गरम आणि ‘ताप’दायक

Primary tabs

कुमार१'s picture
कुमार१ in जनातलं, मनातलं
19 Oct 2020 - 8:05 am

सस्तन प्राणी या वर्गानुसार आपण प्राणिमात्रांत उत्क्रांतीच्या सर्वोच्च पातळीवर आहोत. पृथ्वीवर आपण वेगवेगळ्या खंडांत राहतो. विशिष्ट खंडानुसार आपल्या सभोवतालचे तापमान ऋतूनुसार बदलते असते. कडाक्याच्या थंडीतील उणे ४० C ते भर उन्हाळ्यातील ५२ C हून अधिक, एवढा त्याचा व्यापक पल्ला आहे. आपण बाह्य तापमानाच्या एवढ्या विविधतेने गुरफटलेले असूनही आपल्या शरीराचे तापमान मात्र कायम स्थिर असते. शरीरातील विशिष्ट दमदार यंत्रणेमुळे आपल्याला हे अचंबित करणारे वैशिष्ट्य मिळाले आहे. निरोगी अवस्थेत आपण आपले तापमान सरासरी ३७ C ( ९८.६ F) इतके ठेवतो. विविध आजारांमध्ये हे तापमान वाढते. काही प्रसंगी ते कमीही होऊ शकते. ताप येणे हे बऱ्याच आजारांचे प्राथमिक व महत्त्वाचे लक्षण असते. त्याबाबत आपण संवेदनशील असतो. ताप येण्याची प्रक्रिया समजण्यासाठी आधी आपले तापमान नियंत्रण समजून घेणे इष्ट आहे. त्यासाठीच हा लेख.

या लेखात निरोगी शरीराचे तापमान व त्याच्या मापन पद्धती, त्यातील नैसर्गिक बदल आणि आजारांमध्ये होणारे चढ-उतार याचा आढावा घेतो.
तापमान मोजण्यासाठी दोन मापनांचा वापर प्रचलित आहे.

C = Celsius व
F = Fahrenheit

यातील C चे अंक हे वापरायला आणि लक्षात ठेवायला सोपे असल्याने या लेखात फक्त त्यांचाच वापर करेन.
इथे एक लक्षात घ्यावे की शरीर तापमान हे एकाच अंकावर स्थिर नसते. 24 तासांच्या कालावधीत त्यामध्ये मर्यादित चढ-उतार होत असतात. तसेच आपण शरीराच्या कुठल्या भागात ते मोजत आहोत, यानुसारही मापनाचे अंक बदलतात.

ok

शरीराचे तापमापन
हे नेहमी चांगल्या दर्जाच्या वैद्यकीय तापमापकाने करावे. शरीराच्या विविध भागात तापमान हे थोडेफार भिन्न असते. प्रथम हा फरक समजून घेऊ.

१. तोंड : तोंडाच्या आतील तापमान हे सरासरी 37 डिग्री C असते.
२. काख: इथले तापमान तोंडापेक्षा अर्धा डिग्री C ने कमी असते.
३. शरीरगाभा : इथले तापमान तोंडातीलपेक्षा अर्धा ते एक डिग्री C ने अधिक असते. हे मोजायचे झाल्यास तापमापक अन्ननलिका, गुदद्वार किंवा योनीत ठेवावा लागतो.

निरोगी अवस्थेतही आपले तापमान काही कारणांमुळे थोडेफार कसे बदलत असते ते आता पाहू.

१. चोवीस तासांचा कालावधी : या संपूर्ण कालावधीत तापमान ३६.३ – ३७.३ C या टप्प्यात बदलत राहते. पहाटे ४ च्या वेळेस ते सर्वात कमी तर संध्याकाळी ६ च्या सुमारास सर्वाधिक असते.
२. वय : एक वर्षाच्या आतील बाळात तापमान थोडे जास्त असते आणि बर्‍यापैकी अस्थिर असते. कारण त्यांच्या संबंधित नियंत्रक यंत्रणा पूर्णपणे विकसित नसतात. तसेच म्हातारपणी तापमान प्रौढांपेक्षा काहीसे कमी असते.
३. व्यायाम : हा करीत असताना त्याच्या तीव्रतेनुसार तापमान १-२ C ने वाढू शकते.

४. लिंगभेद : स्त्रियांमध्ये चयापचयाची गती पुरुषांच्या तुलनेत कमी असल्याने त्यांचे तापमान थोडे कमी असते.
५. स्त्रियांचे मासिक ऋतुचक्र : या चक्रामध्ये हॉर्मोन्सचे चढ-उतार होत असतात. त्यापैकी प्रोजेस्टेरॉन हे हार्मोन तापमान वाढवणारे असते. मासिक चक्राच्या साधारण मध्यावर ovulation ही घटना होते. त्या दिवशी सकाळी झोपेतून उठल्यानंतरचे तापमान वाढलेले असते. या दिवसानंतर पुढे चक्राच्या दुसऱ्या संपूर्ण टप्प्यात शरीर तापमान ३६.७ – ३७.२ या वाढीव टप्प्यात राहते.

६. अन्नग्रहण : विशेषतः प्रथिनयुक्त आहारानंतर तापमान थोडे वाढते.
७. भावना : भावनिक आंदोलनानंतर तापमान वेळप्रसंगी २ डिग्री C पर्यंतही वाढू शकते.

शरीरातील विविध प्रकारच्या प्रक्रियांमुळे उष्णता निर्माण होते. या उष्णतेतील काही भाग आपले तापमान स्थिर राखण्यासाठी वापरला जातो. याव्यतिरिक्त जी उष्णता असते ती विविध प्रकारे शरीराबाहेर टाकली जाते. अशा प्रकारे उष्णतेचा समतोल राखला जातो. उष्णतेचे निर्मिती आणि तिचे उत्सर्जन याचे मार्ग आता समजून घेऊ.

उष्णता निर्मिती :
ही खालील क्रियांमुळे होते:

१. चयापचयातील क्रिया : यामध्ये प्रथिनांचा वाटा सर्वाधिक असतो.
२. व्यायाम : याच्या प्रमाणानुसार उष्णता निर्मिती होते.
३. शरीराची थरथर : आपल्या नकळत होणाऱ्या स्नायूंच्या आकुंचनामुळे ही उष्णता निर्मिती होते. थंडीच्या दिवसात ही खूप उपयुक्त ठरते.
४. याव्यतिरिक्त वातावरणातील विशिष्ट सूर्यलहरी आणि काही आकाशलहरीपासूनही आपल्याला उष्णता प्राप्त होते.

उष्णतेचे उत्सर्जन :
हे खालील मार्गांनी होते-

१. आपली त्वचा आणि सभोवतालच्या वातावरणातील तापमानात फरक असतो. ज्या प्रमाणात हा फरक असेल त्यानुसार त्वचेतून उष्णता सतत उत्सर्जित होत राहते.
२. बाष्पीभवन यात शरीरातील पाणी बाष्परूपात बाहेर पडते. या उत्सर्जनाचे मार्ग असे आहेत :

a. त्वचेद्वारा : इथल्या घर्मग्रंथींच्याद्वारा बाष्प बाहेर पडते. यालाच आपण घाम म्हणतो. जेव्हा शरीर तापमान नेहमीपेक्षा वाढू लागते तेव्हा घामाद्वारा अतिरिक्त उष्णता बाहेर टाकली जाते. उन्हाळ्याच्या दिवसात हे काम अत्यंत महत्त्वाचे ठरते.
b. आपल्या उच्छ्वासातून.

थंडी आणि उन्हाळा या दोन भिन्न ऋतूंमध्ये आपण उष्णतेचे उत्सर्जन आणि निर्मिती यांच्यावर बाह्य घटकांतून प्रभाव पाडतो. थंडीत आपल्याला शरीरातील उष्णता टिकवायची असते. म्हणून आपण उबदार कपडे घालतो आणि गरजेनुसार आपले घर गरम करतो. बरोबर याउलट उन्हाळ्यात घडते. तेव्हा बाहेरील उष्णता शरीराला मिळू न देणे महत्त्वाचे असते. म्हणून आपण कमी व सैलसर कपडे घालतो आणि आपले घर थंड करतो.

उष्णतेची निर्मिती आणि उत्सर्जन या दोन्ही क्रिया मेंदूतील हायपोथॅलॅमस या ग्रंथीच्या नियंत्रणात असतात. तिचे कार्य आता समजून घेऊ.

हायपोथॅलॅमसचे कार्य

ok

या ग्रंथीत तापमानसंवेदी चेतातंतू असतात. त्यातले काही तंतू उष्णसंवेदी तर काही शीतसंवेदी असतात. नेहमी या दोघांच्या समन्वयातून तापमानाचा प्रमाण बिंदू ३७ C वर स्थिरावतो. जेव्हा वातावरणातील तापमानामुळे शरीर तापमान वाढू किंवा कमी होऊ पाहते, तेव्हा तिथे विशिष्ट घडामोडी होतात आणि तापमान प्रमाण बिंदूवर नियंत्रित केले जाते.
उन्हाळा व हिवाळा या दोन्ही ऋतुत इथे कशा विरोधी घडामोडी होतात ते आता सविस्तर पाहू.

उन्हाळा :
या ऋतूत बाह्य तापमान शरीरापेक्षा खूप जास्त असते >> त्वचा, अवयव आणि रक्तामधून या ग्रंथीला संदेश जातात >> उष्ण चेतातंतू ते संदेश स्वीकारतात >> आता उष्णतेचे उत्सर्जन वाढवणे आणि निर्मिती कमी करणे असे दुहेरी उद्दिष्ट ठरवले जाते. उत्सर्जन वाढवण्यासाठी खालील गोष्टी होतात :
१. त्वचेकडील रक्तप्रवाह वाढतो आणि तिथल्या वाहिन्या प्रसरण पावतात.
२. घामाचे प्रमाण खूप वाढते
३. श्वसनगती काहीशी वाढते. त्यामुळे अधिक बाष्प बाहेर पडते.

त्याच बरोबर उष्णता निर्मिती कमी होण्यासाठी या घडामोडी होतात :
१. स्नायूंचा टोन कमी होतो
२. काही हार्मोन्सच्या प्रक्रियांमधून आपली भूक आणि चयापचय मंद केला जातो.
३. आपल्याला थंड पाणी पिण्याची आणि थंड हवामानात जाण्याची इच्छा निर्माण होते.

हिवाळा
या ऋतूत बाह्य तापमान शरीरापेक्षा खूप कमी असते >> त्वचा, अवयव आणि रक्तामधून या ग्रंथीला संदेश जातात >> शीत चेतातंतू ते संदेश स्वीकारतात >> आता उष्णतेची निर्मिती वाढवणे आणि उत्सर्जन कमी करणे असे दुहेरी उद्दिष्ट ठरवले जाते. निर्मिती वाढवण्यासाठी खालील गोष्टी होतात :

१. शरीराची थरथर वाढते.
२. स्नायूंचा टोन वाढतो
३. थायरोइड आणि अड्रीनल ग्रंथींच्या हार्मोन्सच्या प्रक्रियांमधून आपली भूक आणि चयापचय वाढवले जातात.
४. आपल्याला गरम पेये पिण्याची आणि उबदार हवामानात जाण्याची इच्छा निर्माण होते.

याचबरोबर उत्सर्जन कमी करण्यासाठी खालील गोष्टी होतात :
१. त्वचेकडील रक्तवाहिन्या आकुंचन पावतात आणि त्यामुळे रक्तप्रवाह कमी होतो.
२. शरीर आक्रसून घेतले जाते.
३. आपण उबदार कपडे घालतो.

आतापर्यंत आपण निरोगी अवस्थेतील तापमान नियंत्रण समजून घेतले. विविध आजारांमध्ये हे नियंत्रण बिघडते आणि त्यामुळे तापमान जास्त किंवा कमी होते. वाढून राहिलेल्या तापमानाला आपण “ताप आला” असे म्हणतो. त्याची कारणमीमांसा आता पाहू.

ताप येण्याची प्रक्रिया
जेव्हा शरीर तापमान ३८ C (१००.४ F) च्यावर टिकून राहते त्या अवस्थेला ताप (fever)असे म्हणतात. त्याच्या मापनानुसार त्याचे वर्गीकरण असे आहे :

तापमान ३८ – ३९ सौम्य
३९ – ४० मध्यम
४० – ४२ उच्च
>४२ तीव्र (hyperpyrexia)

इथे एक महत्त्वाचा मुद्दा सांगतो. जेव्हा आपल्याला ताप आला आहे की काय याबद्दल साशंकता वाटते, तेव्हा बऱ्याचदा आपण दुसऱ्या व्यक्तीला आपल्या कपाळावर हात ठेवून पाहण्यास सांगतो. ही अत्यंत सामान्य स्वरूपाची चाचणी आहे आणि ती संवेदनक्षम नाही. कित्येकदा शरीराचे मोजलेले तापमान 39 C चे वर असतानादेखील कपाळ गरम लागत नाही. असे बऱ्याच रुग्णांचे बाबतीत दिसून येते. तेव्हा तापाची खात्री करण्यासाठी ताप प्रत्यक्ष मोजणे हे महत्त्वाचे आहे.

ताप येण्याची महत्त्वाची कारणे :

१. जंतुसंसर्ग: यात प्रामुख्याने जीवाणू व विषाणूच्या आजारांचा समावेश आहे.
२. थायरॉईड हार्मोन्सचे अधिक्य
३. हायपोथॅलॅमसचे आजार
४. दीर्घकाळ प्रखर उष्ण हवामानाला सामोरे जाणे.

यापैकी जंतुसंसर्गाने येणारा ताप ही नित्याची घटना आहे. आपण सर्वांनी ती आयुष्यात कधी ना कधी अनुभवलेली असते. म्हणून त्याची मीमांसा करतो.
१. सूक्ष्मजंतू त्यांचे विष शरीरात सोडतात
२. त्याचा प्रतिकार रक्तातील पांढऱ्या पेशी करतात

३. या दोघांच्या लढाईतून काही तापजनक रसायने (pyrogens) सोडली जातात.
४. ही रसायने हायपोथॅलॅमसमध्ये पोचतात आणि तिथल्या चेतातंतूंना सतत उत्तेजित करतात.

५. त्यातून काही रासायनिक घडामोडी होऊन तापमान नियंत्रक बिंदू वरच्या पातळीवर नेला जातो.
६. म्हणजेच शरीर तापमान वाढते = ताप येतो

१. जंतुसंसर्गामुळे येणारे ताप हे मर्यादित काळापुरते (साधारण ४-१० दिवसांपर्यंत) टिकतात. एखाद्याला आलेला ताप दोन आठवड्यांनंतर देखील हटलेला नसेल, तर मात्र अशा तापाची गूढ कारणे शोधावी लागतात आणि त्यासाठी शरीराच्या सखोल तपासण्या कराव्या लागतात. अशा काही कारणांपैकी कर्करोग हे एक महत्त्वाचे कारण आहे. काही विशिष्ट कर्करोगात (उदा. ल्युकेमिया ) त्या कर्करोगपेशी तापजनक रसायने सोडतात >> Prostaglandins ना उत्तेजन मिळते >> हायपोथॅलॅमस वर परिणाम >> ताप. हा ताप जंतुसंसर्गाविना येतो हे विशेष.

विविध आजारांनुसार तापाची काही वैशिष्ट्ये असतात. काही आजारांमध्ये तापाच्या जोडीने रुग्णाला खूप थंडी वाजते. काहींमध्ये रात्री भरपूर घाम येतो. काही ताप सलग स्वरूपाचे असतात. तर अन्य काहींमध्ये दिवसरात्रीच्या चक्रानुसार तापमानाचे कमी-अधिक चढ-उतार होत राहतात. रुग्णाच्या अशा लक्षणांकडे बारकाईने लक्ष दिल्यास रोगनिदानास चांगली मदत होते.

तापामुळे आपल्या शरीरामध्ये अन्य काही बदल देखील घडतात. ते असे आहेत :

१. चयापचयाची गती बऱ्यापैकी वाढते. त्यामुळे अधिक ऊर्जा खर्ची पडते. त्यातून रुग्णास अशक्तपणा येतो.
२. हृदयाच्या ठोक्यांची गती आणि रक्तदाब दोन्ही वाढतात
३. श्वसनाची गती देखील वाढते.
४. भूक मंदावते आणि तापाच्या प्रमाणानुसार डिहायड्रेशन होते.

जंतूसंसर्गातून येणारा ताप हा एक प्रकारे शरीराच्या प्रतिकार शक्तीचा एक भाग असतो हे वर स्पष्ट झाले असेल. मात्र वाढता ताप हा रुग्णाला नक्कीच अस्वस्थ करतो. यासंदर्भात एक मूलभूत प्रश्न असा उपस्थित होतो, की अशा प्रसंगी आलेला ताप खरेच फायदेशीर असतो का ? हा बराच क्लिष्ट व वादग्रस्त विषय आहे. जुन्या थिअरीनुसार त्याचे उत्तर ‘हो’ असे होते. परंतु, नवीन संशोधनानंतर आलेल्या थिअरी नुसार ते उत्तर ‘नाही’ कडे झुकलेले आहे.
आता थोडक्यात या दोन्ही थिअरीज समजून घेऊ.

जुन्या थिअरीनुसार ताप फायदेशीर असतो कारण –

१.त्याच्यामुळे रक्तप्रवाहाची गती वाढते. त्यामुळे लढाऊ पांढऱ्या पेशीना संसर्गाच्या जागेवर जायला मदत होते. तसेच त्यांची मारक शक्तीही वाढते.
२.चयापचय वाढल्याने पेशींमधील दुरुस्ती प्रक्रिया वेगाने होतात.
३. काही प्रमाणात जंतूंचे पुनरुत्पादन कमी होऊ शकते

कालौघात या जुन्या थिअरीवर खूप काथ्याकूट झाला आणि तिला आव्हानही दिले गेले. त्यात म्हटल्यानुसार विविध मुद्यांसाठी ठोस पुरावे मात्र देता आले नाहीत. त्यामुळे ती मागे पडली.

नव्या थिअरीनुसार घडामोडी अशा असतात :
१. तापामुळे शरीरातील दाहप्रक्रिया वाढते.
२. चयापचयाची गती वाढल्यामुळे त्याचा शरीरावर एक प्रकारे ताण पडतो. त्यातून रुग्णाची अधिक ऊर्जा खर्ची पडते. जर का रुग्णाला हृदय किंवा श्वसनाचा दीर्घकालीन आजार पूर्वीच असेल, तर हा वाढलेला ताण त्रासदायकच ठरतो.

३. ताप जर आठवड्यातून अधिक काळ टिकून राहिला तर शरीरातील नाइट्रोजन आणि पाणी यांचा समतोल बिघडतो. डीहायड्रेशनही होऊ शकते.
४. तापातून मज्जासंस्थेला इजा पोहोचून फिट्स येऊ शकतात.

(लहान मुलांमधील तीव्र तापामुळे येणारे झटके हा विशेष तज्ञांचा प्रांत असून या लेखाच्या कक्षेबाहेरील आहे).

या सर्व मुद्यांचा साकल्याने विचार करता आता मध्यम दृष्टीकोण ठेवावा लागतो. जंतूसंसर्गानंतर ताप येणे ही अटळ घटना आहे खरी, परंतु एका मर्यादेवरील ताप हा शरीरासाठी योग्य नाही. त्यामुळे तो औषधांच्या वापराने नियंत्रित केला पाहिजे.

अतितीव्र ताप आणि उष्माघात
शरीराचे तापमान 43 C च्या वर जाणे अत्यंत घातक आहे. तीव्र उन्हाळ्यात व दमट वातावरणात जर प्रत्यक्ष श्रमाचे काम बराच वेळ केले, तर त्यातून मृत्यू उद्भवू शकतो. अशा वातावरणात शरीरातील उष्णतेचे उत्सर्जन होत नाही. त्याचबरोबर शरीरातील पाणी व सोडियम निघून जातात परिणामी रक्ताभिसरण कोलमडते.
काही देशांमध्ये तीव्र उन्हाळ्यामध्ये जेव्हा बाह्य तापमान ५० C चे वर जाते तेव्हा उघड्यावर काम करणाऱ्या श्रमजीवी व्यक्तींना सक्तीने सुट्टी जाहीर करण्याचे कायदे केलेले आहेत .
. . .

वातावरणातील तापमानात कितीही टोकाचे चढ-उतार झाले तरी आपले अंतर्गत तापमान स्थिर ठेवले जाते. हे निसर्गाने आपल्याला दिलेले एक मोठे वरदान आहे. हे तापमान स्थिर राखण्यासाठीच्या शरीरातील यंत्रणांची माहिती आपण या लेखाद्वारे करून घेतली. विविध जंतूसंसर्गामध्ये ताप येण्याच्या घटना नित्याच्याच आहेत. त्याचीही प्राथमिक माहिती या लेखात करून दिली आहे. अशा ‘ताप’दायक घटना आपल्या आयुष्यात कमीत कमी वेळा येवोत, या शुभेच्छेसह समारोप करतो.
……………………………………………………………………………………………….

जीवनमानआरोग्य

प्रतिक्रिया

स्मिता.'s picture

19 Oct 2020 - 6:03 pm | स्मिता.

साध्या-सोप्या भाषेत असलेला माहितीपूर्ण लेख! मी तुमचे लेख नेहमीच उत्सुकतेने वाचते. त्यातून वैद्यक क्षेत्रातली बरीच माहिती समजते आणि आपल्या शरीराच्या नव्याने ओळख होते. पुढील लेखांसाठी शुभेच्छा!

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

19 Oct 2020 - 7:24 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

लेखन माहितीपूर्ण आहे, डॉक्टर साहेब. ताप येतो तेव्हा, किंवा डेंग्यू, मलेरिया यात जेव्हा ताप येतो तेव्हा ओल्या रुमालाने अंग पुसून घेतो हे किती लाभदायक असते ? आपण जरा वेळ अंग पुसले की पुन्हा जैसे थे परिस्थिती होते हा तात्पुरता उपाय असेल तर करीत राहावे की कसे ? आणि तापाचे मूळ निदान न होता ज्या काही गोळ्या दिल्या जातात त्या बद्दल तापामधे तातडीने मदत होईल असे काही उपाय ? गोळ्या ?

-दिलीप बिरुटे

कुमार१'s picture

19 Oct 2020 - 7:56 pm | कुमार१

स्मिता , धन्यवाद.
प्राडॉ ,
चांगला प्रश्न.

१. ताप उतरवण्यासाठी ओल्या रुमालाने अंग पुसून घेणे हा एक तात्पुरता प्रथमोपचार आहे. त्याचा परिणाम लवकर दिसतो, पण तो ही क्रिया चालू असेपर्यंतच टिकतो. याउलट तापविरोधी औषधाचा परिणाम सुरू व्हायला वेळ लागतो, पण तो पुढे काही तास टिकतो.

म्हणून, डॉक्टर अथवा औषध उपलब्ध होईपर्यंत एक तात्पुरता उपचार म्हणून पाण्याच्या पट्ट्या ठीक आहेत. अलीकडे त्यासाठी गार ऐवजी कोमट पाणी (32 ते 35 C) वापरण्याची शिफारस केली आहे.

२.

मूळ निदान न होता ज्या काही गोळ्या दिल्या जातात त्या बद्दल तापामधे तातडीने मदत

>>>
Paracetamol ही सुरक्षित गोळी आहे.
मुलांत Aspirin देऊ नये.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

20 Oct 2020 - 2:35 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

पॅरोसिटॉमॉल ही गोळी सुरक्षित आहे या माहितीबद्दल धन्यवाद. पण, ताप आला की ताबडतोब फरक चाळीस मिनिटात घाम घेऊन रीलॅक्स फिलिंग कॉम्बीफ्लेमने वाटते, नीसीप्लस पण एक आहे, डो़कं दुखत असले की उपयोगाची. या गोळ्या पडीकच असतात आमच्याकडे. यांच्या उपयोगितेबद्दल काही ?

-दिलीप बिरुटे

कुमार१'s picture

20 Oct 2020 - 2:59 pm | कुमार१

Combi = paracet. + ibuprofen

व्यक्तीशः मी कमीत कमी औषधे वापरावी या मताचा आहे. वरील मिश्रणाने उगाचच जठराम्लता अजून वाढते. मग तसे होऊ नये म्हणून अजून एक वेगळी गोळी घ्या.... असे ते वाढत जाते.
माझ्या घरी Asp व paracet सोडून कुठलाही ‘साठा’ नसतो. या गोळ्यांची निम्मीएक स्ट्रिप कालबाह्य झाल्याने काही वर्षांनी फेकून द्यावी लागते !

ताप आला की लगेच क्रोसिन घेणे किंवा बाकी ताप उतरव्यासाठी औषध घेणे योग्य आहे का?
तुमच्या लेखातील माहिती नुसार शारीरिक क्रिया मुळेच ताप येतो.
मग त्या मध्ये जंतू संसर्ग झाला की शरीर त्याची प्रतिक्रिया देते हे एक कारण
किंवा चयापचय क्रिये मुळे तापमान वाढते हे एक कारण.
त्या मुळे एक प्रश्न उभा राहतो.
एक दिवस वाट बघून नंतर औषध घेणे योग्य आहे की लगेच ताबडतोप औषध घेणे योग्य आहे.
लगेच औषध घेवून आपण शरीराच्या कार्यात अडथळा तर आणत नाही ना.?
कारण शरीर स्वतः च झालेली तापमान वाढ कमी करण्याचे प्रयत्न करत असते .

बाप्पू's picture

19 Oct 2020 - 10:05 pm | बाप्पू

आणखी एक सहज सोपा लेख. धन्यवाद कुमार1 सर.

वर राजेश यांनी जी शंका उपस्थित केलीय ती मला देखील आहे.
शरीरामध्ये आपल्या पांढऱ्या पेशी विषाणू आणि जिवाणू चा प्रतिकार करताना शरीराचे तापमान वाढते. मग ताप आल्यावर लगेचच ताप करण्याची औषधं का घ्यायची? त्यामुळे त्या नैसर्गिक कार्यात अडथळा येत नाही का?

आपली प्रतिकारशक्ती vs विषाणू या युद्धात ताप कमी करणारी औषधे नेमकी काय भूमिका बजावतात?
अश्या वेळी ताप कमी करणारी औषधे घेण्याआधी आपण किती काळापर्यंत वाट पाहावी?

आणि आणखी ही औषधं शरीरात जाऊन नेमकी काय करतात? ब्रेन ला काही सिग्नल देतात का? कि अजुन काही?

ताप डोक्यात जातो म्हणजे नेमके काय?

काही वेळेला फक्त रात्री ताप येतो आणि सकाळी निघून जातो ( विशेषतः लहान मुलांमध्ये ) ही काय भानगड असते.?

माझ्या वरील प्रतिसादात
मग ताप आल्यावर लगेचच ताप कमी करण्याची औषधं का घ्यायची?
असे वाचावे

कुमार१'s picture

20 Oct 2020 - 9:22 am | कुमार१

राजेश व बाप्पू,
आता एकेक मुद्दे घेतो.

ताप आला की लगेच क्रोसिन घेणे किंवा बाकी ताप उतरव्यासाठी औषध घेणे योग्य आहे का?

>>>

बरोबर. लगेच औषध घेऊ नये. पण त्याचबरोबर हेही करावे:
१. दर ३-४ तासांनी ताप मोजत राहावा.
२. स्वतःच्या इतर लक्षणांवर नजर ठेवावी.
३. तापमान ३९ C चे वरच राहत असेल तर वैद्यकीय सल्ला घ्यावा.
४. ताप ही जरी शरीर प्रतिक्रियाच असली तरी तो नियंत्रित केला पाहिजे.

कुमार१'s picture

20 Oct 2020 - 9:44 am | कुमार१

उच्च तापमानामुळे मेदूवर परिणाम का होतो (“ताप डोक्यात जाणे”) >>>

जर तीव्र ताप बराच काळ टिकला तर मेंदूत असे परिणाम होतात :

१. पेशींची मोडतोड व प्रथिनांचा नाश
२. पेशींचा दाह, सूज
३. रक्तप्रवाहात अडथळा.

>>> आपल्या आकलना (cognition) वर विपरीत परिणाम >> समज, माहितीचे ग्रहण व स्मरण यांवर परिणाम.

कुमार१'s picture

20 Oct 2020 - 10:04 am | कुमार१

निरोगी अवस्थेतही आपले तापमान संध्याकाळी सर्वाधिक असते. बऱ्याच तपाजनक आजारांतही हा pattern टिकून राहतो. जेव्हा रुग्णाचे म्हणण्यानुसार ‘सकाळी बिलकूल ताप नसतो’ , तेव्हा तो प्रत्यक्ष मोजून खात्री केली पाहिजे.

२४ तासांत तापात होणारे चढउतार हे त्याच्या मूळ कारणावर अवलंबून असतात. ताप आणणारे असंख्य आजार आहेत. त्यानुसार तापमानातील चढउतार वेगवेगळे आहेत.

माहितीपूर्ण आणि आशयसंपन्न लेख!

-(गरम) सोकाजी

36.3 आणि 37.3 C असते
भावनिक आंदोलनात 2 c वाढत.
म्हणजे 39.3 c होते हे किती वेळ राहिले म्हणजे normal समजायचे?
दुसरे खूप लोकांचे तापमान हे 36.3 c पेक्षा कमी असते ते योग्य आहे का?
तापमान 36.3 पेक्षा कमी असणे हे शरीराला हानिकारक असते असते का?
असेल तर तापमान कमी झाले असेल तर ते वाढवण्यासाठी काही उपचार आहेत का?

कुमार१'s picture

20 Oct 2020 - 2:20 pm | कुमार१

सोत्रि, धन्यवाद.
राजेश,


.भावनिक आंदोलनात 2 c वाढत.

>>>
२ C याचा अर्थ जास्तीत जास्त २ ने. हे बरेचदा लहान मुलांत प्रचंड भितीमुळे येते. योग्य समुपदेशनाने ते ठीक होते.

2

. खूप लोकांचे तापमान हे 36.3 c पेक्षा कमी असते ते योग्य आहे का?

>>

होय, त्यांचा मेंदूतील प्रमाणबिंदू जरा कमीकडे झुकलेला असतो. त्याची काळजी नको.
३५ C चे खाली गेल्यास तो ‘आजार’ आहे. कारणे शोधावी लागतात.

गवि's picture

20 Oct 2020 - 3:14 pm | गवि

उत्तम लेख.

ताप उतरवणारी / वेदनाशामक औषधे होता होईल तोवर टाळतो. वेदना असह्य, म्हणजे झोप येणे अशक्य व्हावे इतक्या असतील तरच क्वचित घ्यावे असे मत. एरवी शक्य असल्यास विश्रांतीला प्राधान्य. ताप वगैरे सलग अनेक तास 103 वगैरेवर राहिला तरच तापावर औषध.

दात हा एक अवयव मात्र कधी कोपला तर नाइलाज असतो. दाती तृण धरुन शरण यावे लागते.

तुषार काळभोर's picture

22 Oct 2020 - 7:38 am | तुषार काळभोर

धन्यवाद डॉक्टर..
सुदैवाने शालेय वयानंतर कधी डॉक्टर कडे जावं लागेल एवढा ताप आलेला नाही. कधी कधी ताप आला तर शक्यतो आराम, भरपूर द्रव, भूक कमी झाली तरी नॉर्मल जेवणे असं करून अंगावर काढतो. तिसऱ्या दिवशी कमी नाही झाला तर शक्यतो disprin. घरात नसेल तर क्रोसिन. disprin शक्यतो एका गोळीनंतर झोप झाली की मस्त घाम येऊन ताप उतरतो आणि एकदम हलकं वाटतं. बऱ्याचदा दुसऱ्या गोळीची गरज पडत नाही. मात्र विना गोळी शरीराला काम करू दिले तर थकवा फार येतो.

ता. क. सध्या कंपनीत जाताना गेटवर तापमान तपासतात. आधी कपाळाला बघायचे, आता महिनाभरापासून मनगटाला बघतात. बहुधा कपाळाचे जास्त विश्वासार्ह नसावे.

कुमार१'s picture

22 Oct 2020 - 9:12 am | कुमार१

गवि, पैलवान,
धन्यवाद.

दाती तृण धरुन शरण यावे लागते.

>>> अगदी !

*

गेटवर तापमान तपासतात. आधी कपाळाला बघायचे, आता महिनाभरापासून मनगटाला बघतात. बहुधा कपाळाचे जास्त विश्वासार्ह नसावे.

चांगला मुद्दा. शरीराचे तापमान अचूक मोजायचे असल्यास तापमापक शरीराला खेटून असला पाहिजे. त्यामुळे सध्या चाचणी म्हणून लांबून वापरायच्या गन्स निघाल्या आहेत, त्या प्रमाणित तापमापकाइतक्या अचूक नाहीत.

अलीकडेच दोघांची तुलना करणारा एक लहानसा अभ्यास झाला. त्यानुसार, जेव्हा तापमान नॉर्मल असते तेव्हा या दोन्ही यंत्रांनी मोजलेले तापमान बर्‍यापैकी सारखे असते. पण तसा ताप चढत जातो तशी मग दोन्ही मापनांमधील फारकत स्पष्ट होऊ लागते.

कुमार१'s picture

16 Dec 2020 - 6:19 pm | कुमार१

चाळणी चाचणी म्हणून लांबून वापरायच्या गन्स निघाल्या आहेत, त्या प्रमाणित तापमापकाइतक्या अचूक नाहीत.

>>>>

अधिक संशोधनातून या ‘गन्स’च्या मर्यादा स्पष्ट होत आहेत. जेव्हा ताप चढू लागतो तेव्हा त्वचेखालच्या रक्तवाहिन्या आकुंचन पावतात. त्यामुळे शरीरा’बाहेर’ पडणारी उष्णता बऱ्यापैकी कमी होते. >>> गनचे मापन विश्वासार्ह राहत नाही.
जेव्हा ताप उतरू लागतो तेव्हा वरचा प्रकार बरोबर उलटा होतो.
म्हणून दोन्ही वेळेस ‘हे’ तापमान गाभ्याशी विसंगत राहते.

https://www.hopkinsmedicine.org/news/newsroom/news-releases/covid-19-sto...

सुबोध खरे's picture

16 Dec 2020 - 7:10 pm | सुबोध खरे

लेसर तापमापक हा त्वचेचे तापमान पाहण्यासाठी वापरला तर अत्यंत बेभरवशी आहे असेच दिसून येते आहे आणि असे तापमान पाहणे हा एक अत्यंत भंपक प्रकार आहे. केवळ सरकारी अधिकाऱ्यांना आम्ही कोव्हीड साठी आवश्यक सगळी काळजी घेतो हे दाखवण्यापलीकडे याचा काडीचाही उपयोग नाही

कोणत्याही मॉल किंवा तत्सम ठिकाणी जेथे येणाऱ्या प्रत्येकाचे तापमान मोजतात तेथे असलेले रजिस्टर पहा. ९० टक्के लोकांचे ८७ पासून ते ९५ अंश फॅरनहाईट असे काहीही तापमान लिहिलेले आढळते.

सुधीर कांदळकर's picture

22 Oct 2020 - 11:25 am | सुधीर कांदळकर

नेहमीप्रमाणे मुद्देसूद, माहितीपूर्ण. आवडला.

लहान मुलांमधील तीव्र तापामुळे येणारे झटके?

लहान मुलांमधील तीव्र तापामुळे येणारे झटके

यबद्दल सान्गा

कुमार१'s picture

22 Oct 2020 - 3:12 pm | कुमार१

लेखात लिहिल्याप्रमाणे हा स्वतंत्र लेखाचा विषय आहे.
भविष्यात कधीतरी घेईन.

इथे थोडक्यात नको.
धन्यवाद.

कुमार१'s picture

29 Oct 2020 - 4:29 pm | कुमार१

वरील चर्चेत काही जणांनी स्वतःचे तापमान असल्याचे लिहीले आहे. या संदर्भात एक ताजे संशोधन वाचण्यात आले. जरी ते अमेरिकेतले असले तरी त्यातले काही मुद्दे सर्वांसाठी रोचक ठरावेत.

१. ३७ हा सरासरी ‘नॉर्मल’ अंक जर्मन डॉ. कार्ल यांनी १८६७मध्ये निश्चित केला होता.
२. तेव्हापासून ते आजपर्यंत निरोगी लोकांचे तापमान मोजण्याचे अनेक अभ्यास झालेले आहेत.

३. एक गृहीतक असे आहे की दर १० वर्षांत शरीर तापमानात ०.०३ C ने घट होत आहे.

४. या मागची कारणे अभ्यासली जात आहेत. त्यामध्ये आपली शरीररचना, शारीरिक हालचालींचे बदल, उबदार निवासव्यवस्था आणि प्रतिजैविकांचा वाढता वापर यांचा समावेश आहे.

................ भविष्यातील अधिकाधिक संशोधन आता यावर काय प्रकाश टाकते ते पाहू !

कुमार१'s picture

29 Oct 2020 - 4:30 pm | कुमार१

"स्वतःचे तापमान ३७ पेक्षा कमी असल्याचे"
असे वाचावे.

लहान मुलांना ताप आल्यास sumol L + सिरप देते.पण एकदा लोकल डॉक्टरांनी viral fever मध्ये ibuprofen दिले,तरी ताप गेला नाही..नंतर hemorrhagic viral fever मध्ये ibuprofen देऊ नये असे वाचलंय. नेमक तेच दिल्याने complications वाढू शकतात का?.
Plz hemorrhagic viral fever विषयी चांगला लेख सुचवा.

कुमार१'s picture

6 Nov 2020 - 7:38 am | कुमार१

भक्ती,

Ibuprofen आणि त्या आजाराचा मुद्दा योग्यच. या औषधाने रक्तातील बिम्बिका पेशींवर परिणाम होऊ शकतो. त्यातून रक्त गोठण्याच्या प्रक्रियेत अडथळा येतो.
VHFs ची सामान्य माणसांसाठी माहिती इथे आहे

Bhakti's picture

6 Nov 2020 - 11:14 am | Bhakti

माहिती वाचून VHF हा देखील RNA virus ने होतो हे समजले.
https://www.who.int/topics/haemorrhagic_fevers_viral/en/
WHO ने दिलेली VHF ची माहिती .

तनमयी's picture

7 Nov 2020 - 11:25 am | तनमयी

nimusulide बऱ्याच ठिकाणी बॅन आहे त्यावर काय सांगता येईल
इथे तर सर्रास देतात खातात विकतात

कुमार१'s picture

7 Nov 2020 - 11:39 am | कुमार१


Nimesulide


>>

या औषधाचा एक तीव्र दुष्परिणाम म्हणजे यकृताला होणारी गंभीर इजा. ती विचारात घेता अमेरिका आणि काही युरोपीय देशांनी त्याच्यावर बंदी घातलेली आहे. मात्र अन्य बऱ्याच देशात ते अजूनही मिळते.

भारतात हे औषध बारा वर्षाखालील मुलांसाठी वापरू नये असा संकेत आहे. विकिपीडियाच्या माहितीनुसार लहान मुलांसाठीचे याचे उत्पादन आता बंद आहे.
वैद्यकीय सल्ल्याशिवाय आणि दीर्घ मुदतीसाठी तर हे औषध घेऊ नयेच.

तनमयी's picture

7 Nov 2020 - 11:42 am | तनमयी

Mefenamic acid जास्त ताप असला कि द्या असं सांगतात
दुसरे dr जास्त देत नाहीत
त्याने cough वाढतो असं म्हणतात .
अजून एक कॉम्बो आहे पॅरासिटामोल विथ मेफनीक ऍसिड
अशी औषध dr लहान मुलांना देतायत
यावर काय सांगणार

मला डॉक्टरांनी Sumol + 7 ml सांगितले आहे ते पण १००F. Fever असेल तर.otherwise कोमट पाण्याने पुसून fast पंखा लावयचा.

तनमयी's picture

7 Nov 2020 - 11:43 am | तनमयी

Ibuprofen ने माझ्या मुलाला प्रॉब्लेम झालेला
याला एडिमा आलेला

आता आम्ही पॅरासिटामोल आणि पान्याने पुसणे हेच वापरतो

Bhakti's picture

7 Nov 2020 - 11:58 am | Bhakti

बरोबर.. That's first step performed at home.कोमट पाण्यानं पुसून फास्ट पंखा लावयचा.

तनमयी's picture

7 Nov 2020 - 11:47 am | तनमयी

आता मोठा झालाय
आता इम्युनिटी वाढली असावी
लहान असताना खूप वेळा viral फेवर व्हयायचा
दर महिन्याला औषधांचा मारा करावा लागायचा
आता ठीक आहे सर्व

Bhakti's picture

7 Nov 2020 - 12:08 pm | Bhakti

येस
Immunity Booster वर साध्या माझा भर आहे.
त्यात बीट (कोशिंबीर,शिरा ,धपाटे)पपई, डाळिंब ज्यूस यांचा समावेश रोज आहे.पपई पानांचा रस मागविणार आहे.
Eat Apple Day Keep Doctor Away असंही म्हणू शकत नाही.किती इंजेक्शन्स दिली असतात.सो नो doctor says Apple . निदान आमच्या कडे तरी फ्रेश apple नाही मिळत.

कुमार१'s picture

7 Nov 2020 - 11:58 am | कुमार१


Mefenamic acid

या औषधाचे दुष्परिणाम : जठराचे अल्सर, यकृतदाह. अर्थात हे किती डोस व काळ घेणार यावर अवलंबून.
काहींना त्वचेची तीव्र अलर्जी होऊ शकते.

तज्ञाने हे औषध देताना रुग्णात खालील मुद्दे नसल्याचे बघावे:
• रक्तन्यूनता
• श्वासनलिकांतील अडथळा
• हृदय, यकृत वा मूत्रपिंडाचे आजार.

संबंधित रुग्ण-परिस्थिती आणि तज्ञाचे अनुभवानुसार वापर ठरेल.

शेखरमोघे's picture

17 Dec 2020 - 8:49 pm | शेखरमोघे

नेहेमीसारखाच माहितीपूर्ण, अनेक मुद्दे विचारात घेऊन लिहिलेला लेख.
"तापमानसंवेदी चेतातंतू" या सारखे शब्दप्रयोग देखील आवडले.

कुमार१'s picture

13 Mar 2021 - 4:45 pm | कुमार१

पुन्हा एकदा कोविडचे रुग्ण वाढू लागल्याने ‘गन’चा वापर करून सार्वजनिक ठिकाणी लोकांचे तापमान मोजणे वाढू लागेल. गनला शेवटी मर्यादा आहेतच. तरीसुद्धा चाळणी चाचणी म्हणून तिचा वापर करताना तज्ज्ञांनी खालील सूचना केल्या आहेत :

१. एखादी व्यक्ती उन्हातून इमारतीत शिरल्यावर काही मिनिटे थांबून मगच तापमान मोजावे.
२. जिचे तापमान मोजायचे आहे त्या व्यक्तीने डोक्यावरील टोपी आणि चष्मा काढून ठेवावा.
३. तसेच जर डोक्यावरील केस बरेच लोंबत असतील तर ते हाताने बऱ्यापैकी मागे सारावेत.

त्यांच्या मध्ये गंभीर लक्षण पहिल्या पेक्षा जास्त वाढली आहेत का?
मृत्यू चे प्रमाण वाढले आहे का?
की.
फक्त कोणतेच लक्षण नसलेले corona रुग्णांची संख्या वाढली आहे.
फक्त संख्या वाढली असेल पण लक्षण सौम्य असतील तर त्याचा अर्थ काय काढला पाहिजे.