भावातीत अवस्था - कोडींग करताना

वगिश's picture
वगिश in जनातलं, मनातलं
29 Nov 2020 - 9:17 pm

सध्या मिपावर बरेच धागे विदेहत्व आणि भावातीत अवस्था यांची चर्चा करत आहे. लेख लिहायचे प्रयोजन म्हणजे आम्हालाही भावातीत अवस्था गाठण्याचे ज्ञान प्राप्त झाले आहे .परंतु ते बोटात बोटे घालून बसण्याइतके सोपे नाही किंवा कुठल्याही नशेत तंद्री लागण्याइतका सरळ हि नाही .
हि अवस्था गाठण्यासाठी १०-१५ वर्षांची तापशर्या आहे . संगणक विज्ञान आणि अणुविद्युत तंत्रज्ञान शिकण्यासाठी अतीव मेहनत घेतली आहे .अनेक गुरु व ग्रंथ यांचे आमच्या तपात मोलाचे योगदान आहे.

हि अवस्था गाठण्यासाठी आम्हला कुठल्याही एकांताची वा विशिष्ट जागेची गरज नाही, गरज आहे ती फक्त एका ट्रिगर ( प्रेरणा ?) ची. हा ट्रिगर आम्हाला अनेक रूपाने मिळतो. कधी तो उत्तम चालत असलेल्या संगणक आज्ञावलीतील एखादा दोष असतो, तर कधी तो काहीतरी नवीन बनवण्याच्या दृष्टीने असतो.

एकदा कि हा ट्रिगर आम्हाला मिळाला कि भावातीत अवस्था गाठण्यासाठी आम्हाला कुणीच अडवू शकत नाही.आम्ही आमच्या संगणकाशी इतके एकरूप होतो की आम्हाला आमच्या शरीराचे, परिस्थितीचे व वेळेचे भान हरपते.मुलीने पायाशी खेळलेली आम्हास समजत नाही कि अर्धांगिनीने दिलेली हाक किंवा टेबलावर ठेवलेला चहाही.

ह्या अवस्थेचे वर्णन शब्दांमध्ये बांधणे अशक्य आहे परंतु इथे बरेच पंडित असल्याने त्यांनी हि अवस्था असेल. आमच्या मार्गाने साधना केल्यास भावातीत अवस्था अशक्य नाही परंतु खडतर जरूर आहे .पण थांबा नाराज होऊ नका, तुमचे तुमच्या कामावर प्रेम आहे का ? नसेल तर ते निर्माण करा आणि बघा मी काय म्हणतोय याची प्रचिती तुम्हाला तुमच्या कामातून हि येईल .. आपल्याला जे आवडते तेच काम करा किंवा जे काम करतोय त्यात आवड निर्माण करा ( Love what you do, or do what you love.)

आमचे काम हीच आमची साधना , तुम्ही तुमच्या कामावर प्रेमच करत नसाल किंवा तुमच्या आवडीचे करण्यासारखे तुमच्या कडे काहीच नसेल तर मात्र तुमचा मार्ग खडतर आहे .इथे मात्र तुम्हाला आध्यात्माची कास धारावी लागेल व अनेक वर्षे साधना करूनही यश मिळेल कि नाही याची खात्री नाही. ध्यान व योग करून भावातीत अवस्था मिळवण्याचा प्रयत्न आम्हीही केला, त्याचे अनेक शारीरिक व मानसिक फायदे हि आहेत परंतु जी अवस्था आम्हाला आमच्या कामातून मिळते त्यासारखे मिळवण्यास आम्ही अजूनतरी अपयशी आहोत.

जीवनमानप्रकटन

प्रतिक्रिया

१.

ध्यान व योग करून भावातीत अवस्था मिळवण्याचा प्रयत्न आम्हीही केला, त्याचे अनेक शारीरिक व मानसिक फायदे हि आहेत परंतु जी अवस्था आम्हाला आमच्या कामातून मिळते त्यासारखे मिळवण्यास आम्ही अजूनतरी अपयशी आहोत.

जगातलं कोणतंही काम निर्वैयक्तिक आहे. झाडू आपल्याला बोलवत नाही की संगणक कुणाला साद घालत नाही की सतार मला वाजवा म्हणत नाही त्यामुळे आनंद कामात नाही. तुम्ही स्वतः आनंद आहात आणि स्वतःशी कनेक्टेड असाल तर तुम्ही वाट्टेल ते काम इंटरेस्टींग करु शकता. तुमचा लेख नेमका उलट्या धारणेतून आला आहे त्यामुळे तुम्हाला फक्त एकाच कामात आनंद मिळतो. अर्थात हा आनंद कामामुळे नसून त्या दरम्यान तुम्ही स्वतःशी कनेक्टेड असल्यामुळे होतो कारण काम कायम निर्वैयक्तिक आहे .

मी वाट्टेल ते काम इंटरेस्टींग करतो मग ते माझं व्यावसायिक काम असो, कंझ्युमर कोर्टाची केस असो, इथलं लेखन असो, माझ्या विरोधात येणार्‍या प्रतिसादांना उत्तर देणं असो, बायकोबरोबर खरेदी असो की सुपर मार्केटला जाऊन किराणा आणणं असो की स्म्यूलवर येणार्‍या इनवाइटसच्या युवतींबरोबर गाणं असो, टेबल-टेनीस, सिंथेसाइजर, चेस, योगा, प्राणायाम...... काय वाट्टेल ते. तुमचा अप्रोच एकांगी आहे.

२. परंतु ते बोटात बोटे घालून बसण्याइतके सोपे नाही किंवा कुठल्याही नशेत तंद्री लागण्याइतका सरळ हि नाही . हि अवस्था गाठण्यासाठी १०-१५ वर्षांची तापशर्या आहे .

हाच तर मुद्दा आहे ! १०/१५ वर्ष चुकीची साधना करुन काही तरी काल्पनिक अवस्था गाठण्याचा प्रयत्न केल्यामुळे घोर अध्यात्मिक गैरसमज झाले आहेत. त्या धारणेतून तुम्हाला इतक्या सोप्या पद्धतीनं मेंटल अ‍ॅक्टीविटी थांबेल हे मान्यच होणार नाही. याचा अर्थ तुम्ही ते ध्यान करुन पाहा असं नाही तर तुम्ही ते न करताच हा लेखनप्रपंच केला आहे हे नक्की.

तुम्ही सांगितलेल्या ध्यानाचा प्रयत्न केला आहे पण मला निर्देहाचा अनुभव आलेला नाही.
10-15 वर्षे तपश्चर्या मी काही निश्चित मानसिक स्थिती अनुभवण्यासाठी केलेली नाही, किंबहुना ती स्थिती काय आहे हे कधी अनुभवले नसल्याने ती मिळविण्याचा प्रयत्न कसा करणार?
आमच्या कामाची सुरवात ही निव्वळ भौतिक गरजा भागवण्यासाठी पैसे मिळवण्याचा दृष्टीने झाली.. कुठलेही मानसिक समाधान शोधण्यासाठी ह्या मार्गाला लागलेला नाही. त्यामुळे आध्यात्मिक गैरसमज वैगेरे मुद्दे गौण ठरतात.
माझे अनुभव हे भावातीत अवस्थेचा जवळ जाणारे आहे, विदेहत्व ही संकल्पना मला पटण्यासारखी नाही.. सर्व अनुभव हे हा शरीरच घेतो आणि भावातीत अवस्था ही हा एक भाव आहे असे माझे मत आहे. तुमच्या मताचा आदर आहेच आणि तुम्हाला आलेले अनुभव ही नाकारण्यात heआलेले नाहीत, परंतु जितक्या ठामपणे तुम्ही माझ्या मतांना झिडकारले आहे ते बघून आश्चर्य वाटले.

बोटात बोटे घालून बसण्या इतके सोप्पे नाही हे माझ्या स्वतःच्या अनुभवावरून माझ्या स्वतः पुरते लिहिले आहे. प्रतिसादाबद्दल धन्यवाद.

१. मी तुम्हाला वस्तुस्थिती सांगितली. तुमचा अनुभव बाद ठरवलेला नाही. आणि ती स्थिती नेमकी कशामुळे येते हे सुद्धा सांगितलं आहे.

२. उलट तुम्ही लेखाची सुरुवातच अशी सुरुवात केली आहे :

लेख लिहायचे प्रयोजन म्हणजे आम्हालाही भावातीत अवस्था गाठण्याचे ज्ञान प्राप्त झाले आहे .परंतु ते बोटात बोटे घालून बसण्याइतके सोपे नाही किंवा कुठल्याही नशेत तंद्री लागण्याइतका सरळ हि नाही .

त्यामुळे मला प्रतिसाद देणं क्रमप्राप्त झालं !

३.

माझे अनुभव हे भावातीत अवस्थेचा जवळ जाणारे आहे, विदेहत्व ही संकल्पना मला पटण्यासारखी नाही.. सर्व अनुभव हे हा शरीरच घेतो आणि भावातीत अवस्था ही हा एक भाव आहे असे माझे मत आहे.

न तुम्हाला विदेहत्त्वाची कल्पना न तुम्हाला भावातीत अवस्था म्हणजेच विदेहत्त्व या वस्तुस्थितीची कल्पना.
तुम्हाला तुमच्या कामात मजा येते इतका साधा मुद्दा होता. तुम्ही निष्कारण गाडी अध्यात्माकडे वळवली !

३.

आमच्या कामाची सुरवात ही निव्वळ भौतिक गरजा भागवण्यासाठी पैसे मिळवण्याचा दृष्टीने झाली.. कुठलेही मानसिक समाधान शोधण्यासाठी ह्या मार्गाला लागलेला नाही. त्यामुळे आध्यात्मिक गैरसमज वैगेरे मुद्दे गौण ठरतात.

आता करेक्ट बोललात, कामातले पैसे काढून घेतले तर तुमची अवस्था भंगेल ! अध्यात्मिक आकलनासाठी कमालीची फुर्सत हवी आणि यातून शून्य आर्थिक प्राप्ती आहे हे माहिती असतांना सुद्धा स्वरुपाचा शोध घेण्याची नशा हवी.

तुम्ही काहीही साधना न करता उगीच अध्यात्मिक भाष्य करण्याचा फंदात पडलात.

आनन्दा's picture

29 Nov 2020 - 11:05 pm | आनन्दा

खरे आहे, आणि मला अश्या अवस्थेत गेल्यावर स्वतःशीच बडबड करायची सवय आहे..
ऑफिसमध्ये त्यामुळे मी अनेक वेळा चेष्टेचा विषय झालो होतो.. जिवंत माणूस असल्यासारखे मी कोड शी बोलत असे जवळजवळ !!!

वगिश, जोपर्यंत तुम्ही बोटात बोट गुंफून त्याचे लोलक बनवून त्याकडे पाहत नाही म्हणजेच "साधना" करत नाही तोपर्यंत तुम्ही उगीच अध्यात्मिक भाष्य करण्याचा फंदात पडू नका.

एकदा का "साधना" केलीत (तेच ते, बोटात बोट गुंफून त्याचे लोलक बनवून त्याकडे पाहणे. साधना म्हणतात त्याला) आणि "मला अनुभव आला" म्हणालात की तुम्ही अध्यात्मिक भाष्य करण्यास पात्र झालात. त्यानंतर तुम्हाला विदेहत्त्वाची कल्पना तसेच भावातीत अवस्था म्हणजेच विदेहत्त्व या वस्तुस्थितीची कल्पना आली असल्याचे प्रमाणपत्र देण्यात येईल.

कंजूस's picture

30 Nov 2020 - 7:21 am | कंजूस

पण त्याच वेळी बाजूला आणून ठेवलेल्या चहाला गार होऊ देत नाही. एक हात आपसुकपणे कपाकडे गेलेला असतो. मग चहाचे घुटके घेत भाव कायम ठेवतो.

सुबोध खरे's picture

30 Nov 2020 - 10:11 am | सुबोध खरे

@वगिश

तुमचा लेख नेमका उलट्या धारणेतून आला आहे

घोर अध्यात्मिक गैरसमज झाले आहेत

काय वाट्टेल ते. तुमचा अप्रोच एकांगी आहे.

न तुम्हाला विदेहत्त्वाची कल्पना न तुम्हाला भावातीत अवस्था म्हणजेच विदेहत्त्व या वस्तुस्थितीची कल्पना.

तुम्ही निष्कारण गाडी अध्यात्माकडे वळवली !

तुम्ही काहीही साधना न करता उगीच अध्यात्मिक भाष्य करण्याचा फंदात पडलात.

हे तुम्हाला समजलं ना?

म्हणजे काय समजलंच पाहिजे कारण सर्वज्ञ यांनी तसे सांगितले आहे.

तेंव्हा हे कोडिंग फिडींग सारख्या सर्व भंपक गोष्टी सोडून एक क्षणात विदेहत्व कसं मिळवता येईल यासाठी कान पकडून श्री सर्वज्ञ यांचे गंडाबंध शागीर्द व्हा

टवाळ कार्टा's picture

30 Nov 2020 - 4:35 pm | टवाळ कार्टा

=))