दिवाळी अंक २०२१ : दवबिंदू

Primary tabs

साहित्य संपादक's picture
साहित्य संपादक in दिवाळी अंक
1 Nov 2021 - 9:00 pm

दवबिंदू

धुक्यावर अलगद होउन स्वार
नभातून उतरे दवबिंदू फार
रात्रीच केली प्रवासाला सुरुवात
पहाटेच आले झाडा पानाफुलात
दवांनी हळूच आगळीक हो केली
हळूच आले ते पानाफुलांच्या गाली
दवांनी पाडली पानाच्या गाली खळी
पानातुन उमले इवलीशी कळी
फुलाला घातला दव हिऱ्यांचा टोप
पानांच्या गळ्यात हिऱ्यामोत्यांचा गोप
वाऱ्याने झाडाची हळू काढली खोडी
हळूच केली त्याने दंगामस्ती थोडी
झाडावर मारली इवली फुंकर
फुलांवरून घसरे मोती सरसर
झाडाच्या अंगावर आला की शहारा
पाहून हसला गाली खट्याळ वारा
दवांच्या गारव्यात फुला वाजे थंडी
सूर्याने घातली किरणांची रे बंडी
किरणांना पाहू दवबिंदू रुसले
फुरंगटून जात धुक्यात बसले
फुलाला दव म्हणे जातो आम्ही आता
पहाटे येऊ पुन्हा मारायला बाता
दिवसभर फूल उन्हात रापले
रात्री दवांचे स्वप्न बघत झोपले
पहाटे दवांने केले ओले शिंपण
फुलाभोवती घाली मोत्याचे कुंपण
फुलाला आली पहाटे पहाटे जाग
दवांनी भरली पुन्हा एकदा बाग

सौ. उज्वला ढमढेरे
चिंचवड पुणे ३३

प्रतिक्रिया

Bhakti's picture

2 Nov 2021 - 7:16 pm | Bhakti

दिवसभर फूल उन्हात रापले
रात्री दवांचे स्वप्न बघत झोपले

:)

पाषाणभेद's picture

2 Nov 2021 - 8:19 pm | पाषाणभेद

फुलराणी

ज्ञानोबाचे पैजार's picture

2 Nov 2021 - 10:58 pm | ज्ञानोबाचे पैजार

फारच छान, आवडली

पैजारबुवा,

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

8 Nov 2021 - 10:10 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

आवडली कविता.

-दिलीप बिरुटे

तुषार काळभोर's picture

12 Nov 2021 - 7:03 am | तुषार काळभोर

छान कविता आहे.

चौथा कोनाडा's picture

12 Nov 2021 - 11:02 am | चौथा कोनाडा

छान कविता.

पहाटे दवांने केले ओले शिंपण
फुलाभोवती घाली मोत्याचे कुंपण
फुलाला आली पहाटे पहाटे जाग
दवांनी भरली पुन्हा एकदा बाग

सुरेखच !

गुल्लू दादा's picture

16 Nov 2021 - 1:45 am | गुल्लू दादा

आवडली. धन्यवाद.

कर्नलतपस्वी's picture

16 Nov 2021 - 6:07 pm | कर्नलतपस्वी

कवीता तर कवीता प्रतीसाद पण खुप भारी, आवडले.