चिरकुट मुलगी—3

Primary tabs

भागो's picture
भागो in जनातलं, मनातलं
31 May 2022 - 7:33 pm

चिरकुट मुलगी—3
(चिरकुट मुलगी—२ इथे आहे https://www.misalpav.com/node/50277)
(चिरकुट मुलगी--१ https://www.misalpav.com/node/50273)
अष्टावक्र जादूगार
सकाळ झाली. अंकलकाकांनी जोजोच्या डोक्यावरून हळुवारपणे हात फिरवून त्याला जागे केले.
“उठ.”
जोजो जागा झाला. त्याने आपलं आवरलं आणि कपडे करायला सुरुवात केली. त्याने निळे मोजे चढवले. सोनेरी कॉलरवाला निळा शर्ट, निळी पॅंट, सोनेरी बक्कलवाला निळा पट्टा, निळे बूट असा त्याचा पोषाख होता. बोमबोइसह संयुक्त निळावंतीत –म्हणजे जिथं जोजो राहत होता त्या राज्यात- निळ्या रंगाचे साम्राज्य होते. गंमत म्हणजे निळावंतीचे आकाश देखील निळे होते! आहे कि नाही निळी निरनिराळी कमाल!
जोजोनं बघितलं कि अंकालकाकांनी ब्रेडचा चतकोर खाल्लेला नाही. तो चतकोर बघून जोजोला चतकोर भूक लागली. त्याने चतकोर भागाचा अर्धा ब्रेड स्वतः खाल्ला आणि उरलेला अर्धा चतकोर काकांना दिला. काकांनी तो तुकडा कोटाच्या खिशात टाकला. जोजोने पाठीमागच्या झुळझुळ झऱ्याचे स्वच्छ निर्मल पाणी पिऊन आपली.तहान भागवली.
“निघूया.”
अशा तऱ्हेने जोजो आणि अंकल उत्तर डोंगराकडे सुख-समृद्धीच्या शोधात निघाले.
अंकलनी घराचा दरवाजा ओढून घेतला. दरवाज्याला कुलूप लावावे अशी कल्पना त्यांच्या मनातही आली नाही. चोर त्यांच्या घरातून चोरणार तरी काय? यदाकदाचित चुकुनमाकुन कोणी चोर त्यांच्या घरात शिरला असता तर त्यांचे घनघोर दारिद्र्य पाहून त्याला गहिवरून आले असते, व जाताना त्याने दोनचार नाणी सत्पात्री दान म्हणून टेबलावर टिकवली असती.
इतक्या वर्षात जोजोने घर कधी सोडले नव्हते. त्यामुळे तो वाटेतली सीनसिनरी डोळे भरून पहात होता. बघता बघता जादूगाराचे घर दिसू लागले. जादूगार डॉक्टर अष्टावक्र पोपट कुटुंब जोजोचे सगळ्यात जवळचे शेजारी होते. “सगळ्यात जवळचे शेजारी” असले तरी जोजो त्यांना कधीच भेटला नव्हता.
चालता चालता मधेच थांबून काका पुतण्यांनी जंगलात पडलेल्या झाडाच्या ओंडक्यावर बसून, निम्म्या शिम्म्या ब्रेडचा चट्टा मट्टा केला.
दोन तासांच्या पायतुडविनंतर डॉक्टर पोपट ह्यांचा बंगला एकदाचा नजरेच्या टप्प्यात आला.
बंगला गोल होता. बाहेर सुरेख बाग होती. बंगला निळ्या रंगाने रंगवला होता. बाजूला निळी बाग होती. बागेत डौलदार निळी झाडे होती. लहान लहान निळ्या रोपट्यांवर निळी फुले निळ्या दिमाखाने डोलत होती. बागेत निळा कोबी, निळा फुलगोभी, निळी गाजरे आणि निळा मुळा लावले होते.
निळा रंग त्या प्रांताचा राजरंग होता.
डॉक्टर पोपट ह्यांच्या त्या बागेत पाव, बनपाव, बिस्किटे, निळे लोणी देणारी बटरकपची आणि चॉकलेटची झाडे होती.
काकांनी हळुवारपणे बनल्याचा दरवाजा ठोठावला. एका हसऱ्या चेहेऱ्याच्या बाईंनी दरवाजा उघडला आणि हसून त्याचे स्वागत केले.
“मिसेस पोपट?” जोजोने पहाता क्षणीच ओळखले.
“हो हो,” खळखळून हसत सौ. पोपटनी त्यांना घरात घेतले. “माझ्या घरी आगंतुकांचे स्वागत आहे.”
“आम्ही सुप्रसिद्ध रसायनशास्त्री, जादूगार डॉक्टर अष्टावक्र पोपट ह्यांना भेटायला आलो आहोत.”
“हम्म, डॉक्टर खूप कामात आहेत. पण आधी तुम्ही लोकं आत या. मी तुम्हाला काहीतरी खायला देते. तुम्ही दूरवरून प्रवास करून आमच्या या एकाकी घरी आला आहात तेव्हा भूक तर लागली असणारच.”
“काकू, तुमच्या बंगलीत कितीतरी जिवंतपणा आहे. तुम्ही आमच्यपेक्षा नशीबवान आहात. ह्यापेक्षा आमची झोपडी जास्त निर्मनुष्य जागी आहे.”
“म्हणजे तुम्ही निळ्याअरण्यातून आला असणार. आत्ता आलं लक्षात. तुम्ही शांत अबोल अंकलकाका ना. आणि तू रे, दुर्दैवी जोजो! ओळखले कि नाही.” काकू बोलत सुटल्या.
“हो.” अंकलकाकांनी नेहमीप्रमाणे एका शब्दात होकार भरला.
“मी अनलकी जोजो? मला माहीत नव्हते कि मी दुर्दैवी म्हणून प्रसिध्द आहे. खरं आहे म्हणा ते.” जोजोला आपल्या अनलकीपणाची तीव्र जाणीव झाली.
“घाबरू नकोस जोजो. आता तू त्या भयाण जंगलातून बाहेर पडला आहेस. ह्याचा असा अर्थ आहे कि लवकरच तुझे नशीब बदलणार आहे. तू अनलकी जोजो ऐवजी लकी जोजो होणार आहेस!” सौ. मैनाबाई पोपटनी जोजोला धीर दिला.
“माझे अनलकीपण जाऊन मी केव्हा लकी होणार?” जोजो निराश होऊन बोलला.
“अरे जोजो, कोणीही असा कायम अनलकी नसतो बर. तुझेपण ग्रह बदलतील. धीर धर!”
अश्या त्यांच्या गप्पा चालू असताना मैनाबाईंनी त्यांना जेवायला वाढले. अहाहा.काय जेवण होते. हलकी निळी नाजूक चमक असलेलं श्रीखंड, निळ्या मटारची उसळ आणि निळ्या पुऱ्या! जोजो अस जेवण आयुष्यात प्रथमच खात होता. साथीला
नीले गगन के तले,
श्रावणात घन निळा बरसला,
गे निळावंती कशाला झाकीशी काया तुझी,
निळा सावळा नाथ तशी ही निळी सावळी रात
अशी छान छान निळनिळाळी गाणी लावली होती.
दोनी पाहुण्यांनी पोट भर जेवण केले.
“तुमचे डॉक्टर पोपटांशी काम आहे कि आपल सहज भेटायचं?”
अंकलकाकांनी “नाही” म्हणून डोकं हलवलं.
“आम्ही ह्या रस्त्यावरून प्रवासाला निघालो आहोत. विचार केला कि इथे थोडी विश्रांती घ्यावी, ताजेतवाने व्हावे आणि मार्गी लागावे. आलोच आहोत तर मग जगप्रसिद्ध जादूगार डॉक्टर अष्टावक्र ह्यांचे दर्शन घ्यावे हि मनीषा आहेच.” जोजोला खरोखरच डॉक्टरांना बघायचे होते.
“आत्ता मला आठवले. अंकलकाका आणि माझे पती जादूविश्वविद्यालयात बरोबर शिकत होते. जादूलाच अशिक्षित लोक विज्ञान म्हणतात म्हणे. त्यांना एकमेकांशी भेटायला खचितच आनंद वाटेल, असं माझं मन मला सांगतेय. या असे माझ्यामागून. मी तुम्हाला त्यांच्या प्रयोगशाळेत घेऊन जाते.”
डॉक्टरांची प्रयोगशाळा भलीमोठी प्रशस्त होती. बाजूला धगधगणाऱ्या भट्टीवर चार किटल्यांमध्ये रसायन उकळत होती. डॉक्टर ढवळत होते. त्यांच्या दोनी हातात डाव होते. दोनी पायाला डाव बांधले होते. चार किटल्यांमध्ये रसायन उकळत होती पण कुठलीही किटली उतू जात नव्हती.
(सध्याचे राजकारणी लोक तरी दुसरे काय करतात? एकेक इशू बॉयलिंग पॉइंटपर्यंत आणायचा पण आग कह्यात ठेवायची. पाहिजे तेव्हा पाहिजे तसं. हे तंत्र ते डॉक्टर अष्टावक्र ह्यांच्याकडून शिकले असावे असे माझे वैयक्तिक मत आहे.—भागो पाटील)
(क्रमशः)
xxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxx
Frank Baum ह्यांच्या Patchwork Girl ह्या कथेचे स्वैर, मनसोक्त, मनःपूतम् मराठी रुपांतर
(चित्र विचित्र कथांसाठी माझा ब्लॉग इथे आहे.)
(https://iammspd.blogspot.com)
xxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxx

कथाबालकथा