जेथोनि सुरुवात होते..

पाटिल's picture
पाटिल in जनातलं, मनातलं
7 Jan 2022 - 9:35 am

तर तेव्हा समजा शाळेत वगैरे जावं लागत असलं आणि अभ्यास वगैरे असला तरीही आम्हाला अगदीच काही कंदीलाच्या वगैरे उजेडात अभ्यास करायची गरज पडली नाही, कारण दुर्दैवाने त्या गावात आधीच लाईट आली होती..!

त्यामुळे "आम्ही कंदीलाच्या उजेडात अभ्यास करून आयुष्यात असे असे झेंडे लावले!" ह्याप्रकारचे चमकदार डायलॉग वेळप्रसंगी मारता येत नाहीत, याची आज मोठीच हळहळ वाटते.

तर जन्मदाते म्हणाले की,''सगळीच पोरं जातेत तर तू बी जात जा शाळेला. उगा पांदीवगळीतनं खेकडी हुडकत फिरण्याबगर हितं बसून तरी दुसरं काय करनार हैस तू ?''

सवाल बिनतोड होता. आणि माझ्याकडे ठोस असं उत्तर नव्हतं. म्हणून मग जावं लागलं.

शिवाय बारक्या गावामध्ये शाळा बुडवून बोंबलत फिरण्याचे कार्यक्रमही फार काळ लपवता येत नाहीत.

कारण त्यामुळे मग नंतर जन्मदात्यांकडून, ''लगाssआसं करू नगू लगा ss..!" साधारण अशा एखाद्या वाक्याने सुरू होणारं लांबलचक चिंतन ऐकून घ्यावं लागायचं..! आणि त्यात एक दचक असायची की न शिकणाऱ्या पोरांचं भविष्यात काहीतरी भयंकर नुकसान वगैरे होतं की काय..!

म्हणून मग जातच रहावं लागलं..

सकाळी सकाळी सगळ्यांनी पळत पळत जायचं.. रांगेत जांभया दाबत वगैरे उभं रहायचं आणि 'तिमिरातुनी तेजाकडे प्रभू आमुच्या ने जीवना' यांसारख्या प्रार्थना खड्या सूरात म्हणण्याची पद्धत होती तेव्हा.

नंतर नंतर अर्थ कळला की, ती कुठल्यातरी सर्वात्मक नावाच्या देवाला विनंती करायची असे की, ''बाबा रे, आम्ही असं असं ह्या ह्या ठिकाणी अंधारात खितपत पडलो आहोत, तर तू आता बिगीबिगी येऊन आम्हाला प्रकाशाकडे घेऊन जाशील तर बरं होईल.''

प्रार्थना, राष्ट्रगीत, प्रतिज्ञा, आजचा सुविचार, दिनविशेष, मूल्यशिक्षण वगैरे सगळा किमान अर्ध्या ते पाऊण तासांचा कार्यक्रम.

त्यात नंतर कारगिल सीमेवर मोठ्या चकमकी सुरू झाल्यामुळे वातावरणात एकदमच देशभक्तीची लाट उसळली.

आणि एकदा लाट उसळली म्हटल्यावर त्या लाटेला वाट करून देण्यासाठी 'ऐ मेरे वतन के लोगों' ह्या गाण्याशिवाय दुसरं कोणतं हक्काचं माध्यम त्यावेळी असणार ! बाकी लता मंगेशकरांनी समजा अतिशय भाव ओतून ते गायलेलं आहे आणि ते ऐकताना पंतप्रधान गहिवरले होते वगैरे सगळं असलं तरीही, रोज सकाळी ते ऐकायची वेळ आली तर रोजच आमचा कंठ कसा काय दाटून येणार..!

परंतु समजा दररोज आमच्याकडून ते सगळं कबूल करून घेतलं नाही, तर भविष्यात आमचं देशबांधवांविषयीचं, समाजाविषयीचं प्रेम कमकुवत वगैरे होवून जाईल, अशी रास्त धाकधूक असावी त्यापाठीमागे.

त्याबद्दल आमचं काही म्हणणं नाही..परंतु त्याबाबतीत आमच्यावर थोडा विश्वास ठेवायला हरकत नव्हती..! असो.

त्यानंतर भूगोलाचा तास, इतिहासाचा तास, मराठीचा तास असं काहीतरी.

खरंतर एकाच शिक्षकाला वेगवेगळ्या विषयांवर मुक्तपणे दळण दळायला तशी काहीच अडचण नव्हती..!

कारण विषय कुठलाही असला तरी शेवटी, तासाला उभं राहिलं की ऐसपैस हुकमी दळण दळता आलं पाहिजे, हे व्यवसायाचं म्हणून एक ज्ञान हरेकापाशी असतंच .!

पण बहुदा फार पूर्वी कधीतरी अशा दळणांतून पीठ होऊन बाहेर पडलेल्या आणि पुढे सरकारात अधिकारी, पुढारी किंवा शिक्षणतज्ञ वगैरे होऊन बसलेल्यांनी, आपापल्या शालेय जीवनाचा धसका घेतलेला असावा.

आणि म्हणूनच प्रत्येक तासाला वेगवेगळे शिक्षक असावेत, हे धोरण लागू झाले असावं, असा एक आपला अंदाज..!

तर त्यावेळी प्रमाण मराठी भाषेत वगैरे शिक्षकांनाच 'गुरूजन' असंही म्हणत.!
अगदी खांडेकरांच्या उपमा उसन्या घेऊन बोलायचं झालं तर 'गुरूजन हे आपल्यावर ज्ञानकणरूपी मोती उधळतात' किंवा 'गुरूजन हे जीवनरूपी सागरातून आपली नौका सुखरूप किनाऱ्याला नेतात' किंवा 'गुरूजन हे ज्ञानरूपी पर्जन्यधारांमध्ये आपणांस चिंब भिजवून टाकतात' असलं काहीतरी म्हणत बसावं लागेल..! आणि तसलं काही नकोच आता..!

बाकी गुरूजनांनी आमच्या आयुष्याला आकार वगैरेही द्यावा, अशी तेव्हाच्या समाजाची अपेक्षा असली तरी, आम्ही कधीच तसल्या भलत्या-सलत्या अपेक्षा बाळगल्या नाहीत..!

''आम्हाला आदर द्या. आम्ही वर्गावर आल्यावर तरी शांत व्हा आणि आम्ही सांगतोय ते अधूनमधून ऐकून घ्या,लिहून घ्या.'' एवढीच माफक आणि रास्त मागणी असायची त्यांची..! तीही धड पुरी व्हायची नाही..! मग त्यात आणखी हे आयुष्याला आकार बिकार कशाला..!

म्हणूनच उदाहरणार्थ इतिहासाचे गुरूवर्य पाच ओळी वाचून दाखवल्या की दीर्घ पॉज घेऊन म्हणायचे की, ''एवढाच मुद्दा लिहून घ्या..!''

पण 'एवढाच मुद्दा' 'एवढाच मुद्दा' करत करत सबंध धडा आणि वर्ष संपता संपता शेवटी संपूर्ण पुस्तक लिहून झालेलं असायचं..!

आख्खं पुस्तकच जर पुन्हा एकदा वहीत लिहून काढायचं असेल तर शिक्षण खातं दरवर्षी एवढी पुस्तकं कशासाठी छापत होतं, असा मूर्ख प्रश्न कुणाला तरी पडेल.

पण,"लिहून देण्याच्या प्रक्रियेमध्ये तासाचा वेळही मस्तपैकी निघून जातो आणि हाताला काम दिल्यामुळे वर्गातली खुसफुसणारी तोंडंही काही काळासाठी बंद होतात.!" ही इतिहासाच्या गुरूवर्यांची दुहेरी व्यावहारिक आयडीया शासनातल्या शिक्षणतज्ञांना कुठून कळणार..!

भूगोलाचे गुरूवर्य शाळाभर तसे विनोदी म्हणून प्रसिद्ध होते.. परंतु आमच्या मते ते एक थोर धोरणी गृहस्थ होते. तासाचा लांबलचक वेळ घालवण्यासाठी त्यांनी स्वतःची अशी एक मेथड डिझाईन केलेली होती.

म्हणजे तास चालू असताना ते अधूनमधून एखादा चावट विनोद करायचे आणि मग सगळा वर्ग पाचेक मिनिटं तरी खिदळत खिंकाळत रहायचा..!

तो मौका अचूक साधून गुरूवर्य सिलॅबसमधली एक-दोन पानं गपकन् खाऊन टाकायचे आणि डायरेक्ट पुढच्याच धड्यावर जंप मारायचे...! झंझटच खतम..!!

पार्श्वभूमी सांगायची झाली तर तेव्हा आमचा युनिफॉर्म म्हणजे खाकी हाफचड्डी, पांढरा शर्ट आणि गांधी टोपी..! अगदी दहावीपर्यंत हेच..!

त्यामुळे समजा आम्ही सगळे असे तरणेबांड लोक हाफचड्ड्या घालून शाळाभर गावभर फिरत असताना भलतेच असामाजिक, केसाळ वगैरे दिसत असणार..

आणि त्यातही समजा वर्गात बेंचवर बसलो असताना, खालच्या दिशेने एक प्रकारचं मोकळं मोकळं, हवाहवाई किंवा बेचैन अशा स्वरूपाचं संमिश्र फिलींग..!

आणि त्यात हे भूगोलाचे गुरूवर्य मधूनच म्हणणार की, "पायावर पाय ठिवून बसू नये माणसानं ss ! सगळं सामान दिसून राह्यते मग..!.. बरोबराय का नाय पाटील??"

झाssलं..! फाफलला मग सगळा वर्ग हसण्याच्या नादात आणि गुरूवर्यांनी मारलीच हनुमानउडी पुढच्या पानावर..!

तिकडे मोहब्बतें रिलीज झाला आणि इकडे साधारण त्याच टायमाला आमच्या‌ तारूण्याला कोवळे कोवळे कोंब फुटायला लागलेले..!

अर्थात यश चोप्रांच्या फॅक्टरीतल्या त्या गोड गुलाबी प्रेमासंबंधी ट्रेनिंग देण्यासाठी कुणी शारूक गिटार किंवा तत्सम व्हायोलिन वगैरे वाजवत आमच्या गावात येणार नव्हता.

पण शेवटी आयुष्यात कुणावाचून कुणाचं काही अडत नाही..! माणूस बघत बघत शिकत जातो या गोष्टी आपोआप..! नजर खुली ठेवली की मग विशेष काही अडचण रहात नाही..!

म्हणजे समजा ते एक साखर-कारखानदारीवालं गाव असेल..! त्यामुळे समजा बघेल तिकडे दाट हिरव्यागार ऊसबागायतीचे दाबजोर पट्टेच्या पट्टे पसरलेले दिसत असतील..!

आणि समजा सगळं शांत असतानाही, रोज दुपारी ठराविक वेळी ठराविक जागेवरचाच ऊस कसा काय हलताना दिसतोय रे?? उभा खोडवा असा कशामुळे थरथरत असेल? कोण शारूक तिथं तबला वाजवत बसला असेल? एकटाच तर नक्कीच नसणार..! आपण ह्याच्यात जरा लक्ष घातलं पायजेल सरकार..! तपास करायला पायजेल काय भानगड है ही नेमकी..! अशा अर्थाची खुसफुस वर्गबंधू, बेंचबंधू शिंदेसरकारांसोबत करण्याचा काळ..!

त्याचवेळी समजा दूरवर कुठेतरी नांगरट चाललेली आहे आणि तो ड्रायव्हर एक रसिक मनुष्य आहे..!

कारण त्या ट्रॅक्टरमधून ''कारभारी दमानंss होऊ द्या दमानंss" या सुरेखाबाईंच्या लावणीची घायाळ लकेर लेहरत लेहरत खिडकीतून वर्गात प्रवेश करतेय, बहुतेकांच्या कानांच्या आत शिरून मेंदूला भलतीच बेफाम करतेय..!

काहींच्या आत विचित्र अनोळखी खळबळ माजवतेय..! काहींना माफक अस्वस्थही करतेय...!

मग शब्दांमागचा अचूक अर्थ पकडून मागच्या बेंचपासून खुसखुस सुरू होतेय..! आणि एकडाव असली चेन रिॲक्शन सुरू झाली की ती काही लवकर थांबत नसतेय..!

उगमस्थानापासून निघालेली खुसुखुसुची लाट वर्गभर सगळ्यांना संसर्ग करत जातेय..!

हसण्याची वाफ पोटातल्या पोटात दाबण्याच्या प्रयत्नात आधी खांदे आणि नंतर सगळं शरीरच गदागदा हलायला लागलंय..!

सर बघतायत..!

बेंचमधी माना घालून आम्ही गदगद थांबवतोय..!

दुर्लक्ष करावं की चिडावं की आता नेमकं काय करावं, ह्यासंबंधी सरांचं अजून नक्की धोरण ठरत नाहीय..!!

आणि तिकडे सुरेखाबाई तर काही थांबतच नाहीयेत..! आणखीनच अस्सल लाडीक सूर लावतायत की, ''पाठीचीss मोडलीss मोडली कमान्..अंग भिजलं घामानंss'' वगैरे.

आता मी पेन खाली पाडून उचलण्याचं नाटक करत हसण्याची वाफ आतल्या आत जिरतेय का बघतोय.!

"काय चाल्लंय रं तुमचं तिकडं??शिंदेss उभा रहाss"

"काय नाय सर." --शिंदेसरकार.

"काय नाय कसं? तुज्या मनात कायतरी काळं आलंय.!".
(सर अशक्य आहेत.!!)

"नाय सर..! माजं काय नाय, ह्या पाटलाच्याच मनात पयलांदा काळं आलं..! त्येनंच मला खुणावलं सर.'' (शिंदेसरकार सरांपेक्षाही अशक्य आहेत..!)

हे ऐकताच खुसखुसुच्या चेन रिॲक्शनचं रूपांतर आखिरीच्या तडाखेबंद ब्लास्टमधी होतंय.

ह्या दगाबाज शिंदेवर्गबंधूचं काय करावं, ह्या विचारात मी खजिल होत्साता उभा राहतोय..

"चला बाहेर व्हा दोघंबीss नालायक कुठले..!"

(शब्दार्थ: मनात काळं आलं= मनास पापभावनेचा वगैरे स्पर्श झाला)

(क्रमशः)

याआधीचा तुकडा:
https://www.misalpav.com/node/48920

विडंबनशिक्षणमौजमजाप्रकटनविरंगुळा

प्रतिक्रिया

सुरिया's picture

7 Jan 2022 - 10:30 am | सुरिया

चाराण्याची सगळी कडे कॉमन असणारी कथा कोंबडी.
तिला बाराण्याचा सुहास शिरवळकरांचां उधार घेतलेला मसाला.
.
एकूण काही मजा नाही.
पुलेशु.

सिरुसेरि's picture

7 Jan 2022 - 6:14 pm | सिरुसेरि

छान वर्णन . एस्टी ने प्रवास करताना , अनेकदा मधे लागणा-या छोट्या गावांमधे अशा शाळा आणी तेथील डोक्यावर टोपी घातलेली शाळकरी मुले दिसत .

सुखी's picture

19 Jan 2022 - 10:29 pm | सुखी

लै हसलो राव