मी काय पाहतोय.....

सुजित जाधव's picture
सुजित जाधव in जनातलं, मनातलं
26 Mar 2022 - 8:49 am

सध्या मी यूट्यूब वरती गावाकडच्या गोष्टी नावाची वेबमालिका पाहतोय. मला माहित नाहीये की तुमच्यापैकी किती लोकांनी ही वेबमालिका पाहिली आहे किंवा ह्या वेबमालिकेबद्दल बद्दल ऐकलं/वाचलं आहे...ज्यांना या वेबमालिकेबद्दल माहिती नाही त्यांच्यापर्यंत हि मालिका पोहचवण्याचा या लेखाच्या माध्यमातून केलेला प्रयत्न…

वेबमालिकेचे नाव: गावाकडच्या गोष्टी
लेखक व दिग्दर्शक : नितीन पवार
निर्माते: कोरी पाटी प्रोडक्शन
एकूण पर्व (Total Season): ३
एकूण भाग: १००
कुठे पाहू शकाल: यूट्यूब वर फुकटात उपलब्ध

खरं तर मला वेबमालिका हा प्रकार थोडासा कंटाळवाणा वाटतो कारण ती पाहण्यासाठी खूप वेळ खर्ची घालावा लागतो. पण गावाकडच्या गोष्टीचे सुरवातीचे काही भाग पाहिले आणि मी ह्या मालिकेच्या अक्षरशः प्रेमात पडलो.. मला गावाकडच्या गोष्टी पाहण्याचे व्यसनच लागलं म्हणा ना..

या मालिकेच्या माध्यमातून नितीन पवार यांनी गावाकडच्या जीवनातील वास्तविकता दाखवली आहे. ही मालिका प्रामुख्याने गाव, गावातील साधीभोळी माणसं, त्यांच्या दैनंदिन जीवनात घडणारे छोटे मोठे प्रसंग आणि गावातील एकंदर जीवन यावर आधारित आहे. मालिकेच्या प्रत्येक भागात गावामध्ये घडणारे छोटे- मोठे प्रसंग दाखवले जातात आणि प्रत्येक कथेच्या माध्यमातून लेखक एका वेगळ्या विषयाला स्पर्श करतो. कधी तो विषय कौटुंबिक असतो तर कधी सामाजिक. तर कधी लेखक एखाद्या व्यक्तीची किंवा समाजातील एका विशिष्ट घटकाची वेदना/ त्याला सहन कराव्या लागणाऱ्या अन्यायाबद्दल सांगतो. कधी या कथा पाहणाऱ्याला भावनिक करतात, कधीकधी एखाद्या व्यक्ती/परस्तिथीविषयी मनात चीड निर्माण करतात. या कथा पाहणाऱ्याला प्रेरणा देऊन जातात, एखाद्या विशिष्ट व्यक्तीविषयी आपल्या मनात आपुलकी निर्माण करतात.

प्रत्येक भागाची सुरुवात अगदी खेळकर असते पण जशी जशी कथा पुढे सरकते तसा एक एक धागा खोलला जातो. प्रेक्षकांना कथेबरोबर खिळवून ठेवण्याचे कसब इतके जबरदस्त आहे की कथा शेवटापर्यंत कधी पोहचली हे देखील समजत नाही. आणि कथेच्या शेवटी आपण कधी हसतो तर कधी रडतो. कधी कधी तर मन सुन्न होऊन जातं. पण प्रत्येक भाग अथवा कथा प्रेक्षकांना एक छानसा संदेश मात्र देऊन जाते. सामान्य माणूस ह्या कथांसोबत अगदी सहजपणे समरस होतो (relate करतो), कारण ह्या त्याच्या दैनंदिन जीवनात घडणाऱ्या कथा आहेत. एकूण १०० भागांमध्ये गावाकडच्या गोष्टींच्या माध्यमातून कोरी पाटी प्रोडक्शनने शेतकरी, आईचे/वडिलांचे प्रेम, गावाकडची प्रेमप्रकरणे, गावातील राजकारण, शिक्षण, गावातील तरुणांचे प्रश्न, महिला सक्षमीकरण अश्या वेगवेगळ्या विषयांना फक्त स्पर्शच केलेला नाहीये तर ह्या विषयांबद्दल सामाजिक जागृती करण्याचे काम देखील केले आहे.

या मालिकेतील कलाकारांच्या अभिनयाबद्दल तर बोलायला शब्द अपुरे पडतील. कोणताही सिनेमा, नाटक किंवा मालिकेच्या यशामागे पडद्यावर अभिनय साकारणाऱ्या कलाकारांची भूमिका खूप महत्त्वाची असते. या मालिकेतील सर्वच कलाकार लेखकाच्या प्रत्येक कथेला व व्यक्तिरेखांना पुरेसा न्याय देण्यात कुठेच कमी पडत नाहीत. संत्या, बापू, सम्या, माधुरी, सुरखी, बाब्या ह्या वेगवेगळ्या पात्रांची भूमिका साकारणाऱ्या कलाकारांनी या वेबमालिकेमध्ये आपली एक वेगळी छाप सोडली आहे. या कलाकारांचा अभिनय पाहताना कुठेही कृत्रिमपणा दिसत नाही.

मी या कथा पाहत असताना माझे मन टवटवीत तर झालेच त्यासोबतच माझ्या मनाच्या छुप्या कोपऱ्यात साठून राहिलेल्या अनेक आठवणी जाग्या झाल्या. हे भाग पाहत असताना मला माझ्या बालपणातील आणि शाळेतील अनेक गोड प्रसंग आठवले. मित्रांसोबत घालवलेले सोनेरी क्षण आठवले. माझ्या आयुष्यातले संघर्षाचे प्रसंग आठवले. प्रत्येक कथेने माझा जीवनाकडे आणि आयुष्यातील विविध गोष्टींकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला. कुटुंबातील आणि समाजातील अनेक व्यक्तींविषयी माझ्या मनात सकारात्मक मत निर्माण करण्यास या कथांनी मदत केली.

शेवटी इतकंच सांगेन कि तुम्ही गावात राहत असाल अथवा नसाल तुम्ही हि वेबमालिका नक्कीच पाहायला हवी. कारण असा अस्सल कन्टेन्ट आणि तोही फ्री मध्ये तुम्हाला नेटफ्लिक्स किंवा अमेझॉन प्राईम वर पण पाहायला भेटणार नाही.

कलाअनुभव

प्रतिक्रिया

सुजित जाधव's picture

14 May 2022 - 9:33 pm | सुजित जाधव

dd

कंजूस's picture

15 May 2022 - 11:36 am | कंजूस

सीजन एक आणि दोन पूर्ण पाहिलेत त्या वेळी. बहुतेक संत्याच हे लिहितो आणि दिग्दर्शक आहे. सर्वच प्रसंग,चित्रीकरण सुरेख जमलंय.
सिनेमात glamourus पात्रे घेऊन नाचगाणी टाकून जे बाजारू भंगार दाखवतात तसं अजिबात नाही.
सातारा परिसर आहे. आणि तो सुंदरच आहे.

सुजित जाधव's picture

15 May 2022 - 3:45 pm | सुजित जाधव

संत्या नाही....या मालिकेचे दिग्दर्शक नितीन पोवार आहेत.

धर्मराजमुटके's picture

19 May 2022 - 12:26 am | धर्मराजमुटके

मै एक्स मुस्लिम हू ही चर्चा पाहिली. भारतात अशा प्रकारे चर्चा होऊ शकते हे पाहूनच सुखद धक्का बसला. १ तास २० मिनिटाची चित्रफीत आहे. वेळ असणार्‍यांनी जरुर पहावी.