फॅक्टर इन्व्हेस्टिंग ... गुंतवणुकीचा एक वेगळा मार्ग

अमर विश्वास's picture
अमर विश्वास in जनातलं, मनातलं
8 May 2021 - 4:28 pm

लेखाच्या सुरुवातीलाच एक गोष्ट स्पष्ट करतो ... म्युच्युअल फंडावर लिहिताना मला १२ वर्षांचा अनुभव होता. फॅक्टर इन्व्हेस्टिंग ही माझ्यासाठी सुरुवात आहे. त्यामुळे हे "संकल्पना" (Concept) य स्वरूपात आहे. मिपा वरच्या तज्ञ आणि अनुभवी लोकांचे प्रतिसाद मला या स्ट्रॅटेजी मध्ये मदत करतील म्हणूनच हा लेखनप्रपंच
_____________________________________________________________________________________________________________________________

सुरुवात ......

अशाच एका आळसावलेल्या शनिवारी (सध्या लॉकडाऊन मुळे घरातच विश्रांती घ्यावी लागते), म्युच्यअल फंड्स चा रिव्ह्यू करीत असताना एक गोष्ट लक्षात आली कि गेल्या वर्षभरात फोकस फंड्स नी उत्तम रिटर्न्स दिले आहेत. कुतूहल चाळवले कि कुठल्या ह्या पंचवीस कंपन्या ज्यामध्ये हे फंड्स पैसे गुंतवतात ? (फोकस २५ या नावामुळे पंचवीस कंपन्या )
खालच्या तक्त्यामध्ये टॉप ३ फोकस फंड्स आणि त्त्यांनी पॆसा गुंतवलेल्या कंपन्या (टॉप १०)

.

या तक्त्यात काही कंपन्या किमान दोन फंडात आहेत . HDFC Ltd. तिन्ही फंडात आहे. तसेच या कंपन्या प्रामुख्याने बँक / IT आणि मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्रातल्या आहेत .

मग विचार आला ..आपण या फंडात पैसे गुंतवतो ... मग फंड मॅनेजर या कंपन्यांमध्ये पैसे गुंतवतात ..
मग आपणच या पंचवीस कंपन्यांमध्ये पैसे गुंतवले तर ? __________________________________________________________________________________________________________________

कल्पना तर एकदम भारी होती .. पण मग शंकेची पाल चुकचुकली ... हे इतकं सोपं असेल तर यापूर्वी कोणी कधी केलं का नाही ?
आपले काही चुकतंय का ?
मग गुगल बाबाला शरण गेलो. बरीच शोधाशोध केल्यावर कळलं की याला Factor Investing Strategy म्हणतात.

गुंतवणुकीच्या ३ प्रकारच्या स्ट्रॅटेजी असतात

१. Passive Strategy : मुख्यतः बाजाराच्या कार्यक्षमतेवर भरवसा ठेवून गुंतवणूक करायची. इंडेक्स फंडस् तसेच ETF या प्रकारात येतात. या मध्ये अर्थातच गुंतवणुकीचा खर्च कमी असतो. कारण विश्लेषण , पोर्टफोलिओ बदलणे वगैरे गोष्टी कमी असतात / जवळजवळ नसतातच

२. Active Strategy : बरेचसे फंड्स आणि सामान्य गुंतवणूकदार या प्रकारात येतात. विश्लेषण व इतर माध्यमातून मिळणाऱ्या माहिती नुसार पोर्टफोलिओची पुनर्रचना (restructure) करणे हा याचा मूळ गाभा आहे. ही पुनर्रचना daily / monthly / quarterly / yearly / ad-hoc कशीही असू शकते
याचा मुख्य उद्देश हा निर्देशांकावर मात करणे (Outperform Market Index ) हाच आहे.

३. Factor Strategy : वरील दोन्ही स्ट्रॅटेजीज चा माध्यम मार्ग म्हणजे फॅक्टर स्ट्रॅटेजी . यात मार्केट वर परिणाम करणारे इतर फॅक्टर जसे (Govt. Policies , technology वगैरे यांचाही विचार करायचा आणि फक्त Market analysis वर विसंबून वारंवार पोर्टफोलिओची पुनर्रचना करायची नाही

जसे कि :

.

_____________________________________________________________________________________________________________

माझी स्ट्रॅटेजी फॅक्टर इन्वेस्टींगशी साम्य दाखवणारी असली तरी त्यात थाडेसे बदल आहेत
आता मी जी गुंतवणूक करायची ठरवली आहे (या महिन्यात गुंतवणूक करण्याचा मानस आहे ) त्याची रूपरेखा खालील प्रमाणे

१. एकूण २५ कंपन्या निवडणार
२. प्रत्येक कंपनीत सामान गुंतवणूक करणार. सध्या दहा लाख गुंतवायचे ठरवले आहे. त्यामुळे प्रत्येक कंपनीत ४० हजार. (प्रती शेअर किंमतीनुसार ४० हजारात जेव्हडे शेअर्स येतील तेव्हडे) एखादी कंपनी आवडते म्हणून जास्त गुंतवणूक असे नाही
३. २५ पैकी २० लार्ज कॅप आणि ५ मिड कॅप कंपन्या निवडणार
३. दर तीन महिन्यांनी पोर्टफोलिओ रिव्ह्यू करणार. अर्थात (लॉन्ग टर्म कॅपिटल गेन्स चा लाभ घेण्यासाठी आणि शॉर्ट टर्म गेन्स टाळण्यासाठी पुनर्रचना एका वर्षानंतरच करणार
४. या एक वर्षाच्या कालावधीत जर रक्कम गुंतवलेल्या कंपनी बद्दल काही विशेष बातमी तरच त्याचे शेअर्स विकून त्याच किमतीचे दुसऱ्या कंपनीचे शेअर्स घेणार (Event based changes only )

______________________________________________________________________________________________________________

आता मुख्य मुद्दा : २५ कंपन्या कुठल्या ?

तर टॉप परफॉर्मिंग म्युच्युअल फंडांना आधारभूत मानून कंपन्या शॉर्टलिस्ट करणार (याचा अर्थ : या फंडांनी चांगली कामगिरी केली. अर्थात या फंडांच्या मॅनेजर ने केलेले विश्लेषण बरोबर आहे. त्यामुळे त्यांना पैकी च्या पैकी मार्क देऊन त्यांचे विश्लेषण आपले म्हणणार. अर्थात शोरलिस्ट केलेल्या प्रत्येक कंपनीचा डिटेल अभ्यास करूनच फायनल २५ ठरवणार आहे.

फक्त फोकस फंड्स वर “फोकस” न ठेवता लार्ज कॅप आणि मिड कॅप पण विचारात घेणार आहे,

खालचा तक्ता बघा
३ फोकस्ड, २ लार्ज कॅप आणि २ opportunity फंड्स यांचा एकत्रित विचार केला (टॉप १० कंपनीज)
इंडस्ट्री सेक्टर प्रमाणे कलर कोडींग केले आहे

.

यात बँकिंग / फायनान्स आणि IT / Software कंपन्यांचे प्राबल्य आढळते. तसेच अशा काही कंपन्या आहेत ज्यांचा बहुतेक सर्वच फंडात समावेश होतो
उदाहरणार्थ
HDFC
Infosys
TCS
Axis back
ICIC
Bajaj Finance
L&T

__________________________________________________________________________________________________________

समारोप
वरील माहितीच्या आधारे सध्या २५ कंपन्या शॉर्टलिस्ट करायचे काम चालू आहे.
एकंदरीत हा कन्सेप्ट आणि विचारधारा याविषयी तुमची मते जाणून घेण्याची उत्सुकता आहे.
तसेच काही चुकत असेल तर जरूर सांगा

गुंतवणूकविचार

प्रतिक्रिया

चंद्रसूर्यकुमार's picture

8 May 2021 - 4:53 pm | चंद्रसूर्यकुमार

कल्पना चांगली आहे. पण याच्यात एक मेख आहे. म्युच्युअल फंडांच्या मॅनेजर्सच्या दृष्टीकोनातून विचार केला तर कोणालाच आपल्या फंडाने निफ्टीला बरेच जास्त अंडरपरफॉर्म केलेले आवडणार नाही. कारण त्यांचा बोनस, त्यांची करिअर त्यावर अवलंबून असते. त्यामुळे सगळ्या आघाडीच्या फंडांमध्ये रिलायन्स, इन्फोसिस, एच.डी.एफ.सी बँक वगैरे शेअर्स दिसतीलच. कारण या शेअर्सचे निफ्टीमध्ये बरेच वेटेज असल्याने हे शेअर्स आपल्या फंडात असतील तर तो फंड निफ्टीला खूप जास्त अंडरपरफॉर्म करू शकत नाही. एकदा ही बाजू सुरक्षित करण्या इतक्या प्रमाणात हे मोठे शेअर्स घेतल्यावर मग इतर मिडकॅप शेअर्स फंडात आले तरी फंड अंडरपरफॉर्मर दिसणार नाही.

निफ्टीच्या ५० शेअर्समध्ये थोडेफार बदल मधूनमधून होत असतात. एका काल्पनिक परिस्थितीत समजा सध्याचे सगळे ५० शेअर्स निफ्टीतून काढले आणि वेगळेच ५० शेअर त्यात आले तर त्या शेअर्समधील चांगले शेअर्स सगळ्या आघाडीच्या फंडांमध्ये दिसतील. तेव्हा ही self fulfilling prophecy व्हायला नको.

त्यापेक्षा टेक्निकल अ‍ॅनॅलिसिसमधील साधी डाऊ थिअरी वापरून आऊटपरफॉर्म करणारे शेअर शोधता येतील असे वाटते. म्हणजे जेव्हा निफ्टी खाली येताना हायर लो करतो तेव्हा खाली न येणारे किंबहुना हायर हाय करणारे शेअर्स आऊटपरफॉर्मर असतील. अर्थात त्यासाठी सगळ्या शेअर्सच्या चार्टवर बारीक लक्ष ठेऊन असायला लागेल.

अमर विश्वास's picture

8 May 2021 - 6:47 pm | अमर विश्वास

चंद्रसूर्य जी धन्यवाद

निफ्टी ५० मधले काही शेअर्स माझ्या लिस्टमध्ये येतीलच ... पण तुम्ही म्हणता तसे आऊट परफॉर्मर शोधणे महत्वाचे
डाऊ थिअरी वाचली ... याआधी कधी वापरली नव्हती ... प्रयत्न करतो वापरायचा

सतिश गावडे's picture

8 May 2021 - 9:25 pm | सतिश गावडे

मला Technical Analysis हेच मुळी self fulfilling prophecy वाटते
:)

कॉमी's picture

8 May 2021 - 11:35 pm | कॉमी

मी जॉन मर्फी यांचे Technical analysis of Financial market नावाचे पुस्तक वाचत होतो. पहिल्या काही प्रकरणात त्यानीं टेक.अनालीसीस. वरील टिकांचा परामर्ष घेतलेला.

१. पहिली टीका- TA हे सब्जेक्टिव्ह असते.
२. दुसरी टीका- self fulfilling prophecy असते.

दुसऱ्या टीकेला उत्तर काय-
तर जर TA जर सब्जेक्टिव्ह असेल तर ती सेल्फ फुलफिलींग कशी असेल ? टीकाकार दोन्ही डगरीवर एकत्र पाय ठेऊ शकत नाही.

जणू काही दोनीही टीका एकाच व्यक्तीने केल्या आहेत असे समजून उत्तर दिले आहे, जे गंमतशीर वाटते.
(सेल्फ फुलफिलींग असणे ही काय इतकी चिंतेची बाब नाही असे त्यांचे म्हणणे आहे.)

चंद्रसूर्यकुमार's picture

9 May 2021 - 12:41 pm | चंद्रसूर्यकुमार

मला Technical Analysis हेच मुळी self fulfilling prophecy वाटते

तसे बर्‍याच लोकांना वाटते. पण मार्केट फंडामेंटलपेक्षा बर्‍याचदा सेंटिमेंटवर चालते. मागच्या वर्षी एप्रिलमध्येच मार्केट वर जायला लागले. तेव्हा लॉकडाऊन किती काळ चालेल, नुसता लॉक डाऊनच नाही तर एकूणच अर्थव्यवस्थेवर किती काळ परिणाम होईल याविषयी अजिबात स्पष्टता नसतानाही मार्केट वर जायला लागले. कदाचित मार्चमध्ये ओव्हर रिअ‍ॅक्शन आली त्याचा परिणाम असावा. काहीही असले तरी कोरोनाची स्थिती पूर्ण सुधारलेली नसताना निफ्टी कोरोनापूर्व परिस्थितीच्याही वर ऑल टाईम हाय करावा याचे फंडामेंटलवरून कसे काय स्पष्टीकरण देणार हे समजत नाही.

दुसरे म्हणजे मी कामाच्या ठिकाणी कॅश फ्लो प्रोजेक्शनची एक्सेलमध्ये केलेली अतिशय किचकट फायनान्शिअल मॉडेल्स बघितलेली आहेत. आणि ती मॉडेल्स बँकेत असल्याने डेट साईडची बघितली आहेत. इक्विटीची फायनान्शिअल मॉडेल्स अजून जास्त किचकट असतात. यात कंपनीला नक्की कोणकोणत्या मार्गाने कॅश फ्लो येऊ शकेल, कंपनीचे डेट-इव्किटी स्ट्रक्चर लक्षात घेऊन डिस्काऊंटिंग रेट कोणता लावायचा वगैरे कित्येक गोष्टी लक्षात घ्याव्या लागतात. https://rakesh-jhunjhunwala.in/stocks-research-reports-new/phillips-carb... वर फिलिप्स कार्बन ब्लॅक या कंपनीचा आय.सी.आय.सी.आय डायरेक्टचा जानेवारी २०२१ मधील इव्किटी रिसर्च रिपोर्ट दिला आहे. त्यात पुढील तीन वर्षात कंपनीचे कॅश फ्लो प्रोजेक्ट केले आहेत. हे आकडे नुसते बघायला मजा वाटते पण हे कॅश फ्लो प्रोजेक्शन, कंपनीला किती फायदा होऊ शकेल हे प्रोजेक्ट करणे हे खूप म्हणजे खूप किचकट असते. दरवर्षी १५% ने कॅश फ्लो वाढतील वगैरे कोणता तरी ढोबळ आकडा धरणे इतके ते सोपे नसते. या सगळ्या गोष्टी घरी बसून कशा करता येतील/ अनेक जण कशा करतात की फंडामेंटल अ‍ॅनॅलिसिसच्या नावावर वेगळेच काही करतात हे मला तरी न उलगडलेले कोडे आहे.

तेव्हा फंडामेंटल अ‍ॅनॅलिसिस माझ्यासाठी तरी नाही. त्यापेक्षा ट्रेंडलाईन्स, सपोर्ट-रेजिस्टन्स वगैरे अधिक चांगले रिझल्ट देतात हा अनुभव आहे. दुसरे म्हणजे फंडामेंटल अ‍ॅनॅलिसिस करताना काही सेक्टरचाच अ‍ॅनॅलिसिस करता येऊ शकेल. अगदी इक्विटी रिसर्च अ‍ॅनॅलिस्ट म्हणून नोकरी करणारे प्रोफेशनल लोकही बहुतेक वेळा एक किंवा दोन सेक्टर ट्रॅक करतात. कारण मार्केट म्हणजे सगळा महासागर आहे. कोणालाही सगळे सेक्टर समजून घेणे, त्यातील खाचाखोचा, सरकारी धोरणांचा कसा परिणाम होईल, सेक्टरमध्ये स्पर्धा कशी आहे, त्यात पाचेक हजार कंपन्यांच्या बॅलन्स शीट्स, त्यांचे डेट-इक्विटी स्ट्रक्चर वगैरे गोष्टी करता येणे शक्य नाही.

गणेशा's picture

8 May 2021 - 5:16 pm | गणेशा

चांगले..

मला वाटते मी fundamental analysis करून हिच method अवलंबली आहे..
आणि स्वतःचा personal mf share घेऊन चालू केला आहे...

फक्त mf ला प्रमाण न मानता, fundamental आणि sector यानुसार पैसे गुंतवले आहेत..

Good..

चौकटराजा's picture

8 May 2021 - 5:34 pm | चौकटराजा

वा !

अमर विश्वास's picture

8 May 2021 - 6:48 pm | अमर विश्वास

धन्यवाद गणेशाजी
..
नुसते म्युच्युअल फंड्स वर विसंबून राहणे बरोरबर नाही हे पटते. मीही तोच विचार करत होतो

साधारणतः ४० -४५ शेअर्स शोरलिस्ट करून मग fundamental analysis करावा .. आणि शेवटी २५ निवडावे असे वाटते

मुक्त विहारि's picture

8 May 2021 - 6:07 pm | मुक्त विहारि

वाचत आहे

आंद्रे वडापाव's picture

8 May 2021 - 7:04 pm | आंद्रे वडापाव

इंटरेस्टिंग लेख.

माझा तुम्हाला एक अनाहुत सल्ला (तुम्ही न पटल्यास इग्नोर करा, व चुभुदेघे)

कधीही मार्केट मधे एकरकमी गुंतवू नका.

५ हजार रु च्या स्लॉट मधे शेअर घ्या.
एका महिन्यात १ शेअर मधे १ वेळा ५००० रु चे शेअर खरेदी करा.
म्हणजेच एका महिन्यात २५ शेअर * ५ ह एवढीच खरेदी करा.
शेअर ५० डे इ एम ए च्या जवळपास खरेदी करायला पहा.
५० % रक्कम लिक्वीड मधे ठेवा,
मार्केट ने ८-१०. % आपटी घेतली, तर त्यावेळी जास्तीची खरेदी लिक्वीड मधून करा.

अमर विश्वास's picture

8 May 2021 - 9:14 pm | अमर विश्वास

आंद्रे भाऊ .. धन्यवाद
एकरकमी नाही ... पण ४-६ आठवड्यात त्यातल्या त्यात योग्य वेळ साधून शेअर्स खरेदी करणार आहे

मित्रहो's picture

9 May 2021 - 1:08 am | मित्रहो

हा धागा अर्थशास्त्राच्या खाली यायला हवा होता.
index Fund मधे पैसा गुंतवु नये कारण EPF चा पैसा तसाही SBI Mutual Fund (Nifty Fifty index Fund) मार्फत त्यात जातो.

मला वाटत पहिला प्रश्न हा आहे की तुम्हाला स्वतःहून शेअरमधे गुंतवणुक का करायची आहे तुम्ही नफा तर म्युच्यअल फंडात गुंतवणुक करुन सुद्धा कमावू शकता. ज्या कंपन्यात फंड गुंतवणुक करतात त्यात तुम्ही गुंतवणुक केल्याने येणारा परतावा ९० टक्के वेळेला म्युच्युअल फंडापेक्षा कमी असतो.
१. म्युच्युअल फंडांकडे गुंतवायला मोठी रक्कम असते. त्यामुळे ते हेजिंग करतात. सेबीनुसार जेवढ्या किंमतीची गुंतवणुक आहे तेवढ्याच किंमतीचे निफ्टिचे फ्युचर किंवा जेवढ्या किंमतीचे स्टॉक आहे तेवढे स्टॉकचे फ्युचर फंड मॅनेजर शॉर्ट करु शकतो. असे केल्याने मार्केट पडले तरी फंडांना होणारा तोटा हा तुलनेत कमी असतो. मार्केट वर गेले तर शॉर्ट कव्हर करीत जातात मार्केट पडले तर शॉर्टमधून नफा मिळतो. २०१९ पासून फंड कॉल ऑप्शन सुद्धा विकू शकतात. छोट्या गुंतवणुकीला हेज करणे म्हणजे आजारापेक्षा इलाज भारी असे आहे.
२. NSE हे जगातले सगळ्यात मोठे Derivative Exchange आहे. Nifty, Bank Nifty हे सर्वात जास्त ट्रेड होते. Bank Nifty मधले स्टॉक Nifty वर सुद्धा प्रभाव टाकतात. त्यामुळे बँक स्टॉकमधे भयंकर volatility असते. साऱ्या बँक स्टॉकचा बिटा १ च्या वर आहे. योग्य वेळेस विकत घेऊन योग्य वेळी विकणे शक्य होत नाही. जे काम फंड मॅनेजर करु शकतो कारण त्याचे पूर्णवेळ काम आहे. दुसरे हे सार मॅनेज करायला रिसोर्सेस सुद्धा आहेत. प्रायॉरीटी अक्सेस, ट्रेडींग अल्गो हे सारे फंड मॅनेजरकडे असते. जी बातमी आपल्याला टिव्हीवर कळते ती बऱ्याचदा त्यांना आधीच माहिती असते.
३. फंड मॅनेजर त्याचे पोर्टफोलियो बॅलेंसिंग आपल्यापेक्षा चांगल्याप्रकारे करु शकतात. त्याचे ज्ञान मिळवून ते सार शिकून आपण कितपत गुंतवणुक करु शकू ते सांगू शकत नाही. होणारच नाही असे नाही.
४. स्टॉक खूप पडले, महिना दीड महिना किंवा त्याहीपेक्षा जास्त ते वर गेले नाही आणि मग हळू हळू वर जायला लागले आपल्यातली प्रॉफिट बुकींग करायची प्रवृत्ती वाढते. लगेच विकून टाकतो. मग म्युच्युअल फंडा एवढे प्रॉफिट होत नाही.

सेकंडरी शेअर मार्केटमधे पहिली गुंतवणुक असेल दहा लाख रुपये ४ ते ६ आठवड्यात गुंतवणे घाईचे होईल. कमीत कमी तीन महिने तरी वेळ द्यावा.

माझे वैयक्तीक मत आहे की फंडांच्या गुंतवणुकीचा अभ्यास जरुर करावा, त्या स्टॉकचा अभ्यास जरुर करावा. गुंतवणुक करताना फंडांना फॉलो करु नये. स्वतःची वेगळी थीम असू द्यावी त्यानुसार गुंतवणुक करावी ही थीम काहीही असू शकते. अशा तीन चार थीम असू शकतात. ज्यात तुमचे स्वतःचे Conviction हवे. उदा. अशा स्मॉल कॅपमधे पैसे गुंतवु शकता ज्याचा P/E हा P/B पेक्षा कमी आहे. D/E सुद्धा कमी आहे. किंवा दुसरी थीम मी Cyclical Stock मधे गुंतवणुक करणार. Auto, Metal, Construction etc. हे Cyclical Sector आहे याच्या Cycle चा अभ्यास करुन गुंतवणुक करता येऊ शकते. हा गुंतवणकीचा सल्ला नाही तर काय पॉसिबिलिटी आहे ते सांगण्याचा प्रयत्न आहे.

कोणत्या पुस्तकात वाचले ते आठवत नाही पण स्टॉक मार्केटमधे जर तुम्हाला मजा यायला लागली तर समजायचे की तुम्ही आता पैसे गमवायला लागणार. ते जितक कंटाळवाण आणि रुटीन असेल तितका परतावा चांगला राहतो.

चंद्रसूर्यकुमार's picture

9 May 2021 - 10:35 am | चंद्रसूर्यकुमार

हो गेल्या काही वर्षात सेबीने म्युच्यल फंडांनाही कव्हर्ड शॉर्ट पोझिशन घ्यायला परवानगी दिली आहे. पण त्यापैकी किती फंड तसे करतात हा प्रश्न आहेच.समजा मार्च २०२० मध्ये कोणत्या फंडाने निफ्टी शॉर्ट केले असते तर त्या फंडाला घसघशीत फायदा झाला असता. शेवटी मार्केट लाँग करून जितके पैसे काढता येतात त्यापेक्षा कितीतरी जास्त पैसे मार्केटमध्ये घबराट असताना शॉर्ट करून काढता येतात. पण त्यावेळी कोणत्याही फंडाला पॉझिटिव्ह रिटर्न होते असे वाटत नाही.

हे का होत असावे? कारण (माझ्या मते) फंड मॅनेजर्स हे इन्व्हेस्टर या मानसिकतेचे असतात. डेरिव्हिटेव्हमध्ये ट्रेड करून आणि त्यातूनही शॉर्ट करून नियमितपणे पैसे काढायला ट्रेडरची मानसिकता लागते. अमर विश्वास यांना एक स्वतंत्र प्रतिसाद लिहित आहे त्याप्रमाणे १० लाख वगैरेचा पोर्टफोलिओ असेल तर रिटेल मंडळीही ऑप्शनमध्ये ट्रेड करून पैसे काढू शकतात. फंड मॅनेजर्स तर शेकडो किंवा हजारो कोटींचा पोर्टफोलिओ बघत असतात. फंड मॅनेजर्स पूर्णवेळ कोणता शेअर खाली आणि कोणता शेअर वर याच विश्वात असल्याने त्यांना तर ऑप्शन ट्रेडिंगमधून बराच जास्त पैसा काढता यायला हवा. तसे असेल तर कोणताही फंड कोणत्याही महिन्यात निगेटिव्ह रिटर्न द्यायलाच नको. पण तसे होताना दिसत नाही. मार्केट खाली आले की क्वचितच कोणता फंड पॉझिटिव्ह रिटर्न देतो. याचे कारण वर्षानुवर्षे इन्व्हेस्टरच्या मानसिकतेत असतील, इतरांचे पैसे (आणि ते पण काही शे/हजार कोटी) सांभाळायचे असतील आणि स्वत:चा बोनस, इन्क्रीमेन्ट आणि करिअर अवलंबून असेल तर तेवढ्यापुरत्या ट्रेडरच्या मानसिकतेत जाणे सोपे नसते.

अमर विश्वास's picture

9 May 2021 - 11:50 am | अमर विश्वास

योग्य विश्लेषण चंद्रसूर्यकुमारजी

एकदा Investor च्या मानसिकेत शिरलो कि ट्रेडर च्या मानसिकतेत परत जाणे अवघड आहे

चौकस२१२'s picture

10 May 2021 - 10:57 am | चौकस२१२

हे फंड च्या जडण घडणीवर वर अवलंबून आहे ,,,
काही फंड डेरवटिव्ह चेच फक्त बनले असतील सुद्धा ( पण सगळ्याच डेरीवेटीव्ह ना एक्सपाययरी असते कि जी शेअर ला नसते ) त्यामुळे डेरवटिव्ह मध्ये खेळणाऱ्या फंड ना ट्रेडिंग सारखे करावेच लागणार
एकूण शेअर मधील फंड जास्त असण्याचे कारण कदाचित असे असू शकेल !

१) एकूण जनतेला यातील फरक समाजवणे अवघड असेल
२) डेरीवेटीव्ह मधील चढ उतार हि खूप असतात
३) शेअर वॉर बेतलेले फंड ना इंडेक्स हा मोजमाप ठेवता येतो तसे डेरीवेटीव्ह ला काही मोजमाप दंड नाही?

चंद्रसूर्यकुमार's picture

10 May 2021 - 12:11 pm | चंद्रसूर्यकुमार

पूर्णपणे डेरिव्हेटिव्हमध्ये व्यवहार करणारे फंड भारतात आहेत का याची कल्पना नाही. नसावेत.

२) डेरीवेटीव्ह मधील चढ उतार हि खूप असतात

हो. दुसर्‍या प्रतिसादात म्हटल्याप्रमाणे ऑप्शनमध्ये भयानक व्होलाटिलीटी असते. फ्युचर्समध्ये तितकी व्होलाटिलीटी नसते. मुळातल्या शेअरच्या किंमतीत जितकी व्होलाटिलीटी असेल तितकीच फ्युचर्सच्या किंमतीतही असते. पण लॉट साईझमुळे फायदा/तोटा दोन्ही वाढते.

चौकस२१२'s picture

10 May 2021 - 12:28 pm | चौकस२१२

पण लॉट साईझमुळे फायदा/तोटा दोन्ही वाढते.
हा काय प्रकार कळलेलं नाही कधी आणि तो वेगळं का असतो कोण जाणे
अमेरिकेतील फुचर घेतले तर समजा इंडेक्स एस अँड पी ५०० हि ४००० .पॉईंट ला ट्रेंड होत असेल तर ४००० गुनिले $५० असा सराळ हिशोब
अमेरिकेत सिंगल शेअर फुचर फारसे प्रसिद्ध नाहीत
असो एकूणच .. लिव्हरेज त्यात आपोआप असते त्यामुळे फायदा तोटा पटीने वाढतो / कमी होतो हे बरोबर
ऑप्शन मध्ये वेळ जाणे (time value ) असते तशी फुचर आणि शेअर मध्ये नसते

अमर विश्वास's picture

9 May 2021 - 11:47 am | अमर विश्वास

धन्यवाद मित्रहो ...

म्युच्युअल फंड मध्ये मी गेली अनेक वर्षे गुंतवणूक करतो आहे .... त्याबाद्दल मी वेगळी लेखमाला लिहिली होती ही SIP गुंतवणूक अशीच सुरु ठेवणार आहे.

ही गुंतवणूक ही SIP ला पर्याय नाही तर पूरक आहे .

यात म्युच्युअल फंड्स हे फक्त इन्स्पिरेशन म्हणून आहेत. किंवा फर्स्ट बेसलाईन म्ह्णून. त्यात सुद्धा Focus , opportunity, Mid Cap, large cap & Contra या फंडांचा एकत्रित अभ्यास केला तर उत्तम बेसलाईन तयार होईल. यातून best performers, Outliers शोधायचे तर Fundamental analysis ला पर्याय नाही

या लिस्ट ला बाकीचे फॅक्टर्स जसे monitory policy , government policies, post pandemic trends / possibilities हे apply केले तर लॉन्ग टर्म investment साठी चांगला पोर्टफोलिओ निर्माण होईल.

उदाहरणार्थ Hospitality & Travel इंडस्ट्री सध्या कठीण काळातून जात आहे. त्यांचे शेअर्स चे बाजार मूल्य कमी आहे . पण पुढच्या दोन वर्षात जोरदार वाढ अपेक्षित आहे. त्यामुळे असे शेअर्स (जे आत्ता कुठल्याच फंडात नाहीत) तेही घ्यायला हरकत नाही

उदा. Indian Hotels , Taj GVK Hotels, India Tourism, Lemon Tree Hotels

तेजस आठवले's picture

20 May 2021 - 12:15 pm | तेजस आठवले

आपला हा प्रतिसाद अतिशय आवडला, माझ्या मनात हेच आले होते, पण तुमच्यासारखे कदाचित मांडता आले नसते.

आंद्रे वडापाव's picture

9 May 2021 - 7:44 am | आंद्रे वडापाव

माझ्या सुचवणी कंपन्या (*तुमच्या व तुमच्याच जबाबदारीवर गुंतवणूक करा)

Unilever
Hdfc bank
Hdfc
Hdfc life
Bajaj fintech
Bajaj finance
TCS
Tata consumer
Infosys
HCL
Dabur
Indraprastha gas
Asian paints
Pidilite

गणेशा's picture

9 May 2021 - 9:04 am | गणेशा

आपले आणि माझे long term shares जवळ जवळ ९०% पर्यंत सेम आहेत.

माझे
Bank sector
Hdfc bank, hdfc amc

Material
Asian paint, pidilite india

Cards and digitalization
Sbi cards

Telecom
Relaince आणि idea

Pharma
Aurobindo pharma

Fmcg
Colgate, itc

नुकतेच unilever आणि बाटा यांना exit दिलेली आहे..

याबरोबर, hcl tech /biocon आणि cipla / airtel / hdfc life /icici bank /hdfc / heg / jm financial /apollo tyre /bob/tata consumer/dabur

हे चांगले share सुद्धा मी positional ला वापरत असतो

गणेशा's picture

9 May 2021 - 9:05 am | गणेशा

Long term मध्ये IT मधील infy आणि tcs वरच्या list मध्ये mention करायचे राहिले

मुक्त विहारि's picture

9 May 2021 - 9:31 am | मुक्त विहारि

ह्यातला एक पण घेतला नाही का?

गणेशा's picture

9 May 2021 - 10:10 am | गणेशा

Long term मध्ये
१२ ते १५ shares असावेत max त्यामुळे ते ट्रॅक करता येतात, आणि sip करायला सोप्पे जाते..
राहिलेले sector मी positional ला पण वापरतो..

सर्व प्रकारचे sector निवडता येत नाहीत.. आणि काही वेळेस oil वगैरे shares international market वर depend असल्याने अभ्यास वाढतो त्यामुळे पण oil नाही घेतले..

नुकताच ४०५ रुपयांनी एप्रिल ला bpcl घेतलाय आणि आता तो ४० रुपये वाढलाय.. विकेल for positional...

मुक्त विहारि's picture

9 May 2021 - 12:30 pm | मुक्त विहारि

विकू नका ...

Oil and Gas, सिमेंट, लोखंड, इत्यादि खनिज सेक्टर, लंबी रेस के घोड़े है ...

20-25 वर्षांचा आढावा घेतलात तर समजेल

ही गुंतवणूक सगळ्यात सेफ आहे

खूप मोठा परतावा देणार नाही, पण पीपीएफ् सारखी आहे, चार पैसे नक्कीच जास्त मिळतील ....

सुबोध खरे's picture

9 May 2021 - 3:05 pm | सुबोध खरे

Long term मध्ये

१२ ते १५ shares असावेत max त्यामुळे ते ट्रॅक करता येतात, आणि sip करायला सोप्पे जाते..

मी गेली १० वर्षे तरी साधारण १००च्या आसपास शेयर्स चा पोर्टफोलिओ राखून आहे आणि तो ट्रॅक करणे मला अजिबात कठीण जात नाही. उलट सर्वच्या सर्व क्षेत्रात माझे समभाग विखरून असल्याने एखादे क्षेत्र पडले तरी माझा पोर्टफोलिओ फारसा पडत नाही.

मग सर्वच्या सर्व लोक असा सल्ला का देतात?

चौकटराजा's picture

9 May 2021 - 9:32 am | चौकटराजा

कदाचित तुम्ही एकावेळी गुंतवणूक करून लक्ष ठेवून प्रॉफिट मिळविणे असा तुमचा प्लान असावा .मी विचार एस आय पी या अंगाने केला होता ! अर्थात आता मी शेअरमध्ये पैसे गुंतवून न बघता उर्वरित आयुष्य ताणरहित व मजेने असे जाईल याचा विचार अधिक करतो त्यामुळे शेअर " इल्ला" !

आंद्रे वडापाव's picture

9 May 2021 - 9:53 am | आंद्रे वडापाव

चौरा दोन्हीं करा.
१. उर्वरित आयुष्य ताणरहित व मजेने असे जाईल याचा विचार अधिक करा
२. दर्जेदार शेअरमध्ये पैसे गुंतवून असू द्या एस आय पी

आंद्रे वडापाव's picture

9 May 2021 - 10:01 am | आंद्रे वडापाव

तेनाली रामन, देवाची तपस्या करतो..
देव प्रसन्न होतो...
म्हणतो , माझ्या समोर प्रसाद रुपी दुध आहे ते पी, तुला धन लक्ष्मी मिळेल कामधेनू मिळेल....
माझ्यासमोर प्रसाद रूपाने आलेल्या दुसरी वाटीत मध आहे, ते सेवन केलेस तर विद्या मिळेल मनःशांती मिळेल...

बोल काय सेवन करतोय ? मी तुला वर देत आहे.

तेणाली रामन क्षण दोन क्षण विचार करतो.

मध व दुध दोन्हीं पात्रे उचलतो, त्यांना त्यातील मोठ्या पात्रात मिक्स करतो, व ते द्रावण सेवन करतो.

देवाने ऑप्शन दिला, म्हणजे एकच निवडला पाहिजे असा विचार न करता... तेणाली दोन्हीं ऑप्शन निवडतो.

गणेशा's picture

9 May 2021 - 10:06 am | गणेशा

काका,

नाही नाही...
मी long term साठी ५-८ वर्षे टाइम निवडला आहे..
माझे होम loan मी तेंव्हा बंद करेल या अनुषंघाने

आणि fundamental shares मध्ये मी दर महिन्याला ठराविक रक्कम invest करतो..जो share deep ला आला आहे तो घेत राहतो..

मला वाटते या धाग्यात मी ते जास्त व्यवस्थित सांगितले आहे..
https://misalpav.com/node/48553

अमर विश्वास's picture

9 May 2021 - 11:54 am | अमर विश्वास

आंद्रे आणि गणेशा

लिस्ट बद्दल धन्यवाद. आपल्या लिस्ट्स बऱ्यापैकी मॅच होतात.

So I am on right track... thanks

अमर विश्वास's picture

9 May 2021 - 11:52 am | अमर विश्वास

चौराजी

म्युच्यअल फंड (SIP ) आणि शेअर्स हे Either or नसून परस्पर पूरक आहेत.

चौकटराजा's picture

9 May 2021 - 3:40 pm | चौकटराजा

तो एम एफ वाला एस आय पी मी म्हणत नाही ! मला आपणच मॅनेजर अशी शेअरचीच खरेदी अभिप्रेत आहे ! फरक फक्त वन टाइम गुंतवणूक की दरमहा असा मला म्हणायचा आहे !

"अरे!! दहा लाख अशा प्रकारे गुंतवण्यापेक्षा ईंट्राडे बरोबर स्विंग ट्रेडींग(जस्तीत जास्त ४ ते ५ दीवसंपर्यंत पोजीशन ओपेन ठेवायचे) केली असती तर?" ५०हजार ईंट्राडेला व ५० हजार स्विंग ट्रेडींगला पुरे झाले असते!!" थोडे लेव्हरेज व व्ट्रेलिंग स्टॉप लॉस लाउन नुकसान तर टळलेच असते व पर डे व पर वीक प्रॉफीट मिळुन ईन्वेस्टमेंट्पेक्षा कीती तरी चांगला मिळाला असता!"
पण ईंट्राडे ट्रेड्स हाताळायला अनुभव लगतो.

अमर विश्वास's picture

9 May 2021 - 11:59 am | अमर विश्वास

शानबा जी
मी इन्वेस्टमेंट करणार आहे ... ती सुद्धा दीर्घ मुदतीची.

ट्रेडिंग करायचा अजिबात विचार नाही .... मुळात ट्रेडिंग ही investment नाही. तो business आहे.

शानबा५१२'s picture

9 May 2021 - 6:53 pm | शानबा५१२

DHFL व YES bank हे कंपन्यांचे शेअर्स त्या कंपनींना(णी?) असलेल्या रेटींग्समुले खुप विकले गेले होते. त्यात ब-याच जणांनी खुप इन्वेस्टमेंट केली होती. त्या कंपन्यांनी चांगला फायदा नाही तर नुकसान दीले. ह्या कंपण्या ट्रेडर्स मध्ये खुप जास्त लोकप्रिय होत्या पण वास्तवात त्यांचा उद्योग दीवसेंदीवस दीसानासा होत होता व आता त्या पुर्ण गायब झाल्या आहेत.
आपण विचारात घेतलेल्या कंपण्याच्या यादीत ज्या कंपन्या आहेत त्यात FII चे ईनवेस्टमेंट जास्त आहे व ईतर कंपन्या ह्या विदेशाकडुन काम मिळवण्यावर भर देतात. मार्केट पडु द्या, आता जेव्हा सर्वीकडे आर्थिक ताण आहे तेव्हा मार्केट वाढते आहे, आता ब-याच चांगल्या शेअर्सचा भाव चढलेला आहे असे वाटते. जेव्हा सर्व सुरळीत होईल तेव्हा मार्केट पडेल. तेव्हा तुम्हाला शेअर्स कमी कींमतीत घेता येतील.
मी SIP व Mutual Funds ह्या स्कीम्सबद्दल जे वाचले ऐकले आहे ते निराशावादी आहे. काही महीन्यांपुर्वी मी काही दीवस SIP calculator, SIP ही स्कीम देणा-या बँक्स ह्यांबद्दल वाचले तर मला अस काही वाचण्यात नाही आले की बँकेने सांगितल्याप्रमाणे ५ वर्षांनंतर कोणी करोडपती झाला. ह्या स्कीम्स पाच वर्षांपुर्वी पासुन आहेत.
ही सर्व मते माझी कमी व माझ्या निरीक्षनाची जास्त आहेत, त्यात एका युट्युब व्हीडीओ मध्ये सर्व टक्केवारीने समजवले आहे की कसे SIP मध्ये सांगितलेली ध्येये पुर्ण होणे जवळजवळ अशक्य आहे . त्यामुळे स्वःताचा पोर्टफोलिओ स्वःता आभ्यास करुन बनवणे जास्त उपयोगी वाटते.
I don't think banks will make progress in future. All countries are focusing on de-globalization more than globalization.
मलाही ह्या विषयावर तज्ञ लोकांचे मत माहीती करायला आवडेल.

अमर विश्वास's picture

9 May 2021 - 7:17 pm | अमर विश्वास

शानबा५१२ .. .काहीतरी गैरसमज होतो आहे

एकेक मुद्दा बघू

DHFL व YES bank हे कंपन्यांचे शेअर्स त्या कंपनींना(णी?) असलेल्या रेटींग्समुले खुप विकले गेले होते >>>
कधी? कुठले रेटिंग ?

वास्तवात त्यांचा उद्योग दीवसेंदीवस दीसानासा होत होता व आता त्या पुर्ण गायब झाल्या आहेत. >>>
YES बँक ही आघाडीचे बँक आहे. त्याचे मार्केट कॅपिटॅलिझशन ३३ हजार कोटी पेक्षा जास्त आहे .... नक्की काय गायब झाले आहे ?

मी SIP व Mutual Funds ह्या स्कीम्सबद्दल जे वाचले ऐकले आहे ते निराशावादी आहे. >>>>>
काय निराशावादी आहे ? लिंक देऊ शकता का ?
तसेही मी यावर लेखमाला लिहिली आहे . .. खात्रीने सांगू शकतो .. चित्र पूर्णपणे आशावादी आहे
म्युच्युअल फंड्स .... हमखास कोट्याधीश होण्याचा मार्ग (https://misalpav.com/node/48621) ही लेखमाला वाचा . उत्तरे मिळतील

त एका युट्युब व्हीडीओ मध्ये सर्व टक्केवारीने समजवले आहे की कसे SIP मध्ये सांगितलेली ध्येये पुर्ण होणे जवळजवळ अशक्य आहे >>>
कुठली ध्येये ? खुलासा करा. तसेच व्हिडीओ ची लिंक द्या

शेवटी इतकेच नमूद करतो .... FII चे महत्व कोणीच नाकारत नाही. पण ते ही फायदा कमावण्यासाठीच येतात. जर मार्केट फंडामेंटल्स नीट नसतील तर कोणीही फिरकणार नाही

इक्विटी या असेट क्लास ने गेल्या २५ वर्षात सात्यत्याने उत्तम परतावा दिला आहे ... अर्थात आभास आणि चिकाटी ह्या गोष्टी इथेही आवश्यक असतात

शानबा५१२'s picture

10 May 2021 - 3:08 pm | शानबा५१२

येस बँक
https://www.msn.com/en-in/money/markets/yes-bank-shares-are-cheaper-than...

https://www.businesstoday.in/sectors/banks/6-reasons-why-yes-bank-collap...

डीएचएफएल

https://economictimes.indiatimes.com/markets/stocks/news/crisil-downgrad...

https://finance.yahoo.com/news/indian-housing-lender-dhfl-warns-22512875... ही बातमी जुनी आहे त्यानंतर तर ह्यांची पुर्ण वाट..........

https://economictimes.indiatimes.com/mf/analysis/why-are-your-mutual-fun...

https://economictimes.indiatimes.com/mf/analysis/sips-in-these-mutual-fu... म्हणुन आता निपॉन झाले?

ह्या व्हिडीओतील व्यक्ती सुशिक्षित व माहीतीगार वाटतो :

https://www.youtube.com/watch?v=3Eps_0PG0ps

आपण वरील ह्या लेखांशी संबधीत ईतर बरीच माहीती https://duckduckgo.com/ सारखे सर्च इंजिन वापरुन वाचा.

(मी हे सर्व वेळ खर्च करुन लिहलेय कारण ह्यां लोकांमुळे, ह्या कंपण्यामुळे खुप ट्रेडर्सना आर्थिक नुकसान झाले आहे. माझेही नुकसान झाले आहे. मी फक्ट ईक्वीटी ट्रेडर्सबद्दल बोलतो आहे, मी सुध्दा एक ईक्वीटी ट्रेडर आहे)

हा धागा इनव्हेस्टमेंटबद्दल आहे पण तरी "पोजिशन" वगैरेशी संबंधित काही प्रतिसाद बघितल्याने मी ट्रेडिंगबद्दलचे एक निरिक्षण इथे मांडत आहे.
ज्या शेअरचे बाय बॅक घोषित केलेले आहे त्या शेअरमध्ये बाय बॅकच्या शेवटच्या तारखेच्या २-३ दिवस पुर्वी पर्यंत खरेदी करुन शॉर्ट टर्म मध्ये फायदा मिळवता येवू शकतो. व नंतरही ते शेअर बहूधा बाय बॅक प्राईसच्या वर रहातात (पण पहिला फायदा - म्हणजे बाय बॅकचा महत्वाचा तो जास्त खात्रीने पदरात पाडून घेता येवू शकतो)
अलिकडची उदाहरणे - टी सी एस, अतुल इंडस्ट्रिज, आरती ड्रग्ज . पुढचे घोषित झालेले बायबॅक SMARTLINK HOLDINGS LIMITED
माझा फार काही अभ्यास नाही (म्हणूनच मी सल्ला म्हणत नाही तर निरीक्षण म्हणतो आहे). तज्ञांनी अधिक मार्गदर्शन करावे.

चंद्रसूर्यकुमार's picture

9 May 2021 - 11:55 am | चंद्रसूर्यकुमार

हा प्रतिसाद अमर विश्वास आणि १० लाखाचा पोर्टफोलिओ असलेल्या सगळ्यांसाठी आहे. जर हा पोर्टफोलिओ लाँग टर्मसाठी घेतला असेल आणि शॉर्ट टर्ममधील चढ-उतारांमुळे त्यात फार बदल करायचे नसतील तरच हे लागू ठरेल. अन्यथा याकडे दुर्लक्ष करावे.

आपला पोर्टफोलिओ ब्रोकरकडे प्लेज करून त्यावर आपल्याला ७५% ते ८०% मार्जिन मिळू शकते. ते वापरून ऑप्शन सेलिंग करता येईल. सध्या मेटल सेक्टरमधील शेअर्स जोरदार धावत आहेत. टाटा स्टील, जे.एस.डब्ल्यू स्टील वगैरेंची अगदी स्वप्नवत धाव सुरू आहे. असे अपटर्नमधील शेअर बघावेत आणि त्यावरील लांबचे पुट ऑप्शन विकावेत. मागच्या वर्षीपासून सेबीने कव्हर्ड ऑप्शन पोझिशनवर मार्जिन खूप कमी केले आहे. सध्या टाटा स्टील ११८० च्या आसपास चालू आहे. आताच झिरोधाच्या मार्जिन कॅल्क्युलेटरवर बघितले की ११०० चा पुट विकला आणि १०९० चा पुट विकत घेऊन कव्हर्ड पोझिशन केली तर त्यावर ४३,२१६ रूपये मार्जिन लागेल तर जवळपास २ हजार रूपये प्रिमिअम खिशात टाकता येईल. तेव्हा साधारण ४.५% ते ५% रिटर्न २७ मे पर्यंत मिळवता येऊ शकतील. जर टाटा स्टील १०९० च्या खाली आपटला तर ६ हजार तोटा होईल. तेव्हा आपली पोझिशन व्यवस्थित सांभाळायला लागेल. जर अजून सुरक्षित खेळायचे असेल तर १०८०-१०७० ची कव्हर्ड पुट पोझिशन घेतली तर ३% रिटर्न मिळू शकतील. टेक्निकल अ‍ॅनॅलिसिसवर अजून चांगली पकड असेल तर त्यापेक्षा जास्त रिटर्न काढणेही शक्य आहे. दुसरा मार्ग म्हणजे जे शेअर डाऊनटर्नमध्ये आहेत त्यावर लांबचे कॉल विकायचे. पण शक्यतो मार्केट आता आहे अशा अपटर्नमध्ये असेल तर डाऊनटर्नमधील शेअर्सवरही कॉल विकू नयेत. कारण सगळे मार्केट वर जात असेल तर अशी गाढवेही पळतात त्यामुळे तोटा व्हायची शक्यता असते.

पुढील गोष्टी जरूर लक्षात ठेवाव्यात--
१. ऑप्शन हा आगीशी खेळ असतो. व्यवस्थित खेळल्यास झटपट पैसा मिळवून द्यायची ताकद ऑप्शनमध्ये आहे तितकी इतर कशातच नाही. पण फार हाव ठेऊन अती आक्रमक (अ‍ॅग्रेसिव्ह) पोझिशन घेतल्या आणि मार्केट आपल्या दिशेविरूध्द गेले तर रस्त्यावर आणायची ताकदही ऑप्शनमध्ये असते हे विसरू नये.
२. विकताना नेहमी लांबचे ऑप्शन विकावेत- भले थोडा रिटर्न कमी आला तरी चालेल.
३. कोणत्याही परिस्थितीत कव्हर्ड पोझिशनच ठेवावी.
४. डाऊनटर्नमधल्या गाढवांवर कधीही (कितीही लांबचे असतील तरी) पुट विकू नयेत. कारण तो शेअर दाणकन आपटला तर आपली खपायची वेळ येईल.

वाह चांगली माहिती आहे ऑप्शन हे शेअर किंवा फुचुर पेक्षा जास्त ल्किष्ट असतात हे मात्र खरे पण त्याच बरोबर त्यातून खूप काही वेगवेगळ्या पद्धतीने ट्रेडिंग करता येते .. एक दोन गोष्टींचाच खुलासा करावासा वाटलं आपलया लिखाणावर

२. विकताना नेहमी लांबचे ऑप्शन विकावेत- भले थोडा रिटर्न कमी आला तरी चालेल.
येथे तुम्हाला "लांबचे " म्हणजे लांबच्या स्ट्राईक प्राईस चे म्हनायचे असावे नाहीतर लांबचे म्हणजे दूर काळअनंतर "एक्सपआयर " होणारे असे म्हणणे असेल तर धोका बदलतो .. ज्यांना यातील फरक महती नाही त्यांचा गोंधळ होऊ शकतो म्हणून

३. कोणत्याही परिस्थितीत कव्हर्ड पोझिशनच ठेवावी.
म्हणजे स्प्रेड बद्दल बोलताय ( कॉल स्प्रेड किंवा पूत स्प्रेड = ठरलेलआ नफा किंवा तोटा आणि तसे मार्जिन )
की आपण कवर्ड कॉल सेग बद्दल बोलताय ? .. ज्याची जोखीम वेगळी प्रकारची असते

४. डाऊनटर्नमधल्या गाढवांवर कधीही (कितीही लांबचे असतील तरी) पुट विकू नयेत. कारण तो शेअर दाणकन आपटला तर आपली खपायची वेळ येईल.
पूट चे उपयोग:
लांब पलैयासाठी जर एखाद शेअर आपल्याला आहे त्या किमतीत विकत घ्य्याचा असेल तर पूट विकणे ( ऐट द मनि कॅश कवर्ड पूट विकणे ) हि एक पद्धत विचारात घेता येते अगदीच नाही असे नाही
नेकेड कॉल सेल्लिंग मध्ये अगणित तोटा होऊ शकतो हे जरी खरे असले तरी नेकेड पूट सेलिंग मधील धोका हा सीमित असतो (अर्थात तरी तो खूप असू शकतो हे हि मान्य ) कारण शेअर व पेक्षा खाली जाऊ शकत नाही आणि शेअर वरती कितीही जाऊ शकतो .
जसे ऑप्शन चे स्प्रेड तसे भारतातील फुच र चे "कॅलेंडर स्प्रेड" बद्दल आपल्याला काही माहिती आहे का? खास करून मिन रिव्हरटिंग असतात का / मार्जिन वगैरे ( निफ्टी जून/ जुलै , तेल जुलै / ऑगस्ट इत्यादी )

चंद्रसूर्यकुमार's picture

10 May 2021 - 11:57 am | चंद्रसूर्यकुमार

येथे तुम्हाला "लांबचे " म्हणजे लांबच्या स्ट्राईक प्राईस चे म्हनायचे असावे

हो लांबच्या स्ट्राईकचेच ऑप्शन म्हणत आहे लांबच्या एक्सपायरीचे नाहीत.

म्हणजे स्प्रेड बद्दल बोलताय ( कॉल स्प्रेड किंवा पूत स्प्रेड = ठरलेलआ नफा किंवा तोटा आणि तसे मार्जिन )

हो स्प्रेडबद्दलच लिहित आहे. स्प्रेड कॉल किंवा पुट वापरून करता येतात.

१. बुल कॉल स्प्रेड- व्ह्यू बुलिश असेल तर समजा १०० रूपयाच्या स्ट्राईकचा कॉल विकत घेऊन १०५ चा कॉल विकणे- म्हणजेच किंमत १०५ पर्यंत जाणार नाही असा व्ह्यू असेल- म्हणजे मध्ये एखादा तगडा रेजिस्टन्स वगैरे असेल. थोडा लांबचा कॉल विकून आपल्याला विकत घ्यायच्या कॉलची किंमत इफेक्टिव्हली कमी होते.

२. बेअर कॉल स्प्रेड- व्ह्यू असेल की किंमत १०० च्या वर जाणार नाही तर १०० चा कॉल विकायचा. पण समजा किंमत आपल्याला अपेक्षित दिशेविरूध्द उलटली म्हणजे वर गेली तर त्यापासून वाचवायला १०५ चा कॉल विकत घेणे.

३. बेअर पुट स्प्रेड- व्ह्यू बेअरीश असेल तर समजा १०० रूपयाच्या स्ट्राईकचा पुट विकत घेऊन ९५ चा पुट विकणे- म्हणजेच किंमत ९५ पर्यंत खाली जाणार नाही असा व्ह्यू असेल- म्हणजे मध्ये एखादा तगडा सपोर्ट वगैरे असेल. थोडा लांबचा पुट विकून आपल्याला विकत घ्यायच्या पुटची किंमत इफेक्टिव्हली कमी होते.

४. बुल पुट स्प्रेड- व्ह्यू असेल की किंमत १०० च्या खाली जाणार नाही तर १०० चा पुट विकायचा. पण समजा किंमत आपल्याला अपेक्षित दिशेविरूध्द उलटली म्हणजे खाली गेली तर त्यापासून वाचवायला ९५ चा पुट विकत घेणे.

नेकेड कॉल सेल्लिंग मध्ये अगणित तोटा होऊ शकतो हे जरी खरे असले तरी नेकेड पूट सेलिंग मधील धोका हा सीमित असतो (अर्थात तरी तो खूप असू शकतो हे हि मान्य ) कारण शेअर व पेक्षा खाली जाऊ शकत नाही आणि शेअर वरती कितीही जाऊ शकतो .

हे कागदावर (ऑन पेपर) ठिक आहे. पण प्रत्यक्षात परिस्थिती खूप वेगळी असते. टाटा स्टीलचा लॉट साईझ ८५० आहे. समजा ११५० चा कॉल कोणी मागच्या आठवड्यात विकला असेल (व्ह्यू असेल की ११५० च्या वर जाणार नाही) तर तेव्हा किंमत २० ते २५ रूपये होती. आज त्या कॉलची किंमत सकाळी उजाडताना ८५ रूपये होती. म्हणजे तीन चार दिवसात थेट ५० हजाराचा तोटा होईल. म्हणजे अगदी अनंत तोटा नसला तरी एका फटक्यात ५० हजार तोटा होईल. किती लोक तो तोटा सहन करू शकतील? डाऊनटर्नमधील पुट मध्येही असाच बदल होतो. ऑप्शन हा भयानक व्होलाटाईल प्रकार असतो. खरोखरच आगीशी खेळ आहे तो. त्यातील सगळे बारकावे माहित नसतील तर त्यापासून दूर राहणेच इष्ट. नाहीतर अक्षरशः एखाद्याला पूर्ण धुऊन काढून रस्त्यावर आणायची ताकद या प्रकारात असते.

जसे ऑप्शन चे स्प्रेड तसे भारतातील फुच र चे "कॅलेंडर स्प्रेड" बद्दल आपल्याला काही माहिती आहे का? खास करून मिन रिव्हरटिंग असतात का / मार्जिन वगैरे ( निफ्टी जून/ जुलै , तेल जुलै / ऑगस्ट इत्यादी )

हो फ्युचर्स वापरूनही कॅलेंडर स्प्रेड करता येतात. म्हणजे मे च्या लॉटमध्ये लाँग पोझिशन असेल तर जूनच्या लॉटमध्ये शॉर्ट आणि उलटेही. त्यावरही मार्जिनचा बराच फायदा मिळतो.

चौकस२१२'s picture

10 May 2021 - 12:30 pm | चौकस२१२

फ्युचर्स कॅलेंडर स्प्रेड
खास करून मिन रिव्हरटिंग असतात का

चंद्रसूर्यकुमार's picture

10 May 2021 - 12:47 pm | चंद्रसूर्यकुमार

खास करून मिन रिव्हरटिंग असतात का

असतील तरच हा कॅलेंडर स्प्रेड करून फायदा. पण गेल्या काही महिन्यातील मार्केट बघता तसे दिसत नाही. मी हा प्रकार कधीच करून बघितलेला नाही.

सुबोध खरे's picture

9 May 2021 - 3:00 pm | सुबोध खरे

एक मूलभूत प्रश्न

फ्युचर आणि ऑप्शन्स मध्ये वर्षानुवर्षे पैसे मिळवून आपला चरितार्थ चालवणारी माणसाने अजिबातच का दिसत नाहीत?

चंद्रसूर्यकुमार's picture

9 May 2021 - 3:05 pm | चंद्रसूर्यकुमार

फ्युचर आणि ऑप्शन्स मध्ये वर्षानुवर्षे पैसे मिळवून आपला चरितार्थ चालवणारी माणसाने अजिबातच का दिसत नाहीत?

कोणी सांगितले अशी माणसे दिसत नाहीत? नोकरी सोडून पूर्ण वेळ ट्रेडिंग करून त्यावर आपला चरितार्थ चालविणारे अनेक लोक माझ्या माहितीत आहेत. तसेच नोकरी सोडून पूर्ण वेळ ट्रेडिंग केले नाही तरी नोकरीत कमावतात त्या तुलनेत बर्‍यापैकी (अर्ध्याहून जास्त) उत्पन्न ट्रेडिंगमधून मिळवणारे लोकही आहेत. आणि हे ट्रेडिंग करणारे व्यवस्थित मनी मॅनेजमेंट सांभाळून डेरिव्हेटिव्ह मध्येच ट्रेड करतात.

गोंधळी's picture

9 May 2021 - 8:42 pm | गोंधळी

IDFC Bank the next HDFC Bank? अशी चर्चा सुरु आहे. तर यात गुंतवणुक करावी का?
एक analysis

Factor Investing Strategy या संकल्पनेच्या जवळ जाणारं Smallcase नावाचे app आणि website आहे.
त्यामध्ये आपण stocks चे एक बास्केट बनवून त्यानुसार stocks खरेदी करू शकतो. त्यांनी काही Model portfolio सुद्धा बनवले आहेत त्यांचे past performance दिले आहेत. आपण त्यामध्ये बदलही करू शकतो म्हणजे नको ते stocks काढून हवे ते घेऊ शकतो. अर्थात डिटेल पोर्टफोलिओ बघण्यासाठी account log in ची गरज असते. जर Zerodha मध्ये अकाउंट असेल तर डिरेक्टली Smallcase मध्ये लॉग इन करता येते.

अमर विश्वास's picture

13 May 2021 - 9:05 am | अमर विश्वास

हे इंटरेस्टिंग आहे .. चेक करतो

मी समजा समजा लॉन्ग टर्म (इन्व्हेस्टमेंट) म्हणून shares घेतले असतील तरी स्टॉप लॉस लावणं गरजेचं आहे का? मला बरेच जण सांगत आहेत कि आपला कॅपिटल वाचवावे आणि परत एन्ट्री करावी. कोणी गाईड करू शकेल का ?

चौकस२१२'s picture

12 May 2021 - 6:31 pm | चौकस२१२

आपण असे करू शकता
- स्टॉप लॉस घेणे आणि अजून खाली गेलं तर ती गॅप होऊ देणे आणि मग परत घेणे
- किंवा कॉस्ट अवरेजींग ( १० ला घेणे खाली गेला ८ ला अजून घेणे असे )
- "इन्शुरन्स" म्हणून पूट ऑप्शन विकत घेणे
- दुसऱ्या अकाउंट मध्ये शेअर शॉर्ट कराणे ( हे भारतात करता येते कि नाही माहित नाही , शेअर वरील फ्युचर वापरून शॉर्ट करता येते असावे? )
- शांत बसने काह्ही ना करणे
वरील पद्धती चे फायदे तोटे वेगळे आहेत
पण हे जर सर्व तुम्हाला खात्रीने वाटत असेल कि आपण घेतलेले शेअर हा लांब पल्याचा ठेवण्यासारखा आहे
या शिवाय मुळातच विविध शेअर घेणे हा हि उपयाय असू शकतो किंवा काही शेअर + काही कमोडिटी फ्युचर+ काही लिस्टेड रिअल इस्टेट ट्रस्ट असे वेग वेगळे असेट क्लास यात ठेवणे असे हि उपाय आहेत

गणेशा's picture

13 May 2021 - 8:13 am | गणेशा

Long term shares पुर्ण analysis करून घेतल्यावर..
Stop loss ची गरज नाहि..

उलट ज्या ज्या वेळेस shares ची किंमत deep येईल त्या त्यावेळी पुन्हा त्यात खरेदि करत रहायची..

जर stop loss लावायाचा असेल आणि विकायचा असेल तर त्याला long term म्हणायचंच का?

चंद्रसूर्यकुमार's picture

13 May 2021 - 8:30 am | चंद्रसूर्यकुमार

Long term shares पुर्ण analysis करून घेतल्यावर..
Stop loss ची गरज नाहि..

यावर थोडा अधिक प्रकाश टाकता येईल का? पूर्ण अ‍ॅनॅलिसिस म्हणजे नक्की काय? तो कोणत्या आधारावर करायचा?

एकेकाळी काही शेअर्स असेच लाँग टर्म गुंतवणुकदारांच्या गळ्यातले ताईत होते. पण त्याचे काय झाले हे पुढील चार्टवरून समजेल--

सुझलॉन
suzlon

जयप्रकाश असोसिएट्स
JP

रिलायन्स कम्युनिकेशन्स
Rcom

तेव्हा हे शेअर्स खाली येत असताना पण आणखी घेत राहायचे?

गणेशा's picture

13 May 2021 - 9:33 am | गणेशा

आपण
https://misalpav.com/node/48578
हा धागा पाहिला आहेच.. त्यात बरेचसे लिहिलेले आहेच..

आता तुम्हाला असे वाटत असले कि आपण shares घेण्यात काही चूक झाली आहे किंवा share घेतल्या नंतर त्या कंपनीची वाटचाल अधोगती कडे चालू असल्यास त्या कंपनीला आपल्या long term portfolio मधून काढून टाकावी..

पण जर stop loss लावायचा असल्यास ते long term कसे होईल..
आणि फेक कुठला तरी stop loss खुप लांबचा लावायचा झाल्यास त्याचा काहीच अर्थ नाही..

आता आपला portfolio किंवा त्यातील shares पुन्हा जोखून पाहता यावा यासाठीच आपण long term मध्ये जास्तीत जास्त १२-१५ shares घ्यावेत असे सुचवले आहे..

जर आपण long term मध्ये खुप सारे stocks घेतले तर मात्र त्याचा वेळोवेळी आढावा घेणे अवघड जाऊ शकते.. किंवा तुम्ही वरती उदाहरण दिले त्या प्रमाणे shares खुप खाली पडल्यावर कळेल..

दोन्ही बाजूची उदा देतो..
माझ्या long term portfolio मध्ये (आता १३ shares आहेत )
Itc हा १५१ रुपया पासून मी घेतो आहे.. Fmcg चा हा stock खुप slow आहे, analyis मध्ये त्याच्या वर शून्य कर्ज आणि diverse business यामुळे colgate बरोबर हा share मी माझ्या portfolio मध्ये घेतला आहे..

तरी वर्षे झाले तरी तो share २०० च्या आसपास आहे, अगदी गेल्या आठवड्यात तो पुन्हा २३० वरून २०० वर आला तरी मी तो आणखिन add केला.

याला कारण कंपनी अजूनही debt free आहे, आणि चांगली परफॉर्म करेलच.. आणि diversification मध्ये उलट demerge होऊ शकते.. Demerge होताना पुन्हा याचा अभ्यास करावा लागेल..

जर मी याचा stop loss २०० लावला असता तर मी माझ्याकडे गेल्या वर्षांपासून केलेली गुंतवणूक (avg १७५ rs ) २५ रुपये profit ने विकली असती..
मग असेच करायचे असते तर माझे short term shares महिना दोन महिन्यात इतका profit देत असतील तर मग long term चे उद्दिष्ट वेगळे आहे हे मला माहित पाहिजे..

२. मी pharma चे दोन shares long term साठी निवडले होते, एक auro pharma जो मी ३९५ पासून घेतो आणि आता १००० रुपयाला आहे..
पण त्याच बरोबर abbot india सारखा उत्क्रुष्ट share मला,जास्त महाग असल्याने ना avg करता येत आहे ना त्याची किंमत वाढत आहे, त्यामुळे तो share चुकला असे म्हणुन मी तो share माझ्या portfolio मधून काढून टाकला आणि त्या बदल्यात sbi cards हा share ८०१ रुपयापासुन add केला..

यामध्ये मला हे सारे पाहता येते आहे कारण माझी share संख्या कमी आहे, पर्यायाने त्याला लागनारा अभ्यास मला easy पणे करता येतोय..

मी abbot आणि auro बरोबर आणखिन १-२ कंपनी त्यावेळेस final केल्या होत्या. cipla त्यातील एक.
Abbot ऐवजी मी त्यावेळेस cipla घेतली असती तर मी जास्त बरोबर असतो..

But माणुस चुका मधून आणखिन शिकतच जातो..

चंद्रसूर्यकुमार's picture

13 May 2021 - 12:12 pm | चंद्रसूर्यकुमार

पण जर stop loss लावायचा असल्यास ते long term कसे होईल..

याविषयी माझे मत लिहित आहे. मार्केटमध्ये प्रत्येक माणसाची पध्दत वेगळी असते त्यामुळे कोणी एक माणूस लिहित आहे तेच प्रमाण असेल असे अजिबात नाही. प्रत्येकाने आपल्याला काय भावते/जमते/आवडते त्याप्रमाणे निर्णय घ्यावेत.

लाँग टर्म असल्यास स्टॉपलॉस लावायचा नाही असे मी तरी करत नाही. स्टॉप लॉस न लावता खाली जाणारी गाढवे विकत घेत राहिल्यास मोठा गाढवांचा कळप गोळा होईल पण आपल्याला ज्या कारणासाठी हे सगळे करायचे असते- पैसे कमावणे ते काही साध्य होणार नाही. वर दिलेल्या तीन चार्टवरून ते समजेलच. स्टॉप लॉस लावला आहे की नाही यावरून लाँग टर्म किंवा शॉर्ट टर्म हे न ठरविता आपण नक्की कोणत्या टाईम फ्रेमवर काम करत आहोत यावर लाँग टर्म की शॉर्ट टर्म हे ठरेल असे वाटते. माझ्या मते लाँग टर्म म्हणजे मंथली कँडलवर काम करणारे.

आपण ज्या टाईमफ्रेमवर काम करत आहोत त्या टाईमफ्रेमवर बाहेर पडायचा सिग्नल आला की बाहेर पडायचे. हा सिग्नल कोणता तरी रिव्हर्सल पॅटर्न (हेड अ‍ॅन्ड शोल्डर, डबल टॉप, ईव्हिनिंग स्टार वगैरे) असेल किंवा ट्रेन्डलाईन ब्रेकडाऊन असेल. मी इन्ट्राडे करत असेन तर हे सगळे १५ मिनिटांच्या चार्टवर दिसले तर बाहेर पडेन पण लाँग टर्म करत असेन तर मंथली चार्टवर दिसले तर बाहेर पडेन. म्हणजेच तो स्टॉप लॉस झाला. काही काळासाठी एखादा शेअर खाली आला तर तो कायमच खाली जाईल असे नाही. पण खाली पडणारा शेअर बरोबर ठेवायची पण काही गरज नाही. तो एखादा हायर लो करून परत उलटा फिरेल तिथे त्याला उचलायचा. आणि ते पण चार्टवरून पकडता येते. हे कोणत्याही टाईमफ्रेमला लागू आहे.

अर्थात हा माझा मार्ग झाला. सध्या मी इक्विटीत काही करतच नाहीये. सध्या डॉलर आणि कमोडिटी त्यातही चांदी यात काम चालू आहे.

अमर विश्वास's picture

13 May 2021 - 9:18 am | अमर विश्वास

मुळात स्टॉप लॉस ची व्हॅलिडिटी १ वर्ष असते (जास्तीतजास्त )
तर आपण लॉन्ग टर्म म्हणतो तेंव्हा किमान ३ वर्षे कालावधी गृहीत धरलेला असतो ...

त्यामुळे लॉन्ग टर्म इन्व्हेस्टमेंट ला स्टॉप लॉस हे विरोधाभासी (dichotomy) वाटू शकते

त्यामुळे अशा दीर्घ मुदतीच्या गुंतवणुकीला स्टॉप लॉस लावावा का ? याचे उत्तर तुम्ही पोर्टफोलिओ किती actively review करता त्यावर अवलंबून आहे.

जर Fill it ... shut it ... forget it असा प्रकार असेल तर स्टॉप लॉस उपयोगी आहे.

फक्त स्टॉप लॉस मध्ये selling price कमी ठेवावी. उदाहरणार्थ तुम्ही २०० रुपयाला शेअर खरेदी केला तर १९८ किंवा १९५ लास स्टॉपलॉस न लावता १७५ किंवा १५० ला लावावा .. अर्थात हे एक उदाहरण म्ह्णून दिले आहे ...

थोड्याक्यात दीर्घ मुदतीच्या गुंतवणुकीला स्टॉप लॉस लावताना normal volatility च्या बाहेर स्टॉक क्रॅश झाला तर सेफ्टी म्ह्णून स्टॉप लॉस वापरणे योग्य ..
त्याचबरोबर वारंवार स्टॉप लॉस ट्रिगर झाला तर दीर्घ मुदत साधता येणार नाही .. त्यामुळे तारतम्य / बॅलन्स महत्वाचा

MipaPremiYogesh's picture

13 May 2021 - 3:14 pm | MipaPremiYogesh

धन्यवाद ह्या चर्चे बद्दल , बरीच मते कळली . धन्यवाद

अमर विश्वास's picture

19 May 2021 - 9:54 pm | अमर विश्वास

सर्वांचे प्रतिसादाबद्दल धन्यवाद.

वर लिहिल्या प्रमाणे २५ शेअर्स चा पोर्टफोलिओ बनवला आहे ... बघूया वर्षभरात काय प्रगती होते.

शेअर्स निवडताना Contra investment theory चा ही उपयोग केला आहे.

एक क्वार्टर नंतर (क्वार्टर म्हणजे ३ महिने गैरसमज नसावा) प्रगती काय होते याचा लेखाजोखा देईनच

All the best ... to me

गोंधळी's picture

20 May 2021 - 11:51 am | गोंधळी

रुल बेस्ड स्ट्रेटीजी संबंधी चर्चा.
https://www.youtube.com/watch?v=CZh0ixEgibw

तेजस आठवले's picture

20 May 2021 - 12:13 pm | तेजस आठवले

उत्तम चर्चा चालली आहे, बऱ्याच गोष्टी नव्याने समजल्या.

अमर विश्वास's picture

5 Oct 2021 - 3:32 pm | अमर विश्वास

मित्रहो

या लेखात लिहिल्याप्रमाणे २५ स्क्रिप्ट्स खरेदी केले .. आज चार महिने झाले.

चार महिन्यांचा लेखाजोखा :

- २५ पैकी २४ स्क्रिप्ट्स पॉसिटीव्ह .. एकच निगेटिव्ह रिटर्न्स देत आहे
- चार महिन्यांचे रिटर्न्स बघितले तर (equated yearly नाहीत ... Absolute for four months )

.

Overall returns : 29.33% (in four months)

म्हणजे वर्षाचे नव्वद टक्के झाले कि हो .. जवळजवळ दामदुप्पट
अर्थात हाच ग्रोथ रेट राहणार नाही .. वर्षभरात ५० ते ६०% रिटर्न मिळाला तर ... एकदम हॅपी

happy investing

अमर विश्वास's picture

5 Oct 2021 - 9:13 pm | अमर विश्वास

सध्या घेतलेल्या २५ स्क्रिप्ट्स चे अलोकेशन आहे :

Large cap : 67.63%
Mid cap : 32.37%

इंडस्ट्री अलोकशान :

IT 29.77%
Consumer Staples 19.31%
Materials 16.16%
Health Care .. 14.01%
Communication .. 4.55%
Consumer Discretionary 4.48%
Industrial 4.18%
Energy 4.14%
Financials 3.40%

healthcare is lowest yielding while consumer segments are giving maximum gains

राजेंद्र मेहेंदळे's picture

7 Oct 2021 - 7:16 pm | राजेंद्र मेहेंदळे

मी ही तुनळी वाहिनी बर्‍यापैकी बघत असतो आणि तिकडले काही सल्ले मलातरी चांगले वाटले. शिवाय समजवायची पद्धतही सोपी वाटली.

https://www.youtube.com/channel/UCzt5N2zaewxnKxCkOzEZVLg

या वाहिनीवरील अ‍ॅनालिसिस ऐकुन(आणि थोडाफार अभ्यास करुन) घेतलेले काही शेअर्स असे
ईंडियामार्ट ईंटरमेश
बजाज फायनान्स
ब्लॅक रोझ/दीपक नायट्रेट
प्रिन्स/प्रकाश पाईप्स/अ‍ॅस्ट्राल
डिक्सन(हा आत्ताच १:५ स्प्लिट झाला आहे)/हॅपिएस्ट माईड
आय आर सी टी सी

अमरजी--आपली लिस्ट सांगाल का?

अमर विश्वास's picture

7 Oct 2021 - 10:11 pm | अमर विश्वास

राजेंद्रजी ...

काही महत्वाचे स्क्रिप्ट्स (सेक्टर अनुसार ) जरूर लक्ष ठेवा / खरेदी करा

बँकिंग आणि IT हे तर सदाबहार सेक्टर्स आहेत.

बँकांपैकी ICICI / HDFC हे जायंट्स आहेतच .. पण IDFC वर नक्की लक्ष ठेवा

IT सेक्टर मधले बिग फोर (TCS / Infy / Wipro / HCL) हे तर "संग्रही" (long term) हवेतच पण त्याच बरोबर Mphasis / L&T infotech हे जोरदार रिटर्न्स देणाराच

रिटेल सेक्टर हा अजून एक फास्टेस्ट ग्रोइंग सेक्टर ... त्याच बरोबर consumer products ही कायम डिमांड मध्ये असणार ..
त्यामुळे D Mart, tata consumer products, jubilant foods (आपला dominos pizza हो ), Nestle. Hindustan liver, VBL हे नक्की पोटफोलिओत ऍड करा

बाकी मग नेहेमीचेच यशस्वी :Asian Paints आणि Pidilite Industries (फेविकॉल का मजबूत जोड) असायलाच पाहिजेत

तसेच नोकरी सर्वांनाच हवी असते त्यामुळे naukari.com जोरदार घोडदौड करत आहे

बाकी सध्याच्या परिस्थितीत pharma sector जोर पकडेल असे वाटले होते पण त्यामानाने प्रगती धीमी आहे,

Dr. Reddy's lab, Torrent pharma, Divis lab हे भविष्यात चांगला परतावा देतील असे वाटते

अर्थात हा माझा analysis आहे ... जाणकारांच्या मतांच्या प्रतीक्षेत

राजेंद्र मेहेंदळे's picture

8 Oct 2021 - 10:42 am | राजेंद्र मेहेंदळे

तुम्ही सुचवलेले शेअर्स वॉचलिस्ट मध्ये अ‍ॅड्वले आहेत.

आग्या१९९०'s picture

7 Oct 2021 - 7:25 pm | आग्या१९९०

आय आर सी टी सी कधी घेतला?
बजाज चे सगळे शेअर माझे आवडते. फारसा लिक्वीड नसणारा बजाज स्टील ही घेतला होता. सगळ्यांनी चांगला परतावा दिला.

राजेंद्र मेहेंदळे's picture

7 Oct 2021 - 7:44 pm | राजेंद्र मेहेंदळे

आय पी ओ लागला नाही, नंतर १४०० ला घेतला होता तेव्हा २००० वर अडकला होता. मग विकुन टाकला. आता ३७०० ला पुन्हा एंट्री घेतली आहे.