मलाक्काच्या सामुद्रधुनीवर नजर

पराग१२२६३'s picture
पराग१२२६३ in काथ्याकूट
20 Jun 2022 - 1:45 pm
गाभा: 

भारताच्या दृष्टीने मलाक्काच्या सामुद्रधुनीचे सामरिक महत्त्व आहे. हिंदी आणि प्रशांत महासागरांना जोडणारा महत्त्वाचा जलमार्ग या चिंचोळ्या सामुद्रधुनीतून जात असल्याने अन्य देशांसाठीही हे क्षेत्र सामरिकदृष्ट्या महत्त्वाचे ठरत आहे. भारताचा आग्नेय तसेच पूर्व आशियाई देशांशी होणारा व्यापार याच जलमार्गाद्वारे चालतो. भारताने 'आसियान' संघटनेबरोबर मुक्त व्यापार करार केल्यापासून दोन्ही बाजूंदरम्यान आयात-निर्यात मोठ्या प्रमाणात वाढली आहे. आज भारताच्या एकूण आयातीमध्ये एकट्या मलाक्काच्या सामुद्रधुनीतील जलमार्गाद्वारे होणाऱ्या आयातीचे प्रमाण ४० टक्के आहे.

आधीच्या 'पूर्वेकडे पाहा' (Look East) धोरणामुळे भारताला मलाक्काच्या सामुद्रधुनीतील जलवाहतूक सुरक्षितपणे होत राहणे गरजेचे वाटते. त्यासाठी आता भारताने 'पूर्वेकडे कृती करा' (Act East) धोरण अवलंबले आहे. त्यामुळे मलाक्काच्या सामुद्रधुनीजवळ वसलेल्या अंदमान व निकोबार द्वीपसमूहावर भारताने भक्कम लष्करी संसाधनांची उभारणी सुरू केली आहे. अलीकडे चिनी नौदलाच्या हिंदी महासागरातील वाढलेल्या हालचालींमुळे तर ही गरज अतिशय तीव्रतेने जाणवू लागली आहे. या ठिकाणी २००१ पासून तिन्ही सैन्यदलांची संयुक्त 'अंदमान-निकोबार कमांड' कार्यरत आहे.

मलाक्काच्या सामुद्रधुनीच्या पश्चिम मुखाजवळ वसलेल्या ग्रेट निकोबार बेटावर उभारण्यात आलेल्या भारतीय नौदलाच्या हवाईतळाचे २०१२ मध्ये उद्घाटन करण्यात आले होते. आता तेथे नौदलाचे 'पी-८ आय' पाणबुडीविरोधी विमान कायमस्वरुपी तैनात आहे. या विमानाच्या मदतीने मलाक्काची सामुद्रधुनीवर नियमितपणे हवाई टेहळणी केली जात असून सर्व संशयास्पद हालचालींवर लक्ष ठेवले जात आहे. ग्रेट निकोबारवरील या धावपट्टीचा वापर हवाई दलाच्या अवजड तसेच लढाऊ विमानांसाठीही केला जाऊ शकणार आहे.

हिंदी महासागरातील सर्वांत मोठी नाविकशक्ती असलेल्या भारतीय नौदलाकडे या महासागराची प्रवेशद्वारे असलेल्या मलाक्का, होर्मुझ आणि बाब-एल-मांदेब या सामुद्रधुन्यांवर नियंत्रण मिळवत युद्धजन्य परिस्थितीत त्यांची नाकेबंदी करण्याची क्षमता आहे. या सर्व सामुद्रधुन्या भारतासाठी सामरिक दृष्टीने महत्त्वाच्या आहेत. त्यामुळे त्यांचा समावेश भारताच्या प्राथमिक सागरी हितांच्या क्षेत्रात करण्यात आलेला आहे. त्या सामुद्रधुन्यांद्वारे चालणारी भारताची व्यापारी वाहतूक सुरक्षित राहील यासाठी भारतीय नौदल सतत कार्यरत असते. भारतीय नौदलाच्या हिंदी महासागरातील प्रभावाची दखल घेत अमेरिकेने २००१ मध्ये मलाक्काच्या सामुद्रधुनीतून जाणाऱ्या आपल्या व्यापारी जहाजांना सुरक्षित मार्ग उपलब्ध करून देण्याचे आवाहन भारताला केले होते. त्यानंतर २०१५ मध्ये दोन्ही देशांमध्ये मलाक्काची सामुद्रधुनी आणि दक्षिण चीन सागरात शांतता आणि सुव्यवस्था राखण्यासाठी सहकार्य करार करण्यात आला आहे.

भारताचा मलाक्काच्या सामुद्रधुनीच्या प्रदेशावर कायम प्रभाव राहिला आहे. हिंदी महासागराचे पूर्वेचे प्रवेशद्वार असलेल्या या सामुद्रधुनीच्या माध्यमातून प्राचीन काळापासून भारताचे आग्नेय आशियाई देशांबरोबर व्यापारी, सांस्कृतिक संबंध राहिले आहेत. भारताच्या आग्नेय आशियाई देशांबरोबरील मैत्रीपूर्ण संबंधांमुळे भारतीय नौदलाविषयीही 'आसियान' देशांना विश्वास वाटत आहे. म्हणूनच ते देश तेथील सागरी प्रदेशात सुरक्षा आणि स्थैर्य राखण्यात अधिक सक्रीयपणे सहभागी होण्याचे भारताला आवाहन करत आहेत.

आज देशाच्या विकासासाठी हिंदी महासागरीय क्षेत्रात शांततामय आणि सुरक्षित परिस्थिती कायम राखण्यासाठी भारतीय नौदल 'नाविक राजनय', मानवीय मदतकार्य, युद्धसराव इत्यादींच्या माध्यमांद्वारे या महासागराच्या किनाऱ्यावरील देशांशी सतत देवाणघेवाण करत आहे. त्याचबरोबर संकटकाळात एखाद्या देशाला तातडीने मदत पुरवून या क्षेत्रातील आपला दबदबा भारतीय नौदल कायम राखत आहे.

मलाक्काच्या सामुद्रधुनीच्या परिसरातील सामुद्रीक परिस्थितीबाबत जागरूक राहण्याची आवश्यकता लक्षात घेऊन भारताने आग्नेय आियाई देशांशी द्वीपक्षीय सुरक्षाविषयक करार केलेले आहेत. त्यामुळे त्याला मलाक्काच्या सामुद्रधुनीत अधिक सक्रीयपणे लक्ष ठेवता येत आहे.

२००८ पासून सोमाली चाच्यांपासून आपल्या व्यापारी जहाजांची सुरक्षा करण्यासाठी एडनच्या आखातात चीन आपली युद्धनौका आणि पाणबुडी तैनात करत आहे. त्या युद्धनौका-पाणबुड्यांना विश्रांतीसाठी आफ्रिकेतील ड्जीबुटी देशात आपण सुविधा उभारत असल्याचेही चीनने स्पष्ट केले आहे. याबरोबरच पाकिस्तानच्या ग्वादर बंदराकडेही चीनच्या युद्धनौका आणि पाणबुड्यांची ये-जा वाढलेली आहे.

चिनी नौदलाच्या वाढत्या हालचालींमुळे भारताच्या हिंदी महासागरातील हितसंबंधांना आव्हान मिळत आहे. अशावेळी हिंदी महासागरातील आपले नाविक वर्चस्व कायम राखण्याच्या उद्देशाने मलाक्काच्या सामुद्रधुनीतून होणाऱ्या वाहतुकीवर सतत लक्ष्य ठेवण्याची गरज भारताला भासत आहे. त्यासाठी भारतीय नौदलाने या सामुद्रधुनीजवळच्या आंतरराष्ट्रीय जलक्षेत्रात आपली युद्धनौका कायमस्वरुपी तैनात केली आहे.

लिंक
https://avateebhavatee.blogspot.com/2022/06/blog-post_18.html

प्रतिक्रिया

निनाद's picture

21 Jun 2022 - 7:14 am | निनाद

हा मुद्दा अनेक स्तरीय आहे असे वाटते.

म्यानमारमधील क्यूकप्यु येथे चीन एक बंदर बांधत आहे. सिंगापूरचे नुकसान करण्यासाठी खोल सागरी बंदर बांधण्याची किंवा मलाक्का सामुद्रधुनीला बायपास करण्यासाठी क्रा ऑफ इस्थमसमधून कालवा काढण्याची पण चीनी योजना आहे. याशिवाय आसियान राष्ट्रांसाठी, चीन शेजारी, व्यापारी भागीदार आणि गुंतवणूकदार म्हणून फार मोठा आहे.

भारताचा विचार केला तर त्याची बाजू खूपच कमकुवत आहे. पण तरीही भारताने सितवे बंदराच्या बांधकामातही हातभार लावला आहे आणि म्यानमारमधील रस्त्याने आणि नदीच्या जोडणीद्वारे कोलकात्याला त्याच्या पूर्वेकडील मिझोराम राज्याशी जोडण्याचा आपला महत्त्वाकांक्षी कलादान मल्टी-मॉडल प्रकल्प पूर्ण करण्याच्या प्रक्रियेत आहे.

या शिवाय २०१८ मध्ये मोदींनी इंडोनेशियाला भेट दिली तेव्हा संरक्षण सहकार्य करार झाले आहेत. त्याचा भारताला फायदा मिळतो आहे.
पण यात सिंगापुरची भूमिका महत्त्वाची आहे असे वाटते. भारत आणि सिंगापूर हे या प्रदेशातील सर्वात महत्त्वाचे भागिदार आहेत. दोन्हीकडे ब्रिटनकडून वारशाने मिळालेल्या समान संस्था आहेत, तसेच अधिकृत भाषा म्हणून इंग्रजीचा वापर आहे. भारत आणि सिंगापूर दरम्यान उत्तम आर्थिक संबंध आहेत आणि सुरक्षिततेच्या मुद्द्यांवर करार आहेत. सुरक्षा मुद्द्यांवर वार्षिक मंत्रिस्तरीय आणि अधिकृत स्तरावरील संवाद तसेच सशस्त्र दलांच्या तिन्ही शाखांमध्ये कर्मचारी स्तरावरील चर्चा होते.

सिंगापूर आर्मी आणि एअर फोर्स प्रशिक्षणासाठी भारतीय सुविधांचा वापर करतात. दोन्ही देशांनी एकमेकांच्या तळांवर प्रवेश करण्यासाठी आणि युद्धनौकांसाठी परस्पर रसद सहाय्य प्रदान करण्यासाठी एक करार केला आहे.

याच वेळी चीन आणि मलेशिया दरम्यानही असेच करार झालेले आहेत से दिसते. म्हणते शह काट्शह यांचे राजकारण चालले आहे.

भारतासाठी आपले सागरी वर्चस्व कायम राखण्याच्या उद्देशाने मलाक्काच्या सामुद्रधुनीतून होणाऱ्या वाहतुकीवर लक्ष ठेवायला अंदमान आणि निकोबारच्या संयुक्त लष्करी कमांडचे महत्त्व खूप आहे. चिनी पाणबुडीच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी अमेरिकेने स्थापन केलेल्या फिश हूक नेटवर्कचा भारत भाग बनणार असल्याची चर्चा आहे - मात्र याची फारशी माहिती मिळत नाही.

या सर्वात भारताला आपले स्थान आणि या क्षेत्रावर आपले वर्चस्व राखायचे असेल तर आपली नौदल ताकद आहे त्यापेक्षा किमान चौपट करणे ही काळाची गरज आहे.
त्यामानाने मोठ्या भारतीय लष्करी नौकांचे उत्पादन होतांना मात्र दिसत नाही. काहीकाळा पूर्वी उदयगिरी आणि सूरत या दोन तूलनेने लहान नौका तयार केल्या आहेत. पण नौदलाला अशा सुविधांचा वेग या पेक्षा जास्त हवा हे नक्की आहे.

चौथा कोनाडा's picture

23 Jun 2022 - 5:55 pm | चौथा कोनाडा

माहितीपूर्ण धागा !
धन्यवाद !