धारूर, धर्मापुरी आणि अंबेजोगाई - १

Primary tabs

एक_वात्रट's picture
एक_वात्रट in भटकंती
25 Apr 2021 - 9:03 pm

या वर्षी २६ जानेवारी मंगळवारी येत असल्याचं कळताक्षणीच मी २५ जानेवारीची सुट्टी टाकून दिली. मी सुट्टी टाकताच, या चार दिवसांत आपण बार्शीला (तिच्या माहेरी) जात आहोत असं बायकोनं जाहीर करून टाकलं. आता बार्शीला जातोच आहोत तर आजूबाजूचं एखादं ठिकाण पदरात पाडून घ्यावं असा सूज्ञ विचार मी केला आणि इंटरनेट धुंडाळायला लागलो. राज्यात कुठलीही घटना घडली की विरोधी पक्षनेते आपल्याला या घटनेचा फायदा कसा करून घेता येईल याचा शोध घ्यायला लागतात, तसाच मी कुठे जायचं असेल तर आजूबाजूला काय पाहता येईल याचा शोध घ्यायला लागतो. मी ट्रेकक्षितिजची वेबसाईट उघडली आणि माहिती काढू लागलो. बार्शी आहे सोलापूर जिल्ह्यात, पण या जिल्ह्यातले किल्ले काही खास नाहीत आणि बार्शीपासून जवळही नाहीत. बार्शी सोलापूर जिल्ह्यात असलं तरी सोलापूरपेक्षा उस्मानाबादच्या जवळ आहे. मात्र या जिल्ह्यातले दोन किल्ले (परांडा, नळदुर्ग) पाहून झालेले असल्यानं मी बीडकडे मोर्चा वळवला. बीड जिल्ह्यात धारूर आणि धर्मापुरी असे दोन किल्ले आहेत आणि धर्मापुरीत एक अप्रतिम कोरीव शिल्पं असलेलं केदारेश्वर मंदिरही आहे ही माहिती ट्रेकक्षितिजनं दिली. जरा शोध घेतल्यावर अंबेजोगाईजवळ असलेली हिंदू लेणी (शिव लेणी/जोगाई मंडप/हत्तीखाना) देखील पाहण्यासारखी आहेत असं समजलं. तेव्हा बेत असा ठरला -

बार्शी ते किल्ले धारूर ते अंबेजोगाईची शिव लेणी ते किल्ले धर्मापुरी ते केदारेश्वर मंदिर ते बार्शी

एकूण अंतर २८० एक किलोमीटर होत होतं. महाराष्ट्रातल्या रस्त्यांची दिव्य अवस्था आपण जाणतोच, तेव्हा सगळी ठिकाणं पाहून होतील की नाही अशी धाकधूक मनात होती. पण सकाळी लवकर निघू आणि अगदीच उशीर झाला तर एखादं ठिकाण गाळू असं ठरवलं आणि बेत पक्का केला.

पहाटे निघायचे होते, पण निघता निघता साडेसहा झाले. थंडी अशी नव्हती. बार्शीत बनवलेले सगळे सिमेंटचे रस्ते नगरपालिकेने पुन्हा खोदून काढल्यामुळं गाडीत बसल्यावर बैलगाडीत बसल्याचा फील येतो - हा आनंद थोडा वेळ घेऊन आम्ही शहराबाहेर पडलो. सात-आठ किलोमीटर आल्यावर आम्हाला पहिला सुखद धक्का बसला. येरमाळ्य़ाला जाणारा रस्ता नवा बनवला होता आणि तोही चक्क सिमेंटचा. 548C असा विचित्र क्रमांक असलेला हा एक राष्ट्रीय महामार्ग होता. काही ठिकाणी रस्ता एकाच बाजूचा बनला होता आणि काही ठिकाणी पुलांची कामं चालू होती: पण त्यानं काही फारसा फरक पडला नाही. वेगात अंतर कापून आठ-साडेआठच्या आसपास आम्ही कैजला पोहोचलो. नाश्त्यासाठी हॉटेलचा शोध घेत असताना एका गाड्यावर बरीच गर्दी दिसली. इडली, डोसा आणि उडीदवडा असा मेनू होता.उत्तम चव आणि माफक दर - तेव्हा भरपेट नाश्ता झाला. साधारण साडेनऊच्या आसपास आम्ही धारूर किल्ल्याजवळ पोहोचलो.
एका बाजुने भुईकोट आणि दुस-या बाजुने गडकोट अशी वैशिष्ट्यपूर्ण रचना असलेला धारूर भारतात काय, जगात एकमेव किल्ला असावा. आत शिरताना प्रथम दिसतात दोन भलेमोठे बुरूज.

हे पार केले की किल्ल्याचे विशाल, सुंदर महिरप असलेले दगडी प्रवेशद्वार समोर येते.दारातून आत आलो की आत दोन्ही बाजुला बिनभिंतीच्या खोल्या (देवड्या?) आहेत. पुर्वी किल्ल्यात शिरणारा पाहुणा आत आला की इथं दोन घटका विश्रांती घेत असेल.

समोर पाहिले की दिसतात आणखी एक तटबंदी आणि बुरूज.

येण्याआधी मी इंटरनेटवर धारूर किल्ल्याचा शोध घेतला होता, दिसलेले चित्र फारसे उत्साहवर्धक नव्हते. इथे आल्यावर मात्र गडाच्या डागडुजीचे, दुरुस्तीचे काम सुरू असलेले पाहून मनाला जरा बरे वाटले.

आतल्या भिंतीवरून दिसणारे किल्ल्याचे प्रवेशद्वारआम्ही चालत बरेच पुढे गेलो. किल्ल्याची दुसरी बाजू आता दिसू लागली होती.किल्ल्यात पाणी साठवण्यासाठी एक बारव, एक बांधलेले टाके आणि एक बंधारा अशा तीन सोयी आहेत. किल्ल्यावरची बारव मी पाहिलेल्या किल्ल्यांमधली सगळ्यात उंच बारव असावी. पूर्ण भरल्यावर तिच्यात काही लाख लिटर पाणी सहज मावत असेल.


किल्ल्याला ३ तटबंद्या आहेत.
एका दगडी जिन्याने आम्ही वर गेलो.

दुरुस्तीची कामे पूर्ण किल्लाभर चालू होती.

एके ठिकाणी दगडांना आकार देण्याचे काम चालू होते.बांधलेले टाकेदगडी बंधारा

बंधा-याकडे जातानाकिल्ल्याकडे एक शेवटची नजर टाकून आम्ही बाहेर पडलो.
चला, सुरुवात तर छान झाली. आता? अंबेजोगाईची शिवलेणी.

बार्शी-धरूर रस्त्यावर (सिमेंटच्या रस्त्यामुळे) जमिनीपासून एक फूट वर चालणारा आमचा रथ धरूर-आंबेजोगाई रस्त्यावर पुन्हा जमिनीवर आला. रस्ता अतिशय भयंकर नसला तरी त्रासदायक नक्कीच होता. वाटेत लागणा-या अडस गावात एक जुनी गढी असल्याची माहिती मी इंटरनेटवर वाचली होती. ही गढी शोधण्याच्या नादात १०/१५ मिनिटे गेली. एकतर आपल्या गावात गढी नावाचा काही प्रकार आहे हेच मुळात अनेक गावक-यांना माहीत नव्हते. त्यात गावातले रस्ते अरुंद. शेवटी विचारत विचारत बरंच आत गेल्यावर एका सद्गृहस्थांनी मातीच्या उंच, जाडजूड पण आता ढासळलेल्या भिंतिंकडं बोट दाखवलं आणि आमचा धीर सुटला. गढीचा नाद सोडून आम्ही मुकाट अंबेजोगाईच्या रस्त्याला लागलो आणि अर्ध्याएक तासात गावाबाहेर एका नदीच्या काठावर असलेल्या शिवलेण्यांमध्ये पोहोचलो.

अंबेजोगाईची शिव लेणी लेणी हत्तीखाना, जोगाई मंडप ह्या नावांनीही ओळखली जातात. बहुतेक लेणी ही उभ्या दगडात खोदलेली असतात, पण ही लेणी मात्र जमिनीवर आडव्या पसरलेल्या एका भल्यामोठ्या दगडांत खोदलेली आहेत. दगडातच खोदलेल्या पाय-या उतरून आम्ही आत शिरलो. लेणी पाहताक्षणीच पुण्याच्या पांडवलेण्यांची आठवण आली - दोघांची रचना अगदी एकसारखी आहे. दोघांचे शिल्पकार एकच तर नसतील?आत शिरलो मात्र, आम्हाला मोठाच धक्का बसला. एखाद्या कचरापेटीत नसेल एवढा कचरा आत पसरलेला होता. कागद, प्लॅस्टिकच्या पिशव्या, पिण्याच्या पाण्याच्या बाटल्या, वेफर्सची रिकामी पाकिटं, चॉकलेटसची वेष्टनं, काय नव्हतं तिथं? कचरा परवडला, पण त्याहून भयानक प्रकार म्हणजे इथल्या तळीरामांनी या ठिकाणाला चक्क दारूचा अड्डा बनवून टाकलेलं दिसत होतं. जागोजागी फुटलेल्या बाटल्या आणि काचांचे तुकडे पडलेले दिसत होते. परिस्थिती एवढी वाईट होती की आत चालताना खाली पाहून, अक्षरश: जपून चालावं लागत होतं.

आत उतरायला दगडी जिना, त्यासमोर गोलाकार छत असलेले नंदीचं देऊळ, आणि समोर चौकोनी खांब असलेले चौकोनी आकाराचंच मुख्य मंदिर अशी या लेण्यांची रचना आहे.

पण या लेण्यांचे सौदर्य वाढवले आहे चार कोप-यात असलेल्या चार हत्तींनी. ह्या हत्तींची आज पडझड झाली असली तरी त्यांचं सौदर्य मात्र तसूभरही कमी झालेलं नाही. ऐन भरात असताना या लेण्यांचा थाट कसा असेल हा विचार मनात आला की अंगावर काटा आल्याशिवाय रहात नाही.

आतल्या छोट्या गुहांच्या दरवाज्यावर काही मूर्त्या दिसतात, पण प्रयत्न करूनही त्या कुणाच्या हे काही आम्ही ओळखू शकलो नाही.
गर्भगृहं मात्र पूर्णपणे रिकामी आहेत, तिथं आत्ता एकही मूर्ती नाही.

अर्धा एक तास लेण्यांमधे घालवून उदास मनानं आम्ही बाहेर पडलो. जर फ्रान्स, इंग्लंड या देशात असती तर ही लेणी आज अख्ख्या जगात लोकप्रिय असती, भारतात ती त्यांच्या जिल्ह्यापलीकडे कुणाला माहिती नसतील! एका नविन मंदिरासाठी २००० कोटी रुपये जमवणा-या या देशातल्या लोकांना त्याच देशातल्या हजार वर्षे जुन्या लेण्यांची आजची दयनीय स्थिती पाहून किंचितही दु:ख होत नाही हीच त्याची सगळ्यात मोठी शोकांतिका आहे.

असो. साडेबारा होत होते. अगदी आमच्या अंदाजाप्रमाणे, वेळेनुसार आमची सहल चालली होती. मी गाडी वळवली, गुगल मॅप्समध्ये “धर्मापुरी किल्ला” हे ठिकाण टाकलं आणि निघालो.

प्रतिक्रिया

गोरगावलेकर's picture

25 Apr 2021 - 10:59 pm | गोरगावलेकर

भरपूर फोटो आणि वर्णन यामुळे तुमच्यासोबतच भटकंती करत आहोत असे वाटले.

फारएन्ड's picture

26 Apr 2021 - 4:15 am | फारएन्ड

छान माहिती व फोटो

त्या हत्ती व लेण्यांच्या उंचीचा अंदाज फोटोत येत नाही, कारण फ्रेम मधे संदर्भाला दुसरे काही नाही. किती उंचीचे आहेत ते हत्ती व देवळातील आतील कोरीव काम?

एक_वात्रट's picture

2 May 2021 - 7:03 pm | एक_वात्रट

हत्ती ख-या हत्तीच्या आकाराचे वाटत होते, साधारण १२ फूट उंच असावेत. चौकोनी खांब असलेल्या आतल्या मंडपाची उंची (पाया ते छत) हे अंतरही साधारण एवढेच असावे.

कंजूस's picture

26 Apr 2021 - 7:22 am | कंजूस

भरपूर फोटोंमुळे ठिकाण समोरच दिसू लागलं.
एवढी २८० किमीची फेरी केलीत ती उपयोगी ठरली.

सपाटीवर, मैदानी भागावर लढाई करायची तर भरपूर सैन्य आवश्यक असते. त्यामुळे पहिल्याच लढाईत ते किल्ले कुणाच्या ताब्यात गेले ते कायमचेच झाले. पुढे ब्रिटिश आल्यावर तोफांमुळे भक्कम तटबंदी वगैरे या गोष्टींना फारसा अर्थ उरला नाही. दुरूनच दोन चार तोफगोळे किल्ल्यांत डागले की संपले.

लेणी पाताळेश्वरसारखीच दिसत आहेत. हत्ती भारी.

Bhakti's picture

26 Apr 2021 - 8:53 am | Bhakti

छान
फोटो व माहिती चांगली आहे .
कृष्ण धवल फोटो मस्त आहे.
दोन तासांवरच अंबाजोगाई खुप दिवसांपासुन पाहायचं आहे.वाखू साठवते.

प्रचेतस's picture

26 Apr 2021 - 10:40 am | प्रचेतस

फोटो आणि वर्णन आवडले.

धारूर राष्ट्रकूटकालीन दुर्ग, बहमनी, आदिलशाही काळात इथं इस्लामिक शैलीची बांधकामं झाली. खंदकासहित मजबूत कोट दिसतोय एकदम.
अंबेजोगाईच्या लेण्यादेखील राष्ट्रकूटकालीनच. हत्ती हे राष्ट्रकूटांच्या सामर्थ्याचे प्रतिक. वेरुळच्या कैलासलेणीप्रमाणेच येथे हत्ती आहेत. पुण्यातील पाताळेश्वर आणि वेरुळच्या दशावतार लेणीतील सभामंडपाचे येथील सभामंडपाशी कमालीचे साम्य आहे. द्वारांवरील शिल्पे शैव द्वारपालांची आहेत. जी वेरुळला रामेश्वर लेणीत दिसतात.

पुढचा भाग लवकर येऊ द्यात.

चौकटराजा's picture

26 Apr 2021 - 11:48 am | चौकटराजा

वेरूळचे कैलास लेणे सोडले तर महाराष्ष्ट्रात एवढे मोठे हत्तीच्या मूर्ती येथेच असतील !

सौंदाळा's picture

26 Apr 2021 - 5:19 pm | सौंदाळा

उत्कृष्ट लेख आणि फोटो
धारूरचा किल्ला खुपच आवडला

कंजूस's picture

26 Apr 2021 - 6:44 pm | कंजूस

360 डिग्री फोटो किंवा पनोरमा फोटो टाकता येतो का?

एक_वात्रट's picture

2 May 2021 - 7:04 pm | एक_वात्रट

मी 360 डिग्री फोटो किंवा पॅनोरमा काढला नाही.

पद्मश्री चित्रे's picture

26 Apr 2021 - 9:09 pm | पद्मश्री चित्रे

छान माहिती आणि फोटो. अम्बेजोगाईला गेले कि नक्की जाईन.

चौथा कोनाडा's picture

28 Apr 2021 - 5:18 pm | चौथा कोनाडा

सुंदर वर्णन आणि अप्रतिम फोटो !
गडाच्या डागडुजीचे, दुरुस्तीचे काम सुरू असलेले पाहून खुप छान वाटले.
किल्ले धारूर ते शिव लेणी दोन्ही भारी आहेत !
हत्तीचे कोरीव शिल्प अप्रतिम आहे !

वात्रट साहेब, पुढील भागाच्या प्रतिक्षेत !

सिरुसेरि's picture

28 Apr 2021 - 5:19 pm | सिरुसेरि

छान माहिती व फोटो

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

28 Apr 2021 - 5:35 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

भटकंती आवडली. आद्यकवी मुकुंदराज यांच्या स्थळास भेट ?

-दिलीप बिरुटे

एक_वात्रट's picture

2 May 2021 - 7:05 pm | एक_वात्रट

हे नाव मी पहिल्यांदाच ऐकतो आहे. अधिक माहिती मिळाल्यास बरे होईल.

रंगीला रतन's picture

28 Apr 2021 - 6:27 pm | रंगीला रतन

मस्त!
फोटो आणि वर्णन आवडले

अनन्त्_यात्री's picture

30 Apr 2021 - 3:10 pm | अनन्त्_यात्री

दोन्ही उत्कृष्ट.

जगप्रवासी's picture

1 May 2021 - 11:16 pm | जगप्रवासी

हत्तींवरच नक्षीकाम सुंदर आहे, धावत्या वर्णनामुळे सोबत चालल्याचा फील आला. पुलेशु

एक_वात्रट's picture

2 May 2021 - 7:06 pm | एक_वात्रट

प्रतिसाद देणा-या सगळ्यांना धन्यवाद. दुसरा भाग आता टाकला आहे.

टिल्लू's picture

21 May 2021 - 8:02 am | टिल्लू

अरे व्वा तुम्ही तर आमच्या गावाला येउन गेला. धारुरचा किल्ला तसा दुर्लक्षित. मागिल ५-७ वर्षा पासुन डगडुजी चालु आहे. किल्ल्याच्या बाजूने तसेच खाली ३/४ किमी डोंगरात उतरले कि, अंबाचंडी देवीचे एक छोटे मंदिर लागते. मंदिर परिसर निसर्गरम्य आहे.