*पहिला पाऊस*
नेहमीच्या दिमाखात तो अवतरलाच. किती दिवस हुलकावण्या देत होता.
संध्याकाळी आकाशात पसरलेल्या संधिप्रकाशानेच तो येतोय हे कळवलं, हलक्या वा-यांच्या गार झुळूकांनीच हळुच कानात सांगितलं 'तो येतोच आहे लवकरच'.हळुहळू मेघ दाटून आले, वारा सुसाट झाला. आणि..आणि...*तो आला*.
ढगांनी आता जोरात नगारे वाजवायला सुरूवात केली, विजांनीही टाळ्यांचा कडकडाट करत त्याचं स्वागत केलं..आणि भुईवरची माती तर..आनंदाने त्याच्या टपोरल्या थेंबांच्या गंधाने मोहभरीत होऊन..त्याचा गंध चहुकडे उधळीत सुटली, दिसेल त्याला त्या गंधाने वेडं करून टाकलं तिने..
अहाहा! सगळेच त्या मृद् गंधाने वेडावून गेले..धुंद झाले. हळव्या कविमनांना काव्य सुचू लागली, पाऊसवेडे भिजण्याचा आनंद घेत सुटले, प्रेमीजीव तर सचैल भिजण्या आतुर झाले..
झाडे पानोपानी शहारत पाऊसधारा झेलत तृप्त तृप्त होत राहिली.. धरती तर अंगोपांगी सुखावून त्याच्या प्रेमवर्षावात नहात राहिली....
उन्हाच्या काहिलीने तप्त झालेलं सगळंच वातावरण एकदम गारेगार झालं..धुंद फुंद झालं..
झाडे वेली पहिल्या पावसाचे तुषार झेलत आनंदाने डोलु लागले...
लहान मुले पावसात भिजून आनंदी झाली, आला आला " पहिला पाऊस"..!
-©️वृंदा
9/6/22
प्रतिक्रिया
10 Jun 2022 - 7:33 am | श्रीगुरुजी
छान लिहिलंय.
अवांतर - कोठे आला पहिला पाऊस? पुण्यात तर अजूनही थेंबभर सुद्धा नाही. हवामान खाते कायमचे बंद करावे अशी माझी मागणी आहे.
10 Jun 2022 - 9:33 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
हवामा ख्यात्यावर आमचं दळन इथे. सध्या पंजाबराव डख चांगले अंदाज व्यक्त करु लागले आहेत.
-दिलीप बिरुटे
10 Jun 2022 - 8:31 am | अनन्त्_यात्री
कायप्पावर म्हटल्याप्रमाणे " दोन दिवसापासून गाय छाप नरम पडू लागली तेव्हाच ओळखलं की पहिला पाऊस येऊ घातलाय"
10 Jun 2022 - 9:28 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
छान लिहिलंय. पहिला पाऊस अर्थात पहिली बारीश. पाऊस वर्षानुवर्ष आणि दरवर्षीच पडतो. अपवाद असतीलही. पण पहिल्या पावसाचा मृदगंध आणि आठवणी लैच भारी असतात. काल अजिंठ्याहून येतांना पहिला पाऊस लागला आणि गाडी थांबवून पहिल्या पाऊस अंगावर घेतला. आमच्याकडे पहिल्या पावसात भिजलं पाहिजे अशा सांगोवांगीच्या गोष्टी आहेत. आणि ७ जूनला मासे खाल्ले पाहिजेत. आम्ही खायच्या आणि पहिल्या पावसात भिजण्याच्या गोष्टी कशोशीने पाळतो.
-दिलीप बिरुटे
11 Jun 2022 - 9:38 pm | आग्या१९९०
लहानपणी उन्हाळ्यात घामोळ्या हमखास यायच्या. मुलांना पहिल्या पावसात भिजायला लावत, त्याने घामोळ्या बऱ्या होत. हल्ली मुलांमध्ये घामोळ्या प्रकार फारसा दिसत नाहीं.
10 Jun 2022 - 2:49 pm | अमरेंद्र बाहुबली
पहीला पाऊस आला की त्यावर कविता नी कथा येण्याची भिती असतेच. परा सरांनी ह्यावर मस्त लिहून ठेवलंय. अधिक माहीतीसाठी परा सरांचे समग्र मिपासाहीत्य ह्यावर टिचकी द्या.
11 Jun 2022 - 9:17 pm | सौन्दर्य
तुमच्या पहिल्या पावसाची 'रनिंग कॉमेंट्री' आवडली. आमच्या लहानपणी म्हणजे १९६५ - १९७०च्या काळात शाळा व पहिला पाऊस एकाच दिवशी हजेरी लावायचा तो म्हणजे ७ जूनचा दिवस. तो दिवस पुन्हा आठवला.