काशिद किनारा व कोर्लई किल्ला -२०२२

गोरगावलेकर's picture
गोरगावलेकर in भटकंती
1 Apr 2022 - 12:12 am

गेल्या शुक्रवारी रात्री जावई आणि मुलीचा फोन आला. आम्हाला शनिवार-रविवार सुट्टी आहे, काशिदला जायचा विचार आहे तर येणार का? छोटीलाही सुटी होती, यांनाही निघण्यास काही अडचण नव्हती आणि मला तर भटकंतीसाठी निमित्तच हवे होते. लगेच होकार दिला.
जावई-मुलगी सकाळी साडे-नऊला ठाण्याहून निघाले. आम्हा तिघांना नवी मुंबईतून घेऊन अलिबागकडे निघालो. भूक लागली होती. आधी जेवून नंतर मुक्कामासाठी जागा शोधू म्हणत एक-दीडच्या दरम्यान काशीद बीचच्या आधी साधारण आठ किमीवर जेवणासाठी थांबलो. गेल्याच महिन्यात येथील हॉटेल समर्थकृपात जेवलो होतो . जेवण आवडले होते. त्यातच हॉटेलच्या गेटला लागूनच बिअर शॉपी असल्याने ह्यांचे व जावयांचे येथेच थांबण्याबद्दल एकमत झाले. मासे, मटण तांदळाची भाकरी मिळाल्याने जावई एकदम खुश. व्यवस्थित खाणे-पिणे आटोपले. येथल्याच स्टॉलवर चायनीज पदार्थांसाठीची तयारी सुरु होती. पण ही तयारी संध्याकाळसाठीची आहे असे समजले. सुटीच्या दिवशी अगदी रात्री १२ पर्यंत येथे वर्दळ असते असे कळले. जमल्यास संध्याकाळीही येथेच जेवायला यायचे ठरले.

येथून निघाल्यावर रूम शोधणे सुरु झाले. दोन दिवस सलग सुटी असल्याने बहुतेक हॉटेल भरलेली होती. थोडयाफार रूम खाली होत्या तेही चढे दर सांगत होते. पूर्वी गविंच्या एका प्रतिसादात प्रकृती रिसॉर्टचे नाव वाचल्याचे आठवत होते तेथे पोहचलो. रिसॉर्टचे दरपत्रक पाहून भर दुपारच्या उन्हात आम्ही गार पडलो. चार जणांसाठी रूमचा दर होता जवळपास रु.४० हजार. असे असूनही रिसॉर्ट पूर्ण भरलेले होते. यांचेकडे कोणतीच रूम शिल्लक नसल्याचे कळल्यावर जावयांना उत्साह संचारला. काहीही करून एखाद्या रूमची व्यवस्था कराच असे सांगू लागले. शेवटी रूम मिळतच नाही म्हटल्यावर नाईलाज झाल्यासारखे दाखवत आम्ही परत फिरलो. चार वाजायला आले होते. आता सरळ बीचवर जाऊन रात्री मुक्कामी आपल्या घरीच जावे असाही विचार मनात येऊ लागला. प्रकृती रिसॉर्टच्या थोडे पुढे मुख्य रस्त्यालाच एक रिसॉर्ट दिसले.


चौकशी केल्यावर एसी रूमचा तीन हजार असा दर मिळाला. घासाघीस करून पाच हजारात दोन रूम ताब्यात घेतल्या. थोडा आराम करून बीचवर गेलो. आज फक्त भिजायचे. फोटो काढायचेच नाहीत असे ठरवून फक्त एक फोन सोबत घेतला व बाकी सगळ्या इलेकट्रोनिक वस्तू रूमवरच ठेवल्या. किनारा माणसांनी फुलून गेला होता. . ऍडव्हेंचर स्पोर्ट्सवाल्यांची चांगलीच चलती होती. सूर्यास्त पाहून व पाण्यात यथेच्छ मजा करून रूमवर परत आलो. नऊच्या दरम्यान जेवणासाठी बाहेर पडलो. दुपारी जेवलो तेथेच जायचे ठरले. अंधार पडला होता आणि भूकही लागली होती त्यामुळे आता हेच अंतर खूप जास्त वाटत होते. येथे पोहचलो आणि गर्दी बघूनच कळले कि यांचे चायनीज जेवण खरोखरच चांगले असणार आहे. ऑर्डर दिली. वेळ लागणार होता. मधल्या वेळात सासरा-जावयानेआडोशाला एका टेबलवर आपली सोय करून घेतली.
यथील एक स्पेशल डिश, पॅकिंग फ्राईड राईस

पॅकिंग चिकन फ्राईड राईस, चिकन क्रिस्पी, चिकन चिली व माझ्यासाठी व्हेज फ्राईड राईस सर्व मिळून बिल झालं रु.५६०/- फक्त! अकरा वाजले. रूमवर जाण्यासाठी निघालो. दोन्ही मुली कामचलाऊ गाडी चालवतात त्यामुळे ह्यांची व जावयांची ड्रिंक अँड ड्राइव्हच्या त्रासातून मुक्तता होते. वाटेत थांबून आइस्क्रीमचा आनंद घेतला. रिसॉर्टला येऊन बऱ्याच वेळ आवारातच गप्पा मारून झोपायला गेलो.
सकाळी आरामात उठलो. नाश्ता करून बाहेर पडलो. येथील नाश्ता म्हणजे पोहे/उपमा. नाश्ता रु.३०/- एका प्लेटचे, चहा २० रुपये. खूप छान आणि स्वस्त.
थोडे रिसॉर्टविषयी : मुख्य रस्त्यालाच लागून दोन मजली इमारत आहे पुढे, पार्किंगसाठी जागा, बाग, लहान मुलांसाठी खेळण्याची व्यवस्था, पाठीमागे स्विमिंग पूल व आमराई (पूल काही कारणाने बंद होता. आंब्याची झाडे अजून लहान आहेत). एक विशेष वाटले इतकी चांगली व्यवस्था असून व आजूबाजूचे रिसॉर्ट गजबजलेले असताना या रिसॉर्टमध्ये आमच्या व्यतिरिक्त कुणीही नव्हते. जणूकाही संपूर्ण रिसॉर्ट आमच्यासाठीच राखीव होते. रिसॉर्टच्या मालकांनी यदाकदाचित हा लेख वाचला तर माझे सांगणे आहे की व्यवस्थापनात कुठेतरी सुधारणा आवश्यक आहे. (मालक मराठी माणूस व पुण्याचा आहे असे कळते).

रिसॉर्टचे प्रवेश द्वार ते मागील स्विमिंग पूल पर्यंतचा १८० अशांतला पॅनोरॅमिक व्ह्यू

येथील इतर काही फोटो

रिसॉर्ट सोडले व बीचवर गेलो. आज बीचवर थोडासा फेरफटका मारून काल फोटो काढले नव्हते त्याची भरपाई करून घेतली.

बऱ्याच वर्षांपासून काशीद जवळील कोर्लई किल्याला भेट द्यायचे मनात होते.
अलिबागकडून येताना रेवदंड्यानंतर कुंडलिका खाडीवरील पूल (साळाव पूल) ओलांडल्यावर उजवीकडचा रस्ता कोर्लई गावात जातो. आम्ही काशिदकडून परतीच्या प्रवासात येथे जाणार असल्याने मुख्य रस्त्यापासून डावीकडे वळण घेत दोन किमीवरील कोर्लई या गावात पोहचलो.एका गल्लीत घराच्या स्लॅबचे काम सुरु असल्याने गाडी पुढे जाऊ शकत नव्हती. गाडी फिरवून गावाच्या बाहेरील रस्त्याने समुद्राच्या किनाऱ्याने जावे लागले. रस्ता डोंगरावरील दीपगृहापर्यंत जातो. चढ सुरु होतो तेथून कॉंक्रिटचा रस्ता बनवला आहे पण खूपच अरुंद आहे. समोरून गाडी आली तर कोणाला तरी माघार घ्यावी लागेल. रस्ता वळणावळणाचा आहे व जराही गाडी काँक्रिटच्या धारेहून खाली उतरली तर उलटण्याची शक्यता. सुदैवाने जाताना व येतांना कोणतेही वाहन आडवे आले नाही

दीपगृह. सध्या येथे प्रवेश नाही

दीपगृहाच्या बाजूने कच्ची वाट व काही पायऱ्या चढून आपण किल्ल्याच्या पश्चिम दरवाजापर्यंत पोहचतो. वेळ साधारण १५ मिनिट.

हा एक जलदुर्ग असून १५२१ मध्ये पोर्तुगीजांनी बांधला आहे. १७४० च्या सुमारास मराठ्यांच्या ताब्यात आला. त्यानंतर १८१८ मध्ये ब्रिटिशांच्या ताब्यात गेला.किल्ला तीन बाजूनी पाणी व दक्षिणेकडे जमिनीशी जोडलेला आहे.
किल्ला चिंचोळ्या डोंगर माथ्यावर असून दक्षिणोत्तर लांबी ८६५ मीटर व रुंदी २८ मीटर असल्याचे कळते.पश्चिम दरवाजातून आत आलो की पूर्व व पश्चिम बाजूस तटबंदी असलेली लांबच लांब पट्टी दिसते. डाव्या बाजूस वळून आपण उत्तरेकडील प्रवेश द्वाराशी येतो. येथून काही पायऱ्या उतरून एक वाट खाली समुद्रापर्यंत जाते.

येथून कुंडलिका खाडी व रेवदंडा परिसराचे रम्य दर्शन होते.

येथून परत फिरून आपण दक्षिण दिशेला चालत येऊन येथील दरवाजातून आपण आत प्रवेश करतो.

येथिल बुरुजावरील तोफ

याच्यापुढे आणखी एक दरवाजा आहे. याच्या माथ्यवरही काही तोफा आहेत.

ठिकठिकाणी सागराचे नयनरम्य दर्शन होते

याच्यापुढे आणखी एक दरवाजा आहे.आत गेल्यावर छोटेशे शिव मंदिर आहे.

याच्या बाजूला पाण्याचे टाके आहे. पाणी थंड, स्वच्छ व पिण्यालायक आहे.

येथून आणखी एका दरवाजातून प्रवेश केला कि आपण चर्च जवळ येतो.
दरवाज्याच्या वर आतील बाजूस शिलालेख आहे. यावर काय लिहिले आहे कळले नाही.अभ्यास करावा लागेल.

बाजूलाच पडक्या वाड्याचे अवशेष आहेत

येथून पूर्व बाजूला एक प्रवेशद्वार आहे. काही पायऱ्या असून नंतर हि वाट कोर्लई गावच्या कोळी वाड्यापर्यंत जाते. या बाजूने किल्यावर येण्यास साधारण पाऊण तास लागतो असे समजते. दरवाजाच्या रचनेवरून पूर्वीच्या काळी हाच मुख्य दरवाजा असावा.

एक भग्न शिलालेख आडवा ठेवलेला आहे.. शिलालेखावरची माहिती जाणकार सांगतील अशी अपेक्षा.

चर्चच्या पुढे गेल्यावर एका भिंतीत छोटासा दरवाजा आहे. त्यापुढेही भिंत असल्याने येथे किल्ला संपला असे वाटते. पण दरवाजातून आत शिरल्यावर डावीकडे वळून आपण परत उघड्यावर येतो.

तोफा ठेवलेला एक अष्टकोनी बुरुज.

येथून पुढे आपण दक्षिण टोकावरील बुरुजांकडे जातो.
किल्ल्यावर व परिसरात ठिकठिकाणी अनेक तोफा आहेत. येथे काम करण्याऱ्या माणसाला विचारले असता एकूण ३४ तोफा आहेत असे समजले.

कुंडलिका खाडी व समुद्र दोहोंचे मनोहर दर्शन

किल्ला पाहण्यास एक दीड तास पुरेसा आहे. फोटो काढण्यात वेळ गेल्याने आम्ही दोन तास घेतले. किल्ला व किल्ल्याहून दिसणारा अप्रतिम नजारा तसेच समुद्रावरून येणार वारा यामुळे रणरणते ऊनही सुसह्य झाले.

प्रतिक्रिया

कंजूस's picture

1 Apr 2022 - 6:57 am | कंजूस

आणखी काय हवं.

लोकांना ट्रिप करायला काय लागतं ते अनुभव दिल्याने फारच उपयुक्त. किती वेळ, दिवस हाताशी असले तर काय करता येईल. शिवाय हॉटेलचा रिव्यू चांगला करता.

(रेवदंडा नागाव परिसरांतल्या नातेवाइकांकडे जाणे होते आमचे. पण ट्रिप म्हणून होत नाही. जेवणे राहाणे आणि गप्पांतच वेळ जातो. )

उत्तम लेख, उत्तम माहितीही आणि उत्तम शैलीही. धन्यवाद.

बाकी ते प्रकृती रिसॉर्टमधलं वाचून हसू आलं. भारीच आहात. सहकुटुंब सहलींची मजा वेगळीच.

ॲबसेंट माइंडेड प्रोफेसर's picture

1 Apr 2022 - 11:23 am | ॲबसेंट माइंडेड ...

छान वर्णन आणि फोटो.

चौथा कोनाडा's picture

1 Apr 2022 - 12:12 pm | चौथा कोनाडा

व्वा भारी भटकंती वर्णन & प्रचि, अर्थात नेहमी प्रमाणे ...
🎈

कोरलई किल्ला सुंदरच आहे.
आम्हा मित्रांची ही कोरलई किल्ल्याची सफर झकासच झाली होती !

कोरलईची स्थानिक भाषा जी फक्त इथेच बोलली जाते ती ‘नी लींग’ हे या ठिकाणचे मोठे वैशिष्ट्य आहे !

Nitin Palkar's picture

3 Apr 2022 - 6:40 pm | Nitin Palkar

वर्णन आणि प्रची दोन्ही सुंदर.

बेकार तरुण's picture

4 Apr 2022 - 5:42 pm | बेकार तरुण

छान वर्णन अन प्रची...
किल्ल्याहुन जवळच बिर्ला मंदिर आहेत, ते ही पाहिलेत का???

गोरगावलेकर's picture

4 Apr 2022 - 11:21 pm | गोरगावलेकर

बिर्ला मंदिराचे निर्माण कार्य 'शापूरजी पालनजी' या कंपनीकडे होते. कंपनीतर्फे बांधकामासाठी वापरल्या जाणाऱ्या काही छोट्या मशिनरीच्या दुरुस्तीसाठी लागणारे सुटे भाग पुरविण्यात आमच्या दुकानाचा सहभाग होता. त्यामुळे हे ठिकाण तर खूप आधीपासूनच परिचित आहे. गेल्या काही वर्षात कित्येक वेळा येथे जाणे झाले आहे. या वेळी मात्र नाही गेलो.

गोरगावलेकर's picture

4 Apr 2022 - 11:19 pm | गोरगावलेकर

@ कंजूस, गवि, ॲबसेंट माइंडेड ..., Nitin Palkar
अभिप्रायाबद्दल सर्वांचे धन्यवाद

प्रचेतस's picture

5 Apr 2022 - 8:26 pm | प्रचेतस

मस्त लिहिलंय, फोटोही एकदम सुरेख आहेत.
माझा मिपावरील पहिला लेख हा नागाव कोर्लई किल्ल्यावर होता हे आठवले.

साळाव पुलावरून दिसणारे कुंडलिकेचे विशाल पात्र खूपच छान दिसते. तिचा उगम ताम्हिणी घाटातील प्लस व्हॅलीत एका धबधब्याच्या रूपाने होतो. देवकुंड पण कुंडलिकेचाच एक भाग.

गोरगावलेकर's picture

14 Apr 2022 - 10:36 pm | गोरगावलेकर

या निमित्ताने आपला लेख वाचनात आला. कर्पेवाडी रिसॉर्ट छान वाटतेय.
देवकुंड विषयी फक्त ऐकलंय. जायचं आहे एकदा

मुक्त विहारि's picture

14 Apr 2022 - 11:02 pm | मुक्त विहारि

वाखूसा

सुंदर प्रचि आणि डिटेलवार प्रवासवर्णन

चेतन सुभाष गुगळे's picture

20 May 2022 - 10:20 pm | चेतन सुभाष गुगळे

८ एप्रिलला सकाळी निगडी येथून निघून द्रुतगती महामार्गाने काशीद चौपाटी येथे गेलो. द्रुतगती महामार्ग सोडल्यावर अत्यंत वाईट रस्ता आणि रस्त्यावर वाहनांच्या प्रचंड गर्दीमुळे वाहतूक खोळंबा यांचा अनुभव आला. पेण गावात न शिरता बाह्यवळण रस्ता वापरुन देखील १५० किमी इतक्या कमी अंतराच्या प्रवासाकरिता एर्टीगाला चार तासांहूनही अधिक वेळ लागणे फारच त्रासदायक वाटले.

शुक्रवार, शनिवार व रविवार येणे टाळा असा सल्ला टॅक्सीचालकाने दिला.