आधीचा भाग :
कोकण, तळ-कोकण आणि गोवा रोड ट्रिप - १
सकाळी नऊच्या सुमारास जाग आली.
काल येताना दुध आणायचे राहुन गेले होते पण घरात Dairy Whitener होते, ते घालुन चहा बनवून प्यायला आणि नाष्ट्यासाठी पेण मधील श्री ऊपाहार हॅाटेलचे मेनु कार्ड बघुन ‘आज स्पेशल’ विभागात वारा नुसार दिलेल्या यादीतील गुरूवारी मिळणाऱ्या छोले भटुऱ्यांची ॲार्डर व्हॅाट्सॲपवर दिली.
ह्या हॅाटेल मध्ये अजुन प्रत्यक्षात कधी गेलो नव्हतो पण होम डिलेव्हरी मिळत असल्याने पहिल्या लॅाकडाऊन काळात इथून नाश्ता/जेवणासाठी बरेचदा मागवलेले सर्वच पदार्थ छान असायचे.
पलीकडून साडे दहा पर्यंत डिलेव्हरी मिळेल असा रिप्लाय आल्यावर मग अंघोळ आणि बाकी सर्व तयारी झाल्यावर पार्सलची वाट बघत बसलो. सांगीतलेल्या वेळेवर डिलेव्हरी मिळाली. नाश्ता झाल्यावर परत चहा करून प्यायला आणि कप, प्लेट्स धुण्याचे कंटाळवाणे काम उरकल्यावर साडे अकराच्या सुमारास पुढच्या प्रवासाला निघालो.
खोपोली - पेण हायवे वरून पेण बायपास रोडसाठी उजवे वळण घेऊन दहा मिनिटात तरणखोपला पोचून डावे वळण घेतल्यावर राष्ट्रीय महामार्ग क्र. 66 (NH-66) वरून पुढचा प्रवास सुरु झाला.
महामार्गाच्या रुंदीकरणाचे काम अद्याप अपूर्णावस्थेत असले तरी अजून पूर्वीसारखी प्रचंड राहादारी सुरु झाली नसल्याने दोन वाजण्याच्या सुमारास पोलादपूर पर्यंतचा १२० किलोमीटर्सचा पल्ला गाठता आला.
कशेडी घाट सुरू होण्याआधी चहा पिण्यासाठी थांबुन हात पाय थोडे मोकळे झाल्यावर पुढच्या २५ कि.मी. अंतराच्या प्रवासाला सुरूवात केली.
घाटात एके ठिकाणी उलटलेला ट्रक क्रेनच्या सहाय्याने बाजुला करून रस्ता मोकळा करण्याचे काम चालु असल्याने जवळपास अर्धा तास वाहतुक बंद पडली होती. त्यामुळे उरलेले अंतर कापायला बराच वेळ लागला आणि साडे तीनच्या सुमारास भरणे नाक्याच्या ३ कि.मी. अलिकडे, हॅप्पी पंजाबी ढाब्याच्या अगदी समोर असलेल्या ‘पार्थ पॅालिमर्स’ ह्या माझ्या मामे भावाच्या (बोली भाषेत कुठल्याही कंपनीची असली तरी सिंटेक्स ची टाकी म्हणुन ओळखल्या जाणाऱ्या 😀) पाणी साठवण्याच्या टाक्या (Plastic Water Storage Tank) बनणाऱ्या फॅक्टरीत पोचलो.
हा भाऊ नवी मुंबईला रहात असला तरी कामा निमित्त महिन्यातले साधारणपणे पंधरा-वीस दिवस त्याचा ह्या ठिकाणी मुक्काम होतो. त्याच्या वैयक्तिक वापरासाठी दोन आणि ॲाफीस साठी दोन अशा चार खोल्या फॅक्टरीच्या आवारात बांधलेल्या असल्याने इथे माझी रहाण्याची उत्तम सोय होती.
गेट अडवुन उभ्या असलेल्या ट्रक मध्ये लोडींगचे काम चालु असल्याने बाईक बाहेर रस्त्यावरच उभी करून ट्रकच्या बाजुने आत शिरल्यावर भावाला भेटून रूममध्ये सामान टाकले आणि फ्रेश झालो. आता भुक लागली होती आणि तोही मी येईपर्यंत जेवायचा थांबला असल्याने मग दोघांनी समोरचा हॅप्पी पंजाबी ढाबा गाठला.
हा धाबा चांगला मोठा आहे. सात-आठ वर्षांपूर्वी भावाने पनवेलहुन त्याचा प्लॅंट इथे शिफ्ट केल्या पासुन अनेकदा ह्या ठिकाणी येणे होते. कोकणात किंवा गोव्याला जाता-येतांना जेवायला आम्ही शक्यतो ह्याच धाब्यावर येतो. इथले व्हेज - नॅानव्हेज सगळे पदार्थ चविष्ट असतात.
धाब्यावर गेलं की टेबल खुर्चीवर बसुन जेवण्यापेक्षा मधे लाकडी फळी ठेवलेल्या खाटेवर मस्तपैकी मांडी घालुन बसुन जेवायला आवडत असल्याने आम्ही खाटा टाकलेल्या सेक्शन मधे जाऊन बसलो. चार वाजत आले होते त्यामुळे ह्या आडनीड्या वेळी काय मागवायचे ह्यावर विचार करत न बसतां सरळ दाल तडका, बटर रोटी आणि मसाला ताक अशी ॲार्डर देऊन मोकळे झाल्यावर शिळोप्याच्या गप्पा सुरू झाल्या.
माझा भटकंतीचा कच्चा आराखडा ऐकुन तो चांगलाच ऊत्तेजित झाला. लॅाकडाऊन मुळे सहा महिने फॅक्टरी बंद राहिल्याने झालेले नुकसान भरून काढण्यासाठी गेले चार महिने इथेच तळ ठोकुन कामगारांच्या बरोबरीने स्वत: राबत असल्याने बिचारा शरीराने आणि मनाने थकला होता. त्यालाही एका ब्रेकची नितांत गरज होती.
कोकणातल्या दुर्गम खेड्यापाड्यांतील वस्त्यांना पाण्याच्या साठवणुकीची व्यवस्था करून देणे तसेच ग्रामीण भागांतील शाळांना पिण्याच्या पाण्यासाठी जलशुद्धीकरण यंत्रणा बसवुन देण्याचे सेवाभावी काम करणाऱ्या एका NGO ची घाऊक प्रमाणातली पाण्याच्या टाक्यांची ॲार्डर पुर्ण करण्याच्या कामात तो सध्या व्यस्त होता.
पुढच्या दोन दिवसांत त्याचे हे काम पुर्ण होणार असल्याने मी उद्या सकाळी पुढच्या प्रवासाला निघण्याऐवजी आणखीन दोन दिवस थांबुन निघालो तर त्यालाही माझ्या बरोबर ह्या सफरीवर येणे शक्य असल्याचे त्याने सांगितल्यावर “एक से भले दो” म्हणत आनंदाने त्याचा प्रस्ताव मान्य करून उत्साहाच्या भरात कचा कच हिरव्या मिरच्या खात, ताक पित जेवण झाल्यावर आम्ही फॅक्टरीत परत आलो.
सात वाजता जवळच्या कळंबणी गावात रहाणारा मशिन ॲापरेटर आणि एक स्थानिक हेल्पर मशिन बंद करून घरी जायला निघे पर्यंतचा वेळ प्रोडक्शनची प्रोसेस बघण्यात मस्त गेला. वर्क शेडच्या मागे बांधलेल्या खोपटात रहाणाऱ्या दोन परप्रांतीय हेल्पर्सनी बाकीची आवरा आवर करायला घेतल्यावर आम्ही रूम मध्ये आलो.
मागच्या खोपटात रहाणारे पंकज आणि बाबु हे झारखंडचे दोन वीस-बावीस वर्षीय हेल्पर्स स्वयंपाकाचे काम आळीपाळीने करत असल्याने शुद्ध शाकाहारी असलेल्या भावाला घरगुती जेवण मिळत असल्याने त्याच्या जेवणाची सोयही चांगली होते.
रात्री साडे नऊच्या सुमारास हॅप्पी धाब्यावरून मागवलेल्या तंदुर रोट्या आणि पंकजने कच्चे टोमॅटो घालुन बनवलेली हरभऱ्याची उसळ टाईप चवीष्ट भाजी असे जेवण झाल्यावर आवारातच शतपावली घालुन आम्ही रूमवर परतलो. थंडी चांगलीच जाणवत असल्याने उबदार पांघरूणात शिरल्यावर झोपही पटकन लागली.
सकाळी दहाच्या सुमारास जाग आली. ब्रश करून वर्क शेड मध्ये आलो तेव्हा भावासहित सगळे जण कामाला लागलेले दिसले. खोपटात बाबूने कांदे पोहे आणि चहा बनवून ठेवला होता तिकडे चक्कर टाकली आणि चहा नाश्ता केल्यावर पुन्हा वर्क शेड मध्ये आलो तेव्हा तयार झालेली 2 टाक्यांची आजची पाहिली बॅच ओव्हरहेड क्रेनच्या साहाय्याने मशीन मधून बाहेर काढण्याचे काम चालू होते.
पोत्यामधून आलेल्या पावडरचे पूर्णपणे तयार झालेल्या टाकीत रूपांतर होण्याची प्रक्रिया फार रंजक असते!
त्या दिवशी आणि त्याच्या पुढच्या दिवशी उत्पादन प्रक्रिया नुसती बघत न बसता त्यात प्रत्यक्ष सहभाग घेतल्याने वेळही मजेत गेला आणि ओव्हरहेड क्रेन ऑपरेट करून वजनदार धातूचे मोल्ड्स उचलून मशीनच्या चक मध्ये व्यवस्थित बसवता येणे, मशीनच्या तळाशी असलेल्या गॅस बर्नर्स मुळे निर्माण होणाऱ्या उष्णतेने चक वर सतत फिरत असणाऱ्या मोल्ड्सच्या आत कच्च्या मालाच्या स्वरूपात भरलेले प्लास्टिकचे दाणे/पावडर वितळल्यावर ते द्रवरूप प्लास्टिक मोल्डच्या तळाशी आणि तोंडाशी समप्रमाणात पसरण्यासाठी, काही लीव्हर्स पुढे मागे करत मशीन सी-सॉ सारखी हलती ठेवणे, निर्मितीची प्रक्रिया पूर्ण झाल्यावर पुन्हा मशीन मधले मोल्ड्स क्रेनने बाहेर काढून थोड्या अंतरावर नेऊन ठेवणे, मोल्ड्स थंड झाल्यानंतर त्यातून तयार झालेल्या टाक्या बाहेर काढल्यावर त्यावर स्क्रीनच्या साहाय्याने ब्रॅण्डिंग करणे अशा खूप काही नवीन गोष्टी शिकून त्या प्रत्यक्षात करायलाही मिळाल्या.
ऑर्डर पूर्ण होण्यासाठी आवश्यक तेवढे उत्पादन झाल्यावर फॅक्टरीची धुरा ऑपरेटर आणि कामगारांच्या हाती सोपवून 24 तारखेला जेवण करून दुपारी एक वाजता आम्ही दोघे रत्नागिरीला जायला निघालो.
हा प्रवास किनारी मार्गाने करायचे ठरवले होते. तिथून 33 की.मी. वर असलेल्या दापोलीच्या एका डीलरकडे भावाचे थोडे काम असल्याने तिथे एक दहा-पंधरा मिनिटांचा थांबा घेतल्यावर पुढे 30 की.मी. प्रवास करून दुपारी साडे तीनला दाभोळ-धोपावे फेरी बोटी साठी असलेल्या धक्क्यावर पोचलो.
तवसाळच्या धक्क्याच्या थोडे अलीकडे टिपलेले सूर्यास्ताच्या आधीचे दृष्य.
आम्ही तवसाळ धक्क्यावर पोचायच्या आधी 5:40 ची बोट निघून गेल्याने पुढच्या 6:40 च्या बोटीसाठी जवळ जवळ पाऊण तास वाट बघावी लागली.
धक्क्यावरून दिसणारी काही दृष्ये जयगडसाठीच्या धक्क्यावरून झालेले चंद्रदर्शन"आज नऊ तासात जवळपास 165 की. मी. प्रवास झाला होता. गुगल मॅप्स वर बघता हा प्रवास NH66 वरून 135 की. मी.अंतराचा झाला असता आणि चार तासात पूर्ण करता आला असता."
अकरा वाजेपर्यंत निरभ्र आकाशातील तारे बघत गच्चीत बसून गप्पा मारल्यावर खाली आलो आणि निद्रादेवीच्या स्वाधीन झालो.
पुढचा भाग :
कोकण, तळ-कोकण आणि गोवा रोड ट्रिप - ३
प्रतिक्रिया
28 Dec 2021 - 7:50 am | जेम्स वांड
मी पयला
28 Dec 2021 - 7:55 am | जेम्स वांड
प्रवासवर्णन आवडलेच, प्रवास उत्तम आहे. तुम्हाला (अन इथल्या इतरेजनांना पण ) नवल वाटेल पण मी आजवर एकदाही कोकणात फिरलो नाहीये. अगदी अलिबाग पण नाही, त्यामुळे हे सगळे मला एखाद्याने लदाख ट्रिपचे वर्णन टाकावे तितके सुरस आहे. (माझ्या वैयक्तिक फायद्यापुरते) जर प्रत्येक भागासोबत मॅप जोडले तर पुढेमागे फिरण्याच्या हिशोबाने मला एक उत्तम सेलफोन साईझ टूर गाईड मिळेल. फेरी बोट वगैरे वाचून मस्तच वाटलं एकंदरीत पण.
28 Dec 2021 - 10:30 am | टर्मीनेटर
@ जेम्स वांड
प्रतिसादासाठी आभार 🙏
नकाशे जोडण्याची प्रथा मी सहसा पाळतो पण ह्यावेळी ते जोडायचे राहून गेले, हरकत नाही नंतर जोडतो.
तुम्ही कोकण अजूनपर्यंत बघितला नाहीत ह्याचे आश्चर्य नक्कीच वाटले. कधी अलिबाग दौरा काढलात तर कळवा, आमच्या विकएंड होम पासून ३० की. मी. वर आहे, तिथे असलो तर भेटता येईल. (एकटे असाल तर धुडगूस घालता येईल हे वेगळे सांगणे न लगे 😀)
28 Dec 2021 - 11:29 am | जेम्स वांड
आणि नक्कीच, कधी तर मुहूर्त लागला तर नक्कीच कळवतो.
28 Dec 2021 - 9:32 am | प्रचेतस
तपशीलवार वर्णनामुळे लज्जत अजून वाढतीय. डबलसीट गेल्यामुळे काही त्रास वगैरे झाला का? विशेषतः मागे बसलेल्याचे हाल होतात.
वेळणेश्वर, हेदवी तुम्ही चक्क टाळलेत. दोन्ही ठिकाणे अतिशय सुंदर आहेत.
पुढचा भाग लवकर येऊ द्यात. कोकण दर्शन कितीही वेळा वाचले तरी तृप्ती कशी ती होत नाहीच.
28 Dec 2021 - 11:04 am | टर्मीनेटर
@ प्रचेतस
प्रतिसादासाठी आभार 🙏
बरोबर आहे, मला फार वेळ मागे बसलो तर त्रास होतो त्यामुळे जाता-येतानाच्या प्रवासात मीच बाईक चालवत असल्याने काही त्रास असा जाणवला नाही (मागे बसलेल्या भावानेही काही कुरकुर केली नाही म्हणजे बहुदा त्यालाही विशेष त्रास झाला नसावा असे मानण्यास वाव आहे 😀)
फक्त गोव्यातली बहुतांश भटकंती ('ड्रन्क अँड ड्राइव्ह' चे झेंगाट मागे लागायला नको म्हणुन 😀) मी मागे बसून केली.
ही दोन्ही ठिकाणे अर्थातच सुंदर आहेत. गुहागर जवळील कोळथरे येथील 'कोळेश्वर' आमचे कुलदैवत असल्याने तिथे अनेकदा जाणे झाले आहे तेव्हा आसपासची सर्व ठिकाणे किमान एकदातरी बघून झालेली असल्याने आत्ता जाणे टाळले.
(परतीच्या प्रवासात जमल्यास तिथेही जायचे ठरवले होते पण ह्या दौऱ्यात नाही जमले.)
28 Dec 2021 - 11:14 am | प्रचेतस
गोव्यातली भटकंतीचे वर्णन वाचणे अगत्याचे आहेच.
29 Dec 2021 - 10:18 am | रंगीला रतन
'ड्रन्क अँड ड्राइव्ह' चे झेंगाट मागे लागायला नको म्हणुन
हे बेष्ट केले :=)
हा भाग पण आवडला. पुभाप्र.
28 Dec 2021 - 9:37 am | Bhakti
छान लिहताय!
28 Dec 2021 - 11:06 am | टर्मीनेटर
धन्यवाद भक्ती 🙏
28 Dec 2021 - 11:09 am | कुमार१
ओघवते, सुंदर आणि लज्जतदार वर्णन !
त्याला फोटोंची जोड सुरेखच..
28 Dec 2021 - 11:27 am | टर्मीनेटर
धन्यवाद कुमार साहेब 🙏
28 Dec 2021 - 3:00 pm | ॲबसेंट माइंडेड ...
छान. हा भागही आवडला.
28 Dec 2021 - 4:10 pm | गोरगावलेकर
हा भागही आवडला
28 Dec 2021 - 7:36 pm | टर्मीनेटर
ॲबसेंट माइंडेड & गोरगावलेकर
प्रतिसादासाठी आपले आभार 🙏
29 Dec 2021 - 11:24 am | जेम्स वांड
जर ह्या रेस्टॉरंट मध्ये जेवले नसाल तर नेक्स्ट व्हिजिटला नक्की ट्राय करा, टीपीकल गोवनीज थाळी असतात फक्त, पांढरा किंवा उकडा भात तळलेला मासा, मासा करी, ते कोकम आगळ अन मिर्चीचं पाणी सोबत इतरही गोवनीज आयटम, जेवणाच्या शेवटी मस्त बेबींक वगैरे स्वीट, माझ्यासाठी तरी गोवनीज जरा अकवायर्ड टेस्ट होती, तुम्हाला थेट गोवनीज आवडत असेल तर नक्की भेट द्या, पणजी ते मिरामर रोडवर मिलीटरी हॉस्पिटलच्या अगदी समोरासमोर आहे.
29 Dec 2021 - 7:27 pm | टर्मीनेटर
वांड भाऊ,
मी एकवेळ माणूस खाऊ शकतो पण मासा नाही हो खाऊ शकत 😀
माझ्या मासे न खाण्यामुळे दक्षिण गोव्यातील कुर्तोरीम येथे बायकोच्या आजोळी सदिच्छा भेटीसाठी गेल्यावर त्या घरातल्या सकाळ-संध्याकाळ मासे खाणाऱ्या मंडळीना एक वेळचे जेवण माशांशिवाय खावे लागण्याची शिक्षा भोगावी लागते 😀
29 Dec 2021 - 7:33 pm | जेम्स वांड
मिश्राहारी का शाकाहारी तुम्ही ? मिश्राहारी असल्यास सगळे खाता पण मासे नाही हे अंमळ चमत्कारिक वाटले बघा टर्मी भाऊ
29 Dec 2021 - 7:40 pm | टर्मीनेटर
पार्टली मिश्राहारी!
माशांचा वास बिलकुल सहन होत नसल्याने ते अजिबात खाऊ शकत नाही, एवढंच नाही तर ते बनत असलेल्या ठिकाणी थांबूही शकत नाही. सॉलिड ऍलर्जी आहे मला त्या वासाची असे म्हंटले तरी चालेल 😀
29 Dec 2021 - 2:20 pm | कंजूस
एकाच लेखात उरकण्यासारखी ट्रिप नाही. मी मागच्या भागात उगाचच म्हटले की एक वर्षानंतर का लिहिता.
// एक से भले दो” म्हणत आनंदाने त्याचा प्रस्ताव मान्य करून उत्साहाच्या भरात कचा कच हिरव्या मिरच्या खात, ताक पित जेवण झाल्यावर आम्ही फॅक्टरीत परत आलो.
//
काय काय प्रसंग ओढवतात पाहा. शिवाय कुणाला नाही म्हणायचं नाही हे रक्तात का आलं हे कळलं. 😀
सूर्यास्ताचे फोटो भारी.
जयगड -तवसाळ फेरीवाला पूर्वी पुण्यात राहात असावा हे पाटी वाचून लगेच लक्षात येतंय. पाटीवरचे वेळापत्रक पुढे प्रवाशांना उपयोगी ठरेल.
बाकी लेखकाचे मामे,चुलतभाऊ कोकण, गोवा, कर्नाटक, केरळ, तमिळनाडूतील कन्याकुमारीपर्यत ठाणी मांडून बसलेले आहेत तेही रसीक आहेत. असं काही आमचे नसल्याने रेल्वेची चाके धरून थेट जातो.
हेवा करत वाचणार आहे. असो. जीवन सुंदर आहे.
29 Dec 2021 - 7:33 pm | टर्मीनेटर
😀 😀 😀
प्रतिसादासाठी आभार 🙏
30 Dec 2021 - 12:03 pm | पाषाणभेद
अगदी सखोल प्रवासवर्णन वाचून आपणही प्रवास करतो आहे असे वाटते आहे.
30 Dec 2021 - 12:51 pm | टर्मीनेटर
धन्यवाद पाषाणभेद साहेब 🙏
30 Dec 2021 - 4:34 pm | कर्नलतपस्वी
वर्णन तर छानच पण फोटो खुपच सुदंर आहेत.
बाय रोड प्रवासाची आणी ते सुद्धा स्वताःच्या गाडीने मजा काही औरच असते.
31 Dec 2021 - 2:21 pm | टर्मीनेटर
धन्यवाद कर्नल साहेब 🙏
3 Jan 2022 - 8:58 am | जेम्स वांड
नेक्स्ट पार्ट कधी यायचा ??
4 Jan 2022 - 6:12 pm | टर्मीनेटर
वांड भाऊ,
उद्या किंवा परवा टाकायचा प्रयत्न करतो!
3 Jan 2022 - 1:48 pm | ज्ञानोबाचे पैजार
भरगच्च फोटोयुक्त प्रवासवर्णन आवडले.
श्री उपहारगृहाचे मेन्युकार्ड कसले तपशीलवार लिहिलेले आहे. त्याच प्रमाणे फेरी बोटीच्या फलकावरील सुचना सुध्दा मजेदार आहेत.
ग्रॅन्युअल्स पासुन मोठी टाकी बनतानाची प्रकिया खरेच मनोरंजक असते. एवढीशी जरी चूक झाली तरी सगळी मेहनत वाया जाते.
पुढचा भाग लवकर लिहा
पैजारबुवा,
3 Jan 2022 - 2:21 pm | सिरुसेरि
रंगतदार प्रवास वर्णन . पुभाप्र .
3 Jan 2022 - 4:24 pm | अनिंद्य
झकास !
पु भा प्र.
मेनूकार्डात 'अल्पोपहार' आणि 'भोजन' असे लिहिणाऱ्याचे कौतुक करावे हा विचार बाजूच्याच रकान्यातल्या 'मराठी जायका' ने डोक्यातून हद्दपार केला :-)
3 Jan 2022 - 4:25 pm | अनिंद्य
.... फेरीवाला पूर्वी पुण्यात राहात असावा हे पाटी वाचून लगेच लक्षात येतंय.... :-) ;-)
4 Jan 2022 - 6:10 pm | टर्मीनेटर
@ ज्ञा.पै., सिरुसेरी आणि अनिंद्य
प्रतिसादासाठी आपले मनःपूर्वक आभार 🙏
5 Jan 2022 - 11:28 am | नचिकेत जवखेडकर
अरे व्वा! फारच छान प्रवासवर्णन ..
5 Jan 2022 - 1:37 pm | टर्मीनेटर
धन्यवाद नचिकेत जवखेडकर 🙏
5 Jan 2022 - 2:25 pm | कंजूस
आणि विनोदी टिपण्या आणि ओढवलेले प्रसंग ( इष्टापत्ती ?) असलेला पुढचा भाग लवकर आलाच पाहिजे.
आमचं रेस्ट फ्रॉम होम चालू आहे. मिपावर काही वाचायला नसेल आणि स्वयंपाक घरातले डबे रिकामे असले तर मानसिक /शारिरीक त्रास होतो.
5 Jan 2022 - 3:58 pm | टर्मीनेटर
😀 😀 😀
लिहितो आज उद्या कडे...मालिका लिहायला घेतली की कामे वाढतात, असे का होतंय समजत नाहीये :)
5 Jan 2022 - 5:18 pm | मुक्त विहारि
सार्वजनिक अनुभव आहे
5 Jan 2022 - 5:25 pm | टर्मीनेटर
मग ठीक आहे! मला वाटलं की माझ्याच बाबतीत असं होतंय की काय 😀
5 Jan 2022 - 6:01 pm | मुक्त विहारि
दीर्घांतर ठेऊन लिहिलेल्या मालिका सापडतील...
प्रवासवर्णन पुर्ण करणारे मात्र बरेच जण आहेत
त्यामुळे, तुमचे प्रवासवर्णन नक्कीच पुर्ण होईल...
अशीच एक दुर्दैवी अर्धवट मालिका आठवली...
तेरी केहॆके लुंगा, ही अशीच एक दुर्दैवी मालिका
5 Jan 2022 - 6:11 pm | टर्मीनेटर
+१
5 Jan 2022 - 6:30 pm | मुक्त विहारि
हो
5 Jan 2022 - 6:51 pm | Nitin Palkar
सुरेख वर्णन....नेहमी प्रमाणेच..
5 Jan 2022 - 6:59 pm | मदनबाण
वर्णन आणि फोटो दोन्ही मस्त ! :)
हल्ली मी जाहिराती संधी सोडत नसल्याने :) :-
चित्रमय कोकण दर्शन (भाग १)
चित्रमय कोकण दर्शन (भाग २) श्री व्याडेश्वर मंदिर
चित्रमय कोकण दर्शन (भाग ३) श्री दुर्गा देवी
चित्रमय कोकण दर्शन (भाग ४) गुहागर समुद्र दर्शन.
[ मालवणी खडखडे लाडू प्रेमी ] :)
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Maai Bappa Vithala
6 Jan 2022 - 1:51 pm | टर्मीनेटर
@ Nitin Palkar & मदनबाण
प्रतिसादासाठी आपले मनःपूर्वक आभार 🙏
😀
नक्की वाचतो हे चारही भाग निवांतपणे.
धन्यवाद.
7 Jan 2022 - 6:54 pm | तर्कवादी
मी २०११ ला गणपतीपुळे ला ५ दिवस सुटी निवांत घालवली होती तेव्हा जयगड किल्ला बघून मग जयगड-तवसाळ आणि पुन्हा परत अशी फेरी केली होती (मारुती ८०० बोटीत चढवून). खरंतर तवसाळला जावून काय करायचं माहित नव्हतं पण बोटीच्या प्रवासाकरिता गेलो.. मग तिथे जावून कोणतीतरी प्रसिद्ध घळ पाहिली (आता नाव आठवत नाही - फोटोज आहेत)
7 Jan 2022 - 8:23 pm | कंजूस
या विडिओत
https://youtu.be/KIfJGqCiQ84
दाखवलेली?
10 Jan 2022 - 1:39 pm | चौकस२१२
कशेळि मन्दिर
वाह सुंदर लाकूड काम .. आणि वैगरे स्थानिक पद्धतीचे दिसतंय.. नाहीतर गंपती पुळे .. काँक्रीट चे !
10 Jan 2022 - 1:41 pm | चौकस२१२
मेघडंबरी म्हणतात का त्याला
9 Jan 2022 - 7:06 pm | तर्कवादी
10 Jan 2022 - 12:48 pm | टर्मीनेटर
@ तर्कवादी - लहानशी घळ मस्त दिसत आहे 👍
जालावर थोडी शोधाशोध केली पण तिच्या बद्दल काही माहिती सापडत नाहीये.
कोलंबसाने म्हणे अमेरिका शोधून काढली तसे ह्या अपरिचित घळीच्या शोधाचे श्रेय तुम्हाला द्यायला हरकत नाही.
ही निनावी घळ आजपासून 'तर्कवादी घळ' नावाने ओळखली जावी 😀
10 Jan 2022 - 1:29 pm | प्रचेतस
ती हेदवीची बामणघळ दिसतेय.
10 Jan 2022 - 1:33 pm | टर्मीनेटर
माझ्यामते ही ती घळ नसावी!
हेदवीची बामनघळ पाहिली आहे, ती आकाराने मोठी आहे.
10 Jan 2022 - 1:35 pm | चौकस२१२
हो वाटतीय खरी
10 Jan 2022 - 2:03 pm | टर्मीनेटर
बामणघळीचे हे फोटो जालावर सापडले
तवसाळ पासून ही १२-१३ की. मी वर आहे.
आकारावरून मी थोडा साशंक असलो तरी तर्कवादी तिथपर्यंत गेले असतील तर ही बामणघळच असावी.
10 Jan 2022 - 2:32 pm | प्रचेतस
बामणघळीचं मुख भरतीच्या वेळी लहानच दिसते, ती खूप आतपर्यंत पसरत गेल्यामुळे कड्याच्या बाजूची तिची छायाचित्रे वेगळी दिसतात असे वाटते.
10 Jan 2022 - 2:40 pm | टर्मीनेटर
+१
तसेच असावे!
10 Jan 2022 - 3:41 pm | तर्कवादी
बरोबर आहे.. पण तुम्ही शेअर केलेले फोटो खूप दिलखेचक आहेत .. मी ह्या कोनातून घळ बघितलीच नाही बहुधा.. असो.
10 Jan 2022 - 3:57 pm | टर्मीनेटर
आणि मी ह्या कोनातून ती पूर्वी बघितली असल्याने मला तुमच्या फोटोतली लहान वाटली असावी बहुतेक 😀
10 Jan 2022 - 3:39 pm | तर्कवादी
हेदवी आणि बामणघळ ही दोन्ही नावे ऐकल्यासारखी वाटत आहेत.. त्यामुळे ही बामणघळच असावी..
तार्पर्यः
फिरताना डायरीत नोंदी ठेवणे गरजेचे आहे.. आजकाल वॉटस अॅपवर त्या त्या ट्रिपकरिता एक ग्रुप बनवून त्यात जमतील तशा नोंदी ठेवू लागलो आहे.
10 Jan 2022 - 3:36 pm | तर्कवादी
हा हा.. खरेच अशा काही अनवट जागा माझ्याकडून्न शोधल्या जाव्यात.. पण ही अशी घळ बघण्यासारखी आहे हे लोकंकडून (बोटीवरील तसेच तवसाळमधले लोक आणि कुठेतरी जेवण घेतले ते हॉटेलचालक) समजल्यानेच ती बघायला गेलो होतो.
10 Jan 2022 - 4:33 pm | कंजूस
बसने जाणं अवघड असतं. कारण जाणारी बस त्या गावापर्यंतच जाते. परतीच्या बसही जास्ती नसतात. मग पुन्हा ओटो रिटन फेअरने जाणे महागात पडते. त्यासाठी स्वत:चेच वाहन हवे. किंवा तर्कवादी बनून फोटो/विडिओंवरच समाधान मानायचे.
10 Jan 2022 - 4:52 pm | टर्मीनेटर
सहमत आहे!
10 Jan 2022 - 5:54 pm | तर्कवादी
हा हा..
10 Jan 2022 - 5:15 pm | चौथा कोनाडा
सुपर !
लै भारी !!
एक नंबर !!!
12 Jan 2022 - 6:17 pm | कॅलक्यूलेटर
उत्तम प्रवास वर्णन. खूप वर्षांपूर्वी केलेलया धोपावे गणपतीपुळे दापोली गुहागर भटकंतीच्या आठवणी जाग्या झाल्या. ओम्नी मध्ये केवळ ५०० रुपये प्रति व्यक्ती मध्ये पूर्ण झाली होती तेव्हा आमची हि भटकंती.
12 Jan 2022 - 6:38 pm | रात्रीचे चांदणे
नेहमी प्रमाणेच वाचनीय प्रवासवर्णन, पुढचे भाग पटापट येऊ द्या.
13 Jan 2022 - 12:19 pm | टर्मीनेटर
@ चौथा कोनाडा, कॅलक्यूलेटर & रात्रीचे चांदणे
प्रतिसादासाठी आपले मनःपूर्वक आभार 🙏
19 Jan 2022 - 12:39 pm | एक_वात्रट
हाही भाग सुंदर! नुकताच वेळणेश्वराला जाऊन आल्यामुळे जयगड तवसाळ फेरीच्या आठवणी ताज्या आहेत. पुढील भागाच्या प्रतिक्षेत.
25 Jan 2022 - 11:08 am | टर्मीनेटर
तुमच्या वेळणेश्वर सहलीचे वर्णन येउद्यात... वाचायला आवडेल.
धन्यवाद.