दिवाळी अंक २०२१ : भूक
मावळत्या सूर्यानं फेसाळलेल्या ढगांवर आपला तांबूस रंग उधळला होता. पानगळ झालेल्या झाडांची उरलीसुरली पानं घेऊन, वारा ढगांना सैरभैर करू पाहत होता. वाळलेल्या झाडाच्या शेंड्यावर दिमाखात बसलेली कोकिळा मात्र वादळालाच कवेत घेऊ पाहत होती. अलकाची कुऱ्हाड अजूनही थांबायचं नाव घेत नव्हती. सपसप सपसप करत ती त्या वेड्या बाभळीच्या खांडोळ्या करत सुटली होती. उसाच्या गंडोऱ्या व्हाव्यात अगदी तितक्याच सहजतेने वेडीबाभळं छाटली जात होती. घामानं ओलेचिंब झालेल्या अलकाच्या अंगावर चिकटलेली माती घामातून निथळत होती. क्षितिजावरला सुर्य कुऱ्हाडीचा वेग वाढवत होता. आपलं पिल्लू आपली वाट पाहात असेल, भुकेनं ते व्याकूळ झालं असेल, या विचाराने अलका मनातल्या मनात तळमळत होती. लाकडावर एकेक घाव टाकत होती. शेवटी अलकानं सूर्यास्तापूर्वी मोळीभर लाकडांचा फडशा पाडला. जवळच असलेल्या वेलरबराच्या वेलीचा एक तुकडा काढला. मोळीला घट्ट पीळ मारला. मोळीला डोकं देत तिने दोन मणाची मोळी एका झटक्यासरशी डोक्यावर उचलली. झपाझप पावलं टाकत ती आता गावाच्या दिशेनं चालू लागली. मोळीच्या ओझ्याने तिची मान डुलत होती.
'गौरवला उगाचच यंदा शाळंत घाडलं'असं ती मनाशी पुटपुटत स्वत:लाच दोष देत होती. भुकेने व्याकूळ झालेला त्याचा चेहरा तिला दिसत होता. कितीदा तरी गौरव अलकाची वाट पाहात दारातच झोपी जायचा. आजही तो आपल्या आईची आतुरतेने वाट पाहात बसला होता. त्याने आज अलकाला गरम गरम बाजरीची भाकरी आणि कढी करायला सांगितली होती. अलकानंही सकाळीच पावसेबाईंकडून वाटीभर दही आणून ठेवलं होतं. तलाठीन बाईंकडून वीस रुपये मिळाल्यावर ती शेरभर बाजरी दळून आणणार होती.
अलका नदी ओलांडून गावात येईपर्यंत काळोख दाटला. काळ्याकुट्ट अंधारात गावातील विजेचे दिवे तेवढे झगमगत होते. उकाडा असह्य झाला होता. झाडं स्तब्ध होती. अंधारातून वाट काढत अलका गावात पोहोचली. गावात पोहोचताच मोकाट कुत्र्यांनी तिचं स्वागत केलं. कधी एकदा मान मोकळी होईल असं तिला झालं होतं. मागच्या दाराने जाऊन तिनं उभ्यानेच परसात धाडकन मोळी टाकली. मोळीचा आवाज एकताच तलाठीण बाईंनी आवाज दिला,
"अगं ये.... आलके.... .. हाळूच टाक जरा....मोडशील काही"
साडीच्या पदरानं आपल्या कपाळावरील घाम पुसत तिनं आपली मान दोन-चारदा फिरवून मोकळी केली आणि सावकाश खाली बसत म्हणाली,
"नई गं माय... पटांगणात टाकली, ताम्बर पाणी दि गं माय .... लय घसा कोरडा पडलाय."
"घर काय लई लांब होतं व्हय गं, तुझं आता,"
असं म्हणत बाईंनी पाण्याचा तांब्या अलकाच्या जवळ आणून मांडला. अलकानं मान वर करून घटाघट घटाघट करत अख्खा तांब्या रिता केला. पण अजूनही तिची तहान गेली नव्हती. पुन्हा पाणी मागण्याचं धाडस आता ती दाखवू शकली नाही. बाईंनी एकदा तिच्याकडे आणि एकदा ताब्यांवरून नजर फिरवली. अलकानं आपला तांब्या नेहमी प्रमाणे स्वच्छ करून हौदावर ठेवला. अलका आता पैशांची वाट पाहत बसली होती. बराच वेळ झाला, पण तलाठीनबाई अजूनही बाहेर आल्या नव्हत्या. अगोदरच उशीर झाल्याने अलकाला गौरवची काळजी वाटू लागली होती. आपलं बाळ आजही उपाशीच झोपेल, या भीतीने तिने न राहून पुन्हा एकदा बाईंना आवाज दिला आणि आधीच पैसे मिळत नसल्याने चिडलेल्या तलाठीनबाईंचा पारा चांगलाच चढला.
"काय गं, तुला एवढा दम निघत नाही का? आम्ही काय पळून जाणार आहोत का तुझे पैसे घेऊन?"
"नई, तसं नई "
"नाही, तू जाच आता .. ... उद्या ये ....आज पैसे नाही माझ्याकडं."
आता मात्र अलकाला दरदरून घाम फुटला आपण उगाचच घाई केली असं तिला वाटलं. त्यातून कसबसं तिनं स्वतःला सावरलं. आपले अनावर झालेले अश्रू आवरत ती म्हणाली.
"नई, थांबते मी , पण असं करू नका. म्हां गौऱ्या उपाशी हाई ओ"
"तुमच्यासारख्या लोकांना हीच भाषा समजते... आता पटकन ऊठ आणि निघ येथून.... आणि तुला लगेचच पैसे लागत असतील, तर उचल तुझी मोळी आणि चालती हो."
तलाठीनबाईंचे हे अतिटोकाचे शब्द अलकाच्या हृदयात बाणासारखे घुसले. असंख्य विंचवांनी डंख मारावा अशा वेदनांनी तिचं हृदय पिळवटून निघालं. अलकानं आलेला हुंदका दाबत केविलवाण्या नजरेनं एका भाकरीची मागणी केली. तलाठीनबाईंनी एक शिळी भाकरी आणून तिच्या हातावर टाकली. मिळालेली भाकरी घेऊन ती झोपडीकडे निघाली.
काळाकुट्ट किर्र अंधार तुडवत ती आपल्या झोपडीत पोहोचली. झोपडीच्या बाहेर पोटाला पाय बिलगून जमिनीवर झोपलेल्या गौरवला पाहून तिच्या डोळ्यातून घळाघळा पाणी वाहू लागलं. आपल्या बाळाच्या निष्पाप चेहऱ्याकडे पाहत अलका मूकपणाने अश्रू ढाळत होती. थोड्या वेळानं स्वतःला सावरत तिनं त्याला उचलून झोपडीत नेलं. गाठोड्यातील दोन चिंचाची बोटकं पाण्यात भिजवून चिंचाचं आंबट पाणी बनवलं. सोबत आणलेली शिळी भाकरी तव्यावर गरम केली आणि गौरवला उठवू लागली...
"ये बाळा, ऊठ .... बघ, म्या काय आणलंय ... तुला गरमागरम बाजरीची भाकरी आणि कढी खायची ना ... ..."
"ये लेकरा, अरे, ऊठ ना लवकर...."
असं म्हणत अलकानं आपला दाटून आलेला हुंदका आवरला आणि चिंचेच्या पाण्यात चुरलेली शिळी भाकरी गौरवसमोर ताटात ठेवली. गौरव डोळे चोळत चोळत उठून बसला, पण त्याचे डोळे उघडेणासे झाले होते. अलका त्याला एकेक घास भरवत होती आणि भुकेलेला गौरव आपण गरम गरम बाजरीची भाकरी आणि कढी खातोय असं समजून ती चिंचेच्या पाण्यात चुरलेली शिळी भाकरी खात होता. शिळी भाकरी आणि चिंचेचं पाणी हे गौरवला गरम गरम बाजरीची भाकरी आणि कढी वाटत होते. अलका मनात पुटपुटली, "फकस्त समजायचं .. ... "
वाचने
8808
वाचनखूण
प्रतिक्रिया
15
कथा आवडली.
छान आहे कथा.
कथा आवडली!!!
दाहक कथाभुकेलेला गौरव आपण गरम
In reply to दाहक कथाभुकेलेला गौरव आपण गरम by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)
+ १
In reply to दाहक कथाभुकेलेला गौरव आपण गरम by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)
+१
ह्रुद्य कथा
अगदी अंगावर येनारी कथा ..
In reply to अगदी अंगावर येनारी कथा .. by सुक्या
दमामि यांची कथा आहे ती. नाव
हृदयद्रावक कथा. बिचारी अलका
एकविसाव्या शतकातल्या अश्वथाम्याची गोष्ट आवडली
एकाच शीर्षकाच्या
In reply to एकाच शीर्षकाच्या by धर्मराजमुटके
एकाच दिवाळी अंकात एकाच
In reply to एकाच दिवाळी अंकात एकाच by चौथा कोनाडा
लेखक वेगळे असल्याने चोखंदळ वाचक अंक चाळताना
कथा वाचून मन सुन्न झाले. काही