गावाच्या गोष्टी ५ : फणसाचे गरे

Primary tabs

साहना's picture
साहना in काथ्याकूट
17 Feb 2021 - 12:09 am
गाभा: 

गावाच्या गोष्टी ५ : फणसाचे गरे

फणस ह्या फळाची तऱ्हाच न्यारी. हे फळ गणपतीच्या पोटा प्रमाणे भयंकर मोठे. बाहेरून पाहायला अतिशय काटेरी नि रुक्ष. पण हे काटे टोचत नाहीत आणि फणस कापला असता आंत बाळकृष्णाच्या तोंडप्रमाणे एक विश्वच जणू दिसते. आंबा फळांचा राजा इंद्र असला तर फणस हा इंद्राचे पद हस्तगत करण्यासाठी पाताळांतून प्लॅनिंग करणारा कुणी महा पराक्रमी दैत्य. आंबा सचिन असला तर फणस राहुल द्रविड. आंबा असेल सुंदर कविता तर फणस हा निबंध. फणसाचा वास मला विशेष पसंद नाही. सिंगापुर मध्ये डुरियन हे फळ मिळते जे फणसा प्रमाणेच असते. पण ह्या फळावर सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेंत आणणे किंवा हॉटेल मध्ये आणणे ह्यावर बंदी आहे कारण ह्याचा भयंकर वास. डुरियन च्या वासाला सिंगापुर चे लोक किंवा गोरे लोक बरेच घाबरत असेल पण माझ्या मते ह्याचा वास खोबरेल तेल आणि आपला कोंकणातील फणस ह्यांचे मिश्रण आहे. खोबरेल तेल आणि फणस ह्यांचा संबंध आहे. कसे ते पुढे वाचा पण त्या आधी थोडा इतिहास.

फणसाला हिंदीत कठहल म्हणतात तर मल्याळी भाषेंत चक्का. भारताशिवाय इंडोनेशिया, थायलंड इत्यादी प्रदेशांत भरपूर वापरला जातो आणि दक्षिण अमेरिकेत सुद्धा खूप वापरला जातो. फणसाला इंग्रजीत जॅकफ्रुट म्हणतात पण त्यांतील जॅक हा शब्द आपल्या चक्का ह्या शब्दावरून आला आहे. कोंकणीत सुद्धा चाको हा शब्द आहे. हा शब्द कोवळ्या फणसा साठी वापरला जातो. फणस पूर्वेंत भारतातून गेला नाही (किमान आधुनिक काळांत) त्यामुळे फळ तेच असले तरी चव, आकार इत्यादी गोष्टींत हे फळ इंडोनेशिया सारखया देशांत खूप वेगळे आहे.

फणसाचा एक भाऊ आहे निरफणस[१]. ह्याला आमच्या घरांत मानाचे स्थान. निरफणसाचे झाड खरेच निर्लज्ज. हे कुठेही तग धरते. पणजीत एका मोठ्या रस्त्याच्या बाजूला एकही झाड नसताना हे झाड मात्र उभे आहे आणि भयंकर फळे देते. पण गावांत मात्र शेकडो झाडे असली तरी काहीच लोकांच्या दारातील झाड फळे देते. मग ह्या माणसाला गावांत असाधारण महत्व. माझ्या आजीच्या मते निरफणसाचे पापड सुद्धा बनवले जायचे पण मी फक्त एकदाच खाल्ले आहेत. झाड मोठे झाले म्हणून फळ देईलच असे नाही आणि नाही दिले म्हणून कधीच देणार नाही असेही नाही त्यामुळे झाड मारण्यास सुद्धा भीती वाटते. गावांत श्रद्धा होती कि हिथे भूमिगत जल आहे तिथेच ह्या झाडाला फळे होतात. खरे खोटे देव जाणे.

निरफणस ला इंग्रजीत ब्रेडफ्रुट म्हणतात. कारण कदाचित असे असावे कि कापले तर आतील भाग थोडा ब्रेड प्रमाणे वाटतो. फणसा सारखे ह्याला 'गरे' नसतात, हे फळ भरीव (सॉलिड) असते. ह्याची असंख्य व्यंजने सर्व जगांत बनवली जातात. आंग्लप्रदेशांत हे फळ सध्या सुपरफूड म्हणून ओळखले जाते. ह्या फळाचा इतिहास सुद्धा नक्की ठाऊक नाही. हे फळ आधीपासून हवाई बेटांवर उपलब्ध होते पण हवाई त्याला बाहेर जाऊ देत नाही. इतिहासांत किमान एकदा ह्या फळाच्या स्मगलिंग ला घेऊन भले मोठे युद्ध झाले आहे (हवाई प्रदेशांत). वाचकांनी निरफणस खाल्ला नसेल तर मुद्दाम ह्याची भाजी किंवा "फोडी" तळून खाव्यात. योग्य सुगरणीच्या हातांत ह्याला दुसरी सर नाही.

फणस सर्वानीच खाल्ला आहे. फणसाचे दोन प्रकार असतात. रसाळ आणि कापा किंवा कोंकणीत ह्याला "बरकय" म्हटले जाते. गांवांत काही लोक ह्याला पुरुष आणि स्त्री असा लिंगभेद सुद्धा मानायचे. त्याशिवाय प्रत्येक फणस १००% ह्या दोन्ही गटांत निर्विवाद पाणे मोडतो असेही नाही. रसाळ फणस जितका रसाळ तितकाच ओला, चीक असलेला आणि भयंकर गोड असतो. कापा फणस ह्याच्या उलट हा थोडा घट्ट, चीक कमी पण गोड पणा सुद्धा कमी. कधी कधी कुणाच्या घरांतील कापा फणस अत्यंत गोड निर्माण व्हायचा मग ह्याला भयंकर मागणी असायची.

मला मात्र कापा कधीही आवडला नाही. माझ्यासाठी रसाळ फणस अत्यंत प्रिय. त्यांत सुद्धा सर्वांत ओला असणारा आमच्या घरांतील रसाळ फणस विशेष प्रिय. हा इतका गॉड असायचा की ह्याच्या गोडपणाने जिभेला मीरमिरी यायची. आणि काही तास जास्त बाहेर हवेंत ठेवला तर ह्यातील साखरेची अल्कोहोल बनून चव बिघडण्याची. मग आम्ही झाडावरून फणस आणला कि आधी जमिनीवर काही वर्तमानपत्रे वगैरे टाकून त्याला ठेवायचो, बाहेरून साफ करायचो. जेवण वगैरे झाल्यानंतर काही तासांनी शानू आपल्या धारधार कोयत्याने त्याला एका विशिष्ट पद्धतीने कापायचा. आजी मग आपली खोबरेल तेलाची डबी घेऊन यायची. मग त्यांत आम्ही मुले आधी हात बुडवायचो आणि जसे नरसिंहाने हिरण्यकश्यपूच्या पोटांत हात घालून त्याची आतडी बाहेर काढली तसे "गरे" काढायचो. आईसाहेबानी कितीही ओरड केली तरी गरे प्लेट वगैरेंत घेऊन खाणे म्हणजे त्यांचा अपमान आहे अशी माझी ठाम समजूत होती. त्यामुळे गरे थेट तोंडात. मग त्यातील कोय एक दिवस गळ्यांत अडकून मी मरेन अशी शाप वजा भीती आजी व्यक्त करायची. कोय आम्ही बाहेर फेकून द्यायचो. उष्टी असल्याने त्याची भाजी करायला आजी नकार देत. हाताला खोबरे का ? तर फणसाला खूप चीक असतो. खाताना लागत नाही पण खाऊन झाल्यांनतर तो चीक हातावरून काढता काढता भयंकर त्रास व्हायचे. फणसाचा मध्यभाग म्हणजे जी "माव" असायायची ती दिसायला रामानंद सागराच्या सिरीयल मधील राक्षसाच्या हातातील मेस (गदे ) प्रमाणे असायायची. हिला खूपच चीक असायचा.

फणस आमच्या पोटापेक्षा मोठे असायचे पण आम्ही हा हा म्हणता २-३ फणस आम्हा ४-५ मुलांत सहज फस्त करायचो. फणस खाल्यानंतर पाणी प्यायचे नसते त्यामुळे पोटदुखी वाढते. महिलांना विशेष त्रास होऊ शकतो आणि गरोदर स्त्रियांना फणस अजिबात खाऊ दिला जात नसे.

फणस खाल्ल्यानंतर त्यातील धागे, त्याचा मध्यवर्ती भाग "माव' आणि कात हि फेकून न देता बाहेर सूर्यप्रकाशात सुखावली जाते. नंतर आगीत थोडी भाजून हि गुरांना दिली जाते. न सुखावत दिली तर गुरांना त्रास होतो असे लोक म्हणत पण मी कधी पहिले नाही. फणसाच्या गऱ्यांना कधी कधी बाहेर जे धागे असतात ते पूर्णपणे बेचव असतात. ते कधी कधी घशांत अडकू शकतात म्हणून खाताना आपण थोडी सावधानी दाखवणे आवश्यक आहे.

जेंव्हा अन्नाचा तुटवडा असेल तेंव्हा फणस हे फळ एक वरदान प्रमाणे असेल. कारण झाड मोठे पण एकदा वाढल्यानंतर विशेष कष्ट लागत नाहीत. पानाची पत्रावळी केल्या जातात, लाकूड हे अत्यंत उच्च दर्जाचे आणि टिकावू मानले जाते. फणस हे फळ लहान असताना त्याची भाजी केली जाते. थोडा मोठा झाल्यावर सुद्धा तेलांत तळून "गरे" म्हणून एक चविष्ट पदार्थ निर्माण होतो तो कुठल्याही चिप्स पेक्षा श्रेष्ठ पण बनविण्यास सोपा. पिकल्यानंतर खाल्ला जाऊ शकतो. पण ह्याचा रस सुखवून त्याची jerky सुद्धा बनवली जाते. आणि माणसाने वापरल्यानंतर जे काही बाकी आहे ते आपण गुरांना देऊ शकतो. फणसाचे एक चांगले झाड उन्हाळ्यांत १०-२० फणस सुद्धा देऊ शकते. आमचे एक झाड वर्षाला साधारण ७० फणस देत असे. फणस इतके व्हायचे कि आपण खाऊन, सर्वानाफुकट न्या म्हणून सांगून सुद्धा शेकडो फणस बागेंत शेवटी जमिनीवर पडून कुजायचे. मग त्याच्या वासाने माशा यायच्या. त्यामुळे चांगले फणसाचे झाड घरी असणे हे थोडक्यांत लॉटरी प्रमाणे असायायचे. आमच्या इथे आता काही डॉलर मध्ये फणसाचे गरे कॅन मध्ये येतात. ह्यांत साधारण १० गरे असतात. ते खाताना हसू येते. फणसाची व्यंजने मला विशेष ठाऊक नाहीत. पण एक पसंद आहे ते म्हणजे "ढोणास". फणसाप्रमाणेच दिसायला वाईट पण चवींत उत्तम असा हा पदार्थ. हा बेकिंग क्षेत्रांत मोडतो.[२]

आंबा, काजू नारळ इत्यादी फळे चोरणे हा गांवातील रिकामटेकड्या पोरांचा प्रमुख धंदा त्याशिवाय बायका मंडळी ह्या चोरींत तरबेज. पण फणसाला चोरायला कुणीच जात नसे कारण एकट्याने पिशवींत टाकून न्यावा अशी हो गोष्ट नव्हती. त्याशिवाय प्रत्येक फणसाची विशेषतः कापा फणसाची चव हि वेगळी त्यामुळे खाताना हा फणस दामू भटजींच्या बागेतील आहे कि कोसतानीच्या बागेतील आहे हे बहुतेक लोक सांगू शकत.

पण नाही म्हणायला एका ठराविक बागेतून फणसाची चोरी होत असे. गावाच्या वेशीवर पांडुरंग ह्यांची बाग होती. ह्याच्या बागेंत ६ बरकय होत्या ज्याला डझन वारी फणस लागायचे आणि भयंकर गोड. ज्या काळी साधारण फणस ७०-८० रुपये देऊन लोक नेत असत तिथे ह्याच्या फणसाला ३०० रुपयांचा दर होता. आणि दैव पहा, ह्याच्या फणसाची बी पासून दुसरे झाड होत नसे त्यामुळे कलमे करणे हा एकमेव उपाय होता पण हा कुणालाही कलमे करायला देत नसे. शेतकी विभागातल्या अधिकाऱ्यांनी सुद्धा ह्याला कलमे करून विकण्याचा सल्ला दिला होता आणि ह्या फणसाच्या जातीला त्याचे नाव देऊ असे सुद्धा सांगितले होते पण हा माणूस बधला नाही. तर ह्याच्या फणसावर चक्क दरोडा पडायचा. लोक रिक्षा घेऊन येऊन रातोरात सर्व फणस चोरायचे. मग ह्याने रखवालदार सुद्धा ठेवला. पण रखवालदारच रात्री एकदा दुसरा फणस चोरायचा मग हा दररोज फणस मोजून ठेवायचा. मग कुणीतरी ह्याला युक्ती दिली. दर वर्षी ग्रामदेवतेच्या देवळांत लिलाव व्हायचा. ज्या गोष्टी सार्वजनिक संपत्ती आहेत उदाहरणार्थ काही देवालयाच्या बागी, गावांतील नापीक जमीन, नदी, ओहोळ, समुद्रकिनारा (मासे पकडण्यासाठी) इत्यादी, त्यांचा लिलाव करून लोकांना देत असत. पण तुम्हाला तुमच्या खाजगी मालमत्तेचा सुद्धा लिलाव करायचा असेल तर मुभा होती. ह्या लिलावांत जात पात धर्म वगैरे काहीही न पहिला जाता लिलाव केला जाते असे. काही जमिनी अत्यंत नापीक होत्या त्या कवडीमोलात २० वर्षांच्या लीज वर दिल्या जात. आंब्याची झाडे वगैरे वार्षिक लिलावांत. काही गोष्टींचा लिलाव पैश्यांची न होता सेवेने होत असे म्हणजे अमुक सार्वजनिक मालमत्तेची डागडुजी करायची आणि त्या बदल्यांत अमुक एक शेत २ वर्षांसाठी ठेवायचे. ह्याने मग फणसाच्या झाडाचा लिलाव केला. अट फक्त एक, कलमे करायची नाहीत. मग एका गरीब तरुणाने जबाबदारी घेतली. ह्याने खत वगैरे आणून झाडांची उत्कृष्ट काळजी घेतली. रात्रभग जागून पहारा दिला आणि ह्याच्या साईडला पांडुरंगाच्या मधल्या मुलीशी सूत जुळवले. मग फणस राखता राखता पोरगी गायब झाली. सुदैवाने ह्या प्रेमकथेचा शेवट सुंदर झाला आणि लिलाव न करता सर्व फणस पोराला फुकट मिळू लागले.

[१] https://www.smithsonianmag.com/travel/captain-blighs-cursed-breadfruit-4...
[२] https://www.archanaskitchen.com/ripe-jackfruit-cake-pansache-dhonas

प्रतिक्रिया

तुषार काळभोर's picture

17 Feb 2021 - 6:42 am | तुषार काळभोर

आमच्या घरात फणस प्रचंड आवडते. पण बहुतेक गरे (हातगाडीवर काचेच्या पेटीत विकणाऱ्या कडून) विकत आणले जातात. एक दोन नातेवाईकांकडे झाडे आहेत. वर्षातून एखादं फळ येतं. पण ते कापून खाणे हा एक मोठा प्रोजेक्ट असतो.
बिया गावी असताना चुलीत टाकून आणि इथे तव्यावर भाजून खाणे हा पण एक आवडता प्रकार.

एक बडबडगीत आठवते.
भटो भटो..
कुठे गेला होता?
कोकणात.
कोकणातून काय आणले?
फणस.
फणसात काय?
गरे.
गऱ्यात काय?
अठिळा.
तुम्ही खा गरे, आम्ही खातो गरे.
म्हशीला काय, चारखंड.

साहना's picture

17 Feb 2021 - 6:40 am | साहना

छान ! हे मी कसे विसरले !

गवि's picture

17 Feb 2021 - 7:41 am | गवि

हा हा हा.

शिवाय,

गरे घ्या गरे पोटाला बरे.
न खाईल त्याची म्हातारी मरे..

अशी धमकी आहेच की.

फणसाची सर्व रुपे अत्यंत आवडतात. उकडून आठळ्या हा सर्वोच्च प्रकार. आजीने घरीच तळलेले गरे हा दुसरा.

सर्व भाग निवडून विशिष्ट भागांची केलेली भाजी म्हणजे शॉर्टकट स्वैपाकात न बसणारा भाग. पण अति उत्कृष्ट भाजी.

घरातही बागेत सर्वात आधी आणून कापा फणस लावलाय. वाढतोय.

सुबोध खरे's picture

17 Feb 2021 - 8:38 pm | सुबोध खरे

गरे घ्या गरे पोटाला बरे.
न खाईल त्याची म्हातारी मरे..

हे पूर्ण गाणे असे आहे

गरे घ्या गरे पोटाला बरे.
न खाईल त्याची म्हातारी मरे..
मेली तर मेली कटकट गेली
उद्या मरायची ती आजच गेली
गोफ विणू बाई गोफ विणू

असे चार मुली गोफ विणल्यासारख्या नाचत मंगळागौरीला गाणे म्हणतात.

सौंदाळा's picture

17 Feb 2021 - 9:30 am | सौंदाळा

झक्कास लेख
थोडं माझं पण फणसपुराण
कुवऱ्याची (भाजीचा फणस) भाजी मला खूप आवडते. कुवऱ्या आता बाजारात यायला लागल्यात. कच्च्या फणसाच्या गऱ्यांची भाजी म्हणजे तर डेलिकसी. गरे कापून खोबरेल तेल, मीठ, तिखट आणि वरून ओले खोबरे बास. नुसती भाजी पण मस्त लागते मात्र फणस भाजीसाठी कधी कापायचा हे ठरवणे स्किल आहे. गरे तयार पाहिजेत पण पिकलेले नाही तर पांढरे (अर्धे कच्चे) पाहिजेत. अनसाफणसाची भाजी (कच्चं अननस आणि फणस) तर पूर्वी मार्च ते मे दरम्यानच्या लग्न, मुंज वगैरे समारंभात असायची असे आजोबा सांगायचे. एकदा घरी केली होती, खूप आवडली नाही.
निरफणसाची तळलेली काप म्हणजे तर स्वर्ग. फणसाचे खोबरेल तेलात तळलेले गरे पण सुंदर लागतात चवीला. फणसपोळी मात्र तितकी मजा देत नाही.
गऱ्यातल्या बिया (आठला) उकडून खायला किंवा डाळीच्या आमटीत घातल्या तरी मस्तच लागतात. कोकणातील काही लोक आठला आणि सुकी कोळंबी (सोडे) याची भाजी करतात ती कधी खाल्ली नाही.
फणसाचे भरपूर गरे खाऊन त्यावर पानाचा विडा खाल्ला की जबरदस्त फूड पोयझनिंग होते असे आजी म्हणायची.
फणसाची अजून एक मज्जा म्हणजे तुम्ही काप्याचे किंवा बरक्याचे बी लावले तरी काप्यातून कापा किंवा बरक्यातून बरका फणसच येईल हे नक्की नसते. हे म्हणजे बाळांतपणासारखं असतं, मुलगा होणार का मुलगी? त्यामुळे काप्याला बरके फणस सुद्धा येऊ शकतात (आणि बरक्याला कापे) मात्र एका झाडाला एकाच प्रकारचे फणस येतात.

मुक्त विहारि's picture

17 Feb 2021 - 10:07 am | मुक्त विहारि

हमखास वाढतो ...

एकरी, 1000 ते 1500 वृक्ष लागवड सहज होऊ शकते.

अतिशय काटक, त्यामुळे कमी पाण्यात टिकाव धरू शकते.

लाकूड उत्तम .... खैरा नंतर, सर्वोत्तम लाकूड म्हणजे फणसाचे...

10-12 वर्षांनी लाकूड तयार होते... आजचा भाव, एक घनफूट, साधारण पणे, 100-125, एक झाड किमान 1000/- रूपये देते...

मी गेली 2 वर्षे फणसाची रोपे करत आहे ...कलम नाही ... गावठी ...एक रोप बनवायला एक रूपये खर्च येतो, बाजारात, एका बरका रोपाची किंमत 10/- रूपये आहे. कापा असेल तर 50/- ते 200/-

पडीक जमीन असेल आणि पाऊस कमी असेल आणि 20 वर्षे थांबायची तयारी असेल तर, फणसाची लागवड उत्तम...

फणसाचे झाड, कोकणात, मालकाशिवाय कुणीच तोडत नाही.खैर आणि साग, रातोरात गायब होतात.

फणस नंतर, पाणी धरून ठेवते.

त्यामुळे, 5 वर्षे झाली की, हळद, आले, मिरी, इत्यादी आंतरपिके घेऊ शकता....

साहना's picture

17 Feb 2021 - 10:47 am | साहना

१००० रुपये प्रती झाड कमी वाटले. म्हणजे एक फणसाचे झाड १० घनफूटच लाकूड देऊ शकते का ?

मुक्त विहारि's picture

17 Feb 2021 - 12:00 pm | मुक्त विहारि

मोजणी करतांना लाटतात....

बाप्पू's picture

17 Feb 2021 - 11:04 am | बाप्पू

छान आठवणी..

फणस म्हणजे जीव कि प्राण. माझे वडील कोकणात मध्ये सर्विस ला होते.. उन्हाळयात दर आठवड्याला फणस आणि पोते भरून आंबे आणायचे.
मला फणसाच्या दोनच जाती माहिती आहेत. कापा आणि शेम्बडा
कापा म्हणजे कडक गरे.. आणि शेम्बडा म्हणजे मऊ.

शेम्बडा फणसात गरे भरपूर.. खायला गोड. पण तोंडात ठेवला कि चावायची गरज नाही.. एखाद्या लिबलिबीत, मुळमुळीत आणि चिकट पदार्थासारखा तोंडात वळवळ करणार आणि डायरेक्ट घशात जाणार.. मला सोडता घरी कोणालाच तसा फणस आवडत नसे. मग आई असल्या फणसाची फणसपोळी करायची.

आंबे देखील असेच. कोणत्याही जातींचे. सामान्यतः लोकांना हापूस पायरी केशर इ मोजक्याच जाती माहिती आहेत. पण माझे वडील न जाणो कोणत्या कोणत्या जातींचे आंबे आणायचे. काही दिसायला एकदम लहान तर काही भले मोठे.. काही एकदम केशरी तर काही हिरवेगार.. एकदा पूर्ण लाल रंगाचा आंबा आणला होता.. प्रत्येक जातींचे नाव वडील आम्हाला सांगायचे पण आम्ही आंबा खाण्यात मग्न त्यामुळे कोणतेच नाव लक्षात नाही.
कदाचित मी लहानपणी 70-80 प्रकारचे आंबे नक्कीच खाल्ले असतील. आता त्या सर्व जातिची जाडे शिल्लक देखील आहेत कि नाही काय माहिती.

मिपावर कोणी वेगवेगळ्या प्रकारच्या आंब्याच्या जाती संवर्धन करत असेल तर सांगा. मला त्यांच्याकडून रोपे घ्यायला ( विकत ) आवडेल.

मुक्त विहारि's picture

17 Feb 2021 - 1:46 pm | मुक्त विहारि

माहिती काढतो ....

कलमी रोपे हवी असतील तर, दापोली कृषी विद्यापीठात मिळतील.

बाप्पू's picture

17 Feb 2021 - 2:11 pm | बाप्पू

धन्यवाद मूवी.

यावरून आठवले. तुमच्याशी डिस्कस केल्यांनतर मी माझ्या गावी पडीक पडलेल्या जागी 20 केशर जातीच्या आंब्याची झाडे लावली होती.. ती आता चांगली वाढू लागलेत.. यावर्षी तुरळक झाडांना मोहोर आला होता. झाडांची वाढ होण्यासाठी तो तोडून टाकलाय. फक्त एका झाडावर थोडासा शिल्लक ठेवलाय.. पाहण्यासाठी कि नेमकं फळ कसे येतंय. केशर च आहे कि दुसरे काही.

आता गावी घराच्या मागे भरपूर मोकळी जागा आहेत तिथे परसबाग करण्याचा इरादा आहे. त्यामुळे नेहमीच्या जातीच्या झाडासोबत काही दुर्मिळ जातीची झाडे लावायचा प्रयत्न करणार आहे. शक्यतो मोठी (2-3 वर्ष्याची ) झाडे शोधणार आहे.

बाप्पू's picture

17 Feb 2021 - 2:21 pm | बाप्पू

यावरून आठवले. तुमच्याशी डिस्कस केल्यांनतर मी माझ्या गावी पडीक पडलेल्या जागी 20 केशर जातीच्या आंब्याची झाडे लावली होती.. ती आता चांगली वाढू लागलेत..

झाडांची वाढ सुरवातीच्या काही दिवसात अत्यंत स्लो होती. कित्येक झाडे लवकर फुटलीच नाहीत. 4-5 महिन्यानंतर वाढ व्हयला सुरवात झाली आणि आता जोरात वाढतायेत.

अजूनपर्यंत कोणतेही कीटक नाशक किंवा रासायनिक खत वापरले नाही.
घरीच बनवलेले जीवामृत आणि गांढूळ खत देतोय. मध्यंतरी मिलीबग झाडावर सापडू लागले होते. कडुलिंबाचा पाला (पाण्यात उकळून ) आणि तेल (विकत आणावे लागले ) यांचे मिश्रण फवारले. त्यांने फरक पडला.
आजतागायत तरी मेंटेनन्स कोस्ट जवळपास शून्य आहे.

पुढचे माहित नाही.. पहिलाच प्रयत्न आहे.

मुक्त विहारि's picture

17 Feb 2021 - 6:29 pm | मुक्त विहारि

https://www.google.com/search?client=ms-android-xiaomi-rev1&q=Koparkar+n...

=============

भोसले नर्सरी, चिपळूण बस स्टैंड जवळ, काणे लाॅजच्या बाजूला,चिंचनाका... हमखास चांगली रोपे मिळतील... मी प्रयोग म्हणून काही घेतली आहेत ... उत्तम वाढत आहेत ...

========

पुणे जवळ पडत असेल तर, महात्मा फुले कृषी विद्यापीठात मिळतील...

=========

आंबा लागवड चांगली झाली असेल तर, खालील गोष्टी लावा.

1. स्टीव्हिया, घरच्या पुरती साखरेची गरज भागते.
2. मिरी रोपे, वेली नका लावू. वेली लावल्या तर, मजूर खर्च वाढेल. हजार रूपये खर्च केलात तर, 3 वर्षांनी, दर वर्षी 2-3 किलो मिरे मिळत राहतील.
3. ज्या अर्थी आंबा लागवड आली आहे, त्या अर्थी, दालचीनी आणि जायफळ येऊ शकते... प्रयोग म्हणून 2-2 रोपे लावा ... साधारण पणे, 500/- रूपये खर्च येईल...

वरील सगळ्या रोपांना, सुरूवातीला थोडी सावली आणि थोडे ऊन लागते...आंबा, फणस, बांबू, जमिनीतील पाण्याचा साठा वाढवत नेतात.

जायफळाला खूप भाव मिळत नाही....ठोक भाव, रुपयाला एक, पण, घरीदारी वाटू शकता..कुणाला 50-100 रुपये देण्यापेक्षा, 10-12 जायफळे भेट म्हणून देऊ शकता...घेणारा खूष होतो...

खूप मोठ्या प्रमाणात, जायफळाची शेती, कंत्राट केल्या शिवाय, परवडणार नाही...

आंतरपिके घेतलीत तर, कीटकांचा प्रादुर्भाव कमी होतो ...

मुरबाडला, तांदूळ आणि तुर एकत्र लावतात. तांदूळावरचे कीटक, तुरीवर जातात.... तांदूळ वाचतो....ही प्रथा कोकणात नाही ....

साहना's picture

17 Feb 2021 - 11:52 pm | साहना

माझी एकूण सहा झाडे आहेत. इतक्क्या उच्च दर्जाचे जायफळ मी आजपर्यंत पहिले नाही. नखाएव्हडे टाकले तरी वास घमघमीत येतो. त्यामुळे एकूण १२ मी अमेरिकेला आणली आणि मागील ५ वर्षांत फक्त ३ वापरली आहेत कारण खूपच स्ट्रॉंग आहेत. मी अतिशोयोक्ती करत नाही. बाजारातून आणलेल्या जायफळापेक्षा किमान १/५थ च टाके लटरी पुरेसे होते.

आमच्या जायफळाचे झाड भरपूर पिक देते साधारण २०० जायफळ प्रति झाड होतात पण काम खूप आहे. दररोर्ज जाऊन पडलेली जायफळे उचलायची मग त्यांना उंन्हात सुकवयाचे. नाहीतर चुलीच्या बाजूला ठेवणे वगैरे पण हा प्रकार स्केलेबल नाही. त्यामुळे १०० झाडे लावून आपण पीक घेऊ शकणार नाही, हौस म्हणून चांगले आहे धंदा म्हणून विशेष वाटले नाही. आमच्या ओळखीचे रत्नागिरीतील एक गृहस्थ होते ज्यांनी सुमारे २५ झाडे लावली होती. पीक चांगले होते पण सुकवायची कशी हा प्रश्न पडला आणि त्यांनी एक ओव्हन निर्माण केला. पण शेवटपर्यंत तो चालला नाही. एकतर वास खराब होत असे नाहीतर जायफळें. उन्हात सुद्धा सुकवताना जास्त कडक उन्ह नको वास कमी होतो.

गोव्यांत बागायतदार संस्था साधारण ६०० रुपये प्रतिकिलो भाव देते. (बाहेरील आवरण शिवाय). १ रुपये प्रति फळ पेक्षा हे नक्कीच जास्त असावे असे वाटते.

तेंव्हा, व्यापारी भाव पाडून मागतात...

काही वेळा, एक रूपया, हा देखील चांगला दर असू शकतो....

बाजारपेठ नसेल तर, जायफळे पडून राहिलेली मी बघीतलेली आहेत ...

म्हणून तर, जायफळांची, 1-2 झाडे, लावलेली परवडतात....

तसाच प्रकार, दालचीनीचा आहे ...

पण, हेच जर तुम्ही, एखाद्या कंपनी बरोबर कंत्राट करून घेतले तर, फायदा होऊ शकतो...

मुक्त विहारि's picture

17 Feb 2021 - 6:41 pm | मुक्त विहारि

नैसर्गिक हवी ...

तुमचे प्रयोग नक्की यशस्वी होतील ....

बाप्पू's picture

17 Feb 2021 - 11:13 pm | बाप्पू

माहितीबद्दल धन्यवाद मुवि.

मुख्य म्हणजे पाऊस अगदी येणार तेव्हाच पिकतात. आणि प्रत्येक झाडाचा फणस वेगळा असतो. भाजीचा फणस देणारे झाड वेगळे. कापा, बरका यांचेही वेगळे. तर फळे न लागणाऱ्याचे लाकूड उत्तम. शिवाय तुम्ही म्हणता तसे मालक लोक कलमं करवून प्रतिस्पर्धी निर्माण करण्याचे टाळतात.

कुणाचे {दुसऱ्याचे} झाड आणि फणस चांगले आहेत हे बोलण्याचे टाळा.

ज्ञानोबाचे पैजार's picture

17 Feb 2021 - 12:15 pm | ज्ञानोबाचे पैजार

फणस पुराण आवडले

अख्खा फणस कधी विकत घेतला नाही, सोलून काचेच्या पेटीत ठेवलेले गरे मात्र भरपुर खातो.

पैजारबुवा,

Bhakti's picture

17 Feb 2021 - 3:38 pm | Bhakti

मस्त लेख!
फणस माहितीचा सुंदर धागा झालाय.
मी आतापर्यंत एकदाच आख्ख फणस घरी आणलय.. तेव्हा दोन सुरी तुटल्या होत्या..तेव्हा गूगल वा यू ट्युब नव्हतं मदतीला..How to cut jackfruit?
;)

मुक्त विहारि's picture

17 Feb 2021 - 6:00 pm | मुक्त विहारि

मला सुरूवातीला एक फणस कापतांना, चार तास लागायचे...

आता एका तासांत, एक फणस सहज सोलता येतो.

Bhakti's picture

17 Feb 2021 - 9:34 pm | Bhakti

नाही ना..
परत फणस आणलच नाही.आयते गरे बरे :)

मुक्त विहारि's picture

17 Feb 2021 - 9:51 pm | मुक्त विहारि

खालील वस्तू घ्या....

1. थोडे तेल,

2, एक मोठा सुरा

3, एक छोटा चाकू

कृती

1, हाताला आणि चाकू आणि सुरा, यांना तेल लावून घ्या.

2, फणसाचे उभे आणि आडवे, असे आठ भाग करा.

3. मधल्या भागाला, ज्याला "पाव" असे म्हणतात, त्याला सगळे गरे चिकटलेले असतात, तो पाव कापा, सगळे गरे सुटे होतात, जिथे चिकटलेले असतील तिथे, चाकूने मोकळे करत जा

If I can do it, then anybody can do it.

चौथा कोनाडा's picture

17 Feb 2021 - 5:32 pm | चौथा कोनाडा

फणस आख्यान आवडले.
गोष्टीतल्या गरीब तरुणाने बा़जी मारली म्हणायची !

प्राची अश्विनी's picture

19 Feb 2021 - 6:17 pm | प्राची अश्विनी

आवडलं पुराण. जुन्या आठवणी जाग्या झाल्या.
आमच्याकडे "रसाळ गरे गिळूक बरे, कापे गरे हगाक बरे" असं म्हणत ते आठवले.

सोत्रि's picture

21 Feb 2021 - 5:15 am | सोत्रि

बरका फणसाच्या गऱ्यासारखाच मस्त लेख!

-(फणसासारखा) सोकाजी