प्रवास (गूढ कथा) : भाग १

ज्योति अळवणी's picture
ज्योति अळवणी in जनातलं, मनातलं
1 Jan 2021 - 10:15 pm

प्रवास
भाग १

आनंद : यार आटपा आता. उशीर होतोय आपल्याला. थर्टीफस्टला जोडून शनिवार-रविवार आल्याने जमू शकलं इथे माझ्या या वाड्यावर येणं. साल्यांनो, तुम्हाला लॉक डाऊनमुळे work from home आहे; पण मला जावं लागणार आहे शूटला.... आणि अकरा नंतर कर्फ्यु आहे. Not more than four are allowed to travel together. उगाच कुठे थांबवलं तर लफडा होईल.

गाडीच्या दिशेने येत मंदारने आपली सॅक गाडीत टाकली आणि तो आनंदजवळ जाऊन उभा राहिला.

मंदार : अन्या तू कायमच रडया आहेस. लोणावळा ते मुंबई असं कितीसं अंतर आहे रे? जेम-तेम दोन तासात पोहोचू आपण. उगाच उशीर होतोय हे कारण नको देऊस. तुझा हा भूतिया वाडा तुला लवकर सोडायचा आहे... असं म्हण हवं तर.

आनंद : मँडी किती वेळा सांगू तुला असलं काही बोलू नकोस म्हणून.

मंदार : अरे यार.... भूतीयाला भूतिया नाही म्हणणार तर काय माणसांनी भरलेला वाडा म्हणणार का?

आनंद : मँडी आता गपतो का तू की देऊ एक ठेऊन?

मंदार : हिम्मत असेल तर हात लावून दाखव.

मंदार आणि आनंदमध्ये जुंपयला लागली. त्यांचा वाढता आवाज ऐकून अनघा धावत बाहेर आली.

अनघा : झाली का तुमची सुरवात परत?

आनंद : त्याला बोल काय ते. सुरुवात त्याने केली आहे.

अनघा : मँडी, खरंच गप बस् रे आता. इथे आल्यापासून तू भूत भूत बडबडून सगळ्यांचा मूड खराब केला आहेस. आपण सगळे इथे करोना मागे सोडून नवीन वर्षाच्या स्वागतासाठी आलो न? अलीकडे सगळेच नोकऱ्यांमध्ये अडकलो आहोत. कधीतरी दोन-चार महिन्यात जेमतेम एखादं डिनर जमत होतं सगळ्यांना. त्यात या लॉक डाऊनने वाट लावली. गेल्या कित्येक महिन्यात आपली भेट नाही. त्यात अजूनही परिस्थिती फार सुधारलेली नाही आणि मुंबईत काहीच करणं शक्य नव्हतं; म्हणून इथे आलो. येताना पण एकएकटे पोहोचलो. पण शेवटी सगळ्यांनी वेळ काढलाच. जवळ जवळ दीड वर्षाने एकत्र आलोय आपण सगळे. ते काय तुमचं भांडण ऐकायला? का भूत भूत खेळायला?

मंदार : माफ करा अनघाबाई. तुम्ही समोर असताना श्रीयुत आनंद यांना कोणी काही म्हणेल का?

मंदारचं हे वाक्य ऐकून अनघाने क्षणभर आनंदकडे बघितलं आणि काही एक न बोलता परत घराकडे वळली. आनंदला तिचा चेहेरा दिसला नव्हता.

आनंद : गपतो का तू? की देऊ एक.........

ती गेल्याची खात्री करत आनंद म्हणाला. ती गेल्याची खात्री करत मंदार म्हणाला...

मंदार : साल्या तिला तू आवडतोस हे तुला पण माहीत आहे. पण मग तिला विचारत का नाहीस? आता तर तुझी ही दुसरी सिरीयल येते आहे न? जाहिराती पण करायला लागला आहेस तू. म्हणजे चांगली कमाई आहे. इतकी गोड मुलगी कधीपासून तुझ्या मागे आहे आणि तू साल्या भाव खातोस?

आनंद : अरे यार! माझ्या मनात देखील होतं रे. पण या लॉक डाऊनने वाट लावली आहे. पहिली सिरीयल लवकर गुंडाळली गेली. ही नवीन मिळाली आहे ती हॉरर सिरीयल आहे. त्यातसुद्धा मी भूत आहे. म्हणजे मला कधीही संपवू शकतात ते. बाकी जाहिराती मिळण्याची खात्री नाहीच. त्यामुळे थोडं थांबायचं ठरवलंय मी.

नवीन वाड्याच्या मागून अचानक उगवला आणि मंदार-आनंदच्या संभाषणाचा भाग होत म्हणाला...

नवीन : अन्या, तुला कधीपासून पैशाचा विचार करायची वेळ आली रे भाड्या? हे अभिनय वगैरे चोचले तुलाच परवडू शकतात. आमची इच्छा असूनही आम्हाला खर्डेघाशीच करावी लागणार आहे.

अचानक येऊन आनंदवर बरसणाऱ्या नविनकडे आश्चर्यचकित नजरेने मंदार बघायला लागला.

मंदार : तुला अभिनयात रस आहे? म्हणजे करियर म्हणून निवडायचं होतं तुला हे क्षेत्र?

नवीन : मँडी, अन्यापेक्षा जास्त चांगलं काम मी करायचो नाटकात हे तुला माहीत नाही का? कायम लीड रोल मला मिळाला आहे. अनघा माझी हिरोईन असायची नेहेमी. त्याचवेळी तिला विचारावं अशी माझी इच्छा देखील होती..... पण जाऊ दे तो विषय!

खरी आयुष्यातली लीड सिच्युएशन आनंदलाच मिळाली आहे. साल्याकडे पैसा भरपूर.... बाप पण गेला सगळं याच्या नावावर करून.... इतक्या प्रेमळ काकू; पण याच्या बापानंतर अचानक गेल्या. हा इथला वाडा, मागे ही एवढी मोठी शेती. शेतीचं उत्पन्न जबरदस्त असतं न रे अन्या? त्यात मलबार हिलवर दोन फ्लॅट. दोन्ही फ्लॅट भाड्यावर देऊन हा साला गोरेगावात भाड्यावर राहातोय. महिना तीन-चार लाख कमावतोय हा बसून. त्यात कोणतं ना कोणतं शूटचं काम मिळतंच की. अरे, आम्ही दोघांनी एकत्रच स्ट्रगलला सुरवात केली होती. स्क्रीन टेस्टमध्ये माझं कौतुक व्हायचं आणि काम याला मिळायचं. आपण कॉलेजमध्ये होतो तोपर्यंत ठीक होतं. नंतर आमच्या पिताश्रींनी फतवा काढला; घरात राहायचं असेल तर कमवून आणायला सुरवात करा; नाहीतर चालते व्हा. चालते कुठे होणार? याच्या मलबारच्या फ्लॅटवर? म्हणून मग गपचूप नोकरी शोधून कामाला लागलो.

मंदार : आयला... नवीन अन्यासमोर पहिल्यांदाच स्वतःहून कबूल केलंस नं तुला अनघामध्ये इंटरेस्ट आहे ते?

असं म्हणून मंदार मोठ्याने हसायला लागला. मंदारच्या त्या एका वाक्याने सगळं वातावरणच बदलून गेलं. आनंद आणि नविनने एकमेकांकडे निरखून बघितलं. नवीन दोघांकडे पाठ फिरवून वाड्याच्या दिशेने गेला आणि आनंद गाडीत जाऊन बसला. ते दोघेही निघून गेले आहेत हे मंदारच्या लक्षात आलं नाही. तो आपल्याच नादात खदखदून हसत उभा होता... आणि अचानक मंदारला मागच्या झाडीमधून कोणतीतरी ओढून घेतलं. मंदार ओढला गेला हे कोणाच्याच लक्षात आलं नाही. कारण नेमकं कोणीच नव्हतं तिथे. ड्रायव्हर सीटवर जाऊन बसलेल्या आनंदने एकदा हॉर्न वाजवला आणि तो जोरात ओरडून म्हणाला...

आनंद : अरे चला रे. नऊ वाजत आले. तुम्हाला सगळ्यांना सोडून मग मी घरी पोहोचणार. उद्या पाहाटेचं शेड्युल आहे माझं शूटचं.

आनंदचा आवाज ऐकून मनाली धावत बाहेर आली. तिच्या हातात तिची सॅक होती. गाडीचं मागचं दार उघडून हातातली सॅक आत टाकत ती म्हणाली...

मनाली : अन्या, काय बोललास रे नविनला? तो मागच्या दारात जाऊन बसला आहे तोंड पाडून. यार तुम्ही लोक ना त्याला फार बुली करता. तो पण मूर्ख अजूनही अनघाच्या बाबतीत आशा लावून बसला आहे. अभिनयात चांगलं करियर केलं असतं त्याने. पण तिच्यासाठी म्हणून नोकरीला लागला. मात्र सगळ्यांना सांगत फिरतो की बाबांनी सांगितलं म्हणून नोकरी पत्करली. आता जबरदस्त पगार कमावतो आहे. पण तरीही अनघा त्याला भाव देत नाही. परवा थर्टीफस्टला त्याने तिला प्रपोज पण केलं. पण ती काहीएक न बोलता निघून गेली. मी सगळं बघत होते लांबून.

मनालीचं बोलणं ऐकून आनंदला धक्काच बसला. गर्रकन मागे वळून मनालीकडे बघत त्याने विचारलं..

आनंद : नवीनने अनघाला प्रपोज केलं परवा? आणि तू हे मला आत्ता बोलते आहेस?

क्षणभर आनंदकडे निरखून बघत मनाली म्हणाली...

मनाली : तुला नव्हतं माहीत? मला वाटलं सगळ्यांना माहीत आहे.

तिचं बोलणं ऐकून आनंदने नकारार्थी मान हलवली. तो काहीतरी बोलणार होता पण मनाली स्वतःच्याच तंद्रीमध्ये होती.

मनाली : खरं सांगू? मला विचारलं असतं न नविनने तर मी लगेच हो म्हंटलं असतं त्याला. इतका हँडसम... कंपनीमध्ये उत्तम पोस्टवर... दणदणीत पगार... आणि मनाने इतका हळुवार!!!

तिचं बोलणं ऐकून आनंदचे डोळे मोठे झाले. तिच्या डोळ्यांसोमोर चुटकी वाजवत तो म्हणाला...

आनंद : मनु मॅडम ये क्या नया ट्विस्ट हें स्टोरी में? तुला नवीन...???

आनंदच्या बोलण्याने मनाली भानावर आली आणि कावरी-बावरी झाली. ती काही बोलणार तेवढ्यात नवीन हातात स्वतःची सॅक घेऊन आला आणि ती त्याने गाडीत टाकली. त्याला येताना बघून आनंद गाडीतून खाली उतरला आणि गाडीजवळ आलेल्या नविनच्या पाठीत त्याने गुद्दा घातला.

आनंद : साल्या... तू परवा रात्री अनघाला प्रपोज केलंस?

आनंदचं वाक्य ऐकून नवीनने चमकून मनालीकडे बघितलं. तिची नजर खाली झुकली होती. एकदा मनालीकडे बघून काहीसा विचित्र हसत आनंद म्हणाला...

आनंद : तिला का खुन्नस देतोयस? चुकून बोलून गेली ती. भाड्या तू मात्र छुपा रुस्तुम निघालास हा... डायरेक्ट प्रपोज??? साला....

आनंद अजूनही काहीतरी बोलला असता पण अनघाने त्याला वाड्यातून हाक मारली आणि तो वळून वाड्याच्या दिशेने गेला. तो जाताच नविनने एकदा परत मनालीकडे बघितलं आणि तो देखील वाड्याच्या दिशेने वळला. त्याचा हात धरत मनाली म्हणाली...

मनाली : सॉरी नवीन. चुकून निघून गेलं तोंडून. खरंच मला सांगायचं नव्हतं रे.

नविनने तिचा हात झिडकरला आणि वाड्याकडे जायचा विचार बदलून तो गेटकडे गेला. मनाली त्याच्या मागे जायला लागली. पण गाडीच्या उघड्या दारातून तिची सॅक खाली पडली. ती उचलायला ती वाकली. नवीन पुढे चालत गेला. मनाली सॅक घेऊन उभी राहिली आणि मागच्या झाडीतून एका हाताने तिला ओढून घेतलं. मनाली ओढली गेली आणि नुकतीच उचललेली तिची सॅक परत खाली पडली.

त्याचवेळी अनघा गाडीच्या दिशेने येत होती. ती गाडीकडे आली आणि मनालीच्या सॅकला पाय लागून धडपडली. स्वतःची सॅक गाडीत टाकत तिने मनालीची सॅक देखील उचलली आणि गाडीत टाकली. तिने वाड्याकडे वळून आनंदला हाक मारली...

अनघा : आनंद.... ए आनंद... ये की. मघा तूच घाई करत होतास आणि आता आत जाऊन बसला आहेस.

अस म्हणून ती स्वतःशीच खुदकन हसली. आनंद आतूनच ओरडला....

आनंद : येतो ग. तू हा फोडलेला फ्लॉवरपॉट आवरतो आणि येतो. तुम्ही सगळे बसा गाडीत.

अनघाने जीभ चावली आणि परत एकदा खुदकन हसत ती मागे वळली आणि एकदम दचकली. तिच्या मागेच नवीन उभा होता. तिच्याकडे क्षणभर बघून नवीन वाड्याच्या दिशेने चालायला लागला. अनघाने न राहून नविनला हाक मारली..

अनघा : नवीन!!!

नवीन : खरंच फ्लॉवरपॉट पडला का अनघा?

नविनने वळून विचित्र तिरकस आवाजात तिला विचारलं. त्याचा प्रश्न ऐकून अनघाचा चेहेरा स्थितप्रज्ञ झाला आणि तिने त्याच्याकडे पाठ केली. खांदे उडवून नवीन परत वाड्याच्या दिशेने चालायला लागला. नवीन निघून गेला आहे हे अनघाच्या लक्षात आलं नाही. ती अजूनही नवीन गेला त्या दिशेने पाठ करून उभी होती. तिला काय वाटलं कुणास ठाऊक; पण अचानक ती बोलायला लागली...

अनघा : नवीन... तुला मी परवाच सांगितलं आहे. मला तुझ्यात मुळीच इंटरेस्ट नाही. तुला पटतच नाही की माझं आनंदवर प्रेम आहे.... जसं तुझं माझ्यावर आहे. आनंदच्या पैशांकडे बघून जर मी त्याचा विचार करत असते तर त्याचे आई-वडील असतानाच मी त्याच्याकडे जाणं वाढवलं असतं आणि काकूंच्या माध्यमातून आनंदला भरीस पाडलं असतं. तुला माहीतच आहे काकूंना मी कायमच आवडत होते. पण आनंदने माझ्यावर स्वतःहून प्रेम करावं अशी माझी इच्छा होती. उगाच काहीतरी करून त्याला मिळवायचं नव्हतं मला. जाऊ दे! तुला का सांगते आहे हे सगळं मी? तू काही समजून घेणार आहेस का?

अनघा बोलता बोलता मागे वळली आणि तिच्या लक्षात आलं ती एकटीच आहे. एकटं आहे हे लक्षात आल्यावर तिचं लक्ष आजूबाजूच्या किर्रर्र झाडाझुडपांकडे गेलं आणि ती एकदम कावरी-बावरी झाली. गाडीचं उघडं दार झपाट्याने लावत ती वाड्यात जायला वळली आणि अचानक जवळच्या झाडीमध्ये ओढली गेली.

थोड्या वेळाने आनंद बाहेर आला. त्याच्या हातात त्याची सॅक होती. गाडीकडे येत त्याने डिक्की उघडली आणि स्वतःची सॅक आत टाकून तो ड्राइवर सीटवर येऊन बसला. त्याने रेअरव्यू अरशामधून मागे बघितलं तर अनघा, मनाली आणि मंदार गाडीत अगोदरच बसले होते. त्यांना बघून आनंदने रेअरव्यू आरसा नीट केला आणि खिडकीतून डोकं बाहेर काढत मोठ्याने ओरडला...

आनंद : नवीन चल रे लवकर. मुंबई गठेपर्यंतच अकरा वाजून जाणार आहेत. तुम्हाला सोडून मला घरी पोहोचायला किती वाजतील कोण जाणे.

आनंदचा आवाज चांगलाच घुमला आसमंतात. त्याचा आवाज ऐकून नवीन वाड्यातून बाहेर आला. तो अगदी सावकाश चालत होता. तो येऊन आनंदच्या शेजारी बसला. त्याने त्याचे दोन्ही हात स्वतःच्या मांडीवर ठेवले होते. एकदा त्याच्याकडे बघत आनंदने गाडी चालू केली आणि गेटमधून बाहेर काढत मार्गाला लावली.

आनंद शांतपणे गाडी चालवत होता. अधून मधून रेअरव्यू अरशातून तो मागे बसलेल्या अनघा, मनाली आणि मंदारकडे बघत होता. पण अगदीच निघताना झालेल्या विचित्र चर्चेमुळे कोणीच कोणाशी बोलत नव्हतं. अनघा आणि मंदार खिडकी बाहेर बघत होते. मनालीने डोळे मिटून मान मागे टाकली होती. बहुतेक तिला झोप लागली होती. नवीन देखील शांतपणे बाहेर रस्त्याकडे बघत होता. सगळेच शांत बसलेले बघून आनंदला अस्वस्थ वाटायला लागलं. नविनकडे बघत तो म्हणाला...

आनंद : गाणी लावू का रे? अजून आपण मेन रोडला लागलो नाही आहोत त्यामुळे रहदारी अजिबातच नाही. फारच शांत वाटतंय.

आनंदाचं बोलणं ऐकून नविनने फक्त एकदा त्याच्याकडे बघितलं आणि परत बाहेर बघायला लागला. आनंदच्या लक्षात आलं की नवीन फारच अपसेट आहे. म्हणून मग त्याने स्वतःच गाणी लावली. अजून झाडी संपली नसल्याने रेडियोतून देखील धड गाणी ऐकूच येत नव्हती. अधून मधून नुसती खरखर होत होती. पण तेवढ्यात समोर शेवटचं वळण आलं आणि आनंदने नेहेमीच्या सवयीने जोरदार स्पीडमध्ये सफाईदारपणे ते वळण घेतलं. पण त्याचा अंदाज पूर्ण चुकला होता. समोरून मोठी लॉरी येत होती. त्या लॉरीवर आनंदची गाडी जाऊन आदळली.... मोठ्ठा आवाज झाला आणि सगळं संपलं....

*****

रात्री उशिरा इंस्पेक्टर राठी आणि त्यांची टीम अपघात झालेल्या जागेवर पोहोचले. गाडी रस्त्याच्या बाजूला एका खड्ड्यात पडली होती. लॉरी मात्र कुठेच दिसत नव्हती. इंस्पेक्टर राठींचा वाँकीटॉकी वाजला आणि त्यांनी तो ऑन केला...

इंस्पेक्टर राठी : होय साहेब. बातमी खरी आहे. जबरदस्त अपघात आहे. गाडीची पूर्ण वाट लागली आहे. काय साहेब? काय? नाही....... नाही....... साहेब!!! इथेच गाडीसमोर उभा आहे मी. फक्त ड्रायव्हिंग सीटवर एका मुलाची बॉडी आहे. बाकी कोणी नाही आत.!!!

क्रमशः

कथा

प्रतिक्रिया

कानडाऊ योगेशु's picture

2 Jan 2021 - 12:08 am | कानडाऊ योगेशु

पात्रे बरीच आहेत आणि त्यांच्यात क्रॉस कनेक्शन्स. त्यामुळे वाचताना गोंधळल्यासारखे झाले.
आनंद व्यतिरिक्त बाकीची जी पात्रे आहेत त्यांना कोणी मारले?

तुषार काळभोर's picture

2 Jan 2021 - 10:09 pm | तुषार काळभोर

तीन तरुण
दोन तरुणी
पहिला मुलगा एका मुलीवर प्रेम करतो. ती त्याच्यावर प्रेम करते.
दुसरा मुलगा पण तिच्या वर प्रेम करतो. ती त्याच्यावर प्रेम करत नाही.
दुसरी मुलगी त्या दुसऱ्या मुलावर प्रेम करते.

हे आणि नावे लक्षात येईपर्यंत कथा संपली पण.
बाकी कथावस्तू रोचक आहे. कुणी मारले आणि त्यांना जसे मारले तसे झाडीत ओढून आनंदला का नाही मारले, हे वाचायला उत्सुक.

विजुभाऊ's picture

3 Jan 2021 - 3:37 pm | विजुभाऊ

हेच लिहीणार होतो

ज्योति अळवणी's picture

2 Jan 2021 - 12:20 pm | ज्योति अळवणी

पुढील भागांमध्ये एक एक गूढ उकलणार आहे. क्रमशः लिहिण्याचं राहून गेलं

सौंदाळा's picture

2 Jan 2021 - 12:30 pm | सौंदाळा

तरीच, कथा मस्तच रंगत होती पण शेवट वाचून कथा अपूर्ण वाटली किंवा गूढ काय असेल ते वाचकांवर सोडल्यासारखं वाटलं.
संपादक मंडळ कृपया शीर्षकात भाग १ आणि शेवटी क्रमशः असा बदल करू शकेल का?
पुढच्या भागाची वाट बघत आहे.