'चौरा' : विज्ञाननिष्ठ, चिकित्सक, बहुरंगी ‘राजा’माणूस !

Primary tabs

कुमार१'s picture
कुमार१ in जनातलं, मनातलं
21 Nov 2021 - 3:19 pm

चौरा व माझा मिपा परिचय उण्यापुऱ्या चार वर्षांचा. आमची प्रत्यक्ष भेट फक्त एकदाच. तरीसुद्धा मिपावरील प्रतिसादांमधून या राजाने जो मैत्रीचा पूल आमच्यादरम्यान उभारला तो अविस्मरणीयच. म्हणूनच चित्रगुप्त यांच्या धाग्यावर निव्वळ चार ओळींची आदरांजली लिहून माझे समाधान झालेले नाही. किंबहुना मी तेवढेच करून थांबणे हा चौकटराजांवरील अन्याय असेल. काल त्यांच्या निधनाची दुःखद बातमी वाचल्यापासून अगदी ‘आतून’ बरेच काही मनाच्या पृष्ठभागावर येत आहे. त्यांच्यावर अजून काहीतरी मनापासून लिहीले पाहिजे ही ऊर्मी स्वस्थ बसू देत नाही. अशा काही मनात साचलेल्या ‘चौरा-आठवणी’ मोकळ्या करण्यासाठी हा लघुलेख.

सुरुवात करतो त्यांच्या व्यक्तिगत आरोग्य समस्यांपासून.
त्यांना दीर्घकाळ मधुमेह होता. त्याचे शरीरातील महत्त्वाच्या इंद्रियांवर विपरीत परिणाम झालेले होते. त्याची माहिती देणारा त्यांचाच एक प्रतिसाद इथे वाचता येईल. ही स्थिती २०१८ मधील होती. त्यांच्या शरीरव्याधींशी ते चिकाटीने झुंजत होते. असे सहव्याधीग्रस्त शरीर आता कोविडचे भक्ष्य ठरले. त्यांच्या बंधूंचे सुमारे पंचवीस वर्षांपूर्वी आजाराने निधन झाले होते. त्याचा संदर्भ देऊन ते मला म्हणत,

“अहो, मी साठी ओलांडली हाच माझ्या आयुष्यातील एक मोठा बोनस नाही का? समजा, मी आता मरण पावलो तर अमुक आजाराने निधन पावणाऱ्या व्यक्तींचा वैज्ञानिक विदा तयार करण्यासाठी तरी माझा नक्की उपयोग होईल !”

दुर्धर व्याधीने त्रस्त असतानाही, आहे त्याचा हसतमुखाने स्वीकार करायची त्यांची ही वृत्ती कौतुकास्पद. मिपावर मी ग्लुकोज, इन्सुलीन, युरिया इत्यादी विषयांवर आरोग्यलेखन केले. त्यावरील चर्चेदरम्यान चौरा यांचा सक्रिय सहभाग वाखाणण्यासारखा होता. वाणिज्य शाखेतीतील पदवीधर असलेल्या या माणसाचे आरोग्यासंबंधीचे वैज्ञानिक वाचन अफाट व आश्चर्यचकित करणारे होते. अनेकदा त्यांना काही प्रश्न पडत आणि त्यांची अर्धवट उत्तरे तेच तयार करीत. मग हे सर्व पुराण ते मला व्यक्तिगत संपर्कातून पाठवत आणि शेवटी एक प्रश्न असे,

“मी जो हा निष्कर्ष काढला आहे, तो बरोबर आहे ना डॉक्टर ?”

मग त्यांच्या ज्ञानात योग्य ती भर घालून मी त्यांना उत्तर देत असे.
एकदा प्रत्यक्ष भेटीत ते मला म्हणाले, “मी तुम्हाला आरोग्यविषयक साधेसुधे प्रश्न विचारणार नाही. मी भरपूर गुगलगिरी करणार आणि मग त्यातून तुम्हाला अधिक सखोल वाचनासाठी भाग पाडणारे प्रश्न विचारणार !”

काही वेळेस त्यांचे असे भंडावून सोडणे हा माझ्यासाठी त्रास नसून प्रेमाचा वर्षाव वाटायचा. त्यांच्या अशा गुगल डॉक्टरीने ते त्यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनाही त्रस्त करीत. त्यावरून एका डॉक्टरांनी त्यांना चांगलेच फटकारल्याचा किस्साही त्यांनी मला हसतमुखाने सांगितला होता. चौरांनी मिपावर अनेकविध विषयांवर लेखन व प्रतिसाद लिहिले. त्यांचे संगीतविषयक लेखन हे माझ्या मिपाप्रवेशापूर्वी असल्याने ते मी अजून वाचलेले नाही. आता सवडीने वाचेन. त्यांच्या प्रतिसादांमधून त्यांची विज्ञाननिष्ठ दृष्टी दिसून येई. स्वतःला दैववादापासून प्रयत्नपूर्वक दूर ठेवणारे त्यांचे व्यक्तिमत्त्व त्यातून स्पष्ट होई. स्वतःच्याच छंदांमध्ये रममाण झालेला हा माणूस निव्वळ वेळ घालवणाऱ्या आलतूफालतू गप्पा आणि तत्सम कुजबुज समूहापासून कोसो दूर असे. संगीत, वास्तुरचना, चित्रकला आणि गृहसजावट हे त्यांच्या आवडीचे विशेष प्रांत. स्वतःच्या हाताने स्वतःचे घर रंगविणारा हा कदाचित एकमेव शहरी पांढरपेशा मिपाकर असेल ! श्रमप्रतिष्ठा या कल्पनेचे जितेजागते प्रात्यक्षिक रुप या माणसातून आपल्यासमोर आले. चौरा, त्या कृतीबद्दल तुम्हाला हजारदा सलाम !

त्यांच्या बद्दल अजून बरेच काही लिहीता येईल पण त्यासाठी कालौघात मनातील दुःखाचा विसर पडून शांत मनस्थिती व्हावी लागेल. मिपा संस्थापकांचे जेव्हा निधन झाले तेव्हा चौरा यांनी दिलेला एक मार्मिक प्रतिसाद मला खूप आवडला आणि एक नवा दृष्टिकोन देऊन गेला. तो जसा आठवतोय तसा त्यांच्याच शब्दात मांडतो :


“माझा आत्मा वगैरे गोष्टींवर बिलकुल विश्वास नाही. त्यामुळे तात्यांच्या ‘आत्म्यास शांती लाभो ‘ असे काही मी म्हणणार नाही. परंतु तात्यांनी जिवंतपणी मिपाच्या रूपाने जे काही कार्य करून ठेवले आहे त्याबद्दल मी त्यांचा कायम ऋणी राहीन.”


‘श्रद्धां’जलीची औपचारिकता त्यांना मान्य नव्हती हे उघड आहे. पण वरील प्रकारे त्यांनी संस्थापकांबद्दल जो आदर व्यक्त केला तो केवळ लाजवाब. म्हणून मी देखील हा लेख संपवताना ठरावीक औपचारिक शब्द वापरणार नाही. परंतु चौरांना आवडले असते अशाच शब्दात असे म्हणतो,

प्रिय चौरा,
आत्मा, शांती, सद्गती इत्यादी संकल्पनांवर तुमच्याप्रमाणेच माझाही विश्वास नाही. जिवंतपणी तुम्ही तुमच्या हसतमुख बहुरंगी व्यक्तिमत्त्वातून अनेक मिपाकरांशी मैत्रीचे पूल बांधलेत आणि जिव्हाळा निर्माण केलात. तुमच्या या योगदानाबद्दल मी तुमचा कायमचा ऋणी राहीन. तुमचे विचार, लेखन आणि संवाद हे माझ्यासाठी नेहमीच मार्गदर्शक असतील. तुम्हाला मनापासून (मरणोत्तर) धन्यवाद !
................................................................................................................................

समाजसद्भावना

प्रतिक्रिया

@कुमार १: माझ्याही मनात कालपासून हेच घोळत आहे की चौरांबद्दल लिहीण्यासारखे खूप काही आहे. तुम्ही हा धागा काढलात, त्यात आता इतर सर्वांना लिहीता येईल.
माझा त्यांचेशी जो संवाद व्हायचा तो मुख्यतः संगीत (त्यातही विशेषतः ओपी नय्यर यांचे) युरोपमधील भटकंती, इटालीतील वास्तुकला, भारतातले मराठी चित्रकार आणि त्यांची कला (बेन्द्रे, मुळगावकर, दलाल इ.) हे तर असायचेच, त्याशिवाय ते पियानो (की बोर्ड) वर गाणी वाजवून त्याचे रेकॉर्डिंग पाठवत आणि स्मूलवर गाणी गात त्याचे दुवे पाठवत. त्यांचे बघून मी पण महिनाभरात स्मूलवर शंभरेक गाणी गायलो (नंतर ते सोडले ते आजतागायत) शिवाय दीपचंदी वा अमूक ताल या गाण्यात असा तर त्या गाण्यात कसा वाजवला आहे, त्याने कशी बहार आली आहे वगैरे तबल्याचे बोल म्हणून दाखवत सांगायचे. मला या सर्वात खूपच आश्चर्यश्रित आनंद वाटायचा. ओपी-संगिताचे तर ते एनसयक्लोपेडियाच होते. ओपीचे प्रत्येक गीत त्यातल्या बारीकसारीक सांगितिक तपशीलांसकट चौरांना अवगत होते. "ये दुनिया उसी की" मधे सॅक्सोफोन वाल्याने (त्याचे नावही त्यांना माहिती असायचे) पहा कशी गंमत केली आहे वगैरे ते तोंडाने तसा आवाज काढत समजावून सांगायचे.
त्यांनी त्यांच्या व्याधि वगैरेंबद्दल अगदी क्वचितच उल्लेख केला असेल.
कोणी व्यक्ती गेली की "त्यांची पोकळी भरून निघणार नाही" वगैरे आपण वाचतो, पण चौरांच्या जाण्याने माझ्या जीवनात खरोखरच अशी पोकळी निर्माण झालेली आहे. त्यांचेशी जसा संवाद व्हायचा, तसा करणारे आता कुणीही नाही.
"चौकटराजा म्हणजे उत्साह, मनमिळाऊपण, सतत नवे शिकणे व ते इतरांशी वाटणे, सहजपणे माणसं जोडणे, समाधानी, कलासक्त अशा अनेक गुणांचा समुच्चय असणारा माणूस होता" असे श्रीरंग जोशींनी त्यांचे जे वर्णन केलेले आहे, त्याचा अनुभव नेहमी यायचा.
तसेच धर्मराजमुटके यांनी लिहील्याप्रमाणे "कोविड ला अजूनही गांभिर्याने घ्यावे लागेल हा संदेश मिळाला" हेही महत्वाचे आहे.
माझ्यापेक्षा वयाने कमी असलेल्या चौरांच्या अकस्मात जाण्याने "आता आपण आपले सगळे व्याप आवरते घेण्याचे काम लगेचच हाती घ्यायलाच हवे" ही जाणीव तीव्रतेने होते आहे, त्या दृष्टीने विचार सुरू केला आहे.
चौरांसारखा संगीत-कला प्रेमी, रसिक, चिंतक, लेखक, प्रवासवेडा, मनमोकळा, दिलदार मित्र आपल्या जीवनातून कायमचा गेला, आणि यापुढे तसा कुणीही मिळणार नाही, ही जाणीव अतीव वेदनादायक आहे.

कंजूस's picture

21 Nov 2021 - 4:39 pm | कंजूस

त्यांचे आणि माझे विचार जुळतात हे आपले दिवेकर गुरुजींनी केव्हाच ओळखले आणि त्यांची गाठ घालून दिली वनविहार कट्ट्याला. मग आम्ही लेखनातून भेटत ,बोलत राहिलो. त्यांनी सांगितले की इकडे दोन दिवस राहायलाच या. भरपूर बोलायचं आहे, फोटो दाखवून गमती सांगायच्या आहेत. तरी यातून संगीत संग्रह वगळतो म्हणाले तुमच्यासाठी नाहीतर आठ दिवस राहावे लागेल.

त्यांना भेटणारा कुणीही उत्साह घेऊनच बाहेर पडणार. वाचन दांडगं, विनोदबुद्धी भरपूर हेच त्यांच्या जीवनाचं रहस्य होतं.

असेच अनेक चौराकाका निर्माण होवोत.

प्रचेतस's picture

21 Nov 2021 - 5:23 pm | प्रचेतस

असा माणूस होणे नाही. आपलं माणूस निघून गेलंय हीच भावना कालपासून छळतेय.

माहीती मिळाल्यामुळे त्यांच्याबद्दलचा आदर दुणावला. धन्यवाद.

सुधीर कांदळकर's picture

22 Nov 2021 - 7:04 am | सुधीर कांदळकर

तुमचा इन्सुलीनवरील लेख पुन्हा एकदा वाचला. काही व्यक्ती मरण पावल्यानंतर देखील अप्रत्यक्षपणे आपल्याला ज्ञान देऊन जाता ते असे.

मित्रहो's picture

22 Nov 2021 - 7:52 pm | मित्रहो

या आणि वल्ली यांच्या धाग्यातून चौराकाकांविषयी बरीच निराळी माहिती मिळाली. फार अभ्यासपूर्ण प्रतिसाद देणारी व्यक्ती म्हणून त्यांची ओळख होतीच.

Nitin Palkar's picture

22 Nov 2021 - 8:12 pm | Nitin Palkar

चौरांचे युरोप वारीवरील लेखन वाचले होते. त्यांच्या विषयी नवीन माहिती आत्ता कळली.

कुमार१'s picture

22 Nov 2021 - 9:50 pm | कुमार१

आपणा सर्वांशी सहमत आहे.

राघव's picture

24 Nov 2021 - 5:29 pm | राघव

महिन्यातून एक तरी कट्टा ठरवून/न ठरवता अटेंड करायला हवा हे पटले आहे आता.. पण त्यासाठी एवढा मोठा आघात होणे गरजेचे नव्हते..
इतक्या जवळ राहत असूनही भेटणे झाले नाही याचे शल्य आता कायम घेऊन रहावे लागेल. छ्या.. काय राव.. :-(

अप्पा जोगळेकर's picture

24 Nov 2021 - 5:34 pm | अप्पा जोगळेकर

अरेरे. वाईट झाले.

चौथा कोनाडा's picture

24 Nov 2021 - 5:54 pm | चौथा कोनाडा

समर्पक लिहिलंय !
लेखन, प्रतिसाद, व्यनि, कट्टा, प्रत्यक्ष भेट यांतून चौरांनी मनात आगळे स्थान निर्माण केले होते.
चौरांची पोकळी जाणवत राहिल !

कुमार१'s picture

24 Nov 2021 - 6:31 pm | कुमार१

एकदा त्यांच्या स्वतःच्या शस्त्रक्रियेसाठी ते टेबलावर निजलेले असताना त्यांनी शस्त्रक्रिया करणार्‍या डॉक्टरांनाच जो काही विनोद सांगितला त्यातून त्यांचे दिलखुलास व्यक्तिमत्त्व दिसून येते.

कुमार१'s picture

24 Nov 2021 - 6:33 pm | कुमार१

चौराकाकांबद्दल अधिक समजले या लेखातून. त्यांना आदरांजली.