चिंता नक्को, हम हइ इद्दर!!"

जे.पी.मॉर्गन's picture
जे.पी.मॉर्गन in जनातलं, मनातलं
31 May 2022 - 11:24 pm

"चिंता नक्को. हम हइ इद्दर!"

अस्त्युत्तरस्यां दिशि देवतात्मा हिमालयो नाम नगाधिराज:।
पूर्वापरौ तोयनिधी वगाह्य स्थितः पृथिव्या इव मानदण्डः।।

- कालिदास (कुमारसम्भव १/१)

आजवर बघितलेला हिमालय हा कुठेतरी काव्यात वाचलेला, सिनेमांमधून पाहिलेला, अद्भुतरम्य तरीही सुंदर. निळ्या नभाला शोभायमान करणार्‍या पांढर्‍याशुभ्र सानुंचा. निळ्याशार पाण्याच्या सरोवरांचा, असंख्य जलस्रोतांचा, अगदी गुल़जारच्या "आओ हाथ पकड़ लो मेरा, पसलियोंपे पांव रखो, ऊपर आ जाओ, आओ ठीक से चेहरा तो देखूं तुम्हारा,कैसे लगते हो।" अश्या ओळींनी अगदी आजोबांच्या प्रेमाने जवळ बोलावणारा.

पण गेल्या आठवड्यात बघायला मिळाला तो हिमालय मात्र कठोर, करारी, निर्दय, निष्ठुर वाटला. एरवी अंगाखांद्यावर नातवंडांना खेळवणार्‍या पांढर्‍या दाढीच्या आजोबांनी आपला युद्धाचा वेष चढवावा आणि त्यांच्या त्या वात्सल्यपूर्ण डोळ्यांत काळभैरवाचा आवेश दिसावा तसा. समुद्रसपाटीपासून सतरा - अठरा हजार फुटांवर जिथे गवताचं पातं दिसत नाही, दहा पावलं चाललं की धाप लागते, जिथे बिना हातमोज्यांची बोटं काही क्षणांत काळीनिळी पडायला लागतात, जिथे ऐन उन्हाळ्यात देखील ५ डिग्रीच्या वर तापमान जात नाही. जिथवर पोहोचण्याची हिंमत फक्त वार्‍यात आणि जिथून खाली यायची जिगर फक्त पाण्यात असू शकते अश्या हिमालयाचं उरात धडकी भरवणारं रूप बघितलं. हे हिमालय आजोबा आधी बघितलेल्या आजोबांपेक्षा खूपच वेगळे होते.

पण तिथे देखील या रौद्रभीषण आजोबांची जिगरबाज नातवंडं होतीच. काही डोळ्यांत तेल घालून गस्त घालणारी, काही शस्त्र परजून छातीचा कोट करून उभी, काही त्या भयावह भूप्रदेशात रस्ते निर्माण करणारी, काही जिवावर उदार होऊन आपल्या भावंडांना रसद पुरवणारी. ८ मद्रास, ११ गोरखा, ग्रेनेडियर्स, आर्टिलरी, बिहार रेजिमेंट, ITBP, सिक्किम स्काउट्स अश्या अनेक कुळांतली.

आम्ही आरामदायक इनोव्हामधून प्रवास करून देखील हैराण झालेलो. आतून कोणीतरी घण घालावेत तसं ठणकणारं डोकं हे "प्राणवायू" ही आपल्याला फुकट मिळणारी किती अमूल्य वस्तू आहे ह्याची जाणीव करून देत होतं. रस्त्याच्या प्रत्येक वळणाने सकाळी केलेल्या नाष्ट्याची चव पुन:पुन्हा चाखवली होती. हाडं खिळखिळी झाली होती, मान-पाठ एक झाली होती. तरी ते गुरुडोंगमार सरोवर अजून लांबच होतं. डोळ्यांसमोर येणार्‍या अंधारीमध्येच हिमालय आजोबांचा छद्मीपणाने हसणारा चेहरा दिसत होता. ड्रायव्हरने गाडी बाजूला घेतली. त्याच्या बोलण्यातला "चाय" इतकाच शब्द कळाला आणि खाली उतरलो. दोन-चार मिनिटं कापूर हुंगल्यावर थोडा शुद्धीत आलो. सैन्याच्या कुठल्यातरी यूनिटचा "बेस कॅम्प" असावा. पत्र्याच्या बर्‍याच शेडस होत्या. काही रणगाडे होते. तोफा होत्या. आर्मीच्या ट्रक्समधून सैनिकांच्या तुकड्यांच येणं जाणं चालू होत. एका खोपटीत शिरून थोडा चहा पोटात ढकलल्यावर थोडी तरतरी आली.

चहा पिऊन बाहेर आलो तर समोर पुन्हा ते छद्मीपणे हसणारे पांढरे आजोबा आणि त्यांच्या समोर त्यांचा एक धिप्पाड हसतमुख नातू. डोक्यावर जाड कानटोपी, ग्लव्ज, गमबूट्स, हातात स्वयंचलित शस्त्र, छातीवर उजव्या बाजूला लिहिलेलं त्याचं नाव "S Saravana", डाव्या बाजूला ढाल तलवारींवर असलेल्या हत्तीचं मद्रास रेजिमेंटचं चिन्ह, त्याच्या मागे एका पत्र्याच्या शेडवर लिहिलेलं घोषवाक्य "स्वधर्मे निधनं श्रेय:" आणि त्या शेडच्या मागे एका मजबूत लोखंडी खांबावर धीरोदात्त फडकणारा तिरंगा!!!

त्या एका दृश्यानी दिवास्वप्नात हरवलेल्या विद्यार्थ्याला शिक्षकांच्या सणसणीत चपराकीने जमिनीवर आणावं तसं मला ताळ्यावर आणलं. खडबडून जागा झालो.

"जय हिंद सर्वना" - मी म्हणालो.

"जय हिंद सर" - सर्वनाचं हसतमुखाने उत्तर.

"Can I take a picture with you?"

"Sorry sir, no photography allowed here."

"आप कहाँसे हो सर्वना?"

"सेलम. टमिलनाड"

"How old are you brother?"

"आइ एम ट्वन्टी एईट सर"

"कबसे हो यहाँ?"

"वन मन्थ रोटेशन में होता है" - सर्वना अर्थातच तपशील सांगणार नव्हता.

हे सगळं माझ्यासाठी अनाकलनीय होतं. सर्वना अर्थातच सुशिक्षित होता. दोन वेळची भाजी भाकरी आणि त्यापलिकडची ऐहिक सुखं ही त्याला सेलमच्या आसपास काहीही कामंधामं करून सहज मिळाली असती. त्याच्या घरी त्याचे आई-बाप, भावंड असतील. कदाचित बायको-मुलं देखील. एक बर्‍यापैकी नोकरी करून तो सहज सुखात राहिला असता. पण तरीही सेलमच्या असह्य उकाड्यात वाढलेला सर्वना घरापासून जवळपास पावणेतीन हजार किलोमीटरवर असलेल्या रक्त गोठवणार्‍या थंडीच्या प्रदेशात, जीवघेण्या परिस्थितीत आपल्या मातृभूमीचं संरक्षण करत उभा होता. क्रूर शत्रू किंवा क्रूर निसर्ग - कोण, कधी आणि कसा घात करेल याचा नेम नाही. मग तरीही काय विचाराने सर्वना सैन्यात भरती झाला असेल? अशी कुठली गोष्ट असेल जी त्याला त्या वातावरणात शत्रूशी दोन हात करायला सज्ज राहायला प्रवृत्त करत असेल? काय पुण्य केलं की मिळतात असे सैनिक? कोणता नवस बोलला की जन्मतात अशी मुलं? कुठल्या मुशीतून घडतात अशी लोकं? कुठून आणतात हा अभिमान, ही स्फूर्ती, ही जिगर, हे चैतन्य?

काहीतरी फुटकळ इच्छा - आकांक्षांना कवटाळून, त्यांच्या पूर्तीत समाधान आणि यश मानणार्‍या माझ्या मनावरची पुटं सर्वना झटकत होता. अप्रेझल मनासारखं झालं नाही तर निराश होणार्‍या माझ्या डोळ्यांत सेलमच्या त्या युवकानं झणझणीत अंजन घातलं.

भारावून जाण्याच्याही पलिकडे गेलेलो मी, न राहवून त्याला विचारलं, "Is there anything I can do for you brother?"

तसा त्या विराट पांढर्‍या आजोबांचा तो निडर नातू माझ्या खांद्यावर हात ठेऊन हसत म्हणाला,

"देसमें जाके बोलो, चिंता नक्को, हम हइ इद्दर!!"

S Saravana, तू आणि तुझ्यासारखे हजारो सर्वना आहेत म्हणून बाहेरच्या शत्रूची काळजीच नाही रे. पण आम्हीच कुठेतरी चुकतोय. नक्की काय चुकतोय हे देखील आता उमगतंय पण ह्या भाजी भाकरीच्या व्यापात कृती करणं थोडं मागे पडतंय. माझ्या उजव्या खांद्यावर तुझा तो स्पर्श कुठेतरी एक जबाबदारी ठेऊन गेला आहे. आता तरी इतकंच सांगू शकतो की ती पेलायचा आम्ही मनापासून प्रयत्न करू. एक दिवस आम्ही देखील तुझ्यासारख्या सर्वनांना सांगू शकू - "चिंता नक्को. हम हइ इद्दर!"

© - जे.पी.मॉर्गन

समाजप्रकटनविचारसद्भावना

प्रतिक्रिया

सारे सैनिक हे अगदी वेगळ्या मुशितले असतात. माझ्यासारखे ९-५ काम करणारे त्यांच्या जवळपासही जाउ शकत नाही.
सैन्यात भरती होताना पगार मिळवणे हा मुद्दा नसतोच मुळी. तसा पगार ते कुठेही मिळवु शकतात. देशासाठी काहीतरी करायची भावना ही सगळ्या सैनिकांमधे भरती होण्याच्या आधी पासुन असते. ती उर्मी त्यांना ह्या सर्वोच्च प्रोफेशन ला घेउन जाते.

जेव्हा जेव्हा कुठलाही सैनिक मला दिसतो .. त्याला मी आदराने "Thank you for your Service" म्हणतो.

तुषार काळभोर's picture

1 Jun 2022 - 5:07 am | तुषार काळभोर

अगदी काळजाला हात घालणारं लेखन.... काळजातून आलेलं!

ज्ञानोबाचे पैजार's picture

1 Jun 2022 - 10:03 am | ज्ञानोबाचे पैजार

हे लोक असे बॉर्डर वर उभे आहेत म्हणून आपण इथे बिन्धास्त जगू शकतो.
अशा सगळ्या सर्वानांना कडक सॅल्युट
पैजारबुवा,

अप्रतिम लिखाण !! डोळ्यात टचकन पाणीच आलं

कंजूस's picture

1 Jun 2022 - 11:07 am | कंजूस

पटलं.

बेकार तरुण's picture

1 Jun 2022 - 11:14 am | बेकार तरुण

तुमचे लेखन नेहमीच आवडते... हे देखील आवडले... खूप मनापासुन लिहिता तुम्ही... .../\...

नचिकेत जवखेडकर's picture

2 Jun 2022 - 7:07 am | नचिकेत जवखेडकर

खूप छान!

छान लिहिलंय .जय हिंद!

सरिता बांदेकर's picture

2 Jun 2022 - 10:09 am | सरिता बांदेकर

छान.

स्वराजित's picture

2 Jun 2022 - 1:40 pm | स्वराजित

खुप छान लेख.

कर्नलतपस्वी's picture

2 Jun 2022 - 2:22 pm | कर्नलतपस्वी

माॅर्गन भाई , तुमची निरीक्षण शक्ती व संवेदनशील स्वभाव याला सॅल्युट. भारतीय सैनिकांच्या मागे भारतीय नागरिक नेहमीच उभा आसतो व ते आमचे शक्ती स्थान आहे.

एक आठवण, संपुर्ण युनिट घेऊन फिल्ड प्रशिक्षणा साठी जात होतो. मध्यप्रदेश मधे मटकुली घाट आहे तो पार करताना काही तांत्रिक बिघाडामुळे आमची एक गाडी दिड एकशे फुट खाली कोसळली. जवानांनी प्रसंगावधान राखून वेळीच उड्या मारल्या त्यामुळे कुणालाही मोठी जखम झाली नाही.
उलट दिशेने जाणाऱ्या टाटा सुमो नी मला खबर दिली. निबीड जंगल ,सुनसान घाट, जबरी टेन्शन, मला विचारात पडलेला पाहून टाटा सुमो चा मालक म्हणला काळजी करू नका, घटनास्थळी पोहचा आमची माणसे येवून मदत करतील.

गाडी वर काढली,बरोबरच मध्यरात्र झाली जेवण केले नाही म्हणून जेवायलाच घातले .जुजबी गाडी ठिक करून मार्गी लावले.

आशा परीस्थीतीत सैन्यात यंत्रणा आहे पण सुनसान जागी मदत मिळण्यास वेळच लागणार ना. काय म्हणणार यावर,फक्त सॅल्युट च म्हणून शकतो.

सौंदाळा's picture

2 Jun 2022 - 5:28 pm | सौंदाळा

कर्नल साहेब,
तुमच्या सैन्यातल्या अनुभवाबद्दल जरुर लिहा. तुमच्या साठी एखादी गोष्ट / घटना साधी असली तरी आमच्यासारख्या सामान्यांसाठी सगळेच अद्भुत आहे.

सौंदाळा's picture

2 Jun 2022 - 5:29 pm | सौंदाळा

लेख नेहमीप्रमाणेच छान आहे.

गोरगावलेकर's picture

3 Jun 2022 - 12:43 pm | गोरगावलेकर

केवळ शब्दांमधून प्रत्यक्ष चित्र डोळ्यासमोर उभे राहिले.
या ठिकाणचा अनुभव घेतला असल्याने जास्तच भावले. नोव्हेंबरचा शेवटचा दिवस. लाचेनहुन पहाटेच गुरुडोंगमारसाठी निघालो होतो. हिमवृष्टी सुरु झाली होती. आपण लिहिल्याप्रमाणेच सैन्याचे कॅम्प वगैरे दिसत होते. काही अंतरावर जवानांनी आम्हाला परत फिरण्याचा सल्ला दिला. हिमवृष्टी लवकर थांबली नाही तर रस्ते बंद होतील व तुम्ही किती काळ अडकून पडाल ते सांगता येणार नाही असे सांगितले. त्यांनी काळजीपोटी दिलेला सल्ला आम्ही मानला व परत फिरलो. सरोवर नाही तरी इतर ठिकाणे व बर्फात खेळायचा मनमुराद आनंद मिळाला.

राघव's picture

3 Jun 2022 - 1:44 pm | राघव

काही वेगळं बोलण्या/लिहिण्याची गरजच नाही. भापो.
_/\_

श्वेता व्यास's picture

3 Jun 2022 - 4:38 pm | श्वेता व्यास

अतिशय हृद्य लिहिले आहे, सर्वनासारख्या सगळ्यांनाच सलाम!