'चौरा' : विज्ञाननिष्ठ, चिकित्सक, बहुरंगी ‘राजा’माणूस !
चौरा व माझा मिपा परिचय उण्यापुऱ्या चार वर्षांचा. आमची प्रत्यक्ष भेट फक्त एकदाच. तरीसुद्धा मिपावरील प्रतिसादांमधून या राजाने जो मैत्रीचा पूल आमच्यादरम्यान उभारला तो अविस्मरणीयच. म्हणूनच चित्रगुप्त यांच्या धाग्यावर निव्वळ चार ओळींची आदरांजली लिहून माझे समाधान झालेले नाही. किंबहुना मी तेवढेच करून थांबणे हा चौकटराजांवरील अन्याय असेल. काल त्यांच्या निधनाची दुःखद बातमी वाचल्यापासून अगदी ‘आतून’ बरेच काही मनाच्या पृष्ठभागावर येत आहे. त्यांच्यावर अजून काहीतरी मनापासून लिहीले पाहिजे ही ऊर्मी स्वस्थ बसू देत नाही. अशा काही मनात साचलेल्या ‘चौरा-आठवणी’ मोकळ्या करण्यासाठी हा लघुलेख.
सुरुवात करतो त्यांच्या व्यक्तिगत आरोग्य समस्यांपासून.
त्यांना दीर्घकाळ मधुमेह होता. त्याचे शरीरातील महत्त्वाच्या इंद्रियांवर विपरीत परिणाम झालेले होते. त्याची माहिती देणारा त्यांचाच एक प्रतिसाद इथे वाचता येईल. ही स्थिती २०१८ मधील होती. त्यांच्या शरीरव्याधींशी ते चिकाटीने झुंजत होते. असे सहव्याधीग्रस्त शरीर आता कोविडचे भक्ष्य ठरले. त्यांच्या बंधूंचे सुमारे पंचवीस वर्षांपूर्वी आजाराने निधन झाले होते. त्याचा संदर्भ देऊन ते मला म्हणत,
“अहो, मी साठी ओलांडली हाच माझ्या आयुष्यातील एक मोठा बोनस नाही का? समजा, मी आता मरण पावलो तर अमुक आजाराने निधन पावणाऱ्या व्यक्तींचा वैज्ञानिक विदा तयार करण्यासाठी तरी माझा नक्की उपयोग होईल !”दुर्धर व्याधीने त्रस्त असतानाही, आहे त्याचा हसतमुखाने स्वीकार करायची त्यांची ही वृत्ती कौतुकास्पद. मिपावर मी ग्लुकोज, इन्सुलीन, युरिया इत्यादी विषयांवर आरोग्यलेखन केले. त्यावरील चर्चेदरम्यान चौरा यांचा सक्रिय सहभाग वाखाणण्यासारखा होता. वाणिज्य शाखेतीतील पदवीधर असलेल्या या माणसाचे आरोग्यासंबंधीचे वैज्ञानिक वाचन अफाट व आश्चर्यचकित करणारे होते. अनेकदा त्यांना काही प्रश्न पडत आणि त्यांची अर्धवट उत्तरे तेच तयार करीत. मग हे सर्व पुराण ते मला व्यक्तिगत संपर्कातून पाठवत आणि शेवटी एक प्रश्न असे,
“मी जो हा निष्कर्ष काढला आहे, तो बरोबर आहे ना डॉक्टर ?”मग त्यांच्या ज्ञानात योग्य ती भर घालून मी त्यांना उत्तर देत असे. एकदा प्रत्यक्ष भेटीत ते मला म्हणाले, “मी तुम्हाला आरोग्यविषयक साधेसुधे प्रश्न विचारणार नाही. मी भरपूर गुगलगिरी करणार आणि मग त्यातून तुम्हाला अधिक सखोल वाचनासाठी भाग पाडणारे प्रश्न विचारणार !” काही वेळेस त्यांचे असे भंडावून सोडणे हा माझ्यासाठी त्रास नसून प्रेमाचा वर्षाव वाटायचा. त्यांच्या अशा गुगल डॉक्टरीने ते त्यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनाही त्रस्त करीत. त्यावरून एका डॉक्टरांनी त्यांना चांगलेच फटकारल्याचा किस्साही त्यांनी मला हसतमुखाने सांगितला होता. चौरांनी मिपावर अनेकविध विषयांवर लेखन व प्रतिसाद लिहिले. त्यांचे संगीतविषयक लेखन हे माझ्या मिपाप्रवेशापूर्वी असल्याने ते मी अजून वाचलेले नाही. आता सवडीने वाचेन. त्यांच्या प्रतिसादांमधून त्यांची विज्ञाननिष्ठ दृष्टी दिसून येई. स्वतःला दैववादापासून प्रयत्नपूर्वक दूर ठेवणारे त्यांचे व्यक्तिमत्त्व त्यातून स्पष्ट होई. स्वतःच्याच छंदांमध्ये रममाण झालेला हा माणूस निव्वळ वेळ घालवणाऱ्या आलतूफालतू गप्पा आणि तत्सम कुजबुज समूहापासून कोसो दूर असे. संगीत, वास्तुरचना, चित्रकला आणि गृहसजावट हे त्यांच्या आवडीचे विशेष प्रांत. स्वतःच्या हाताने स्वतःचे घर रंगविणारा हा कदाचित एकमेव शहरी पांढरपेशा मिपाकर असेल ! श्रमप्रतिष्ठा या कल्पनेचे जितेजागते प्रात्यक्षिक रुप या माणसातून आपल्यासमोर आले. चौरा, त्या कृतीबद्दल तुम्हाला हजारदा सलाम ! त्यांच्या बद्दल अजून बरेच काही लिहीता येईल पण त्यासाठी कालौघात मनातील दुःखाचा विसर पडून शांत मनस्थिती व्हावी लागेल. मिपा संस्थापकांचे जेव्हा निधन झाले तेव्हा चौरा यांनी दिलेला एक मार्मिक प्रतिसाद मला खूप आवडला आणि एक नवा दृष्टिकोन देऊन गेला. तो जसा आठवतोय तसा त्यांच्याच शब्दात मांडतो :
“माझा आत्मा वगैरे गोष्टींवर बिलकुल विश्वास नाही. त्यामुळे तात्यांच्या ‘आत्म्यास शांती लाभो ‘ असे काही मी म्हणणार नाही. परंतु तात्यांनी जिवंतपणी मिपाच्या रूपाने जे काही कार्य करून ठेवले आहे त्याबद्दल मी त्यांचा कायम ऋणी राहीन.”‘श्रद्धां’जलीची औपचारिकता त्यांना मान्य नव्हती हे उघड आहे. पण वरील प्रकारे त्यांनी संस्थापकांबद्दल जो आदर व्यक्त केला तो केवळ लाजवाब. म्हणून मी देखील हा लेख संपवताना ठरावीक औपचारिक शब्द वापरणार नाही. परंतु चौरांना आवडले असते अशाच शब्दात असे म्हणतो, “प्रिय चौरा, आत्मा, शांती, सद्गती इत्यादी संकल्पनांवर तुमच्याप्रमाणेच माझाही विश्वास नाही. जिवंतपणी तुम्ही तुमच्या हसतमुख बहुरंगी व्यक्तिमत्त्वातून अनेक मिपाकरांशी मैत्रीचे पूल बांधलेत आणि जिव्हाळा निर्माण केलात. तुमच्या या योगदानाबद्दल मी तुमचा कायमचा ऋणी राहीन. तुमचे विचार, लेखन आणि संवाद हे माझ्यासाठी नेहमीच मार्गदर्शक असतील. तुम्हाला मनापासून (मरणोत्तर) धन्यवाद ! ................................................................................................................................
वर्गीकरण
प्रतिक्रिया
चौरांबद्दल लिहीण्यासारखे खूप काही आहे.
खरंय.
असा माणूस होणे नाही. आपलं
चौरांच्या व्यक्तिमत्त्वाचे पैलूंची .....
चौरांच्या व्याधीच्या निमित्ताने .....
दोन धाग्यातून
सुयोग्य श्रद्धांजली
धन्यवाद ,
_/\_
अरेरे. वाईट झाले.
समर्पक लिहिलंय !
सहमत
दुरुस्ती
चौराकाकांबद्दल अधिक समजले या
आठवण
आदरांजली.
चौरा यांना भावपुर्ण आदरांजली
चौरा यांना भावपुर्ण आदरांजली
स्मृतीदिन
चौरा यांना खुप मिस करतोय !