निसर्गरम्य तोरणमाळ

गोरगावलेकर's picture
गोरगावलेकर in भटकंती
18 Aug 2021 - 11:07 pm

नुकतीच काही कामानिमित्त माहेरी फेरी झाली. आम्ही सहा बहिणी व एक भाऊ असा मोठा परिवार आहे. सर्व बहिणी जळगाव जिल्ह्यातच आहेत. त्यामुळे मी गावी येणार आहे असे समजले कि बहिणी, भाचे कंपनीची भेटायला येण्याची लगबग सुरु होते. मी तेथे पोहोचायच्या आधीच वाड्यात सर्व मंडळी जमा झालेली असते. एक दिवस सगळ्यांच्या भेटीगाठी घेण्यात निघून जातो. यावेळी जवळपासच्या एखाद्या पर्यटन स्थळी सहलही करण्याचे ठरले होते. बच्चे कंपनी धरून चांगला पंधरा जणांचा ग्रुप जमला. ठिकाण ठरले चार साडेचार तासांवरील तोरणमाळ.

सातपुडा पर्वत रांगांमध्ये वसलेले तोरणमाळ हे एक निसर्गरम्य ठिकाण. नंदुरबार जिल्ह्यातील हे ठिकाण महाराष्ट्रातील दोन नंबरचे व खान्देशातील सर्वात उंचावरचे थंड हवेचे ठिकाण आहे. याची उंची संद्रसपाटीपासून सरासरी ३३३६ फूट इतकी आहे. याच्या जवळपास मोठी शहरे नसल्याने पर्यटक कमी असतात व त्यामुळेच इथले निसर्ग सौंदर्य अजूनही टिकून आहे.

सकाळी सातला चोपड्याहून (जळगांव) निघालो. साधारण ६०किमीवर शिरपूर नाक्याला नाश्त्यासाठी थांबलो. जास्त वेळ घालवायचा नव्हता म्हणून पटकन मिळणारे पदार्थाच मागवायचे ठरले.
गरमागरम रस्सा वडा किंवा गिला वडा , भजी , कचोरी .

येथून पुढे दीड तासावर शहादा (५४ किमी) व तेथून ५०किमी (दीड तास) तोरणमाळ. धुळ्याकडून येणाऱ्या प्रवाशांनाही शहाद्याहुनच पुढे जावे लागते. तोरणमाळच्या आधी साधारण चार किमीवर नागमोडी वळणांचा खूप सुंदर घाट सुरु होतो. दुतर्फा सागवान वृक्ष व बांबूचे वन दिसते. घाटाला सात नागमोडी वळणे आहेत यावरून याचे नाव सातपायरी घाट असे पडले आहे. सर्वात वरची पायरी चढून आलो की सातपायरी पॉइंटहून आपल्याला सगळ्या पायऱ्या दिसतात. वाढलेल्या वनराईमुळे मला मात्र चारच पायऱ्या नजरेस पडल्या .

तोरणमाळला अगदी हाताच्या बोटावर मोजण्याइतकीच हॉटेल्स आहेत. त्यातही दोन तीनच चांगली. येथे MTDC चे एक अतिशय मोक्याच्या जागेवर एक रिसॉर्ट होते पण काही वादामुळे ते बंद पडले आहे. सुदैवाने एका चांगल्या हॉटलमध्ये संपूर्ण ग्रुपसाठी रूम मिळाल्या. ताजेतवाने होऊन तोरणमाळचे पॉंईंट बघायला बाहेर पडलो.

बंद पडलेल्या MTDC च्या जागेततून दिसणारा परिसर व तलाव. याच परिसरात काही शिल्पही नजरेस पडतात.

'यशवंत' तलाव
महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यांनी सन १९६९ मध्ये तोरणमाळला भेट दिली होती. त्यांच्या नावावरून या तलावास यशवंत तलाव असे नाव पडले. पूर्वीचे या तलावाचे नाव मात्र अज्ञात आहे. या तलावास पायी अथवा गाडीने संपूर्ण फेरी मारता येते.
या तलावात बोटिंगचीही सुविधा आहे पण सध्या मात्र बोटिंग बंद आहे. तलावाजवळच गुरु गोरक्षनाथांचे मंदिर आहे.

सीता खाई पॉईंट : येथून घनदाट झाडीने भरलेली व उंच खडकांमधील खोल दरी दिसते. येथील पठाराहून दरीत कोसळणारा एक सुंदर धबधबाही नजरेस पडतो. येथे लगताच इको पॉईंट, सनसेट पॉईंट , खडकी पॉईंट आहेत


वळणा वळणाचे रस्ते

झुक झुक गाडी. खूप दिवसांनी घराबाहेर पडलेल्या मुलांनी सहलीचा पुरेपूर आनंद लुटला.

परिसरात अनेक औषधी गुण असलेल्या वनस्पती आहेत.
जडीबुटी विकणारा एक वैदू.

वाटेतील एक शिव मंदिर व शिल्प

संपूर्ण एकच असलेला वटवृक्ष

येथील आणखी एक प्रसिद्ध तलाव म्हणजे "कमळ तलाव किंवा लोटस तलाव"
नावाप्रमाणेच असंख्य कमळ फुललेली पहिली.

एका कड्यावरून दिसणारे सातपुडा पर्वतरांगांचे अप्रतिम दृश्य

मच्छिन्द्रनाथ गुहा. या ठिकाणी थोडेसे अंतर चालल्यावर पायऱ्या उतरून आपल्याला गुहेपर्यंत पोहचता येते.

तोरणमाळचे क्षेत्रफळ खूपच कमी म्हणजे ४१ चौ.किमी आहे तसेच जवळपास सगळ्या पॉईंट पर्यंत गाडी जाते. यामुळे ३-४ तासात बहुतेक सर्व ठिकाणे पाहून होतात. आम्ही पहिल्या दिवशी पाहिलेली काही ठिकाणे दुसऱ्या दिवशी पहाटेच परत एकदा पहिली. अतिशय थंड वातावरणात धुक्याच्या चादरीत लपेटलेले तोरणमाळ बघताना एक वेगळाच अनुभव मिळतो.

परतीच्या प्रवासात शहाद्याजवळील सारंगखेडा येथील दत्त मंदिर पहिले. हे एकमुखी दत्त मंदिर आहे. दरवर्षी मार्गशीर्ष शुद्ध पौर्णिमेला सारंगखेडा येथे मोठी यात्रा भरते. यात्रेला ४०० वर्ष जुनी परंपरा आहे. यात्रेनिमित्त येथे भरणारा घोडेबाजार खूपच प्रसिद्ध आहे. करोनाकाळात मंदिर सध्या बंदच आहे. मंदिराच्या आत गाभाऱ्यात नवीन घुमट बसविण्याचे काम सुरु होते. कामानिमित्त देवांच्या मूर्ती बाजूच्या घरात हलविल्या आहेत. दर्शन घेतले व परतीचा प्रवास सुरु केला.

प्रतिक्रिया

निनाद's picture

19 Aug 2021 - 6:24 am | निनाद

छान सहल झाली. आणि या निमित्ताने आम्हाला पण पहायला मिळाले.
सर्व वृतांत आणि फोटो छान!

श्रीरंग_जोशी's picture

19 Aug 2021 - 8:03 am | श्रीरंग_जोशी

सुंदर फोटोज अन वर्णन. माझेही मूळ गाव सातपुड्याच्या पायथ्याशी आहे. त्यामुळे सातपुड्याचे सौदर्य जवळून अनुभवले आहे.
तुमचे हे लेखन वाचून तोरणमाळला जावेसे वाटत आहे.रस्सावडा व कचोरीचे फोटोज पाहून तोंडाला पाणी सुटले.
सारंगखेड्याच्या दत्तमंदिराची रंगसंगती आवडली.

मस्त कमल तलाव सुंदर आहे.हातात कमळ धरून घेतलेला फोटो मस्त आहे :)

खेडूत's picture

19 Aug 2021 - 9:35 am | खेडूत

छान माहिती.
एकदा भेट द्यायला हवी..

कंजूस's picture

19 Aug 2021 - 11:14 am | कंजूस

फोटो आवडले.

हे तोरणमाळ हिल स्टेशन आणि या नावाचे गावही वरच आहे का?
पाल यावल अभयारण्यातही न्या.

गोरगावलेकर's picture

19 Aug 2021 - 12:40 pm | गोरगावलेकर

गाव पाहिलं नाही पण पायथ्याशी असावे.
समुद्रसपाटीपासून गावाची उंची २०१ मीटर तर हिल स्टेशनची ११५०मीटर आहे.
पालला शाळेत असतांना गेले आहे. आता परत केव्हा जाणे होईल तेव्हा निश्चितच फोटो देईन.

गोरगावलेकर's picture

19 Aug 2021 - 12:38 pm | गोरगावलेकर

प्रतिसादाबद्दल निनाद, श्रीरंग_जोशी, Bhakti, खेडूत या सर्वांचे धन्यवाद.

यश राज's picture

19 Aug 2021 - 12:51 pm | यश राज

छान फोटो व प्रवास वर्णन,
मी सुद्धा सध्या चोपडा येथे मुक्कामी आहे पण वेळेअभावी जाता येणार नाही आहे. पुढच्या वेळी नक्की जाणार.

गोरगावलेकर's picture

19 Aug 2021 - 2:00 pm | गोरगावलेकर

चोपड्यापासून अवघ्या २५ किमीवर उनपदेव हे ठिकाण करता येईल. येथे गरम पाण्याचे कुंड आहे. गोमुखातून कुंडात पाणी पडत राहते. या भागात पाण्याची पातळी खूपच खाली गेली आहे त्यामुळे कूप मालिकेतील पाणी पंपाद्वारे गोमुखात सोडले जाते असे कळले.
खूप छान विकास केला आहे जागेचा.

मनुदेवी हे चपाड्यापासून तासाभराच्या अंतरावरचे अजून एक मस्त ठिकाण. पावसाळ्यात येथे जायला खूप मजा येते. छानसा धबधबा आहे. याच्या डोहात डुंबताही येते. यावर्षी पाऊस कमी असल्याने येथे गेलो नाही पण गेल्या दोन दिवसात या भागात चांगला पाऊस झाल्याचे कळते. चौकशी करून जाऊ शकता.
शक्य असल्यास कुटुंब/मित्र मंडळींसोबत या दोन्ही ठिकाणी वन भोजनाला जा.
(काही मदत हवी असल्यास सांगा . मेहुणे चोपड्यातच आहेत "सुनील मेडिकल")

माझ्या याच फेरीतील उनपदेवचे काही फोटो

यश राज's picture

19 Aug 2021 - 2:43 pm | यश राज

चोपडा हे माझे आजोळ आहे. सगळे बालपण चोपड्यात गेले आहे. ऊनपदेव व मनुदेवी च्या आठवणी जाग्या केल्याबद्दल परत एकदा धन्यवाद.
यावेळेस अगदी धावती भेट असल्याकारणाने आणि वर्क फ्रोम होम असल्यामुळे बाहेर पडता येत नाही.

चौथा कोनाडा's picture

19 Aug 2021 - 1:12 pm | चौथा कोनाडा

व्वा, एक नंबर !
अप्रतिम फोटो आणि झकास भटकंती !

गोरगावलेकर, तुमची अशी काही भटकंती पाहिली की आम्हाला इम्फॅरीटी कॉम्प्लेक्स येतो !

सिरुसेरि's picture

19 Aug 2021 - 1:22 pm | सिरुसेरि

छान फोटो व प्रवास वर्णन . +१

ज्ञानोबाचे पैजार's picture

19 Aug 2021 - 3:34 pm | ज्ञानोबाचे पैजार

एक नवे पर्यटनस्थळ समजले. पुण्यापासुन मात्र फारच लांब आहे. जवळ जवळ ५०० किमी.
जवळपास कुठले रेल्वे स्टेशन आहे का?
कोणत्या हॉटेल मधे राहिला होतात?
पैजारबुवा,

गोरगावलेकर's picture

19 Aug 2021 - 4:03 pm | गोरगावलेकर

जवळचे मोठे स्टेशन नंदुरबार (८५किमी). व्हाया जळगावच जावे लागेल.
रेल्वे सोयीची नाहीच. याच कारणांमुळे येथे जास्त पर्यटक नाहीत.
आम्ही मुक्काम केला ते ठिकाण

उत्तम वर्णन आणि फोटोज.

हा भाग (खानदेश, सातपुड्याचा धुळे, नंदुरबार, जळगाव लगतचा प्रदेश) एकूणच पर्यटनासाठी तितकासा प्रसिद्ध नाही. वास्तविक अनेक ठिकाणे येथे दडलेली आहेत. विशेषत: जुने अवशेष, मंदिरे असेही आहे. एरवी बराच भाग कोरडा असला तरी उर्वरित मोठ्या पट्ट्यात हिरवाई आणि निसर्गसौंदर्य तर आहेच. खरे तर हिरवाई म्हणजेच निसर्ग असे नसते. क्षितिजापर्यंत पसरलेली उन्हाळ्यात करडी ठाक आणि पावसाळ्यात पुरुषभर उंचीच्या गवताने हिरवीगार झालेली माळराने हेही नमुने सुंदर असतात. पर्वत तर आहेच. त्या मानाने मध्य प्रदेश हद्दीत याचसारखे लँडस्केप आहे, पण टुरिझमच्या दृष्टीने ते अधिक प्रगत आहे.

गोरगावलेकर's picture

19 Aug 2021 - 4:05 pm | गोरगावलेकर

सविस्तर प्रतिसाद आवडला

कंजूस's picture

19 Aug 2021 - 3:33 pm | कंजूस

म्हणून आमचं जाणं झालं नाही त्या भागात. फक्त एकदा जळगावमार्गे अजिंठा केलं तेवढंच.
हे उनपदेवचे फोटोही आवडले.

टवाळ कार्टा's picture

19 Aug 2021 - 4:02 pm | टवाळ कार्टा

मस्त जागा आहे

टर्मीनेटर's picture

20 Aug 2021 - 1:21 am | टर्मीनेटर

निसर्गरम्य तोरणमाळ आवडले! नेहमीप्रमाणेच छान लेखन.
सगळे फोटोज मस्त आहेत. वटवृक्ष, कमळांचे तळे आणि दत्त मंदिराचे विशेष आवडले!

गॉडजिला's picture

20 Aug 2021 - 1:27 am | गॉडजिला

त्या भागातील निसर्ग आफाट आहे...

गोरगावलेकर's picture

20 Aug 2021 - 12:17 pm | गोरगावलेकर

चौथा कोनाडा, सिरुसेरि, टवाळ कार्टा, टर्मीनेटर, गॉडजिला या सर्व प्रतिसादकांचे आभार.

सौंदाळा's picture

20 Aug 2021 - 12:46 pm | सौंदाळा

सुंदर लेख आणि फोटो
या भागात कधीच जाणे झाले नाही. मारुती चितमपल्ली यांच्या जंगलकथांमधुन या भागातील निसर्गाची सुंदर माहिती आणि वर्णन आहेत.

फोटो आणि वर्णन खूपच आवडले. ऐन उन्हाळ्यात मेळघाटात निष्पर्ण सातपुडा पाहिला होता, आता पावसाळ्यातला हा हिरवागार सातपुडा खूपच भारी दिसतो आहे.

गॉडजिला's picture

21 Aug 2021 - 8:04 pm | गॉडजिला

प्रकाशा, शहादा पट्टीत अनेक ठिकाणे आहेत... साहसाची आवड असेल तर फिरायला. तिथे एका झोपडीत कसली तरी उसळ, तिखट आणि मक्केकी रोटी खाल्ली होती भन्नाट चव वाटली. प्रवासाच्या विशेष सोयी सुविधानसल्याने सामान्य लोकांसाठी जरा खडतर भाग आहे पण तीच बाब अमुलाग्र शांतता देऊन जाते

MipaPremiYogesh's picture

21 Aug 2021 - 5:39 pm | MipaPremiYogesh
MipaPremiYogesh's picture

21 Aug 2021 - 5:39 pm | MipaPremiYogesh
मदनबाण's picture

21 Aug 2021 - 9:08 pm | मदनबाण

वर्णन, फोटो आणि लेखातील प्रतिसाद देखील आवडले.

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी : - Misirlou Acapella

गोरगावलेकर's picture

22 Aug 2021 - 2:02 pm | गोरगावलेकर

प्रतिसादाबद्दल सौंदाळा, प्रचेतस, गॉडजिला, MipaPremiYogesh, मदनबाण सर्वांचे धन्यवाद

गोरगावलेकर's picture

22 Aug 2021 - 2:02 pm | गोरगावलेकर

प्रतिसादाबद्दल सौंदाळा, प्रचेतस, गॉडजिला, MipaPremiYogesh, मदनबाण सर्वांचे धन्यवाद

चौथा कोनाडा's picture

23 Aug 2021 - 8:29 pm | चौथा कोनाडा

लै भारी ! +१

(विद्यामान पर्यटन मंत्री आणि त्यांच्या पक्षाचा काहीसा "विकास" होणार हे नक्की ! मागच्या वर्षी पर्यटन मंत्र्यांच्या पुढाकारातून मोटॉहोम नावाची कॅम्पर व्हॅन एमटीडीसी तर्फे पर्यटकांना भाड्याने देण्यासाठी विकत घेतली होती. कोविडमुळे मरगळलेल्या पर्यटन क्षेत्राचा विकास करण्यासाठी सदरची व्हॅन विकत घेतली होती असे सांगितले गेले. व्हॅनचा पुढे काय "विकास" झाला ते कळले नाही ! )

श्रीरंग_जोशी's picture

23 Aug 2021 - 11:44 pm | श्रीरंग_जोशी

तोरणमाळ पर्यटन क्षेत्र विकासाबाबत होणार्‍या घडामोडींचे स्वागत.

अनिंद्य's picture

25 Aug 2021 - 10:02 am | अनिंद्य

छान वृत्तांत.
ते कमळफुलांनी दाटलेले सरोवर फारच आवडले !

जागु's picture

25 Aug 2021 - 4:25 pm | जागु

खुप छान

एक_वात्रट's picture

3 Sep 2021 - 12:03 pm | एक_वात्रट

वर्णन छान, फोटो सुंदर! पहिल्या फोटोतला वडा काळजाला चीर पाडणारा आहे, कचो-याही तशाच. का कोण जाणे, भज्यांना मात्र पीठ जास्त झाल्यासारखे वाटते. चवीला कशी होती?

वळणावळणाचा घाटरस्ता आणि कमळे असलेले तळे सुंदर.

एका नविन अपरिचित ठिकाणाची आम्हाला ओळख करून दिल्याबद्दल धन्यवाद.