केळीच्या पानातील ग्रिल्ड पापलेट (व्हिडिओ सोबत)

Primary tabs

मी_देव's picture
मी_देव in पाककृती
22 Nov 2020 - 1:14 pm

दिवाळीचा फराळ खाऊन कंटाळा आला असले म्हणून हि खास चमचमीत पापलेट रेसिपी

जिन्नस:

 • पापलेट (आम्ही इथे काळा पापलेट घेतलाय साधारण ७५० ग्राम होता. माशाच्या आकारानुसार नग ठरवावेत)
 • हळद - २ टीस्पून
 • जाडं मीठ - १ टीस्पून
 • साधं मीठ - चवीनुसार
 • केळीचं पान - १
 • मोहरी तेल - १ टीस्पून
 • थोडं नेहमीचं वापरातलं तेल

वाटणाकरिता
---------------

 • आलं - १ इंच
 • लसूण - ४/५ पाकळ्या
 • हिरवी मिरची - १ ते २ (तिखट खाण्याच्या आवडीनुसार कमी जास्त करावी)
 • पुदिना - ८ ते १० पानं
 • कोथंबीर - अर्धा कप
 • काळी मिरी - अर्धा टीस्पून
 • अर्ध्या लिंबाचा रस

पाककृती :

 • साफ केलेल्या पापलेटला, जाड मीठ आणि १ टीस्पून हळद लावून चोळावे आणि १५ मिनिटं ठेवून द्यावे.
 • आम्ही काळा पापलेट घेतलाय. त्याला खवले थोडे जास्त असतात. जाडं मीठ चोळल्यामुळे जर काही खवलं राहिली असतील तर निघायला मदत होईल आणि मासा धुण्याआधी हळद लावल्याने त्याचा हिंवसपणा कमी होईल. जर सिल्वर पापलेट असेल, तर याची गरज पडणार नाही.
 • मासा स्वच्छ धुवून घ्यावा आणि प्रत्येक १ इंचावर चीर द्यावी.
 • चवीनुसार मीठ आणि १ टीस्पून हळद लावावी.
 • आलं, लसूण, पुदिना, कोथंबीर, मिरची, मिरी आणि लिंबाचा रस बारीक वाटून घ्यावं.
 • वाटण माश्याला लावून घ्यावे आणि माशाच्या चिरांमध्ये नीट भरून घ्यावं.
 • केळीचं पान तव्यावर रंग बदलेपर्यंत भाजून घ्यावे.
 • आता पानात वाटण लावलेला मासा गुंडाळून घ्यावा आणि सर्व बाजू टूथपिक लावून बंद कराव्यात किंवा दोऱ्याने बांधाव्यात.
 • मासा निदान अर्धा तास मॅरीनेट होऊ द्यावा.
 • ग्रीलपॅनला थोडा तेल लावून त्यावर मासा १५ ते २० मिनिटं माध्यम आचेवर भाजून घ्यावा. केळीच्या पानाच्या किती लेयर आहेत यावर हा वेळ कमी जास्त होऊ शकतो.
 • दुसरी बाजूही यानुसार भाजून घ्यावी.
 • मासा पानातून काढून एका ताटात घ्यावा. एका वाटीत जळता निखारा घेऊन त्यावर मोहरी तेल सोडून धूर करावा. वरून झाकण ठवून २ ते ३ मिनिटं बंद करावे. अप्रतिम स्मोकी फ्लेवर येतो.
 • आवडत असल्यास पापलेटला थोडं बटर लावावं. वरून लिंबू पिळून सर्व्ह करावे.

प्रतिक्रिया

निनाद's picture

22 Nov 2020 - 3:58 pm | निनाद

वाह वा! सुंदर, करून पाहू.

पण हिंवसपणा म्हणजे काय? हा शब्द प्रथम ऐकला.

मी_देव's picture

22 Nov 2020 - 6:16 pm | मी_देव
मी_देव's picture

22 Nov 2020 - 6:17 pm | मी_देव

आभार निनाद, हिंवस म्हणजे उग्र दर्प. कोकणात हा शब्द सर्रास वापरतो. मटा वाले पण वापरतात LoL हीही
https://maharashtratimes.com/food-recipes/test/articleshow/47560252.cms

चौकस२१२'s picture

3 Dec 2020 - 10:30 am | चौकस२१२

हिवस हा शब्द पहिल्यांदा ऐका त्याबरोबर "वैस पणा" हे हि ऐकलंय.. त्याचा नक्की अर्थ काय? वैस म्हणजे पुरेसे मसालेदार झालाय! कि नाही झालाय ?

विजुभाऊ's picture

22 Nov 2020 - 6:06 pm | विजुभाऊ

तेच म्हणतो.

मस्त.... हिंवस म्हणजे ज्याला शाकाहारी लोक मांसाचा/ मासळीचा दुर्गंध मानतात तो वास असावा. विशेषत: जलचर प्राण्यांना असलेला विशिष्ट उग्र वास असावा.

हा पदार्थ भारी लागत असणार चवीला.

प्रसाद_१९८२'s picture

22 Nov 2020 - 7:18 pm | प्रसाद_१९८२

पाककृती.
हा काळा पापलेट आणि सिल्वर पापलेट काय प्रकार आहे ?
तुम्हाला काळा पापलेट = हलवा(Black pomfret) म्हणायचे आहे का ?

शा वि कु's picture

22 Nov 2020 - 9:05 pm | शा वि कु

फोटो भारी.

आनंदी गोपाळ's picture

24 Nov 2020 - 7:32 pm | आनंदी गोपाळ

त्या लिंबाच्या पातळ चकत्यांचा नक्की उपयोग काय? (डेकोरेशन शिवाय)
त्या खाता येतात का? कशा?

king_of_net's picture

3 Dec 2020 - 5:16 pm | king_of_net

काळा पापलेट ???????
हलवा आहे हा...
दोघांच्या चव आणि texture मधे खुप फरक आहे...

स्वलिखित's picture

7 Jan 2021 - 8:21 am | स्वलिखित

आता जर्मल च्या ताटातील बनवा