी करून, निसर्गाचा भरभरून आस्वाद घेऊन खाली उतरायला सुरवात केली.

.

.

.

.

.

एव्हाना ११/११.३० होत आले होते. उतरताना जळवांच्या कचाट्यातून वाचण्यासाठी जंगलवाट अतिशय वेगात म्हणजे अगदी अर्ध्या तासातच उतरलो. कारण जेवढे तुम्ही एकाजागी थांबाल तेव्हढे जळवांना पायावर चढायला वाव मिळतो. खाली उतरल्यावर आमचे गाईड रणजित उतेकरकडे मस्त जेवण केलं आणि दोन वाजेच्या सुमारास पाथरपुंज गावाकडे भैरवगडला जाण्यासाठी आमच्या बसने निघालो.

.

.

.

.

बसमध्ये बसल्याबसल्या गाढ झोप लागली. तासाभराने जाग आली ती बसच्या खडखडाटाने. आमची बस चालली होती दगडधोंड्यांच्या लाल मातीच्या कच्च्या एकेरी रस्त्याने. ह्या भागात माणसांचा किंवा वाहनांचा क्वचितच वावर दिसत होता. आजूबाजूला कोणती वस्तीही नव्हती. चढाच्या आणि दगड धोंड्यांच्या रस्त्यावर बसच्या तोंडाला फेस येत होता. एका पॉईंटला आम्ही सगळे बाशितून उतरून पायी प्रवास सुरू केला आणि रिकामी बस आमच्या मागून हळूहळू येऊ लागली.

.

.

.

.

उन एकदम कडक होते. पण आकाशात थोडे ढगही होते त्यामुळे पावसाचा काही नेम नव्हता. मनात शंका येत होती की आता जर पाऊस आला तर आमची बस त्या लाल ओल्या घसरड्या मातीवरून चालणार कशी? बरं, शेवट पर्यंत चालत जायचे ठरवले तर अजुन ७-८ किमी बाकी होते आणि त्यानंतर भैरवगडाची चढाई/उतराई. संध्याकाळ होत आली होती. आजूबाजूला दाट जंगल. माणसांचा वावर शून्य. वेळेचं गणित तर अजिबातच जुळत नव्हते. त्यामुळे सर्वानुमते परत फिरण्याचा निर्णय झाला. त्यामुळे आता वेळ हाताशी होता. येताना जंगलाचा ३/४ किमीचा भाग आम्ही चालत जाण्याचे ठरवले. वाटेतच हरणटोळ आणि शेकरूचे दर्शन झाले. फोटोग्राफी झाली. करवंदाच्या जाळीत करवंदांचा, जांभळाच्या झाडाखाली जांभळाचा आणि बरोबर आणलेल्या कलिंगगडांचा मनसोक्त आस्वाद घेत भरपूर टाईमपास केला. पाटणला चहा घेऊन उंब्रज मार्गे हायवेला लागलो. वाटेत एका हॉटेलला जेऊन, पुण्यात पोचलो तेव्हा रात्रीचा दीड वाजला होता.

.

.

प्रतिक्रिया

मुक्त विहारि's picture

9 Aug 2022 - 8:31 pm | मुक्त विहारि

मस्तच

कर्नलतपस्वी's picture

10 Aug 2022 - 2:09 pm | कर्नलतपस्वी

मस्त वर्णन थरार फोटो.

मार्कस ऑरेलियस's picture

11 Aug 2022 - 2:13 pm | मार्कस ऑरेलियस

ट्रेक अप्रतिम . फोटोही भन्नाट !

पण

आपण हा ट्रेक कसा केला ? जंगली जयगड हा आता इकॉलॉकिकली रेड झोन मध्ये असल्याने तिथे कोणालाही प्रवेश करायची परवानगी नाही. अगदी वनविभागाची परवानगी घेऊन देखील नाही ! परवानगी देतच नाहीत.
आणि ही ऐकीव गोष्ट नाही , माझ्या जवळच्या ओळखीतील एकांना ग्रुपसोबत ट्रेक करत असताना पकडले होते जंगली जयगड वर . नेहमी प्रमाणे चिरीमिरी घेऊन सोडले नाही, रीतसर गुन्हा दाखल केला, आणि जामीन वगैरे केल्यावरच सोडले होते . लय महागात पडला त्यांना तो ट्रेक. आणि हो तो संपुर्ण ग्रुप माळकरी होता , दारु, सिगारेट , मटण , हत्यारे वगैरे काहीही नव्हते. केवळ जंगलात प्रवेश केला म्हणुन गुन्हा दाखल केलेला. पेपरात फोटो वगैरे !!
:(

आमच्या ट्रेक leader ने रीतसर परवानगी घेतली होती. आमच्या ग्रुप शिवायही एक ग्रुप आम्हाला वाटेत भेटला. कदाचित पावसाळ्यात परवानगी देत नसतील.

कंजूस's picture

11 Aug 2022 - 5:04 pm | कंजूस

सातारा /चिपळूण ?

हा किल्ला सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यात आहे. पायथ्याचे गाव नवजा.