गुरुजींचे पालकांना पत्र

भम्पक's picture
भम्पक in जनातलं, मनातलं
28 Sep 2021 - 8:58 pm

प्रिय पालक,
सगळीच मुलं पुढे जाऊन डॉकटर, इंजिनिअर बनत नाहीत.प्रत्येकाच्या वकुबाने प्रत्येक जण तसा बनतो.आणि हो डॉकटर,इंजिनिअर बनणे हे काही यशस्वीतेचा मापदंड नाही.कळेल पुढे पोरांना.पण त्यांना चांगला माणूस घडवूया आपण.आम्ही तर आहोतच,परंतु तो तुमचे अनुकरण करणार आहे त्यामुळे तुम्ही सावध असा.या चार भिंतीत आम्ही जगाचे शिक्षण देऊच त्याला,परंतु तुमचा सहभाग हा त्यात सिंहाचा वाटा असेल.
हा समाज प्रत्येक घटकाचा बनलेला आहे, प्रत्येक घटक हा त्याच्या उपयुक्तते प्रमाणे महत्वाचा आहे.म्हणजे अगदी खालच्या पातळीवरचाही मनुष्य तेवढाच महत्वाचा आहे जेवढा वरिष्ठ पातळी वरचा.आपण हे त्याला बिंबवूया.म्हणजे तो प्रत्येकाचा आदर करण्यास शिकेल.
आम्ही तर शिकवू त्याला मेहनतीच्या ,कष्टाच्या पैशाचा आनंद कसा मौल्यवान असतो,पण तुम्ही त्याचे रोल मॉडेल आहेत त्यामुळं तुम्ही कसे वागतात,काय करतात त्यावर अवलंबून आहे.
आपण शिकवू त्याला जीवनाचा आनंद भरभरून घ्यायला.जे करेल त्यात जीव ओतून कसे करावे हे शिकवेल मी त्याला.परंतु आताच त्यावर तू असे कर तू तसे कर म्हणून भार टाकणे सर्वथा चुकीचे आहे.गुदमरतात हो मुलं अश्याने.कळेल त्याला योग्य वेळी त्याला काय करायचे आहे,आम्हीही तेच करून घेऊ.पण तुम्ही मात्र अनावश्यक अपेक्षांचे ओझे नका हो टाकू त्याच्या कोवळ्या खांद्यावर...उमलू देऊ त्याला,बोन्साय प्रकार ऐकलाय ना तुम्ही?
पुस्तकांचे विश्व दाखवूच त्याला पण त्यात किती आनंद भरलेला आहे हे तुम्ही पण पटवा त्याला.
त्याला रोकू नका,बागडू द्या,खेळू द्या.उघड्या निसर्गात हुंदडू द्या.फक्त घरात कोंडून राहिल्याने बाहेरच्या निसर्गाच्या सौन्दर्याला मूकेल तो.निसर्ग भरभरून पाहू द्या त्याला,कोण जाणे त्यात त्याला त्याच्या आयुष्याची वाट सापडेल...!
खिलाडू वृत्ती तर शिकवूच त्याला,पण त्याचे बाहेरील वागणे हे तुमच्या घरातल्या वागणुकीचेच परावर्तन असते हे लक्षात घ्या.
त्याला वेळोवेळी प्रोत्साहित करा.त्याला नवनवीन गोष्टी करण्यासाठी प्रेरित करा.काही चुकले तर चिडू नका.त्यामुळे तो घाबरून नवीन गोष्ट करण्यास धजावणार नाही.त्याच्या प्रत्येक नवीन गोष्टीचे कौतुक मनापासून करा.
मुलं ढ वगैरे काही नसतात हो.काहींना गती असते काहींना नाही.पण प्रत्येक जण कशात तरी हुशार असतो.आपण वृथा अपेक्षा करण्यापेक्षा त्याला स्वतःलाच समजण्याची संधी देऊ या.अन एक सांगतो खुप सोपं आहे मुलांना घडवणं फक्त त्याला तुमची योग्य साथ हवी.योग्य वेळी योग्य वागणे हा मंत्र आहे.म्हणजे जिथे चूक असेल तिथं रागवाच अन जिथे बरोबर असेल तिथं दाद द्याच.उगीच लाड करणे, चूक असतांनाही त्याला झाकणे ह्या गोष्टी खूप घातक आहेत.म्हणजे आता वेळ मारली जाईल, परंतु त्याच्यासाठी मात्र पुढे वाईट असेल.
तुम्ही कठोर रहा पण कधी,तर त्याला चांगल्या सवयी लागव्यात यासाठी.अन लहानपणी शिकलेले चांगले संस्कार हेच मोठेपणी समाजात वावरताना अवतरतात हे मी तुम्हाला स्वानुभवाने सांगतो.
हे जीवन म्हणजे धर्मयुद्ध आहे ,हे जसे लहानग्या शिवबाला शहाजी राजांनी शिकविले होते तसे शिकवूया आपण.म्हणजे जश्यास तसे वागावे.
तुम्ही जर अशी साथ आम्हास दिली तर निश्चितच आपण त्याला एक सुजाण नागरिक बनवू की जो खरे खोट्यातला फरक करू शकेल.आव्हानांना यशस्वी रित्या तोंड देईल.तो धाडसी असेल अन त्याला त्याच्यापेक्षा कमजोर लोकांची काळजी असेल.तो नम्र असेल परंतु अन्यायापुढे नमणार नाही.तो राष्ट्रभक्त असेल पण तो अंधानुकरण करणार नाही. तो आदर्श असेल .
माफ करा,मी खूपच बोलतोय तुम्हाला.पण तुमच्या सहभागाशिवाय हे साध्य करणं सर्वथा अशक्य आहे.

तुमचा मुलगा भलताच गोड छोकरा आहे हो तो!!!

मुक्तकविचार

प्रतिक्रिया

अमरेंद्र बाहुबली's picture

28 Sep 2021 - 9:10 pm | अमरेंद्र बाहुबली

गुरूजींचो म्हणजे श्रिगुरूजींचे का??

सरिता बांदेकर's picture

28 Sep 2021 - 9:41 pm | सरिता बांदेकर

विचार आवडले मला.

कंजूस's picture

28 Sep 2021 - 10:34 pm | कंजूस

हे बरंय.

सुरिया's picture

28 Sep 2021 - 11:01 pm | सुरिया

अखेरीस आज आब्राहाम आजोबांना त्यांनी न लीहालेल्या पत्राची पोहोच मिळाली.

अमरेंद्र बाहुबली's picture

28 Sep 2021 - 11:14 pm | अमरेंद्र बाहुबली

ते शाळेत न कळनार्या भाषेत भिंतीवर चिपकवलेलं अग्रलेख छाप पत्र. मला वाटायचं एखाद्या विद्यार्थ्याला शिक्षा म्हणून पुर्ण वाचायला लावत असावेत.

गॉडजिला's picture

30 Sep 2021 - 6:08 pm | गॉडजिला

भलताच गोड छोकरा आहे हो

समजा तो गोड छोकरा नसता तरी विचार तितकेच महत्वाचे नाहीत काय ?