जिलचे देवदूत

पर्णिका's picture
पर्णिका in जनातलं, मनातलं
23 Jul 2022 - 4:36 am

एखादा वीकांत निवांत मिळावा, कामाच्या आठवड्याच्या व्यस्त दिनक्रमांपेक्षा सर्वार्थानेच निराळा यांसारखे सुख नाही. दोन-तीन महिन्यांतून एकदा असा योग जुळून येतोही. त्यावेळी मला मनसोक्त बागकाम करणे, विशलिस्टमधील बरेच दिवस खुणावणारे पुस्तक बे विंडोच्या आरामशीर बैठकीत बसून वाचणे, जवळपासच्या ठिकाणांना भेटी देणे, नाहीतर बरेच दिवस न केलेली ट्रेल करणे या आणि अशा बऱ्याच गोष्टी करायला आवडतात. मागच्या महिन्यांत अगदी ध्यानींमनीं नसतांना, " अरे! हा तर लंब वीकांत आहे." असा साक्षात्कार झाला. खरे तर आपण सर्वचजण सुट्ट्यांची नेहेमीच आतुरतेने वाट पाहत असतो, त्यानुसार नियोजनही करत असतो. पण Juneteenthची ही सुट्टी मागील वर्षांपासूनच नव्याने मिळत असल्याने अजिबात लक्षात आले नव्हते. मग काय विचारता? या तीन दिवसांत काय करता येईल बरें? याचे विचारचक्र डोक्यांत वेगाने सुरु झाले. महिन्यापूर्वीच, १० दिवसांची भरगच्च अशी कौटुंबिक सहल झाली असल्याने पुन्हा प्रवास करायची फारशी उत्सुकता नव्हती. त्यापेक्षा, घरीच आराम करू, एखादे छानसे पुस्तक वाचू, एखाद्या संध्याकाळी सर्वजण मिळून मस्त बोर्डगेम खेळू इकडेच सर्वांचा कल दिसत होता. नवऱ्याचे आणि मुलांचेही त्यांच्या मित्रमंडळींसोबत आधीच शनिवार-रविवारचे प्लॅन ठरले होते. असा हा 'निवांत वीकांत'चा अनपेक्षित, सुखद धक्का मिळाल्यामुळे माझी 'आनंद पोटात माझ्या मावेना!' अशीच स्थिती झाली होती आणि शुक्रवारची मी मोठ्या उत्साहाने वाट पाहू लागले. 
 
त्यानंतरचा कार्यालयीन दिवस नेहेमीपेक्षा जास्तच धावपळीचा गेला. थोडासा थकवाही आला होता, आता मस्त कॉफी घ्यावी, असा विचार करतच होते एव्हढ्यात माझा फोन वाजला. 
“Hey Parna, if you don’t have any plans for this Saturday yet, I’ve already planned something for all of us.” माझ्या जीवलग मैत्रिणीशी, क्रिस्टीशी थोडा वेळ बोलून फोन ठेवला अन मगाशी आलेली मरगळ कुठल्या कुठे पळून गेली. कारण होते अर्थात आमच्या ग्रुपने शनिवारी ठरवलेला एक आगळावेगळा प्लॅन. आमचा ग्रुप म्हणजे क्रिस्टी, मी, जेनिफर, सौम्या, आणि रचेल. शाळेच्या एका कार्यक्रमांत मुलांच्या मित्रांचे पालक म्हणून आम्ही भेटलो आणि आमचीही मैत्री फुलली. क्रिस्टी आणि जेनिफर गेली कित्येक वर्षे PTAच्या महत्वाच्या पदांवर कार्यरत आहेत. शाळेत विविध यशस्वी उपक्रमांचे आयोजन करण्यात त्यांचा कायम पुढाकार असतो. तर झाले असे होते की ८-१० दिवसांपूर्वी आमच्या भागांत मोठे वादळ आले होते. त्यांत अनेक घरांचे प्रचंड नुकसान झाले होते. अनेक सेवाभावी संस्था, स्थानिक लोक आपणहून या लोकांच्या मदतीसाठी पुढे येत होते. जवळच्याच एका छोट्याशा गांवातील काही कुटुंबांना मदत करण्यासाठी क्रिस्टीने आमच्या ग्रुपची स्वयंसेवक म्हणून नोंद केली होती. क्रिस्टी आणि जेनिफर या दोघींमुळे यापूर्वी अशा अनेक सामाजिक उपक्रमांत आम्ही भाग घेतला होताच. तसेच, या वादळामुळे झालेले नुकसान यांविषयी रोज बातम्या येतच होत्या. त्यांमुळे, मदत करण्याची ही संधी आम्हा कुणालाच सोडायची नव्हती. 

आमच्या ठिकाणापासून सुमारे ४० मैलांवर असलेल्या त्या गांवात आमचा ग्रुप शनिवारी सकाळी साधारण आठ वाजता पोहोचला. उन्हाळ्याचे दिवस असल्याने ३-४ तास काम करायचे आणि नंतर दुपारचे जेवण तिथेच घेऊन परत थोडेफार काम करून घरी परतायचे, असा प्लॅन ठरला होता. आमच्यासारखेच अनेक ग्रुप तिथे आले होते. आजूबाजूच्या इतर घरांच्या दुरुस्तीचे काम सुरु होते. काही जण झाडांच्या तुटलेल्या फांद्या, इतर कचरा उचलत होते. तर काही घरांचे छप्पर (रुफिंग) व्यवस्थित केले जात होते. आम्हीही संस्थेच्या नोंदणी डेस्कवर जाऊन आमची ओळखपत्रे घेतली. सैन्यातून निवृत्त झालेला स्टीव्ह आणि त्याची पत्नी जिल या दोघांना मदत करण्याचे काम आमच्या ग्रुपला दिले गेले होते. त्यांच्या घराभोवतीचे लाकडी कुंपण, आवारांतील टूल शेड आणि स्टोअरेज रूम यांची दुरुस्ती आणि थोडीफार साफसफाई अशा स्वरूपाची ही मदत होती. आमचे सेफ्टी किट (या किटमध्ये मास्क, ग्लोव्हज, antibacterisal wipes, पाण्याच्या बाटल्या, स्नॅक्स अशा काही गोष्टी असतात) घेऊन, आम्ही स्टीव्ह आणि जिलच्या घराकडे निघालो. cul-de-sac वर असलेले ते एक छोटेसे टुमदार घर होते. नुकत्याच आलेल्या वादळाच्या काही खुणा दिसत होत्या. मात्र घरापुढे लावलेली सुंदर फुलझाडे, छोटी शोभेची झाडे, पुढील व्हरांड्यात असलेले सुरेख फर्निचर अशा अनेक गोष्टींतून घरमालकाच्या अभिरुचीची झलक दिसत होती. जिल आमची वाट पाहतच होती. साधारण सत्तरीतील, निळ्या डोळ्यांची जिल अत्यंत प्रेमळ आणि बोलकी होती. आमची ओळख करून दिल्यावर तिने आम्हांला मागच्या अंगणात नेले आणि आमच्या कामाचे स्वरूप थोडक्यांत सांगितले. घराच्या मागील बाजूस असलेले ते टूल शेड आणि दुसऱ्या बाजूला असलेली सामान ठेवायची एक मोठी खोली यांचे वादळांत बरेच नुकसान झालेले दिसत होते. दुरुस्तीपूर्वीची स्वच्छता करावयाचे काम आम्हाला दिले होते. “We’re lucky, dear. The storm didn’t hit our home directly.  Just this tool shed, storage room and some backyard stuff were damaged. And look at my little vegetable and herb patch! It stood well. ” कोबी-गाजर, पार्सली, बेझिल अशा भाज्या लावलेला छोटासा वाफा आम्हांला दाखवत जिल बोलत होती. थोडा वेळ आमच्याशी बोलून, 'काही लागले तर मला सांगा.', असे सांगून ती घरांत गेली. आम्हीही कामाला लागलो. वादळात तुटून पडलेल्या फळ्या, दरवाजा, इतर काही वस्तू आम्हाला एका भल्या मोठ्या ट्रॅश कंटेनरमध्ये नेऊन टाकायचा होत्या. मी व जेनिफर त्या खराब झालेल्या वस्तू एका छोट्या Wheelbarrowमध्ये भरत होतो आणि नंतर क्रिस्टी-रचेल त्या ढकलगाडीतील वस्तू रस्त्यावर असलेल्या मोठ्या कंटेनरमध्ये नेऊन टाकत होत्या. तर सौम्या बऱ्यापैकी सुस्थितीत असलेल्या वस्तू बाजूच्या एका खोलीत नेऊन ठेवत होती. दुसऱ्या दिवशी, तिथेच नव्याने बांधकाम करण्यासाठी इतर काही स्वयंसेवक येणार होते. आमचे हे काम झाले की घराभोवतीच्या लाकडी कुंपणालाही  आम्हाला रंग द्यायचा होता. 

आम्ही आमचे काम सुरु करून साधारण तास-दीड तास झाला असेल,  इतक्यात " How are my young helpers doing today?" असे अभिवादन खणखणीत आवाजांत ऐकू आले. व्हीलचेअरवर बसलेला, प्रथमदर्शनी थोडा करारी वाटणारा स्टीव्ह हात उंचावून आम्हांला बोलावत होता. आम्हीही, आमचे काम थांबवून "Doing good! How are you?" असे म्हणत त्याच्याशी थोडे बोलायला घराच्या मागच्या व्हरांड्याकडे निघालो. तोपर्यंत जिल आमच्यासाठी अगदी ताजं लिंबाचे सरबत आणि खाऊ घेऊन आली. आम्हा सर्वांना तहान तर लागलीच होती. ते थंडगार सरबत पीत आम्ही त्यांच्याबरोबर थोडा वेळ गप्पा मारल्या. हजरजबाबी, मिश्किल स्टीव्हशी बोलतांना हसू आवरत नव्हते. देखणी, उत्साही जिल तर पाहताक्षणीच आवडली होती. ते दोघे एकमेकांशी बोलतांना, काळजी घेतांना पाहून त्यांच्या चार-पाच दशकांच्या समृद्ध सहजीवनाची सहजच जाणीव होत होती. त्यांचे एकमेकांवरील प्रेम, अभिमान आणि सर्वात महत्वाचे म्हणजे त्या दोघांच्या चेहऱ्यावरील असलेली तृप्तता पाहून एक वेगळेच समाधान वाटत होते.

त्या जोडप्याशी बोलून म्हणा, किंवा मग लिंबू सरबतानेही असेल आम्ही पाचही जणी पुन्हा एकदा जोमाने कामाला लागलो. स्टीव्ह आणि जिल दोघेही आत-बाहेर करत, आमच्याशी संवाद साधत होते. प्रखर बुद्धीमत्ता, सद्य सामाजिक-राजकीय परिस्थितीचे ज्ञान, समृद्ध अनुभव विश्व आणि जीवनाकडे बघण्याचा सकारात्मक दृष्टिकोन यांचेच स्वच्छ प्रतिबिंब त्यांच्या बोलण्यातून सतत जाणवत होते. नुकतेच मोठे वादळ त्यांच्या परिसरांत येऊन गेले होते, थोड्याफार प्रमाणांत त्याची झळ या वृद्ध जोडप्याला लागली होतीच, मात्र त्यांच्या बोलण्यांत कुठलीही नकारात्मकता नव्हती. अशी माणसे आपल्या आजूबाजूला असली की आपल्यातही एक प्रकारची ऊर्जा संचारते. बघता बघता, पुढील दोन-तीन तासांत ते अंगण बऱ्यापैकी स्वच्छ दिसू लागले. तोपर्यंत, जेवणाचीही वेळ होत आली होती. संस्थेतर्फे तर जेवणाची सोय केलेली होतीच, शिवाय त्या नेबरहुडमधील रहिवाशीही फळे, पिझ्झा, सँडविचेस, कोल्ड बीअर, ज्यूस, कपकेक्स, एनर्जी बार्स असे अनेक खाद्यपदार्थ स्वयंसेवकासाठी घेऊन आले होते. शारीरिक श्रमाने भूक तर सपाटून लागली होती, पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे आम्ही थकलेलो नव्हतो. जमलेल्या इतर स्वयंसेवकांशी गप्पा मारत आम्ही दुपारचे जेवण घेतले. यापूर्वीच्या उपक्रमांत भेटलेले ओळखीचे चेहरे पाहून छान वाटले, काही नव्याने ओळखी झाल्या. संस्थेच्या सभासदांनी पुढील काही आठवड्यांत नियोजित केलेल्या सेवाभावी उपक्रमांची थोडक्यांत माहिती दिली. हळू हळू सर्वजण परत कामाला लागले. आम्हीही जिलच्या घराकडे निघालो. आता, तिच्या घराभोवतीचे लाकडी कुंपण रंगवण्याचे काम करायचे होते.

क्रमशः

कथा

प्रतिक्रिया

समृद्ध करणारे अनुभव,वाचत आहे.

तुषार काळभोर's picture

23 Jul 2022 - 8:13 am | तुषार काळभोर

प्रेरणादायी.

मुक्त विहारि's picture

23 Jul 2022 - 1:57 pm | मुक्त विहारि

सकारात्मक लेख...

पुढच्या भागाच्या प्रतिक्षेत

पर्णिका's picture

23 Jul 2022 - 10:08 pm | पर्णिका

धन्यवाद, भक्ती, तुषार, आणि मुक्त विहारि !
हो, पुढील भाग टाकते लवकरच...

सुखी's picture

23 Jul 2022 - 10:35 pm | सुखी

खूप छान

पर्णिका's picture

25 Jul 2022 - 7:29 am | पर्णिका

प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद, सुखी.

..... एनायारने एनायारांसाठी लिहीलेला, एनायारांना(च) नीट कळेल असा हा एनायार धागा आहे, असे 'ह्यांचे' म्हणणे.
...... घाटकोपरच्या एकाद्या चाळीत, पिंपरी - चिंचवडच्या अमूक बीयचकेत, झुमरीतल्लैयाच्या एकाद्या वस्तीतील वाचकांनाही कळेल, रुचेल, वाचावासा वाटेल, अश्या रितीने हाच धागा पुन्हा एकदा लिहून बघायला हरकत नाही, असेही 'ह्यांचे' म्हणणे.
..... लेखात उल्लेखित क्रिस्टी, जेनिफर, सौम्या, रचेल इत्यादि देवदूतांचे आणि स्टीव्ह-जिल या दांपत्याचे, cul-de-sac वर असलेल्या त्यांच्या छोट्याश्या टुमदार घराचे, तसेच 'नुकत्याच आलेल्या वादळाच्या काही खुणा' वगैरेंचे फोटो देऊन लेखाची रंजकता वाढवता येईल, तसेच ही ज्या देशातील्/प्रांतातील घटना आहे, त्यासंबंधी थोडी माहिती, फोटो, नकाशे, चित्रे वगैरे सुद्धा देता येतील, असेही 'ह्यांचे' म्हणणे.
........ बाईसाहेब फुरसुंगीकर.

आपला मौल्यवान वेळ खर्चून माझे अनुभवकथन काळजीपूर्वक वाचले, त्यावर सविस्तर प्रतिक्रियाही दिली. याबद्दल धन्यवाद, चित्रगुप्त.