ट्राईब्स ऑफ युरोपा : नेटफ्लिक्स

Primary tabs

साहना's picture
साहना in जनातलं, मनातलं
24 Feb 2021 - 3:12 pm

गेम ऑफ थ्रोन्स, वॉकिंग डेड इत्यादींच्या अभूतपूर्व यशानंतर अनेकांनी ह्या प्रकारचा मसाला टाकून विविध सिरीस निर्माण केल्या. १०० काय, बेडलँड्स काय, एक्सपांस अनेक ठराविक साच्यातील साय फाय किंवा फँटसी सिरीयल ची चलती आहे.

एक वेगळे विश्व् निर्माण करायचे म्हणजे २३०० तील पृथ्वी किंवा दुसरा ग्रह वगैरे. मग त्यांत विविध टोळ्या, राजघराणी वगैरे असतात. ह्यांचात दुश्मनी असते. प्रत्येक टोळीचा जो प्रमुख नेता असतो तो मग काही तरी अवघड निर्णय घेतो, सत्तेसाठी षडयंत्रे, अनेक बरी वाईट पात्रें, भरपूर हिंसा आणि त्याला विनाकारण लावलेला शृंगाराचा तडका. भाऊ बंदकी, मालक गुलाम, मांडलिक, पिता पुत्र ह्यांच्यातील भांडण ह्यावर गोफ धरून एक कथा विणली जाते.

हा फॉर्मुला सध्या विविध चॅनेल आणि प्लॅटफॉर्म वर किमान २० वेळा तरी वापरला गेलाय असे वाटते. आपण सास बहू पाहणाऱ्या लोकांवर हसतो पण ह्या सिरीज सुद्धा निव्वळ हास्यास्पद प्रकारचे मनोरंजन आहे असे वाटू लागते.

ट्राईब्स ऑफ युरोपा ह्याच प्रकारची सिरीज आहे. युरोप खंड संकटांत आहे. भविष्यांतील कथा आहे. जर्मन, फ्रेंच इत्यादी मंडळी आता विविध ट्राईब्स मध्ये विभागली गेली आहे आणि संपूर्ण युरोप खंडावर राज्य करण्याचे ह्यांचे मनसुबे आहेत. क्रो (कावळे), ओरिगिनीज (आधुनिक तंत्रज्ञान न वापरणारे), क्रिम्सन (एक आर्मी), आणखीन अनेक टोळ्या मग सत्ते साठी किंवा निव्वळ जगण्यासाठी भांडत आहेत. ह्यांत अटलांटिस नावाची एक टोळी आहे ती मात्र पूर्णपणे वेगळी आहे. त्यांच्याकडे अत्यंत अत्याधुनिक तंत्रज्ञान असून हि मंडळी बहुतेक करून गायब असतात.

एकूणच इथे कथा सांगितली तर तुम्हाला विशेष काही फरक पडणार नाही कारण कथेंत वेगळे असे काहीच नाही. पण त्याच वेळी भरपूर ऍक्शन, ड्रॅमा वगैरे असल्याने कंटाळा सुद्धा येणार नाही.

माझ्यामते खूपच भिकार दर्जाची विज्ञान कथा आहे. विस्मय चकित करणे हा विज्ञान कथेचा पाया असतो. अश्या कथांत श्रोते बहुतेक वेळा आपले तर्कट बाजूला ठेवायला तयार असतात त्यामुळे कल्पनाशक्तीला ताण देता येतो. पण नेहमीच पृथ्वी संकटांत असून काही टोळ्या भांडत आहेत आणि कुणाकडे तरी एक खास तंत्रज्ञान आहे. श्रोत्यांना मुद्दामहून ह्या तंत्रज्ञाना पासून अंधारात ठेवले जाते आणि उलगडा शेवटी होतो. ह्या कथेंत मध्यभागी आहे ती एक घटना जी म्हणे २०२९ मध्ये घडली. अचानक जगांतील सर्व तंत्रज्ञान बंद पडले. फोन्स, विमाने, उपग्रह आणि सर्व काही. आता तंत्रज्ञान बंद पडले म्हणून एकूणच समाज का कोसळला ह्याचे उत्तर दिले जात नाही. तेंव्हा तंत्रज्ञान बंद पडले तर आता वाहने, बंदुका, वीज कशी चालते ह्याचेही उत्तर नाही.

ट्राईब्स ऑफ यूरोपा मध्ये अनेक पद्धतीने रोमांच आणता गेला असता. युरोप मधील शिल्पे, महाल, राजघराणी, तत्वज्ञान, ह्यांचे भाग कथानकांत घातले गेले असते तर मजा आली असती. पण त्यांनी अमेरिकन walking dead प्रमाणे टोळ्या दाखवल्या आहेत ज्या बंदूक घेऊन एकमेकांना विनाकारण मारत आहेत. ह्यांच्या गाड्यांसाठी पेट्रोल कुठून येते हे एक आश्चर्य आहे. आणि शहरांत राहण्याऐवजी सर्व लोक जंगलांत वगैरे का राहतात हा सुद्धा एक प्रश्न आहे.

तंत्रज्ञान बंद पडले तर विनाकारण माणूस जंगली का होतील हे एक कोडे आहे आणि लेखकाने ह्यावर काहीही स्पष्टीकरण दिले नाही हे खटकते. अनेक तंत्रज्ञान आमच्या साठी आवश्यक असले तरी फोन आणि टीव्ही बंद पडला म्हणून आम्ही एकमेकांचा जीव घेऊ असे वाटत नाही.

Tribes of Europa

कलासमीक्षा

प्रतिक्रिया

कपिलमुनी's picture

24 Feb 2021 - 3:36 pm | कपिलमुनी

लेख अर्धाच वाटत आहे. योग्य समारोप नाही