झूम बराबर झूम!

kool.amol's picture
kool.amol in काथ्याकूट
1 Aug 2021 - 11:25 pm
गाभा: 

Zoom बराबर zoom!

आजचा जमाना झूम चा आहे असं म्हणलं तर अतिशयोक्ती होणार नाही. माणूस आयुष्यभर विद्यार्थी असतो ही शाळेत शिकलेली भिती खरी करण्याचं काम हे zoom सध्या उत्साहाने पार पाडत आहे. पण इथे शिकण्यापेक्षा मला जन्मजात असलेला वाह्यातपणा करण्यात मजा येते. Meeting मध्ये नाईलाजाने सद्गुणी बनून वावरणं गरजेचं असतं (इथं वावरणं शब्दाचा तोच अर्थ घ्यावा जो आहे).

ह्याउलट webinar मध्ये मजा येते. शाळेत असताना वर्गाच्या बाहेर उभं केल्यानंतर जेवढं शिकायचो तेवढंच ह्या webinar मध्ये मी शिकतो. इथंही खूप मजा असते. विदेशी शिक्षक खूप मन लावून शिकवतात पण तितकी मजा येत नाही. ह्याउलट भारतीय इन्स्टिट्यूट चे webinar अगदी देशी असतात. म्हणजे बराच वेळ तर ओळख परेड असते मग ते शिक्षक येतात, दमदार इंग्रजीत सुरुवात करून हळूच हिंदी किंवा मराठीत शिरतात. बऱ्याच वेळेला स्क्रीन share होत नाही मग विद्यार्थी सल्ले देतात, सर किंवा मॅडम परत एकदा प्रयत्न करतात, ह्या गोंधळात काही लोकं उगाचच unmute करतात आणि मजेशीर वाक्य ऐकू येतात. सांगायचंच झालं तर, मी ऐकलेली काही वाक्ये..आता बसतो का गप्प का देऊ थोबाडीत?, ए मम्मी अजून किती वेळ गं चालणार आहे हे तुझं काम?, अरे wifi गेलं की काय, हे सर थांबलेत एकाच जागी!, can you here me? आणि एकदमच..अरे कोई तो बोलो! काही वेळेस खुद्द organizer गायब होतो, काही जण एकदमच hand raise करतात आणि नंतर mute होतात. एका webinar मध्ये ते सर प्रत्येक वाक्यात over there म्हणत होते मग मी तेच मोजत बसलो. शेवटी शेवटी तर मी फक्त over there कडेच लक्ष दिलं, बाकीचं काही आठवत नाही.

शेकडा 37 लोकं join करून आपापले काम करतात, शेकडा 28 फेबुवर तर शेकडा 19 इतर apps वर असतात. उरलेले webinar मध्ये असतात. कितीही कंटाळवाणं lecture असेल तरीसुद्धा काही जण ब्रम्हज्ञान प्राप्त झाल्यासारखे त्याचं कौतुक करतात तर 5% लोकं आम्हाला presentation मिळेल का हा प्रश्न नक्की विचारतात. चुकून कॅमेरा सुरू झाल्यावर उडणारी तारांबळ भलतीच मजेशीर असते. कधी छत, कधी भिंत तर कधी काहीच दिसत नाही. एकदा तर कोणाचं तरी लेकरू माहिती नाही कसं काय पण त्या स्क्रिनवर भारी भारी चित्र काढत होतं. Presenter इतका वैतागला की विचारता सोय नाही. मला ते माहिती करून घ्यायचं होतं म्हणजे पुढच्या webinar ला मी पण चित्र काढले असते, कोणाला माहिती असेल तर नक्की सांगा.

ऑफिसच्या मीटिंगमध्ये देखील एक से बढकर एक गंमती आहेत. काही महाभाग जॉईन होतात आणि नंतर गायब, कॅमेरा बंद करून टाकतात. बॉस जेव्हा काही महत्वाचं सांगत असतो तेव्हाच ह्यांचं wi fi बंद पडतं. बऱ्याचदा ह्यांना विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर देण्यापेक्षा हे स्क्रीनकडे पाहत राहतात. Screen sharing हा असाच एक मजेशीर प्रकार! कामाची file, excel sheet सोडून बाकी सगळ्या गोष्टी ह्यात आपल्याला दिसू शकतात. मग बराचसा वेळ योग्य ते शोधण्यात जातो. काही जण स्क्रीनकडे बघतच नाहीत. दुसरीकडेच बघत राहतात. एकदा तर माझ्या बॉसने एका सहकाऱ्याला टाळ्या वाजवून स्वतःकडे लक्ष द्यायला सांगितलं होतं. तरीसुद्धा त्या व्यक्तीमध्ये फार फरक पडला नाही हे वेगळं सांगायला नको.

ह्या मीटिंगमध्ये लोकं जे कपडे घालून येतात तो अभ्यासाचा विषय आहे. आमचे एक सर कायम व्यवस्थित ब्लेझर, टाय अशा पेहरावात असतात, स्त्रिया तर अगदी छान मेकअप वगैरे करून असतात आणि आमच्यासारखे काही महाभाग त्यातल्या त्यात बरे टी शर्टस घालून आपापली हजेरी लावत असतात. बॉस आणि लेडीज सहकारी जर मिटींगला नसतील तर मग काय विचारायलाच नको. मी तर लॅपटॉपचा कॅमेरा माझ्या कपाळाच्या वर जाऊ शकणार नाही अशा पद्धतीने ऍडजस्ट करण्यात अगदीच तरबेज झालो आहे, हो म्हणजे व्यवस्थित भांग वगैरे पाडण्याचे कष्ट घेण्याची गरज नाही. इच्छुकांनी संपर्क साधावा.

असो, असेच कोर्सेस सुरू राहावेत आणि ऑफिसपेक्षा निवांत काही क्षण सर्वांना मिळावेत अशी अपेक्षा करतो आणि माझे दोन शब्द संपवतो,जय हिंद, जय महाराष्ट्र!

प्रतिक्रिया

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

2 Aug 2021 - 1:17 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

झूम-गूगल मिट.

माझा आवाज ऐकू येतोय ? हॅलो. अहो सर, तुमचा माइक म्यूट करा प्लीज. अहो त्यांना म्यूट करा. व्हिडिओ म्यूट केला आहे असे समजून काहींचे ते खाणे प्रकार लाइव्ह चालू असतो. इन-लेफ्ट होणे चालू असते. लोक मीटिंग सुरु करून आपापली कामे करतात म्हणून व्हीडीयो म्यूट न करायच्या सुचना सर्व गमतिशीर आहे.

करोनाकाळात कोणाला येऊ की ना येऊ. झुम आणि गूगलमीटला अच्छे दिन आले आहेत.

-दिलीप बिरुटे

चौथा कोनाडा's picture

2 Aug 2021 - 2:57 pm | चौथा कोनाडा

भारी लिहिलंय कुल_अमोल !
पहिले ३-४ परिच्छेद ... हा हा ... हा !
तंतोतंत असंच होतं बहुधा !

मी तर लॅपटॉपचा कॅमेरा माझ्या कपाळाच्या वर जाऊ शकणार नाही अशा पद्धतीने ऍडजस्ट करण्यात अगदीच तरबेज झालो आहे, हो म्हणजे व्यवस्थित भांग वगैरे पाडण्याचे कष्ट घेण्याची गरज नाही. इच्छुकांनी संपर्क साधावा.

ही भारी कला जमवलीय !

रमेश आठवले's picture

2 Aug 2021 - 7:55 pm | रमेश आठवले
Nitin Palkar's picture

2 Aug 2021 - 8:14 pm | Nitin Palkar

रियली कूल. खूप छान!

टर्मीनेटर's picture

3 Aug 2021 - 2:18 pm | टर्मीनेटर

मजेशीर लेख आवडला 😀

हे वाचल्यावर बाई बायको कॅलेंडर मधील तो स्टयास्टिक मराठे आठवला