पद्याव्हान १ - लिमरिक्

धष्टपुष्ट's picture
धष्टपुष्ट in जे न देखे रवी...
26 Nov 2021 - 11:36 pm

लिमरिक् हा इंग्रजीतला प्रख्यात विनोदी आकृतिबंध पाचच ओळींचा असतो म्हणून पहिल्यांदा घेतला.

हा बऱ्याचदा भलताच चावट असतो, पण एक साधं उदा:
There was a young woman named Bright, (A)
Whose speed was much faster than light.(A)
She set out one day, (B)
In a relative way, (B)
And returned on the previous night. (A)

इंग्रजीतल्या शब्दांत साघात आणि निराघात syllables असल्यामुळे लिमरिकची एक विशिष्ट लय असते. ती मराठीमध्ये आणणं कठीण आहे, पण आवश्यक काही बदल करून खाली लक्षणं देतोय:
१. पहिल्या ओळी मध्ये एखाद्या व्यक्तीचं किंवा गावाचं नाव असतं. उदा पुण्याचा, विनीता इ.; किंवा व्यक्तिविशेष - आपले नायक/नायिका पुढारी असतील, शाळकरी असतील,अमुक, तमुक. वरच्या उदाहरणात Bright हे मुलीचं नाव.

२. वृत्त (प्रायोगिक तत्वावर): लगागा लगागा लगागा लगागा. पण गुरुच्या ठिकाणी दोन लघु अक्षरं वापरण्याची मोकळीक. म्हणजेच लगागा च्या ठिकाणी लललगा चालेल.

हे काटेकोरपणे पाळलंच पाहिजे असं काही नाही, पण वृत्ताचा बट्ट्याबोळ करू नका. वेगळी लगावली भावली तर तीही चालेल. सैल असला तरी काही वृत्तसदृश ठेका विनोदनिर्मितीला उपयोगी होतो.

३. महत्वाचं हे: पहिली, दुसरी आणि पाचवी ओळ मोठी असते; तिसरी आणि चौथी लहान असते.

४. पहिल्या, दुसऱ्या आणि पाचव्या ओळीमध्ये अन्त्ययमक असतं (वरच्या उदाहरणात A).
तिसर्‍या आणि चौथ्या ओळीमध्येही अन्त्ययमक असतं, पण वेगळ्या अक्षराचं (वरच्या उदाहरणात B). यालाच AABBA rhyme scheme म्हणतात.

थोडक्यात, लिमरिक् अशी दिसते
XxxxXxxxxXxxxA
XxxxXxxxxXxxxA
XxxxXxxxB
XxxxXxxxB
XxxxXxxxxXxxxA

स्वरचित (भंगार) उदाहरण:
सुगंधा प्रवासा निघाली म्हमयला (A)
उतरली कि नाकास दुर्गंध आला (A)
म्हणाली कुठे नाक वळवू? (B)
कुण्या सायबाला हे कळवू? (B)
कि सोडून सगळे हे परतू पुण्याला? (A)

होऊन जाऊद्या!

कविता

प्रतिक्रिया

अनन्त्_यात्री's picture

27 Nov 2021 - 9:47 am | अनन्त्_यात्री

चल पुन्हा वेगाने चंद्रावर जाऊ
तिथून जरा गजबजलेल्या पृथ्वीकडे पाहू
दिसले ओझोनथरातले भोक?
करू नकोस शोक!
पुढच्या खेपेस याहीपेक्षा मोठे भोक पाहू

धष्टपुष्ट's picture

27 Nov 2021 - 1:07 pm | धष्टपुष्ट

भारी. धन्यवाद!

प्राची अश्विनी's picture

27 Nov 2021 - 6:35 pm | प्राची अश्विनी

पंढरपुरच्या गल्लीमधला
एक पांगळा वेडा वदला
दुख-या पायी
उभीच राही
आतातरी ती जागा बदला

धष्टपुष्ट's picture

27 Nov 2021 - 8:24 pm | धष्टपुष्ट

सुरेख.

धष्टपुष्ट's picture

27 Nov 2021 - 8:32 pm | धष्टपुष्ट

तुमची, अनंत यात्रींची आणि गविंची कविता पाहून वाटतंय की निर्वृत्त(?) लिमरिक् अधिक सोयीची असेल. बघूया इतर प्रतिसाद.

इंग्रजीमध्ये
da da DUM da da DUM da da DUM
da da DUM da da DUM da da DUM
da da DUM da da DUM
da da DUM da da DUM
da da DUM da da DUM da da DUM
अशी अतिशय मजेदार लय असते. da = निराघात आणि DUM म्हणजे साघात syllable.

गवि's picture

27 Nov 2021 - 6:52 pm | गवि

वाडीमधला नाना बापट
सदैव करतो आदळ आपट
जनाबाईशी पहा भांडला
लेंग्यावरती चहा सांडला
जनाबाईचा चिमटा लापट

धष्टपुष्ट's picture

27 Nov 2021 - 8:24 pm | धष्टपुष्ट

लेंग्यावरती चहा सांडला

हाहा-कार!

डॅनी ओशन's picture

28 Nov 2021 - 9:08 am | डॅनी ओशन

(एका जुन्या इनोदाचे रूपांतर.)
कोपऱ्यावरचे सान इस्पितळ, गोंधळलेले डॉक्टर जोशी;
रुग्ण बिचारा हतोत्साहाने वर्णवुनी सांगितो त्याची शी
"पडते ती जशी शेवई"
मुरडत नाक, उचलत भिवई,
वदती जोशी "बसण्याआधी बनियान उचलुनी पहा खाशी."

धष्टपुष्ट's picture

28 Nov 2021 - 7:01 pm | धष्टपुष्ट

असं करुणाष्टक म्हणताना लहानपणी खूप हसू येई. त्याची आठवण आली!

विनायक पाटील's picture

29 Nov 2021 - 6:17 pm | विनायक पाटील

एक होती तरुणी, नाव तिचे आरुणी
सुसाट वेगाने ती, धावे किरणाहूनी
एके दिवशी निघाली
म्हणजे तशी वाटली
पोचली तरी अजुनी होती मागली रजनी

धष्टपुष्ट's picture

29 Nov 2021 - 7:10 pm | धष्टपुष्ट

धन्यवाद! Bright नावाचं पण भाषांतर केलेलं अजून आवडलं.

कानडाऊ योगेशु's picture

29 Nov 2021 - 7:19 pm | कानडाऊ योगेशु

बहुयत्ने मिपावरती एक प्रसवला धागा..
प्रतिसाद एवढे अपुरी पडली त्याला आणिक जागा..
लेखापेक्षा लोका आवडे प्रतिसाद..
लेखकु म्हणे उगा ओढवली ही ब्याद..
करीत राहिला तोही आता त्रागा आणिक त्रागा..

धष्टपुष्ट's picture

30 Nov 2021 - 4:07 pm | धष्टपुष्ट

आनंदु बहु जाहला.

ज्ञानोबाचे पैजार's picture

30 Nov 2021 - 11:01 am | ज्ञानोबाचे पैजार

मास्क घाला, हात धुवा, थोडे से तुम्ही नियम पाळा
घरी बसा, थोडं सोसा, लस घ्या, अन गर्दी टाळा
धुडगुस घालत आला डेल्टा
सगळा प्रकारच याचा उल्टा
ओमिक्रोनचे नाव ऐकून, जग कापते चळाचळा

पैजारबुवा,

धष्टपुष्ट's picture

30 Nov 2021 - 4:08 pm | धष्टपुष्ट

ओमि-गॉड!

ज्ञानोबाचे पैजार's picture

30 Nov 2021 - 11:02 am | ज्ञानोबाचे पैजार

बायको होती मुड मधे, तवा होता तापलेला
माळला होता गजरा तिने सायंकाळी घेतलेला
चल ग लवकर मी ओरडलो
अधाश्या सारखा तुटून पडलो
मटण भाकरीचा फक्कड बेत आज तिने बनवलेला

पैजारबुवा,

सौंदाळा's picture

30 Nov 2021 - 12:07 pm | सौंदाळा

वाह, मस्तच प्रकार आहे.
प्रतिसादही जबरदस्त, वाचतोय

धष्टपुष्ट's picture

30 Nov 2021 - 4:10 pm | धष्टपुष्ट

पुढच्या आव्हानासाठी प्रोत्साहन मिळतंय.