पुस्तक परिचय -पार्टनर: लेखक व. पु. काळे

सुजित जाधव's picture
सुजित जाधव in जनातलं, मनातलं
1 Jun 2022 - 4:44 pm

बऱ्याचदा असं होत की आपल्याला वाचायचं तर भरपूर असतं पण पुस्तक निवडताना गोंधळ उडतो. अश्यावेळी आपण पुस्तकांबद्दल आंतरजालावर माहिती मिळवण्याचा प्रयत्न करतो. अश्या लोकांना मदत व नव्या पिढीतील वाचकांना मराठीतील समृद्ध साहित्याची ओळख करून देण्याचा एक छोटासा प्रयत्न मी या लेखमालिकेच्या माध्यमातून करीत आहे. याआधी मी सुहास शिरवळकर यांचे 'समांतर' आणि आणि वपुंचे 'ही वाट एकटीची' या पुस्तकांचा परिचय करून दिला आहे. त्याचा दुवा खाली देत आहे.

पुस्तक परिचय: "ही वाट एकटीची" -- व. पु. काळे

पुस्तक परिचय "समांतर" लेखक- सुहास शिरवळकर

लेखकाविषयी चार ओळी

लेखक, कादंबरीकार, कथाकथनकार अशी ख्याती असलेल्या व.पु.काळे अर्थात वसंत पुरुषोत्तम काळे यांचा जन्म २५ मार्च १९३३ रोजी झाला. त्यांचे आपण सारे अर्जुन, गुलमोहर, गोष्ट हातातली होती, घर हरवलेली माणस, दोस्त, माझं माझ्यापाशी, पार्टनर, मी माणूस शोधतोय, वन फॉर द रोड, रंग मनाचे, वपुर्झा, हुंकार, प्लेझर बॉक्स असे पत्रसंग्रह, ललीतप्रकार खुपच प्रसिद्ध आहेत. तसेच तप्तपदी, ठिकरी व ही वाट एकटीची यासारख्या कादंबऱ्या खूपच गाजल्या. एकदम साधीसरळ शब्दरचना आणि जीवनातील तत्वज्ञान अगदी सहज सांगण्याची हातोटी ही वपुंच्या लेखणीची वैशिष्ट्ये. त्यांना महाराष्ट्र शासनाचा उत्तम लेखकाचा पु.भा.भावे पुरस्कार, फाय फाउंडेशनचा पुरस्कार आणि अमेरिकेत आयोजित करण्यात आलेल्या साहित्य संमेलनात अध्यक्षपद बहाल केले गेले होते. २६ जून २००१ रोजी ह्रदयविकाराच्या झटक्याने व. पु. काळेंचे मुंबईत निधन झाले.

पार्टनर

प्रत्येकाच्या आयुष्यात असा एक 'पार्टनर' असतो..ज्याच्यासोबत/जिच्यासोबत आपण आपले सुख-दुःख Share करतो... ती व्यक्ती आपल्याला संकटसमयी मार्गदर्शन करते, आपल्या सुखदुःखाचा भागीदार बनते…वपुंची 'पार्टनर' ही कथा पण आपल्याला अश्याच एका पार्टनरची ओळख करून देते…तशी पार्टनर ही एक प्रेमकथाच आहे पण ती वपुंनी लिहली आहे हे तिचं वैशिष्ट्य…

S

दादरच्या एका चाळीत राहणारा श्री या कथेचा नायक आहे. त्याच्या कुटुंबातील इतर सदस्य म्हणजे त्याची आई, भाऊ, वहिनी आणि आणि एक छोटासा पुतण्या ज्याचे त्याचा काकांवर खूप प्रेम आहे. श्रीचा मोठा भाऊ अरविंद हा PRE-MATURE BABY असल्यामुळे तब्येतीला थोडा कमजोर आहे. त्यामुळे लहानपणापासूनच आईवडिलांचा तो प्रिय असतो. अरविंद याच गोष्टीचा फायदा घेत असतो, श्रीला मात्र नेहमी दुट्टपी वागणूक मिळत असते त्यामुळे तो एकटा पडतो. लग्न झाल्यावर अरविंद आपल्याला एकांत मिळावा म्हणून श्रीला त्याची झोपण्याची सोय दुसरीकडे करायला सांगतो. या दरम्यानच श्रीला पार्टनर भेटतो. पार्टनर हे त्याच खर नाव नाही. पार्टनर श्रीला खोलीत झोपायला जागा देतो आणि तेव्हापासून पार्टनर श्रीच्या जीवनाचा एक भाग बनतो.

पार्टनर एक अजब रसायन आहे. पार्टनर ही श्रीच्या आयुष्यातील अशी व्यक्ती आहे ज्याच्यासोबत श्री कोणत्याही विषयावर चर्चा करू शकतो, त्याच्याकडून मार्गदर्शन मिळवू शकतो. थोडक्यात काय तर पार्टनर म्हणजे मित्र, तत्वज्ञ, वाटाड्या.... पार्टनर ची PHILOSOPHY श्री बरोबरच वाचकांच्या मनावर पण छाप पाडते. पार्टनर म्हणतो "There is not a single example of happy Philosopher" आणि हे त्यालासुद्धा लागू पाडतं..

कथेत पुढे श्रीच्या आयुष्यात किरण नावाची एक सुंदर तरुणी येते. किरण व श्री एकमेकांच्या प्रेमात पडतात. त्यांचं लग्न होत. लग्नानंतर आई, भाऊ आणि वाहिनी यांच्या दुट्टपी वागण्यामुळे श्री आणि किरण मध्ये नेहमी वाद होतात. M आणि W यांच्यात श्री अडकून पडतो. आता M आणि W नेमका काय प्रकार आहे हे माहिती करून घ्यायला तुम्हाला पुस्तकच वाचावं लागेल…

पुस्तक वाचताना आपल्याला पण पार्टनर सारखा एक दोस्त हवाच असं वाटू लागत. पार्टनर समाजातल्या पोकळ रूढी चालीरीतींशी फटकून वागतो…. त्याची स्वतःची अशी एक वेगळीच फिलॉसॉपी आहे… त्याला स्वतःच्याच मस्तीत जगायला आवडत. त्याच दुसरं रूप म्हणजे स्वतःच घर विकून मित्राला घर घेण्यासाठी पैसे देणारा दोस्त…वडिलांच्या एका कटाक्षाने अपमान वाटून घर सोडून जाणारा पार्टनर..

या कथेत आपल्याला नात्यांची विविध रूपे, वैशिष्ट्ये पाहायला मिळतात. यातील श्रीची आई, अरविंद आणि त्याची वाहिनी मनोरमा यांच्याकडे पाहून आपल्याला अशीही नाती असतात का? असा प्रश्न पडतो. पुस्तक वाचून झालं तरी त्यातील काही वाक्ये बराच काळ आपल्या मनात रेंगाळत राहतात…
तुम्ही अजूनपर्यंत हे पुस्तक वाचले नसेल तर नक्की वाचा….

S

या पुस्तकातील काही सुंदर ओळी:

  • कुणाचा तरी मुलगा होणं टाळता येत नाही. कुणाचा तरी बाप होणं टाळता येतं….
  • गैरसमज हा कॅन्सर सारखा असतो तिसऱ्या अवस्थेत पोहचल्यावर तो आपल स्वरूप प्रकट करतो…
  • आपल्याला हवा तेव्हा तिसरा माणूस न जाणं हाच नरक…
  • पुरुषाचं लग्न झालं म्हणजे त्याला आई दुरावते आणि त्याला मूल झालं म्हणजे बायको दुरावते…
  • माणूस गर्दीचा झाला म्हणजे हरवत नाही. एकटा राहिला की हरवतो….
  • दु:ख-आनंद, जय-पराजय, हसू-आसू, जन्म-मरण, विरह-मिलन सगळं तसंच असतं. प्रत्येक क्षणी माणसाचं मन नवा जन्म घेतं. एवढचं काय ते नवीन. पुन्हापुन्हा जन्म घेण्याची ही क्रिया थांबणं हे मरण…

धन्यवाद….!!!

वाङ्मयमाहिती

प्रतिक्रिया

भागो's picture

1 Jun 2022 - 5:46 pm | भागो

सुंदर परिचय. सुंदर लेख. धागड धिंगाण्यात थोडी हिरवळ!
पण मला "पुस्तक परिचय "समांतर" लेखक- सुहास शिरवळकर" ह्याची लिक मिळत नाहीये. कृपया मदत करा.
No backlinks found. असा संदेश येतो आहे.

सुजित जाधव's picture

1 Jun 2022 - 6:47 pm | सुजित जाधव

धन्यवाद सर....!

ही लिंक उघडून बघा..

पुस्तक परिचय "समांतर" लेखक- सुहास शिरवळकर

भागो's picture

1 Jun 2022 - 7:39 pm | भागो

आभार
वाचला लेख.तो पण चांगलाच आहे. थोडा त्रोटक वाटला.

सुजित जाधव's picture

1 Jun 2022 - 10:00 pm | सुजित जाधव

धन्यवाद...!
पहिलाच लेख होता ना तो त्यामुळे....

सुजित जाधव's picture

1 Jun 2022 - 6:48 pm | सुजित जाधव

धन्यवाद सर....!

ही लिंक उघडून बघा..

पुस्तक परिचय "समांतर" लेखक- सुहास शिरवळकर

Nitin Palkar's picture

1 Jun 2022 - 5:51 pm | Nitin Palkar

छान लिहिलेय.

सुजित जाधव's picture

1 Jun 2022 - 8:37 pm | सुजित जाधव

प्रतिसादाबद्दल धन्यवाद...!

Bhakti's picture

1 Jun 2022 - 8:44 pm | Bhakti

पार्टनर वाचून १३-१४ वर्ष झाली.थोड थोडं आठवतंय शेवट शेवट वाचताना पुस्तक बाजूला टाकल होतं,एवढा श्रीचा राग आला होता.
रच्याकने
काय तर पार्टनर म्हणजे मित्र, तत्वज्ञ, वाटाड्या....
मित्र ,तत्वज्ञ , वाटाड्या म्हणजे मितवा ना :)
नक्की कोण ओरिजनल.

सुजित जाधव's picture

1 Jun 2022 - 10:18 pm | सुजित जाधव

धन्यवाद...!
मित्र, त्तत्वज्ञ, वाटाड्या याचे संक्षिप्त रूप म्हणजे मितवा.
या कथेतील पार्टनर ला ही तिन्ही विशेषणे लागू होतात..
पण खरंच छान पुस्तक आहे..वेळ मिळाला की नक्की वाचा...माझ्याकडे Ebook पण आहे. हवे असल्यास सांगा..

जुन्या आठवणी जाग्या झाल्या

कर्नलतपस्वी's picture

2 Jun 2022 - 6:18 pm | कर्नलतपस्वी

व पु,मिरासदार,जयवंत दळवी,शंकर पाटील,चिं वी इ. लेखकांची पुस्तके मध्यमवर्गीयांच्या जीवनातील हिरवळ.
"तुच माझी वहिदा, तीशी"या कथा तप्तपदी,वपुर्झा, दोस्त,इटींमेट,वपुर्वाई" माझी आवडती पुस्तके. कधीच कंटाळवाणी होत नाहीत. "वपुर्झा",तर जिथून सुरूवात कराल तीच त्याची सुरुवात. बरीच पुस्तके संग्रही आहेत.

व पु लखनौ येथील मराठी समाजाने गणेशोत्सवात आयोजित केलेल्या कथाकथनाच्या कार्यक्रमात,आले होते तेव्हा अध्यक्षांच्या घरी आयोजित केलेल्या भोजनाच्या प्रसंगी झालेल्या दिलखुलास गप्पा आजही आठवतात. त्याच वेळेस सभांषणातील एक वाक्य त्यांच्या बद्दल बरेच काही सांगुन गेले.
"लेखक कधीच मोठा नसतो तर वाचक त्याला मोठे बनवतात".

समीक्षा आवडली.

सुजित जाधव's picture

2 Jun 2022 - 8:17 pm | सुजित जाधव

धन्यवाद सर...!
त्यांची ही वाट एकटीची, मी माणूस शोधतोय आणि पार्टनर ही माझी आवडती पुस्तके...जेव्हा कधी त्यांचे कोणतेही पुस्तक हाती घेतो तेव्हा ते खाली ठेवूच नये असं वाटत...
आणि वपुंची भेट म्हणजे एक पर्वणीच!

सुजित जाधव's picture

2 Jun 2022 - 8:19 pm | सुजित जाधव

धन्यवाद सर...!
त्यांची ही वाट एकटीची, मी माणूस शोधतोय आणि पार्टनर ही माझी आवडती पुस्तके...जेव्हा कधी त्यांचे कोणतेही पुस्तक हाती घेतो तेव्हा ते खाली ठेवूच नये असं वाटत...
आणि वपुंची भेट म्हणजे एक पर्वणीच!

चौथा कोनाडा's picture

2 Jun 2022 - 8:28 pm | चौथा कोनाडा

सुंदर लिहिलंय !

कोणे एके काळी पागल फॅन होतो या कादंबरीचा !
सॅल्युट. वपु !

सुजित जाधव's picture

3 Jun 2022 - 8:44 am | सुजित जाधव

धन्यवाद...!

श्रीगुरुजी's picture

3 Jun 2022 - 2:22 pm | श्रीगुरुजी

पार्टनर कादंबरीवर आधारीत एक दूरचित्रवाणी मालिका सुमारे ३ दशकांपूर्वी दूरदर्शनवर प्रसारीत होत होती. त्यात प्रमुख भूमिकेत अश्विनी भावे आणि विजय कदम ही अगदीच विसंगत जोडी होती.

चौथा कोनाडा's picture

15 Jun 2022 - 10:38 pm | चौथा कोनाडा

अगदी. विशेषत: विजय कदम हे ह्या धाटणीच्या (जॉनर) सिनेमासाठी योग्य नव्हते !
७-८ वर्षांपुर्वी याच कादंबरीवर "श्री पार्टनर " हा सिनेमा आला होता, प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला होता असं वाचण्यात आलं होतं.