आजोळच्या आठवणी ​

Primary tabs

नानुअण्णा's picture
नानुअण्णा in जनातलं, मनातलं
23 Sep 2021 - 4:01 pm

खुप वर्षापुर्वीची गोष्ट, आम्ही तेव्हा अहमदनगर जिल्ह्यात एका गावात रहात होतो. माझ्या वडिलांची नोकरी तिथे होती. आमचं आजोळ चौल आणि आईच माहेर अलिबागच्या कुशीतील वरसोली. वर्षांतून एकदा मे महिन्यात शाळेच्या सुट्टीत आम्ही सगळे आजोळी जात असु, आगगाडी, लाल एष्टी असा आमचा आठ एक तासाचा प्रवास असे किंवा व्हाया मुंबई असा. मुबंईत, किंवा डोंबिवलीत एक थांबा आत्या, काकांकडे आणि मग कधी भाऊच्या धक्क्या वरून लाँच अथवा लाल एष्टी. त्यावेळी एष्टी वाटेतील सगळ्या गावात थांबे. एस्टी खचा खच प्रवाशांनी भरलेली असे. सामान, टोपल्या, माश्यांचा वास. कंडक्टर आणि प्रवाशांचा कलकलाट.
केसात फुल, चमकीचे गजरे माळलेल्या माळणी आणि कोळणी सुद्धा. यातील काही प्रवासी नेहमीचे असत ते आणि कंडक्टर गप्पा मारीत. पेण आणि पनवेल ही मोठी स्थानक होती, शिवाय बाजारपेठ..तेव्हा कुलाबा जिल्हा होता. एष्टी स्टँड मध्ये शिरली की आत शिरण्यासाठी माणस एसटी मागे धो धावत. आतुन उतरणाऱ्यांची आणि पुढच्या प्रवासाला जाणाऱ्यांची कसरत चाले..मे महिना लग्न सराईचे दिवस, सुट्ट्या व अलिबाग जिल्ह्याचे ठिकाण एष्टीला गर्दी असे. एष्टी थांबली की विक्रेते खिडकीजवळ येऊन ओरडत असत, खोबऱ्याची व गुळाची प्लास्टिकच्या कागदात बांधलेली चिक्की ही तिथली स्पेशालिटी होती. पेणला एष्टीस्टँड बाहेर अनेक माळणी रस्त्याच्या कडेला ताजी भाजी विकण्यास बसत, हे दृश्य अगदी अलीकडच्या काळात सुद्धा बघायला मिळते.
पेण आलं की आई सांगे आता धरमतरच्या खाडीचा पूल येईल बघा, मग पुलावरून त्या पाण्यात डोलकाठी, वेगवेगळे झेंडे फडकत असलेली गलबत बघायला मिळत, फार मजा वाटे, अलिबाग जवळ आलं आता थोडा वेळ राहिला, याची खुण पटे, मग छोटी गाव लागत, वडखळ, पोयनाड, कार्ले खिंड, गावाची नावे पण किती छान. कार्ले खिंडीतील वळणावर पात्रुदेवीचं मंदिर आहे, तिथे यष्टीचा ड्रायव्हर तीचा वेग हळु करे बरेच प्रवाशी सुट्टी नाणी देवाला खिडकीतून टाकत, आम्ही पण टाकत असु. नाणी रस्स्यावर पडल्याचा खण खण आवाज येई. प्रथा आहे आजही, प्रवास सुखरूप पार पडू दे या साठी.
तिथुन झाडीतून समुद्राचं पहिलं दर्शन होई..आलं एकदाच गाव अस वाटे, समुद्राचं, विमानांचं, बोटींच मला फार आकर्षण वाटे. ह्या गोष्टीं आम्हाला वर्षानंतर दृष्टीस पडत. यथावकाश एष्टी अलिबाग स्टँड मध्ये शिरे, आम्ही असंख्य सामान, पिशव्या घेऊन उतरत असू. मग टांगा ठरवण्याचा कार्यक्रम असे. तेव्हा रिक्षा नव्हत्या. सगळं सामान ठेऊन पुढे एक व मागे दोन मोठी माणसं व त्यात उरलेल्या जागेत आम्ही कोंबून बसत असू. अलिबागपासून वरसोली अंदाजे दीड ते दोन किलोमीटर असावे. टांगा अतिशय हळू चाले, सायकल चालवणारे सुद्धा पुढे जात असा टांग्याचा वेग असे. एक लयबध्द आवाज आणि तालात टांगा डुलत डुलत चाले.
पाहुणे आले अस सगळ्या गावाला समझें. रस्त्यात ओळखीची मंडळी आई वडिलांना हाक मारत. भाई, अण्णा कसे आहात?
रामनाथ जवळ रस्त्यात एक भात गिरणी लागे, तिथे भाताच्या तुसाचे ढीग लागलेले असत.
अशी आमची वरात मामाच्या वाडीच्या, घराच्या तोंडाशी येऊन थांबे. तिथुन घरापर्यंत जाण्यास एक छोटी गल्ली वजा रस्ता आहे. तोपर्यंत मामी, मामा आम्हाला नेण्यास येत असत. आम्ही पडवीतून घरात जात असू. घर लाल कौलांचं, घरात अंधार असे, आणि एका काचेच्या कौलातून प्रकाशाचा कवडसा पडलेला असे.
मोठ्या माणसांची ख्याती खुशाली, विचारपूस सुरू होत. विहिरीचं पाणी चव वेगळीच वाटे, नळ पोहोचले नव्हते गावात. चहा, किंवा कोकमचे सरबत, ती चव आणि रंग न विसरता येण्यासारखा..
मामाच घर, खुप मोठ अंगण, बाजूला तुळशी वृंदावन, समोर चिक्कूच झाड..चिंचेची दोन झाड. मागे पण ओसरी त्याला लागून छोटस स्वयंपाकघर घरात एक स्वतंत्र देवघर आणि मग वाडीत विहीर व तिथेच न्हाणीघर व बाजूला विजेचा पंपाच् घर. विहिरीवर पाणी काढण्यासाठी छोटा रहाट बाजुला पाणी साठवून ठेवायची टाकी..आम्ही या टाकीच्या थंडगार पाण्यात मनसोक्त डुंबत असु.. मामा वाडीच शिंपण करताना झाडांच्या आळ्यामधील पाण्यात नाचत असू.
नारळी पोफळीची वाडी, घरामागे फणस, आंब्याची झाड, एक आंबा आकाराने छोटा पण अनेक घोस लागत फांदीवर, चव व रंग अप्रतिम. हा पिकला की देठाजवल नारंगी होई व इतर भाग पिवळा, गोंडस दिसे.
दुसरा विहरीजवळचा आंबा मोठा व चव आंबट गोड अननसासारखी..अनेक फुलझाड, बकुळीच एक मोठं झाड त्या खाली पडलेला बकुळ फुलांचा सडा.
नारळामध्ये एक मोहाचा नारळ हा प्रकार असे, अजूनही असेल, त्याच्या शहाळ्याचे पाणी अतिशय गोड असे.
आम्ही विहिरीवर धावत असु, आई ओरडे, काही उद्योग करू नये म्हणून.. उदाहरणार्थ विहिरीत साबणाची वडी पाडणे, स्लीपर पाडणें, डोकावून कासव दिसत का? मासे दिसतात का? विहिरीत काय पडलंय? अनेक प्रकार.
किती आठवणी..हा आनंद शोध पुढे महिनाभर चाले.
सचिन वर्तक (९९२२५३४५५५)

जीवनमानलेख

प्रतिक्रिया

सुरिया's picture

23 Sep 2021 - 4:27 pm | सुरिया

सुंदर टेम्प्लेट निबंध
गेली पंधरा वर्षे मराठी आंतरजालावर हेच ममव आजोळ फिरते आहे.
.

चौथा कोनाडा's picture

23 Sep 2021 - 5:49 pm | चौथा कोनाडा

😊

मिपाने या पुढील स्पर्धा " आजोळच्या आठवणी" य विषयावर घ्याव्यात का ?

ज्योति अळवणी's picture

25 Sep 2021 - 10:09 am | ज्योति अळवणी

कल्पना छान आहे. कारण आजोळ सगळ्यांनाच प्रिय असतं

अमरेंद्र बाहुबली's picture

3 Oct 2021 - 12:32 am | अमरेंद्र बाहुबली

त्या पेक्षा आठवणी म्हणून विभाग सुरू करावा का मिपाने?

होकार...

+१ असा विभाग असलाच पाहिजे.

चौथा कोनाडा's picture

23 Sep 2021 - 5:46 pm | चौथा कोनाडा


केसात फुल, चमकीचे गजरे माळलेल्या माळणी आणि कोळणी ...... डुलत डुलत चाले.


व्वा, खुप छान ! संपुर्ण चित्र डोळ्यापुढे उभे राहिले, विशेषतः कोळीण (अर्थातच सैलाब मधली माधुरी दिक्षित .... हम को आजकल हैं इंतजार ...)

लेखनाची शैली जबरदस्त चित्रदर्शी आहे !
असे एकेक भाग लिहिलेत तर आत्मचिरीत्र इझीली लिहून होईल !
पुढील भागाच्या प्रतिक्षेत !

अलिबागला एस्टीने जायची मजाच न्यारी. का काय माहीत घाट उतरुन झाला की एका वेगळ्या जगाशी कनेक्ट झाल्याचे फिलींग येते.

ज्योति अळवणी's picture

25 Sep 2021 - 10:08 am | ज्योति अळवणी

आवडलं

कर्नलतपस्वी's picture

28 Sep 2021 - 12:56 pm | कर्नलतपस्वी

।दहा वर्षाचा असताना पहिल्यांदा कोकणात जायचा योग आला. मीत्राचा मामा चिपळूण कोर्टात नोकरीस, शिवाजीनगर ते चिपळूण न ऊ तासाचा रस्ता, खबांटकी घाटाचा जबरदस्त दरारा होता, एक महीना राहीलो तेंव्हा पासुन निर्माण झालेले आकर्षण आजतागायत कायम आहे. दरवर्षी वेगवेगळ्या ठिकाणी जातो आता नातेवाईक नाहीत पण नाते कायम आहे

ॲबसेंट माइंडेड प्रोफेसर's picture

28 Sep 2021 - 4:24 pm | ॲबसेंट माइंडेड ...

लेख आवडला.

सुबोध खरे's picture

29 Sep 2021 - 12:10 pm | सुबोध खरे

आमच्या आईचे माहेर नागावचे. त्यामुळे आपण लिहिलेलं वर्णन अक्षरशः बालपण जागवणारं आहे.

दर उन्हाळ्यात आम्ही ठाणे अलिबाग (सकाळी ७) एस टी ने जात असू तेथून पुढे अलिबाग रेवदंडा बसने नागावला. तेथे किमान एक महिना राहत असू. आई आणि दोन मावश्या आणि दोन मामा आणि त्यांची मुले अशी सगळी मुंबईतून नागावला जात असू.

बाकी वर्णन तसेच्या तसे. फक्त सुटी सोडून इतर वेळेस घर बंद असे. घराच्या मागे वाडीत एक हापूसचे आणि आठ नऊ रायवळ आंब्याची झाडे होती एक विहीर त्यातील पाण्याचा हौद त्यावर लाकडी रहाट आणि डोळ्यावर झापडं बांधून फिरणारा बैल सगळं डोळ्यापुढे उभा राहिलं. ( पाणी मचूळ होते त्यामुळे त्याची सवय व्हायला ३-४ दिवस लागत)

पुढे मी ९ वित असताना आजी गेली आणि दहावीनंतर शिक्षणाच्या आणि करियरच्या मागे लागलो आणि सगळं मागे राहिलं.

सिरुसेरि's picture

2 Oct 2021 - 11:40 pm | सिरुसेरि

छान वर्णन .