स्मरणरंजन

Primary tabs

नीलकंठ देशमुख's picture
नीलकंठ देशमुख in जनातलं, मनातलं
21 Oct 2020 - 11:24 am

स्मरणरंजन
रेडिओ (१)
बचपन के दिन.
माझा जन्म खेड्यातला .आडगाव. जि.बीड.
वयाच्या दहा/अकरा वर्षापर्यंत
तिथेच वाढलो.
कळायला लागल्यापासून घरी रेडिओ.
आजोबांच्या बैठकीत
एका कोनाड्यात.फिलीप्स कंपनीचा  सुबक.
बॉक्स आकाराचे एवरेडी बॅटरी वर चालणारा.
ईंग्रजी नाईन चे आकड्यातून उडी मारणारी मांजर.
बॅटरी वर्षभर चालायची.
मग तालुक्याचे गावाहून (माजलगाव)दुसरी आणायची. 
जुनी बॅटरी अंगणात  फोडणे हा माझा  कार्यक्रम.
त्यात,
पितळी पट्ट्याचे चौकटीत ,
कोळशासारख्या पदार्थाच्या टोस्ट च्या
आकाराच्या वड्या .
त्या फोडल्या वर पाणी निघे.
पितळी पट्टया सोनार घेउन जाई. फुकट.
बहुतेक पितळ वितळवून सोन्यात मिसळतअसावा.
     रेडिओतून एक तार ,अंगणात लटकवलेल्या
दहा फुट ×सहा इंच आकाराचे जाळीच्या पट्टीला जोडलेली .एंटिना.
त्यातून नभोवाणी च्या ध्वनीलहरी
रेडिओ पर्यंत.
रेडिओ साठी  परवाना आवश्यक
दरवर्षी तालुक्याचे पोस्ट ऑफिस मधे  त्याचे नुतनीकरण . ती एक कटकटच .
दिड/दोन रुपये फीस भरली की पोस्टात
परवाना पुस्तकात स्टांप  मारत .
नंतर ती पध्दत बंद झाली.
माजलगाव चे  एका टेलरचा
रेडिओ दुरुस्तीचा साईड बिझीनेस.
रेडिओ वर फक्त 
मुंबई ब केंद्र किवा पूणे केंद्र.
सकाळी भक्ती संगीत.
       लता, आशा, माणीक वर्मा ,सुमन,दशरथ पुजारी,
सुधीर फडके, प्रल्हाद आणि विठ्ठल शिंदे ,छोटा गंधर्व ,
बाल गंधर्व आणि कितीतरी ...
एवढ्याशा रेडिओ मधे ही मंडळी कशी बसत असतील
अशी शंका बालमनात.
कुणी तरी  सांगितले  की गाणी  रेडीओ केंद्रात म्हणतात. थंडीचे दिवसात लता बाई ,आशाताई ई. अंगावर  शाल पांघरून  गात असल्याचे काल्पनिक चित्र समोर उभे राही.
तिथे रेकॉर्ड वाजवतात हे नंतर कळलं.
सकाळी अकरा वाजता,
अर्धा तास मराठी गाणी वाजणारे कार्यक्रमास
कामगार सभा हे
नाव का दिले असावे?
या वेळी कामगार मंडळी काम
सोडून गाणी ऐकत  बसली
तर मालक कामावर ठेवील ?
वनीता मंडळ, श्रुतिका .नभोनाट्य.
पण ऐकायचे कुणी कुणी.
'पुन्हा प्रपंच' वाली ,
बाळ कुडतरकर, प्रभाकर जोशी ,नीलम प्रभू
ई.मंडळी प्रसिद्ध. 
संध्याकाळी शेतकरी बंधूंसाठी  कार्यक्रम .
त्यात जनावरावरील खुरमांड्या  रोग,
आंतरपिके कशी घ्यावीत,
कापसावरील बोंडअळी कशी नियंत्रणात
आणावी  वगैरे  विविध विषयांवर चर्चा  .
शेतकरी अधिकारी , प्रगतीशील शेतकरी यांच्याशी संवाद ,सल्ला वगैरे.
किती शेतकरी
ते सल्ले ऐकून त्यानुसार शेती करत
असतील
कोण जाणे? 
'आजचे बाजारभाव '
म्हणजे लासलगाव' कांदा 'आवक अमुक अमुक
क्विंटल दर रुपये अमुक अमुक प्रति क्विंटल.
जालना 'मुग' आवक अमुक क्विंटल.
दर अमुक रुपये प्रति क्विंटल. वगैरे वगैरे.
हवामान वृत्त एक विनोदी प्रकार.
कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात काही ठिकाणी
जोरदार पाऊस. मराठवाडा मध्य महाराष्ट्रात व विदर्भात तुरळक ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस पडेल.
उर्वरित महाराष्ट्रात हवामान कोरडे राहील.
असला अंदाज.
उडाला तर पक्षी.बुडाला तर बेडूक.
यावरून कोणी काय समजायचे
ते समजून घ्यावे.
लोकसंगीत,म्हणजे
धनगरी गाणे,ओव्या,लावणी पोवाडे,
आदिवासींची गाणी वगैरे.
किर्तनाचे कार्यक्रमातून समाज प्रबोधनासाठी,
'दारूबंदी ते नसबंदी' पर्यंत कुठलाही  विषय वर्ज्य नसे.
सकाळी व संध्याकाळी
प्रादेशिक आणि  दिल्ली केंद्रावरच्या बातम्या.
दिल्ली केंद्राचे निवेदक सदाशिव दिक्षीत, वसंत देशपांडे ,दत्ता कुलकर्णी इ.या मंडळीचे नावा भोवती
पण एक वलय. आवाजावरून कोण बातम्या देतो ते कळे.
एकदा औरंगाबाद ला सभु समोरचे बसस्टॉपवर एक गृहस्थ भेटले. परगावचे असावेत.मकबराला जाणारे बसची चौकशी करत होते.बोलण्यातून  ते सदाशिव दिक्षीत असल्याचे कळले. आपण रेडिओ वर नेहमी ज्यांचा आवाज
ऐकतो  ते वृत्तनिवेदक प्रत्यक्ष भेटले म्हणून कोण आनंद .
वसंतराव देशपांडे याची मुलगी न्यायाधीश.
त्यांची ही पुढे ओळख झाली.
प्रादेशिक केंद्रावरची मंडळी पण लोकप्रिय.
सुधा नरवणे इ.
तेव्हा गावी वीज नव्हती. रात्रीआठ वाजता
सगळीकडे सामसूम.
रात्रीच्या बातम्या नंतर रेडिओ बंद.
बचपन के दिन भि  क्या दिन  थे.
                                         ( क्रमशः )
                  नीलकंठ देशमुख   .
                   ८७९३८३८०८०.
        nilkanthvd1@gmail.com

    

मुक्तकलेख

प्रतिक्रिया

कुमार१'s picture

21 Oct 2020 - 11:46 am | कुमार१

आवडले.

या आधीची चर्चा

मराठी_माणूस's picture

21 Oct 2020 - 2:17 pm | मराठी_माणूस

छान. खुपच आठवते आहे.

(सभु: सरस्वती भुवन)

सिरुसेरि's picture

24 Oct 2020 - 10:56 pm | सिरुसेरि

छान . +१
दुरदर्शनवरही पुर्वी आठवड्यातील लोकप्रिय गीतांवर आधारीत कार्यक्रम प्रसारीत होत असत . त्याबद्दलच्या काही आठवणी https://www.misalpav.com/node/40694