आठवणीतील दिवाळी !

kvponkshe's picture
kvponkshe in जनातलं, मनातलं
3 Nov 2021 - 10:44 pm

आठवणीतील दिवाळी !
दिवाळी म्हणजे सणांचा राजा !
२१ दिवस सुट्टी, फराळ , फटाके , भरपूर क्रिकेट ... आम्हा बाळ गोपाळांसाठी पर्वणीच !
पण या दिवाळीचा आनंद असा सहजासहजी मिळत नसे. त्या आधी सहामाही परीक्षेचे अग्निदिव्य पार पडावे लागे. दसऱ्याच्या अगदी दुसऱ्या दिवशी पासून सहामाही सुरु होई. आणि बहुदा पहिला पेपर गणित किंवा इंग्रजीचा असे. म्हणजे दसऱ्याला मजा करायची सोडून आम्ही मान मोडून अभ्यास करावा अशी शाळेची अपेक्षा असे. (आम्ही शाळेच्या अपेक्षा कधीच पुऱ्या केल्या नाहीत हा भाग अलहिदा ! ). सहामाही चा शेवटला पेपर बरेचदा चित्रकलेचा असे. आणि त्याआधी भूगोलाचा. म्हणजे भूगोलाचा पेपर झाला की दिवाळी सुट्टी सुरूच झाल्यासारखी असे. मला आठवते ते जर बरोबर असेल तर आम्हाला २१ दिवस दिवाळी सुट्टी असे. दिवाळीच्या आधी साधारणतः ४-५ दिवस आधीपासून दिवाळी सुट्टी लागे.
आमचे सुट्टीचे शेड्युल बरेच आधी ठरलेले असे.
एकदम बिझी !
खूप कामे असत आम्हाला ! किल्ल्याची तयारी करणे हे काम अग्रणी असे. त्यात किल्ल्यासाठी साठी माती आणणे हा एक फार महत्वाचा भाग असे. हल्ली सिमेंटीकरणामुळे हा प्रश्न खूप गंभीर झालाय. पण आमच्या काळी ही माती सहज मिळत असे. मग किल्ल्याची जागा ठरत असे. आमचे किल्ले अगदी साधेच असत. एक मातीचा डोंगर, त्यात पायऱ्या , आणि पायऱ्या संपल्या की थेट महाराजांचे आसन. हां, काही कलाकार मंडळी अगदी छान तटबंदी वगैरे पण करत असत. किल्ल्यात बाकी काही नसले तरी दोन गुहा असणे हा अलिखित नियम होता. एक गुहा वाघासाठी आणि दुसरी सिंहा साठी. गम्मत म्हणजे या गुहांच्या अगदी हाकेच्या अंतरावर एखादा शेतकरी त्याच्या शेतात काम करत असे !
असो आपण जरा पुढे गेलो. तर या किल्ल्यावर हिरवळ नको का ? यासाठी हळीव पेरणे हा एक किल्ल्या बनवण्यामधील महत्वाचा भाग होता. शेत म्हणून काही जण गहू पण पेरत. हे हळीव अशा प्रकारे पेरावे लागत की नरक चतुर्दशी च्या दिवशी छान उगवले असतील. जर ते बरेच आधी पेरले तर ते ऐन दिवाळीत कोमेजून जात . आणि उशिरा पेरले तर भाऊबीजेला उगवत ! याचे गणित जमवावे लागे. किल्ला झाला की त्यावर शिवप्रभू नकोत का ? आणि महाराजांबरोबर मावळे नकोत का ?
या सगळ्या मूर्तीना का कोण जाणे "चित्रे" असे म्हणत. या चित्रांची खरेदी हा आमच्या दिवाळी सुट्टीतील एक महत्वाचा कार्यक्रम असे. स्वारगेट येथील वोल्गा चौक , तुळशीबाग , मंडई येथे पथारीवाले ही चित्रे विकत असत. हल्ली वोल्गा चौकात ही चित्रे मिळताना दिसत नाहीत. या चित्रांच्या लिस्ट मध्ये एक शिवाजी राजांची मूर्ती, मावळे , पठाण , भटजी , शेतकरी, तोफा , वाघ , सिंह गौळण, सैनिक अशा सर्व असामी असत.
का कोणास ठाऊक पण या चित्रांमध्ये पोपट पण असे. गम्मत अशी की या पोपटाची उंची वाघ, सिंह यांच्या पेक्षा मोठी असे . पण हा पोपट किल्ल्याच्या चित्रांत असेच असे.
किल्ला तयारी नंतर वेध लागत फटाके खरेदीचे ! आम्ही सगळे मित्र जमून फटाक्यांची खरेदी यादी करत असू.
१. पिस्तूल (टिकल्या उडवायचे हो !)
२. रॉकेट ज्यात टिकल्या टाकयच्या आणि वर फेकून ते जमिनीवर आपटले की बार वाजत असे.
२. त्यात लागणाऱ्या टिकल्यांच्या डब्या आणि टिकली रोल
३. चंद्रज्योत (रंगीत उजेड पाडणारी काडेपेटी)
४. नाग गोळी
५. फुलबाज्या साध्या
६. साखरेच्या फुलबाज्या (रंगीत)
७. वायर
८. पेन्सिल फुलबाजी
9. भुईचक्र
१०. भुईनळे (सोप्या भाषेत झाड)
११. आपटबार ( आम्ही याचा काही ललनांवर "सदुपयोग" केल्याने पुढे यावर बंदी आणली गेली )
१२. लवंगी
१३. मोठे लवंगी (का कोण जाणे याना दंडे फटाके म्हणत)
१४. लक्ष्मी बॉम्ब (यादीत या फटाक्यांचे फार महत्व असे. कारण सगळ्यात जास्त कचरा याच फटाक्याने व्हायचा. आणि आमची समजूत अशी की ज्याच्या घरापुढे जास्त फटाक्याचा कचरा तो श्रीमंत !)
१६. या लक्ष्मी बॉम्बचे मिनी व्हर्जन म्हणजे चिमणी बॉम्ब.
१७. त्रिकोणी आकाराची पानपट्टी
१८. सुतळी बॉम्ब
१९. "A" सर्टिफिकेट मिळालेला चौकोनी बाँम्ब
२०. बुलेट बॉम्ब
.... आणि बरंच काही ......
हि वरील यादी सामान्य लोकांची. मग यात बाण, पॅराशूट , ३० शॉट्स, ५० शॉट्स , असे अनेक प्रकार लोक घेत असत. बजेट च्या बाबतीत गंभीर असलेले लोक एकत्र येऊन फटाक्यांची घाऊक खरेदी करत. फटाके खरेदी झाली की मग त्याचे दिवाळीच्या दिवसांनुसार वाटप होई. सर्वात जास्त कोटा लक्ष्मी पूजनाच्या दिवसाला मिळे. विशेषतः १००० किंवा ५००० ची माळ या कोट्यात असे. अगदी पुढे येणाऱ्या त्रिपुरी साठी सुद्धा आम्ही एक दोन लवंगीच्या माळा , एखाद भुईनळा , फुलबाज्या बाजूला ठेवत असू.
इकडे घरामध्ये आईची फराळाची लगबग सुरु असायची. यात किराणाची यादी देणे , ते सामान आणणे, आणि मग प्रत्यक्ष फराळ बनवायला सुरुवात व्ह्यायची. साधारण पणे शंकरपाळे किंवा लाडू अशा गोडाच्या पदार्थाने फराळ बनत असे. शेवटला नंबर बहुदा चिवड्याचा असे. (या चिवड्यातील खमंग भाजलेले खोबरे सगळ्यात आधी संपत असे.) पूर्ण घरात भाजलेल्या बेसनाचा, करंजीचा, चकली कडबोळ्यांचा खमंग वास भरत असे. या फराळाचे बनवायचे ही एक गणित आईला संभाळावे लागे. खूप आधी बनवला तर दिवाळीच्या आधीच तो संपत असे.
या नंतर एक महत्वाची खरेदी असे ती म्हणजे कपडे खरेदी. दिवाळीच्या आधीचे गुरुवार , शनिवार आणि रविवार लक्ष्मी रस्ता तुडुंब गर्दीने वाहून जाई. आणि अजूनही जातो. दिवाळीच्या प्रत्येक दिवशी एक स्वतंत्र ड्रेस ही चैन तेव्हा परवडत नसे. साधारणतः आम्ही २ नवीन ड्रेस घेत असू. त्यातील एक नरक चतुर्दशी ला आणि पाडव्याला, आणि दुसरा लक्ष्मी पूजन आणि भाऊबीजेला.
वसुबारसेला संध्याकाळी गाय वासराचे पूजन होई. धनत्रयोदशीला धान्य पूजन होई. माफक फटाके पण उडवले जात.
दुसऱ्या दिवशी नरकचतुर्दशी ला पहाटे अभ्यंग स्नान करण्यासाठी उठायचे असे. पहाटे उठून सगळ्यात पहिला फटका कोण उडवणार याची आमच्यात पैज लागलेली असे. आमच्यातले माझ्यासारखे पळवाटा शोधणारे तज्ज्ञ यात एक युक्ती करत. पहाटे ३. ३० किंवा चार वाजताचा गजर लावून उठून पहिले एक दोन सुतळी उडवून पैज जिंकल्याचा दावा करत. मग त्यावरून वाद होत असत. मग पैज अपडेट केली गेली. जो कोणी लवकर उठून अभ्यंग स्नान करून पहिला फटका उडवेल त्याला विजयी मानन्यात येऊ लागले. एकदा तर मी ३. ३० ला उठून अभ्यंग करून ४ ला पहिला सुतळी फोडलेला आठवतोय. धनत्रयोदशीच्या रात्री आई खसखस वाटून ठेवत असे. दिवाळीत थंडी नुकतीच सुरु झालेली असे पण गारवा सुखद असे. अभ्यंगावेळी त्याचा खूप सुंदर वास येई. नरक चतुर्दशीच्या आंघोळीच्या वेळी मोती साबण नसणे हे नॉन कम्प्लायन्स गणले जायचे. उठल्यावर तोंड धुवून झाले की चहा पिऊन मग आई आम्हास उटणे लावत असे. डोक्याला राजकोटचं टीपीकल दिवाळीचा वास असलेले तेल लावले जाई. मग पाट्यावर वाटलेली खसखस लावून आंघोळ करून नवीन कपडे घालून झाले की आई औक्षण करी. औक्षण होईतोवर आम्ही कसे बसे कळ काढत असू आणि औक्षण झाल्याझाल्या पहिला सुतळी उडवायला आम्ही पळत असू. नंतर उजाडेपर्यंत फटाके उडवणे हाच कार्यक्रम चाले. नरक चतुर्दशीचा सकाळचा कोटा संपला की मग फराळावर ताव मारत असू आम्ही. फाटकाच्या दारूने बरबटलेले हात न धुताच आम्ही चिवड्यात खोबरे शोधायला हात घालणार तितक्यात आई येऊन आम्हास हात धुवायला लावत असे. मगच समोर फराळाची चिवडा, चकल्या , लाडू करंजी यांनी भरलेली डिश येत असे. मग संध्याकाळ पर्यंतचा दिवस आम्ही पोरं आमच्या महर्षी नगरच्या वसाहतीतील चाळीतील लोकांनी बनवलेले किल्ले पाहण्यात, क्रिकेट खेळण्यात घालवत असू. काही लोक किल्ल्यात रेल्वे पण लावत, पण तो डिफॉल्ट मानला जात नसे. कागदाचे चांदणीचे आकाश कंदील हे जवळपास सर्वत्र वापरले जात. अधिक संप्पन घरांसमोर थर्माकोलचे आकाश कंदील असत.
मी जिथे राहतो त्या महर्षी नगर मध्ये पूरग्रस्त वसाहतीतील चाळीतील बैठी घरे होती. मधल्या दोन खोल्या, समोर आणि मागे अंगण. पुढील अंगणात आम्ही किल्ला करत असू. सध्या जिथे अरुणा असफ अली बाग आहे तिथे तेव्हा काँग्रेस गवताने भरलेले त्रिकोणी मैदान होते. मैदानाच्या मधोमध एक कवठीचे आणि एक कोणतेतरी उंच पण डेरेदार झाड होते. आम्ही लांब फुलबाज्यांच्या तारांचे आकडे करून त्या पेटवून या झाडांवर फेकत असू. अशा खूप पेटलेल्या फुलबाजा त्या झाडावर लटकलया की ते छान दिसत असे. दिवाळीच्या प्रत्येक दिवशी संध्याकाळ चा चहा झाला की गृहिणी या बैठ्या घराबाहेर रांगोळ्यांचे गालिचे काढत. साधारण ४ ला सुरु करून ६ ला गालिचे पूर्ण होत. पण रात्री ९ वाजेपर्यंत हे गालिचे फटाक्यांच्या कचऱ्याने भरून जात. पण कोणी कधी त्रक्रार केलेली आठवत नाही. अगदी छोट्या छोट्या गोष्टीत तेव्हा आनंद असायचा जो हल्ली ५० -५० हजाराचे फोन घेऊनही मिळत नाही. या त्रिकोणी मैदानात उभे राहिले की तिन्ही बाजूला असलेली आकाश कंदील आणि दीपमाळांनी सजलेली ही बैठी घरे एखाद्या रेखीव चित्राप्रमाणे दिसत. हल्लीचे महर्षी नगर पाहून ती मजा काय होती याची कल्पना कधीच येणार नाही. नरक चतुर्दशीचा दिवस पटकन संपून जाई.
दुसऱ्या दिवशी लक्ष्मी पूजनाला सकाळी काही विशेष काम नसे. दिवसभर आम्ही क्रिकेट खेळण्यात आणि उनाडक्या करण्यात घालवत असू. या क्रिकेट वरून आठवले. या दिवाळीच्या खरेदीत क्रिकेट ची बॅट हि एक खरेदी असे. चकचकीत काचेच्या स्पोर्ट्स शोरूम चे दिवस तेव्हा आले नव्हते. मित्रमंडळ ते महालक्षमी सिग्नल हा जो चढ आहे त्याच्या बाजूला या बॅट स्वस्तात मिळत, आणि अजूनही मिळतात. तिथून आम्ही या बॅट विकत घेत असू. अमकी चाळ वि तमकी चाल अशा क्रिकेटच्या मॅचेस आम्ही घेत असू. पणाला टेनिस बॉल लागलेला असे. जो जिंकेल (महर्षीनगरच्या आमच्या भाषेत जिकेल) त्या टीमला तो बॉल मिळत असे. लक्ष्मी पूजन आणि महेश कोठारे यांचा पिक्चर यांचा काय संबंध होता कोण जाणे. पण बरेचदा लक्ष्मी पूजनाला महेश कोठारे यांचा धूमधडाका चित्रपट दूरदर्शन मुंबईवर लावत. लक्षमी पूजनाला संध्याकाळी लक्षमी पूजन होत असे. आणि मग फटाक्यांचा धुराळा. ज्याच्या घरासमोर जास्त फटाक्यांचा कचरा तो भारी असा नियम होता. म्हणूनच लक्ष्मी बॉम्ब या दिवशी फार महत्वाची भूमिका बजावे.
दिवाळी पाडव्याला मात्र दिवाळी संपत आल्याची कुणकुण लागत असे. दिवाळीची वाट खूप दिवस पाहायला लागे आणि दिवाळी मात्र पटकन संपे. पाडव्याला आम्हा मुलांचे काही विशेष काम नसे. पुन्हा दिवसभर क्रिकेट आणि उनाडक्या. गृहिणींसाठी मात्र हा हक्काचा दिवस ! गृहिणी पतीला ओवाळत. आणि मग त्याबदल्यात त्यांना साडी, एखादा दागिना अशी भेट मिळे. आम्ही मुले आमचे चित्रकलेचे Nandkumar Moreमोरे सर किंवा माझा मित्र Rahul Naik राहुल आणि Sagar Naik सागर नाईक यांच्या घरी VCR वर एखादा चित्रपट पाहत असू. अगदी दोन तीन तास हक्काने बसून. पण या दोघांनीही कधीही तक्रार केली नाही. पाडव्याला संध्याकाळी त्या दिवशीचा फटाक्यांचा कोटा आम्ही उडवत असू. फटाक्यांची बरीचशी रिकामी झालेली पिशवी आमचे मन खट्टू करी. फराळाचाही आता कंटाळा आलेला असे.
भाऊबीजेला सकाळी लवकर आवरून बहिणींकडे जाऊन येण्याचा कार्यक्रम असे. दिवसभर एकतर बहिणी येत किंवा आम्ही त्यांच्या कडे जाऊन औक्षण करून घेत असू. दिवस यातच संपे. संध्याकाळी भाऊबीजेचा फटाक्यांचा कोटा संपून टाकला की फक्त आता देव दिवाळीसाठी ठेवलेले फटाके पिशवीत उरत. रात्री १० ला एक प्रकारची उदासी सर्वत्र दाटून येई. मोठ्या लोकांना त्यांची ऑफिसातील कामे खुणावू लागत.
उरलेली सुट्टी केलेला किल्ला आवरण्यात , खेळण्या बागडण्यात कधी संपे हे ही समजत नसे. सुट्टीच्या दोन दिवस आधी आम्हा मुलांच्या लक्षात येई की शाळेने दिलेला दिवाळीचा अभ्यास तसाच राहिला आहे. हा दिवाळी चा अभ्यास म्हणजे मला दिवाळी सुट्टीला लागलेला शाप वाटे. मग सुट्टीचे शेवटले दिवस तो पूर्ण करण्यात जाई. शाळेची चाहूल लागलेली असे.
सुट्टीच्या शेवटच्या एखाद्या संध्याकाळी भूक लागली की आम्ही चिवड्याचा डबा चिवडा खायला उघडत असू. त्यात चिवडा , खोबरे , डाळे संपलेले असे आणि खाली फक्त त्याचा उरलेला मसाला दिसे जो आम्हास जणू सांगे, की "दिवाळी सुट्टी संपली !"
कौस्तुभ पोंक्षे

कलाप्रकटन

प्रतिक्रिया

दिवाळीच्या रम्य आठवणी आवडल्या.

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- सीख नहीं पा रहा हूँ मीठे झूठ बोलने का हुनर,कड़वे सच से हमसे न जाने कितने लोग रूठ गये।

चौथा कोनाडा's picture

5 Nov 2021 - 5:57 pm | चौथा कोनाडा

सुंदर स्मरणरंजन.
बालपणीच्या अश्या सणाच्या आठवणी म्हणजे मौल्यवान ठेवा. कधी उघडा आणि त्या गंधाने भूतकाळाचे सुख पुन्हा उपभोगायचे.

श्रीगणेशा's picture

8 Nov 2021 - 12:14 am | श्रीगणेशा

आठवणी आवडल्या, आपल्याच वाटल्या!
कुणीतरी या आठवणी लिहून, साठवून ठेवतंय हे पाहून हायसंही वाटलं!!

अगदी एका वयोगटातल्या प्रत्येकाला यातील अनेक आठवणी जशाच्या तशा येत असतील. उत्तम स्मरणरंजन.

खालील काही केवळ गंमत म्हणून:

दसऱ्याच्या अगदी दुसऱ्या दिवशी पासून सहामाही सुरु होई.

सहामाही नाई काई. सहामई किंवा सामई...!!

एक मातीचा डोंगर, त्यात पायऱ्या , आणि पायऱ्या संपल्या की थेट महाराजांचे आसन.

अगदी तंतोतंत..!! शिवाय मावळे, वाघ, सिंह, पक्षी यातील कोणीही कोणाहीपेक्षा आकाराने मोठे लहान असणे हेही. हाय टेक लोक, विशेशत: पालक डॉक्टर असतील ती पोरे इंजेक्शनची सुई पैदा करुन एक सलाईन तत्वावर कारंजेही बनवत किल्ल्यासमोर.

उरलेली सुट्टी केलेला किल्ला आवरण्यात

गुहा या नंतर सुतळीबॉम्ब लावण्यासाठीच जणू बनवलेल्या असत. आपलीच रचना खुद्द आपणच उत्साहाने बॉम्ब लावून उध्वस्त करणारे वीर म्हणजे फार रोचक व्यक्तिमत्वे असू आपण मुळातच.

पुन्हा एकदा, लेख आवडला.

मुक्त विहारि's picture

8 Nov 2021 - 9:26 am | मुक्त विहारि

दिवाळीची सुट्टी आणि मे महिन्याची सुट्टी, 11 वी नंतरच जास्त Enjoy केली

ह्या दोन्ही सुट्टट्या, आधीच खराब असलेले अक्षर, अजून जास्त खराब करण्यातच गेल्या

पाढे, परवाचे, इंग्रजी स्पेलिंग आणि शुद्नलेखन ह्या चौघांच्या खांद्यावर बसूनच, आमची सुट्टीची तिरडी निघत होती

जाऊ दे

नकोच त्या आठवणी ...

श्वेता व्यास's picture

9 Nov 2021 - 4:11 pm | श्वेता व्यास

छान आठवणी आहेत, बऱ्याचशा आठवणी मिळत्या जुळत्या आहेत त्यामुळे अधिकच आवडल्या.

बबन ताम्बे's picture

9 Nov 2021 - 6:37 pm | बबन ताम्बे

मागच्या पिढीच्या सर्वांच्या आठवणी अशाच आहेत. फक्त तो दिवाळीचा अभ्यास ही संकल्पना ज्या कुणी काढली असेल त्याला नरकात पण जागा मिळणार नाही. स्वच्छन्दी आनन्द लुटताच यायचा नाही सुट्टीचा. आमचा एक मास्तर सहामाहीचे पेपर सोडवायला सांगायचा, ज्याचा पुढच्या टर्मला काही उपयोग नसायचा. सुट्टी संपून शाळा सुरू झाली की ज्यांनी दिवाळीचा अभ्यास लिहून आणला नाही त्यांना छड्या. नुसता छळवाद होता.
लेख आवडला.