अमरनाथ यात्रा-बेचाळीस वर्षापूर्वीची -१

कर्नलतपस्वी's picture
कर्नलतपस्वी in भटकंती
6 Aug 2022 - 3:46 pm

जुलै-ऑगस्ट महिना सुरू झाला की कश्मीर मधील अमरनाथ यात्रेच्या बातम्या सुरू होतात. बेचाळीस वर्षापुर्वी केलेल्या यात्रेची आठवण जरूर येते. यावर्षी जवळचे एक नातेवाईक अमरनाथ यात्रेला चालले होते. माझ्या अनुभवा बद्दल विचारत होते. अर्थात तेव्हाच्या व आताच्या परिस्थितीची तुलनाच करू शकत नाही. आता भरपुर सुखसोई पण तरीदेखील यात्रा अजूनही कठीण आहे. यानिमित्त काही आठवणी व नातेवाईकांनी पाठवलेले आताचे त्यांच्या यात्रेचे फोटो आपल्या समोर मांडत आहे.

सन ऐंशी मधे काश्मीर खोरे शांत होते, पर्यटक बिनधास्त नंदनवनात फिरू शकत होते.शहरी भागात बर्‍यापैकी सोई उपलब्ध होत्या. ग्रामीण भागात विज,बँक,दळण वळणा सारख्या मुलभूत सोईंचा वानवाच होता.असामाजिक तत्त्व संघटित होण्यास सुरवात झाली होती.सेने बद्दलचा द्वेष शहरी भागात जाणवत होता.ग्रामीण भागात स्थानीक लोक बरेचसे सेनेवर अवलंबून आसायचे, क्षयरोग निर्मुलन, निशुल्क वैद्यकीय सेवा,रोजगार इत्यादी साठी सेनेवरच निर्भर होते.सेनेला सुद्धा मजुर, पोनी (तट्टू),पोर्टर(हमाल) यांच्या करता स्थानिकांची मदत लागायची.गावात वातावरण सौहार्दपूर्ण होते.

बदली झाल्यापासून काही महीने रस्ता बंद होता.डब्बाबंद पदार्थ,प्राणवायूची कमतरता, शारीरिक व्यायाम व इतर हालचाल कमी, परिणामी अग्निमांद्य,पोटात आपान वायूचे वाढते प्रमाण,घरून येणारा पत्रव्यवहार खंडीत झाल्यामुळे थोडी चिंता,थोडी उदासी आशा काही कुरबुरी पण सगळेच समदुःखी.

नोव्हेंबर ते फेब्रुवारी पर्यंत डाकसेवा हेलीकॉप्टरने,प्रतीकुल हवामाना मुळे ती सुद्धा विस्कळीत.बर्फ वितळण्यास सुरूवात झाली,दाट धुक्याची चादर विरळ होत होत संपून गेली.आंगावरचे कपड्यांचे ओझे बर्‍यापैकी कमी झाले.पाच किलोच्या पाढंर्‍या स्नो बुटांची जागा चामड्याचे बुट अॅकंल (Ankle) ने घेतल्यामुळे खुपच हल्के वाटत होते.हळुहळू "फुट काॅलम " सुरू झाला आणी काही दिवसांनी दळण वळण.घरून पत्र व्यवहार सुरळीत झाला. सुट्टीवर जाण्यासाठी दोनच महीने राहीले होते. मनावरचे मळभ थोडे कमी झाले.

आसो,दिवस मस्त चालले होते. शिशीर संपून वसंत वैभव चहूकडे पसरू लागले होते.आता ती जागा नंदनवन वाटत होती. उतारावरील भात खाचरातून हिरवे कोबं हळूच डोकावू लागले होते. कांगडी आणी फिरन मधले निरुद्योगी गावकरी साध्या पठाणी पोशाखात भात खाचरात खपताना दिसून येत होते.

अस्थिर आयुष्याची सवय झाली होती, कधीही कुठेही जायचा हुकुम यायचा.
जरूरी सामान सतत जवळ आसायचे.टाॅर्च, स्लीपिंग बॅग,स्नो गाॅगल्स,काचेची बाटली, बिस्कीट, चिवडा इत्यादी.फौजी हॅवरसॅक (Backpack) आणी मुख्य म्हणजे " हाऊस वाईफ" तर आवश्यकच.आजच्या सारख्या पाठीवर टांगत्या बॅगा नव्हत्या.

थोडे विषयांतर,सेनेत मिळणार्‍या सर्व गोष्टी अतीआवश्यक आणी आत्मनिर्भर करण्यासाठी मिळतात. त्या काळात शर्ट पॅन्ट ला गुंड्या बटणे आसायची. दुर्गम भागात कधी कपडे फाटतील याचा नेम नाही मग त्यासाठी एकतर घरवाली किंवा कमीतकमी सुई दोरा,बटणे जवळ ठेवावी लागत.सदा सर्वदा घरवाली तर बरोबर नसणार म्हणून सुया, दोऱ्याचे रीळ,छोटी, मोठी हिरव्या रंगाची बटणे आणी स्टिच बटणे हिरव्या रेक्झीनच्या पाकीटा मधे व्यक्तिगत वापरा साठी मीळायची. हाऊस वाईफ हे त्या पाकीटा करता किती समर्पक नाव आहे नाही.

कशमीर खोर्‍यातील प्रत्येक प्रवास म्हणजे एक वेगळाच अनुभव. कामा निमित्त खुप प्रवास झाला. तीन वर्षांच्या वास्तव्यात दोनदा यमधर्माशी गाठभेट झाली."कसा आहेस? विचारले,पण घरी चल नाही म्हणाला".

काही तातडीच्या कामानिमित्त उधमपुरला चाललो होतो.थंडीमुळे "फुटकाॅलम" जात आसताना अचानक वरून बर्फाचा कडा कोसळला,नऊ लहान थोरांना सोबत घेऊन गेला.माझ्यात आणी यमदुतात दहा एक पावलाचे अंतर आसावे. दोन महिन्या नंतर बर्फ वितळले आणी मगच मृतदेह बाहेर काढता आले.

दुसरी भेट, सुट्टीवरून परत येताना झाली. टेन टनर (टाट्रा) गाडीतून परत युनिट मधे येत होतो. एका तीव्र वळणावर ती अजस्र गाडी पलटी झाली. मी आणी ड्रायव्हरच होतो. गाडीच्या बाॅडी मधे डिझेलचे बॅरल भरलेले होते.थरार होता ,खुप काही शिकवून गेला.बाकी ढगफुटी जुन जुलै मधे एखाद दोन वेळेस निश्चीतच.

एक दिवशी हुकुम आला अमरनाथ यात्रेला ज्यांना जायचे त्यांनी नाव द्या. अमरनाथ बद्द्ल वाचले होते पण ती गोष्ट होती.वास्तव काय ते माहीत नव्हते.ट्रेकला जायचे म्हणून क्लिक थ्री कॅमेरा व मजबूत काठी बरोबर घेतली.त्या काळात कॅमेऱ्याची कार्यालयात नोदं करणे सुरक्षेच्या दृष्टीने अनिवार्य होते.त्या काळात 'गुगल' सारखे माध्यम नसल्यामुळे इतरांच्या अनुभवावर अवलंबून राहावे लागत असे.

प्रवास सुरू करण्या अगोदर थोडं इतीहासात डोकावून बघु.

कश्मीर ऋषी कश्यपांची भूमी, हिन्दू धर्मग्रंथात याचा उल्लेख आहे. भृगू ऋषींनी पहिल्यांदा अमरनाथ पवित्र गुफा शोधली असे म्हणतात.

अकराव्या शतकात लिहीलेल्या 'रजतरंगीणी' या पुस्तकात या पवित्र गुफेबद्दल माहीती मिळते.

François Bernier, फ्रेंच डॉक्टर औरंगजेबाबरोबर १६६३ मधे काश्मीर खोऱ्यात गेला होता. त्याने आपल्या 'Travels in Mughal Empire', पुस्तकात,'The paradise of the Indies' या नावा खाली कशमीर मधील विविध स्थळांबद्दल लिहून ठेवले आहे. अमरनाथ गुफे बद्दल तो लिहीतो,

"The grotto full of wonderful congelations is the Amarnath cave, where blocks of ice, stalagmites formed by dripping water from the roof ( छतावरून पाणी टपकल्याने शंकूच्या आकाराचे बर्फाचे स्तंभ ) are worshipped by many Hindus who resort here as images of Shiva...."
-पान क्रमांक ४१८

श्री वाल्टर रुपर्ट लाॅरेन्स,I.C.S, C.I.E., कशमीर आणी जम्मू वसाहतीचे प्रथम कमिशनर,१८४६ ते. सर लाॅरेन्स लिहीलेल्या "The Vally of Kashmir", १८८९ मधे प्रकाशित झालेल्या पुस्तकात अमरनाथ गुफा आणी तीचा इतीहास याचे सविस्तर वर्णन करताना तत्कालिन समाज जीवनावर विस्तृत प्रकाश टाकला आहे. त्यांनी लिहीले आहे,

'Shrawan Drádashi, or the twelfth day of the waxing moon of the month Sawan, is the day on which rites are performed for children who died before they received the sacred thread. and on this day the bereaved mothers flock to a spring called Kapál Mochan at Batpura in the Shupiyon Tahsil to intercede for their lost ones. Puran Mashi, the full moon of the Amarnath and worship the snow linga, which gradually melts away after month Sawan, is the day when pilgrims must reach the distant cave ofthe Puran Mashi.
-पान क्रमांक २६६-६७

आपल्या पुस्तकात ते पुढे लिहीतात,

The most famous places are the Amamath cave, which lies far away up the Liddar valley, and the Ganga-Bal lake, which rests deep and still under the terrible snow-capped Haramukh. To Ganga-Bal the Hindus resort after the death of a parent, and fling the kunckle-bones(अस्थी) which the funeral pyre has spared into the deep waters. The road is difficult, as early snow sometimes overtakes the pilgrims, and delicate women and children often perish from exposure. Amarnath cave attracts pilgrims from all parts of Kashmir and India, and they swarm there in thousands. After a preliminary visit to Khir Bhawani of Tula Mula, the army of pilgrims musters in Srinagar and proceeds by appointed marches to Amarnáth, which must be reached on the full moon of Sawun (beginning of August). They must bathe at appointed places, and they pass through sacred Mach Bawan, which ranks next after Khir Bhawani of Tula Mula in sanctity. At Mach Bawan the army is joined by the Pandits of that place, and further up the valley the Malik family of Batkot takes charge of the procession. These Maliks are bound to keep the difficult mountain path in order, to carry sick pilgrims, and to see that no property is stolen. But at the head of the procession goes Lal Gir Sadhu of Amritsar, and as each day's journey comes to an end Lal Gir Sadhu encamps in front. He must enter the sacred cave first. The offerings at the cave are divided into three parts-one goes to Lal Gir Sadhu, one to the Pandits of Mach Bawan, and one to the Maliks of Batkot. But as the Maliks are not allowed to enter the cave they do not receive their fair share of the offerings. The tale has been told to me by the Maliks of the late Maharaj Ranbir Singh disguising himself as a villager and stealing a march on the Amritsar Sidhu. When the pilgrims arrived they found the Maharaja seated in the cave, and though the Maliks enjoyed the incident the Hindus regarded it as a dangerous breach of precedent. When the pilgrims have bathed in the lake of Shisha Nag two marches have yet to be made before the sacred cave is reached. Then the pilgrims, covering their nakedness with strips of birch-bark(भुर्जपत्र वृक्षाची साल), call on Shiva to appear,and if God is propitious pigeons flutter out from the cave.

-पान २९८,९९

बालटाल पर्यंत आडिचशे कि.मी.चा प्रवास फौजी गाडीनेच करायचा होता.सकाळीच पॅक नाष्टा घेतला. अती दुर्गम भागात खाण्या पिण्याच्या गोष्टी बरोबर ठेवणे अती आवश्यक.कुठे थांबावे लागेल याचा नेम नाही.सात वाजता गाड्यांचा काफीला नीघाला. क्राॅस कन्ट्री रोड,दहा हजार फुट खडी चढाई, साठ-बासष्ट तीव्र वळणे आणी जलेबी मोड, तेवढेच अंतर खाली उतरणे. पहिला पडाव चौकीबाल बेस कॅम्प मधे होता.

बेस कॅम्प मधे दुपारचे जेवण घेतले व पुढील प्रवास करता प्रस्थान केले. पुढील रस्ता नागमोडी घाटाचा जरी आसला तरी पक्का डांबरी त्यामुळे फारसा काही अवघड नव्हता.एक दोन ठिकाणी चहापानाला, पाय मोकळे करण्या साठी गाड्या थांबल्या.संध्याकाळी सात साडे सातच्या सुमारास बालटाल कॅम्प मधे पोहोचल्या.गरम गरम जेवण झाले थोडे कॅम्प मधे फेरफटका मारला पण थंडी, बोचरा वारा, काळाकुट्ट अंधार,चिमण्या कंदील टिमटीमत होत्या.त्यामुळे विचार अर्धवट सोडला आणी बराकीत परतलो.

सुचने प्रमाणे सकाळीच लवकर जायचे होते.पहाटे साडेचारला उठलो.सगळीकडे निरव शांतता होती.कॅम्पच्या मागेच सिंध नदी,गान्दरबल जिल्ह्यातील एक प्रमुख नदी,माचोड ग्लेसियर मधून निघून पुढे झेलम दर्यात मीसळते.ही ती मुख्य सिंधू नदी नव्हे.खळ खळ वाहणार्‍या पाण्याचा लयबद्ध आवाज येत होता. दाट काळोखात चंद्राचे शितल चांदणे हुडहूडी भरणाऱ्या थंडीत भर घालत होते.

आंघोळी करता सामान घेतलं आणी दोन तीन मित्रांबरोबर नदी कडे निघालो. खाच खळगे,चढ उताराचा रस्ता,ठेचा खात,नदी किनारी पोहोचलो.पर्वतीय नदी होती,पात्र बरेच मोठे होते,पाण्याची धारही तेज होती.वाहून आलेल्या दगड गोट्यांनी आमचा चांगला पाहुणचार केला. पुढील प्रवासाची कल्पना आली. ग्लेसियर मधून वहात आलेल्या थंडगार पाण्यात आंघोळी उरकल्या. सुस्ती गेली. बराकीत परतलो, नाष्टा तयार होता. गरम गरम चहा पिला आणी पुरी भाजी बांधून घेतली. ठिक सहा वाजता कॅम्प सोडला व सिंध नदीच्या काठाने पायी प्रवास सुरू केला.

-क्रमशः

तळटीप- संदर्भात दिलेली दोन्ही पुस्तके अंतरजालावर चकटफू उपलब्ध आहेत.

भाषांतर व शुद्धलेखनाच्या चुका कमी करण्यासाठी पुस्तकातून तसेच्या तसेच डकवला आहेत.

प्रतिक्रिया

कपिलमुनी's picture

6 Aug 2022 - 4:26 pm | कपिलमुनी

पुभाप्र

शाम भागवत's picture

6 Aug 2022 - 5:23 pm | शाम भागवत

+१

अनिंद्य's picture

6 Aug 2022 - 9:12 pm | अनिंद्य

चांगली सुरूवात,

पु. भा. प्र.

विवेकपटाईत's picture

7 Aug 2022 - 9:07 am | विवेकपटाईत

लेख आवडला. माझ्या आईने 1974 मध्ये अमरनाथ यात्रा केली होती. त्यावेळी अनेक अडचंनींना सामोरे जावे लागले होते. पण यात्रा सकुशल संपन्न झाली.

मुक्त विहारि's picture

7 Aug 2022 - 9:01 pm | मुक्त विहारि

पुढच्या भागाच्या प्रतिक्षेत ....

प्रचेतस's picture

8 Aug 2022 - 7:04 am | प्रचेतस

एकदम भारी सुरुवात.
पुढचा भाग लवकर येऊ द्यात. ४२ वर्षांपूर्वीच्या काळाच्या परिप्रेक्ष्यातून ही यात्रा अनुभवणे रोचक ठरेल.

कॅलक्यूलेटर's picture

8 Aug 2022 - 11:36 am | कॅलक्यूलेटर

वा मस्त सुरुवात. पु. भा. प्र.

निनाद's picture

8 Aug 2022 - 12:12 pm | निनाद

तुमचे लिखाण फार छान ओघवते आहे.

दोनदा यमधर्माशी गाठभेट झाली

हे दोन्ही किस्से विस्ताराने यायला हवे होते हे नक्की! दोन्हीवर एक एक स्वतंत्र लेख यायला हवा...

ज्ञानोबाचे पैजार's picture

8 Aug 2022 - 4:50 pm | ज्ञानोबाचे पैजार

पुभाप्र
पैजारबुवा,

खेडूत's picture

8 Aug 2022 - 4:54 pm | खेडूत

खूपच छान.!
फोटो दिलेत तर त्या काळात कशी परिस्थिती होती याची आणखी चांगली कल्पना येईल.

कर्नलतपस्वी's picture

8 Aug 2022 - 5:45 pm | कर्नलतपस्वी

@खेडूत भौ, फोटूची पण एक वेगळीच गंमत आहे पुढील भागात वाचा.
@कपिलमुनी,वामन भागवतजी,अनिंद्द माऊली,निनाद, प्रचेतसजी, मुवी, कॅल्क्युलेटर जी सर्वाचे
प्रतिसादाबद्दल मनापासून धन्यवाद.
पुढचा भाग फोटोसहित जास्त माहितीपुर्ण व रोचक वाटेल आशी आशा करतो.

टर्मीनेटर's picture

8 Aug 2022 - 7:20 pm | टर्मीनेटर

"हाऊस वाईफ" भारीच 😀

कशमीर खोर्‍यातील प्रत्येक प्रवास म्हणजे एक वेगळाच अनुभव.

+१०००
पुढील भागाच्या प्रतीक्षेत!

Nitin Palkar's picture

22 Aug 2022 - 8:15 pm | Nitin Palkar

खूपच सुरेख वर्णन!

Sanjay Sahasrabuddhe's picture

21 May 2023 - 10:39 pm | Sanjay Sahasrabuddhe

मी पण १९७७ मधे बलताल मार्गे केली होती,
जे अ‍ॅन्ड के (मिल्शीया) कृपेने.
टाट्रा मधे सुद्धा प्रवास झाला आहे.
आपण सांगितलेली दोन्ही प्रकाशने मी काही वर्षांपूर्वी अर्काइव्हज मधून डाऊनलोड केली आहेत.
प्रवाही रहा.

कर्नलतपस्वी's picture

22 May 2023 - 2:25 pm | कर्नलतपस्वी

जे अॅण्ड के मिल्शिया आता रेग्युलर युनीट आहे. जे अॅण्ड के लाईट इन्फन्ट्री. हायली डेकोरेटेड युनिट.

प्रतिसाद दिलात धन्यवाद.

कर्नलतपस्वी's picture

22 May 2023 - 2:27 pm | कर्नलतपस्वी

संजय सहस्त्रबुद्धे, टंकण्यात चुक झाली.

शशिकांत ओक's picture

22 May 2023 - 3:39 pm | शशिकांत ओक

सन १९७३ ऑगस्ट...
स्क्वाड्रन लीडर अग्रवाल यांना १ विंगच्या स्टाफ व्हिजिट कार्यक्रमात बायको, मुलांसह बरोबर अमरनाथ यात्रा करायला जायची सुरसुरी होती. मी तेंव्हा पायलट ऑफिसर होतो. म्हणून माझ्या बॉसनी चुणचुणीत जूनियर म्हणून मला पुढे केले. म्हणून मी जरा जबरदस्तीने तयार झालो. बालटालचा मार्ग तेंव्हा खूप सूनसान असे. काही ठिकाणी ३ फुटाच्या रुंदीत जाणाऱ्या आणि समोरून येणाऱ्या घोडेस्वारांना घशटून जाताना थंड हवेत घाम फुटत होता. एका हातात कंदिल दुसर्‍या हातात लाठी टेकवत रात्री अनेक जात असत असे ऐकून होतो. अनेक ठिकाणी घोड्यावरून उतरून बर्फाळ वाटेत कुर्र कुर्र करताना पाय सटकत होते. कडक उन, क्षणात जोरदार पावसाची सर असे झेलत बर्फानी बाबाचे दर्शन झाले... म्हणजे काय तो बर्फ लोकांनी हात फिरवून फिरवून पार नष्ट झालेला होता. पण ती यात्रा यासाठी आठवणीत राहीली कारण एक बंगाली आमच्या बरोबर परतत असताना अती श्रमामुळे बसल्या बसल्या झापड येऊन घोड्यावरून तोल जाऊन खाली पडला. तो खाईतच जायचा पण एक पाय रिकिबीत अडकला म्हणून लटकून राहिला. नंतर कसाबसा वर काढला होता...!
नंतर अनेक वर्षे लोटली. १९९७ साल होते. एका रेस्क्यू ऑपरेशन साठी हेलीकाप्टरने आम्हाला अमरनाथच्या पायथ्याशी सोडले गेले. तेव्हा खूप छान दर्शन झाले होते...! तेव्हाचा किस्सा फारच हृदय स्पर्षी होता. नंतर सादर करेन...