भारांच्या जगात...५

अजिंक्य विश्वास's picture
अजिंक्य विश्वास in जनातलं, मनातलं
19 Aug 2021 - 9:39 pm

सगळं सगळं ठीक होतं
भा. रा. भागवतांची पुस्तकं मिळवता मिळवता कधी सेंचुरी मारली कळलेच नाही. या प्रवासात अनेक लोकांनी सर्वतोपरीने मदत केली. एखादे दुर्मिळ पुस्तक मिळवायला, स्वत:च्या कलेक्शनमधून काढून द्यायला आणि काहींनी चक्क ती मी येत नाही तोपर्यंत अगदी जपून ठेवली होती. अशातच कधी काही पुस्तके गहाळ झाली, काही देतो म्हणून नंतर यू-टर्न घेऊन गेले. या सगळ्या गोंधळात एक गोष्ट मात्र कळाली. आयुष्य सुंदर आहे. फक्त हवे असणारे पुस्तक कधी ना कधी मिळाले पाहिजे.
माझ्या स्नेही मित्रांनी काही पुस्तके माझ्यासाठी घेतली होती, त्यात मला काल भारांचं एक दुर्मिळ पुस्तक मिळालं, ‘सगळं सगळं ठीक होतं’. दुर्मिळ अशासाठी की काही लोकांनी त्याचे नाव विकीपेडिया आणि ‘ऐसी अक्षरे’चा भा रा भागवत विशेषांकात ते नाव वाचले असेल, पण ते पुस्तक नक्की कशाचे हे माहिती नसेल. मला स्वत:ला आधी सांगितलेले सोर्सेस सोडून ‘मॅजेस्टिक प्रकाशना’च्या जुन्या पुस्तकांच्या मागच्या बाजूला एकदा दोनदा नाव दिसले होते. तसे ते नाव मला कोणी एका भल्या व्यक्तीने इंटरनेटवर करून ठेवलेल्या यादीतही दिसले होते.ती यादी होती ‘अमेरिकन कादंबऱ्यांच्या मराठी अनुवादा’ची- १९०८ पासून १९९० पर्यंत!
ही कहाणी आहे एका नॉर्वेजिअन- अमेरिकन मध्यमवर्गीय कुटुंबाची... ज्यांची आला दिवस घालवतानाही ओढाताण होते. सहज सहज गोष्टींसाठी देखील त्यांना थांबावे लागते, मनाला मुरड घालावी लागते आणि कामांकडे लक्ष द्यावे लागते. ही गोष्ट एक लहान मुलगी सांगते. जिला घरचे ‘कॅट्रीन; म्हणत असतात. ती व तिची बहीण भावंडं आपल्या घरच्यांबरोबर सॅनफ्रांसिस्कोमध्ये राहत असतात.
जरी ते कष्टात दिवस काढत असले तरी त्यांच्यासाठी ही गोष्ट एका मुलांच्या खेळासारखी असते. त्याचे कारण असते त्यांची आई- ‘ममा’! तिच्या समजूतदारपणामुळे, हजरजबाबी स्वभावामुळे तसेच प्रत्येक गोष्टीत सकारात्मक दृष्टीने पाहण्याच्या प्रवृत्तीमुळे ममा आपल्या कुटुंबाला एका हसत खेळत घरात बदलते. तिच्या संस्कारक्षम वृत्तीने आपोआपच तिची पुढची पीढी ती घडवत जाते.
कादंबरीत अशी बरीच प्रकरणे आहेत, ज्यात कुटुंबासमोर समस्या येत राहतात. जसे त्यांचा मोठा मुलगा नेल्स- त्याला शाळेत घालायचे असते, तेव्हा त्याच्यावर पुरेसे पैसे खर्च करण्यासाठी देखील नसतात. अशा वेळेस ममा एका बॅंकखात्याचा हवाला देते, ज्यात इतके पैसे असतात की त्यांच्याकडचे पैसे संपल्यास गरज लागल्यास त्या खात्यातून पैसे काढता येतील. पण हे पैसे केवळ आपतकालीन घटनेसाठी असल्यामुळे, जवळ असलेल्या रकमेचा योग्य कसा वापर करायचा हे ममा त्यांना शिकवते.
जेव्हा त्यांच्या घरी असलेला भाडेकरू न वटणारा चेक देऊन फरार होतो, तेव्हा देखील ती दु:खात देखील त्या भाडेकरूने आपल्या मुलांना सांगितलेल्या कथा-कादंबर्‍यांची कथानके व मागे ठेऊन गेलेल्या पुस्तकांच्या ठेव्याकडे भाडे म्हणून पहाते. या लहान मुलांना सांगितलेल्या अभिजात गोष्टींनी त्यांच्या बालमनावर संस्कार घडतील हा तिला भरवसा असतो.
जेव्हा तिच्या मुलीला दवाखान्यात ठेवले जाते, तेव्हा नर्सेसचा कडक पहारा चुकवण्यासाठी ती साफसफाईवाली बाई बनते. जेव्हा नवर्‍यावर उपचार करायचे असतात, तेव्हा डॉक्टरांना त्यांच्या घरचे सुतारकाम एकदम स्वस्तात करून देण्याची तयारी दाखवते. (अर्थातच ते कामपण तिच्या आजारी असलेल्या नवर्‍याकडूनच करवून देणार असते.)
स्वत:ला हिवाळ्यातल्या थंडीपासून बचाव करण्यासाठी तिला गरम कोटाची गरज असते, पण त्या पैशात आपल्या घरच्यांच्या मूलभूत गरजा पूर्ण होणार असतात, म्हणून ती काही ना काही कारणं सांगून कोट घेणे पुढे ढकलत असते.
अशा या चतुर ममाची एक हळवी आणि संवेदनाशील बाजू या पुस्तकात पाहायला मिळते, ते देखील तिच्याच मुलीच्या नजरेतून!
भारांना अनुवाद करायला हेच पुस्तक सुचायचे कारण देखील याच गोष्टींमधून सहज कळून येते, तसेच भारांच्या वाचनाचा आवाका देखील लक्षात येतो.
सायन्स फिक्शन पासून लोकसाहित्याकडे, अभिजात साहित्यापासून विनोदीकथांमध्ये, रहस्यकथांपासून भूतकथांपर्यंत, त्यांच्या वाचनाची झेप खूप उंच जाते. यात केवळ मनोरंजन न पाहता काही चांगले विचारही मुलांच्या वाचनात यावेत. त्यांच्या वयाच्या हिशोबाने योग्य त्या गोष्टी त्यांना मिळाव्या, यासाठी भा.रा. सतत जागरूक राहीले आहेत. आणि केवळ मुलांसाठीच नव्हे तर मुलींसाठीही त्यांच्याच जवळची वाटेल अशी कहाणी भा.रा. अल्लदपणे त्यांच्या लिखाणातून समोर आणतात हे विशेष.
हे पुस्तक मॅजेस्टिकमध्येही सध्या उपलब्ध नाही. त्या पुस्तकाच्या एकंदर हालतीवरून पल्प पेपरवर ते पुस्तक काढल्याची भावना जास्त प्रबळ होते. हे पुस्तक असले तर कोणा भा.रा. प्रेमींच्याच जवळ एखादी कॉपी असण्याचा संभव जास्त आहे. जर भा.रां.च्या वारसांकडे ही कॉपी असेल तरच हिची रिप्रिन्ट होण्याची शक्यता जास्त वाटते.
पण आपल्या जवळच्या ग्रंथालयात या पुस्तकाची प्रत मिळाली तर नक्की वाचा. अन्यथा मूळ इंग्रजी कथानकही सोपे आहे.
पुस्तकाची लेखिका आहे, कॅथ्री‌न फोर्ब्‌स्‌ आणि पुस्तकाचे नाव आहे. ‘ममा’ज्‌ बॅंक अकाऊंट’ !

वाङ्मयआस्वादलेखमाहिती

प्रतिक्रिया

सौन्दर्य's picture

19 Aug 2021 - 10:55 pm | सौन्दर्य

पुस्तक मुळातूनच वाचायला आवडेल.

अजिंक्य विश्वास's picture

20 Aug 2021 - 8:12 am | अजिंक्य विश्वास

खरे आहे. दुर्दैवाने ते बाजारात उपलब्ध नाही. जवळच्या लायब्ररीत किंवा कोणाकडे खाजगी कलेक्शनमध्ये असले तर वाचायला मिळते. अन्यथा इंग्रजी पुस्तक वाचायचे. ते मूळचे खूपच ओघवते आणि सोप्या भाषेत आहे.

सरिता बांदेकर's picture

20 Aug 2021 - 12:14 pm | सरिता बांदेकर

ॲमेझॅीनवर ९०४₹ ला आहे मूळ पुस्तक.
कुणाला पाहिजे तर चेक करा.

रावसाहेब चिंगभूतकर's picture

20 Aug 2021 - 8:52 am | रावसाहेब चिंगभूतकर

एक विनंती आहे. यातली पुस्तके स्कॅन करून ती एखाद्या ठिकाणी अपलोड करता येतील का तुम्हाला? भारांची बहुतेक पुस्तके दुर्मिळ आहेत आणि बहुधा त्यांचे पुनर्मुद्रण होण्याची शक्यता नाही. निदान ही पुस्तके अशा स्वरूपात तरी टिकली तरी आम्हाला आणि पुढील पिढीला वाचायला मिळतील.

सिरुसेरि's picture

23 Aug 2021 - 7:24 pm | सिरुसेरि

सुरेख पुस्तक ओळख .