काय वाचताय ?-२

कॉमी's picture
कॉमी in जनातलं, मनातलं
14 Sep 2021 - 8:59 am

खालील गोष्टी वाचल्या-

१. ककोल्ड-


"little saint" अर्थात संत मिराबाईंच्या नवऱ्याचे आत्मकथन किरण नगरकरांच्या कादंबरीत आहे. कादंबरीची सुरुवात चांगलीच गुंतवणारी आहे. मध्यंतरी मात्र कादंबरी जेरीस आणते. पण शेवटी मात्र इतके मोठे पुस्तक वाचले, ते वर्थ झाले असे वाटते. ह्याचे कारण म्हणजे मुख्य पात्र अतिशय उत्तमपणे बांधले आहे. मेवाडच्या राणा संग्राम उर्फ राणा संग यांचा मुलगा, मेवाडच्या गादीचा वारस (महाराज कुमार) - राजा भोज- हा कथेचा नायक, आणि, 'ककोल्ड' आहे. ककोल्ड म्हणजे व्यभिचारी स्त्रीचा पती. हा शब्द वापरला जातो तो पतीसाठी दौऱबल्यवाचक म्हणून.

महाराज कुमारचा मेर्ता (मीरत)च्या राजकन्येसोबत विवाह होतो- मीरेशी. तिचा काका राव विरामदेव हा एक ताकदवान आणि प्रभावशाली सेनापती असतो, आणि हिरव्या डोळ्यांची मीरा अतिशय सुंदर असते. म्हणजे, राजवारसासाठी अतिशय उत्तम स्थळ असते. त्यामुळे तिच्या प्रेमात आकंठ बुडालेल्या कुमारला लग्नाच्या पहिल्या दिवशी कळणाऱ्या गोष्टी अतिशय धक्कादायक असतात. त्याची पत्नी त्याला सांगते की ती आधीच कुणाशीतरी विवाहित आहे. (अर्थातच, ती कृष्णाबद्दल बोलत असते.) यानंतर कुमारच्या आयुष्यातील होणाऱ्या घडामोडींवर हि कादंबरी आहे.

इतिहासात अत्यन्त कमी दखल घेतलेलं असं कुमारचं पात्र आहे. त्याबद्दल ठोस माहिती सुद्धा अतिशय कमी आहे. असं असताना त्यावर कादंबरी लिहिताना नगरकरांकडे त्यांचा स्वतःचा कुमार उभारण्याचे भरपूर स्वातंत्र्य होते. आणि त्यातून उभारलेला कुमार वाचकांच्या मनात खूप दिवस घर करून राहणार हे नक्की. कुमारचं पात्र अत्यंत खुबीने उभारलं आहे. त्याचे अंतःकरण वाचकांसमोर पूर्ण उघडे केले आहे. त्याच्या सर्व इच्छा, आकांक्षा, नैतिक मूल्य, त्याला लाज वाटणाऱ्या गोष्टी, त्याच्या लैंगिक इच्छा- सगळं आपल्यासमोर आहे. त्यामुळे कुमार हे पात्र हे प्रेडिक्टेबल आहे- पण ते चांगल्या अर्थाने. तो आता काय करेल, ह्याचा आपल्याला अंदाज येतो, पण काहीतरी क्लिशे गोष्टी घडतात म्हणून नव्हे, तर कुमारला आपण नीट ओळखतो म्हणून. Maharaj Kumar the character is as close a character can get to being perfect.

कादंबरीत बराच फॅन्टसी वाटण्याजोगा भाग आहे. आणि, तो भाग आणि चित्तोडच्या दरबारातील कुटील राजकारण याची किंचितही सरमिसळ होऊ दिली नाहीये. त्यातला फॅन्टसी टाईप भाग- हा बहुतेक मुद्दामून तृतीयपुरुषी वर्णनात लिहिला आहे, आणि इतर भाग मात्र कुमारच्या प्रथमपुरुषी निवेदनात आहे.

ककोल्ड अगदी न मिस करण्यासारखं पुस्तक आहे. पुढे मागे पुन्हा एकदा वाचीन असे म्हणतो.

2. स्वाम्प थिंग-


अॅलन मूर या सुप्रसिद्ध (कॉमि)ककार* लेखकाच्या कल्पनेतून साकार झालेलं हे कॉमिक बुक आहे. व्ही फॉर व्हेंडेट्टा, वॉचमेन, द किलिंग जोक हे सुप्रसिद्ध कॉमिक्स त्याच्या नावावर आहेत.
मूरने स्वाम्प थिंगला आपल्या लेखणीखाली खाली घेतलं तोपर्यंत असे काही झाले असते-
अलेक हॉलंड आणि त्याची पत्नी लिंडा हॉलंड वनस्पतींच्या वाढीवर संशोधन करत असतात, जगातला अन्नाचा तुटवडा सोडवण्यासाठी. पण काही कारणाने तिथे स्फोट होतो का करवला जातो, आणि त्यात लिंडा ठार होते. तर मशाली सारखा जळणारा अलेक त्यांच्या घराजवळच्या स्वाम्प, म्हणजे दलदलीत आग विजवण्यासाठी पळत जातो. त्या दलदलीतल्या पाणवनस्पतींवर त्यांच्या प्रयोगशाळेत बनवलेले रसायन शिंपडले गेले असते. त्याचा परिणाम हा होतो, कि वनस्पतींनी वेढलेला/बनलेला, आणि अलेक हॉलंडच्या आठवणी असणारा प्राणी- स्वाम्प थिंग स्वाम्प बाहेर पडतो. संबंध 'ग्रीन' म्हणजे वनस्पतींशी त्याचा संपर्क असतो. त्यानंतर त्याच्या शरीराचा वापर करून अमरत्वासाठी प्रयत्न करणार व्हिलन, स्वाम्प थिंगचा लिंडाच्या मारेकऱ्यांना शोषून संपवण्याचे सूडपर्व, त्याचा पाठलाग करणाऱ्या फौजा इत्यादी होऊन स्वाम्प थिंगचे हे पर्व त्याला 'स्कल पिअरसिंग' गोळी लागून आणि त्याचे अपेरेंटली देहावसान होऊन संपते.

इथे मूर स्वाम्प थिंगची गोष्ट परत सुरु करतो.

स्वाम्प थिंगचा तुटला फाटला (मृत?)देह सदरलँड नावाच्या एका मोठ्या उद्योगपतीच्या प्रायव्हेट लॅबोरेटरीत फ्रीझर मध्ये पडून आहे. इथे डीसी कॉमिक्सच्या एका जुन्या
खलनायकाला पाचारण केले आहे- जेसन वूड्रयू. हे डीसी लोअर मधले बरेच जुने, पण कमी महत्वाचे पात्र असावे. डीसी मध्ये लिहिताना अॅलनला असली पात्रे जाम आवडतात. त्यांच्यासोबत हवे ते करायला स्वातंत्र्य मिळते ना! मूरच्या वॉचमेन या गोष्टीचेपण बहुदा तसेच आहे. त्यातले रोरशॅक हे पात्र बॅटमॅनच्या संकल्पनेला त्याच्या अंतिम सीमेला नेले तर काय होईल , अश्या अर्थाने लिहिले आहे.

तर हा वूड्रयू खरेतर झाडांच्या संबंधित असलेला ड्रॅयाड नावाचा प्रकार असतो. हे ड्रॅयाड्स 'ग्रीन'शी, म्हणजे झाडांच्या एकसंध नेटवर्कचा भाग असतात, पण काही कारणाने वूड्रयू यातून बाहेर पडला असतो, आणि पुन्हा त्या जाळ्यात जाणे त्याला जमत नसते. त्यामुळे तो माणसांच्या जगात राहत असतो, आणि बॉटनिस्ट म्हणून प्रसिद्ध झाला असतो. पुन्हा ग्रीनमध्ये परत जाण्याची ओढ आणि झाडं कापणाऱ्या माणसांबद्दल तिटकारा असं त्याचं पात्र आहे.
या वूड्रयूला स्वाम्प थिंगचे शवविच्छेदन करायला सदर्लंडनी बोलावले असते. तिथे शवविच्छेदनात दिसणारी गोष्ट वूड्रयूला आश्चर्यचकित करते. स्वाम्प थिंगच्या शरीरात फुप्फुस, मेंदू, यकृत इत्यादी सर्व गोष्टी असतात, पण त्या पण लाकूड, पानांनी बनलेल्याच! त्या अर्थातच काम करत नसतात. वूड्रयूला मग प्लॅनेरीयन वर्म म्हणून एका अळीच्या जातीची आठवण येते. अडथळे पार करायचे शिकलेल्या वर्मचे तुकडे जर नवख्या वर्मला चारले, तर दुसऱ्या वर्मला सुद्धा अडथळे पार करणे शक्य होत असते. थोडक्यात या वर्म्समधून त्यांच्या आठवणी सुद्धा पास होत असतात.
वूड्रयूला समजते कि स्वाम्प थिंग हा अलेक हॉलंड नाहीचे मुळी ! हॉलंड तर त्या आगीतच बुडून मेला. हा स्वाम्प थिंग म्हणजे स्वतःला अलेक हॉलंड समजणारं झाड आहे फक्त ! त्या हॉलंडचे अवशेष त्या झाडांसाठी खाद्य बनतात, आणि हॉलंडच्या प्रयोगशाळेतील केमिकल्स मुळे हॉलंडच्या आठवणी आणि ओळख त्या झाडांमध्ये येते, आणि आपल्याला सुपरिचित असणारा आकार ते झाड धारण करते, ज्यातून स्वाम्प थिंग तयार होतो. आणि अर्थात निव्वळ सवय म्हणून असलेल्या मेंदूत गोळी लागून स्वाम्प थिंग ठार होणार नाही, कारण मुळात त्याचा मेंदू दिखावाच आहे! स्वाम्प थिंग निव्वळ मेंदूत गोळी लागल्याच्या शॉकने आणि भितीने जायबंदी झाला ! आणि एव्हाना वूड्रयू आणि सदरलँडचे वाजले असते त्यामुळे वूड्रयू स्वाम्प थिंगच्या फ्रिजमधले तापमान वाढवतो आणि पळून जातो. तापमान वाढल्याने स्वाम्प थिंग पुन्हा उठतो, आणि वूड्रयूचा अहवाल वाचतो. आपण अलेक हॉलंड नाही, आपण अलेक हॉलंड कधीच नव्हतो या सत्यामुळे स्वाम्प थिंग दुःखाने वेडापिसा होतो, आणि त्याला त्रास देणाऱ्या सदर्लंडला यमसदनी पाठवतो.
पण काहीतरी करून आपण पुन्हा आधीसारखं होऊ, हे त्याचे स्वप्न भंग झाले असते.

ही मूरच्या मालिकेची फक्त सुरुवात आहे. आणि ती कल्पनाच भन्नाट आहे- एक झाड जे स्वतःला माणूस समजतं- आणि त्याचा भ्रमनिरास होतो...

*- मूर चांगलाच सोशालिस्ट-अनार्किस्ट आहे.

३. चॉकी- जॉन विंडहॅम


गुडरीड्स जेव्हा चालू केलेलं तेव्हा अगदी सुरुवातीला मला चॉकी रेकमंड झालं होतं. आणि कथा रोचक वाटलेली. आणि कालपरवा दोन दिवसात हि लहानशी कादंबरी हातावेगळी केली.

हि गोष्ट आहे मॅथ्यू नावाच्या ११-१२ वर्षांच्या मुलाची. मॅथ्यूला त्याच्या डोक्यात एक आवाज ऐकू येतो हे त्याच्या वडिलांच्या लक्षात येते. (निवेदन वडिलांचेच आहे.) आणि हल्ली मॅथ्यूचे प्रश्न सुद्धा काहीशे विचित्र झाले असतात. जेव्हा मॅथ्यूचे वडील मॅथ्यूचा स्वतःशी संवाद ऐकतात तिथेपण मॅथ्यू कोणाला तरी थोड्याश्या त्राग्यानेच 'महिन्यात ३२ दिवस का बरे नाहीत ? आठवड्यात ८ दिवस का बरे नाहीत ?' अश्या प्रश्नांचे उत्तर त्याला जमेल तसे देण्यात व्यस्त असतो. मॅथ्यूचा शाळेतून सुद्धा असेच रिपोर्ट्स आले असतात- मॅथ्यू भूगोलाच्या शिक्षकांना विचारत असतो-पृथ्वी कुठे आहे ? पण सौर्यमाला कुठे आहे ? पण सूर्य तरी नक्की कुठे आहे ?

तर, मॅथ्यूचा वडिलांना समजते कि ह्या सगळ्या गोष्टी मॅथ्यू 'चॉकी' चे समाधान करण्यासाठी विचारत असतो. चॉकी म्हणजे त्याला जो आवाज येत असतो त्याला दिलेले नाव. चॉकी स्वतःबद्दल फार माहिती देत नसते, पण मिळालेली माहिती पण कोणालाही बुचकळ्यात टाकेल अशी असते.

यापुढे काही न सांगणे इष्ट- कथा कल्पना आवडल्यास कादंबरी वाचावी लागेल.

कादंबरी अत्यंत सहजसोप्या भाषेत आहे. (ककोल्ड नंतर मोठा आराम !) इतकेच नव्हे तर कथाशैली सुद्धा अत्यंत संयत आहे. अश्या प्रकारच्या गोष्टी बहुदा हिंस्त्र, किंवा अतीव दुःखी/भीतीदायक अश्या होत असतात. चॉकी मात्र कुठेही विशेष हिंदकाळे न देता संथ गतीने गोष्ट सांगते. हा संयतपणा वाचायला सुखद आहे. आणि कथा सुद्धा छानच आहे.

वाङ्मयमौजमजाआस्वादलेख

प्रतिक्रिया

कंजूस's picture

28 May 2022 - 5:09 pm | कंजूस

मोबाईलचचे किंडल app आणि किंडल अकाउंटचा संबंध आहे का माहीत नाही. पण पुस्तकाची pdf move केली तर तिथे उघडते.
1)Kindle app ( android ) download,
2) login with Amazon account,
नंतर
मोबाईल रूट स्टोरेज >> Android folder>> data >> com dot Kindle>> files>>इथे आणायची.
ती app मधे new file म्हणून दिसते.

श्रीगुरुजी's picture

28 May 2022 - 2:07 pm | श्रीगुरुजी

नुकतेच Joker in the pack हे IIM Bangalore मधील एका विद्यार्थ्याने आपल्या ३ वर्षांच्या campus मधील अनुभवांवर लिहिलेले पुस्तक वाचले. खूपच मजेशीर व रोचक अनुभव आहेत. वाचताना मजा आली.

जेम्स वांड's picture

29 May 2022 - 6:49 am | जेम्स वांड

डॉ. बाबासाहेब आंबेडकर समग्र लेखन खंड (सगळे) हार्डकॉपी कुठं विकत मिळतील मुंबईत किंवा पुण्यात ?

तसेच,

घटनासमितीच्या संसदेतील (घटना निर्मितीकालीन) चर्चांचे खंड कुठे विकत मिळू शकतील ? (संसदेच्या वेबसाईटवर सॉफ्ट कॉपी असतील पण मला हार्ड हवी आहे)

कंजूस's picture

29 May 2022 - 7:17 am | कंजूस

Publications Division

Ministry of Information and Broadcasting Government of India.

DIVAKAR RAO

Sales Assistant

Ph. 9821415003 Sales Road,

No. Office: Tele/ Fax: (022) 22610081, Mob: Emporia, Commerce House, 2nd Floor, Karimbhoy Ballard Pier, Mumbai-400 001. E-mail: sempd@rediffmail.com Hqrs: Patiala House, New Delhi - 110 001.

स्वधर्म's picture

29 May 2022 - 7:18 pm | स्वधर्म

कॉनरॉड रिक्टर यांच्या त्रयीचे जी ए कुलकर्णी यांनी केलेले अनुवाद वाचत आहे. पहिली दोन पुस्तके 'द ट्रीज' आणि 'द फिल्ड्स' अशी आहेत. त्याचे जी एंनी 'रान' आणि 'शिवार' या नावाने अनुवाद केलेले आहेत. ते वाचून झाले. एकाच स्त्रीचे जीवन शिकारी - अन्न गोळा करणार्या जीवनशैलीमध्ये 'रान' या पुस्तकात आहेत. तिचेच जीवन पुढे शेती व्यवस्थेत कसे बदलत जाते हे 'शिवार'मध्ये येते. तिसरे पुस्तक 'गांव' हे आहे, ते आता वाचेन.
दोन्ही पुस्तके स्लो बर्निंग प्रकारची असून हळूहळू पकड घेत जातात. जी ए म्हटलं की भाषेचा जी एक खास शैली असते, तिचा प्रत्यय इथे येतोच. १७-१८व्या शतकातील अमेरिकेत गोर्या लोकांच्या वसाहती होत असतानाचे जीवन, त्यातील संघर्ष, रितीभाती यांचे अगदी चित्रदर्शी वर्णन वाचून सध्याच्या अमेरिकेत लोक असे का वागत असावेत, याचा काही प्रमाणात उलगडा होतो.

कॉमी's picture

29 May 2022 - 8:27 pm | कॉमी

धन्यवाद.

मस्तच पुस्तकं दिसतायत. अमेरिकेची सुरुवातीची वर्षे सेंटेनियल (जेम्स मिशनर) आणि पाडस दोन्ही मध्ये वाचली होती. हि त्रयी सुद्धा वाचावी वाटतेय.

कंजूस's picture

7 Jun 2022 - 12:53 pm | कंजूस

पुस्तकं म्हटली की प्रकाशक आलेच.
वरदा प्रकाशनाचे ह.अ.भावे यांचे आत्मकथन असेले पुस्तक.
प्रकाशनातील भावेप्रयोग आणि पतंगाची दोरी.
ह.अ. भावे,मंदाकिनी भावे.
रु ३५०
पाने ३३०
ते १९७५ साली शिक्षकी पेशा, घरदार सोडून ते धुळ्यातून पुण्याला प्रकाशन व्यवसायात कसे उतरले याबद्दल सांगताहेत. कोण कोण लेखक भेटले, कोणत्या पुस्तक प्रकाशनाने हात दिला, काय बरे वाईट अनुभव आले हे चटपटीत शैलीत आहे.

वा. वि. मिराशी यांनी लिहिलेले 'कालिदास' वाचून झाले आता मिपाकर जयंत कुलकर्णी यांनी लिहिलेले 'एका धर्मच्छळाची कहाणी अर्थात इन्क्विझिशन' हे पुस्तक वाचायला सुरू केलेय.

IMG_20220726_073941.jpg

कॉमी's picture

2 Sep 2022 - 10:16 am | कॉमी

दोन पुस्तकं वाचतोय-

१. माधव गाडगीळ आणि नंदा खरेंचे - वारूळ पुराण.
ह्यात माधव गाडगीळांचा उत्क्रांती, निसर्गशास्त्र, कीटक विश्वातले परस्पर सहकार्य, ह्या विषयांवर असलेला "सातेरीचा वाडा झाला चिरेबंदी" हा लेख आहे. आणि सोबत, एडवर्ड विल्सन ह्या किटकशास्त्रज्ञाची आत्मचरित्रात्मक कादंबरी- अँटहील- चा नंदा खरेंनी केलेला अनुवाद आहे. हे विल्सन गृहस्थ सामाजिक उत्क्रांतिवादाचे पुरस्कर्ते आहेत, म्हणजे कि समाजातील दुबळे घटक मागे पडणार हे स्वाभाविक आहे, आणि आपण त्यात ढवळाढवळ करू नये अश्या मताचे. अनेक राईट विंग विचारवंतांशी त्यांची मैत्री आहे. त्यामुळे एकूण रोचक वाचन असेल असे वाटते.

२. अमेरिकन प्रोमॅथ्यूस-
रॉबर्ट जे. ओपन्हायमर चे चरित्र. अतिशय विस्ताराने ओपन्हायमरची भावनिक, बौद्धिक जडणघडण उकलली आहे.

जेम्स वांड's picture

5 Sep 2022 - 9:25 am | जेम्स वांड

.

बघू तरी म्हणलं काय लिहिलं आहे, खूप नाव ऐकत होतो साधक बाधक याच्याबद्दल

कंजूस's picture

3 Nov 2023 - 11:33 am | कंजूस

वेरूळचे शिल्पवैभव

हे २८० पानांचे पुस्तक सर्व लेण्या आणि सर्व शिल्पांची सविस्तर माहिती, साठ फोटो, ऐंशी केशभूषा रेखाचित्रे, दहा नकाशांसह आहे.
मेहता पब्लिशिंग हाऊस , प्रकाशन २००६.
लेखिका राधिका टिपरे.
ISBN 81-7766-633-9

जेम्स हेरीयटचे ऑल क्रीचर्स ग्रेट अँड स्मॉल वाचतो आहे. इंग्लंड मधल्या खेड्यात, १९३०-४० काळात, नुकताच उत्तीर्ण झालेल्या एका प्राण्यांच्या डॉक्टरची आत्मकथा आहे. अतिशय सुंदर पुस्तक. प्राण्यांच्या (पेशंटच्या) गमतीजमती, शेतकऱ्यांचे स्वभाव, वरिष्ठ डॉक्टर सिगफ्रिड आणि त्याचा आळशी, मिश्किल भाऊ ट्रीस्टन, अनेक गमतीजमती आहेत. आपल्या व्यवसायाबद्दल अत्यंत आत्मीयता हे वैशिष्ट्य आहे. अगदी निखळ आनंद देणारे पुस्तक !

कंजूस's picture

17 Feb 2024 - 1:31 pm | कंजूस

Idea Man - Paul Allen (2011)

कुणी वाचलं आहे का?

कॉमी's picture

20 Feb 2024 - 7:23 pm | कॉमी

ड्यूनचा पाहिला भाग वाचला होता, नंतर सिनेमा सुद्धा पाहिला (भारी आहे). दुसरा भाग वाचायला चालू करूया असा विचार केला, आणि पहिल्या भागाची समरी म्हणून हा व्हिडिओ बघितला. व्हिडिओ इतका प्रचंड आवडला की ताबडतोब त्या चानेलचा दुसऱ्या पुस्तकाचा (Dune messaiah) व्हिडिओ सुध्दा लगेच ऐकला. पाहिला भाग दुसऱ्या भागाशिवाय अपूर्ण आहे असे वाटले. चौथ्या भागापर्यंत व्हिडिओ ऐकले. उत्तम चॅनल आहे.

एकूण ड्यूनची कथा खूपच एपिक स्केल वर आहे. हजारो वर्षांच्या काळात वेगवेगळ्या पात्रांवर बेतलेली, पण एका समान धाग्याने बांधलेली कथा आहे. पूर्ण कथेवर सिनेमे निघायला कमीतकमी १०-१२ वर्षे जातील इतके मटेरियल आहे.

ड्युन - २ सिनेमाचा ट्रेलर इथे पाहू शकता.

ग्रेट, तुम्ही परिचय दिला तेव्हा ओटीटीवर भाग पाहिला पाहिला.दुसरा भाग बघायला थिएटरमध्ये जाते.