रुक्मिणी-अनय संवाद

मिडास's picture
मिडास in जनातलं, मनातलं
27 Oct 2021 - 5:39 pm

भाग १

कोजागिरीच्या मध्यरात्री वृन्दावनातल्या सळसळत्या पिंपळ वृक्षाखाली रुक्मिणी वाट बघत होती. काही अंतरावर कालिंदी आपल्याच नादात वाहत होती. त्या मंजुळ नादात रुक्मिणी काही वेळ रमली सुद्धा असेल. पण हे मान्य करायची तिची तयारी मात्र नव्हती. लोक म्हणत हिमासारखी शुभ्र अशी ती नदी कृष्णाच्या सावळ्या रंगात रंगून कालिंदी झाली. आज पौर्णिमेच्या मध्यान्हाला चंद्र कालिंदीवर चांदणं शिंपडून तिला पूर्वीच्या रूपाची आठवण करून देत होता. पण तिचं ते रुपडं बघायला रुक्मिणीशिवाय तिथे कुणीच नव्हतं. जिथे पाहावं तिथे रुक्मिणीला कृष्णाच्या नाना लीळांच्या खुणा जाणवत होत्या. तो कदंबाचा वृक्ष ज्याच्या आडून त्याने गोपींना निर्वस्त्र होताना पहिला होतं, तो कालिंदीचा ऐलतीर जो कृष्णाच्या रासलीलांचा साक्षीदार होता. आणि तो पिंपळ वृक्ष ज्याच्या खाली बसून कृष्णाने 'ती'च्याकरता वेळूत त्याचा प्राण फुंकला होता. सारं काही रुक्मिणीच्या मनःचक्षुंपुढे उलगडत होतं. आज रुक्मिणी त्याच ठिकाणी कुणाची तरी वाट बघत होती. त्याला निरोप मिळाला असेल कि नाही तिला ठाऊक नव्हतं. निरोप मिळाला तरी तो येईल कि नाही तिला ठाऊक नव्हतं. ती इथे त्याला भेटायला आली आहे हे कृष्णाला जरी सांगितलं नाही तरी त्याला हे नक्की समजणार एवढं ती जाणून होती, पण जर कृष्णाने तिला याबद्दल छेडलं असतं तर तिच्या जहरी वाग्बाणाने तो घायाळ होईल याची पूर्ण खबरदारी ती घेणार होती. पण ज्याची वाट ती बघत होती तो येणार तरी कधी कि येणारच नाही.
रुक्मिणीला ठाऊक असल्यापासून तिने कायम 'ती'चा तिरस्कार केला होता. पट्टराणी असून 'ती'ला जे स्थान मिळालं होतं ती जागा रुक्मिणीला कधीच मिळणार नव्हती. विचारांच्या भोवऱ्यात गरगरत एक पुसटसा संशय तिच्या मनात रुजला होता. बघता बघता तो विचार फोफावत जाऊन रुक्मिणीला थोडी उभारी येत होती. काय गरज होती रुक्मिणीला 'ति'चा एवढा बाऊ करण्याची? नवऱ्याच्या त्रासाला कंटाळून गेली असेल 'ती' शरण कृष्णाला. नाहीतरी कसला तरी त्रास असल्याशिवाय देवाची आठवण कुठल्या भक्ताला येते म्हणा. लोकांचं काय त्यांना श्रद्धा आणि प्रीती यातला फरक समजला असता तर देवांच्या अस्तित्वाचं प्रयोजन तरी काय होतं? असले वेगवेगळे प्रश्न रुक्मिणी स्वतःलाच विचारून स्वतःच त्याची उत्तरं सुद्धा देत होती. पण शेवटी कल्पनेला कुठे तरी वास्तवाची जोड हवीच कीं ? एकदा 'ति'च्या नवऱ्याला भेटलो कि सगळं उलगडा होणारच होता. मग कृष्णाच्या असंख्य भक्तांच्या रांगेत 'ती'ला ढकलून रुक्मिणी शांतं होणार होती. अरे पण राहिला तरी कुठे असेल हा? कि असाच अडेलतट्टू असेल तो आधी पासून ? कुणाचं नं ऐकणारा, अहंकारी, कोपिष्ट कदाचित दुराचारी देखील ? कदाचित म्हणूनच 'ती' बिचारी प्रेमात पडली असेल कृष्णाच्या. आणि कृष्णाला तरी काय म्हणा त्याचं, जशा बाकी सगळ्या तशीच हि देखील अजून एक. लोक उगीच नावांच्या जोड्या लावतात झालं. आता नशिबाने 'तीं चं नाव तेवढं साधं सरळ होतं म्हणून चिकटलं कृष्णाबरोबर. पण कृष्णपत्नी म्हणून कुणी 'ती'ला कुणीतरी तो मान देणार होतं का? सुतराम नाही. रुक्मिणीने ठरवलं आता उगीच वेळ वाया घालवायचा नाही. इतका वेळ थांबलो खूप झालं परत आपल्या महालात जावं हेच बरं. रुक्मिणी वळणार तेवढ्यात तिला पायाखाली पानं चुरडल्याचा आवाज आला. त्याने आपल्याला बघू नये म्हणून ती पटकन झाडामागे दडली. नाहीतरी त्याला भेटून उपयोग असा नव्हताच तरी पण एकदा तो दिसतो तरी कसा हे बघायला म्हणून ती हलकीशी बाहेर डोकावली.

क्रमशः

मुक्तकप्रकटन

प्रतिक्रिया

तुषार काळभोर's picture

27 Oct 2021 - 5:46 pm | तुषार काळभोर

कदाचित पुढील भागात कळेल.

चौथा कोनाडा's picture

28 Oct 2021 - 12:54 pm | चौथा कोनाडा

रोचक चित्रदर्शी लेखन !
चित्र डोळ्यांपुढे उभं राहिलं !
+१

पुढील भागाच्या प्रतिक्षेत !