आठवणी दाटतात. गावाकडची दिवाळी

नीलकंठ देशमुख's picture
नीलकंठ देशमुख in जनातलं, मनातलं
14 Nov 2020 - 4:37 pm

 
आठवणी  दाटतात.
गावाकडची दिवाळी.
किट्टी आडगाव.तालुका माजलगाव,जिल्हा बीड,मराठवाडा.
माझे गाव.जन्म गाव.तालुक्याचे गावाला जोडणारे सडके पासून चार किलोमीटर आत,एका छोट्या टेकडीआड दडलेले,जवळ जाई पर्यंत न दिसणारे,दोन तीन हजार घरांचे गाव.शहरी भागापासून दूर,कुठलेही वैशिष्ठ्य नसलेले.अगदी साधे.
   गावी शेती.मोठा चिरेबंदी वाडा.वडील शेती पाहायचे.माझे
निम्मे आयुष्य,वडील होते तो पर्यंत,गावाशी जोडलेले होते.
एकतीस वर्षांपूर्वी वडील गेले.नेमकी त्याच वेळी न्यायाधीश म्हणून नोकरी मिळाली.गावातील मोठ्या वाड्यात आई एकटी राहाणे शक्य नव्हते.वाड्याला कुलूप लागले.आमची भ्रमंती सुरू झाली.हे गाव,ते गाव.
  नोकरी निमित्ताने महाराष्ट्रातील विविध भागातील दिवाळी अनुभवली.घरीही दिवाळीचे अनेक सोहळे झाले,अजूनही होतात.पण दरवर्षी दिवाळीआली की,मन भूतकाळात जाते.गाव अन गावाकडची दिवाळी आठवते.
      दसरा झाला की दिवाळीची वाट पाहाणे सुरू होई.
खरीपाचे पिक आलेले असे.बैलगाडीने शेतमाल विक्रीसाठी तालुक्याला मोंढ्यात नेला जाई.तेव्हाच दिवाळीची खरेदीपण होई.मीही हट्ट करून वडिलां सोबत जाई.गाडीवानाचे शेजारी बसून बैल पळवायला मजा येई.मालाविक्रीचे पैसे मिळाले की दिवाळी साठीची खरेदी.आई ने किराणा सामानाची मोठी यादी दिलेली असे.माझे सगळे लक्ष मात्र फटाक्याचे खरेदीत.फुलबाज्या,भुईनळे,चक्र, लवंगी फटाके ,तोटे ,बॉंब , नागाच्या
गोळ्या,काडी पेट्या टिकली,पिस्तूल अशी खरेदी. घरी आल्यावर तो 'माल' पुन्हा पुन्हा पाहाणे,जमल्यास त्यातला काही उडवणे हा कार्यक्रम असे.दिवाळीच्या आधीच फटाके संपवशील म्हणून घरच्यांची बोलणीही खावी लागत.
दिवाळीच्याआगेमागे, गावात गोसावी,गोंधळी ,मसणजोगी,
वासुदेव,बहुरुपी, (रायरंद)इ.भिक्षेकरी लोक कुठुन कुठुन येत.
धान्य,जुने कपडे, जे दिले ते घ्यायचे.काहींना मात्र पैसे हवे असत.मसणजोग्यांची फार भिती वाटायची.पळवून नेतील
म्हणून. कमरेला पांढर्या लुंग्या अन डोक्याला पांढरे फेटे
बांधलेल्या तेलंगी ब्राम्हणांच्या(?)टोळ्या 'अंबे अंबीके बालीके 'असे काही म्हणत यायच्या.त्यांना ताक भाताचे जेवण लागे.काशीचे पंडे ही येत.मनगटावर गंडे बांधून गंगेच्या (?)पाण्याचे गडू द्यायचे .दक्षिणा घेऊन जात.
  कोजागिरी पोर्णिमेपासूनच आकाशकंदिल लागायचा.तो
आजोबा घरीच बनवत.बांबूच्या कामट्या पासून,षटकोनी आकाराचा. जिलेटीनचे  निळे/लाल/पिवळे  पारदर्शक कागद चिकटवलेला.आत पणती ठेवण्याची जागा.तो अंगणात दोरीने लटकवायचा.रोज संध्याकाळी पणती बाहेर काढून त्यात तेल वात घालून पेटवायची व परत आत ठेवायची हे नाजूक काम आई करे.
  फराळाचे तयार पदार्थ विकत आणणे,ही कल्पनेबाहेरची गोष्ट.स्वयपाकघरात चुलीवर,चिवडा ,शेव,लाडू,शंकर पाळे, करंज्या,चकल्या,अनारसे ई.फराळाचे पदार्थांची,तयारी आई च्या नेतृत्वाखाली सुरू असे.तो घमघमाट स्वस्थ बसू देत नसे.बायकांची नजर चुकवून भाजलेले शेंगदाणे,खोबरे खायचे अन त्यांची बोलणीही.
आजोळचे पाहुणे किंवा लग्न झालेल्या बहिणी,भाऊजी येणार असले तर फराळाची तयारी आणखी जोरात.
पाहुणे येण्याची अधीरतेने वाट पाहिली जायची.अमुक दिवशी येणार असे त्यांचे टपाल येई.चार पाच किलोमीटर अंतरावर असलेल्या सडके वर बसथांबा.पाहुण्यांना घेण्यासाठी तिथे सकाळपासून बैलगाडी तैनात.कधी कधी ठरल्या दिवशी पाहुणे यायचेच नाहीत.बैलगाडी रिकामीच परत येई.मग निराशा.दुसरे दिवसाची वाट पाहाणे. शेवटी एकदाचे पाहुण्यांचे आगमन होई.खरी दिवाळी तेव्हाच सुरू. 
वाड्याचे बाजूला घरची जनावरे;बैल ,गायी ,वासरे,म्हशी, घोडा बांधण्यासाठी वाडा.गायवाडा. दिवाळीच्या तीन चार दिवस आधी पासून संध्याकाळी;गुराखी मुले,
दिन दिन दिवाळी ,गायी म्हशी ओवाळी।
गायी म्हशी कुणाच्या,लक्षुमनाच्या।।
असे गाणे म्हणत,गायी म्हशींना दिवट्यांनी ओवाळीत.
हा 'लक्षुमन 'कोण होता कुणास ठावूक?
   नरकचतुर्दशीला पहाटे चार पासूनच अभ्यंगस्नानाची गडबड सुरू होई.किंचित थंडी असे.महिला मंडळी सर्वाचे आधी उठून आंघोळी उरकून घेत.मग पुरुष मंडळीचे अभ्यंगस्नानाची तयारी .तीळ हळदीचे उटणे,सुगंधित तेल,मोती साबण इ.ची सज्जता असे.चुलाणवर पाण्याचे हांड्यात पाणी गरम केले जाई.स्नानाचे अगोदर औक्षवण
(ओवाळणे)होई.बहिणी उटणे लाऊन स्नान घालत.तांब्याचे
मोठ्या घंगाळातून गरम गरम पाणी अंगावर पडतच राहावे,संपूच नये
असे वाटे.शरीर ,मन ताजेतवाने होई. घराबाहेर  बॅंडवाले,हालगी,
ताशेवाले,तुतारीवाले (शिंग)वाद्ये वाजवत फिरत. त्या मंगल (?)वाद्यांचे गजरात अभ्यंगस्नाने संपन्न होत.मुलांना फटाके फोडायची घाई असे.
अंगणात, घराबाहेर ,फटाक्यांचा धुमधडाका आणि धूर.सर्वांची स्नाने दिवस उजाडण्याचे आत व्हायलाच हवीत. नाही तर अंगावर नरक पडेल ही भिती.वडील देवपुजा करीत.देवाला गरम,सुवासिक पाण्याने स्नान,व नवी वस्त्रे. तोपर्यंत उजाडलले असे.लगेच फराळ.तयार चिवडा, लाडू, चकल्या ,करंज्या वगैरे. खास पाहूणे आलेले असल्यास उपमा ,शिरा असे ताजे पदार्थ व्हायचे.   
दिवाळीत दिनक्रम ठरलेलाच असे. एकवेळ  भावकीचे,नात्यातले घरी,
फराळासाठी जाणे, व त्यांना आपल्या कडे फराळास बोलावणे,हा
उपचार पाळला जाई.पाहूणे असल्यास त्यांनाही निमंत्रण असे.घरी बनवलेला मूरमुरेचा चिवडा; रवा,बेसन इ.चे लाडू हा मेनू ठरलेला. वर्तमानपत्राचे कागद अथवा पत्रावळ्यावर फराळ दिला जाई.
बलुतेदार आणि इतरांनाही  फराळाचे वाटप होई.
  फराळानंतर  मुलांचा फटाके फोडण्याचा सामुहिक कार्यक्रम. त्या शिवाय उखळी(लोखंडीपळी)त फटाक्यातील दारू काढून भरायची व आपटून बार करायचा,जमीनीवर सांडलेली दारूची भुकटी  पेटवायची हे अतिरिक्त खेळ
आवडीचे.त्यात अनेकदा हात भाजायचे. ते तर फटाके हातात धरून पेटवतानाही भाजत.मग मोठ्यांची बोलणी अन फटके ही खायचे. रंगांची उधळण करणारे, आकाशात उडणारे,मोठे आवाज करणारे फटाके,रॉकेट वगैरे रात्रीसाठीराखून ठेवले जायचे .ती उडवायची कामगिरी मोठी माणसे
व मोठ्या धाडसी मुलांकडे असे.
दुपारचे जेवण साग्रसंगीत.ताटाभोवती रांगोळ्या,पाना फुलांची आरास.अगरबत्ती चा सुवास.घरी गोधन भरपूर.तेव्हा दह्या दुधाची रेलचेल असे.त्या मुळे श्रीखंड,बासुंदी हे पदार्थ असणारच.सोबत चमचमीत,खमंग पदार्थ तर हवेच.
  गावी वीज नव्हती, रात्री पेट्रोमॅक्स(बत्ती)लावली जायची.
बत्तीत रॉकेल भरणे,काचा साफ करणे,मेंटल( प्रकाश देणारा
रेशमसदृश्य धाग्याचा फुगा ) लावणे,पंपाने हवा भरणे , हवेच्या छिद्रातील कचरा पीनने दूर करून बत्ती पेटवणे हे येरागबाळ्याचे काम नसे.
    आमावस्येच्या संध्याकाळी 'लक्ष्मी पुजन'.देवीची कृपादृष्टी असावी,
समृध्दी राहावी म्हणून.फुलांनी सजवलेल्या चौरंगावर पुजा मांडली जाई.लक्ष्मीची प्रतिमा अन फोटोची पुजा होई.साळीच्या लाह्या व बत्ताशाचा नैवेद्य.आरतीच्या वेळी फटाके उडवायचे. पुजेच्या मुहुर्ताची वेळ ठरलेली .
घरोघरी आणि दुकानांमध्ये एकच वेळी पुजा.पुजा सांगणारे भटजींना खूप मागणी असे.त्यांची गडबड.गावभर फटाक्यांचा धुमधडाका होई.
    बलीप्रतिपदा/ पाडव्याचे व्यापारीमंडळी साठी वेगळे महत्त्व .हिशोबाचे वह्यांची पुजा करुन व्यवसायाचे नवे वर्ष सुरू होई.दुकानांमध्ये मोठ्या लोकांना पानसुपारी साठी आमंत्रण असे.मी पण वडीलांचे मागे जाई.पेढे बत्तासे मिळण्याचे आशेने.
गावातील ब्रम्हवृंद दुपारी पंचाग सांगणेसाठी घरी येई.आशिर्वचने देऊन,
दक्षिणा घेऊन जाई.संध्याकाळी स्त्रीया आपले पतीला व मुलांना अन मुली वडीलांना ओवाळीत.
    भाउबीजेचा दिवस तर खास. सकाळी भावाला आंघोळ  घालताना ,संध्याकाळी ओवाळणी काय घालणार?ही बहिणींची विचारणा .भाउ परावलंबी.वडिलांनी आणले असतील तर कपडे,नाही तर ते देतील ते पैसे,अगदी एक रुपयाचे बंदा ते पाच/दहा रुपयेपर्यंत; तेच ओवाळणी म्हणून द्यायचे.मनासारखी ओवाळणी मिळाली नाही तर त्या खट्टू होत.मला पाच बहिणी.पैकी चौघी मोठ्या. त्यामुळे माझ्या बाबतीत मात्र हे होत नसे. कुणाला ,किती व कायओवाळणी मिळते ही मुलींना उत्सुकता असे.
मिळालेल्या पैशाची मोजदाद होई.ओवाळणीच्या वस्तू,कपडे पाहिले जात.तुलना होई.भांडणे पण.
गावातल्या नात्यातील घरी ओवाळून घ्यायला जाणे आवश्यक असे.कुठे ब्लाऊज पीस,कुठे पैसे,कुठे इतर काय द्यायचे, याच्या घरून आगाऊ सुचना असत.त्यानुसार ओवाळणी द्यायची.
   रोज रात्री जेवणानंतर, सोंगट्या वा पत्त्याचे डाव रंगत.महिला मंडळ
दिवसभराचे कामाने थकलेले असे. दुसरे दिवशी ची कामे ही समोर दिसत.त्या लवकर निवृत्तहोत.मुलेही पेंगता पेंगता झोपीजात.
पुरुष मंडळींचा खेळ मात्र उशीरा पर्यंत चाले.
रोज संध्याकाळी नवे कपडे,(बहुधा दसर्याला आणलेले)घालायचे.रात्री झोपताना घड्या घालून ठेवायचे. दुसरे दिवशी घालण्यासाठी.कधी पाहुण्याकडून ही नवे कपडे मिळत.मग घड्या घालायचे काम नसे.
दिवाळी हा दिव्यांचा उत्सव.कुंभाराकडून पणत्या येत.त्यात कापसाच्या वाती तेल घालून संध्याकाळी रोषणाई केली जायची.घरात सर्वत्र; ओसरी ,देवघर,कोनाडे,मुख्य दरवाजा,माडी, त्यावरील पत्रांची वरवंडी (पॅरापेट वाल) सगळी कडे दिवेच दिवे.सगळी घरे,गल्ल्या अन गाव दिव्यांचे प्रकाशात  उजळून निघे.दिवे लावणे,पेटवणे हा एक सोहळाच.
  अंधारलेल्या रात्री,लखलखत्या दिव्यांच्या सर्वत्र पसरलेल्या प्रकाशाचे ,वेगळेच विश्व तयार होई.नेहमीचे गाव नसायचेच ते.अन माणसेही. त्या दिव्य प्रकाशात,किंचित मागे झुकुन तुतारी वाजवणारा,गावातील फाटका तुतारीवालाही,आकाशातून अवतरलाय असे वाटे.पन्नासहून जास्त वर्षे
उलटली तरी अजूनही डोळ्यात ते दृश्य  साठलेले .
  भाउबीजेचे रात्री ;तुळशीचे लग्नासाठी ,मोजके फटाके बाजूला काढून,उरलेले फटाके फोडले जात.दिवाळीचा समारोप दणक्यात होई.
    दुसरे दिवशी सकाळी घरासमोर,फटाक्याचा कचरा पडलेला असे.
गावाकुसाबाहेरच्या झोपडपट्टीतील मुले ,तो ढीग ऊचकून,उडवता येण्या जोग्या फटाक्याचा शोध घेत.त्यात एखादा फटाका मिळाला की परमानंद होई.जवळ शिलकीत असलेले फटाक्याचा साठ्यातील एक दोन नग त्यातील एखाद्याला दिले,की इतरही अनेक जमा होत. मग निमुटपणे घरात जाण्याशिवाय पर्याय नसे.
       दिवाळी संपली की पाहूणे,जाण्याची वेळ येई.मुली सासरी जाणार,माहेरची माणसे जाणार, दोस्त जाणार, म्हणून सगळेच उदास.घर उदास होई.मजामस्तीचे दिवस संपले,आता पुन्हा केव्हा भेट होणार?भरल्या डोळ्यांनी निरोप दिले जात. पाहुण्यांना बसथांब्यावर घेऊन जाणारे बैलगाडीच्या मागे,काही अंतर चालत ,पळत जायचे. दूर जाणारे गाडीकडे पाहायचे दिसेनाशी होईपर्यंत.आणि जड अंतःकरणाने घरी परतायचे.
दिवाळी संपायची.पण दिवाळीच्या आंबट गोड आठवणी,संपत नसत. खूप काळ उलटला.आई वडील गेले.जवळचे अनेक लोकही गेले. बालपण संपले.प्रौढत्वही गेले. संध्याछाया दिसू लागल्या.अशा वेळी मनात आठवणी दाटतात . दिवाळीच्याच नाही तर त्या सगळ्यांच्याही.

                     नीलकंठ देशमुख 
    

मुक्तकअनुभव

प्रतिक्रिया

प्रकाश घाटपांडे's picture

15 Nov 2020 - 12:03 pm | प्रकाश घाटपांडे

हळू हळू मानवी नातीही कशी बदलत गेली नाही? आठवणी शिल्लक राहतात.

नीलकंठ देशमुख's picture

16 Nov 2020 - 10:06 am | नीलकंठ देशमुख

याला जीवन ऐसे नाव

शकु गोवेकर's picture

16 Nov 2020 - 1:55 am | शकु गोवेकर

खुप चान्ग्ला लेख आहे

नीलकंठ देशमुख's picture

16 Nov 2020 - 10:05 am | नीलकंठ देशमुख

धन्यवाद

नीलकंठ देशमुख's picture

16 Nov 2020 - 4:40 pm | नीलकंठ देशमुख
Rajesh188's picture

16 Nov 2020 - 10:25 am | Rajesh188

सुरेख वर्णन.
डोळ्या समोर गवकडची दिवाळी उभी राहिली.
वास्तव वर्णन.

नीलकंठ देशमुख's picture

16 Nov 2020 - 11:13 am | नीलकंठ देशमुख

धन्यवाद