हंगामा है क्यूँ बरपा

साहना's picture
साहना in जनातलं, मनातलं
11 Aug 2021 - 3:23 am

सर्वच चित्रपट करमणूक म्हणून पाहायचे नसतात. काही चित्रपट निव्वळ प्रेक्षकांच्या मनाला अस्वस्थ करण्याची दिग्दर्शकाची क्षमता अनुभवण्यासाठी पाहायचे असतात. जोकर हा चित्रपट त्यातीलच एक.

सुपरहिरो चित्रपटांत मारवेल वाल्यानी भरपूर धिंगाणा घातला असला तरी माझ्या मनाला भावते ते DC कॉमिक्स सच. DC ची बॅटमॅन ट्रिलॉजि माझ्या मते सर्वात उत्कृष्ट सुपरहिरो चित्रपट होते. नोलान ह्यांच्या सिद्धीप्राप्त प्रतिभेने लॉन्ग हॅलोविन ह्या सुप्रसिद्ध कॉमिक्स ला घेऊन हे ३ चित्रपट बनवले. लॉन्ग हॅलोविन हे कॉमिक खरोखर उत्कृष्ट होते. हार्वी डेन्ट, बॅटमॅन आणि जिम गॉर्डन हि त्रयी मित्र बनतात आणि गॉथम मधील गुन्ह्याच्या दुनियेवर युद्ध पुकारतात. त्यातून त्यांचा ब्रोमान्स सुरु होतो. तिन्ही व्यक्ती आपापल्या पद्धतीने "obsessed" असतात. (मराठींत ह्याला साक्षेप म्हणतात काय ?)

त्यांच्या ह्या obsession मुळे त्यांच्या तिघांच्या खाजगी प्रेमजीवनाला सुरुंग लागतो. तिघांच्याही प्रेमिका वेगळ्या. जिम ची पत्नी मुलांवर केंद्रित असते. बॅटमॅन ची प्रेमिका सेलिना खाईल हि अत्यंत स्वतंत्र मानसिकतेची असते तर डेन्ट ची पत्नी त्याच्यासोबत मूल निर्माण करण्याची अभिलाषा ठेवून असते. ह्या दरम्यान हॅलोविन ला एक खून होतो आणि त्यानंतर प्रत्येक महिन्यांत सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी एक एक खून होत जातो.

तिन्ही हिरो आपापल्या पद्धतीने ह्या गुन्ह्याचा शोध घेण्याचा प्रयत्न करतात. ह्यांत फाल्कन फॅमिली, कॅलेंडर मॅन, कॅटवूमन, जोकर आणि जवळ जवळ इतर सर्व मोठे बॅटमॅन व्हिलन हजेरी लावतात. अत्यंत गूढ असे हे खून आणखीन गूढ होत जातात आणि बॅटमॅन ला हे आपली चूक असे वाटत जाते. शेवटी ह्याची परिणीती जोकर माफिया ला हाताशी धरून डेन्ट च्या तोंडावर ऍसिड फेकतो आणि डेन्ट चा टू फेस बनतो. बॅटमॅनच्या दृष्टिकोनातून केस सॉल्व होते पण त्याचे सर्वत्र हिरावून नेले जाते. सेलिना त्याला सोडून जाते. डेन्ट हा मित्र शत्रू बनतो, जिम गॉर्डन ची पत्नी सोडून जाते. पण ह्या कथेचा अँटी क्लायमॅक्स आहे. केस प्रत्यक्षांत सॉल्व होत नाही. खुनाच्या मागे नक्की कोण असतो हे फक्त वाचकांना समजते.

लॉन्ग हॅलोविन वरकरणी सुपरहिरो आणि गुन्हा प्रकारचे मनोरंजन वाटले तरी प्रत्यक्षांत अत्यंत प्रौढ स्वरूपाचे कॉमिक आहे. लहानपणी आपली नाती सोपी असतात. मैत्री लवकर होते आणि जिवाभावाची वाटते. पहिल्या प्रेमात आपण असे गुंततो कि इतर सर्व काही शुल्लक वाटते. पण प्रौढ पणी सर्व नात्याना वेगळ्या झालरी लागतात. मैत्री किंवा प्रेम टिकवून ठेवावे लागते. त्यासाठी मेहनत घ्यावी लागते आणि अनेक त्याग करावे लागतात. त्याशिवाय आपला स्वभाव आणि आपली मानसिकता हि सुद्धा आडवी येते. आयुषांत सर्व काही मिळणार नाही हि भावना वाढू लागते. है सर्व गोष्टी लॉन्ग हॅलोविन मध्ये लोएब ह्यांनी अत्यंत समर्थ पणे दाखविल्या.

नोलान ह्यांनी हे कथानक घेऊन त्यांत बरेच बदल केले आणि त्याला मोठ्या पडद्यावर अत्यंत समर्थ पणे उभे केले.

आधुनिक सुपरहिरो चित्रपट माझ्या मते चित्रपट सृष्टीला लागलेला एक कॅन्सर आहे. एवेन्जर्स इत्यादी चित्रपट माझ्या मते अत्यंत सुमार दर्जाचे होते. पण चित्रपट सुमार असले म्हणून समस्या नाही. अगदी antman सारखे भिकार सुपरहिरो चित्रपट बिलिअन डॉलर क्लब मध्ये बसू लागले तेंव्हा मात्र हे पाणी डोक्यावरून जायला लागले आहे हे समजू लागले. मोठ्या मोठ्या स्टुडिओनी अचानक प्रचंड पैसे सुपरहिरो चित्रपटांकडे वळवले.

एके काळी हिट चित्रपट बनविण्यासाठी मेहनत घ्यावी लागायची. त्यासाठी टेलेन्ट शोधले जायचे. चांगले कथानक निर्माण केले जायचे. तो प्रकार जवळ जवळ गायब होत आहे. बहुतेक सुपरहिरो चित्रपट गुलाबी रंगाचे स्फोट, काळ्या रंगाचे विचित्र एलियन्स, तोकड्या कपड्यांत किंवा टाईट्स मध्ये फाईट करणाऱ्या स्त्रिया आणि ह्या सर्वाना डायव्हर्सिटीच्या नावाने कृष्णवर्णीय लोक, गे इत्यादी लोकांचा तडका. मग शेवटी प्रचंड मोठी फाईट आणि सुपरहिरो जिंकून घरी जातात.

ह्याला अपवाद आहेतच. कॅप्टन अमेरिका एक अत्यंत चांगला चित्रपट होता. त्यातील ग्रेनेड सिन माझ्या मते सर्व सुपरहिरो चित्रपटांतील सर्वांत चांगला सिन असावा.

Watchmen हा असाच एक अत्यंत चांगला सुपरहिरो चित्रपट आणि त्याच्यावर आधारित HBO ची सिरीज सुद्धा थक्क करणारी होती. पण त्याला न्याय देण्यासाठी मला वेगळा लेख लिहावा लागेल. Watchmen स्कॉट स्नायडर चा चित्रपट होता ह्याच्या सकरपंच च्या चित्रपटाचे समीक्षण मी ह्याआधी इथे लिहिले होते.

मारवेल (डिस्नी) च्या यशाने वॉर्नर कंपनीला मिरच्या झोबल्या आणि त्यांनी त्यांच्या पायावर पाऊल टाकून स्नायडर ला घेऊन त्यांनी अत्यंत घटिया चित्रपटांची निर्मिती केली. सुपरमॅन, बॅटमॅन, वंडर वूमन ह्यांच्या सारख्या सुपरहिरोना घेऊन अत्यंत रद्दी चित्रपट बनवले. आणि त्यांच्या अपयशाचे खापर स्नायडर वर फोडले.

पण जोकर हा चित्रपट ह्याला अपवाद. जोकर हा जगांतील सर्वांत सुप्रसिद्ध व्हिलन. ह्याला काहीही सुपरपावर नाहीत. तरी सुद्धा इतर कुठल्याही व्हिलन पेक्षा हा माणूस उरांत धडकी भरवितो. ह्याने रॉबिन ला रॉड ने बडवून बडवून मारले. जिम गॉर्डन च्या डोळ्यापुढे त्याच्या मुलीला नग्न करून तिचे कंबर मोडले आणि तिला आजन्म व्हाईलचेर साठी ठेवले. त्याशिवाय जोकर ने लक्षावधी लोकांना ठार मारले असेल. लहान मुलांच्या खेळण्यांत बॉम्ब ठेवून त्यांना मारले. ख्रिसमस च्या दिवशी लहान मुलांच्या पुढे त्यांच्या आईवडिलांना ठार मारले. जी डॉक्टर त्याच्यावर काम करत होती तिला आधी आपल्या प्रेमात ओढून नंतर तिला वेडे केले आणि आपल्याप्रमाणे विल्लन केले आणि त्याशिवाय तिला अब्युस केले ते वेगळे.

जोकर सर्वार्थाने मानवजातीतील सर्वांत खराब व्यक्ती आहे. पण तो नक्की असा का ? ह्या प्रश्नाचे उत्तर क्वचितच कॉमिकस मध्ये सापडते. जोकर चे ओरिजिन तसे स्पष्ट नाही. काही ठिकाणी तो एक खूप जुना अगम्य असा व्यक्ती आहे (रेस अल गुल प्रमाणे) तर काही ठिकाणी भुरटा चोर जो बॅटमॅन च्या चुकीने एका रसायनात पडला आणि त्याचा जोकर झाला.

पण जोकर हा चित्रपट त्याचे ओरिजीन फार चांगल्या आणि वास्तव पद्धतीने दाखवतो. जोकर हा लुजर आहे. वास्तविक जीवनात अनेक लूजर्स आपल्याला दिसतात. त्यातीलच हा एक. चित्रपट पाहताना आम्हाला त्याच्याबद्दल सहानुभूती वाटतेच पण त्याच्याबद्दल सहानुभूती वाटते म्हणून गिल्टी सुद्धा वाटते. चित्रपट जोकर च्या दृष्टिकोनातून दाखवला गेलाय आणि त्याचे डिप्रेसशन काही ठिकाणी प्रेक्षक म्हणून आम्हाला सुद्धा जाणवते.

मग चित्रपटाच्या शेवटी मानवी शरीरात अडकलेला तो लुजर निरुपद्रवी माणूस अचानक बदलतो, त्याचा जोकर बनतो. आणि अचानक त्याच्याबद्दल आम्हाला भीतीयुक्त आदर वाटू लागतो. तो किळसवाणा असला तरी लुजर वाटत नाही. त्याच्यावर आम्हाला दया येत नाही. तो आत्मविश्वासू वाटतो. आणि आम्हाला आमचेच आश्चर्य वाटते.

जोकर चित्रपट एक चांगला चित्रपट आहे. मुख्य अभिनेता होकिंम ह्याने अद्वितीय अभिनय करून ह्या पात्राला उभे केले आहे. असंख्य क्रिकेटिव्ह लिबर्टी चित्रपटाने घेतल्या असल्या तरी एका अतिसामान्य माणसाच्या अतिसामान्य जीवनाचे चित्रण आणि त्या सर्वांतून डोके शॉर्ट होऊन बनणारा जोकर हे चित्रण मुद्दाम पाहावे असे आहे.

टीप : चित्रपटाच्या निमित्ताने आमच्या एका दूरच्या नातलगाची आठवण आली. अत्यंत साधा आणि पापभिरू माणूस होता. हातातून कधी फुलपाखरू सुद्धा दुखावले गेले नसेल. सायन मध्ये एका चाळीत राहायचा. काही तरी धंदा सुरु केला आणि चांगला चालत असतानाच एका कामगार लीडर ने काही टायर गडबड करून ह्याचा वर्कशॉप बंद पडला. डोक्यावर कर्ज आणि घरी ३ तोंडे खायला. करणार तरी काय. शेवटी वर्कशॉप वर कामगार लीडर ची वाद झाला, डोके सटकले आणि एक लोखंडी सळ ह्याने त्याच्या डोक्यांत घातला. कामगार नेता तिथेच मृत झाला. कोर्ट केस झाली. परिवार रस्त्यावर येणार असे झाले आणि कुणी तरी सांगितले कि साहेबांची भेट घे काही तरी करतील. साहेबानी म्हणे सांगितले मी मिटवतो पण आयुष्यभर तुला माझा सेवक म्हणून प्रामाणिक पणे सांगेल ते काम करावे लागेल. त्याने मान्य केले आणि पालन सुद्धा केले. कधीही इलेक्शन वगैरेत स्वतः उभा राहिला नाही पण एका प्रामाणिक कुत्र्याप्रमाणे वाट्टेल ते काम केले. थोडेफार पैसे होते ते घेऊन मुलगी आणि बायको चांगल्या फ्लॅट मध्ये राहायला गेली तरी राजकीय दृष्ट्या सोयीचे म्हणून हा जुन्याच चाळीत राहून लोक संग्रह करायचा. उतारवयात अपघातांत मरण पावला. कोणी म्हणतो मारला. खरे ठाऊक नाही. बायको आणि मुलगी मात्र त्या राजकीय दलदलीतून नेहमीसाठी बाहेर पडली. सध्या ती न्यूयॉर्क मध्ये डेंटिस्ट आहे.

कला

प्रतिक्रिया

कंजूस's picture

11 Aug 2021 - 5:17 am | कंजूस

धन्यवाद.

उग्रसेन's picture

11 Aug 2021 - 9:07 am | उग्रसेन

हम्म. वाचलं सगलं. धन्यवाद.

रावसाहेब चिंगभूतकर's picture

11 Aug 2021 - 1:27 pm | रावसाहेब चिंगभूतकर

फार छान लिहिलंय.

बाकी सांगायचं तर जोकर माझा आल्टर इगो आहे.

पण इनामदार भुसनळ्याचे डोळे जोकरपेक्षा डेंजर आहेत :p

गॉडजिला's picture

11 Aug 2021 - 3:15 pm | गॉडजिला

लेखमाला होउ शकतेे... अवश्य लिहावी

मदनबाण's picture

11 Aug 2021 - 7:50 pm | मदनबाण

लेख अतिशय आवडला... जोकरचे दिलेले गाणं देखील.

बॅटमॅनला लहानपणा पासुन पाहत आलोय. पण जोकर पाहिल्यावर त्याने बॅटमॅन कथांवर कुठेतरी मात केली असे वाटले.
जितके मी वाचले आहे त्यानुसार जोकर हे पात्र ज्या ज्या अभिनेत्यांनी रंगवले आहे त्यांना त्या पात्राचा पुढील आयुष्यात त्रास झालेला आहे. ज्या शिड्यांवर जोकरने नाच केला आहे तिथे जाउन लोकांनी सेल्फीज घ्यायला सुरवात केली, कारण "जोकर" तिथे आला होता... त्या भागात गुन्हेगारी आधी अधिक होती पण सेल्फी क्रेझमुळे तिथल्या गुन्हेगारी मध्ये घट झाली असे देखील वाचण्यात आले होते. या चित्रपटात जोकर जितक्या वेळेला आणि जितक्या प्रकारे हसला आहे केवळ त्या वरुनच होकिंम ने पात्र किती जिवंतपणे साकारले आहे हे सहज लक्षात येते.
फक्त माझा अजुनही गोंधळ उडालेला आहे की तो [ जोकर ] हा खरंच Thomas Wayne चा मुलगा असतो की त्याला कोणी तरी दत्तक दिलेले असते. Thomas Wayne म्हणजेच बॅटमॅन चे वडिल.

बाकी जोकर वरुन मला इट [ IT ] चित्रपट आठवला... आर्थात या भयपटातील जोकर हा वेगळा !

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी : - MISERLOU - William Joseph & Caroline Campbell (feat Tina Guo) EXPLOSIVE cover from Pulp Fiction

सुरिया's picture

11 Aug 2021 - 8:27 pm | सुरिया

जोआकिन फिनिक्सने रंगवलेला जोकर आणि त्याचे हसू हा खरोखर खतरनाक विषय आहे.
फिनिक्सच्या डोळ्यातील ती वेडाची छटा अगदी २००० चा ग्लॅडीएटर बघताना त्यातील फिनिक्सने रंगवलेला कमोडस हा बापाला मारुन त्याचे राज्य बळकावणारा व्हिलन बघतानाच जाणवलेली होती. त्यातली नुसती झलक जोकरमध्ये २० वर्षानी पूर्ण विकसित स्वरुपात दिसली.
बाकी जोकर थॉमस वायनेचा मुलगा नसतो. त्याची आई तसा समज करुन घेऊन मरते आणि तोच किडा जोकरमध्ये राहतो.

गॉडजिला's picture

11 Aug 2021 - 8:37 pm | गॉडजिला

त्याची आई तसा समज करुन घेऊन मरते

त्याची आई तसा समज करुन देऊन मरते, असं जोकरला वाटत आणि तीथेच त्याचा उदय होतो... अर्थात आपण म्हणता तसे असेल तर आता परत एकदा बघावे लागेल...

मदनबाण's picture

11 Aug 2021 - 10:04 pm | मदनबाण

जोआकिन फिनिक्सने चुक दुरुस्ती बद्धल धन्यवाद. :)

बाकी जोकर थॉमस वायनेचा मुलगा नसतो. त्याची आई तसा समज करुन घेऊन मरते आणि तोच किडा जोकरमध्ये राहतो.
ओक्के. धन्यवाद.

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी : - MISERLOU - William Joseph & Caroline Campbell (feat Tina Guo) EXPLOSIVE cover from Pulp Fiction